* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/२/२३

आपलं अद्वितीय आयुर्वेद..!

हायडलबर्ग हे जर्मनीतलं तसं लहानसं गाव. अवघ्या दीड लाख लोकवस्तीचं.मात्र हायडलबर्ग प्रसिद्ध आहे ते शिक्षणाचं माहेरघर म्हणूनही.युरोपातलं पहिलं विद्यापीठ याच शहरात सुरू झालं,सन १३८६ मध्ये.


या हायडलबर्ग शहरात,शहराजवळच,एका पर्वतीसारख्या टेकडीवर बांधलेला किल्ला आहे.या किल्ल्याला 'हायडलबर्ग कासल' किंवा 'श्लोस' म्हणूनही ओळखले जाते.(जर्मनीत किल्ल्याला 'कासल' किंवा 'श्लोस' म्हटलं जातं). तेराव्या शतकात बांधलेला हा किल्ला व्यवस्थित देखरेखीखाली आहे.आणि म्हणूनच पर्यटकांच्या आकर्षणाचं एक मोठं केंद्रही आहे.या किल्ल्याच्या एका भागात एक नितांतसुंदर संग्रहालय आहे 'अपोथीकरी म्युझियम' किंवा 'औषधांचं संग्रहालय.'अत्यंत कलात्मक पद्धतीने,नीट- नेटक्या स्वरूपात,सुबक अशा बरण्यांमधून आणि बाटल्यांमधून,आकृत्या, पुतळे आणि जुन्या यंत्रांमधून त्यांनी औषधनिर्मितीचा इतिहास जिवंतपणे समोर उभा केला आहे.जर्मनीतला हा औषधांचा इतिहास उण्यापुऱ्या आठशे / नऊशे वर्षांचा.मात्र त्यांच्या मते जगातील औषधशास्त्राचे अग्रणी जर्मनच आहेत.


या संग्रहालयात अगदी लाजेकाजेस्तव भारताचा उल्लेख करण्यात आलेला आहे.आणि तोही असा की,'वास्को-डी-गामाच्या भारतभेटीनंतर भारतातल्या जडी-बुटींच्या औषधांची ओळख युरोपला झाली.'


गेल्या महिन्यात मी या हायडलबर्गच्या किल्ल्यातल्या औषधी संग्रहालयाला भेट द्यायला गेलो होतो,तेव्हा तिथे आसपासच्या कुठल्यातरी शाळेतली मुलं आली होती.चौथी-पाचवीतली ती पोरं,त्या संग्रहालयात बागडत होती,चिवचिवत होती.मात्र ती पोरं फार सूक्ष्मतेने प्रत्येक गोष्ट बघत होती,आपापसात जोरजोरात चर्चा करत होती.आणि गंमत म्हणजे प्रत्येकाच्या हातात कागद होता आणि ती पोर त्या कागदावर काही तरी लिहीत होती.जरा विचारल्यावर कळलं की, ही सहल म्हणजे त्या मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि त्या मुलाना ह्या संग्रहालयाच्या भेटीवर नोट्स काढायच्या .ह्या नोट्सच्या आधारावर त्यांची युनिट टेस्ट होणार आहे.खरं सांगतो,माझ्या काळजात लक्कन काही तरी हाललं...! आपल्या देशात असं होऊ शकेल.. ?


ती मुलं काय मत घेऊन बाहेर पडतील.. ? की जगामधे औषधांच्या / चिकित्साशास्त्राच्या क्षेत्रात (फक्त एक हजार वर्षांचा या संबंधात इतिहास असलेली) 'जर्मनी' सर्वांत पुढे आहे.भारत तर त्यांच्या खिजगणतीतही नसेल..! आणि आपण इतके कर्मदरिद्री की,तीन हजार वर्षांचा चिकित्साशास्त्राचा,औषधी विज्ञानाचा खणखणीत इतिहास असणारे आपण....... यातलं काहीही आपल्या नवीन पिढीला दाखवू शकत नाही..!!


साऱ्या जगाला जेव्हा चिकित्सा,मेडिसिन, अपोथिके,फार्मेसी यांसारखे शब्दही माहीत नव्हते,

त्या काळात,म्हणजे इसवी सनाच्या सातशे वर्षं आधी,जगातील पहिल्या (तक्षशीला) विद्यापीठात चिकित्साशास्त्र नावाचा सुव्यवस्थित विभाग होता..! इसवी सनाच्या सहाशे वर्षं आधी सुश्रुताने 'सुश्रुत संहिता' हा चिकित्साशास्त्रावरचा परिपूर्ण ग्रंथ लिहिला होता.सुश्रुत हा जगातील पहिला ज्ञात 'शल्य चिकित्सक (सर्जन) आहे. ह्या शल्य चिकित्सेसाठी तो १२५ प्रकारची उपकरणे वापरायचा.या सर्व उपकरणांची यादी सुद्धा त्याने दिली आहे.सुश्रुताने ३०० प्रकारच्या वेगवेगळ्या 'शल्य चिकित्सा' (ऑपरेशन्स) केल्याचे लिहून ठेवले आहे.

अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे सुद्धा त्याने सविस्तर वर्णन केले आहे.लक्षात घ्या,हे सारे पावणेतीन हजार वर्षांच्या आधीचे आहे..! युरोपसकट साऱ्या जगाला या शब्दांची तोंडओळख होण्याच्या किती तरी आधीचे !


आजच्या विद्यार्थ्यांना तर जाऊच द्या,पण जाणत्या पिढीला तरी यातलं कितीसं माहीत आहे..?


चिकिस्ताशास्त्राच्या प्राचीनतेसंदर्भात तीन प्रकारच्या प्रणालींचा विचार केला जातो -


१. भारतीय चिकित्सापद्धती-प्रामुख्याने आयुर्वेद

२. इजिप्शियन प्रणाली

३.ग्रीक प्रणाली


यातील इजिप्शियन चिकित्सा प्रणालीचा मूळ पुरुष मानला जातो.इसवी सनापूर्वी सत्तावीसशे वर्षं हा त्याचा कार्यकाळ मानला जातो.अर्थात आजपासून सुमारे पावणेपाच हजार वर्षं जुना मात्र शास्त्रशुद्ध रीत्या रोगांचे निवारण आणि त्या प्रकारची औषधांची रचना त्या काळात उपलब्ध नव्हती.प्रामुख्याने वाईट शक्तींपासून (भुता-खेतांपासून) वाचविण्यासाठी काही औषधं वापरण्यावर भर होता.यातील इजिप्शियन प्रणालीत,पिरामिडमध्ये 'ममीज' ठेवण्याचं शास्त्र त्यांना माहीत असल्याने प्राचीन मानलं जातं.या प्रणालीत 'इमहोटेप'(Imhotep) हा अनेक विषयांत पारंगत असलेला गृहस्थ,इजिप्शियन चिकिस्ता प्रणालीचा मूळ पुरुष मानला जातो.अर्थात आज पासून सुमारे पावणे चार हजार वर्षे जुना.मात्र शास्त्रशुद्धरीत्या रोगांचे निवारण आणि त्या प्रकारची औषधांची रचना त्या काळात उपलब्ध नव्हती.प्रामुख्याने वाईट शक्तींपासून (भूता-खेतांपासून) वाचवण्यासाठी काही औषध वापरण्यावर भर होता.


