* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/६/२३

बायबल - येशू ख्रिस्त (इ.स.पू.पहिलं शतक)

'बायबल' हा परमेश्वराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो.हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा,

धर्माची मूलतत्त्वं काय आहेत आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा आहे.परमेश्वराचं अस्तित्व,त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे.जगभरात या ग्रंथाची सर्वाधिक विक्री झालेली आहे.लिओनार्दो दा व्हिंचीचं 'द लास्ट सपर' आणि मायकेल अँजेलोचं 'क्रिएशन ऑफ अॅडम' ही चित्रं बायबलवरच आधारित होती.


बायबल' हा ख्रिश्चन लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबलचा अर्थ 'ग्रंथसंग्रह' असा होतो. याच ग्रंथाला 'पवित्र शास्त्र' असंही म्हणतात. 'ता बिब्लिया' या मूळ ग्रीक शब्दांवरून 'बायबल' हा शब्द इंग्रजीत रूढ झाला असं मानण्यात येतं. बिब्लिया या शब्दाचा अर्थही अनेक पुस्तकांचा संग्रह असाच होतो.बायबल दोन भागांमध्ये असून पहिल्या भागाला 'जुना करार (ओल्ड टेस्टामेंट)', तर दुसऱ्या भागाला 'नवा करार (न्यू टेस्टामेंट)' असं म्हणतात. जुना करार हा ज्यू म्हणजेच यहुदी लोकांचा धर्मग्रंथ मानला जातो. बायबलमध्ये एकूण ११८९ प्रकरणं म्हणजे चॅप्टर्स आहेत.त्यातल्या जुन्या करारामध्ये ३९ पुस्तक (बुक्स) आणि ९२९ प्रकरणं, तर नव्या करारामध्ये २७ पुस्तक (बुक्स) आणि २६० प्रकरणं आहेत. त्यातलं साम ११९ हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे, तर साम ११७ हे सगळ्यात लहान प्रकरण आहे. बायबलमध्ये एकूण ६११०० शब्द आहेत. दरवर्षी बायबलच्या १० लाख प्रती खपतात.चीनमध्ये बायबलची सगळ्यांत जास्त छपाई होते! पण जगामध्ये सगळ्यात जास्त चोरीला जाणारं पुस्तकही बायबलच आहे.! बायबल लिहायला ४० लोकांनी मदत केली. 'तू व्यभिचार (अॅडल्ट्री) करणार नाहीस' अशा ऐवजी १६३१ साली छापलेल्या बायबलमध्ये चुकून 'तू व्यभिचार करशील' असं छापलं गेल्यामुळे या बायबलला 'व्यभिचारी' किंवा 'पाप्यांचं बायबल' असं म्हटलं गेलं. या बायबलच्या बऱ्याचशा प्रती नष्ट करण्यात आल्या, पण काही 'कलेक्टर्स आयटम्स' बनल्या. त्यांची किंमत आज १ लाख डॉलर्स इतकी आहे.जुना करार लिहायला जवळजवळ १००० च्या वर वर्ष लागली,तर नवा करार ७०-७५ वर्षांत तयार झाला! 'बायबल' मध्ये ६००० भविष्यवाणी केल्या आहेत.आजही 'बायबल' वर हात ठेवून न्यायालयात खरं बोलण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. 'बायबल' मधला शेवटचा शब्द 'आमेन' म्हणजे 'तथास्तु' हा आहे.


ज्यू लोकांच्या आयुष्यात परमेश्वरानं ख्रिस्ताचं आगमन होण्यापूर्वी कोणतं कार्य केलं याची माहिती जुन्या करारात मिळते.तसंच विश्वाच्या निर्मितीपासून ते ज्यू लोकांच्या इतिहासाबद्दल सर्व काही जुन्या करारात वाचायला मिळतं. बायबलमधल्या जुन्या कराराला ३००० वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. ख्रिश्चन धर्मामध्येही दोन गट होते.एक कॅथलिक गटातले लोक,तर दुसरे प्रोटेस्टंट गटातले लोक. ख्रिश्चन धर्माच्या उदयाआधी येशू ख्रिस्त आणि त्यांचे अनुयायी हे यहूदी (ज्यू) धर्माचे होते.


नव्या करारात येशू ख्रिस्तासंबंधी माहिती आहे. नव्या कराराला २००० वर्षं झाली आहेत.यात येशू ख्रिस्ताचा जन्म,त्याचं आयुष्य,त्याची शिकवण,त्याच्या आयुष्यातली संकट आणि त्याचा क्रूसावर झालेला मृत्यू या सगळ्यांचा इतिहास वाचायला मिळतो.


बायबलच्या जुन्या करारामध्ये काय आहे? जग जेव्हा निर्माण झालं तेव्हा अॅडम आणि इव्ह हे पहिले स्त्री-पुरुष (मानव) कसे निर्माण झाले यांची एक गोष्ट सांगितली आहे.हे दोघं निर्माण होण्याचा काळ २० लाख वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. बायबलप्रमाणे हे जग ६००० ते ८००० वर्षांपूर्वी निर्माण झालं.त्या काळाला 'पेबल कल्चर' असंही संबोधलं जातं.यानंतर अब्राहमची कथा येते.

अब्राहम आपली पत्नी सारा हिच्यासह इस्त्रायल आणि तेव्हाचं कनान इथं (आताचं इराक) आला. त्या दोघांना मूल नव्हतं, मात्र त्याची दासी हागार हिच्यापासून त्याला इश्माएल नावाचा मुलगा झाला. पुढे अनेक वर्षांनी सारालाही इसहाक नावाचा मुलगा झाला. साराच्या छळाला कंटाळून हागार आपला मुलगा इश्माएल याला घेऊन अरबस्तानात निघून गेली. इसहाकपासून पुढे यहुदी (ज्यू) जमात आणि इश्माएलपासून अरबी जमात निर्माण झाली.इसहाक याला इसाब आणि याकोब अशी दोन मुलं झाली.इथून पुढे या जमातींचा वंश विस्तारतच गेला.आजच्या अरब-इस्रायल वादाचं मूळ इतकं जुनं आहे!


