* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/८/२४

सर तुम्ही मेल्यावर / Sir when you die

"ती"... पूर्वी मागून खायची... 


आता "तीला" एका मेडिकल कॉलेजमध्ये स्वच्छता कामगार म्हणून काम मिळवून दिले आहे.तीच्या मुलाला "आपण" दत्तक घेतलं आहे, सर्व शैक्षणिक खर्च गेल्या चार वर्षांपासून "आपणच" करत आहात. (मी नाही...!) कामावर जाताना आज बुधवारी सकाळी ती  चुकुन भेटली. 


पर्वती पासून सदाशिव पेठेपर्यंत ती चालत जायची, घरातलं सगळं आवरून जाताना कामाला उशीर व्हायचा,केवळ या कारणासाठी तिला काढायला नको,म्हणून "आपण" तिला नवीन सायकल सुद्धा घेऊन दिली आहे. 


मला रस्त्यावर भिक्षेकर्‍यांमध्ये बसलेला बघून ती सायकल थांबवून घाई घाईने माझ्याजवळ आली,

म्हणाली; 'सर राकी बांदायची होती, पन कामावर खाडा झाला आसता... म्हनून मी रकशा बंदनाला यीवू शकले न्हायी... स्वारी सर...! तिच्या नजरेत अजीजी होती. 


मी म्हटलं हरकत नाही;भाऊ बहिणीच्या नात्याला औचित्य किंवा मुहूर्त लागत नाही.... आत्ता बांद राकी...! मी आनलीच न्हायी की वो सर,मला काय म्हाईत तूमी आता भेटताल म्हनून ...'  ती पुन्हा खजील झाली.मी सुद्धा इकडे तिकडे पाहिलं... माझ्याकडे ड्रेसिंग चे सामान होतं, त्यातली चिकटपट्टी घेऊन तिला म्हटलं, 'हि घे चिकटपट्टी आणि बांद मला "राकी"...' 


'या बया...  म्हणत, तोंडाला ओढणी लावत, तीनं मला हसत हसत "राकी" बांदली...' 


यानंतर मी खिसा चाचपला.... हातात येईल ती नोट तिला ओवाळणी म्हणून टाकली....! 


तीने ती नोट निरखून पाहिली....  कपाळाला लावली आणि परत माझ्या खिशात ठेवत म्हणाली,  'सर मला ववाळणी नको,माज्या पोराला साळंचा डीरेस घ्या... '


'म्हणजे ? मी नाही समजलो... ?'


ती म्हणाली, 'सर आवो तुमि साळेची फी भरली... वह्या पुस्तकं घ्येतली, समदं  केलं पन त्याला साळेचा डीरेस घ्यायला इसरले तुमि... ' बोलू का नको ?  सांगू का नको ? सांगितलं तर यांना राग येईल का ? या अविर्भावात चाचरत ती बोलली...! 


मला माझी चूक लक्षात आली... शाळेची फी भरली... वह्या पुस्तकं घेतली... सॉक्स आणि बुट घेतले....  मग युनिफॉर्म कोण घेणार ? 


याचा युनिफॉर्म घ्यायचा कसा काय राहिला माझ्याकडून ? मी मनाशी विचार करत राहिलो... 'मग आधी का नाही माझ्या लक्षात आणून दिलंस ?'  मी जरा वैतागून बोललो. 


'आवो सर आदीच ह्येवढं करता आमच्यासाटी,त्यात आजून किती तरास द्येयचा,आसं वाटलं म्हनुन न्हायी बोलले आदी...'


तिच्या या वाक्यानं मी खरं तर सुखावलो...


कुणाच्या करण्याची काही "किंमत" समजली तरच "मूल्य" समजते ! 


खर्च झाल्याचं दुःख नसतंच,हिशोब लागला पाहिजे...! 'बया, कुटं हरवले तुमी...?' माझे खांदे हलवत तीने विचारलं... 


मी भानावर आलो...


'साळेचा डीरेस नसंल तर झेंडावंदलाला येऊ नगोस म्हणून त्याला साळेत सांगितलं हुतं सर... आनी म्हनून त्यो गेला पन न्हाय सर झेंडावंदलाला.... !'  


'साळेचा डीरेस नव्हता,म्हनुन त्याला वर्गाच्या भायर पन हुबं केलं सर... म्हनुन मंग आज तुमाला बोलले सर...' लहान मुलीने आपल्या वडिलांना काही तक्रार करावी,या स्वरात ती बोलत होती... ! 


युनीफॉर्म नव्हता म्हणून झेंडावंदन करू दिले नाही... ? देशभक्ती युनिफॉर्मवर ठरते का?? 


या विषयावर खूप काही लिहायचं आहे, पण पुन्हा कधीतरी... ! माझ्या चेहऱ्यावरचे भाव कदाचित बदलले असावेत.... हे भाव बघून ती म्हणाली....


'जावू द्या सर मी बगते... डीरेसचं काय तरी..'


तीच्या या वाक्याने मी भानावर आलो...


मी म्हणालो, ' आता आणखी काही बगु नकोस....  घरी जाऊन पोराला घे आणि शाळेचा डीरेस घे .... कामावर आजचा खाडा पडला तर पडू दे... त्याचे पैशे मी देईन तुला... !'


ती चटकन उठली.... 


'मला ववाळणी नगो .... पण माज्या पोराला शिकू द्या.... त्येला शाळेचा डीरेस घ्या... त्येला झेंडावंदनाला जाऊ द्या ' हे म्हणणाऱ्या अशिक्षित परंतु सुसंस्कारित माऊली मध्ये मला खरी "भारतमाता" दिसली.. ! 


मला ववाळणी नगो .... पण माज्या पोराला शिकू द्या.... त्येला शाळेचा डीरेस घ्या... या दोनच वाक्यात मला माझी "जीत" झाल्यासारखं वाटतं....


कारण लहान मुलांना दिवसाला साधारण एक हजार रुपये भीक मिळते,म्हणजे महिन्याभरात तीस हजार रुपये...! शिका रे,म्हणणाऱ्या मला मग कोणते पालक भीक घालतील... ?


तरीही यांच्याशी झालेल्या नात्यांच्या जीवावर मुलं दत्तक घेतो आहे आणि त्यांना शिकवतो आहे...


असो, तर आजच दुपारी शाळेचा "डीरेस" विकत घिवून ती आली आणि म्हणाली, 'सर किती करताल ओ माज्यासाटी...मी लय त्रास देती तुमाला.... स्वारी सर.... !' 


काय बोलू मी यावर.... ? 


मी तिला म्हणालो, 'माझ्या मूर्खपणामुळे १५ जुलै च्या अगोदर त्याला युनिफॉर्म घ्यायचं मला सुचलं नाही.... आणि त्यामुळे तो झेंडावंदनाला हजर राहू शकला नाही... वर्गातून त्याला बाहेर राहावं लागलं.... 


त्याबद्दल आज मीच,तुझी आणि त्याची माफी मागतो गं माऊली,  "स्वारी गं...!!! 


'बया...  तुमि नगा स्वारी म्हणू सर....' असं म्हणत, डोळ्यातून पाणी काढत, तीनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं...मी पोराकडे पाहिलं... नवीन कपड्याचे तीन जोड पाहून पोरगं "हरखून टूम्म" झालं होतं...


 इस्त्री केलेल्या कपड्याचा एक जोड त्याने अंगावर घातला होता.... 


मी इंटरनॅशनल संस्थेत काम करताना असेच मस्त कडक इस्त्रीचे कपडे घालायचो... मला माझीच आठवण झाली.... आता मी नाही असे इस्त्री चे कपडे घालत, इच्छाच होत नाही... पण, मला त्याच्यामध्ये अभिजीत दिसला...! 


पूर्वी तो आईबरोबर याचना करायचा... आज तो इस्त्री चे कपडे घालून शाळेत जाईल...


मी त्याला सहज गमतीने विचारलं,'बाळा शिकून पुढे मोठा होऊन काय करशील ?'


तो म्हणाला सर,'मला डॉक्टर व्हायचं आहे. ...'


मी म्हटलं,'बाळा, डॉक्टर होऊन काय करशील पण ?'


तो निरागसपणे हसला आणि म्हणाला,

"सर तुम्ही मेल्यावर मी डॉक्टर होऊन, भिकाऱ्यांची सेवा करीन....!!!


बुधवार २१ ऑगस्ट २०२४


"कापडी पिशवी प्रकल्प - अर्थात "आजीबाईचा बटवा..!!!"


हुश्श्श.... ! 


चालू झाला एकदाचा कापडी पिशवी प्रकल्प...!!! खूपदा सांगितलं आहे तरीही पुन्हा सांगतो....

रस्त्यावरील लोकांना भीक देणाऱ्या माझ्या भाऊ आणि बहिणींनो....  मी आपल्या पायावर डोकं टेकवून सांगतो, की लोकांना भीक देऊ नका... ! 


यांना आपण कामाला लावू.... तुमच्याकडे काही काम असेल तर यांना द्या...! काही काम नसेल तरी हरकत नाही पण, यांना भीक नका देऊ... दोन पाच रुपयात पुण्य विकत मिळत नाही...!!! 


मी यांना शासकीय नोकरी देण्याचा प्रयत्न करतोय परंतु,शासनाच्या कोणत्याही योजनांमध्ये काही कागदपत्रे नसल्यामुळे हे लोक बसत नाहीत... समाजातील अनेक लोक यांच्यासाठी मला नोकऱ्यांची ऑफर देतात,परंतु माझ्या लोकांकडे ते कौशल्य नाही किंवा शारीरिक क्षमता नाही... 


आणि म्हणून,कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त मोबदला देणारा कोणता व्यवसाय आपण या लोकांना देऊ शकू ? याचा विचार मी रोज करत असतो... ! 


असो...


समाजाने गोरगरिबांना वाटण्यासाठी दिलेल्या साड्यांचा ढीग माझ्या घरात आहे. या साड्यांची बोचक्यावर बोचकी बांधून मी घरात ठेवली आहेत. 


चालताना चुकून एखाद्या बोचक्याला माझा धक्का लागतो... मी धड;पडत नाही... परंतु पुढे जाऊन कुठेतरी धडपडतो.... घरातल्या एखाद्या वस्तूला माझा हात लागतो.... ती वस्तू खाली पडते... आणि प्रकट दिन असल्याप्रमाणे घरातली गृहलक्ष्मी न जाणो कुठून तरी प्रकट होते... हातात लाटणे आणि चेहऱ्यावर रुद्रावतार...! 


