ज्या प्राचीन भारताच्या लखलखत्या,वैभवशाली खजिन्याविषयी आपण बोलतोय,तो ज्ञानाचा खजिना नेमका गेला कुठे..? हे अत्यंत अमूल्य असे प्राचीन ज्ञान कुठे हरवले..? अनेक गोष्टी आपण भारतीयांनी सर्वप्रथम शोधल्या असे आपण म्हणतो,त्या गोष्टी नेमक्या कुठे विखरून गेल्या..? असे प्रश्न अनेक जण विचारतात.असे प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे.एके काळी अत्यंत समृद्ध असलेला आपला देश इतका गरीब कसा काय झाला..? त्या प्राचीन ज्ञानाचा काहीच उपयोग झाला नाही का..? असेही प्रश्न समोर येतात.
काहीजण तर खवचटपणे असेही म्हणतात की,'जगात एखादा नवीन शोध लागला की,प्राचीन भारताची ही अभिमानी मंडळी ताबडतोब उसळी मारून समोर येतात आणि म्हणतात की,हा शोध तर भारतीयांनी फार आधीच लावला होता...!'
असे अनेक प्रश्न आणि अनेक आरोप... मग खरी वस्तुस्थिती काय आहे..?
पहिली गोष्ट ही की,त्या काळात आपला देश हा संपत्तीने आणि संस्कृतीने सर्वांत समृद्ध असलेला देश होता. आणि ही माहिती जगभर होती.म्हणूनच जगज्जेत्या म्हणवल्या जाणाऱ्या सिकंदरला (अलेक्झांडरला) अगदी लहानपणापासून वाटत होतं की,भारताला जिंकून घ्यावं.अकराव्या शतकापासून भारतावर आक्रमण करणाऱ्या मुसलमान आक्रमकांना भुरळ पडली होती ती भारताच्या वैभवाची.
भारताला जाण्यासाठी म्हणून निघालेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला,तर वास्को-डी-गामा,मार्को पोलो या लोकांना भारताचे प्रचंड आकर्षण होते.
थोडक्यात,आपल्यासारख्या समृद्ध देशाबद्दल जगाला कुतूहल असणे स्वाभाविकच होते.आणि ही समृद्धी आपण आपल्या ज्ञानाच्या बळावर मिळवलेली होती.( भारतीय ज्ञानाचा खजिना,
प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )
हे ज्ञान कशा स्वरूपात आपल्या देशात जतन करून ठेवलं होतं..? त्या काळात छपाईचे तंत्रज्ञान अवगत नसल्याने ग्रंथ नकलून घेत.ते ग्रंथ लिहिणे,अर्थात नकलून घेणे,हा एक सोहळाच असायचा.
रामायण, गीता,महाभारत,वेद,उपनिषदे यांसारखे ग्रंथ नकलून घेण्यास महिनोन् महिने लागत.अगदी व्युत्पन्न शास्त्र्यांच्या घरीही फारसे ग्रंथ किंवा पोथ्या नसत.
हे ग्रंथ किंवा पोथ्या ठेवण्याच्या जागा म्हणजे विद्यापीठं, गुरुकुल आश्रम,मठं,देवस्थानं आणि मंदिरं.या ठिकाणी हे ग्रंथ अगदी भक्तिभावाने आणि व्यवस्थित ठेवलेले असायचे.
विद्यापीठांमध्ये मोठमोठी ग्रंथालयं होती.नालंदाच्या ग्रंथालयाबद्दल इतिहासात तुटक,तुटक माहिती आढळते.मात्र निश्चित आणि भरभक्कम पुरावा मिळाला तो हिंदीचे प्रसिद्ध लेखक आणि संशोधक राहुल सांकृत्यायन (१८९३ - १९६३) यांना.हे बौद्ध धर्माचे अभ्यासक होते.बौद्ध धर्माच्या प्राचीन ग्रंथांसाठी यांनी तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत अनेक प्रवास केले.तिबेटला तर ते अनेकदा गेले.त्या काळात तिबेटवर चीनचे आक्रमण झालेले नव्हते.तिबेटच्या तत्कालीन सरकारने त्यांना विशिष्ट अतिथीचा दर्जा दिलेला होता आणि त्यांना कोणत्याही बौद्ध मंदिरात जाण्याचा मुक्त परवाना होता.राहुल सांकृत्यायननी याचा चांगला उपयोग करून घेतला.पाली आणि संस्कृत भाषेतले अनेक प्राचीन ग्रंथ त्यांनी वाचले आणि त्यांतले बरेचसे भारतातही आणले. याच प्रवासात मध्य तिबेटच्या एका बौद्ध आश्रमात त्यांना एक महत्त्वाचा ग्रंथ मिळाला.
