राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशन केलेले..२०७ पानांचे 'नरभक्षकाच्या मागावर' या पुस्तकाचे मुळ लेखक केनेथ अँडरसन हे आहेत,तर या पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखक संजय बापट यांनी केला आहे.(त्यांच्याशी सहजच वरील पुस्तका संदर्भात बोलत असताना) जे मूळ इंग्रजी पुस्तक त्यांनी त्यांच्या आयुष्यात ५० वर्षांपुर्वी वाचले होते.त्यांनी ते पुस्तक मला आवर्जून वाचण्यास सांगितले होते.ते पुस्तक म्हणजेच मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे)
...दिसेना. परत मचाणापर्यंत उतरून मी आडव्या पसरलेल्या फांद्याच्या टोकापर्यंत गेलो पण तिथून सुद्धा बिबळ्या गेल्याच्या दिशेला काहीच दिसत नव्हतं. यावेळी तीन वाजले होते.दोन तासानंतर चंद्रप्रकाश फिका होऊ लागला व जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसू लागल्या तसा मी झाडावरून उतरलो.बोकडाने माझं बें बें करून स्वागत केलं.बोकडाच्या पलीकडे रस्त्याच्या कडेला एक बसका लांबुळका खडक होता व
त्यावर इंचभर जाडीचा रक्ताचा माग होता.अशाप्रकारे रक्त अंगातून गेल्यावर कोणताही बिबळ्या दोन मिनिटांच्या वर जगू शकत नाही.
त्यामुळे शिकारी प्राण्यांच्या मागावर जाताना घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही खबरदाऱ्या मुळीच न घेता मी रस्त्यावरून खाली उतरलो आणि खडकापलीकडे रक्ताचा माग काढायला सुरूवात केली.तसाच पुढे पन्नास यार्ड माग काढल्यावर मला तो बिबळ्या मरून पडलेला दिसला. जमीनीवरच्या एका उथळ खळग्यात मागे घसरून तो पडला होता व त्याची हनुवटी खळग्याच्या कडेवरती स्थिर झाली होती.
हा नरभक्षकच आहे हे ओळखण्यासाठी कोणतीच खूण समोर दिसत नव्हती तरी यावेळी क्षणभरसुद्धा मला शंका नव्हती ! पण इथे तर कोणताही सैतान,भूत किंवा दुष्टात्मा नव्हता.माझी सर्व धडपड लपून बघत,सैतानी हास्य करत मी केव्हा बेसावध राहतोय याची वाट पहात जिभल्या चाटणारं दृष्ट जनावर नव्हतं... इथे एक साधा वयस्क बिबळ्या होता... इतर जातभाईपेक्षा थोडे फार फरक असलेला ! त्याच्या मानेवरचे केस राखाडी झाले होते,मिशा नव्हत्याच.सर्वांकडून भीती व तिरस्काराला पात्र झालेल्या ह्या जनावराचा एकच गुन्हा होता, निसर्गाच्या दृष्टीने फारसा नव्हे तर माणसाच्या दृष्टीकोनातून कारण त्याने माणसाचं रक्त वाहवलं होतं. पण ते माणसावर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा त्याला दहशतीखाली ठेवण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि आत्ता तो हनुवटी जमीनीला लावून चिरनिद्रा घेत होता ! ज्या रायफलच्या एका बुलेटमुळे माझे व त्या बिबळ्यामधले आजपर्यंतचे सर्व हिशेब चुकते झाले होते त्या रायफलमधल्या उरलेल्या बुलेट्स मी काढून ठेवत होतो.
तेवढ्यात मला खोकल्याचा आवाज आला.वर पाहिलं तर रस्त्याच्या कडेवरून वाकून पाहणरा पंडित दिसला.मी त्याला खुणेनेच बोलावलं तसा तोही लगबगीने खाली आला पण त्याला बिबळ्याचं डोकं दिसताच तो जागीच थबकला आणि मला अगदी दबक्या आवाजात विचारलं की तो मेलाय का? व ते काय आहे? तो मेला आहे व पाच वर्षापूर्वी त्याचा गळा धरणारा तोच सैतान आहे असं उत्तर दिल्यावर त्याने हात जोडले व माझ्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात रस्त्यावरून "साहेब,तुम्ही कुठे आहात?" अशी हाक आली.आमच्याच एका माणसाचा आवाज होता.मी जेव्हा 'ओ-दिली तेव्हा रस्त्यावर चार डोकी उगवली आणि आम्हाला पाहातच घाईघाईने डोंगर उतरून आली.त्यातल्या एकाच्या हातात पेटलेला कंदील होता... तो विझवायला विसरला होता.