तिथे असणाऱ्या हिब्रू भाषिक लोकांनी मोशे नावाच्या व्यक्तीला आपला नेता म्हणून निवडलं. प्रत्यक्ष परमेश्वर त्याला आदेश देतो,अशी त्यांची समजूत होती.मोशेला सिनाय नावाच्या पर्वतावर परमेश्वराकडून दहा आज्ञा (टेन कमांडमेंट्स) मिळाल्या. यावरचा 'टेन कमांडमेंट्स' हा चित्रपट खूप गाजला होता.या आज्ञा बायबलमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.सिनायच्या वाळवंटात या दहा आज्ञांच्या कराराचा कोश करण्यात आला आणि हिब्रू लोकांनी तो पाळणं बंधनकारक समजलं गेलं. काही काळानं मोशेचं निधन झालं.


नव्या कराराची गोष्ट आणखीनच विलक्षण आहे. इ.स. च्या सुमाराला पॅलेस्टाइन देशावर रोमन सत्तेचा ताबा होता. हेरोद हा त्या प्रदेशांवर राज्य करत होता. त्याला दहा बायका होत्या. त्यातली मरियम ही त्याची आवडती बायको होती. हेरोद कर्तव्यदक्ष असला तरी अत्यंत क्रूर आणि हलक्या कानाचा होता. त्याच्या बहिणीनं असूयेपोटी मरियमविरुद्ध हेरोदचे कान भरले आणि ते ऐकून हेरोदनं मरियम,तिची आई आणि आपली दोन मुलं अरिस्तंबुलास आणि अॅलेक्झांडर यांना ठार मारलं.


येशूचा जन्म झाला तेव्हा त्याला आपला प्रतिस्पर्धी समजून हेरोदनं त्या वेळी जी मुलं जन्मली होती आणि दोन वर्षांहून लहान होती त्यांनाही ठार मारलं.येशूच्या अनुयायांनी या सगळ्या घटना संकलित करून त्याची मांडणी केली.यालाच 'नवा करार' म्हणतात.येशू ख्रिस्त आणि त्यांचे शिष्य हे यहुदी (ज्यू) होते आणि 


त्या काळी धार्मिक नीतिनियमांचं खूपच अवडंबर माजलं होतं. येशू ख्रिस्ताचा अशा धार्मिक कर्मकांडाला विरोध होता.चांगल्या परोपकारी

कामांसाठी त्याचा विरोध नव्हता. त्यामुळेच त्यानं मानवतेच्या दृष्टिकोनातून जगण्याचे नियम करण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला.


येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवीसन ही कालगणना सुरू झाली असं मानल जात. मेरी आणि जोसेफ यांचा येशू ख्रिस्त मुलगा ! त्याचा जन्म नेमका कधी झाला याबद्दल एकवाक्यता नाही. काहींच्या मते त्याचा जन्म इ.स.पूर्व मध्ये बेथलहेममध्ये झाला. २५ डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस मानला जातो आणि नाताळ म्हणून तो जगभर साजरा करण्यात येतो.जोसेफ सुतारकाम करत असे.येशूचा जन्म हेरॉड द ग्रेट याच्या शासनकाळात झाला.जन्मलेल्या मुलापासून आपल्याला धोका असल्याचं समजल्यामुळे त्यानं दोन वर्षांखालील सगळ्या मुलांना ठार मारण्याचा आदेश दिला होता. मात्र एका देवदूतानं जोसेफला या धोक्याची पूर्वसूचना दिल्यामुळे त्यानं आपल्या कुटुंबाला घेऊन तिथून इजिप्तला हेरॉडचा मृत्यू होईपर्यंत स्थलांतर केलं होतं. हेरॉडचा मृत्यू झाल्यानंतर जोसेफ आपल्या कुटुंबाला घेऊन गॅलिलीमधल्या नाझरथ या गावात वास्तव्याला आला. खरं तर ख्रिश्चन लोक येशूला परमेश्वराचा अवतार मानतात. लोकांनी केलेल्या पापांसाठी त्यानं मरण पत्करलं,असं म्हटलं जातं.येशूच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मॅथ्यू,मार्क,ल्यूक आणि जॉन यांनी लिहून ठेवलं होतं.


१२ वर्षांचा असताना येशू आपल्या आई- वडिलांबरोबर जेरुसलेमच्या यात्रेला गेला आणि तिथेच तो त्यांच्यापासून वेगळा झाला.अनेक दिवसांनी तो जेरुसलेममधल्या ज्येष्ठांबरोबर चर्चा करत असताना एका मंदिरामध्ये आढळला. येशून काही काळ सुतारकाम केल्याचेही उल्लेख सापडतात.मात्र वयाच्या ३० व्या वर्षी जॉन बॉप्टिस्ट यानं त्याचा बाप्तिस्मा केला आणि त्याच वेळी त्यानं येशू परमेश्वराचा पुत्र असल्याचं जाहीर केलं.हा बाप्तिस्मा झाल्यानंतर येशूने यहुदींच्या वाळवंटात जाऊन ४० दिवस आणि ४० रात्री उपवास करण्यात घालवल्या.


असं म्हटलं जातं की तीन वेळा राक्षस किंवा सैतानानं येशूला वेगवेगळी प्रलोभन दाखवली. एकदा दगडाचं रूपांतर ब्रेडमध्ये करता येईल म्हणून,तर दुसऱ्यांदा तो कितीही उंच पर्वतावरून खाली खोल दरीत कोसळला तर त्याला देवदूत वाचवतील म्हणून,तर तिसऱ्यांदा जगातल्या सगळ्या राज्यांवर तो आपली सत्ता गाजवू शकतो म्हणून पण येशून तिन्ही वेळेस ही प्रलोभनं नाकारली.