ग्रीक चिकित्सा प्रणाली ही देखील बरीच जुनी.आजचे डॉक्टर्स ज्या 'हिप्पोक्रेट' च्या नावाने,व्यवसाय सुरू करण्याआधी,शपथ घेतात,तो हिप्पोक्रेट हा ग्रीसचाच.सुश्रुतच्या सुमारे दीडशे वर्षं नंतरचा,ह्या हिप्पोक्रेटच्या काळात भारतात चिकित्साशास्त्र विकसित स्वरूपात वापरले जात होते.ख्रिस्तपूर्व सातव्या-आठव्या शतकांत तक्षशीला विद्यापीठातील चिकित्साशास्त्राचा अभ्यासक्रम शिकायला अनेक देशांचे विद्यार्थी येत होते.आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की,हिप्पोक्रेटच्या लेखांमधे सुश्रुत संहितेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.


पुढे येशू ख्रिस्ताच्या काळात 'केलसस' (-ulus Cornelius Celsus- ख्रिस्तपूर्व २५ ते ख्रिस्तानंतर ५० वर्षे) ने चिकित्साशास्त्रासंबंधी 'डीमेडीसिना'हा आठ भागांचा मोठा ग्रंथ लिहिला.यात सातव्या भागात काही शस्त्रक्रियांची माहिती दिलेली आहे.आणि गंमत म्हणजे यात वर्णन केलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची माहिती ही या ग्रंथाच्या सहाशे वर्षं आधी सुश्रुतने लिहिलेल्या 'सुश्रुत संहिता' मधील मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेच्या माहितीशी तंतोतंत जुळणारी आहे..!


मुळात भारतात आयुर्वेदाची सुरुवात कोठून झाली हे कोणालाच ठामपणे सांगता यायचं नाही.ऋग्वेदात आणि अथर्ववेदात यासंबंधी उल्लेख सापडतात.अथर्ववेदात तर चिकित्साशास्त्रासंबंधी अनेक टिपण्या आढळतात.आणि म्हणूनच आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद समजले जाते.आता अथर्ववेदाचा निश्चित कालखंड कोणता..? कठीण आहे सांगणं.कोणी ख्रिस्तपूर्व १२०० वर्षे सांगतात,तर कोणी ख्रिस्तपूर्व १८०० वर्षे.


आणि या ग्रंथामधूनही 'आयुर्वेद' हा नवीन शोधलेला प्रकार आहे,असं जाणवत नाहीच. त्या काळात असलेल्या ज्ञानाला अथर्ववेदासारखा ग्रंथ शब्दबद्ध करतोय असंच दिसतंय.याचाच अर्थ,आपली चिकित्सा पद्धत ही अतिप्राचीन आहे.


मुळात आयुर्वेद हे अत्यंत सुव्यवस्थितपणे रचलेलं चिकित्सा / आरोग्य शास्त्र आहे.चरक आणि सुश्रुतांच्या परंपरेला त्यांच्या शिष्यांनी पुढे नेलं.पुढे इसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतातील वाग्भटांनी चरक,सुश्रुत आणि कश्यप यांच्या ग्रंथांना एकत्र करून,त्यांच्या आधाराने एक ग्रंथ लिहिला.त्यालाच 'अष्टांग हृदय' असे म्हटले जाते.


यातील रोग / विकारांवर अधिक काम करून आठव्या शतकात वैद्य माधव ऋषी यांनी 'निदान ग्रंथ' लिहिला.या ग्रंथाची ७९ प्रकरणं आहेत, ज्यात रोग,त्यांची लक्षणं आणि त्यावरील उपचार याबाबत सखोल विवेचन केलेले आहे.यानंतर 'भावप्रकाश','योग रत्नाकर' हे ग्रंथ तयार झाले. शारंगधरांनी औषधनिर्मितीच्या प्रक्रियेसंबंधी बरेच लिहिले.पुढे अकराव्या शतकात मुस्लीम आक्रांतांची आक्रमणं सुरू झाल्यानंतर भारतातही आयुर्वेदाची परंपरा क्षीण झाली.


मात्र आज जगात इजिप्शियन चिकित्सा पद्धती अस्तित्वात नाही.ग्रीक चिकित्सा पद्धत (यूनानी) काही प्रमाणात आहे.मात्र त्यातील 'शुद्ध युनानी' औषधं किती,हा प्रश्नच आहे.जगात आज बोलबाला आहे तो अँलोपॅथिक (ऍलोपॅथिक)पद्धतीचा,जी साधारण आठशे / नऊशे वर्षांपासून विकसित होत आलेली आहे.होमियोपेथी तर अगदी अलीकडची.१७९० मध्ये जर्मनीत सुरु झालेली.


या सर्व पार्श्वभूमीवर किमान तीन / चार हजार वर्षं जुनी असणारी आणि आजही जगभर प्रचंड मागणी असणारी 'आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती' ही अद्वितीय ठरते.फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही,हेच काय ते दुःख आहे..!


१४ फेब्रुवारी २०२३ लेखाचा पुढील भाग..


१३/२/२३

आपले प्रगत धातुशास्त्र..!

आपल्या भारतात,जिथे जिथे प्राचीन सभ्यतेचे पुरावे मिळाले आहेत (म्हणजे नालंदा,हडप्पा,

मोहनजोदडो,लोथल,तक्षशिला,धोलावीरा, सुरकोटडा,दायमाबाग, कालीबंगण), त्या सर्व ठिकाणी मिळालेल्या लोखंड,तांबे,चांदी,शिसे इत्यादी धातूंची शुद्धता ही ९५% ते ९९% आहे. हे कसं शक्य झालं असेल..? आजपासून चार,साडेचार हजार वर्षांपूर्वी धातूंना अशा शुद्ध स्वरूपात परिष्कृत करण्याचे तंत्रज्ञान आपल्याजवळ कुठून आले असेल,असा प्रश्न पडतो.


भारताला पूर्वीच्या काळात 'सुजलाम सुफलाम..' म्हटले जायचे.अत्यंत संपन्न असा आपला देश होता.पूर्वी आपल्या देशातून सोन्या-चांदीचा धूर निघायचा असं आपण शाळेत शिकलोय. अर्थातच आपल्या देशात सोनं- नाणं भरपूर होतं हे निश्चित.


विजयनगर साम्राज्याच्या उत्कर्षाच्या काळात हम्पीच्या बाजारपेठेत सोनं-चांदीही भाजीपाल्यासारखी विकली जायची,असं अनेक विदेशी प्रवाशांनी नोंदवून ठेवलंय.


त्याच्या थोड्या आधीच्या काळात आपण गेलो तर अल्लाउद्दीन खिलजीनं देवगिरीवर जेव्हा पहिलं आक्रमण केलं तेव्हा पराभूत झालेल्या रामदेव रायानं त्याला काहीशे मण शुद्ध सोनं दिलं.


याचाच अर्थ,अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात सोनं,चांदी,तांबे,जस्त वगैरे धातू माहीत तर होतेच,शिवाय प्रक्रिया पण केली जात होती.


गंमत म्हणजे जगातील अत्यंत प्राचीन अशी, आजही वापरात असणारी सोन्याची खाण भारतात आहे,हे किती लोकांना माहीत असेल..?


ती खाण आहे,'हड्डी' नावाची.कर्नाटकच्या उत्तर-पूर्वभागात असलेली ही खाण रायचूर जिल्ह्यात आहे.


सन १९५५ मधे ऑस्ट्रेलियाच्या डॉ.राफ्टरने या खाणीत सापडलेल्या दोन लाकडांचे कार्बनडेटिंग केल्यावर ही खाण सुमारे दोन हजार वर्ष जुनी असल्याचे समजले.मात्र कदाचित ही खाण यापेक्षाही जुनी असू शकेल. आजही ही खाण 'हड्डी गोल्डमाईन्स लिमिटेड' या नावाने सोन्याचे उत्खनन करते.