यानंतर ती माऊली, काम वाढवलं म्हणून, पुढचे दोन तास मंजुळ स्वरात माझ्या घराण्याचा उद्धार करणार,

हे मला माहीत असतं आणि म्हणून मी,समस्त नवरे जातीचा मान राखून,आपण जन्मजात बहिरे आहोत असं दाखवून,गुपचूप घराबाहेर पडतो आणि भीक मागणाऱ्या लोकांमध्ये फिल्डवर जातो...!  


असाच एके दिवशी,फिल्डवर गेलो असता,एका भिक मागणाऱ्या ताईने मला शिलाई मशीन घेऊन द्याल का असं विचारलं ? 


कान टवकारुन,मी तिला म्हणालो,' बाई, काय करशील गं तू मशीन घेऊन दिल्यानंतर ?' 


ती म्हणाली,'साड्यांना फॉल पिको करेन, कपड्यांची किरकोळ दुरुस्तीची कामं करेन ... आणि मला साड्या किंवा मोठे कापड मिळाले तर मी या कपड्यांच्या पिशव्या शिवेन,सासू बसून भीक मागते तिला बसल्या बसल्या या पिशव्या रस्त्यावर विकायला लावेन... तेवढाच आमच्या कुटुंबाला हातभार... ! 


हाच तो शंभरावा ठोका...!!! 


मला आठवतं,त्यावेळी मी खूप जोर जोरात हसलो होतो... मला मार्ग मिळाला होता...! 


घरात पडलेल्या साड्या,या ताईला किंवा ज्यांना शिलाई काम येतं,अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना देऊन पिशव्या शिवायला लावल्या तर ??? 


या ताईच्या सासूसारखे अनेक लोक नुसते बसलेले असतात... यांना या पिशव्या बसल्या बसल्या विकायला लावल्या तर...??? भीक मागणाऱ्या लोकांसाठी कमी खर्चात,कमी कष्टात जास्त मोबदला मिळवून देणारा हा मोठा व्यवसाय ठरेल... !


मला मार्ग सापडला... आणि तो आमच्या एका याचकानेच दाखवला.


एक गट बसून पिशव्या शिवेल,दुसरा गट या पिशव्या विकेल... असा जर एखादा प्रकल्प सुरू केला, तर भीक मागणाऱ्या लोकांना एक व्यवसाय तर मिळेलच.... 


परंतु;आमच्या गृहलक्ष्मीच्या तलवारीसम भासणाऱ्या लाटण्यापासून माझी सुद्धा सुटका होईल... माझ्या घराण्याचा उद्धार यानिमित्ताने टळेल ....असाही एक स्वार्थी विचार मनात तरळून गेला... ! 


या विचाराने मी सुखावलो...


पण,आमच्या भीक मागणाऱ्या लोकांकडून पिशव्या विकत घेणार कोण ??? 


मग आमच्याकडून पिशव्या विकत घ्या, भीक नको काम द्या.अशा अर्थाचा एखादा बोर्ड तयार करून विकणाऱ्या लोकांच्या गळ्यात लटकवू... असा विचार मनात आला. पण उगीच कोरडा काहीतरी मेसेज तयार करण्यापेक्षा,पुण्यातल्या लोकांशी इमान राखून.... पुणेरी टोमणे का तयार करू नयेत ? असं डोक्यात आलं...


पुणेरी टोमण्यांच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या विकत घ्या अशा अर्थाचा मेसेज लिहिला तर समाज प्रबोधन सुद्धा होईल आणि आमच्या पिशव्या सुद्धा विकल्या जातील,असा विचार डोक्यात आला. 


पुणेरी टोमणे गुदगुल्या करतात,पण ते टोचत नाहीत,बोचत नाहीत...! 


आपोआप चेहऱ्यावर स्मितहास्य येतं... आणि जे काही सांगायचं आहे ते बरोबर योग्य ठिकाणी घुसतं...आणि मग पहिलाच टोमणा सुचला... 


सासूबाईंच्या सारख्या सूचना आणि सुनबाईंच्या सूचना नको असतील तर प्लास्टिक पिशवी वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या वापरा...


पाठोपाठ दुसरा सुचला...


प्लास्टिकची पिशवी म्हणजे गर्लफ्रेंड दिखावू,

कापडी पिशवी म्हणजे सुंदर, छान बायको टिकाऊ... प्लास्टिक पिशवी वापरणे सोडून द्या आणि आमच्या कापडी पिशव्या वापरा...!


मला आणखी टोमणे हवे होते... मग डोक्यात सतत तेच विचार ... पण,या दोन शिवाय गाडी काही पुढे जाईना....आणि टोमणे पण काही केल्या सुचेनात ... 


एकतर मी सातारी... धीर धरायची आम्हासनी सवय नाही...! हिकडं भाकरी थापली,की तिकडं ती तोंडात गेलीच पायजे...


काही केल्या हे गणित जमेना...


तरीही सतत विचार सुरू होते....

मोटरसायकल चालवताना एखादा टोमणा सुचला की गाडी बाजूला घेऊन पटकन मिळेल त्या कागदावर तो टोमणा लिहून घ्यायचो... 


चार आठ दिवसात बरेच टोमणे सुचले...


मग माझ्या पुस्तकाच्या डिझाईन पासून प्रिंटिंग पर्यंत सर्व काही करणारी,पद्मिनी खुटाळे हिला मी माझी आयडिया सांगितली, तिने कागदावर टोमण्यांना डिझाइनचं रूप दिलं...आम्ही चक्क कॉपी करतो.असं म्हणणाऱ्या डीजी कॉपीयर्स यांनी माझ्या या टोमण्यांची मला चक्क कॉपी काढून दिली...


यानंतर,पिशव्या शिवू शकतील असा एक गट तयार केला... पिशव्या विकू शकतील असा दुसरा गट तयार केला... आधी सर्व अंदाज घेतला,(म्हणजे होमवर्क केला.

लहानपणी कधी केला नाही,परंतु आत्ता मात्र केला ) आणि मगच होमवर्क करून माझा विचार तुम्हा सर्वांना सांगितला... ! मला वाटलं नव्हतं पण,माझ्या एका साध्या छोट्या विचाराला तुम्ही सर्वांनी इतकं उचलून धरलं की काय सांगू ? 


कुणी शिलाई मशीन दिल्या,कुणी कपडे, कुणी आर्थिक मदत... आणि काय काय सांगू ? माझ्यावर माया करणाऱ्या कितीतरी आज्यांनी फोन करून या प्रकल्पाची आणि माझी स्तुती केली... 


हि पण एक प्रकारे मदतच आहे...(यावेळी भारावून मी त्यांना म्हणालो होतो, प्रकल्पाविषयी लिहीन तेव्हा आजी तुमचं नाव नक्की लिहिणार आहे... त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या,नाव लिही, पण आमच्या नावापुढे आजी लावू नकोस... ताई म्हण हां... Ladies are Ladies )


यातून एक झालं... 


यामुळे माझं मनोबळ आणखी वाढलं... आपण योग्य रस्त्यावर आहोत याची खात्री पटली...! 


असो.... यावरून एक आठवलं... 


केलेली स्तुती कधी लक्षात ठेवायची नसते... 

पण स्तुती करणाऱ्या व्यक्तीला मात्र विसरायचं नसतं. स्तुती आठवली की अहंकार वाढतो... स्तुती करणारी व्यक्ती आठवली की कृतज्ञता... !!! 


मी कृतज्ञ आहे या आजीबाई ताईंचा...!!! 


यानंतर शिवणाऱ्या गटाला पिशव्या शिवायला लावल्या,विक्री केल्यानंतर, ज्याच्या हातात या पिशव्या पडतील,त्याला या पिशव्यांच्या विक्री मागचा हेतू कळावा, यासाठी एक छोटासा मेसेज फ्लेक्स वर टाईप करून पिशवीवर शिवून घेतला. 


यानंतर विकणाऱ्या गटाला बोलावून त्यांच्या गळ्यात पुणेरी टोमण्याचे बोर्ड घातले...  हातात पिशव्या दिल्या आणि त्यांना सांगितलं,या पिशव्या आता विकायच्या... लक्ष्मी रोड,तुळशीबाग,बाजीराव रस्ता, कॅम्प अशा गर्दीच्या ठिकाणी फिरत रहा... '


'गळ्यात अडकवलेले बोर्ड लोकांना दिसायला हवेत... येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पिशव्या घेण्यासाठी विनंती करा... '


'यातून जे पैसे येतील ते निम्मे पैसे तुम्ही घ्यायचे, उरलेले निम्मे मला द्यायचे,म्हणजे मी हे निम्मे पैसे शिवणाऱ्या व्यक्तीला देईन.'


यातून एकाने कळीचा मुद्दा विचारला,'सर एक पिशवी कितीला विकायची ?' 


बापरे... 


मी हा विचारच नव्हता केला...एक पिशवी कितीला विकायची... ??? 


खरंच पिशवीची किंमत काय ठेवायची...??? 


समाजाने दिलेल्या कपड्यातून मी या पिशव्या शिवल्या होत्या... 


कुणी देवीला होतील म्हणून ठेवलेल्या नव्या साड्या मला दिल्या होत्या.... 


लेकीच्या लग्नात मिळालेल्या साड्या मला दिल्या... 


कुणी पडद्याचे कापड दिले... 


वडिलांच्या पंचाहत्तरी निमित्त / वाढदिवसानिमित्त आलेले सुटिंग शर्टिंग आणि सफारी चे कापड मला अनेकांनी दिले.कुणी घरात असलेल्या कपड्यांच्या रात्रंदिवस बसून स्वतः पिशव्या शिवल्या होत्या.... त्या मला दिल्या...अक्षरशः कुणी कुणी पाचशे रुपये मीटरचे कापड विकत घेऊन मला तागेच्या तागे दिले होते ...ठेवणीतल्या साड्या आता घालून मी या वयात कुठे मिरवणार आहे ? असं म्हणत कितीतरी आज्यांनी ठेवणीतल्या साड्या मला दान केल्या...


हे प्रेम म्हणू ?  माया म्हणू ? विश्वास म्हणू ? की समाजाबद्दलची कृतज्ञता म्हणू.... ?? 


समाजाने दिलेल्या या प्रेमाची, मायेची, विश्वासाची आणि कृतज्ञतेची आम्ही पिशवी तयार केली....  पण त्याची किंमत ठरवणारा मी कोण ??? 


माझी तितकी पात्रता नाही...


आमचा हा प्रकल्प म्हणजे नुसता प्रकल्प नाही,तर डोंगरावर पोहोचलेल्या माणसांनी, पायथ्याशी असलेल्या माणसांना, माणुसकीने केलेली मदत आहे...!!!


