* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: तुम्हीच लाविले जी झाड ! You planted the tree!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/३/२५

तुम्हीच लाविले जी झाड ! You planted the tree!

दिनांक ११-२-८२ त्या दिवशी माझा मुक्काम पंढरपूरला होता.ब्राह्ममुहूर्तावर चंद्रभागेच्या वाळवंटावर आलो.

मावळत्या चंद्रप्रकाशात वाळवंटातल्या रेतीतून चालत होतो.

नक्षत्रांचं गूढ प्रतिबिंब पाण्यात डोकावत होतं.नदीचं शांत वाहतं पाणी.आंघोळ केली अन् परत मठाची वाट धरली.चालताना मनात म्हणत होतो,"माझी शैक्षणिक रजा सुरू झालीय.साहित्य मंडळाकडून पुरस्कार मिळालाय.आता लवकर नांदेडला जायचं. प्राचार्य नरहर कुरुंदकरांना भेटायचं.सरांना भेटून किती वर्षे झालीत!" पंढरपूरला जाण्यापूर्वी नवेगावला साहित्य प्रसार केंद्राचे श्री.राजाभाऊ कुळकर्णी भेटले होते.'पक्षी जाय दिगंतरा'हा माझा ग्रंथ त्यांनी प्रकाशनासाठी घेतला होता.त्यांनी विचारले,


"ग्रंथाला प्रस्तावना कोण लिहील?"


माझ्या मनात सरांचं नाव होतं. मी म्हटलं, "कुणाची हवी?"


"प्राचार्य नरहर कुरुंदकरांची!"


मी लगेच होकार दिला होता.


या आठवणीतच मी नदीकाठ चढून मठात आलो. ज्ञानेश्वरी पुढ्यात ठेवून वाचू लागलो.


नंतर कुणीतरी 'तरुण भारत'चा अंक पुढं ठेवून गेला. पहिल्याच पानावर सरांचं छायाचित्र आणि त्यांच्या निधनाची शोकवार्ता! ज्ञानेश्वरी नीट बांधून पिशवीत ठेवली.जवळच खांबाला टेकून थंडगार फरशीवर बसलो.समोर नदीचं पात्र दिसत होतं.चंद्रभागा वाहत होती.माझ्या आयुष्यात मी एकदा दुःखी झालो तो वडिलांच्या मृत्यूनंतर अन् आता दुसऱ्यांदा !


मला नांदेडच्या गोदातीरावरील दिवस आठवले. मराठवाड्यात गोदावरीला गंगा म्हणतात.माझं घर गंगेच्या काठी होतं.दहा-बारा वर्षांपूर्वी सर होळीत राहत होते.अरुंद गल्ली-बोळांतून चालत गेलं आणि तीन-चार वाडे ओलांडले की सरांचं घर यायचं.अंगणात पारिजातक.पायऱ्या चढून वर गेलं की,सोप्यात सतरंजीवर बसून सर लिहीत वाचीत असताना दिसायचे. पुढ्यात तक्क्या,टेकायला लोड.आता पुन्हा त्यांची मूर्ती उभी राहिली.उंच,सडपातळ,सावळा रंग.पांढरे शुभ्र धोतर,साधा शर्ट,गहिरे डोळे,रुंद कपाळ,विचारमग्न व किंचित हसरा चेहरा.अन् ही मूर्ती आता एकाएकी कापरासारखी नामशेष झाली! सर लौकिकाच्या व साहित्याच्या संसारातून अचानक निघून गेले.ते असे एकाएकी निघून जातील,असं आम्हाला स्वप्नातदेखील खरं वाटलं नसतं.पन्नाशीतला माणूस म्हणजे म्हातारा नव्हे.त्यांची प्रकृती निकोप होती.काही आजार असल्याचं ऐकिवातही नव्हतं.सदा प्रसन्न मुद्रा.