त्यानंतर येशू गॅलिलीमध्ये परतला आणि त्यानंतर त्याने अनेक आसपासची पिंजून काढली. या काळात अनेकांनी त्याचं शिष्यत्व पत्करलं. त्यात 


मेरी मेग्डलीन हीदेखील त्याची निस्सीम शिष्या होती.तिने अखेरपर्यंत येशूला साथ दिली.


पॅलेस्टाइन या भागातला सगळा परिसर येशून पिंजून काढला होता.त्याची प्रवचन ऐकण्यासाठी लोक दुरून दुरून येत असत.येशू मानवजातीला पापातून मुक्त करण्यासाठी आला आहे,असं बायबलमध्ये म्हटलं आहे.

येशूची कीर्ती आणि शिष्य दिवसेंदिवस वाढतच गेले.तसंच त्याच्या चमत्कारांनी गरीब,दीनदुबळ्या लोकांचे आजार बरे होऊ लागले,त्यांची संकट दूर होऊ लागली. येशूची कीर्ती सर्वदूर पसरल्यानं तत्कालीन सत्ताधारी चिडले आणि त्याला वयाच्या ३३ व्या वर्षी क्रूसावर चढवून खिळे ठोकून ठार मारण्यात आलं. त्याचं दफन करण्यात आलं.

मृत्यूपूर्वी येशूनं आपल्या बारा शिष्यांसह जे भोजन केलं, त्याला 'लास्ट सपर म्हटलं जातं.या वेळी त्याने आपल्या शिष्यांना उपदेश केला,असं म्हटलं जातं.


येशूला दफन केल्याच्या तीन दिवसांनंतर ज्या ठिकाणी त्याचं दफन करण्यात आलं होतं,ती जागा रिकामी असल्याचं आढळून आलं.


त्याच दिवशी येथून आपली शिष्या मेरी मेग्डलीन आणि आपली आई मेरी हिला दर्शन दिलं. ४० दिवसांनंतर येथून जेरुसलेमच्या पूर्वेकडे असलेल्या ऑलिव्हेट पर्वतावर आपल्या शिष्यांची भेट घेतली.एका ढगाद्वारे स्वर्गात जाण्यापूर्वी येथून आपल्या शिष्यांना आपण आता पवित्र आत्मा झालो असून मानवतेसाठी प्रयत्नशील राहू,असं सांगितलं.


'बायबल' मध्ये सांगितल्यानुसार खूप खूप पूर्वी या जगात अंधार,अन्याय असं काहीही नव्हतं; पण कालांतरानं लोकांमधली राक्षसी वृत्ती आणि अहंकार वाढला गेला आणि त्यामुळे जगभरात अंधार पसरला.या अंधाराला प्रत्यक्ष परमेश्वरानं बांधून ठेवलं आणि पृथ्वीवरचा पहिला मानव ज्याला म्हटलं जातं त्या आदमला पृथ्वीचा राजा बनवलं.मात्र आदमला सैतानानं गोड बोलून पाप करायला भाग पाडलं आणि तेच पाप संपूर्ण मानवजातीत पसरलं.

यामुळे सगळे लोक मृत्युमुखी पडले.त्यामुळे परमेश्वरानं जलप्रलय घडवून आणला आणि पापाचा विनाश केला. त्यानंतर परमेश्वरानं पुन्हा पृथ्वीची निर्मिती केली आणि पृथ्वीवर ऋतू निर्माण केले. त्या त्या ऋतूंचा कालावधीपण निश्चित केला. या ऋतूनुसार परमेश्वरानं माणसाकडे लक्ष ठेवलं. 


अब्राहमच्या काळात लोक सुळावर चढून परमेश्वरासाठी स्वतःचा बळी देत. ही प्रथा जवळजवळ मुसा नबीच्या काळापर्यंत म्हणजेच येशू ख्रिस्त जन्मण्याआधी यासाठी १२०० वर्ष सुरू राहिली. येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर लोकांना न्याय मिळावा तो वारंवार परमेश्वराच्या संपर्कात राहिला त्या पीडित लोकांच्या जीवनात येथून अंधार दूर करून आशेचा किरण आणला. त्यामुळे आजही ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून परमेश्वराशी संपर्क साधतात आणि आपल्या सुखी जीवनाची अपेक्षा करतात.


 बायबलमध्ये येशू ख्रिस्ताची शिकवण दिली आहे.

त्यानुसार यशू म्हणतो, 'सत्य, मार्ग आणि जीवन म्हणजे मीच आहे.मीच जीवनात भूक मिटवणारं अन्न आहे.मी जगताना लागणारं पाणी आहे.मी या जगातला आशेचा किरण आहे.मी एक चांगला जगनियंता आहे.मी पहिला आणि शेवटचा अल्फा आणि ओमेगा आहे. मी या जगाचा आरसा आहे.'


इ. स. ३० ते ५० या कालावधीत येशू ख्रिस्ताच्या विचारांचा त्याचे अनुयायी मौखिक स्वरूपात प्रसार करत होते. त्यानंतर ते एकत्रित करून लिखित स्वरूपात मांडलं गेलं. येशू ख्रिस्त म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार असून त्यानं माणसाचा जन्म घेऊन वाट्याला आलेलं दुःख भोगलं.अखेर त्याला समाजातल्या क्रूर लोकांनी क्रूसावर मारलं.येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर तो पुन्हा येईल आणि जगात न्यायाचं राज्य प्रस्थापित करेल याचा विश्वास त्याच्या अनुयायांना होता.


जुना करार हा मूळ हिब्रू भाषेत लिहिला गेला. हिब्रू ही प्राचीन भाषा असून ती उजवीकडून डावीकडे लिहिली आणि वाचली जाते. ६व्या शतकापर्यंत यहुदी लोक हिब्रू भाषा बोलत असत.जुना करार पपायरसच्या कागदावर लिहिला गेला.पपायरस म्हणजे लव्हाळ्याच्या लगद्यापासून बनवलेला कागद. हा कागद कोरड्या हवामानात अनेक दिवस टिकत असे. 