आमची पिशवी म्हणजे पिशवी नाही... आजीबाईचा हरवलेला बटवा आहे तो...! 


या बटव्यामध्ये प्रेम,माया, विश्वास आणि कृतज्ञतेचा,आजीच्या खरबरीत हाताच्या मायेचा स्पर्श आहे...! आणि मग खूप विचार करून ज्यांनी मला पिशवीची किंमत विचारली होती त्यांना सांगितलं... 


'मामा, या प्रत्येक पिशवीची किंमत अमूल्य आहे...आणि या पिशवीची किंमत ठरवण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही...!' 


'जी व्यक्ती तुम्हाला या पिशवीची किंमत विचारेल... त्याच्याशी थोडसं बोला,त्यांना जाणीव करून द्या,पिशवीचं कापड कुठून आलंय... कुणी दिलंय ? देणाऱ्याची भावना काय आहे ? कुणी शिवलंय... आपण कशासाठी या पिशव्या विकतोय... ?' वगैरे.... वगैरे ! 'माझी खात्री आहे, पिशवीवरचा मेसेज वाचून, तुमचं बोलणं ऐकून,एखादी संवेदनशील व्यक्ती या पिशवीचं मोल बरोबर ठरवेल... आपल्याला किंमत नकोच आहे.हवंय ते समाजाच्या विश्वासाचं मोल... !'


'किंमत ठरवण्याची पात्रता आपली नाही; समाजाने दिलेल्या गोष्टीचे मोल समाजच करेल...!' यानंतर ती व्यक्ती पिशवी विकत घेतल्यानंतर,जो निधी देईल,तो प्रसाद समजून माथ्याला लावा...! 


'प्रसादाची चिकित्सा,किंमत आणि मोल करायचं नसतं कधीच...!' 


माझ्या लोकांनाही ते पटलं...


बरोब्बर शनिवारी एक जूनला आमचा हा प्रकल्प सुरू झाला.... शिवणाऱ्याने पिशव्या शिवल्या... विकणाऱ्याने पिशव्या विकल्या... ! 


दिवसाढवळ्या जे स्वप्नं पाहिलं होतं...ते प्रत्यक्षात येत होतं...! आता पाच लोक पिशव्या शिवत आहेत....  पाच लोक पिशव्या विकत आहेत...


माझा एक अपंग माणूस आहे,पूर्वी तो वर्षानुवर्षे रस्त्यावर पडून होता.... त्याला नीट करून,आता अपंगाची सायकल दिली आहे... सायकलवर पुणेरी टोमणे अडकवले आहेत... मला अभिमान हा की,याच्याकडून मला कोणतीच अपेक्षा नव्हती तरीही सर्वात जास्त व्यवसाय तोच करतो...!!! 


तर, "आजीबाईचा हा बटवा" सध्या दहा लोकांचे कुटुंब चालवत आहे... ! 


या प्रकल्पाची माहिती मिळाल्यानंतर,अनेक लोकांनी माझ्याकडे पिशव्यांची डायरेक्ट ऑर्डर द्यायला सुरुवात केली...! 


सुरुवातीला अनेक लोकांना,माझ्या लोकांनी तयार केलेल्या या पिशव्या मी घरपोच पाठवल्या...पिशव्या पाहून,तुम्हाला द्यायचे ते पैसे द्या,असे म्हणालो.... त्यांनी त्याचे योग्य ते... नव्हे, जास्तीचेच मोल दिले...! पण तरीही मनामध्ये एक सल होता... 

हे पैसे मिळाल्यानंतर,मनात अनेक विचार सुरू झाले... हे विचार मी अत्यंत नम्रपणे आपल्यासमोर मांडत आहे,हा विचार चुकीचा असेल तर मला जरूर कळवा..माझ्याकडून जर कुणी अशा डायरेक्ट पिशव्या विकत घेतल्या,तर मिळालेल्या पैशातून मी निम्मा पैसा पिशव्या शिवणाऱ्या व्यक्तींना मोबदला देऊ शकतो... पण उरलेला निम्मा पैसा मी कोणाला देऊ ? पिशव्या विकून संस्थेसाठी देणगी जमा करणे हा हेतूच नाही....! 


आज पाच लोक भीक मागणे सोडून... इकडे तिकडे फिरून.... गळ्यात पाटी अडकवून.... पिशव्या घेण्याविषयी, लोकांना विनंती करून पिशव्या विकत आहेत... त्यांना त्या बदल्यात पैसे मिळणार आहेत.... त्यांचं कुटुंब चालणार आहे.... भीक मागणे सोडून त्यांनी कायम हेच करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यांना कामाची / कष्टाची सवय लागावी... त्यांच्याकडे पाहून इतर याचकांना प्रेरणा मिळावी... 


उद्या पाचाचे ५० लोक व्हावेत... या ५० लोकांनी भीक मागणे सोडावे आणि आम्हाला सुद्धा पिशव्या विकायला द्या, म्हणून माझ्याकडे पिशव्या मागाव्यात... मी त्यांना माझ्याकडच्या पिशव्या विकायला देईन आणि यातून ५० लोकांची / कुटुंबांची उपजीविका चालेल... हा मूळ हेतू आहे... ! 


परस्पर जर मी माझ्याकडूनच पिशव्या विकल्या तर... शिवणाऱ्या व्यक्तीला पैसे मिळतील, परंतु पिशव्या विकणारे ५० लोक मग कसे तयार होणार ???


आणि म्हणून अत्यंत नम्रपणे मी सांगू इच्छितो की, तयार झालेला हा "आजीबाईचा बटवा" भीक मागणाऱ्या लोकांनी कष्ट करून,फिरून विकावा, त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांनी चालवावा...  याचसाठी ठेवायचा असं ठरवलं आहे.. ! 


(हा मेसेज तुम्हाला मिळण्यापूर्वीच ४५,०००) पिशव्यांची ऑर्डर माझ्याकडे आली आहे... किंमत तुम्ही सांगाल ती..अशी प्रेमळ सूचना सुद्धा आहे,परंतु मी वरील विचार त्यांना सांगून,अत्यंत नम्रतेने नकार कळवला आहे) हि तर सुरुवात आहे...जरा जोर लावला तर, आणखीही खूप ऑर्डर्स मिळतील..., अशाप्रकारे निधी मिळत गेला तर संस्था उत्तम प्रकारे चालेल यात वादच नाही... 


पण मला संस्था नाही,तळागाळात पडलेल्या,.. रुतून बसलेल्या माझ्या भीक मागणाऱ्या समाजाला चालवायचं आहे, चिखलातून त्यांना उठवून उभं करायचं आहे.... ! डायरेक्ट पिशव्या विकून,

भविष्यातल्या माझ्या ५० /५००/५००० लोकांच्या तोंडचा घास मला हिरावून घ्यायचा नाही...! 


आणि म्हणून मी कोणालाही परस्पर पिशव्या न विकण्याचा निर्णय घेतला आहे... !


मी चुकत असेन तर जरूर कान पकडावा... व्यवहारात मी जरा कच्चाच आहे...!!!  


याचकांकडून पिशव्या शिवून घेणे आणि त्यांच्याचकडून विकणे हा माझ्यासाठी व्यवसाय किंवा धंदा नाही... हा प्रकल्प म्हणजे माझ्यासाठी,माझ्यापुरती मी  मांडलेली पूजा आहे... 


माझे लोक या प्रकल्पाविषयी लोकांना बोलून माहिती देतील,कपडे देणाऱ्या व्यक्तीच्या भावना बोलून दाखवतील,प्लास्टिक पिशव्या वापरू नका म्हणून समाजाला विनवतील .... माझ्या लोकांनी  केलेली ही आरती आहे असं मी समजतो...! या प्रकल्पातून मिळालेल्या निधीमधून माझे भीक मागणारे लोक,आपल्या नागड्या उघड्या लहान मुलांच्या तोंडात सन्मानानं घास भरवतील तोच माझ्यासाठी नैवेद्य असेल...!! 


म्हाताऱ्या आईला याच पैशातून ते मानानं साडीचोळी करतील तीच माझ्यासाठी नवरात्र असेल....!!! याच पैशातून त्यांच्या घरातली चूल पेटेल... तीच माझ्यासाठी दिवाळीची पणती असेल ...!!! त्यांच्या घरातली लक्ष्मी उंबऱ्याच्या आत, ताठ मानेनं, दिमाखात डोक्यावर पदर घेऊन उभी असेल... तीच माझी गुढी आणि तोच माझा पाडवा... ! अशा भरल्या घरात मी कधीतरी जाईन आणि तिथली चिल्ली पिल्ली पोट्टी.... मामा मामा म्हणत माझ्या अंगा खांद्याशी झोंबतील... माझ्या ताईच्या घरची हि कार्टी "मामाच्या गावाला जाऊया" म्हणत मला त्रास देतील... या पिल्लांना कसं सांगू ???  मामाचा गाव हाच आहे गड्यांनो...! आमचा हा दंगा बघून खाटेवर पडलेली म्हातारी खोकत खोकत मला म्हणेल... भयनीच्या घरी आलाच हायस तर जीवून जा बाबा ...


मी म्हणेन, 'नगो म्हातारे प्वॉट भरलंय माजं....' म्हातारी मग लटक्या रागानं,मुडद्या म्हणत माझ्या तोंडात गुळ शेंगदाण्याचा तोबरा भरंल ... 


मला मिळालेला प्रसाद हाच तो...!!!


आता अजून कसली पूजा मांडू ?? कुठे अभिषेक करू... ???


आज पर्यंतच्या अनुभवावरून सांगतो... आता तुमचा पुढचा प्रश्न असेल, 'डॉक्टर आम्ही यात काय आणि कशी मदत करू शकतो?'*


चला तर आज खरंच मागतो... 


आजपर्यंत तुम्ही इतकं काही दिलं आहे,की माझी झोळी पूर्णतः भरून गेली आहे... मी तुमच्याकडे काही मागावं असं तुम्ही काही शिल्लकच ठेवलं नाही...! तरीही काही द्यायचं असेल तर माझ्या या पाच कष्टकरी लोकांचे ५०... नव्हे ५०० ... नाही नाही ५००० लोक होऊ देत.... असा आशीर्वाद द्या... !कधी बोललो नाही,परंतु खूप वेळा नाउमेद होतो मी... अशावेळी चल रे,म्हणत पाठीवर एक हलकीशी थाप द्या...! थकून कधी गुडघ्यावर बसलोच तर,उठून उभं राहण्यासाठी उठ रे... म्हणत साद द्या...! 


मी रेडा होवून नुसता "वेद" म्हणतो..

त्यावेळी तुम्ही दुसऱ्याची "वेदना" जपता...