या खाणीचे वैशिष्ट्य सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी, ही खाण २,३०० फूट खोल खोदली गेलेली आहे.आता हे उत्खनन कसं केलं असेल.. ? तर शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे की,'फायर सेटिंग' पद्धतीने हे खाणकाम करण्यात आलं.अर्थात आतील खडक,लाकडांच्या अग्रीद्वारे गरम करायचे अन् एकदम त्यांच्यावर पाणी टाकून ते थंड करायचे.या प्रक्रियेतून मोठमोठ्या खडकांना भेगा पडतात आणि ते फुटतात.याच खाणीत ६५० फूट खोल जागेवर प्राचीन असा ऊर्ध्वाधर शाफ्ट सापडला,जो खाणकाम क्षेत्रातलं आपलं प्राचीन कौशल्य दाखवतोय.


पण सोनंच कशाला..? लोखंड मिळवण्यासाठी लागणाऱ्या भट्ट्या आणि त्यांचं तंत्रज्ञान त्या काळात विपुल स्वरूपात उपलब्ध होतं.याच लेखमालेत 'लोहस्तंभ' ह्या लेखात आपण दिल्लीतील कुतुब मिनारजवळील लोहस्तंभाविषयी चर्चा केली होती.आज किमान दीड-दोन हजार वर्षं झाली त्या लोहस्तंभाला,पण आजही ते तसूभरही गंजलेले नाही.आणि आज एकविसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांनाही, स्वभावतःगंज न लागणार लोखंड कसं तयार केलं असेल याचं आश्चर्य वाटतं.


या लोहस्तंभासारखीच पूर्णपणे तांब्यात बनलेली बुद्धमूर्ती आहे ७ फूट उंच.ही मूर्ती चौथ्या शतकातील असून सध्या लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात ठेवलेली आहे.बिहारमधे मिळालेल्या ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील तांब हे खराब होत नाही.ते तसंच लखलखीत राहतं.


गंगेच्या खोऱ्यात नुकतेच राकेश तिवारी ह्या पुरातत्त्ववेत्त्याने काही उत्खनन केले.त्यात त्यांना आढळून आले की इसवी सनापूर्वी किमान २८०० वर्षांपासून भारताला परिष्कृत लोखंड तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत होते.अर्थात यापुर्वीपासूनही असू शकेल.पण साधारण ४,८०० वर्षांपूर्वीचे तर पुरावे सापडले आहेत.


याचप्रमाणे छत्तीसगढमधील 'मल्हार' येथे काही वर्षांपूर्वी जे उत्खनन झाले त्यात किंवा उत्तर प्रदेशातल्या दादुपूर,'राजा नाला का टिला' आणि लहुरोदवा येथील उत्खननात इसवी सनाच्या १,८०० ते १,२०० वर्षांपूर्वीचे लोखंड आणि तांब्याचे शुद्ध स्वरूपातले अनेक पात्र आणि वस्तू सापडल्या आहेत.


इसवी सनाच्या तीनशे वर्षांपूर्वी,लोखंड/ पोलाद हे अत्यंत परिष्कृत स्वरूपात तयार करणाऱ्या अनेक भट्ट्या दक्षिण भारतात सापडल्या आहेत.ह्या भट्ट्यांना इंग्रजांनी क्रुसिबल टेक्निक (Crucible Technique) हे नाव,पुढे जाऊन दिले.या पद्धतीत शुद्ध स्वरूपातील घडीव लोखंड,कोळसा काच,ही सर्व सामग्री मूस पात्रात घेऊन त्या पात्राला इतकी उष्णता देतात की लोखंड वितळतं आणि कार्बनला शोषून घेतं. ह्या उच्च कार्बन लोखंडाला,नंतर अरबी लढवैय्ये, 'फौलाद' म्हणू लागले.


वाग्भटाने लिहिलेल्या 'रसरत्न समुच्चय' ह्या ग्रंथात धातुकर्मासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या भट्ट्ट्यांची वर्णनं दिलेली आहेत.महागजपुट, गजपुट,वराहपुट,कुक्कुटपुट आणि कपोतपुट भट्ट्यांची वर्णनं आहेत.यात टाकल्या जाणाऱ्या शेणाच्या गवऱ्याची संख्या आणि त्या अनुपातात निर्माण होणाऱ्या तापमानाचा उल्लेख यात आहे. उदाहरणार्थ,


महागजपुट भट्टीसाठी २,००० गवऱ्या तर कमी तापमानावर चालणाऱ्या कपोतपुटसाठी फक्त ८ गवऱ्यांची आवश्यकता असायची.


आजच्या आधुनिक फर्नेसच्या काळात कोणालाही ह्या गवऱ्यांवर आधारित भट्ट्या म्हणजे अतिशय जुनाट आणि आउटडेटेड संकल्पना वाटेल.पण अशाच भट्ट्यांमधून त्या काळात लोहस्तंभासारख्या ज्या अनेक वस्तू तयार झाल्या,त्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरूनही आजच्या वैज्ञानिकांना तयार करणं शक्य झालेलं नाही.


त्या काळच्या भट्ट्यांद्वारे निर्माण होणारी उष्णता मोजण्याचे प्रयोग आधुनिक काळात झाले.अगदी ग्रंथात लिहिल्याप्रमाणे भट्ट्या तयार केल्या गेल्या आणि त्यातून निर्माण झालेली उष्णता मोजण्यात आली.ती ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणेच निघाली..! 


९,००० हून अधिक उष्णतेसाठी वाग्भटाने चार प्रकारच्या भट्ट्याचं वर्णन केलेलं आहे -


१. अंगारकोष्टी, २. पातालकोष्टी, ३. गोरकोष्टी आणि

४. मूषकोष्टी


यांतील पातालकोष्टीचं वर्णन हे धातुशास्त्रात उपयोगात येणाऱ्या अत्याधुनिक 'पिट फर्नेस' बरोबर साम्य असणारं आहे.


विभिन्न धातूंना वितळवण्यासाठी भारद्वाजमुनींनी 'बृहद् विमान शास्त्र' नावाच्या ग्रंथात ५३२ प्रकारच्या लोहाराच्या भात्यांसारख्या रचनेचे वर्णन केले आहे.इतिहासात ज्या दमिश्कच्या तलवारी जगप्रसिद्ध होत्या,त्यांचे लोखंड हे भारतातून जायचे.भारतात अत्यंत शुद्ध जस्त आणि तांबं निर्माण व्हायचं,असं अनेक विदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेलं आहे.


तांब्याचा वापर भारतात अत्यंत प्राचीन काळापासून केला जातोय.भारतात इसवी सनाच्या तीन-चारशे वर्षांपूर्वी तांब्याचा वापर होत असल्याचे पुरावे सापडले आहेत.हडप्पन काळातील तांब्याची भांडी मोहनजोदडोसहित अनेक ठिकाणच्या उत्खननात आढळली आहेत.आज पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तान प्रांतात प्राचीन काळी,तांब्याच्या अनेक खाणी असल्याचे उल्लेख आणि पुरावे सापडले आहेत. राजस्थानात खेत्री येथेही प्राचीन काळात तांब्याच्या खाणी असल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात.


जस्त (झिंक) हा पदार्थ भारतात शोधला गेला, हे सुद्धा आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल..? इसवी सनापूर्वी नवव्या शतकात राजस्थानात जस्त वापरात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.याहूनही महत्त्वाचं म्हणजे. इतिहासाला आजपर्यंत ज्ञात असलेली,जस्ताची सर्वांत प्राचीन खाणही भारतात राजस्थानात आहे...!