प्राचीन संगीतशास्त्रावर त्यांचं प्रेम होतं.राजा उदयनविषयी ते आम्हांला कितीतरी सांगायचे.संगीताचे सात सूर,त्यांची व्युत्पत्ती,तंतुवाद्यं,चर्मवाद्यं व अंगुष्टी याविषयी तासन् तास बोलायचे.भरतमुनीच्या नाट्यशास्त्रावर त्या वेळी त्यांचं लेखन चालू होतं.


अन् या संगीताविषयी बोलायला जातानाच औरंगाबादला त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन श्री.अनंत भालेरावांसारख्या अनेक मित्रांच्या समोर ते व्यासपीठावर कोसळले आणि परत उठलेच नाहीत.त्यांच्या जीवनाचे संगीत व्यासपीठावरच संपलं.!


नांदेडमधील वास्तव्यात आम्ही वेळोवेळी त्यांच्या दारात उभं राहून विचारायचो,


"सर,आत येऊ काय?"


औरंगाबादचे कथाकार मुकुंद कृष्णा गायकवाड बरोबर असायचे.सरांशी त्यांनी परिचय करून दिला होता. आतून उत्तर यायचं,"नको."


गायकवाड डोकं खाजवीत उभे राहायचे.मी हळूहळू पायऱ्या उतरू लागे.


पुन्हा आवाज येई," स्त्री मासिकाकरिता तातडीनं लेख लिहितोय.थोड्या वेळानं या म्हणजे निवांत बसू."


आम्ही जेवणं उरकून रात्री पुन्हा वाड्याची वाट धरत असू.


सर लोडाला टेकून वाचीत बसलेले दिसायचे.त्यांचं असं अखंड वाचन,लेखन,मनन व चिंतन चालू असे.


आम्हाला पाहून हसतमुखानं म्हणायचे,"या हो आत. बसा.लिहून झाला एकदाचा लेख."


मग साहित्यिक गप्पा चालू व्हायच्या.शरदबाबू, रवींद्रनाथ टागोर व चेखोव हे माझे अत्यंत आवडते लेखक.


त्यांनी विचारलं,"चितमपल्ली,तुम्ही टागोरांची 'नष्टनीड' ही कथा वाचली?"


"होय." मी.


ते पुढं सांगू लागले - "रवींद्रनाथांचं नाव घेताच 'काबुलीवाला' ही गोष्ट समोर येते.हिंदु-मुसलमानांच्या ऐक्यावरील ती कथा म्हणून जगप्रसिद्ध झाली,पण त्यांची उत्कृष्ट कथा 'नष्टनीड' आहे.तसंच चेखोवचं.तो रशियन साहित्यातला श्रेष्ठ कथाकार,

पण त्यानं लिहिलेली डॉक्टरांची कथा अद्वितीय आहे.त्यात मानवी मनाचे कंगोरे अतिशय हळुवारपणे कोरले आहेत.तशा ह्या दोन्ही कथा सारख्याच. 'चारुलता व तिचा दीर एकत्रित येतात.कळत नकळत ती एकमेकांच्या प्रेमात पडतात.घडू नये ते घडत असतं.कुठं चुकलं ते त्यांना कळतच नाही.जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते.अन् अपार व्यथेशिवाय जीवनात काही शिल्लक राहत नाही.'


'तीच तऱ्हा डॉक्टर व त्याच्या प्रेयसीची.डॉक्टर आपल्या प्रेयसीला बागेत भेटायला बोलावतो.ती येण्याचं टाळते. तिला त्याचं महत्त्व वाटत नाही.अन् डॉक्टरांच्या आयुष्याचं दुसरं पर्व.ती त्याला त्याच बागेत बोलावते. तो जात नाही.काय व कुठं चुकलं हेच त्यांना उमजत नाही.अन् ते आयुष्याची गोडी घालवून बसतात!'