मी "दान" मागत झोळी घेवून फिरतो...

त्यावेळी तुम्ही "पसायदान" जगता...


आता काय मागु माऊली तुमच्याकडे ? 

आपल्यापुढे नतमस्तक मी... कृतज्ञ मी ...!!! 


५ जून २०२४


डॉ.अभिजीत सोनवणे-डॉक्टर फॉर बेगर्स..

२२/८/२४

सोनेरी मुलगी व डॉक्टर / The blonde girl and the doctor

गोऱ्यापान,सोनेरी केसांच्या त्या चौदा-पंधरा वर्षांच्या सुंदर मुलीचं सगळं शरीर एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखं कडक झालेलं होतं.हात पाय वाकडे तिकडे होऊन एकाच पोझिशन मध्ये जणू घट्ट रुतून बसले होते.पाठ देखील वाकडी झाल्याने तिला सरळ स्ट्रेचर वर झोपता येत नव्हतं.थोडाही बोलण्याचा,हलण्याचा प्रयत्न केला,तर अख्ख्या शरीराला झटके येत होते.तिला नीट रडता देखील येत नव्हतं,पण वेदनेमुळे सतत डोळ्यातून पाणी झरत  होतं,त्यामुळे तिची उशी ओली झालेली होती. तिच्या आई-वडिलांनी तिचं स्ट्रेचर ढकलत आणलं होतं.कालच ते इराकमधून तडक मुंबईमध्ये पोहोचले होते,तिथून तिला कारनं पुण्याला आणलं होतं. वडील अशिक्षित कामगार,पण आई मात्र बगदाद विद्यापीठामधून सायन्सची ग्रॅज्युएट.स्वतःच्या मुलीची अशी अवस्था पाहतांना आतून खचून गेलेल्या त्या माउलीनं त्यांच्या बरोबर आलेल्या तबरेझ नावाच्या भाषांतर करणाऱ्या एका इराकी विद्यार्थ्यांच्या मदतीनं मला तिच्या या खजान नावाच्या मुलीची कहाणी सांगितली.

पाच-एक महिन्यांपूर्वी शाळेच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये नाच सादर करत असतांना खजान लंगडत असल्याचं तिच्या एका शिक्षिकेनं पाहिलं, आणि तिच्या आईला कळवलं.इराक मधल्या एका न्यूरॉलॉजिस्टनं तिची तपासणी केली,त्यात त्याला तिच्या डोळ्यात तपकिरी रंगाच्या रिंग दिसल्या. खजान ला विल्सन डिसीज नावाचा अतिशय दुर्मिळ पण गंभीर आजार असल्याचं अचूक निदान त्यानं केलं.यकृतामधल्या (लिव्हर) दोषामुळे शरीरात  कॉपर (तांबे) हा धातू साचत जातो.काही दिवसांत कॉपर ची रक्तामधली पातळी इतकी जास्त होते, कि त्याचे विषारी परिणाम सगळ्याच अवयवांवर व्हायला लागतात. पण सगळ्यात आधी लिव्हर आणि मेंदूचं अतोनात नुकसान होतं. ताबडतोब इलाज केला नाही,तर पेशंट काही आठवड्यांतच विकलांग होतो, आणि काही महिन्यांत सारा खेळ संपतो.सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याची जी मुख्य दोन औषधं आहेत,त्या दोन्हींमुळे सुरुवातीच्या काळात पेशंटचा आजार वाढतो,कारण रक्तातील कॉपरची पातळी आधी वाढते मग कमी व्हायला लागते. त्यातलंही एक औषध अतिशय महाग.

खजानला पाहिलं औषध सुरु केलं गेलं,पण दुर्दैवाने तिला त्याचे इतके साईड इफेक्ट झाले कि,तिच्या सगळ्या नसा खराब होऊन ती अगदी पलंगालाच खिळली.पॅरालीसीसचाच प्रकार होता हा.बोलणं कमी झालं,शब्दोच्चार समजेनासे झाले.मग डॉक्टरांनी दुसरं औषध सुरु करायचं ठरवलं.ते अमेरिकेतून इम्पोर्ट करायचं होतं.

खजानच्या आई-वडिलांनी त्यांचं घर,जमीन आणि एक छोटंसं दुकान होतं ते सगळं विकून टाकलं. एका छोट्याशा घरात ते भाड्यानं राहू लागले.काही दिवसांतच नवीन औषध त्यांच्या हातात आलं, आणि खजानला ते देण्यात आलं.पण एखाद्या दुःस्वप्नासारखं घडलं,खजानची अवस्था आणखीनच बिघडली.बोलणं,खाणं-पिणं सगळंच बंद पडलं.आता ती वाचणार नाही,फक्त लिव्हर ट्रान्सप्लांटेशन (यकृत प्रत्यारोपण) केलं,तरच तिचा जीव वाचण्याची काही शक्यता आहे,पण त्यानंतर ही ती चालू-बोलू शकेल याची खात्री नाही असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं.

त्यांनी मग अनेक धार्मिक आणि इतर संस्थांकडे कर्ज आणि मदत मागितली,नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले,आणि ते तडक भारतात आले.

भारतातले डॉक्टर आणि इलाज सगळ्या जगात सगळ्यात चांगले असल्याचं आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं.अगदी अमेरिकेतूनही भारतात पेशंट इलाज करायला येतात असंही आमच्या डॉक्टरांनी सांगितलं.सगळेच इलाज,ऑपरेशन भारतात निम्म्यापेक्षाही कमी खर्चात, जगात सर्वात स्वस्त होतात,असं कळल्यामुळे आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला.खजानची आई मला सांगत होती. 

खरंच आहे हे! विकसित देशांमध्ये वैद्यकीय खर्च तर आवाक्याबाहेरचा आहेच,पण अगदी स्पेशालिस्ट डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला महिने महिने लागतात,ऑपेरेशनसाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. Urgent केस असेल तर भेटेल त्याच्या हाती निमूट ऑपरेशन करून घ्यावं लागतं. यामुळेच भारतात गेली पंधरा एक वर्षं अख्ख्या जगातून पेशंट इलाजाकरिता येतात.

मला एकदा माझ्या लहानपणी एका काकांनी रोजसारखी ताटात प्रसादाची खीर वाढली.मी काही ती संपवली नाही.माझी मावशी आश्चर्यानं म्हणाली अरे खीर कशी काय टाकून देतोस?काका ताबडतोब म्हणाले कारण याला रोज विनासायास मिळते ना? ज्याला खीर बघायलाही मिळत नाही अशा एखाद्याला दे,त्याला नक्की आवडेल.भारतातल्या वैद्यक व्यवसायाचीच ही गोष्ट आहे जणू..!

खजानची आम्ही परत कसून तपासणी केली. शरीरावर जणू मांसच राहिलं नव्हतं.! रक्तही कमी. मी खजानच्या आई-वडिलांना तिची गंभीर परिस्थिती समजावून सांगितली.तिसरं,स्वस्त एक औषध चालू करून वाट पाहावं लागेल,बराच वेळ लागू शकतो हेही सांगितलं.कुठल्याही गोष्टीची मी गॅरंटी देऊ शकत नसल्याचंही स्पष्ट सांगितलं. तिची आई म्हणाली.डॉक्टर,आम्हाला तिचं ऑपरेशन नकोय.बाकी तुमची मुलगी आहे असं समजून जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करा.ती बरी व्हावी म्हणून आमचा जीव तीळतीळ तुटतो,पण सगळं काही तुमच्या हातात नसतं,हे आम्हाला समजतंय. आम्ही डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतोय, पुढे जे होईल ते आमचं नशीब!"

आता मात्र केसची सगळी जबादारी माझ्यावर अली होती. नातेवाईकांनी,पेशंट्सनी पूर्ण विश्वास ठेवला, वाईटाचा दोष,संशय डॉक्टरवर नाही असं सांगितल्यावर डॉक्टर पूर्ण मनमोकळेपणाने निर्णय घेऊ शकतात.कायद्याची भाषा,संशय,धमक्या असे सुरु झाले,कि सगळेच डॉक्टर बॅकफूट वर इलाज करतात.आम्ही तिचे इलाज सुरु केले.खरंतर खजानच्या आईला या आजाराविषयी अनेक डॉक्टरांपेक्षा जास्त माहिती होती,पण तिनं कधीही उद्धटपणे प्रश्न विचारले नाहीत,कि आमच्या निर्णयांना आक्षेप घेतले नाहीत.जेवढी अवघड केस, तेवढा तो डॉक्टर जास्त अनुभवी बनतो.माझ्या विद्यार्थ्यांनी,इतर सहकाऱ्यांनी खूप मदत केली. खजानला घरच्यासारखी वागणूक दिली.प्रेमानं, सहानुभूतीनं दिलेली औषधं जरा जास्तच चांगला इफेक्ट करतात! त्यात जर पेशंटचा डॉक्टरवर पूर्ण भरवसा असेल, तर फारच उत्तम. मृत्यूच्या दाट, भीतीदायक छायेतून  खजान हळूहळू बाहेर पडली.जगण्याची आशा,परत  उभं राहण्याची जिद्द तिच्या चेहऱ्यावर दिसू लागले.काही दिवसांनी ती घोट घोट पाणी प्यायला लागली,उठून उभं राहायला लागली. अजून नीट खाता,बोलता येत नव्हतं.कडकपणा हळूहळू कमी होत होता.व्हिसाची मुदत संपल्यानं त्यांना इराकला परतावं लागलं.पण तिथूनही विडिओ कॉल करून तिच्या पालकांनी तिचे इलाज चालू ठेवले.त्यानंतर दोनदा खजान आईवडिलांसोबत भारतात येऊन गेली.त्यांच्या शेवटच्या भेटीनंतर काही महिन्यांतच मला एक हातानं लिहिलेलं पत्र मिळालं.खजाननं स्वतः इंग्लिश मध्ये लिहिलं होतं: 

मी आता कॉलेज मध्ये प्रवेश घेतलाय. तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचंय मला!

तिच्या आईनं खाली अरबीत लिहिलं होतं: डॉक्टर, तुम्ही माझ्या आयुष्यात उजेड परत आणला.माझी सोन्यासारखी मुलगी मला परत मिळवून दिलीत. तुमच्यासाठी आम्ही सगळे रोज अल्लाहकडे दुआ मागतो.मला माझा देव पावला होता! आता गेली तीन वर्षं खजान एकदम छान  आहे.तिला लिहिलेल्या उत्तरात मी आवर्जून लिहिलं: तुझ्या जगण्याचं सगळं श्रेय केवळ तुझा आईच्या जिद्दिलाच आहे.