त्या खळग्यात बिबळ्याचं अंग ताठ झालं होतं त्यामुळे तिथून त्याला बाहेर काढताना बरीच खटपट करावी लागली.आमच्या माणसांनी येताना बांबूही आणले होते आणि त्या बांबूला आम्ही बिबळ्याचं धूड बांधताना माणसं म्हणाली की रात्री त्यांना झोप लागली नव्हती. बंगल्याच्या जमादाराच्या घड्याळात ४.३० वाजलेले पहाताच त्यांनी कंदील पेटवला आणि बांबू व दोऱ्या घेऊन ते मला भेटायला निघाले.त्यांना वाटलं होतं की मला काहीतरी मदतीची गरज आहे.पण इथे मचाणावरही मी नाही,
बोकडही सुरक्षित आहे हे पाहिल्यावर त्यांना वाटलं की बिबळ्याने माझाही बळी घेतलाय व आता पुढे काय करायचं हे न कळल्याने त्यांनी मला हाका मारल्या होत्या.माझा रग मचाणावरून आणण्यासाठी व काल रात्रीची घटना यात्रेकरूंना तिखटमीठ लावून सांगण्यासाठी पंडितला तिथेच ठेवून मी,ती चार माणसं व दुडक्या चालीने चालणारा तो बोकड असे सर्वजण आम्ही बंगल्याकडे निघालो. बिबळ्याने ज्या क्षणी झडप मारली त्या क्षणीच त्याला माझी गोळी लागल्याने तो बोकड छोट्या जखमेनिशी बचावला होता.त्याला आता जाणीवही नव्हती की त्याच्या काल रात्रीच्या साहसामुळे तो उर्वरित आयुष्य एखाद्या 'हिरो' सारखं जगणार आहे त्याला एक सुंदर पितळी कॉलर बक्षीस मिळणार आहे आणि त्याच्या मालकासाठी तो एक उत्पन्नाचं साधन बनणार आहे.
मी दरवाजा खटखटवला तेव्हा इबॉटसन झोपला होता. काचेतून मला पाहताच तो बेडवरून उडी मारून उठला व दरवाजा उघडला.त्याने मला आनंदाने मिठीच भारली आणि दुसऱ्या मिनिटाला व्हरांड्यावर ठेवलेल्या बिबळ्याच्या धूडाभोवती नाचायला लागला.जोरजोरात ओरडून त्याने माझ्यासाठी चहा व गरम पाणी काढायच्या ऑर्डर्स दिल्या,स्टेनोग्राफरला बोलावलं, आणि शासन,प्रसारमाध्यमं,जीन व माझी बहीण यांच्यासाठीच्या टेलिग्रामच डिक्टेशन देऊ लागला.
त्याने मला अक्षरशः एकही प्रश्न विचारला नाही.त्याला माहीत होतं की इतक्या सकाळी मी इथे आणलेला तो बिबळ्या नरभक्षकच होता.मग प्रश्नांची गरजच काय होती?मागच्या वेळेला सर्व पुरावे समोर दिसत असूनही मी ठाम राहिलो होतो की आम्ही जिनटॅपमध्ये मारलेला बिबळ्या नरभक्षक नाही आणि यावेळी मी काहीच बोललो नव्हतो !
मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून त्याच्या खांद्यावर फारच मोठी जवाबदारी येऊन पडली होती. मतदारांना खूष ठेवायला बघणाऱ्या राजकारणी लोकांना,दररोजच्या वाढत्या नरबळींमुळे दबाव आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना,वरिष्ठांना आणि प्रसारमाध्यमांना त्यालाच तोंड द्यावं लागत होत.एखादा गुन्हेगार माहीत आहे पण तो गुन्हे मात्र थाबवू शकत नाही आणि त्यामुळे सगळीकडून थपडा खाव्या लागणाऱ्या पोलीस ऑफिसरसारखी त्याची अवस्था झाली होती.त्यामुळे २ मे १९२६ रोजी इबॉटसन हा जगातला सर्वात आनंदी माणूस होता यात नवल नव्हतं ! आता तो सर्वांना छाती ठोकून सांगू शकणार होता की त्या नरभक्षकाचा आता खातमा झालाय. त्याचप्रमाणे आसपासच्या गावातल्या लोकांना, यात्रेकरूंना,बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये हळूहळू जमणाऱ्या लोकांना तो सांगू शकणार होता की त्यांना सतत आठ वर्ष छळणारी 'सैतानी शक्ती' आता नष्ट झाली आहे.चहाचं भांडं रिकामं केल्यावर आणि गरम पाण्याने आंघोळ केल्यावर मी थोडा झोपायचा प्रयत्न केला,पण नाही! माझ्या पायाला पेटके आले होते व पाय मुरगळल्यासारखा झाला होता.केवळ इबॉटसनने केलेल्या मसाजमुळेच जरा बरं वाटतं होतं.तसे पेटके परत येतील या भीतीने मी झोपू शकलो नाही.