रवींद्रनाथ व चेखोव्हच्या गोष्टी मी अनेकदा वाचल्या होत्या.त्या कथांतील सहजसुंदर मर्म त्या दिवशी त्यांनी सांगितलं.एकदा ते शरदबाबूंविषयी म्हणाले, 


"शरदबाबूंच्या कथा-कादंबऱ्या शोकान्तिका आहेत. विधवा व परित्यक्ता-स्त्रीजीवनाचं त्यांनी चित्रण केलं आहे.पण त्यांनी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत त्यांचा विवाह लावून दिला नाही!त्यांना तसंच नियतीवर सोपवून दिलं. मिलन नाही.विरहाची व्यथा आहे."


रशियन कादंबरीकाराचा विषय निघाल्यावर ते म्हणाले, "रशियन कादंबरीचा व्याप फार मोठा असतो.शेकडो पात्रं असतात.हजारो पानांचं लेखन असतं.टॉलस्टॉयची 'ॲना कॅरोनिया' घ्या किंवा मिखिल शोलोखव्हची 'ॲण्ड क्वाइट फ्लोज दि डॉन' घ्या.

अनुभव घेणं व त्याला साहित्यिक लेखनाचं रूप देणं त्यांना जमलं आहे.ते जे आयुष्य जगले ते आम्हा मराठी लेखकांच्या कुणाच्या नशिबी आलं नाही.अंशतः आलं तरी ते समर्थपणे लिहिता आलं नाही!" त्यांचं वाचन अफाट होतं.कधी मोपासा-मॉम व जॉन गुंथरचा विषय निघे.पु. शि.रेगे यांच्या 'सावित्री' विषयी ते बोलत.विश्राम बेडेकरांच्या 'रणांगण' विषयी सांगत.


र.वा.दिघे,श्री.ना.पेंडसे व गोनीदांच्या कादंबऱ्यांविषयी बोलत.

चि.त्र्यं.खानोलकरांच्या साहित्याविषयी चर्चा होई. गदिमा व व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्याची वैशिष्ट्यं सांगत.त्यांच्या बोलण्याचा अखंड ओघ चालू राही. आम्ही देहभान विसरून ते शांतपणे ऐकत असू.रात्रीचा दुसरा प्रहर संपून पहाट झालेली असे.सर घटका दोन घटका पलंगावर पडून राहत.


कार्तिक महिन्याचे ते दिवस.वर निरभ्र आकाशात आकाशगंगेच्या उजळ प्रकाशात बगळ्यांच्या रांगा उडतानाचं सुंदर दृश्य दिसायचं.

भक्तगण गात गात गंगेवर कार्तिक स्नानाला जाऊ लागलेले असत.

आम्ही घरी न परतता ती भजनं ऐकत घाटावर जात असू.ती जागा फार सुंदर आहे.विस्तीर्ण घाट आहेत.तिथून खाली नदीचं पात्र दिसे.गुलाबी थंडीला नुकतीच सुरवात झालेली असे.नदीच्या पात्रावर लाटा उठत.नक्षत्रांचं सुंदर प्रतिबिंब पाहता पाहता आकाशगंगेत उडणाऱ्या बगळ्यांच्या रांगा नदीतीरावर उतरू लागत.सरांची आठवण अशी लख्ख आकाशगंगेसारखी मनात भरून आहे.नदी,आभाळ,नक्षत्र व पाखरांशी नातं जोडणारी आहे.त्या वेळी मी भारतातील पक्षिसृष्टीचा अभ्यास करीत होतो.तेवढ्यासाठी मी संस्कृत साहित्यसृष्टी धांडोळीत होतो.कधी कधी राम शेवाळकरांकडं गेलो की,त्यांच्या संस्कृत पाठांतरानं व अमोघ वाणीनं मी मोहित होई.सरांच्या बोलण्यात वेदोपनिषदां

पासून रामायण-महाभारतापर्यंत आणि चरक, सुश्रुत,

कौटिल्यापासून संस्कृत महाकाव्यांपर्यंतचे उल्लेख येत.मुळातून संस्कृतचं अध्ययन करावं,असं या काळात वाटू लागलं.