जादू,दैवी,अद्भुत म्हणता येतील अशा घटना भारतात वैद्यक शास्त्रात रोजच शेकडो वेळा घडतात.मरणाच्या दाढेतले लहानमोठ्या वयाचे रुग्ण केवळ आपल्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे,बुद्धिमतेमुळे उठून चालायला लागतात, हसत घरी जातात.हे रोजच,भारतातल्या प्रत्येक खेड्यात,शहरात,

प्रत्येकच दवाखान्यात घडत असतं.अगदी सरकारी दवाखान्यात देखील! पण यातील काही थोड्या वाईट घटनाच सगळ्यांना दाखविल्या जातात,त्यांचीच सतत चर्चा होते.चोवीस तास, वर्षभर राबणाऱ्या डॉक्टरांनी वाचवलेले लाखो जीव कुणालाच दिसत नाहीत.आजची खजानची ही कहाणी भारतातल्या अशाच शेकडो अनामिक मृत्युंजय डॉक्टरांना अर्पण!

ती सोनेरी मुलगी,खीर,आणि डॉक्टर.

डॉ.राजस देशपांडे,न्यूरॉलॉजिस्ट पुणे.

ता. क. : विल्सन्स डिसीज वर भारतात अनेक उत्तम तज्ज्ञ आहेत,आणि हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो.

एक वाचणीय नोंद- हरकारा :मध्ययुगीन कालखंडात कागदपत्रांची ने-आण करण्याचं काम हरकारे करत असत.ही पत्रे लवकरात लवकर पोहोचवणे आवश्यक असे.यासाठी हरकाऱ्यांना लहानपणापासूनच तसे शिक्षण दिले जात असे.हिंदुस्थानात असे हरकारे तयार करण्यात पुढाकार घेतला तो मुघल सम्राट अकबराने.त्याबाबची नोंद अबुल फझलने त्याच्या 'ऐन ए अकबरी'त केली आहे.हे हरकारे गुप्तहेर म्हणूनही काम करत.अकबराच्या राज्यात असे हजार हरकारे असल्याची नोंद अबुल फझलनं केली आहे. इ.स.१५८० मध्ये जेझुईट पाद्री फादर मोन्त्सेराने अकबराच्या दरबाराला भेट दिली होती.त्यानेही अकबराच्या या हरकाऱ्यांची आणि त्यांना दिल्या जात असलेल्या शिक्षणाची नोंद आपल्या प्रवास वर्णनात केली आहे.तो लिहितो की अशा लोकांच्या पायात शिशापासून तयार केलेले बूट घातले जात आणि त्यांना एका जागेवर थांबून टाचा कुल्ल्याला लागतील अशा प्रकारे जलद धावण्याचा सराव करायला लावत. (यावरूनच मराठीत 'जलद पळणे' या अर्थाचा वाक्प्रचार अस्तित्वात आला. तो म्हणजे 'ढुंगणाला पाय लावून पळणे.') अशा जलद धावू शकणाऱ्या लोकांमार्फतच त्या काळात कागदपत्रे पाठवली जात.या लोकांना म्हणत हरकारे.इराणवरून भारतात येणाऱ्या अशा हरकाऱ्यांविषयी बातीस्त ताव्हेर्निये या प्रवाशानेही अनेक नोंदी केल्या आहेत.हा फ्रेंच व्यापारी सतराव्या शतकात अनेकदा भारतात येऊन गेला होता.भारतातल्या अशा हरकाऱ्यांची नोंद दुसरा एक फ्रेंच प्रवासी तेवनो यानंही केली आहे.मराठेशाहीतही असे हरकारे असत.त्यांना म्हणत,काशीद किंवा जासूद.

दुर्गाडी : आदिलशाहीत असणारा हा मुलूख शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तो २४ ऑक्टोबर १६५७ रोजी.जवळचेच कल्याण बंदर ताब्यात आल्यामुळे त्यांनी इथे किल्ला बांधण्याचे ठरवले.आबाजी महादेवांना हा किल्ला उभारत असताना अमाप द्रव्य सापडले.त्यातून याची बांधणी झाली.दुर्गेची कृपादृष्टी समजून याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.याच्याजवळच शिवाजी महाराजांनी आपली गोदी उभारली होती.तिथे लढाऊ जहाजांची निर्मिती केली जायची. त्यासाठी महाराजांनी पोर्तुगीजांची मदत घेतली होती.याच आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांवर, वसईच्या पोर्तुगीजांवर आणि जंजिऱ्याच्या सिद्दीवर दहशत बसवली.शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराचा पाया घातला तो याच दुर्गाडीजवळ.


इंग्रज अनुवादकाच्या मते हा 'माहुली' असावा. माहुलीचा उच्चार कोकणी स्वरात केल्यास त्याचा अपभ्रंश झाल्यास मलंग असा होतो.मलंगचा शेवटचा राजा म्हणजे अहमदनगरच्या निजामाचा अखेरचा वारस 'हुसेन' असावा.त्यानं हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून घेतला होता.हा मलंगचा अखेरचा सत्ताधीश.हा किल्ला अहमदनगरजवळच आहे.१६७० मध्ये तो मराठ्यांनी जिंकला.अलंग,मलंग आणि मलंग ही दुर्गत्रयी.कदाचित हा कल्याणजवळील मलंगगड असावा,हाजी मलंगगड.


दुर्ग म्हणजेच शिवाजीराजांचा दुर्गाडी असावा.दुर्गाडी ते वसई हे अंतर पायी गेल्यास नऊ तासांचे आहे.कॅरेनं केलेलं दुर्गचं वर्णन दुर्गाडीशी अगदी मिळतंजुळतं आहे.त्याच्या म्हणण्यानुसार वसईपासूनचे त्याचे अंतर एक दिवसाचेच आहे.


वाचता…वाचता…वेचलेले…







२०/८/२४

दुहेरी आणि दुटप्पी / Double and double

हॅमिल्टनच्या प्रतिपादनानंतर मुंग्या - मधमाशांसारख्या कीटकांच्या समाजप्रेमाचे रहस्य आई-मुलींपेक्षाही बहिणी-बहिणींच्यात जास्त जवळचे रक्ताचे नाते असते हेच असणार हे शास्त्रीय जगतात सर्वमान्य झाले.हे काम नुकतेच प्रसिद्ध झाले तेव्हा १९६५ साली मी हार्वर्डला विल्सनचा विद्यार्थी होतो,आणि ते वाचून विल्सन एक मोठे कोडे सुटले असे खुलले होते.पण ह्यातून प्राण्यांच्या आणि मानवाच्या समाज जीवनाबाबतचे सारे काही प्रश्न सुटले नव्हते.कागदमाशांसारखे खास रक्ताचे नाते नसलेले कीटकही इष्ट मैत्रिणींशी हातमिळवणी करतात हे ठाऊक होते.मानवी समाजात तर रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन पुण्य परोपकार, पाप ते परपीडा अशी मांडणी करण्यात येत होती.बुद्ध भिक्खू,ख्रिस्ती धर्मगुरू स्वेच्छेने ब्रह्मचर्य पत्करत होते,अनाथांची सेवा करत होते. मराठा योद्धे देव,देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती या वृत्तीने लढत होते.औरंगजेबासारख्या प्रबळ शत्रूला नामोहरम करत होते.ह्या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? आणि मानवी समाजांतल्या दुटप्पी वागणुकीचा कसा उलगडा करायचा?१९६५-७० ह्या काळात हार्वर्ड विद्यापीठात प्रचंड खळबळ माजलेली होती. व्हिएटनाममधले युद्ध कळसाला पोचलेले होते.पहिले आणि दुसरे महायुद्ध,नंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकातले कोरियातले व एकोणीसशे साठच्या दशकातले व्हिएटनामचे युद्ध, एकोणीसशे नव्वदच्या दशकातले इराकचे पहिले युद्ध व गेल्या शतकाच्या अखेरीचे इराकचे दुसरे युद्ध ही सगळी युरोपीय समाजाची जगाच्या सत्तेवर पकड राहावी आणि त्यातून ह्या युरोपीय समाजाचे आर्थिक हितसंबंध पुष्ट होत राहावेत ह्या खटाटोपांचा भाग होती. 


एका बाजूला समानता,स्वातंत्र्य,बंधुत्वाचा घोष करत अमेरिका आपले सारे बळ एकवटून जगात इतरत्र केवळ आपल्या हितसंबंधांना अनुकूल अशा राजवटी राहाव्यात एवढीच काळजी घेत होती.त्यासाठी चिलीसारख्या देशात लोकांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्ष आयेन्डेचा खून घडवून तिथे पिनोचेसारख्या सैनिकी हुकूमशहाची रक्तरंजित सत्ता पोसत होते.ही दुटप्पी वागणूक सगळ्याच अमेरिकी नागरिकांना पटत होती असे नाही,पण तीच समर्थनीय आहे असं मानणारी प्रभावी राजकीय विचारधारा अमेरिकेत नांदत होती.


अशी दुटप्पी मूल्येही कशी योग्यच आहेत ह्याची मांडणी मनुष्यप्राणी मोठ्या हुशारीने करत राहतो.भारतीय समाजात तुम्ही पूर्वजन्मी पापे केलीत,म्हणून ह्या जन्मात त्याची फळे भोगताहात असे म्हणून अन्यायांचे समर्थन केले.जायचे,आणि बहुसंख्य लोकांच्या मनावर ह्या संकल्पनेची अगदी घट्ट पकड होती. जसा युरोपीय साम्राज्यवाद फैलावला तसा जगातील भारतासारख्या देशांची आपण लूट नाही करत आहोत, तर त्यांना सुधारतो आहोत,त्यांच्या समाजांना युरोपीय सभ्यतेच्या उच्च पातळीकडे नेत आहोत म्हणून समर्थन केले गेले. 

व्हिएटनामवर आक्रमण अमेरिकी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी नाही,तर त्या देशाला साम्यवादाच्या नरकापासून वाचवण्यासाठी करतो आहोत, म्हणून सांगितले जात होते. हे युद्ध तेव्हा सुरू झालेल्या टीव्हीच्या युगात लोकांच्या डोळ्यासमोर येऊ लागले होते. 

त्यातला एक संस्मरणीय प्रसंग होता,माय लाइ ह्या खेड्याचा पूर्ण विध्वंस तिथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांचे हत्याकांड.हे हत्याकांड का केले असा प्रश्न विचारल्यावर एका अमेरिकी सैनिकी अधिकाऱ्याने नामी उत्तर दिले - त्या खेड्याला वाचवायसाठी आम्हाला ते समूळ नष्ट करणे भाग पडले !