जस्ताची ही प्राचीन खाण 'जावर' ह्या गावात आहे.

उदयपूरपासून ४० असं किलोमीटर अंतरावर असलेली ही खाण आजही जस्ताचं उत्पादन करते.सध्या 'हिंदुस्थान झिंक लिमिटेड' तर्फे येथे जस्ताचं उत्खनन केलं जातं.. म्हणतात की,इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात ही जावरची जस्ताची खाण काम करत होती.तसे पुरावे मिळाले आहेत.


जस्त तयार करण्याचा विधीही अत्यंत कौशल्याचा,जटील आणि तांत्रिक स्वरूपाचा होता.भारतीयांनी या प्रक्रियेत प्रावीण्य मिळवले होते. पुढे 'रसरत्नाकर' लिहिणाऱ्या नागार्जुन ने जस्त तयार करण्याचा विधी विस्तृत स्वरूपात दिलेला आहे. आसवन (डिस्टीलेशन), द्रावण (लिक्विफिकेशन) इत्यादी विधींचाही उल्लेख त्याने केलेला आढळतो.


या विधीमधे खाणीतून काढलेल्या जस्ताच्या अयस्काला अत्यंत उच्च तापमानावर (१००० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त) वितळवतात. या प्रक्रियेतून निघालेल्या वाफेचे आसवन (डिस्टीलेशन) करतात.त्यांना थंड करतात आणि ह्या प्रक्रियेतून घनरूपात जस्त (झिंक) तयार होत जाते.


यूरोपला सन १७४० पर्यंत जस्त (झिंक) ह्या खनिज धातूच्या उत्पादनाची काहीही माहिती नव्हती.ब्रिस्टोलमधे व्यापारिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या जस्ताची उत्पादनप्रक्रिया ही भारतातल्या 'जावर' प्रक्रियेसारखीच होती. अर्थात भारतात होणारे जस्ताचे उत्पादन बघूनच युरोपने,त्याच पद्धतीने, त्याचे उत्पादन सुरू केले असे म्हणावे लागेल.


एकूणात काय,तर भारतातल्या धातुशास्त्राने जगाच्या औद्योगीकरणात फार मोठी भर घातली आहे.सन १००० च्या आसपास,जेव्हा भारत हा वैश्विक स्तरावर उद्योग जगताचा बादशहा होता, तेव्हा विभिन्न धातूंनी बनलेल्या वस्तूंची निर्यात फार मोठ्या प्रमाणावर होत होती.


विशेषतः जस्त आणि हायकार्बन स्टीलमधे तर आपण जगाच्या खूपच पुढे होतो आणि त्या विषयातले तंत्रज्ञान जगाला देत होतो..!


आपल्या धातुशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे इतके लक्षात ठेवले तरी पुरे..!!


११ फेब्रुवारी २०२३ या लेखातील भाग…

११/२/२३

आपले प्राचीन 'जलव्यवस्थापन'💧

प्राचीन काळी आपल्या देशात पाण्याचं व्यवस्थापन उत्कृष्ट होतं आणि म्हणूनच आपला देश

'सुजलाम सुफलाम' होता..!


पाण्याचं हे नियोजन किती चांगलं असावं.. ? तर जगातले पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण हे भारतात आहे,हे आपल्यापैकी किती लोकांना माहीत असेल..? इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात,चोल राजा करिकलन याने बांधलेला 'अनईकट्ट' अथवा इंग्रजांच्या भाषेत 'ग्रांड अनिकट' (Grand Anicut) किंवा आजच्या बोलीभाषेत 'कलानाई बांध' हा तो बांध आहे.गेली अठराशे वर्षं वापरात असलेला..!!


आजकालच्या धरणांना जिथे तीस-पस्तीस वर्षांत भेगा पडतात तिथे अठराशे वर्षं सतत एखादे धरण वापरात असणं,हे एक अद्भुत आश्चर्य आहे..! नदीच्या मुख्य पात्रात बांधलेला हा बांध किंवा हे धरण ३२९ मीटर्स लांब आणि २० मीटर्स रुंद आहे. त्रिचनापल्लीपासून फक्त १५ किलोमीटर्स दूर असलेला हा बांध,कावेरी नदीच्या डेल्टा प्रदेशात उभारलेला आहे. इंग्रजांनी या धरणावर इंग्रजी संस्कार करण्याचा प्रयत्न केला होता.अत्यंत ओबड-धोबड खडकांनी बांधलेले हे धरण बघून असे निश्चित वाटते की,त्या काळात धरणे बांधण्याचे शास्त्र चांगले विकसित झाले असावे.हे धरण प्रायोगिक तत्त्वावर बांधलेले वाटत नाही,तर कुशल आणि अनुभवी व्यक्तींनी नदीच्या मुख्य प्रवाहात बांधलेले अनुभवसिद्ध धरण वाटते.याचाच अर्थ, आपल्या देशात धरणे बांधण्याचे,म्हणजेच 'जलव्यवस्थापनाचे' शास्त्र फार- फार जुने असावे.अर्थात नंतर झालेल्या विदेशी आक्रमणांमुळे ह्या प्राचीन शास्त्राचे पुरावे नष्ट झाले आणि उरले ते इतिहासात डोकावणारे कलानाई धरणांसारखे गवाक्ष..!


जगाच्या इतिहासात बघितलं तर अत्यंत प्राचीन अशी धरणे बांधल्याचे उल्लेख आढळतात. नाईल नदीवर कोशेश येथे इसवी सनाच्या २९०० वर्षे आधी बांधलेले १५ मीटर उंचीचे धरण जगातील सर्वांत जुने धरण मानण्यात येते.पण आज ते अस्तित्वात नाही.किंबहुना अर्वाचीन इतिहासकारांनी त्या धरणाला पाहिलेलेच नाही. त्याचे फक्त उल्लेख आढळतात.


इजिप्तमधे इसवी सनापूर्वी २७०० वर्षच्या सुमाराला नाईल नदीवर बांधलेल्या धरणाचे काही अवशेष आजही बघायला मिळतात. साद-अल- कफारा असं त्याचं नंतर नामकरण करण्यात आलं.कैरोपासून तीस किलोमीटर अंतरावर बांधलेले हे धरण,बांधल्यानंतर काही दिवसांतच कोसळले.त्यामुळे पुढे अनेक शतकं इजिप्तच्या लोकांनी धरणे बांधण्याची हिम्मतच केली नाही.चीनमधेही इसवी सनापूर्वी २२८० वर्षांपूर्वीच्या धरणांचे उल्लेख सापडतात.मात्र प्रत्यक्षात वापरात असलेलं इतकं जुनं एकही धरण जगभरात आढळत नाही.


भारतात मात्र कलानाई धरणाच्या नंतर बांधलेली आणि वापरात असलेली धरणे आढळतात. इसवी सन ५०० ते १३०० मधे दक्षिणेतल्या पल्लव राजांनी बांधलेल्या अनेक मातीच्या धरणांपैकी काही आजही वापरात आहेत.ते सन १०११ ते १०३७ ह्या काळात तामिळनाडूमधे बांधलेले वीरनाम धरण हे याचे उदाहरण आहे.


