* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एप्रिल 2023

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/४/२३

मुंग्यांचं बोलणं : एक झेन कथा

एक होता राजा.त्यानं त्याचं राज्य खूप न्यायानं, आदरानं सांभाळलं.त्याचं वय झालं.त्याचा मुलगा होता तरुण वयाचा.त्याला वाटलं आता वारसा हक्कानं आपल्याकडे राज्य सहज येणार;पण राजा पुत्रप्रेमानं भाळलेला नव्हता.आपल्या मुलाची पात्रता सिद्ध झाली,तरच त्याला भावी राजा म्हणून घोषित करायचं,असं त्यानं ठरवलं होतं.त्यामुळे अरण्यात राहणाऱ्या आपल्या गुरूंकडे राजानं मुलाला पाठवलं. मुलाला राजानं निघताना सांगितलं,की तू चांगला राजा होऊ शकतोस,

असं गुरुजींना वाटलं,तरच तुझ्यावर मी राज्य सोपवेन.

राजाचा मुलगा तसा स्वभावानं चांगला होता.अस्त्र-शस्त्रविद्या,ग्रंथांचं औपचारिक शिक्षण त्यानं घेतलेलं होतं.त्यामुळे आपल्या वडिलांचे जे कोणी गुरुजी आहेत,

त्यांनी आपली एखादी परीक्षा घेतली,की काम झालं, असं त्याला वाटलं.अरण्यात चार दिवस बदल म्हणून राहण्याचाही अनुभव मिळेल,असा विचार करून राजाचा मुलगा मोठ्या उत्साहानं गुरुजींच्या कुटीकडे निघाला.


दाट अरण्यात राहणाऱ्या गुरुजींनी राजाच्या मुलाचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं.आपल्याकडे परीक्षा देण्या -

आधी काही अनुभव व प्रशिक्षण घ्यावं लागेल,असं गुरुजींनी त्याला सांगितलं. दोन दिवस विश्रांती झाल्यावर गुरुजी त्याला म्हणाले,'आता तू सकाळी सर्व आवरून लगेच वनात जायचंस.संध्याकाळीच परत यायचं.तिथं काय करायचं,हे तूच ठरवायचंस.' राजाच्या मुलाला आधी यात काही विशेष वाटलं नाही.तो वनात आत चालत गेला.दमला तेव्हा एका दगडावर बसला.एक तास गेला,

दोन तास गेले. वेळ जाता जाईना.बरं,वनात काही बघायलाही नव्हतं.ना इमारती,ना कुठलं संगीत वा नृत्य,ना कुठले क्रीडा प्रकार,राजमहालात त्याला रिझवायला

( करमणूकीसाठी ) बरीच माणसं असायची,तसंही काही नाही.कसा तरी त्यानं दिवस ढकलला.उन्हं उतरायला लागल्यावर गुरूंच्या कुटीकडे परत फिरला.गुरुजींनी त्याला विचारलं, 'कसा गेला आजचा दिवस?' राजाचा मुलगा जरा चिडूनच म्हणाला,'कसा जायचाय? ढकलला एवढंच.' गुरुजी किंचितसं हसले.ते म्हणाले,'अरे,पुढचा महिनाभर तुला रोजच अरण्यात जायचंय.तुझ्या प्रशिक्षणाचा तो भाग आहे.'


हे ऐकून राजाच्या मुलाच्या पोटात खड्डा पडला;पण गुरूंच्या शिफारसीशिवाय राजगादीचा मार्गही मोकळा होणार नव्हता.त्यानंतर पुढचा आठवडाभर तो अरण्यात जात राहिला.हळूहळू रानातल्या अनवट वाटा त्याच्या ओळखीच्या होऊ लागल्या.निर्जीव भासणाऱ्या अरण्यातील पानांची सळसळ,वाळलेल्या पाचोळ्यावरून चालताना होणारा चुर्र चुर्र आवाज,