बाराव्या,तेराव्या शतकांतील तिबेटी भिख्खू,'धर्मस्वामी' (मूळ नाव चागलोत्सावा. ११९७ - १२६४) ने लिहिलेला हा ग्रंथ.हा धर्मस्वामी सन १२३० च्या सुमारास नालंदाला भेट द्यायला गेला.बख्तियार खिलजीने ११९३ मध्ये नालंदाला उद्ध्वस्त केले होते.त्यामुळे नालंदाचे ग्रंथालय आणि नंतरचा तो विध्वंस डोळ्यांनी बघितलेली माणसं तिथं होती.त्या उद्ध्वस्त नालंदाच्या परिसरात फक्त सत्तर विद्यार्थी,'राहुल श्रीभद्र' ह्या ऐंशी वर्षांच्या बौद्ध शिक्षकाकडे विद्याध्ययन घेत होती.आणि या सर्वांची काळजी घेत होता,जयदेव नावाचा एक ब्राम्हण.या सर्वांशी बोलून धर्मस्वामीने जे चित्र नालंदाचे उभे केले आहे,ते भव्य आणि समृद्ध अशा विद्यापीठाचे आहे.दहा हजार विद्यार्थी,दोन हजार शिक्षक आणि संशोधक असलेले हे विद्यापीठ होते.
विद्यापीठाचे ग्रंथालय देखील विद्यापीठासारखेच प्रचंड होते. 'धर्मगंगा' नाव असलेल्या ह्या ग्रंथालय परिसरात तीन मोठमोठ्या इमारती होत्या.त्यांची नावं होती - रत्नसागर,रत्नोदधी आणि रत्नगंजका.यांतल्या रत्नोदधी ह्या नऊ मजल्याच्या (होय,नऊ मजल्याच्या. धर्मस्वामीने तसा उल्लेख त्याच्या पुस्तकात केला आहे.आणि ह्यूएनत्संग सकट काही चिनी प्रवासी-विद्यार्थ्यांनीही नऊ मजली उंच इमारतीचा उल्लेख केलाय.) इमारतीत अनेक प्राचीन (त्या काळातील प्राचीन.अर्थात त्या काळापूर्वी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे.अर्थातच ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांचे) ग्रंथ सुरक्षितपणे ठेवण्यात आलेले होते.या दुर्मीळ ग्रंथांपैकी 'प्रज्ञापर मिता सूत्र' या ग्रंथाचा उल्लेख धर्मस्वामी करतोय.प्राचीन चिनी संशोधक झुआन झांग हा ह्या ग्रंथालयासंदर्भात लिहितो -'हा संपूर्ण ग्रंथालय परिसर, विटेच्या भिंतींनी बंदिस्त होता.या परिसराला एकच मोठे दार होते, जे उघडल्यावर आत आठ मोठमोठी दालनं दिसायची.ह्या ग्रंथालयात किती ग्रंथ असतील..? अक्षरशः अगणित.हजारो.कदाचित लाखो पण.आणि ग्रंथ म्हणजे हस्तलिखितं.भूर्जपत्रांवर,ताम्रपत्रांवर आणि कागदांवरही लिहिलेली.दुर्मीळ,प्राचीन अशी ही अमाप ग्रंथसंपदा.
बख्तियार खिलजी ह्या क्रूरकर्त्यानं ही सारी ग्रंथसंपदा जाळली.
आणि हे सर्व ग्रंथभांडार जाळून नष्ट करायला त्याला तीन महिन्यांपेक्षाही जास्त वेळ लागला..!
कोण होता हा बख्तियार खिलजी..?
'इख्तीयारुद्दिन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी' या लांबलचक नावाचा हा प्राणी आताच्या दक्षिण अफगाणिस्तानातल्या 'गर्मसीर' ह्या लहानशा गावातला एक टोळीप्रमुख.पुढे हा कुतुबुद्दीन ऐबकच्या सैन्यात सेनापती झाला आणि दिल्ली बळकावल्यावर ऐबकाने त्याला बिहार आणि बंगाल जिंकायला पाठवले.
११९३ मध्ये याने नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला आणि विद्यापीठातील अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथसंग्रह जाळून टाकला.सतत तीन महिने त्याचं सैन्य ग्रंथालयातून पुस्तकं आणून आगीत टाकत होतं. पण तरीही पुस्तकं उरतच होती.इतका विशाल ग्रंथसंग्रह होता तो.बख्तियार खिलजीनं फक्त नालंदाचं ग्रंथभांडारच नाही जाळलं,तर बंगाल मधल्या विक्रमशिला आणि उड्डयनपूर या विद्यापीठांनाही जाळून उद्ध्वस्त केलं.तिथलाही असाच मोठा ग्रंथसंग्रह नष्ट केला गेला.दुर्दैवाने हा क्रूरकर्मा बख्तियार खिलजी आज 'बांगला देशचा' राष्ट्रीय नायक आहे..!
नालंदा विश्वविद्यालय हे त्या काळातील सर्वांत मोठं विद्यापीठ असल्याने त्याला नष्ट करण्याची,त्यातील पुस्तक जाळून टाकण्याची बातमी इतिहासकारांनी नोंदवून घेतली.मात्र आपल्या खंडप्राय असलेल्या विशाल देशात अशी अनेक लहान-मोठी विद्यापीठं आणि कितीतरी गुरुकुलं होती.पुढच्या दोनशे-तीनशे वर्षांच्या काळात या ठिकाणची ग्रंथसंपत्ती ही,मुस्लीम आक्रमकांद्वारे अशाच प्रकारे नष्ट करण्यात आली.