जलव्यवस्थापनेच्या संदर्भात बांधलेल्या अनेक रचना आजही अस्तित्वात आहेत.पूर्वी गुजरातची राजधानी असलेल्या 'पाटण' येथे बांधलेली 'रानी का वाव' ही विहीर (राजेशाही बारव) आता युनेस्कोच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत गेली आहे.भूगर्भातील पाण्याला नीट खेळवण्याचे आणि साठवण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. इसवी सन १०२२ ते १०६३ या काळात बांधण्यात आलेली ही सातमजली विहीर आजही सुस्थितीत आहे.सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमती यांनी आपले पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ ही विहीर बांधली होती.म्हणूनच हिचे नाव 'रानी का वाव' अर्थात 'राणीची विहीर' असे पडले.हाच काळ होता,जेव्हा सोमनाथवर महमूद गजनीने आक्रमण केले होते.विहीर बांधल्यानंतर काही वर्षांनी गुजरात हे पूर्णपणे मुस्लीम शासकांच्या ताब्यात गेलं.त्यामुळे पुढे जवळपास सातशे वर्षं ही राजेशाही विहीर चिखलाच्या गाळात दुर्लक्षित होती...!


अर्थात भूमिगत पाण्याच्या व्यवस्थापनाची माहिती आपल्याला फार पूर्वी पासून होती,हे निश्चित.

पंचमहाभूतांच्या मंदिरांसंबंधी या आधीच्या लेखात,याच लेखमालेत,उल्लेख आलेला आहे.त्यातील 'जल' संबंधीचे उल्लेख आणि जलव्यवस्था- पनाची माहिती फार प्राचीन काळापासून आपल्याला होती याचे अनेक पुरावे आपल्या समोर आहेत.ऋग्वेदात,यजुर्वेदात आपल्याला पाण्याच्या नियोजनासंबंधी अनेक सूक्ते आढळतात.धुळ्याच्या श्री.मुकुंद धाराशिवकरांनी यावर विपुल आणि अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे.त्यांनीच प्राचीन जलव्यवस्थापनासंबंधी गो.ग.जोशी यांचाही उल्लेख केला आहे.तारापूरमधे ज्येष्ठ अभियंता असलेल्या जोशी यांचा प्राचीन शास्त्रासंबंधी चांगला व्यासंग होता.


स्थापत्यवेद हा अथर्ववेदाचा उपवेद समजला जातो.दुर्दैवाने त्याची एकही प्रत भारतात उपलब्ध नाही.युरोपमधील ग्रंथालयात याच्या काही प्रती आढळतात.यातील परिशिष्टांमधे तडाग विधी (जलाशयनिर्मिती) ची संपूर्ण माहिती दिलेली आहे.


मुकुंद धाराशिवकरांनी आणखी एका ग्रंथाचा उल्लेख केलाय,ज्याचे नाव दुर्दैवाने उपलब्ध नाही आणि शेवटचे पान नसल्याने तो कोणी लिहिलाय,हे देखील कळत नाही.अथ जलाशया प्रारम्यते... ह्या ओळीने सुरू होणाऱ्या ह्या ग्रंथात भिंत बांधून जलाशय कसा निर्माण करावा याचे सविस्तर वर्णन आहे. हा ग्रंथ २८०० वर्षांपूर्वीचा आहे.


कृषी पाराशर,कश्यप कृषी सूक्त,सहाव्या शतकात लिहिलेल्या 'सहदेव भाळकी' इत्यादी ग्रंथांत पाण्याची साठवण,पाण्याचे वाटप, पावसाचे अनुमान,जलाशय निर्मिती यांवर बरीच आणि सविस्तर माहिती आढळते..


द शिल्पशास्त्र आणि भृगु शिल्पशास्त्र यांत सागरातील किल्ले,नदीतील नारद किल्ले यांसारख्या विषयांपासून ते पाण्याची साठवण, पाण्याचे वाटप आणि पाण्याचा निचरा यावर सखोल विवेचन आढळते.भृगु शिल्पशास्त्रात पाण्याचे दहा गुणधर्म सांगितले आहेत.मात्र पाराशर मुनींनी पाण्याला एकोणीस गुणधर्म असल्याचे प्रतिपादन केले आहे.


पाण्यासंदर्भात वेदांमधे आणि विविध पुराणांमधे अनेक उल्लेख येतात.विशिष्ट परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती मिळते.


सन २००७ मधे योजना आयोगाने 'ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट अँड ओनरशिप' हा रिपोर्ट तज्ज्ञ लोकांद्वारे लिहून प्रकाशित केला.नेटवरदेखील हा उपलब्ध आहे.मोन्टेक सिंह अहलुवालियांची प्रस्तावना ह्या रिपोर्टला आहे.या रिपोर्टच्या सुरुवातीलाच ऋग्वेदातील पाण्यासंबंधीची एक ऋचा वापरली आहे -


The waters of sky, 

the waters of rivers,

and water in the well,

whose source is the ocean, 

may all these sacred waters protect me.


नंतर रिपोर्ट लिहिण्याची सुरुवात करताना प्राचीन भारतीय शास्त्रानुसार जलव्यवस्थापन हे किती शास्त्रशुद्ध होतं,याचं विवेचन केलं आहे..!


मात्र जलव्यवस्थापनासंबंधी अत्यंत विस्तृत विवेचन केलंय 'वराहमिहिर' ने याचे राहणे उज्जैनला होते.तेव्हा उज्जैनचे महाराजा होते, 


'सम्राट विक्रमादित्य' वराहमिहिरने सन ५०५ च्या सुमारास विविध विषयांवरील अभ्यासाला सुरुवात केली आणि सन ५८७ मधे तो वारला. याचाच अर्थ,जवळपास ऐंशी वर्ष वराह मिहिराने ज्ञानसाधनेत खर्च केले.


वराहमिहिराचे प्रमुख कार्य म्हणजे त्याने लिहिलेला 'बृहत्संहिता' नावाचा ज्ञानकोश.या कोशात उदकार्गल (पाण्याची साठवण) नावाचा ५४ क्रमांकाचा अध्याय आहे.१२५ श्लोकांच्या ह्या अध्यायात वराहमिहिरांनी जी माहिती दिली आहे,ती अद्भूत आहे,अक्षरशः थक्क करणारी आहे.


भूगर्भामधे पाण्याचा शोध कसा घेता येऊ शकतो,यासंबंधीचे श्लोक आहेत,जे आजही आपल्याला चकित करतात.वराहमिहिराने जमिनीच्या आतील पाणी शोधताना मुख्यतः 


तीन गोष्टींच्या निरीक्षणावर भर दिलेला आहे. त्यात त्या भागात उपलब्ध असलेली झाडं, झाडांजवळ असलेली वारुळे,त्या वारुळाची दिशा,त्यात राहणारा प्राणी आणि तिथल्या जमिनीचा रंग,पोत आणि तिची चव यांचा समावेश आहे..! या निरीक्षणांच्या आधारे जमिनीच्या आतील पाणी नक्की शोधता येईल असे त्याचे म्हणणे आहे


लक्षात घ्या,दीड हजार वर्षांच्याही आधी,काहीही आधुनिक संसाधने माहीत नसताना,वराहमिहिर हे ठाम प्रतिपादन करतोय..!!


मात्र हे सर्व करताना वराहमिहिराने आजच्या वैज्ञानिकांसारख्या नोंदी करून ठेवल्या,ज्या महत्त्वपूर्ण आहेत.त्याने पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे त्याने मातीचे वर्गीकरण देखील विस्ताराने केले आहे.ह्या सर्व निरीक्षणांचे निकषही त्याने मांडून ठेवले आहेत. त्यांतील काही -


१. भरपूर फांद्या तेलकट साल असलेले ठेंगणे झाड असेल तर पाणी आढळते.


२. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर पृष्ठभागाजवळ पाणी असते.


३. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.


४. जेव्हा जमीन गरम झालेली असते तेव्हा एखाद्याच ठिकाणी ती थंड लागली तर तिथे पाणी असते.


५. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते....


वगैरे,अशी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवलेली आहेत. खरी गंमत तर पुढेच आहे.


वराहमिहिराचे हे प्रतिपादन खरं की खोटं,हे ठरविण्यासाठी आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीमधल्या श्रीवेंकटेश्वर (एस.व्ही.) विद्यापीठाने सुमारे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदून पाहायचे ठरविले.वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील अशा जागा निवडल्या आणि सुमारे ३०० बोअर घेतले.

(बोअरवेल खणल्या) आश्चर्य म्हणजे ९५% ठिकाणी पाणी लागले.


अर्थात वराहमिहिराचे निरीक्षण योग्य होते हे सिद्ध झाले.मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफीतशाहीत अडकला आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही..!


पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजाचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात.अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद येथे बांधलेले 'थत्ते नहर' असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणीपुरवठ्याची रचना असो.बऱ्हाणपूरला आजही अस्तित्वात असलेली,पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो,की पंढरपूर-अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. 'समरांगण सूत्रधार' ह्या ग्रंथाच्या आधाराने राजा भोजने बांधलेला भोपाळचा मोठा तलाव असो... अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.


गढा-मंडला (जबलपूर संभाग) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचं राज्य होतं. अगदी मुगलांना,आदिलशाहीला किंवा कुतुबशाहीला सुद्धा त्यांना जिंकता आलं नव्हतं. मात्र तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला.अर्थात खरं चित्र तसं नव्हतं.एक खूप सुरेख हिंदी पुस्तक आहे- 'गोंडकालीन जल-व्यवस्थापन'यात सुमारे पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात किती उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन केलं होतं याचं वर्णन आहे.या नियोजनाचा फायदा म्हणजे कुठल्याही दुष्काळाची किंवा अवर्षणाची झळ ह्या गोंड प्रदेशाला कधीही लागली नाही.


आमच्या जबलपूर शहरात गोंड राणी दुर्गावतीच्या काळात (अर्थात पाचशे वर्षांपूर्वी) 'बावनताल आणि बहात्तर तलैय्या' बांधले गेले (तलैय्या- लहान तलाव).हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते,तर जमिनीच्या 'कंटूर' प्रमाणे त्यांची रचना आहे.काही तलाव तर आतून एक-दुसऱ्याशी जोडले गेलेले आहेत.आज त्यांतले अनेक बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपूरमधे,अगदी आजही पाण्याची पातळी बऱ्यापैकी चांगली आहे आणि येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही.मग त्या काळात पाण्याची,शेतीची आणि निसर्गाची काय समृद्धी असेल..!!


याचाच अर्थ,पाण्याचे महत्त्व,पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्याजवळ होते.काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पद्धतीने वापरत होतो.आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होता..!


मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आज ही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी.आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..!


दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जलव्यवस्थापन विसरलो अन् आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय,१४४ कलमं लावतोय,युद्ध खेळतोय..!!


आपल्यालाच आपल्या समृद्ध ज्ञानाचा,वारशाचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं होणं अटळ आहे..!!


९ डिसेंबर २०२३ ला लेखातील पुढील भाग..

९/२/२३

भारताच्या प्राचीन कला - २

छत्तीसगढला आपण ओळखतो ते नक्षलवादाने ग्रस्त असलेला एक अशांत प्रदेश म्हणून.पण छत्तीसगढचे हे चित्र खरे नाही.नक्षलवादाशिवाय बऱ्याच गोष्टी या प्रदेशात आहेत, ज्या छत्तीसगढला संपन्न करून गेल्या आहेत.प्राचीन काळातील अनेक अवशेष येथे आढळतात.दुर्गम असल्याने मुसलमानी आक्रमणाच्या काळात ह्या प्रांतात विध्वंस तुलनेने कमी झाला.आणि म्हणूनच काही महत्त्वाच्या जागा ह्या शिल्लक राहिल्या.


अशा जागांपैकी एक आहे सीता बेंगारा गुफा. छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूरपासून २८० कि.मी.अंतरावर असलेल्या,सरगुजा जिल्ह्यातील रामगढ गावाजवळ ही गुफा आहे. हा संपूर्ण पर्वतीय भाग आहे.मात्र रामगढ पर्यंतचा रस्ता हा बिलासपूर - अंबिकापूर मार्गावर असल्याने चांगला आहे.


इतकं विशेषत्वानं उल्लेख केलेल्या ह्या गुहेचं वैशिष्ट्य काय ?


ही गुहा म्हणजे आशिया खंडातील (आणि कदाचित जगातील ) पहिले ज्ञात जगातील ) नाट्यगृह आहे..!!


ह्या गुहेतील भित्तीचित्रांच्या आधारे ह्या गुहेचा वापरात असण्याचा कालखंड हा इसवी सनापूर्वी दोनशे ते तीनशे वर्षे असा केला जातो.ह्या गुहेत तीन कक्ष आहेत.त्यांतील एक मोठा आहे.हा मोठा असलेला कक्ष म्हणजेच पन्नास ते साठ दर्शकांच्या बसण्याची जागा आणि रंगमंच आहे. अशी मान्यता आहे की,कवी कालिदासाने 'मेघदूत' ह्या महाकाव्याची रचना येथे बसूनच केली होती.


मात्र आपलं दुर्दैव की,सामान्य माणूस तर सोडाच,पण कलेच्या क्षेत्रात मुक्त विचरण करणाऱ्या आणि वेळोवेळी ग्रीक,रोमन,फ्रेंच आणि ब्रिटिश रंगभूमीचे दाखले देणाऱ्या कलावंतांनाही ही गुफा माहीत नाही..


ह्या गुहेचा मुख्य कक्ष ४४ फूट लांब आणि २० फूट रुंद आहे.भिंती सरळ आहेत,तर प्रवेशद्वार गोल आकारात आहे.पूर्णपणे बंदिस्त असलेल्या ह्या गुहेत प्रतिध्वनी नष्ट (suppress) करण्यासाठी काही ठिकाणी भिंतींना भोकं केलेली आहेत.गुहेचा अर्धा भाग हा रंगमंचासारखा,तर उरलेला अर्धा हा प्रेक्षक दीर्घा आहे.येथे रंगमंचाचा भाग हा खाली आणि गुहेतला अर्धगोलाकार भाग हा कापून त्याला पायऱ्याच्या स्वरूपात तयार केलेले आहे. हीच ती दर्शक दीर्घा.


ह्या गुहेत ब्राम्ही लिपीत लिहिलेला आणि पाली भाषेत असलेला एक शिलालेख आढळला आहे. त्यावरील मजकुराचा आशय आहे-


'हृदयाला देदीप्यमान करतात,स्वभावाने महान असलेले कविगण रात्री,वासंती हून दूर

हास्य आणि विनोदात स्वतःला हरवून ते चमेलीच्या फुलांच्या माळेचं आलिंगन करतात..'


ही सीता बेंगारा गुफा ज्या रामगढ गावाजवळ आहे,तिथेच काही अंतरावर जोगीमारा गुफा सुद्धा आहे.या गुहेत इसवी सनापूर्वी तीनशे वर्षे काढलेली काही रंगीत भित्तीचित्रे आहेत,जी वेगवेगळ्या कलांची अभिव्यक्ती दाखवतात.


यात एक नृत्यांगना बसलेली आहे,जी गायक आणि नर्तकांच्या गर्दीने वेढलेली आहे.याशिवाय नाट्यगृह आणि मनुष्यांच्या आकृत्याही रेखाटलेल्या दिसतात.