यात ३९ पुस्तकांचा समावेश होता,तर नव्या करारात २७ पुस्तकं सामील होती. त्यानंतर ग्रीक भाषेत बायबलचं भाषांतर झालं. इ.स.३९० मध्ये सेंट जेरोम यांनी लॅटिन भाषेत भाषांतर केलं आणि या 'भाषांतराला 'व्हलगेट' असं संबोधलं गेलं. त्यानंतरची १००० वर्षं कॅथलिक चर्चचं बायबल म्हणून त्याला मान्यता मिळाली. बायबलच्या प्राचीन हस्तलिखित प्रती आजही जतन करून ठेवलेल्या आहेत.


इस्लाम धर्मातदेखील 'बायबल'कडे खूप आदरानं बघितलं जातं.'कुरआन' (बोलीभाषेत 'कुराण' असं संबोधलं जातं) प्रमाणेच 'बायबल' हाही परमेश्वराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो.हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा,धर्माची मूलतत्त्वं काय आहेत हे सांगणारा आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा ग्रंथ आहे.परमेश्वराचं अस्तित्व, तसंच त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे.जगभरात या ग्रंथाच्या इतर कुठल्याही ग्रंथांपेक्षा सर्वाधिक प्रतींची विक्री झालेली आहे.विख्यात चित्रकार लिओनार्दो दा व्हिंचीचं 'द लास्ट सपर' आणि मायकेल एंजेलोचं 'क्रिएशन ऑफ अॅडम' ही चित्रं 'बायबल' वरच आधारित होती.


१५५७ साली प्रोटेस्टंट पंथाचा मार्टिन ल्युथर किंग यानं बायबलचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं.त्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला.


आजही अनेक भाषांमध्ये भाषांतर करताना लोक आढळतात.संपूर्ण बायबल हे एकूण ६९८ भाषांमध्ये

भाषांतरित झालं असून,फक्त नवा करार हे १५४८ भाषांमध्ये, तर 'बायबल' मधल्या गोष्टींचा भाग ११३८ भाषांमध्ये आणि 'बायबल' मधला काही भाग घेऊन तो ३३८४ भाषांमध्ये आजवर भाषांतरित झाला आहे. इतर कोणत्याही ग्रंथाचं इतक्या भाषांमध्ये आजपर्यंत भाषांतर झालेलं नाही.१६१६ साली फादर स्टीफन यांनी 'ख्रिस्तपुराण' नावानं 'बायबल'चं मराठीतून भाषांतर केलं,तर डॉ. विल्यम कॅरी यांनी १८०७ साली ४० भाषांमध्ये 'बायबल'चं भाषांतर केलं.१९२४ साली पंडिता रमाबाई यांनी १८ वर्षं परिश्रम करून हिब्रू 'बायबल' मराठीत आणलं. 'बायबल' चं मराठीत भाषांतर करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांच्याकडे तो मान जातो. ज्या दिवशी त्यांनी शेवटच्या वाक्याचं भाषांतर केलं,त्याच दिवशी (रात्री) त्यांचा मृत्यू झाला.फादर दिब्रिटो यांनी 'बायबल'चा सुबोध मराठी भावानुवाद केला आहे. तसंच मंगेश पाडगावकर यांनी देखील 'बायबल' मराठीत आणलं आहे. १५ व्या शतकात गटेनबर्ग यानं छपाईचा शोध लावला,तेव्हा प्रथम त्यानं 'बायबल'च छापलं होतं.


जगातल्या या पहिल्या छापील 'बायबल'मध्ये दर पानावर ४२ ओळी असल्यामुळे याला '४२ ओळींचं बायबल' असं म्हटलं गेलं. 


ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून 'बायबल'ला अपार महत्त्व आहे. जगातल्या अत्यंत प्रभावशाली ग्रंथांमध्ये बायबल या ग्रंथाचा खूप वरचा क्रमांक आहे हे मात्र खरं!


" परमेश्वर तुमचा सोबती असल्यामुळे तुमचं ध्येय तितकंच विशाल ठेवा." - येशु ख्रिस्त


७ जून २०२३ भागातील पुढील भाग..






७/६/२३

एक्सपेरिमेंट इन प्लँट हायब्रिडायझेशन - ग्रेगॉर मेंडेल (१८६६)

वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगॉर मेंडेल नावाच्या धर्मगुरूनं आनुवंशिकतेचं गूढ उलगडलं.त्याच्या सिद्धान्तामुळे माणसांमध्ये येणाऱ्या आनुवंशिक विकृतीबद्दलचा अभ्यास करणं शक्य झालं.माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ४६ गुणसूत्रं (क्रोमोसोम्स) म्हणजे गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात.पण अनेक वेळा गुणसूत्रांमध्ये आधिक्य किंवा कमतरता निर्माण झाली तर पुढल्या पिढीत विकृती निर्माण होऊ शकते. त्यामुळे 'एक्सपेरिमेंट इन प्लँट हायब्रिडायझेशन' या मेंडेलच्या ग्रंथाचं योगदान मानवजातीच्या कल्याणासाठी उपकारक ठरलं!



चार्ल्स डार्विन यानं उत्क्रांतिवादाची तत्त्वं मांडली, पण आनुवंशिकतेविषयी तो पूर्णपणे अनभिज्ञ होता.

विज्ञानाच्या शाखेत आनुवंशशास्त्र ही शाखा दाखल झाली,तिनं मानवी शरीरातली किती तरी रहस्य उलगडली,यामुळे अनेक विकृती का होतात याविषयी

देखील माणूस सतर्क झाला.आणि पुढे त्या विकृतींची कारणं कळल्यामुळे त्यावरचे उपायही शास्त्रज्ञांनी शोधून काढले.या आनुवंशिकतेचं गूढ वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगॉर मेंडल नावाच्या धर्मगुरूला कसं उलगडलं ही एक खूपच रोचक कहाणी आहे. मेंडेलच्या झपाटले-

पणातून 'एक्सपरिमेंट इन प्लॅट हायब्रिडायझेशन' हा ग्रंथ कसा प्रकाशझोतात आला आणि त्यावर आधारलेली आनुवंश-शास्त्राची शाखा कशी विकसित झाली हे जाणून घेणं खूपच विलक्षण आहे.!