नांदेडमधल्या यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेची वाट धरली.त्यांना भेटलो. एवढा मोठा प्रौढ विद्यार्थी त्यातून बदनाम अशा वनखात्याला.शास्त्रीबुवांना माझ्या संस्कृत अध्ययनातील हेतू ध्यानात येईना.शेवटी सरांना भेटून सारं विस्तारानं सांगितल्यावर मला पाठशाळेत प्रवेश मिळवून लहान मुला-मुलींबरोबर बसून अध्ययन करण्याची परवानगी मिळाली ! आकाशवृत्तीनं राहणाऱ्या एकनाथमहाराज खडकेकर यांच्यासारख्या गुरूजवळ मी संस्कृतच्या अध्ययनाला सुरवात केली.


"कविता आणि निसर्गशोभा यांचा संबंध कितीही जवळचा असला,

तरी ते प्रकरण जंगलखाते,सागवान लाकूड,लाकूड चोरणारे चोर या कक्षेत सामावणारं नाही," सर मला नेहमी म्हणायचे, "चितमपल्ली, जंगलखातं हे काही तुमचं खातं नव्हे!"


मराठीतले कादंबरीकार नाथमाधव व बंगालमधील प्रख्यात लेखक शरदबाबू हे दोघंही एके काळी जंगलखात्यातच नोकरीला होते,असा बादरायण संबंध लावून मी मनात समाधान मानी.


त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दिसेना.शेवटी सरांनी माझ्याविषयी दिलेल्या शिफारस दाखल्यासह त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक श्री.बाबासाहेब बूट यांना विनंती अर्ज केला.त्यांनी माझी बदली पुण्यातील वनसंशोधन केंद्रात केली.


पुण्यातील वास्तव्यात मला अभ्यास व संशोधनासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली.वाईट अनुभवल्यावर चांगलं काय ते कळतं,तसं मला श्री.एम.डी.जोशी व मरबल्लीसाहेबांसारखी देवमाणसं अधिकारी म्हणून मिळाली.तिथं मी संस्कृत,जर्मन व रशियन भाषेचा अभ्यास केला.तेथील भांडारकर प्राच्य संशोधन संस्था व डेक्कन कॉलेजच्या ग्रंथालयात जाण्याची परवानगी मिळाली.पुण्यातील तीन वर्षांच्या वास्तव्यात मी ज्ञानभिक्षुकी स्वीकारली.त्याचा पुढच्या आयुष्यात खूप उपयोग झाला.


पक्षिशास्त्रातील माझा अनुभव व संस्कृत वाङ्मयातील पक्ष्यांचे संदर्भऐकून सर म्हणायचे,"चितमपल्ली,तुम्ही पक्षिशास्त्रातले चालतेबोलते ज्ञानकोश आहात.पण कोश म्हणजे शास्त्र नव्हे,साहित्य नव्हे !"


त्यांना मी लावा पक्ष्याविषयी संदर्भासहित माहिती पाठवून दिली.

तोच मजकूर वापरून त्यांनी लावा पक्ष्यावर एक सुंदर लेख लिहून पाठविला.त्यासोबतच्या पत्रात लिहिलं होतं : " पुनर्लेखन केलेला लेख काळजीपूर्वक वाचा.अभ्यासा,लिहिण्याचा क्रम व मुद्दे लक्षात ठेवा."त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (२४ ऑक्टो. १९७१) मध्ये 'पक्षिवेडा मारुती चितमपल्ली' हा परिचयलेख लिहून महाराष्ट्रातील विचारवंतांचं व साहित्यिकांचं लक्ष माझ्याकडे वेधलं! त्यानंतर मी 'संस्कृत वाङ्मयातील पक्षी' ही लेखमाला 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित केली.त्यातील नावीन्यपूर्ण माहिती व बारीकसारीक संदर्भामुळं साऱ्यांचं लक्ष वेधलं.सर कुणी पक्षिशास्त्रज्ञ नव्हते,पण त्यांनी मला पक्षिशास्त्रज्ञ म्हणून महाराष्ट्रापुढे आणलं. सूत्रबद्ध लेखन कसं करावं,तर्कशुद्ध विचार कसा मांडावा,नेमके महत्त्वाचे संदर्भ कसे टिपावेत,यांचं त्यांनी मार्गदर्शन केलं.पक्षिशास्त्रावरील लेखनाकडून श्री.उमाकांत ठोमरे या चतुरस्र संपादकानं मला पक्ष्यांवरील ललित लेखनाकडे वळवलं.ते नवीन लेखन महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांना आवडलं.पक्ष्यांना मानवी संदर्भ देऊन कसं लेखन करावं,याचं मार्गदर्शन सत्यकथेच्या राम पटवर्धन यांनी केलं.