डॉ.टी.ब्लॉख ह्या जर्मन पुरातत्त्ववेत्त्याच्या अनुसार ही भित्तीचित्रे सम्राट अशोकाच्या काळातली आहेत.अर्थात अजिंठ्याच्या आधी काढलेली..!


एकुणात काय,तर रामगढच्या क्षेत्रात असलेल्या सीता बेंगारा आणि जोगीमार ह्या गुहा तत्कालीन कलेचं केंद्र असाव्यात.सीता बेंगारा ही नाट्यगृहाच्या रूपात विकसित असलेली गुहा असावी.मात्र काही लोकाना हे मान्य नाही. त्यांच्या मते सीता बेंगारा हे कलेचं केंद्र असेलही. पण ते नाट्यगृह नव्हतं. का..? तर भरत मुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात 'नाट्यगृहाची' जी मापं दिलेली आहेत,त्यानुसार या गुहेची रचना नाही म्हणून.. !!


पण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की,भरत मुनींचा काळ हा त्याच सुमारासचा आहे.त्यामुळे भरत मुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे ह्या गुहेची रचना होणे शक्य नाही.आणि खाली रंगमंच व अर्धचंद्राकृती उभ्या पायऱ्यांवर बसलेले दर्शक, हीच रचना ग्रीक रंगमंचाचीही आहे.


याचा अर्थ असा की,आपल्या देशात भरत मुनींच्या नाट्यशास्त्रापूर्वीही नाट्य आणि इतर कलांचे वास्तव्य होते.म्हणजेच भरत मुनी नाट्यशास्त्राची नवीन व्याख्या करत नाहीत,तर आधीच असलेल्या कलेच्या ह्या प्रांताला व्यवस्थितपणे,सुसूत्रपणे आपल्यासमोर ठेवताहेत.याचाच अर्थ,आपल्या देशात प्रगल्भ अशी नाट्यकला ही तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त प्राचीन आहे.


आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे.त्यांनी नाट्यकलेचं भारतात असलेलं अस्तित्व व्यवस्थितपणे मांडलं आणि जगानंही ते मान्य केलं.


जगात नाट्यकलेविषयी प्राचीन प्रवाह दोनच आढळतात.ग्रीकची रंगभूमी आणि आपल्या भारतातली रंगभूमी.


ग्रीकवर परकीय आक्रमणं फारशी झाली नाहीत.त्यामुळे तेथील रंगभूमीचे प्राचीन अवशेष आजही आपल्याला बघायला मिळतात.


इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात ग्रीक रंगभूमीचे उल्लेख मिळतात.त्या काळात बांधलेले भव्य नाट्यगृह आजही अस्तित्वात आहे.


ग्रीक वास्तुकारांनी डोंगराच्या उताराचा फायदा घेऊन टप्पे निर्माण केले व प्रेक्षकांच्या बसण्याची सोय केली. 'एपिडोरस' या एम्फी थिएटरमधे अशा टप्प्यांवर सहा हजार लोकांच्या बसण्याची सोय होती (मराठी विश्वकोश).


ग्रीक व रोमन रंगमंडलात वाद्यवृन्दासाठी मध्यवर्ती मोठी वर्तुळाकृती जागा पायऱ्यांच्या तळाशी योजण्यात येत असे.सरगुजा जिल्ह्यातील रामगढमधे आढळलेल्या सीता बेंगारा गुफेतही अशीच रचना आढळते.


मग प्रश्न असा पडतो की,इसवी सनापूर्वी ४०० ते ५०० वर्षांपूर्वी ग्रीसमधे बांधलेल्या नाट्यगृहासारखीच रचना,फक्त पुढच्या शंभर / दोनशे वर्षांत भारतातल्या अगदी आतल्या बाजूस असलेल्या डोंगराळ आणि दुर्ग प्रदेशात कशी निर्माण झाली..?


म्हणजे भारतीय रंगमंचाविषयीच्या माहितीच्या आधारे ग्रीकांनी आपली रंगभूमी उभारली? की त्याच्या अगदी उलट घडले..? इसवी सनापूर्वी ३३३ व्या वर्षी ग्रीसच्या मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर हा मरण पावला. तो भारतात येण्यापूर्वीच भारत आणि ग्रीस यांच्यात बरेच संबंध होते असं आता सिद्ध होतय.


मीना प्रभू या लेखिकेनं जगभर प्रवास केलाय अन् त्याची फार सुंदर वर्णन त्यांच्या पुस्तकात करून ठेवली आहेत.त्यातीलच एक पुस्तक आहे - 'ग्रीकांजली' त्यांच्या तीन आठवड्यांच्या ग्रीस प्रवासाचं त्यात त्यांनी लिहिलंय की,ज्या घरात त्या काही दिवस 'गेस्ट' म्हणून राहिल्या,त्या घराचा कुटुंबप्रमुखच पुरातत्त्ववेत्ता आणि भारताची बरीच माहिती असलेला होता.त्याने मीना प्रभूंना सांगितले की,ग्रीसने भारताकडून बरेच काही घेतलंय.अनेक प्राचीन ग्रीक विद्वानांना संस्कृत भाषा येत होती.इतकेच नाही, तर ग्रीक भाषेतील अनेक शब्द संस्कृतमधून आले आहेत.मीना प्रभूंनी त्या शब्दांची यादीच दिलीय.


गंमत म्हणजे,ग्रीक भाषेमधे 'शब्दाला' समानार्थी शब्द आहे-'अब्द' तो ऐकून मीना प्रभूंना मर्ढेकरांची कविता आठवते -


किती पाय लागु तुझ्या

किती आठवू गा तूंते, 

किती शब्द बनवू गां

अब्द अब्द मनी येते..!


थोडक्यात काय,तर संस्कृत भाषेप्रमाणेच नाट्यकलेसारख्या इतरही गोष्टी ग्रीसमधे गेल्या असतील हे मानायला बरीच जागा आहे.


मात्र ही तुलना क्षणभरासाठी बाजूला जरी ठेवली,तरी आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी एक समृद्ध संस्कृती नांदत होती,ज्यात गायन,वादन, नाट्य यांसारख्या कलाप्रकारांना महत्त्व होतं. नाट्यशास्त्राची बीजं ही ऋग्वेदात आणि सामवेदात आहेत,हे आपण मागच्या लेखात बघितलंच आहे.इसवी सनापूर्वी पाचशे वर्षांपूर्वीच्या काळात पाणिनीने संस्कृतचे व्याकरण लिहिले.त्यातही नाट्यशास्त्रासंबंधी उल्लेख मिळतात.यात शिलाली आणि कृशाश्व ह्या दोन नट सूत्रधारांचा उल्लेख प्रामुख्याने येतो. यातील शिलालीचा उल्लेख यजुर्वेदीय शतपथ ब्राम्हण आणि सामवेदीय अनुपद सूत्रांत मिळतो. या विषयातील तज्ज्ञांनी ज्योतिषीय गणनेनुसार शतपथ ब्राम्हणांना चार हजार वर्षांपेक्षाही प्राचीन म्हटले आहे.


अत्यंत प्राचीन मानल्या गेलेल्या अग्निपुराणात ही नाटकांची लक्षणे वगैरे विस्ताराने दिलेली आहेत.मंगलाचरण,पूर्वरंग सारखे,नाटकांच्या रचनेतील,यांचा विशेषत्वाने उल्लेख होतो.या सर्व पुराव्यांवरून,विल्सनसारख्या भाग,


पाश्चात्त्य पुरातत्त्ववेत्त्यांनी हे कबूल केले आहे की,भारतीय नाट्यकला ही बाहेरून आलेली नाही,तर मुळात इथेच विकसित झालेली आहे.