'एक्सपरिमेंट इन प्लॅट हायब्रिडायझेशन' हा पेपर १८६५ मध्ये प्रकाशित झाला; पण त्या वेळी त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. या ग्रंथात ग्रेगॉर मेंडेलनं वनस्पतींवरचे प्रयोग लिहिले आहेत.काही झाडांना पांढऱ्याच रंगाची फुलं का येतात?लाल रंगाची का येत नाहीत ? एखाद्या झाडाला ठरावीक प्रकारचाच वाटाणा का येतो? अशा आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी तो आपल्या सहकाऱ्यांबरोबरही चर्चा करत असे. खरं तर यासाठी मेंडेलनं अनेक पुस्तकंही वाचली; पण तरीही त्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं नीटपणे मिळाली नव्हती. आपल्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्यालाच शोधावी लागतील,या विचारापर्यंत मेंडेल येऊन पोहोचला आणि त्यानं आपल्या बागेत काही प्रयोग करायला सुरुवात केली.


मेंडेलला फर्टिलायझेशन करून नवीन पिढीत येणारे गुणधर्म तपासायचे होते आणि त्यासाठी त्याला भराभर नवीन तयार होणाऱ्या पिढ्या हव्या होत्या.त्यामुळे त्यासाठी आपण वाटाण्याच्या रोपांची लागवड केली तरच आपल्याला हवे ते परिणाम मिळतील,असं त्याला वाटलं.

ही रोपं निवडण्यामागे काही कारणं होती.वाटाण्याचं झाड हे वर्षभरात कुठल्याही ऋतूत लावलं तरी चालणारं होतं. त्याचं जीवनचक्र तीन-चार महिन्यांत पूर्ण होतं.तसंच वाटाण्याच्या रोपांमधलं वैविध्य ठळकपणे शोधता येत होतं.उदाहरणार्थ,हिरवा आणि पिवळा वाटाणा किंवा वाटाण्याचा पृष्ठभाग (गुळगुळीत किंवा सुरकुतलेला) तसंच या वाटाण्याच्या आधी येणाऱ्या फुलाचा रंगही वेगळा असतो.पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या वाटाण्यांच्या रोपांची मेंडेलनं लागवड केली. अशा रीतीनं मेंडेलच्या प्रयोगाचं काम आपल्या बागेतच सुरू झालं.


मेंडेलच्या चिकाटीला तोडच नव्हती. त्यानंतरच्या आठ वर्षांत मेडेलनं आपल्या बागेत ३०००० रोपांची लागवड केली.त्यातल्या १० हजार रोपांच्या वाढीतल्या बारीकसारीक बदलांच्या नोंदी तो ठेवत राहिला.त्यानं वाटाण्यांच्या तपासणीसाठी त्यांचे सात गुणधर्म नक्की केले.म्हणजे वाटाण्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आहे की खडबडीत,तो वाटाणा पिवळा आहे की हिरवा, वाटाण्याची वेल उंच आहे की ठेंगणी,

तिच्या टोकाला फुलं येतात की मध्ये खोडावर येतात वगैरे.


खरं तर हे काम खूपच कंटाळवाणं होतं; पण मेंडेलनं मात्र कधी कंटाळा किंवा आळस केला नाही.गणिताचा वापर करून तो अनेक प्रयोग करत असे.वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या झाडांचं तो फलनसंकर(क्रॉसफर्टिलायझेशन) करत असे.दोन संकरित झाडांचं पुन्हा क्रॉस फर्टिलायझेशन केल्यानंतर त्याला आणखी गमतीदार परिणाम दिसायचे.उंच झाडां-बरोबर उंच झाडं हायब्रिड केली तेव्हा नव्या पिढीतली झाड उंच निघायची.ठेंगणी झाड ठेंगण्या झाडांबरोबर हायब्रिड केली तर ती ठेंगणी निघायची.मात्र उंच झाडांबरोबर ठेंगणी झाड हायब्रिड केली तेव्हा येणारी झाडं उंच निघाली.तेव्हा तो थोडा गोंधळात पडला. नंतर त्याला असं वाटलं की,सजीवातल्या प्रत्येक पेशीमध्ये प्रत्येक गुणधर्मासाठी प्रत्येक गुणधर्मासाठी दोन घटक असावे लागतात.खरं तर ही कल्पना 'जीन'च्या जवळ जाणारी होती आणि मेंडेल त्याला 'एलिमेंट' असं संबोधत असे.म्हणजे वाटाण्याच्या रंगासाठी त्याच्या प्रत्येक पेशीमध्ये असलेले दोन घटक त्याच्या आई-वडिलांकडून प्रत्येक एक असे आलेले असतात.हे जसं रंगासाठी असतं,तसंच ते त्या झाडाच्या उंचीसाठी देखील असतं.थोडक्यात,प्रत्येक गुणधर्मासाठी दोन-दोन घटक असतात.म्हणजेच वाटाण्याच्या वेलीचं उदाहरण बघितलं, तर त्यातली आई ही वेल उंच असेल,आणि 

त्या वेलीच्या प्रत्येक पेशीत उंचीचे घटक दोन्हीही उंच-उंच असे असले आणि वाटाण्यातले वडील ही वेल समजा ठेंगणी असली,तर त्या वडील वेलीच्या प्रत्येक पेशीत उंचीचे घटक ठेंगणा ठेंगणा असे असले तर त्याच्या संकरफलना (क्रॉसफर्टिलायझेशन) मधून जी वेल निर्माण होईल,त्या वेलीच्या प्रत्येक पेशीत उंच,ठेंगणा असे आई-वडिलांकडून प्रत्येकी एक असे उंचीचे घटक येतील. 