त्याच्या चाहुलीनं थबकणारे प्राणी,झाडांवर पानांमागून चिवचिवणारे पक्षी,पाण्याच्या स्रोतांच्या आवाजाचे फरक,झाडावरून गळणारं पान,प्राणी-पक्ष्यांच्या पिलांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल आणि त्यांचं बिचकून जाणं,असा एक ना अनेक गोष्टी त्याच्या ध्यानात येऊ लागल्या.रिकाम्या अरण्यात किती तरी जीवांच्या ध्वनींचं संगीत भरलेलं आहे,त्यांच्या पळण्यात,थांबण्यात,मान वळवण्यात किती लय आहे,ती त्याला जाणवू लागली.सरपटणाऱ्या जीवांच्या त्वचेवरचे रंग व रचनांची मिश्रणं त्याला मोहवू लागली.


रोज संध्याकाळी कुटीत परतल्यावर गुरुजी त्याला,आज काय केलंस हा जो प्रश्न विचारायचे, त्याची अनेक पदरांची उत्तरं आता त्याच्याकडे साठू लागली होती.नंतर असं होऊ लागलं,की अरण्यातून परत आल्यावर तो स्वत:च उत्साहानं गुरुजींना तिथल्या कथा सांगू लागला.त्याच्या चेहऱ्यावरचा कंटाळा लोप पावला आणि हर क्षणी आपल्या चोहोबाजूला चैतन्य वावरत असतं,याचं भान त्याला आलं.हळूहळू महिना पूर्ण व्हायला आला होता.त्याच्या मनातून राजपदाचा विचार जणू पुसला गेला होता.

एका संध्याकाळी परतल्यावर तो गुरुजींना म्हणाला,


'गुरुजी,आज मी मुंग्यांचं बोलणं ऐकलं.त्यांनाही शब्द असतो हे मला ठाऊकच नव्हतं.'


हे ऐकताक्षणी गुरुजींच्या चेहऱ्यावर सात्विक आनंदाचा रंग पसरला.ते शांत सुरात म्हणाले, 


'बाळा,तू राजा होण्याचा पात्रतेचा बनला आहेस. तुझ्यातला अहंकार पुसला गेला आणि ज्यांच्या आवाजाकडे,भावनांकडे कोणीही कधीही लक्ष देत नाही,त्या मुंग्यांचा शब्द तू ऐकलास.समाजात उठावदार गोष्टींसाठी सगळेच काम करतात; पण जो अत्यंत दुर्लक्षित समूहाच्या कल्याणासाठी काम करतो,तोच नेता बनण्याच्या लायकीचा असतो.

आता तू राजमहालात परत गेलास तरी चालेल.


डॉ.सुरुची पांडे 


आमचे मित्र एन.के पत्रकार यांनी फार दिवसापूर्वी मला पाठविलेली कथा..

२८/४/२३

द आर्ट ऑफ वॉर - सन त्सू (इसपू पाचवं शतक)

'द आर्ट ऑफ वॉर' या पुस्तकाचा अभ्यास केवळयुद्धातले नेतेच करत नाहीत; तर चीन, जपान, रशिया,व्हिएतनाम आणि अमेरिका या देशांतल्या डावपेच (स्ट्रॅटिजी) ठरवणाऱ्या गटांनीही केला.चीनच्या नागरी युद्धाच्या वेळी माओ-त्से-तुंग यानं या पुस्तकाचा अभ्यास करून अनेक स्ट्रॅटिजीज त्या युद्धात वापरल्या होत्या.आजही अनेक सैनिकी शाळांमध्ये या पुस्तकाचा वापर केला जातो.केवळ युद्धासाठीच नाही; तर व्यवसाय,उद्योग,व्यवस्थापन,

खेळ आणि राजकारण या क्षेत्रांतही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.


व्यवस्थापनाचं महत्त्व उद्योग क्षेत्रात किंवा व्यवसायविश्वात आवश्यक असतं असाच सर्वसाधारणपणे समज आहे.

मात्र सगळ्यात जास्त व्यवस्थापन कौशल्य पणाला लागतं ते युद्धभूमीवर ! युद्धात शत्रू हे एका तऱ्हेने स्पर्धकच असतात.इथेही नेतृत्वाची नितांत आवश्यकता भासते.