एक गोष्ट मात्र नक्कीच की,भरत मुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहून भारतीय नाट्यकलेला एक सुव्यवस्थित आकार दिला.संगीत,अभिनय आणि नाटक यांचे परिपूर्ण विवेचन करणारा हा ग्रंथ इसवी सनापूर्वी साधारण ३०० ते ४०० वर्षांपूर्वी लिहिला गेला असावा.काहींच्या मते ह्या ग्रंथात ३७ अध्याय होते. आज मात्र उपलब्ध असलेल्या ग्रंथात ३६ अध्याय आढळतात.


या ग्रंथात भरत मुनींनी नाट्यशास्त्राची जी खोलात जाऊन चिकित्सा केलीय,ती बघून अक्षरशः थक्क व्हायला होतं.गंमत म्हणजे आपण नाटकांच्या लांबीसाठी दोन अंकी,तीन अंकी नाटक असे जे शब्द वापरतो,त्यातील 'अंक' हा शब्द याचं अर्थाने भरत मुनीही वापरतात.मात्र त्यांना त्याचा अर्थ माहीत नाही, कारण भरत मुनींच्या मते 'अंक' हा शब्द पूर्वीपासून चालत आलेला (रूढीबद्ध) आहे. म्हणून त्यांनीही तो तसाच वापरला आहे.याचाच अर्थ,भारतीय नाट्यशास्त्र हा प्रकार,भरत मुनींच्याही कितीतरी आधीपासून चालत आलेला आहे...


नाटकातील पात्रे,सूत्रधार,नायक,नायिका, पीठमर्द (नायकाचा साथीदार,जो त्याची काळजी घेतो),वीट (धूर्त नागरिक),चेट,विदूषक इत्यादी अनेक पात्रांबद्दल भरत मुनींनी विस्ताराने लिहिले आहे.नाटकाची रचना किंवा आकृतिबंध तयार करताना भरत मुनींनी पाच अर्थप्रकृती दाखविल्या आहेत - बीज,बिंदू,पताका,प्रकरी आणि कार्य.याचप्रमाणे नाटकाच्या पाच अवस्था, पाच संधी यांचेही विस्तृत विवरण आहे.


भरत मुनींनी ज्याचा उल्लेख केला आहे, असे पहिले नाटक म्हणजे 'समवकार अमृतमंथन'.

'भास' हा नाटककार,भरत मुनींच्या समकालीन किंवा शंभर वर्षे नंतरचा.भास हा कवी होता, पण त्याहीपेक्षा जास्त नाटककार होता.पुढे प्रसिद्ध झालेल्या कालिदासाने आणि बाणभट्टानेही भासच्या नाटकांची प्रशंसा केलेली आढळते.


भासाचा उल्लेख जरी अनेक ठिकाणी होत असला,तरी भासाने लिहिलेली नाटके ही काळाच्या उदरात गडप झालेली होती.पुढे सन १९१२ मधे त्रावणकोर संस्थानातील एका मठात, ताडपत्रांवर मल्याळी लिपीत लिहिलेली भासाची संस्कृत नाटके,टी.गणपती शास्त्री ह्या संशोधकाला मिळाली.मिळालेल्या नाटकांची संख्या तेरा आहे.मात्र भासांनी याहूनही अधिक नाटकं लिहिली असावीत हे उपलब्ध उल्लेखांवरून समजतं.कृष्णाजी लक्ष्मण सोमण ह्यांनी भासाची ही नाटकं १९३१ साली पहिल्यांदा मराठीत आणली.सध्या रंगमंचावर असणारं 'प्रिया बावरी' हे नाटक महाकवी भास रचित 'मध्यमाव्यायोग' या संस्कृत नाटकावर आधारलेले आहे.


थोडक्यात काय,तर भारतीय नाट्यकलेला अत्यंत पुरातन,प्राचीन अशी वैभवशाली परंपरा आहे.जगातील पहिले नाटक भारतीय भाषेत लिहिले गेले असावे ह्याचे पुरावे मिळताहेत.

मात्र आपलं दुर्दैव असं की आजही नाट्य व्यवसायात असलेली तथाकथित बुद्धिजीवी मंडळी ग्रीक,इटालियन,फ्रेंच आणि इंग्रजी नाटकांचेच संदर्भ तोंडावर फेकतात.आजही सार्त्र,शेक्सपिअर,शा,इब्सन,चेखोव्ह यांनाच नाट्यकलेतील आदर्श मानले जाते. ही सर्व मंडळी आहेतही तशी उत्तुंग.पण म्हणून कालातीत प्रतिभा असणाऱ्या भरतमुनी,भास, कालिदास,बाणभट्ट यांची उपेक्षा का..?


नाट्यकलेचा तेजस्वी वारसा आम्ही बाळगतोय, ही जाणीव जरी आपल्याला झाली तरी पुष्कळ आहे..!


३ फेब्रुवारी २०२३ लेखामधील पुढील भाग..

७/२/२३

दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजही काळजाला पिळून टाकतं•

रमा !

कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे,प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो.आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.


दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत.या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे.मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे.माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत.खूपच हळवे झाले आहे मन खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली.यशवंताची आठवण आली.


मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस.मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही.तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो.माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता.तू पाहत होतीस.तुझं मन गदगदून आलं होतं.कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस.तू शब्दांनी बोलत नव्हतीस;पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते.तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं.तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता.ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.


आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत.मन नाजूक झाले आहे.जीवात कालवाकालव होत आहे.कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत.आता आहे फक्त यशवंत.तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता.त्याला आपण जपलं पाहिजे.यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव.त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत.तोवर ते जागे राहत.मला ती शिस्तच त्यांनी लावली.मी उठलो,अभ्यास सुरु केला की ते झोपत असत.अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई.त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे.पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला.याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे.माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत.त्यांनी रात्रीचा दिवस केला.अंधाराचा उजेड केला.माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली.फार फार आनंद वाटतो रमा आज रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे.ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.


रमा,वैभव,श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत.तू अवतीभोवती पाहते आहेसच.माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात.त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. 


या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत.आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा.आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही.दारिद्रय,गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही.अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत.अपमान,छळ,अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत.


मागे अंधारच आहे.दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे.त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.


आपणाला दुनिया नाही.आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे.आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव.त्याच्या कपडयांची काळजी घे.त्याची समजूत घाल.त्याच्यात जिद्द जागव.मला तुझी सारखी आठवण येते.यशवंताची आठवण येते.


मला कळत नाही असं नाही रमा,मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस.पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस.पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय.दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा.वसा ज्ञानाचा !


मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे.मला इतर कशाचे यावेळी भान नाही;पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे.तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस.आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस.म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.


खरं सांगू रमा,मी निर्दय नाही.पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली,तरी यातना होतात.माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला,यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे;पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे.सुडक्याला सांभाळ रमा.त्याला मारु नको.मी त्याला असे मारले होते.त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको.तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.


माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा,आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत.त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.


रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत.कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे.ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.


रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील.घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे,एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे,एवढेच धान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे.हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती.माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता.मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो.जप स्वतःला जशी जपतेस मला.लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.


सर्वांस कुशल सांग.

कळावे,

तुझा

भीमराव

लंडनD⅓⁷


आमचे मार्गदर्शक परमित्र दादाराव ताजने यांनी व्हॉट्सऍप वर पाठविलेले पत्र..