साथी हाथ बढाना !


व्हिएटनाममधल्या युद्धाने अमेरिकी समाजात एका जोरदार विचारमंथनाला चालना दिली होती.मानवी मन,मानवी समाज समजावून घेणे हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता.ह्याचा मागोवा घेत हार्वर्डचे मानववंशशास्त्रज्ञ माकडांचा,अगदी अप्रगत तंत्रज्ञाने वापरणाऱ्या आफ्रिकेतल्या कलहारी वाळवंटातल्या टोळ्यांचा,

आणि मानवी समाजातल्या गुलामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करत होते. ह्या प्रवाहातून महाविद्यालयीन शिक्षणात साहित्य आणि समाजशास्त्राचा अभ्यासक असलेला बॉब ट्रिव्हर्स जीवशात्र - उत्क्रान्तिशास्त्राकडे वळला. त्याने ठरवले की आपण परोपकार-परपीडा, स्वार्थ- परार्थ-परमार्थ,आप्तार्थ-मित्रार्थ-संघार्थ, स्वहित-आप्तहित-परहित ह्या सगळ्यांचा एका नव्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. निसर्गनिवडीच्या चौकटीत हे सगळे मांडले पाहिजे.बॉब ट्रिव्हर्स आणि मी जिगर दोस्त होतो. रोज संध्याकाळी जोडीने स्कॅश खेळायचो.


ट्रिव्हर्सने ह्या सगळ्याचा उलगडा करणारे, परतफेडीचा,

देवाण- घेवाणीचा परार्थ नावाचे शास्त्रीय जगतात खास गाजलेले सैद्धान्तिक प्रतिपादन कसे विकसित केले,हे मी दोन वर्षे खेळ संपल्यावर संत्र्याचा रस पीत-पीत ऐकले. खूप मजा आली !


आदिमानवाच्या समाजात प्रत्येक जण प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर ओळखतात.वर्षानुवर्षे एकमेकांच्या संपर्कात राहतात.एकमेकांना मदत करत,एकमेकांना दुखवत राहतात.अशी सामाजिक देवाण घेवाण ही शेवटी निसर्गाच्या निवडीतूनच साकारलेली असणार. प्रत्येक व्यक्ती आपण आतापर्यंत दुसऱ्यासाठी किती झीज सोसली,दुसऱ्याचा किती फायदा करून दिला,आणि ती दुसरी व्यक्ती आपल्यासाठी किती झीज सोसते आहे,

आपला किती फायदा करून देत आहे,आपण दुसऱ्याला किती दुखावले - सुखावले,त्याने आपल्याला किती दुखावले-सुखावले ह्या साऱ्याचा हिशेब करत राहणार.

संयुक्तिक,संतुलित देवाण घेवाण दोनही पक्षांच्या फायद्याची ठरू शकेल,आणि अशा सर्वांना लाभदायक नेटक्या आदान-प्रदानांतूनच मानवी समाजाची भरभराट झाली आहे.परस्परा करू सहाय्य हे मानवी समाजाच्या यशाचे रहस्य आहे.पण दोघांचाही लाभ असला तरीही देवाण - घेवाण जर प्रमाणबद्ध असली तरच निसर्ग

निवडीला उतरेल.केवळ एकाला भरमसाट लाभ असेल तर निसर्गनिवडीत ती असमर्थनीय आहे,टाकाऊ आहे असे ठरेल. म्हणून मनुष्यप्राणी सढळ हाताने मदत कोण करतात आणि हात आखडता कोण घेतात, कोण उपकाराची जाणीव ठेवतात,आणि कोण मदत करणाऱ्यांचा विश्वासघात करतात, 


कोणाशी जवळीक करणे शहाणपणाचे आहे, आणि कोणाला दोन हात दूर ठेवणे बरे,कोणाची वाहवा करावी आणि कोणाची छी-थू करावी, कोण सज्जन,कोण दुर्जन हे सतत जोखत असतात.अशा हिशोबांतून,अजमासांतून, ठोकताळ्यांतून मानवी समाजजीवन उभारले गेले आहे.


भाषाकोविद मानव…


मनुष्यप्राणी अशा अनेक परस्परसंबंधांचा, कालचा,

आजचा, खूप वर्षांपूर्वीचा सुद्धा जमाखर्च ठेवू शकतो,तो त्याच्या सांकेतिक भाषेच्या बळावर.ही भाषा माणसाच्या आनुवंशिकतेचा मूलाधार असलेल्या डीएनेसारखीच अगदी थोड्या घटकांनी बनलेली आहे.पण त्या मोजक्या घटकांच्या जुळणीतून अनंत वैविध्य निर्माण करू शकते.


डीएनेत केवळ ॲडेनीन,थायामीन,सायटोसीन व ग्वानीन हे चार घटक ओळीने गुंफून वाटेल तेवढे वेगवेगळ्या त-हेचे जनुक बनविले जातात.केवळ चार रंगांच्या पाच मण्यांची माळ गुंफली तरी हजारांहून जास्त वेगवेगळ्या माळा बनवता येतात.दहा मण्यांच्या भरतात दहा लाखांवर,

पंधरांच्या अब्जावर ! आपल्या बोलण्यात शंभराहून जास्त ध्वनी असतात.ते ओळीने गुंफून अमाप शब्दवैविध्य निर्माण करता येते. 


हे शब्द वेगवेगळ्या वस्तू,क्रिया, संकल्पनांच्या संज्ञा म्हणून वापरता येतात.ओळीने शब्द गुंफून अगणित वाक्ये बनवता येतात.वाक्यांच्या माळांतून अगणित विधाने करता येतात, कथानके रचता येतात.आपल्या डोक्यात एक संवाद सतत चालू असतो.त्यात जगात काय चालते,

काय चालणे शक्य आहे,काय चालणे योग्य आहे ह्याचा निरंतर ऊहापोह चालू असतो. 


उलटा-पालटा,इकडून तिकडे उड्या मारत, बहिणाबाईंच्या शब्दात मन वढाळ वढाळ,जसे गुरु पिकावर।असा प्रवास सुरू असतो.हे सारे निसर्गाच्या निवडीत पारखले गेले असणार.मग ह्यातून काय काय लाभ होतात?


ह्यातून मानवाला लाभली आहे.कार्यकारण संबंधांची मीमांसा,चिकित्सा करण्याची क्षमता. ह्या सामर्थ्यामुळे आपण इतर जीवजातींवर लीलया मात केलेली आहे.इतर साऱ्या जीवजातींची प्रगती मंदगतीने होत राहते. 


उत्क्रान्तीच्या ओघात वनस्पती शत्रूचा प्रतिरोध करण्यासाठी विषोत्पादन करतात.बांबूचे कोंब असतात मोठे पौष्टिक,पण सायनाईडने ठासून भरलेले,विपुल बांबू असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या काळतोंडी वानरांच्या पोटातले बॅक्टेरिया सायनाइडचे दुष्परिणाम टाळू शकतात,म्हणून असे बॅक्टेरिया पोटात बाळगणारी वानरे ह्या कोंबांवर ताव मारतात.असे समर्थ बॅक्टेरिया माणसांच्या पोटांत नाहीत,तर वानरांच्यात कुठून आले? वानरांच्या पोटातल्या बॅक्टेरियांची सायनाइड पचवायची शक्ती अपघातकी आनुवंशिक बदलातून उपजली,आणि मग बांबू खाण्याचे धाडस करणाऱ्या वानरांच्या पोटात ह्या शक्तीमुळे त्या बॅक्टेरियांना आणि त्यांना बाळगणाऱ्या वानरांना- चांगले पौष्टिक अन्न मिळू लागले.यातून त्या सशक्त बॅक्टेरियांची आणि वानरांचीही पैदास वाढली.ह्या जनुकांच्या उत्क्रान्ती प्रक्रियेला हजारो-लाखो वर्षे लागली असणार.अन् आपण? मानवाला सायनाइड म्हणजे साक्षात् मरण! पण मानवाने आपली चौकस बुद्धी,

प्रयोगशीलता वापरत शोधून काढले की कोंबांना चिरून,

पाण्यात खूप वेळ ठेवले की सायनाइडचा निचरा होतो.ही स्मरुकांच्या उत्क्रान्तीची प्रक्रिया काही दशकांतच साधली असेल,आणि एकदा समजले की ही उपयुक्त माहिती भराभर पसरली असेल. 


आज जिथे जिथे बांबू मुबलक मिळतो तिथेही तंत्रज्ञान वापरून बांबूचे कोंब बिनधास्त खाल्ले जातात.प्राण्यांना जे कमवायला हजारो पिढ्या लागतात,ते सारे आपण ज्ञानसाधनेच्या बळावर चुटकीसरशी साधतो.या ज्ञानसाधनेचा एक भाग म्हणून माणूस तऱ्हेतऱ्हेच्या कामकाजांसाठी उपयुक्त अशा कृत्रिम वस्तू,अवजारे,

आयुध्ये घडवतो.या कृत्रिम वस्तूंना जनुक-स्मरुक ह्यांच्याशी यमक जुळवायला आपण निर्मक असे अभिधान दिले आहे.शिकारीचे डावपेच ही स्मरुके,तर शिकारीची शस्त्रे ही निर्मुके,आग निर्माण करण्याची कृती ही स्मरूके,तर चुली,शेगड्या ही निर्मुके आहेत.

अशा नानाविध स्मरूक-निर्मुकांनी सज्ज मानव उंदरासारखे गवताचे बी खातो,बकऱ्यांसारखी पालेभाजी खातो,डुकरांसारखी कंदमुळे खातो, पोपटांसारखी फळे खातो,सरड्यांसारखे मुंगळे खातो,बगळ्यांसारखे खेकडे-मासे खातो, वाघांसारखी रानडुकरे खातो,आणि इतर कोणीच ज्यांना मारू शकत नाहीत असे अवाढव्य देवमासेही खातो ! आपण विषुववृत्तीय जंगलापासून ध्रुवाजवळच्या बर्फील्या वाळवंटांपर्यंत,प्रवाळाच्या बेटांपासून हिमालयातल्या पठारांपर्यंत फैलावले आहोत.


मनुष्यप्राणी अहर्निश डोके चालवत असतो. आसमंतात काय चालले आहे,आपल्याला काय काय आव्हानांना सामोरे जायला लागणार आहे, हे समजावून घेत असतो.