मग आता ही नवी वेलं उंच असेल की ठेंगणी हे कसं ठरवायचं ? हा प्रश्न जेव्हा मेंडेलसमोर आला,तेव्हा त्याने एक अनोखी मांडणी केली. प्रत्येक गुणधर्मासाठी एक प्रबळ (डॉमिनंट) आणि एक दुर्बळ (रिसेस्हिव्ह) असे प्रकार असल्याचं त्याचं म्हणणं होतं.म्हणजेच वाटाण्याच्या वेलीमध्ये उंचीसाठी उंच ठेंगणा यातला 'उंच' हा प्रबळ समजला जाईल आणि अर्थातच 'ठेंगणा' हा दुर्बल समजला जाईल. थोडक्यात,वेलीमध्ये पुढल्या उंचीसाठी उंच आणि ठेंगणा दोन्हीही घटक असतील तेव्हा ती वेल उंच निघेल कारण 'उंच' हा प्रबळ असल्यामुळेच तितकाच प्रभावी असल्याचं मेंडेलचं मत होतं.


म्हणजेच वाटाण्याच्या एका हिरव्या वेलीमध्ये हे दोन घटक हिरवा हिरवा असे आहेत आणि दुसऱ्या हिरव्या वेलीमध्ये ते तसेच हिरवा हिरवा असतील तर जेव्हा दोघांचे हायब्रिड तयार होईल तेव्हा नवीन वेलीत सगळेच घटक हिरवे असल्यानं नवीन वेलही हिरवीच निघेल;पण त्यानंतर दुसऱ्या पिढीत मात्र हायब्रिड करताना मेंडेलला वेगळेच गंमतशीर परिणाम मिळाले.त्यानं हिरवी दिसणारी पण संकरित झालेल्या दोन वेली घेतल्या.ज्यांच्यात उंचीचे घटक प्रत्येकी हिरवा,

पिवळा असे होते. त्यानं त्यांचं पुन्हा संकरफलन (क्रॉस

फर्टिलायझेशन) केलं,तेव्हा त्याला दुसऱ्या पिढीतल्या वेलींपैकी ६०२२ हिरव्या, तर २००१ पिवळ्या वेली दिसल्या.तसंच गुळगुळीत वाटाणे जेव्हा त्याला ५७७४ वेलींवर मिळाले, तेव्हा खरखरीत पृष्ठभागाचे त्याला १८५० वेलीवर मिळाले. उंच आणि ठेंगण्या वेलींचे वाटाणे यांच्यातही हे प्रमाण ७८७:२७७ असं मिळालं. म्हणजेच इथेही हे प्रमाण जवळजवळ ३:१ असं होतं.हे असं का होतं,याचं उत्तर मेंडेलनं गणित आणि संख्याशास्त्र वापरून शोधलं. 


प्रत्येकी हिरवा आणि पिवळा असे दोन्ही घटक असलेली दोन हायब्रिड वेली पुन्हा क्रॉस फर्टिलाइझ केल्या तर प्रत्येक आई-वडील वेलीतून नवीन वेलीत रंगाचा कुठला तरी प्रत्येकी एक घटक येईल.म्हणजे आपल्याला नवीन वेलीमध्ये रंगाचे घटक चार तऱ्हेनं मिळू शकतात.हिरवा-हिरवा,हिरवा- पिवळा,पिवळा-हिरवा आणि पिवळा- पिवळा.संख्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे या चारही शक्यता समानच होत्या.


म्हणजे नवीन पिढीतल्या २५% मध्ये हिरवा-हिरवा हे घटक असतील.२५% मध्ये हिरवा-पिवळा असे.२५% मध्ये पिवळा-हिरवा आणि शेवटच्या २५% मध्ये पिवळा-पिवळा असे घटक असतील.यातल्या पहिल्या तीन प्रकारांत एक तरी हिरवा घटक असल्यानं आणि तो प्रबळ असल्यानं त्या सगळ्या वेली हिरव्या होतात आणि या ७५% वेली असतात.फक्त शेवटच्या प्रकारात एकही 'हिरवा' घटक नसल्यानं ती वेल पिवळी होते.या वेली फक्त २५% एवढ्याच असतात.यामुळे हिरव्या आणि पिवळ्या वेलींचं प्रमाण ३:१ असं येत होतं.


त्यानंतरच्या अभ्यासातून मेंडेलनं 'सेग्रिगेशन' आणि 'इंडिपेंडंट अॅसॉर्टमेंट' असे दोन नियम सांगितले.

यासाठी त्यानं वाटाण्याच्या पुढल्या पिढ्यांवर अनेक प्रयोग केले आणि काही गणितं मांडली.त्यात त्यानं वाटाण्याच्या वेलीच्या उंचीचा आणि रंगाचा विशेषतःतो वाटाणा पिवळ्या रंगाचा असतो का हेही तपासून बघितलं.


त्यानं मांडलेल्या नियमातल्या सेग्रिगेशननुसार आई आणि वडील यांच्यातल्या गुणधर्मांसाठी दोन दोन घटक असतात आणि मूल जन्माला येताना एक एक घटक एकत्र होतात आणि ती जोडी मुलामध्ये येते या जन्मलेल्या मुलामध्ये आलेल्या दोन घटकांमधला जो घटक प्रबळ असतो त्यावरून त्या मुलाचा म्हणजेच उंची किती असेल हे ठरतं. 


तसंच इंडिपेंडंट अॅसॉर्टमेंट या नियमाप्रमाणे बघितलं तर अशा दोन गुणधर्मामध्ये काही संबंध नसतो.

