* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: हे राम / hey ram

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३०/८/२५

हे राम / hey ram

२ ऑक्टोबर १८६९ रोजी महात्मा गांधींचा जन्म झाला आणि ३० जानेवारी भारताच्या सेवेत घालविली. अत्यंत श्रेष्ठ प्राचीन संस्कृतीने परिभूषित असा हा महान १९४८ रोजी त्यांचे निर्वाण झाले ! ७९ वर्षांतील जवळजवळ ५५ वर्ष महात्माजींनी देश सुमारे दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या बंधनांत होता.या कालखंडात भारताची अस्मिता हरवलेली होती.येथील जनता परकीयांच्या सेवेत मग्न झालेली होती आणि त्यातच तिला समाधान वाटत होते.भारतातले ऐतिहासिक चैतन्य आणि आत्मा नष्टप्राण होऊ लागलेला होता.ही पराधीनता नष्ट केल्याखेरीज भारताचा पुनर्जन्म होणार नाही,भारताची अस्मिता जागृत होणार नाही आणि भारताला स्वतःचे उज्वल भवितव्य घडविता येणार नाही,म्हणून महात्माजींनी भारताच्या राजकीय कुरुक्षेत्रात पदार्पण केले आणि सतत पन्नास वर्षे ब्रिटिश राज्यसत्तेशी अपूर्व झुंज देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.जागतिक इतिहासात आजवर जे जे युगपुरुष होऊन गेले त्यात महात्माजींचे स्थान फारच वरचे आहे.महात्माजींनी भारताचा इतिहास घडविला हे तर खरेच,परंतु जगाच्या इतिहासालादेखील त्यांनी नवे वळण लावले.

जगाचा भूगोल बदलत नसतो,बदलत असतो तो इतिहास आणि हा इतिहास माणूस घडवीत असतो.
जीवनकलहाचा संघर्ष हा केवळ पोटापाण्याचा आणि जीवनावश्यक सुखसोयींच्या उपलाभावर उभा नसून तो संघर्ष खरा मानवांच्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीवर आणि अंतःप्रेरणेवर अवलंबून असतो असे महात्माजींनी सांगितले.

भारताचे राजकीय बंधन सोडविताना अथवा तोडताना महात्माजींच्या डोळ्यापुढे,जगात जेथे जेथे मानवांची सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर पिळवणूक चाललेली आहे,ते देश आणि ते प्रदेश उभे होते.

माणूस माणसाचा वैरी का होतो याचे सूक्ष्म संशोधन महात्माजींनी हयातभर केले.ते करीत असता अविनाशी आणि चिरंतन सत्याचे स्वरूप कसे असू शकते या आध्यात्मिक तत्त्वाचा त्यांनी मागोवा घेतला. सत्याच्या मागोमाग हिंसा आणि अहिंसेचेही तत्त्वज्ञान त्यांनी संशोधिले.माणूस माणसाची हिंसा का करतो ? मानवाच्या इतिहासाच्या प्रारंभापासून माणूस माणसाचा वैरी झाला आहे,ते का?