काही वर्षांपूर्वी मी आदिवासींचा शिष्य बनून पायी हिंडत हत्तींच्या शिरगणतीचा उपद् व्याप केला.माझे गुरू सतत बारीकसारीक खाणाखुणा धुंडाळत असायचे, कोठे खुट्ट वाजले तर कान देऊन ऐकायचे.सांगायचे,ह्या झाडाच्या बुंध्यावरचा चिखल बघ.सहा- सात फूट उंचावर आहे,

म्हणजे इथे एक मोठा नर हत्ती अंग घासून गेला आहे.

अजून चिखल ओला आहे,म्हणजे तो महाकाय जवळच कोठे तरी असणार.तिकडे कडाकडा आवाज येतोय ना,तिथे बांबूचे मोठे बेट आहे,तो चरतोय वाटते.काही राखून न ठेवता माझे आदिवासी गुरू मला शिकवत आहेत.कारण ज्ञानसंपदा ही अशी खाशी संपत्ती आहे की दिल्याने ती घटत नाही,उलट आदान-प्रदानातून वृद्धिंगत होते. ईशावास्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्ण ज्ञान इतरांपर्यंत पोचवले तरी आपल्यापाशी पूर्ण ज्ञानच शिल्लक राहते.ह्या आगळ्या वित्त भांडारातून मानवाने सृष्टीवरची आपली पकड हळूहळू घट्ट केली आहे.


फुकटबाजी व फसवेगिरी


मानवी समाजात जसजशा एकमेकांना मदत करण्याच्या शक्यता वाढल्या तशा एकतर्फी फायदा घेण्याच्या शक्यताही वाढतात.एखाद्याने जर मोकळेपणे कुठल्या झाडाला भरपूर फळे लगडली आहेत हे सांगितले,तर इतर त्या माहितीचा फायदा उठवून पोट भरू शकतील. पण त्याच वेळी काही जण स्वत:जवळची अशी माहिती दुसऱ्यांना न देता,केवळ दुसऱ्यांच्या माहितीचा लाभ घ्यायचा अशीही अप्पलपोटेगिरी करू शकतील.शिवाय परस्परांना मदत केवळ ज्ञानाच्याच नाही,तर अनेक जिवाभावाच्या संदर्भात देण्याचे प्रसंग येतात.हिंस्र श्वापदाची चाहूल लागताच धोका पत्करूनही आरोळी देणे, शिकार करताना सावजाची पळण्याची वाट रोखून धरणे,ओढ्याचा जोराचा प्रवाह ओलांडायला हात देणे,

अशा अनेक प्रसंगांत एकमेकांना मदत करण्याचा प्रचंड फायदा मिळू शकतो.पण मदतीचा हात पुढे करणाऱ्याचे नुकसान होण्याचाही धोका असतो.


कोण सच्चेपणे मदतीचा हात पुढे करतात आणि कोण लुच्चेपणे हात आखडता घेतात,कोण पूर्वी दिलेल्या मदतीची न विसरता परतफेड करतात आणि कोण आयत्या वेळी तोंडघशी पाडतात, हे सगळे मानवी समाज जीवनातले जिव्हाळ्याचे विषय आहेत.टिचग्या कागदमाशाही आपल्या पोळ्यातल्या इतर माशांना वैयक्तिक पातळीवर ओळखतात.कोण दणकट,कोण कमकुवत हे उमगत उमगत एकमेकींपुढे वाकतात, हातमिळवणी करतात किंवा कुरघोडी करतात.

मानवी समाजात असे वैयक्तिक परस्परसंबंध अतोनात गुंतागुंतीचे बनतात.


तुकोबा म्हणतात : मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेटूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।। कोणाशी आणि केव्हा मऊपणे वागावे, कोणाशी केव्हा कठोरपणे वागावे,कोणाला लंगोटी द्यावी, कोणाला काठी हाणावी,हे ठरवता - ठरवता माणसाच्या नीतिसंकल्पनांची उत्क्रांती झाली. 


सुष्टता,दुष्टता,कृतज्ञता,कृतघ्नना,आदर,तुच्छता, द्वेष,सूड अशा सगळ्या भावना उद्भवल्या.पुण्य, परोपकार,पाप ते परपीडा अशा संकल्पना मांडल्या गेल्या.पण जोडीला क्रोध,लोभ,मद, मोह,मत्सरही फोफावले आणि 'पुण्य इथे दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली'अशी परिस्थितीही उद्भवू शकली.मानवाला भाषेद्वारे विविध संदेश देता येतात,

नानाविध परीच्या माहितीची देवाण-घेवाण करता येते.

अशा संवादांत दुसऱ्यांना खरे काय ते सांगता येतेच,आणि तितक्याच सहजतेने दुसऱ्यांची दिशाभूलही करता येते.

खोटे सांगून अनेकदा स्वहित साधू शकते.मित्रांना आपण त्यांच्यासाठी काय,काय करतो आहोत हे सांगताना राईचा पर्वत करून त्यांच्याकडून परतफेड म्हणून अवाच्या सवा लाटता येते, शत्रूना खोटे-नाटे सांगून संकटात पाडता येते. सर्वच मानव जन्मभर इतक्या शिताफीने खऱ्या- खोट्याची सरमिसळ करत असतात की असे न करणाऱ्या सदा सत्यवचनी हरिश्चन्द्राचे खास कौतुक केले जाते.असा आहे समाजप्रिय मानवाच्या उत्क्रान्तियात्रेचा परिपाक.दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती,आणि जोडीला त्यांना फसवून स्वतःचा फायदा करून घेण्याचीही.संघासाठी स्वतःचे प्राण देण्याची तयारी,पण त्याबरोबरच ज्यांना परके मानतो त्यांच्याशी बेफाम क्रौर्याने वागण्याची,त्यांची हत्या करण्याचीही तयारी. सच्चे ज्ञान संपादन करण्याची अफाट क्षमता, आणि धादान्त खोटे बोलण्याची,फसवण्याचीही ! म्हणूनच प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात काही प्रमाणात तरी स्वार्थ आणि परोपकार,हिंसा आणि करुणा,क्रौर्य आणि दया-क्षमा-शांती, खोटेपणा आणि सच्चेपणा ह्यांच्यात एक रस्सीखेच चालू असते.एक निरंतर द्वंद्व, कुतरओढ चालू राहते.समाजातही ह्या परस्परविरोधी प्रवृत्तींची स्पर्धा चालू असते.


२०.०७.२४ या लेखमालेतील पुढील लेख…

१८/८/२४

भारतीय शिल्पकला / Indian Sculpture

कळसाला पोहोचलेली भारतीय शिल्पकला..


सन १९५७ ची घटना आहे.उज्जैनला राहणारे आणि पुरातत्त्व खात्याशी संबंधित असलेले डॉ. श्रीधर विष्णू वाकणकर हे आगगाडीने दिल्लीहून इटारसीला जात होते.भोपाळ गेल्यावर त्यांना पर्वतांमध्ये काही फॉर्मेशन्स दिसली.डॉ. वाकणकरांना ती फॉर्मेशन्स ओळखीची वाटली, कारण त्यांनी तशीच फॉर्मेशन्स स्पेन आणि फ्रान्समधे बघितली होती.त्यामुळे डॉ.वाकणकरांचे कुतूहल जागृत झाले आणि पुरातत्त्व खात्याची एक टीम घेऊनच ते त्या पर्वतांमध्ये आले.त्यांच्या ह्या प्रयत्नांनी इतिहासाचं,भारतीय कलेचं,शिल्पशास्त्राचं एक गवाक्ष काहीसं किलकिलं झालं.ही जागा म्हणजे भीमबेटका.

येथे,सुमारे ४०,००० वर्षांपूर्वी भिंतींवर काढलेली चित्रं मिळाली.प्राचीन भारतीय कलेचा हा पहिला प्राप्त नमुना..!! आज हे भीमबेटका,युनेस्कोच्या संरक्षित स्मारकाच्या यादीत येतं.इथे साडेसातशे शैलाश्रयं किंवा शैलगृहं (सोप्या भाषेत 'गुहा') आहेत. यांतील पाचशे शैलगृहांमध्ये चित्रकारी केलेली दिसते.या चित्रामध्ये वाघ आहे,हरीण आहे,हत्ती आहेत,बैल,मोर वगैरेही आहेत.मुख्य म्हणजे घोडाही आहे.त्यामुळे घोडा भारतात अतिप्राचीन काळापासून होता हे सिद्ध झाले आहे.अन्यथा काही इतिहासकार अरब आक्रमकांनी घोडे भारतात आणले असं सांगत होते.भारतात जगाच्या इतर भागांच्या तुलनेने फार चांगली आणि शास्त्रशुद्ध मूर्तिकला विकसित झाली.पण ती बऱ्याच नंतर.जगातल्या पहिल्या म्हणून म्हटलेल्या ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत, त्यांतील एकही मूर्ती भारतातली नाही. 


'लॉवेनमेंश फिगरीन' म्हणून नावाजलेली जगातली पहिली म्हणवली जाणारी मूर्ती जर्मनीच्या आल्प्सजवळच्या भागात सापडलेली आहे.ही साधारण तीस ते पस्तीस हजार वर्षे जुनी असावी,असं कार्बनडेटिंगचे परिणाम सांगताहेत.इजिप्तमधे आढळलेले स्फिंक्स आणि इतर मूर्ती तशा बऱ्याच नंतरच्या,म्हणजे इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षांच्या.रशियाच्या सैबेरिया भागात लाकडाची जी प्रतिमा सापडलेली आहे, तिला 'शिगीर आयडॉल' म्हटले जाते.ही मूर्ती सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वी (अर्थात इसवी सनाच्या नऊ हजार वर्षांपूर्वी) लाकडावर कोरलेली आहे.

तुर्कस्तानात सापडलेल्या मूर्ती ह्या सहा हजार वर्षांपेक्षा जास्त प्राचीन आहेत.या मूर्तीमध्ये भारतीय शैली झळकते असे म्हटले जाते.मुळात माती हे सहज सोपे माध्यम अगदी प्राचीन मूर्तीमध्ये आढळते.मात्र 'माती' ही चिरकाल टिकणारी नसल्याने मातीच्या जास्त मूर्ती सापडत नाहीत.

फ्रान्समध्ये आदिमानवांच्या गुहांमध्ये (Tuc d' Audoubert) सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या मातीत बनलेल्या रानरेड्याच्या आकृती सापडतात.भारतात सिंधू घाटीमधील उत्खननात,भाजलेल्या मातीची काही चांगली शिल्पं सापडली.सिंधू घाटी, अर्थात मोहन जोदडो / हडप्पा,ह्यांचा काळ साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो.भारतात मधमाश्यांच्या पोळ्यांमधील मेणाने तयार केलेल्या प्रतिमाही आढळतात.मात्र पुढे ह्या मेणाच्या माध्यमातून मातीचे साचे तयार होऊ लागले आणि ओतकामातून धातूंच्या मूर्ती तयार होऊ लागल्या.मोहन- जो-दडो येथील नृत्यांगनेची छोटी मूर्ती हे प्राचीनतम भारतीय धातुशिल्पाचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. 