उदाहरणार्थ,वाटाण्याचा रंग हिरवा असेल आणि त्यावर सुरकुत्या असतील तर त्यांच्यातले सगळे गुणधर्म स्वतंत्रपणे काम करत असावेत असे मेंडलनं सांगितले.तसंच हे वाटाण्यावरचं संशोधन होतं त्यामुळे इतर सगळ्या सजीवांना हेच नियम लागू होतील असं काही नव्हतं.असं असलं तरी संशोधनाआधीच मेंडेलनं जेनेटिक्स म्हणजेच अनुवंशशास्त्र या शाखेतलं काम सुरू केलं होत म्हटलं तरी चालेल.


अखेर आठ वर्षांनंतर मेडेलला त्याच्या हव्या त्या प्रश्नांची उत्तरं सापडली.ती त्यानं एका प्रबंधात मांडली. ८ फेब्रुवारी १८६५ या दिवशी मेंडेलनं 'नॅचरल हिस्ट्री सोसायटी' इथल्या ४० बुद्धिमान विद्वान मंडळींसमोर आपला प्रबंध वाचून दाखवला.

टाळ्यांच्या कडकडाटात लोक प्रतिसाद देतील,असं मेंडेलला वाटलं; पण गणिती पद्धतीनं मांडणी केल्यामुळे मेंडेलचं म्हणणं बऱ्याच जणांना नीटसं समजलं नाही आणि मेंडेलनं काही तरी विशेष आणि महत्त्वाचं सांगितलं आहे,असं कुणालाच वाटलं नाही. उपस्थितांमधला तर एक मेंडेलला ऐकू जाईल अशा रीतीनं कुजबुजला,'आठ वर्षं वाटाण्यावर असे प्रयोग करत बसायचं म्हणजे मूर्खपणाच.' मेंडेलला वाईट वाटलं;पण तो निराश झाला नाही. 


त्यानंतर एकच वर्षाने म्हणजे १८६६ या वर्षी मेंडेलनं आपल्या निरीक्षणावर आधारित एक संशोधनपर लेख तयार केला. तो त्यानं 'अॅन्युअल प्रोसिडिंग्ज ऑफ नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी' या जर्नलमध्ये प्रकाशित केला;पण दुर्दैवानं त्या वेळी मेंडेलच्या या रीसर्च पेपरची दखल विशेष घेतली गेली नाही.मेंडेलचा हा रीसर्च पेपर तिथल्या लायब्ररीत पुढली ३५ वर्ष धूळ खात पडून राहिला.


 माझं संशोधन आज ना उद्या जगासमोर येईल आणि त्याचं महत्त्व जगाला एक दिवस नक्कीच कळेल,असं मेंडेलनं आपल्या मित्रांजवळ म्हणून ठेवलं होतं.


आनुवंशिकतेबद्दलचे सगळे सिद्धान्त जगासमोर यायला मेंडेलच्या मृत्यूनंतर १६ वर्षं जावी लागली.इंग्लंडमधला वनस्पतीशास्त्रज्ञ बॅटेसन याच्या हाती मेंडेलचे पेपर पडले आणि तो वेडाच झाला.त्यानं मेंडेलचे शोधनिबंध इंग्रजीत भाषांतरित केले.त्यानं १९०५ साली मेंडेलचं हे संशोधन ग्रंथरूपात जगासमोर प्रकाशित केलं. त्यानंच 'जेनेटिक' हा शब्द तयार करून पहिल्यांदा वापरला.

तसच याच दरम्यान हॉलंडचा ह्युगो द हाईस,जर्मनीतला कार्ल कॉरेन्स आणि आणि ऑस्ट्रियामधला एरिक व्हॉन शिओमाक या तीन शास्त्रज्ञांनी मेंडेलचे निष्कर्ष शोधून पुन्हा जगासमोर आणले.आता मात्र मेंडेलला जगभरातून विज्ञानाच्या जगात मान्यता मिळाली;पण ते सुख बघायला तो जिवंत नव्हता.


२२ जुलै १८२२ या दिवशी मोराविया देशामध्ये म्हणजे पूर्वीचं ऑस्ट्रिया आणि आताचं चेक प्रजासत्ताक इथं एका गरीब शेतकरी कुटुंबात ग्रेगॉर योहान मेंडेल याचा जन्म झाला.मेंडेल आपल्या आई- वडिलांबरोबर लहान असतानाच शेतातली कामं करायला लागला.या कामात त्याला खूप गोडी वाटत असे.मेंडेल अतिशय चुणचुणीत आणि चुळबुळ्या स्वभावाचा मुलगा होता.त्यामुळे काम करत असतानाही,त्याला प्रत्येक गोष्टीविषयीचं कुतूहल स्वस्थ बसू देत नसे.त्याला शेतातल्या पिकांबद्दल,

फळाफुलांच्या रंगांबद्दल,आजूबाजूच्या परिसराबद्दल अनेक प्रश्न पडायचे आणि मग तो आपल्या आई-वडिलांना असे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. बिचाऱ्यां-जवळ मेंडेलच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नसत.मात्र आपला मुलगा इतर मुलांपेक्षा खूप वेगळा आणि बुद्धिमान आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं.त्याला शाळेत घातलं पाहिजे, असंही त्यांना वाटत असे;पण त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की,दोन वेळा पोटभर जेवायचीच मारामार होती.अशा परिस्थितीत मेंडेलच्या शिक्षणाचा विचार करणंही त्यांना कठीण वाटे.तरीही मेंडेलच्या वडिलांनी काहीही करून आपल्या मुलाला शिकवायचंच, असा निर्धार केला आणि त्याला शाळेत दाखल केलं.


मेंडेल जसजसा मोठा होत होता,तसतशी त्याची झाडंझुडं,पानंफुलं,इतर वनस्पती यातली गोडी दिवसें-

दिवस वाढतच होती;पण घरची परिस्थिती आणखीनच हलाखीची होत होती.अशा अवस्थेत शिकायचं की घरची परिस्थिती सावरायची,असा पेच त्याच्यापुढे पडत असे.