महाभारतकाळात कुरुक्षेत्रावर याच एका प्रश्नाने अर्जुनाला मोह घातला होता.भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पडलेल्या या प्रश्नाचे १८ अध्यायांची भगवद्‌गीता सांगून निराकरण केले.महात्माजींचे जीवन, महात्माजींचा आयुष्यक्रम,महात्माजींचे सत्याचे आणि अहिंसेचे प्रयोग,महात्माजींचे अध्यात्मपूर्ण राजकीय तत्त्वज्ञान या सर्व विषयांचा आपण अभ्यास करू लागलो म्हणजे वाटते की भारत हा खरोखर अत्यंत भाग्यशाली देश आहे की जेथे भगवान राम कृष्ण जन्मले.जेथे भगवान बुद्ध जन्मले.जेथे भगवान शंकराचार्य जन्मले,जेथे महात्माजी नेहरू जन्मले.जेथे सावरकर आंबेडकर जन्मले ! आणि एक दिवस भारताचा आजपर्यंत कधीही न मावळलेला ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कायमचा अस्तंगत झाला.स्वातंत्र्य मिळाले पण ते मिळताना भारताचे विभाजन झाले. हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी भारताची दोन शकले झाली.स्वातंत्र्य मिळाले ते रक्तलांच्छित ठरले.उत्तरेच्या सरहद्दीवर आणि पूर्वेच्या सीमेवर हिंदू मुसलमानांचे दंगे झाले.
हिंदू निराश्रितांचे मैल मैल काफिले स्वतंत्र हिंदुस्थानात येण्यासाठी वाटचाल करू लागले.ज्या जमिनीत पिढ्यान् पिढ्या जगले,वाढले ती मायजमीन सोडून त्यांना जीवाच्या भीतीने इकडे यावे लागले.त्यांचे घर उद्ध्वस्त झाले ! ज्या जमिनीवर त्यांनी पिढ्यान् पिढ्या मातृवत् प्रेम केले त्या जमिनीवर कृतज्ञतेचे दोन अश्रू गाळून त्यांना इकडे मनाविरुद्ध यावे लागले. त्यांच्या संसाराची वाताहत झाली.या रणधुमाळीत अनेक कुटुंबेच्या कुटुंबे नष्ट झाली,नामशेष झाली.
स्वतंत्र भारताची सीमारेषा ही रौद्र तांडवाची अग्निरेषा आणि रक्तरेषा ठरली ! एका ताटात भाऊ-भाऊ म्हणून घास घेणारे हिंदू आणि मुसलमान हे आता उत्तरपूर्व आणि पश्चिम सीमेवर एकमेकांचे वैरी ठरले.पंजाब पेटला, सिंध पेटला,बंगाल पेटला ! महात्माजींना ते पाहवले नाही! अरे,ज्या ध्येयासाठी,भारताच्या ज्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आपण एवढी हयात घालविली त्याची अशी माती माती व्हावी,हे पाहून तो वृद्ध महात्मा अंतःकरणात खचला ! काय मागितले,
कशासाठी झुंज दिली,आणि काय पदरात पडले ! तिकडे नौखाली पेटलेली होती! हिंदू आणि मुसलमान हातात जळते पलिते घेऊन एकमेकांच्या घरादारांना,खोपट्या झोपड्यांना आगी लावत पिसाटासारखे धावत होते! ती आग शांत करावी,त्या आगीने होरपळून निघालेल्या निराधार,निष्पाप,
निराश्रितांचे अश्रू पुसावेत म्हणून हा वयोवृद्ध आणि तपोवृद्ध महात्मा बाहेर पडला.

मानवधर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा त्याला संजीवन देण्यासाठी महात्माजींसारखे योगिराज द्रष्टे अवतरत असतात.परपीडा जाणून घेणारे,परपीडेची यातना समजणारे महात्माजी एक अत्यंत थोर वैष्णवजन होते! मानवतेला आणि मानवाला सत्याचे, अहिंसेचे,साधनशुचितेचे आणि मांगल्याचे अधिष्ठान लाभावे म्हणून महात्माजींनी एकेक श्वास वेचला होता! एखाद्या नंदादीपासारखे ते जन्मभर तेवत होते,स्वतःला जाळून घेत दुसऱ्याला प्रकाश देत होते !

३० जानेवारी १९४८! ती अशुभ सायंकाळ! नित्याप्रमाणे अचूक पाच वाजता बापूजी प्रार्थनेला निघाले.प्रार्थनेच्या व्यासपीठाजवळ येत असतानाच एका क्रूर,निर्दय,अमानुष पिस्तुलातून थाङ् थाङ् तीन गोळ्या सुटल्या आणि ७९ वर्षांचे बापूजी कोसळले!

बिर्ला भवनाच्या आवारात एकच आर्त आकांताची आरोळी उठली, 'बापूजी कोसळले! बापूजी गेले! महात्माजी आम्हांला सोडून गेले!' ही काळीकमित्र अशुभवार्ता साऱ्या भारतातच नव्हे तर साऱ्या जगात हा हा म्हणता पसरली बापूजी गेले। महात्माजी गेले! Gandhiji is dead! या बातमीवर सुरुवातीला कुणाचाच विश्वास बसला नाही.प्रार्थनेसाठी निघालेल्या वृद्ध गांधीजींवर पिस्तूल रोखून गोळ्या झाडून महात्माजींचा वध केला गेला होता! 

उरात त्या तीन गोळ्या बसताच रक्ताची चिळकांडी उडाली! ते रक्त आपल्या उजव्या हाताने झाकून ठेवीत महात्माजी खाली कोसळताना म्हणाले, "हे परमेश्वरा!
त्याला क्षमा कर! हे राम !" आणि ती दिव्य अमरज्योत बिर्ला भवनाच्या आवारात अकस्मात शांत झाली मालवली गेली,स्वर्गस्थ झाली !

गांधी नावाचे महात्मा...