शेवटी मी उठलो आणि आम्ही दोघांनी बिबळ्याची मोजमापं घेतली,काळजीपूर्वक निरीक्षण केलं. ही निरीक्षणं खाली देत आहे.
मापं…
लांबी : बिटवीन द पेग्ज - ७ फूट ६ इंच
लांबी : ओव्हर द कर्व्हज - ७ फूट १० इंच
(बिबळ्या मेल्यानंतर १२ तासांनी ही मापं घेतली आहेत.)
निरीक्षणे
रंग: फिक्कट गवती
केस : आखूड व गळणारे
मिशा : नाहीत
जीभ व तोंड : काळा रंग
जखमा : उजव्या खांद्यावर ताजी बुलेटची जखम
मागच्या डाव्या पंजाला जुन्या रायफलच्या गोळीने झालेली जखम व एक चवडा व नख गायब.
डोळ्यावर बऱ्याच खोल पण अर्धवट भरलेल्या जखमा
शेपटीवर बऱ्याच पण अर्धवट भरलेल्या जखमा
मागच्या डाव्या पायाच्या स्टीफलवर एक छोटीशी जखम.
तोडांच्या व जिभेच्या काळ्या रंगाबाबत मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही,कदाचित सायनाईडमुळे पण तसं झालं असावं असं काहींचं म्हणणं आहे. अर्धवट भरलेल्या जखमांपैकी डोकं,उजवा मागचा पाय आणि शेपटीला झालेल्या जखमा त्याच्या भैंसवाड्याला झालेल्या लढाईत झाल्या होत्या.डाव्या मागच्या पायाच्या स्टीफलला झालेली जखम जिनट्रॅपमध्ये अडकल्यामुळे झाली होती,कारण ट्रॅपमध्ये सापडलेला कातडीचा तुकडा व केस यात चपखल बसले.मागच्या डाव्या पायाची जखम १९२१ मध्ये त्या तरूण आर्मी ऑफिसरने ब्रिजवरून झाडलेल्या गोळीमुळे झाली होती.बिबळ्याची कातडी काढताना मला बंदुकीचा एक छर्रा त्याच्या छातीजवळच्या कातडीत अडकलेला मिळाला.जवळ जवळ वर्षभरानंतर एका भारतीय ख्रिश्चन माणसाने तो छर्रा ज्यावर्षी बिबळ्या नरभक्षक झाला त्या वर्षी त्याने मारलेल्या गोळीतला आहे हे कबूल केलं.ही सर्व मोजमापं व निरीक्षण झाल्यावर त्याचं धूड एका झाडाच्या सावलीत ठेवण्यात आलं आणि संपूर्ण दिवसभर हजारो माणसं,बायका व मुलं त्याला बघायला येत राहिली.जेव्हा आमच्या भागातली पहाडी लोकं एखाद्याला काही विशिष्ट उद्देशाने भेटतात उदा.आभार मानण्यासाठी वगैरे,तेव्हा या मोहिमेवर रिकाम्या हाताने जाऊ नये असा रिवाज पाळला जातो.
एखादं गुलाबाचं,चमेलीचं फूल किंवा पाकळ्या पुरेशा असतात व हाताची ओंजळ करून ही भेट दिली जाते. भेट स्वीकारणाऱ्याने उजव्या हाताच्या बोटांचा स्पर्श त्या वस्तूला केला की देणारा माणूस ओंजळ सोडून घेणाऱ्याच्या पायावर ती फुलं टाकतो,जसं ओंजळीने पाणी टाकावं तसं !
मी इतरही अनेक प्रसंगात असे आभार स्वीकारले आहेत.पण त्या दिवशी रुद्रप्रयागमध्ये मात्र प्रथम बंगल्यावर आणि नंतर बाजारात भरलेला सोहळा केवळ अविस्मरणीय होता.
"त्याने माझ्या एकुलत्या एका पोराला मारलंय साहेब आणि आता म्हातारपणी आम्हाला कोणी नाही."
"माझ्या पाच पोरांच्या आईचा त्याने बळी घेतला,सर्वांत धाकटा तर फक्त काही महिन्यांचा आहे.आता पोरांचा सांभाळ करायला,जेवण करायला घरात कोणी नाही."
"माझा पोरगा रात्री खूप आजारी पडला पण रात्री दवाखान्यात जायची कोणाचीच छाती झाली नाही आणि त्यातच तो दगावला."
एकापेक्षा एक शोकांतिका... पण ते दुःस्वप्न आता संपलं होतं. आणि त्या ऐकत असताना माझ्या पायावर फुलांचा व पाकळ्यांचा सडा पडत होता !