उद्योग-व्यवसायाप्रमाणेच युद्धातही निरनिराळे डावपेच किंवा स्ट्रॅटेजीज आखाव्या लागतात.युद्धात सफलता मिळणार की नाही ते या नियोजलेल्या व्यवस्थापन कौशल्यावरून ठरतं.सध्या तर मॅनेजमेंट क्षेत्रातही युद्धातल्या डावपेचांवर असलेल्या पुस्तकाचं महत्त्व खूपच वाढलंय.याचं कारण हे डावपेच केवळ युद्धापुरते राहिले नसून ते सगळीकडेच कामी येतात.ख्रिस्तपूर्व ५०० साली सन त्सू यानं लिहिलेलं 'द आर्ट ऑफ वॉर' हे पुस्तक तेव्हा जितकं महत्त्वाचं ठरलं,तितकंच आजही ते गाजतं आहे.


एकविसाव्या शतकात न्यूयॉर्कमधल्या समुद्रासमोरच्या मॅनहटनमधल्या एखाद्या सुळक्यासारख्या इमारतीतल्या १०० व्या मजल्यावर २५०० वर्षांनंतर आपल्या पुस्तकावर सूटबूट घातलेली मंडळी तासन् तास चर्चा करत राहतील याची हे पुस्तक लिहिताना सन त्सूला कल्पनाही नसेल. 


आधुनिक काळात डावपेच किंवा स्ट्रॅटेजी यावर खोलवर विचार मांडण्याचं श्रेय 'आयगॉर ॲनसॉफ' याला देण्यात येतं;पण माणसानं दुसऱ्या माणसाशी भांडायला सुरुवात करून त्यावर मात कशी मिळवायची याचा विचार त्याच्या डोक्यात जेव्हापासून घोळायला लागला, तेव्हापासूनच खरी 'स्ट्रॅटेजी' सुरू झाली,असं प्रसिद्ध मॅनेजमेंट तज्ज्ञ गॅरी हॅमेलन म्हटलंय. अर्थात ते सर्वात आधी सन त्सून केव्हाच लिहून ठेवलं होतं.


'द आर्ट ऑफ वॉर'मध्ये सन त्सून जे लिहून ठेवलंय त्यातलं बरंचसं आजही लागू पडतं, म्हणूनच आजही मोठमोठ्या ग्रंथालयांतून या पुस्तकाला सतत मागणी असते.२५०० वर्षांपूर्वीचं हे पुस्तक आजदेखील चक्क 'बेस्ट सेलर' आहे.हार्वर्ड,व्हार्टन यांच्यासारख्या विद्यापीठांत त्यावर चर्चा आजही रंगते.या पुस्तकांत सन त्सून शत्रूला कसं 'सरळ' करावं याविषयीचे धडे दिले आहेत.'जर धूर्तपणे आणि कष्ट करून शत्रूवर मात करता येत असेल,तर शत्रूला उगाच नष्ट कशाला करायचं?' असं या पुस्तकात सन त्सूनं म्हटलं आहे.


शत्रूला शरण आणायचं असेल तर प्रथम त्याच डावपेच ओळखावेत आणि तेच मोडून काढावेत. ते जमलं नाही तर मग त्याच्या मित्रांवर आणि सहकान्यावर हल्ला करावा.तेही न जमल्यास शत्रूच्या शहरावर हल्ला करावा,असा सल्ला सन त्सूनं दिला आहे.


'द आर्ट ऑफ वॉर' हे पुस्तक युद्धनीतीवर बोलतं. कधी लढावं आणि कधी लढू नये हे याविषयी ते सांगतं.याशिवाय हे पुस्तक अनेक सल्लेही देतं. उदाहरणार्थ,जो शक्तिशाली आहे त्याच्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिज आणि जो कमकुवत आहे त्याच्यावर मात्र त्वरित हल्ला करावा; शत्रूवर हल्ला करताना आधी त्याला पूर्णपणे जाणून घ्यावं.