काळाच्या वाळूवर आपल्या पावलांचे ठसे उमटविणाऱ्या कीर्तिमान देशभक्तांच्या स्फूर्तिदायक कथांनी देशाच्या इतिहासाची पाने भरलेली असतात.
क्वचित प्रसंगी त्यात अतिशयोक्तीही असते.अशा तेजःपुंज वीरपुरुषांनी आपला असा एक काळ गाजविलेला असतो.

त्याच इतिहासाच्या पुस्तकावरून असेही आढळून येते की या देशभक्तांचे अनुकरण करणारे असंख्य अनुयायी त्यांच्या मागून येतात.या देशभक्तांनी घालून दिलेल्या मार्गाचा अवलंब करणे एवढेच आपले कर्तव्य आहे असे ते समजतात.या अनुयायांचा सर्व काळ,
होऊन गेलेल्या नेत्यांचे गोडवे गाण्यातच निघून जातो.

कारण या तथाकथित अनुयायांना स्तुती,प्रार्थना,गाणे, बोलणे,घोषणा देणे,ओरडणे,यांखेरीज अन्य मार्ग अवगत नसतो.तेच आपले कर्तव्य आहे असे समजून स्वतःथोडेफार आपल्या नेत्यांच्या,त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या व काही मर्यादित प्रमाणात जगाच्या उपयोगी पडल्याच्या भावनेत ते असतात.

कदाचित म्हणूनच जीवनाच्या प्रगतीसंबंधी शेक्सपिअरच्या मॅक्बेथमधील एक सुभाषित अर्थवाही वाटते.त्याचा मथितार्थ असा की,कुणा एका मूर्खाने सांगितलेली सुखदुःखाने मिश्रित परंतु अर्थहीन अशी बडबड म्हणजे जीवनगाथा. Life is a story told by an idiot full of sound and fury signifying nothing. गांधीजींच्या बाबतीत हे असे घडू नये. आणि तसे घडत असेल तर त्यापासून सावध होण्याचे मार्गही आम्ही धुंडाळले पाहिजेत.

३० जानेवारी १९४८ रोजी निधन पावलेल्या महात्म्याला आपण ज्या तर्हेने सत्कारीत आहोत त्या पद्धती धोकादायक निशाणी ठरणाऱ्या आहेत.भाषणे, पुतळे,रस्त्याचे नामकरण आणि सदिच्छा बस्स,पुष्कळ झाले हे! याहूनही अनेक गोष्टी आहेत.थोडक्यात म्हणजे आम्ही तोंडाने बोलतो,डोळ्याने पाहतो,परंतु हृदयाचा ओलावा मात्र आढळत नाही.

गांधी नावाचे महात्मा,संपादक - रॉय किणीकर,
साहाय्यक - अनिल किणीकर 

आम्ही भारतवासीयांनी,विशेषतः सध्याच्या तरुण पिढीने,जी उद्याच्या भारताचा वारसा सांगणार आहे, विशेष लक्षात ठेवले पाहिजे,गांधीजींचा वारसा हा साधा व सोपा नाही.आम्हां सगळ्यांकडून चांगले तेच मागणारे ते एक ऐतिहासिक अभिमानाचे लेणे आहे.निव्वळ आनंददायी शब्द व सदिच्छा यांहून अधिक उच्चतर असे ते लेणे आहे.गांधी म्हणजे मूर्तिमंत चैतन्य.आणि आपणा सर्वांना जर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी प्रामाणिकपणा दाखवायचा असेल तर आपणही क्रियाशील बनले पाहिजे.आणि या क्रियाशील वृत्तीकरिता प्रेरणा हवी असेल तर ती 

कवी लाँगफेलोच्या सामर्थ्यशाली व हेतूपूर्ण शब्दात आढळते - "सतत कार्य हेच आपले ध्येय ठेवा, कोणतेही कार्य अंत:करणापासून करा. देवाला साक्षी ठेवून करा." पुन्हा प्रश्न निर्माण होतो.त्याचे उत्तर एक किंवा अनेकही असू शकतील.प्रश्न असा की,आम्ही कोणते कार्य करावे? कोणते? केव्हा? व कसे? या प्रश्नाचे उत्तर जरी मोठे लांबलचक असले तरी ते साधेच आहे.आमच्या प्रत्येक कार्यात,प्रत्येक ठिकाणी गांधीजींच्याप्रमाणेच सत्याचा प्रकाश आपल्या पाठीशी असावा.याचाच अर्थ असा की,आम्ही नेहमी चांगले तेच केले पाहिजे.जरी ते सोईचे नसले,किंवा कायद्याचे नसले तरीसुद्धा !