भरतवाक्य…
या पुस्तकात मी सांगितलेली गोष्ट १९२५ ते १९२६ या काळातली आहे.त्यानंतर १९ वर्षांनी म्हणजे १९४२ साली मी मीरत येथे युद्धासंदर्भातल्या कामात होतो. मला आणि माझ्या बहिणीला एक दिवस जखमी सैनिकांची करमणूक करण्यासाठी कर्नल फ्लायनी एका गार्डन पार्टीला येण्याचं निमंत्रण दिलं.
भारताच्या सर्व भागातून आलेली पन्नास-साठ माणसं एका टेनिस कोर्टवर नुकताच चहा संपवून बसली होती आणि आता जरा हास्यविनोदाच्या व धूम्रपानाच्या मूडमध्ये होती.अशातच आम्ही पोचलो आणि कोर्टाच्या पलीकडच्या बाजूने मी व माझ्या बहिणीने बाहेरच्या रांगेतून हळूहळू फिरायला सुरुवात केली.
सर्वच लोक मध्यपूर्वेकडचे होते आणि थोडी विश्रांती घेऊन त्यांच्या त्यांच्या घरी जाणार होते;काहीजण रजेवर तर काही डिस्चार्जवर.
फ्लायमॅडमने भारतीय संगीताच्या रेकॉर्ड ग्रामोफोनवर वाजवण्याची व्यवस्था केली होती. पार्टी संपेपर्यंत आम्ही दोघांनी तिथे रहावं अशी त्यांनी विनंती केल्याने आम्हाला जखमी सैनिकांशी बोलायला बराच वेळ उपलब्ध होता.
फिरत फिरत आम्ही एक अर्धवर्तुळ पूर्ण केलं असेल तसा आम्हाला एक पोरगेलेसा सैनिक छोट्या खुर्चीवर बसलेला दिसला.तो जबर जखमी झाला होता.त्याच्या खुर्चीशेजारी दोन कुबड्याही होत्या.मी जवळ आल्यावर तो मोठ्या कष्टाने खुर्चीवरून उठला आणि माझ्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करू लागला.बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्याने त्याचं वजन बरंच घटलं होतं.मी त्याला उचलून परत खुर्चीवर ठेवलं तेव्हा तो म्हणाला,"मी मघाशी तुमच्या बहिणीशी बोलत होतो आणि जेव्हा मी त्यांना मी गढवाली आहे असं सांगितलं तेव्हा त्यांनी मला तुम्ही कोण आहात हे सांगितलं."तुम्ही त्या बिबळ्याला मारलेंत तेव्हा मी खूप छोटा होतो.माझं गाव रुद्रप्रयागपासून बरंच दूर दूर होतं.
मलाही त्यादिवशी रुद्रप्रयागला यायचं होतं.पण मी इतकं अंतर चालू शकणार नव्हतो.माझे वडील मला खांद्यावरून घेऊन जाऊ शकतील इतके ताकदवान नव्हते.घरी परतल्यावर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी बिबळ्याला बघितलं आणि त्याला ज्या साहेबाने मारलं त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं.त्या दिवशी सर्वांना मिठाई वाटण्यात आली होती आणि त्यांच्या वाट्याची मिठाई त्यांनी माझ्यासाठी आणली होती.
आता मीही घरी जाऊन सांगू शकेन की मी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलंय ! दरवर्षी रुद्रप्रगाला नरभक्षकाचा मृत्यू साजरा करण्यासाठी मोठी जत्रा भरते.त्या जागेवर मला घेऊन जाणारा कोणी भेटला तर मी सर्वांना सांगेन की तुम्ही मला भेटलात !
असा आहे आमचा गढवाली माणूस ! हा मुलगा ऐन जवानीच्या उंबरठ्यावरचा होता आणि एक युद्ध गाजवून जखमी होऊन आला होता.पण स्वतःच्या शौर्याच्या कथा सांगण्याऐवजी १९ वर्षापूर्वी रुद्रप्रयागच्या एका बिबळ्याला मारणाऱ्या माणसाला त्याने पाहिलंय एवढंच तो त्याच्या बापाला व इतर सर्वांना सांगणार होता.
१२.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग..।
'रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या' या लेखापासून व ०९.०७.२३ या तारखेपासून आपण हे पुस्तकच क्रमशः प्रकाशित करीत आलेलो आहोत.दोन मोकळ्या पानासहीत १६० पानांचे हे पुस्तक आज संपले.'अंधारातील नेम' या लेखातील हा तिसरा व पुस्तकातील शेवटचा भाग .. या बद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार…- विजय गायकवाड..!!