ही मूर्ती पंचधातूंची असून वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोहन-जो-दडो आणि हडप्पा येथे सापडलेल्या मूर्ती आणि मेसोपोटेमिया येथे सापडलेल्या मूर्ती यांत बरीच समानता आढळते.या मूर्तिशिल्पात सर्वांत सुरक्षित मूर्ती एका माणसाची आहे.सुमारे सात इंच उंच डोकं आणि खांदे असलेलं हे 'बस्ट' एखाद्या पुजाऱ्याचं वाटतं.याच्या चेहऱ्यावर छोटीशी दाढी असून शरीर एका शालीत आच्छादित आहे.याच उत्खननात अनेक मुद्रा (Seal) मिळाल्या. या चौकोनी असून यावर बैल आणि तत्सम गोष्टी कोरलेल्या आहेत.ह्या,बैल किंवा जनावरांच्या आकृत्या,अगदी कलात्मक रीतीने कोरलेल्या आहेत.

चारशेपेक्षा जास्त आकार असलेल्या ह्या मुद्रांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे.


भारतात मूळ प्रतिमा मेणामध्ये घडवून त्याचा साचा तयार करण्याची पद्धत रूढ होती. या तंत्राला प्राचीन शिल्पसाहित्यात'मधूच्छिष्टविधान' म्हटले आहे.

प्रथम मातीऐवजी मधाच्या पोळ्याचे मऊ मेण वापरून प्रतिमा बनविली जाते.माती, शेण व तांदळाचा कोंडा यांच्या मिश्रणात पाणी घालून केलेल्या लगद्याने ती आच्छादली जाते. प्रतिमेला आधीच एक मेणाची जाडसर वळी जोडलेली असते,जिचे दुसरे टोक प्रतिमेला आच्छादणाऱ्या साच्याच्या पृष्ठभागावर राहील, याची काळजी घ्यावी लागते.हा साचा वाळवून भट्टीत गेला की,त्यामधील सर्व मेण वितळून त्या वळीच्या वाटे वाहून जाते आणि साच्याच्या आत प्रतिमेच्या आकाराची पोकळी निर्माण होते.या पोकळीत वितळविलेल्या धातूचा (ब्राँझ,पितळ किंवा तांबे,क्वचित सोने-चांदी सुद्धा) रस ओतून मूळ मेणाच्या प्रतिमेची प्रतिकृती मिळविता येते. साच्यातून काढलेल्या प्रतिमेला नक्षीदार धातुपत्रांनी सजविण्याची किंवा धातूच्या दगडालाच ठोकून ठोकून मूर्ती घडविण्याची परंपरा प्राचीन काळात दिसून येते.


आपल्या देशात कास्य शिल्पाची किंवा धातूच्या शिल्पाची परंपरा ही जुनी आहे. 'यजुर्वेदात' चांदी,शिसे आणि कथिल या धातूंचे उल्लेख लोखंडासारख्या इतर धातूंबरोबर येतात. अर्थातच हे धातू कसे वापरायचे याची माहिती तत्कालीन लोकांना होती.काही वर्षांपूर्वी औरंगाबादजवळ असलेल्या 'दायमाबाद' येथील उत्खननात सापडलेल्या मूर्ती ह्या पंचधातूंच्या असून कार्बनडेटिंग द्वारे यांचा कालखंड तीन हजार वर्षांपूर्वीचा सिद्ध झालेला आहे. या उत्खननात मिळालेल्या प्राण्यांच्या भरीव प्रतिमांना खेळण्यांसारखी चाके आहेत.एक दुचाकी बैलगाडीही यात सापडलेली आहे.चौथ्या शतकापासून मात्र ओतकामांच्या अर्थात धातूंच्या मूर्ती आणि इतर वस्तू मुबलक स्वरूपात मिळतात.साधारण तीन प्रकारच्या धातूंच्या वस्तू निर्माण होत होत्या -


१. प्रत्यक्ष देव-देवतांच्या मूर्ती


२.पूजाविधीची उपकरणे.उदाहरणार्थ: दीपलक्ष्मी,पूजेची घंटा,उभे/ टांगते/हातात धरण्याचे दिवे इत्यादी.


३.दैनंदिन उपयोगाच्या वस्तू.उदाहरणार्थ : विविध प्रकारची भांडी,हत्यारांच्या मुठी इत्यादी


तंजावर जिल्ह्यातील 'नाचीर कोइल' हे गाव ओतकामासाठी प्रसिद्ध होते,कारण तिथे कावेरी नदीची पिवळी वाळू मुबलक मिळत होती,जी साचे बनविण्यासाठी उपयुक्त होती.याच कारणामुळे गुवाहाटी,

आसाममधील सार्तबरी, मणिपूर,वाराणसी इत्यादी ठिकाणे धातूंच्या मूर्ती आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध होती.

मात्र त्याचबरोबर शिल्पशास्त्रात भारताचे कौशल्य विकसित होत होते.पुढे याच कौशल्याच्या आधारावर अवघ्या दक्षिण-पूर्व आशियात भारतीय शिल्प - तंत्रज्ञांनी अद्भुत शिल्पं उभारून दाखविली.गांधार शैली आणि मथुरा शैली अशा दोन प्रकारच्या प्रवाहांमधून भारतीय शिल्पशास्त्र विकसित झाले.


मात्र हडप्पन संस्कृती आणि पुढील मौर्य शासन, यांमधील सुमारे दोन हजार वर्षांची शिल्पं आपल्याला सापडलेली नाहीत.मौर्य साम्राज्यात उभारलेल्या शिल्पांविषयी,त्या शिल्पांच्या भव्यतेविषयी आणि प्रमाणबद्धतेविषयी सिकंदरच्या काळात भारतात आलेल्या ग्रीक इतिहासकार मेगस्थनीजने बरेच लिहून ठेवले आहे.त्याच्या 'इंडिका' ह्या पुस्तकात पाटलीपुत्राच्या वेगवेगळ्या शिल्पांविषयी आणि नगराच्या भव्यतेविषयी बरेच लिहिलेले आहे.


सम्राट अशोकाचा कालखंड हा इसवी सनापूर्वी ३०४ वर्ष ते २३२ वर्षे,अर्थात आजपासून साधारण साडेबावीसशे वर्षं मागे,असा आहे.त्याच्या'काळातील अनेक प्रतिमा,अनेक शिल्पं आजही आपल्याला पाहायला मिळतात.अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्याने माध्यम बनविले,

शिल्पकलेला.अनेक स्तंभ, अनेक स्तूप,अनेक शिलालेख,

अनेक शिल्पं, अनेक मूर्ती त्याने बनविल्या.त्याच्या काळात बनविले गेलेले चार सिंहांचे प्रतीक,आज 'अशोक चिन्ह' म्हणून आपली राष्ट्रीय ओळख आहे.हे अशोक चिन्ह सारनाथ येथे सापडले होते.सुमारे बावीसशे वर्षांनंतरही ते शिल्प व्यवस्थित होते.अगदी असेच चार सिंहांचे प्रतीक चिन्ह थायलंड-मध्येही आढळले आहे.मात्र भारतीय शिल्पशास्त्राचा कळसाध्याय आपल्याला बघायला मिळतो,तो बराच पुढे सातव्या / आठव्या शतकात.वेरूळ येथील 'कैलास लेणे' हे ते अद्भुत आश्चर्य आहे.एकाच शिलाखंडात कोरलेले हे शिल्प म्हणजे मानवी शिल्पकलेचा अप्रतिम आणि विश्वास न बसावा असा नमुना आहे.साधारण सन ६०० ते ७५० च्या दरम्यान ह्या लेण्यांची निर्मिती झाली असावी असे अनुमान काढले जाते.मात्र काही पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते याचा काल बऱ्याच आधीचा असावा.तरीही उपलब्ध पुराव्यांच्या अनुसार ह्या शिल्पांच्या निर्मितीचा काळ हा राष्ट्रकूटांच्या शासनाचा आहे.राजा कृष्ण (प्रथम) याने आठव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या लेण्यांची निर्मिती प्रारंभ केली असे मानले जाते. मात्र एच.गोझ ह्या इतिहासकाराच्या अनुसार कृष्ण राजाचा पुतण्या दान्तिदुर्ग (सन ७३५ ७५६) ह्याने अगदी युवावस्थेत ह्या लेण्यांचे काम सुरू केले.मात्र एम.के. ढवळीकर ह्या इतिहासतज्ज्ञांचे मत कृष्ण राजाच्या बाजूचे आहे.मात्र त्या काळात जे काही निर्माण झाले, ते अद्भुत आहे.मानवी बुद्धीला अचंबित करणारे आहे.जगाच्या पाठीवर कोठेही,एकाच दगडाला कोरून,वरपासून खाली खोदकाम करत बनविलेले असे भव्य शिल्प नाही..!


आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ह्या पूर्ण मंदिरातील सर्वच शिल्पं अत्यंत प्रमाणबद्ध आणि रेखीव आहेत.कसलेल्या, कुशल मूर्तिकारांनी / कारागिरांनी कोरून काढलेली ही शिल्पं..! काही पिढ्यांच्या प्रयत्नांतून घडवलेली ही शिल्पं..! आपले दुर्दैव असे की,आज आपल्याजवळ ह्या मूर्तिकारांची,कलाकारांची,योजनाकारांची कसलीही माहिती उपलब्ध नाही..!! हे मंदिर,पट्टडकल (कर्नाटक) येथील विरुपाक्ष मंदिरासारखे आहे,जे कांचीच्या कैलास मंदिराची प्रतिकृती आहे.२७६ फूट लांब,१५४ फूट रुंद

आणि ९० फूट उंच असे हे मंदिर सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. युनेस्कोने ह्याचा जागतिक संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश केलेला आहे.पुढे अकराव्या / बाराव्या शतकांत पश्चिमेतून येणारी मुसलमानी आक्रमणं तीव्र झाल्यावर मंदिरांच्या बांधकामाचा वेग मंदावला आणि त्याचबरोबर उन्नत असलेल्या भारतीय शिल्पकलेला उतरती कळा लागली.कालांतराने जगाला अचंबित करणारे शिल्प बांधणारे आम्ही, त्या शिल्पकलेला पूर्णपणे विसरलो..!!


२३.०७.२४ या लेखातील पुढील भाग…