मेंडेलनं यातून मार्ग काढण्यासाठी धार्मिक विषयातला अभ्यास करायचा ठरवलं.त्यासाठी त्यानं एका चर्चमध्ये प्रवेश घेतला.चर्चमध्ये दाखल होताच त्यानं ग्रेगॉर या संताला आदरांजली म्हणून त्याचं नाव धारण केलं.आता सगळेच त्याला ग्रेगॉर योहान मेंडेल या नावानं ओळखू लागले. धार्मिक विषयावरचं शिक्षण घेत असताना तिथल्या शिक्षकांना मेंडेलची भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांतली गोडी लक्षात आली. त्यामुळे चर्चमधल्या वरिष्ठ पदावरच्या मंडळींनी त्याला व्हिएन्ना विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयातलं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. विद्यापीठात भौतिकशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच मेंडेलनं आपल्या धार्मिक विषयातलं शिक्षणही लक्ष देऊन पूर्ण केलं.आपलं दोन वर्षांचं शिक्षण पूर्ण करून मेंडेल पुन्हा चर्चमध्ये परतला आणि

त्यानं फादर ग्रेगॉर मेंडेल म्हणून आपल काम सुरू केलं.मेंडेल ज्या चर्चमध्ये काम करत होता, त्या चर्चची स्वत:ची पाच एकराची जागा होती. या जागेत मोठी विस्तीर्ण अशी बाग होती.त्या बागेची निगा राखण्याचं काम मेंडेल स्वतः करत असे.बागेत तासन् तास कसा वेळ जातो.हे त्याचं त्यालाही कळत नसे.प्रत्येक रोपट्यावरून तो अतिशय मायेनं हात फिरवत असे.अशा वेळी लहानपणी जे प्रश्न त्याच्या मनाला पडत,ते पुन्हा उसळी मारून वर यायला लागले.यातूनच त्याचं संशोधन सुरू झालं आणि त्याचा शेवट त्यानं लिहिलेल्या रीसर्च पेपरमध्ये झाला.


६ जानेवारी १८८४ या दिवशी ग्रेगॉर मेंडेलचा मृत्यू झाला.अखेरच्या दिवसांमध्ये त्याला हृदय,किडनी आणि जलोदर यांचा त्रास होत होता.या काळात तो आपलं वजन कमी करण्यासाठी चर्चिलप्रमाणेच रोज २०- २० सिगार्स ओढत असे.आपलं संशोधन जगाला कळेल याचाही नाद त्यानं शेवटी सोडला होता. 


वेगवेगळ्या भाज्या पिकवणं,मधमाशा,उंदीर आणि सफरचंद यांचा अभ्यास करणं आणि चर्चमध्ये धर्मोपदेशकाचं काम करणं यातच त्यानं आपला वेळ घालवला.


मेंडेलच्या सिद्धान्तामुळे माणसामध्ये येणारी आनुवंशिक विकृती याबद्दलचा अभ्यास करणं शक्य झालं.माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ४६ गुणसूत्रं (क्रोमोसोम्स) म्हणजे गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात.पैकी २३ जोड्या या आईकडून,तर २३ जोड्या वडिलांकडून येतात; (जग बदलणारे ग्रंथ, दीपा देशमुख, मनोविकास प्रकाशन) पण अनेक वेळा गुणसूत्रांमध्ये आधिक्य किंवा कमतरता निर्माण झाली तर किवा एखादा भाग लोप पावला तर किंवा स्थानांतर झालं तर पुढल्या पिढीत विकृती निर्माण होऊ शकते. 


दुभंगलेले ओठ,हिमोफिलिया,वर्णकठीणता, अशी काही उदाहरण आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे सिकलसेल अॅनिमिया, रातांधळेपणा,सिस्टिक फायब्रॉसिस असे जवळजवळ ४००० प्रकारचे मानवी आनुवंशिक विकार सापडले आहेत.या आजारांवर मात करण्यासाठी जेनेटिक इंजिनीअरिंग ही एक नवी शाखा सुरू झालीय. त्यासाठी जगभरातून मधुमेह,

हृदयविकार यांसारख्या विकारांवर उपचार करण्याचे प्रयत्न केले जाताहेत.


साधारणपणे दीडएकशे वर्षांपूर्वी वनस्पतींवर केलेल्या या प्रायोगिक सिद्धान्तांचा उपयोग आपल्याला आजही मेंडेलच्या संपूर्ण जीवसृष्टीच्या जनुक आणि आनुवंशिक शास्त्रात होतोय. मेंडेलच्या 'एक्सपरिमेंट् इन प्लॅट हायब्रिडायझेशन' या ग्रंथाचं योगदान मानवजातीच्या कल्याणासाठी उपकारक ठरलं आहे यात शंकाच नाही !


" माझं संशोधन आज ना उद्या जगासमोर येईल आणि त्याचं महत्त्व जगाला एक दिवस नक्कीच कळेल.-" ग्रेगॉर मेंडेल




३/६/२३

स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो.

किंग आर्थर नावाचा एक राजा होता.एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले.पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.


पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर देण्यासाठी वर्षभरासाठी मुक्त करेल.त्या वर्षभरात आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.


तर तो प्रश्न होता की,

" स्त्रियांना नेमके काय पाहिजे ? "

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते,तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता.पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.


तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली.त्यात त्याची राणी,नावाजलेले विद्वान,दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले.पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.


मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट,

तिच्याशी सल्लामसलत कर.ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल.पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते.कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.


चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली,"मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल;तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल."


सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर योद्धा अशी होती.


तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला.ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती.तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता.तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ती जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.


आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.


पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला.तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही.

नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले.लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.


तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की.


" स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो. "


हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे.


शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले.या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.


विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती.


धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला ?


त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.


आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.


यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले.दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल.पण एकांतात काय?


अन् त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?


आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?


तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.


कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असलीस तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे.तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा.

माझी कसलीही हरकत राहणार नाही.


हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेन.कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.


अनामिक..