सत्याच्या या प्रकाशात आपल्याला असे आढळून येते की,आनंदी जिणे जगण्याकरिता माणसाने अंतःकरणाने निर्हेतुक प्रेम करावे लागते.आपल्या सहकाऱ्यावरील प्रेमामुळे आपण सत्याकडे ओढले जातो.जगण्याची आणि विचार करण्याची अशी पुढे एक पायरी गाठली जाते की,जिथे परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो.या सगळ्या गोष्टी घडायच्या तर दूषित पूर्वग्रह नष्ट झाले पाहिजेत व आपला सर्वार्थाने ख्रिस्ताच्या पुढील सुवर्णतुल्य शब्दांवर विश्वास पाहिजे, "जे या धरतीची मनापासून सेवा करतात तेच यशाचे खरे मानकरी आहेत."ज्या वेळी आम्ही कार्याला सुरुवात करू तेव्हा व गांधीजींच्या आनंददायी जगाची अभिलाषा धरू तेव्हा,उद्या,पुढच्या आठवड्यात,पुढच्या महिन्यात या शब्दांना काही अर्थ उरणार नाही. सुरुवातीची खरी वेळ आत्ताच आहे.
आज आत्ता या क्षणी,कारण दुसरी एखादी वेळ म्हणजे पुन्हा विलंब होणार.या चांगल्या कामाची सुरुवात कोण करणार? आपले शेजारी? भाईबंद? का मित्र ? नव्हे.सर्वांत सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे या कार्यांचे सर्वप्रथम उदगाते तुम्ही स्वतः आहात.तुम्हीच वाचक आहात.कारण फार फार वर्षांपूर्वी एका विद्वान माणसाने आपल्याला सांगितले होते

"हृदयात चांगुलपणा असेल तर स्वभावात सौंदर्य येते.स्वभावात सौंदर्य असेल तर घरात सुसूत्रता येते.जर घर सुघटित असेल तर राष्ट्रात शिस्त येते. शिस्तीचे राष्ट्र जगाच्या शांततेत भर घालते."

आपल्याला जे काही जीवनमृत्यूचे तत्त्व माहीत आहे त्या दृष्टीने विचार करता गांधीकथेचा उत्तरार्ध दुःखद आणि लाजिरवाणाच होता असे म्हणावे लागेल.
नाहीतर त्यांच्यानंतर आलेल्या आमच्या पिढीत.मनात आणले तर दुःखाचे अन्य कशात तरी रूपांतर करण्याचे सामर्थ्य खचितच आले असते.आपल्याला हे माहीत आहे की देवाला प्रिय अशा व्यक्तीचे अस्तित्व पर्ण पुष्प वृक्ष यांच्यातून सत्यरूपाने वास करीत असते.या सत्यस्वरूपी वृक्षाचा अंश त्यांच्यात असल्याने चिरंतन जगण्याची उमेद बाळगून असे महात्मे मृत्यूला हसत असतात.लोकांनी वृक्षावर प्रेम करून त्याविषयी कष्ट घेतले तर चांगली फळे प्रसवतात.गांधीजीवनकथेत आणखी एखादी भर टाकायची ठरवली तर आपण सर्वांनी कष्टाळू माळ्याच्या भूमिकेतून वेगाने कार्यरत झाले पाहिजे.

जर आम्ही असे वागलो तर पुढील काळातील स्त्री पुरुष गांधीजीवनकथा पुढीलप्रमाणे वाचतील,
"कोणे एके काळी गांधी नावाचा एक मनुष्य होऊन गेला.त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांनी त्यांचे कार्य असे काही पुढे नेले की जणू काय त्याचा मृत्यू घडलाच नाही आणि तो चिरंजीव अमर ठरला !"

"महात्माजींविषयी नवीन आणि वेगळे असे आज काय सांगता येईल? उत्तुंग पर्वताचे शिखर,खळाळता रे सप्तसागर किंवा लखलखणारी नवलाख नक्षत्रे यांच्याविषयी तरी असे काय नवीन आणि वेगळे सांगता येणार आहे? तो पर्वत,ते सप्तसागर आणि ती नक्षत्रे यांचे दर्शन घडताच मानवाच्या मनाचे हात अपार श्रद्धेने आपोआप जुळतात,तसेच महात्माजींच्या नामोच्चारानेही होते.भव्य पर्वताची उदात्तता,सागर तळाशी अंथरलेली निगूढ एकांतता,नक्षत्रांचे मांगल्य आणि अचल निष्ठा या साऱ्या श्रेष्ठ सद्गुणांचा समन्वय म्हणजेच महात्माजी!"

रॉय किणीकर...