त्यातूनच निरगू गोंड व चांदी कवडी (सत्यकथा,दिवाळी ७८) हे लेखन प्रसिद्ध झालं. सत्यकथेतील तो लेख वाचून सरांनी लिहिलं,"लेख सुंदर वठला आहे.शैली घाटदार आहे.तुम्हाला शून्यातून वर आलेला पाहून मला खूप आनंद झाला!"


एकदा माझ्या हातून लेखनात तांत्रिक चूक झाली. संपादकानं प्रतिष्ठेचा प्रश्न केला.पत्रव्यवहार चालू झाला. मी सरांकडे धाव घेतली.उत्तरात त्यांनी लिहिलं होतं :


'खुलाशांविषयीचा कच्चा खर्डा सोबत लिहून पाठवला आहे.असा खुलासा कुणाकडूनही घेतला जात नाही. आता तुमची प्रतिष्ठित लेखकांत गणना होतेय.यापुढं असं करू नका.जबाबदारीनं वागा.'


१९७५ साली पुण्याहून विदर्भात जाण्यापूर्वी त्यांची भेट देशमुखवाड्यात झाली.त्या वेळी मी 'मृगपक्षिशास्त्र' ह्या संस्कृत ग्रंथावर टीका लिहीत होतो.सरांना ती दाखविली.त्यांनी ती वाचून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.नंतर तेथून चालत चालत गप्पागोष्टी करीत शनिवारवाड्यावरून श्री.रा.चिं.ढेरे यांच्या घरी गेलो.श्री. ढेरे मला नावानं ओळखत होते.सरांनी त्यांच्याशी माझा समक्ष परिचय करून दिला.जरूर लागेल तेव्हा मला मार्गदर्शन करण्याविषयी सरांनी त्यांना विनंती केली.


पुण्यातली ही त्यांची शेवटची भेट! आमच्यात पत्रव्यवहार होता.त्यांची कार्डावर लिहिलेली पत्रं त्रोटक असत.नागपूरला येण्यापूर्वी त्यांचं पत्र यायचं.पण जंगलातून दौरा संपवून परत येईपर्यंत ते व्याख्यान देऊन नागपुरातून परत गेलेले असायचे!


पक्षिशास्त्रज्ञ,ललित लेखक व कथाकार म्हणून सरांनी मला पुढं आणलं.जंगलात भटकताना (शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली,

साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर) पक्षिनिरीक्षणापासून सुरवात करून मी कुठचा कुठं पोचलो! जंगलात वाढत असलेल्या ह्या रोपाचं वृक्षांत रूपांतर केलं.ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुमाऊली

विषयी लिहिलंय-


हे सारस्वताचे गोड।

तुम्हीच लाविले जी झाड। 

तरी आता अवधानामृते वाड। 

सिंपोनि की जो ॥


मला सरांविषयी असंच म्हणावं लागेल.जंगलात अहोरात्र भटकणाऱ्या ह्या वनवासी झालेल्या माणसाकडून साहित्यक्षेत्रातील अल्प-स्वल्प सेवेचं श्रेय त्यांनाच द्यावं लागेल.