आपल्यातल्या क्षमता आणि ताकद,तसंच आपल्यातल्या उणिवा आणि कमतरता यांना जाणायला हवं,जर आपण शत्रूला आणि स्वत:लाही ओळखत असू तर मग शंभर वेळा युद्ध झालं तरी त्याच्या परिणामाविषयी चिंता करण्याचं काही एक कारण नाही.


सन त्सून या पुस्तकात 'खूप दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धामुळे कुठल्याही देशाला लाभ झालेला नाही,असं म्हटलंय.सन त्सू हा चीनच्या उत्तर भागात कन्फुशियस

च्या काळात वास्तव्य करत होता.तो युद्धाच्या रणनीती आखण्यात पारंगत होता.चीनमध्ये 'द आर्ट ऑफ वॉर' या ग्रंथाला खूप महत्त्वाचं मानल जातं.तो एक दुर्मीळ दस्तावेज मानला जातो.याचं कारण त्या काळी केवळ मौखिक रूपात सगळ्या गोष्टी केल्या जात.मात्र सन त्सूचा हा ग्रंथ बांबूच्या कामट्यांवर लिहिला गेलेला ग्रंथ आहे.


संताप किंवा क्रोध यातून जी युद्धं घडतात त्यात अनेक देश हरतात.तसंच क्रोध हाअराजकता आणि अंदाधुंदीचं वातावरण निर्माण करतो. त्यातूनच अधिक पीडा आणि वेदनादायी परिस्थिती उद्भवते.वॉरन बफेट आपल्या आयुष्यातल्या संकटांविषयी बोलताना म्हणतो की,वॉल स्ट्रीट फर्म ही सॉलोमन ब्रदर्सला वाचवण्यासाठी त्याला लढावं लागलं.अमेरिकन सरकारद्वारे वॉल स्ट्रीट बंद होण्याचं संकट त्याच्यावर येऊन कोसळलं होतं,कारण त्यातल्या व्यापाऱ्यांमधल्या एका व्यापाऱ्यानं काही गोष्टी खोट्या दिल्या होत्या.जी तपास समिती होती तिच्याबाबत निर्णय घेताना वॉरन बफेटनं चूक केली आणि त्यांना शुल्क कमी करून बंद केलं. या सगळ्या प्रसंगांत वॉरन बफेट विरोधकांशी सामना करण्यात कमी पडला;पण तरीही त्यानं ज्या पद्धतीने लढाई न लढताही तो सहजपणे जिंकला ती गोष्ट अत्यंत शानदार होती. 


बफेटचं उदाहरण हे सन त्सूच्या मांडणीचं एक उत्तम उदाहरण आहे.


युद्ध न करता जिंकणं हे सन त्सूचं सगळ्यात आदर्श उदाहरण आहे.आपल्या विरोधकांना सन्मानपूर्वक वागवल्यानं अनेक गोष्टी सोप्या होतात.समोरच्याचा विरोध आपोआपच कमी होतो आणि त्याचा खूप चांगला परिणाम मिळतो.


सन त्सू हा सैन्यदलात जनरल आणि रणनीतीकार होता.त्याचा जन्म प्राचीन चीनमध्ये इ.पू.५४४ मध्ये एका प्रतिष्ठित श्रीमंत घरात झाला होता आणि मृत्यू इ.पू. ४९६ साली झाला. 'द आर्ट ऑफ वॉर' या एका पुस्तकानं तो जगभर नावाजला गेला.लहानपणापासून त्याला सैन्याचं आकर्षण होतं आणि पुढे सैन्यदलात सैनिकांचा नेता म्हणून त्याचा नावलौकिक होता.सन त्सू हा एक अत्यंत चांगला लेखक आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होता.