बाराव्या शतकानंतर, भारतात विद्यापीठं नष्ट झाल्याने वेगवेगळ्या विषयांवर होत असलेले संशोधनाचे प्रकल्प बंद पडले. भारतीय ज्ञानाचा हा ओघच थांबला. उच्च स्तरावरचं ज्ञान घेणं आणि देणं, नुसतं कठीणच नाही, तर अशक्य झालं. ग्रंथांची निर्मिती थांबली. आणि म्हणूनच अगदी अपवाद वगळता, बाराव्या शतकानंतर लिहिलेले महत्वाचे अथवा मौलिक ग्रंथ आढळत नाहीत.
अकराव्या शतकात,माळव्याचा राजा भोज याने संकलित केलेला 'समरांगण सूत्रधार' हा महत्त्वाचा ग्रंथ.यात ८३ अध्याय असून अनेक विषयांसंबंधी लिहिलेले आहे.पुढे अठराव्या शतकात जगन्नाथ पंडिताने 'सिद्धांत कौस्तुभ' हा खगोलशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला आहे.पण हे तसे अपवादच.आपलं प्रचंड मोठं ज्ञानभांडार मुस्लीम आक्रमकांनी नष्ट केल्या-मुळे ज्ञानाचा जिवंत आणि खळाळता प्रवाह आटला. थांबला.त्यातूनही जे तुरळक ग्रंथ शिल्लक होते,ते इंग्रजांनी आणि इतर युरोपियनांनी आपापल्या देशात नेले.खगोलशास्त्रावरील 'नारदीय सिद्धांता'चा ग्रंथ आज भारतात उपलब्धच नाही.अर्थात त्याचे कोणतेही हस्तलिखित आपल्याजवळ नाही.
मात्र बर्लिनच्या प्राचीन ग्रंथसंग्रहालयात हा ग्रंथ (त्याच्या मूळ हस्तलिखित स्वरूपात) उपलब्ध आहे.(Webar Catalogue no.862). खगोलशास्त्रावरचाच 'धर्मत्तारा पुराणातील' सोम चंद्र सिद्धान्तावरील ग्रंथ भारतात मिळतच नाही.त्याचे हस्तलिखित बर्लिनच्या संग्रहालयात आहे (Webar Catalogue no.840). प्राचीन खगोलशास्त्रात 'वसिष्ठ सिद्धांत' महत्त्वाचा मानला जातो.या सिद्धांताचे उल्लेख अनेक ठिकाणी येतात.या ग्रंथाचेही हस्तलिखित भारतात उपलब्ध नाही.
ते आहे - इंग्लंडमधल्या मेकेंजी संग्रहालयाच्या विल्सन कॅटेलॉग मध्ये १२१ व्या क्रमांकावर..! आर्यभटाचे 'आर्यअष्टकशतः' आणि 'दशगीतिका' हे दोन्ही दुर्मीळ ग्रंथ बर्लिनच्या वेबर कॅटेलॉगमध्ये ८३४ व्या क्रमांकावर उपलब्ध आहेत.एकुणात काय,तर ग्रंथांच्या रूपात असलेलं आपलं बरंचसं ज्ञान मुसलमान आक्रमकांनी नष्ट केलं,उद्ध्वस्त केलं.जे काही ग्रंथ शिल्लक राहिले,त्यांना इंग्रजी शासनाच्या काळात इंग्रज,डच,फ्रेंच आणि जर्मन संशोधकांनी युरोपला नेलं.मग ज्ञानाचा साठा आपल्याजवळ राहील तरी कुठून..?
आपली हिंदू परंपरा ही वाचिक आहे.आणि ह्या परंपरेमुळेच आपले अनेक ग्रंथ,पुराणे,उपनिषदं,वेद इत्यादी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाचिक स्वरूपात हस्तांतरित होत राहिले.
मात्र शाहजहा आणि औरंगजेबाच्या काळात,ज्या क्रौर्याने आणि बर्बर्तेने मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांना मारण्यात आले, त्यामुळे ही वाचिक परंपराही पुढे काहीशी क्षीण झाली...! मात्र इतकं सारं होऊनही आज जे ज्ञान आपल्यासमोर आहे,ते प्रचंड आहे.अद्भुत आहे.
विलक्षण आहे.'सिरी भूवलय' सारखा ग्रंथ आजही आपण पूर्ण वाचू शकलेलो नाही.आजही दिल्लीचा 'लोह स्तंभ' कशामुळे गंजत नाही,हे कोडं आपण सोडवू शकलेलो नाही.
'अग्र भागवताच्या' अदृश्य शाईचे रहस्य आजही आपण उकलू शकलेलो नाही..थोडक्यात काय, तर आपल्या प्राचीन ज्ञानाचा शोध घेण्याचा हा अद्भुतरम्य प्रवास असाच चिरंतन चालू राहील असे वाटते..!