1. Laying Plans


2. Waging War


3. Attack by Stratagem


4. Tactical Dispositions


5. Use of Energy


6. Weak Points and Strong


7. Maneuvering an Army


8. Variation of Tactics


9. The Army on the March


10. Classification of Terrain


11. The Nine Situations


12. Attack by Fire


13. Use of Spies


विजय त्या लोकांना मिळतो ज्यांनी सातत्यानं स्वतःचं परीक्षण केलं,सुधारणा केली आणि नैतिकतेचा विकास केला.आपण समोरच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,पण चरित्र,ज्ञान आणि अंतर्दृष्टीची आपली स्वतःची ताकद विकसित करून स्वत:वर विजय आधी प्राप्त करू शकतो.महान चरित्र ज्यांचं असतं ते स्वाभाविकरीत्या नेता बनतात.'असं सन त्सू म्हणत असे. 


चीनमध्ये निर्माण झालेलं 'द आर्ट ऑफ वॉर' हे पुस्तक जरी युद्धनीतीविषयी लिहिलं गेलं असलं तरी आजच्या रोजच्या जगण्यातल्या अनेक समस्यांचं निराकरण या पुस्तकातून मिळतं हे विशेष


या पुस्तकाविषयी अनेक दंतकथा आणि वाद आजही चर्चेत येतात.या पुस्तकाचं खरं शीर्षक 'सन त्सू पिंग फा' असं होतं आणि ते मुळात सन वू या लष्करातल्या जनरलनं लिहिलं होतं,अशी एक दंतकथा प्रचलित आहे.या पुस्तकामुळे राजानं मग सन वूला बोलावून घेतलं.युद्धात शिस्तीची आवश्यकता किती खोलवर आहे हे सांगताना प्रात्यक्षिक म्हणून त्यानं राजाच्या दोन रखेल्यांची मुंडकी उडवली होती,अशीही एक दंतकथा सांगितली जाते.तसंच दुसऱ्या दंतकथेप्रमाणे चीनच्या राजानं सन त्सू एक चांगला नेता असल्याचं केव्हाच ओळखलं होतं, पण त्याची परीक्षा घेण्यासाठी त्यानं त्याला राजवाड्यात बोलावलं.आपल्या जनान -

खान्यातल्या १८० स्त्रियांना सन त्सून सैनिक म्हणून प्रशिक्षित करावं,असा आदेश त्यानं दिला. सन त्सून या १८० स्त्रियांना दोन गटांत विभागलं आणि त्यानंतर त्यानं प्रत्येक गटासाठी एक अशा दोन स्त्रियांची नेता म्हणून निवड केली.त्यानंतर त्यानं या दोन स्त्री नेत्यांना आपल्या गटाखालील स्त्रियांना अमुक एक आदेश द्यावा,असं सांगितलं.मात्र त्या स्त्रियांनी आदेशाचं पालन करण्या -

ऐवजी नुसता गोंधळ घातला.ते बघून सन त्सून या दोघी नेत्या स्त्रियांना ठार मारलं.आणि दुसऱ्या दोन स्त्रियांची त्यांच्या जागी नियुक्ती केली.त्यानंतर पुन्हा त्या दोन नव्या नेत्यांनी आपल्या गटातल्या स्त्रियांना आदेश दिला आणि त्या सगळ्या स्त्रियांनी तो आदेश निमूटपणे पाळला,अशी ती कथा आहे.


"सन त्सू याचं युद्धाविषयीचं ज्ञान जसं जसं वाढत गेलं,तसतसा तो नेहमीच युद्धासाठी स्ट्रॅटेजी स्वतःच आखायचा.ज्या वेळी चू नावाच्या बलाढ्य राजाच्या विरोधात वू राजाला युद्ध करण्याची वेळ आली,तेव्हा सन त्सूनं या युद्धाचं नेतृत्व केलं आणि चू राजाच्या चिंग राजधानीवर ताबा मिळवण्यात यश मिळवलं.हे सगळे अनुभव त्यानं आपल्या 'द आर्ट ऑफ वॉर' या पुस्तकात लिहून काढले.


'द आर्ट ऑफ वॉर' हे पुस्तक जगभरातल्या प्रसिद्ध पुस्तकांमधलं एक पुस्तक आहे.या पुस्तकात एकूण १३ अध्याय किंवा प्रकरणं आहेत.प्रत्येक युद्ध वेगळं असतं आणि प्रत्येक युद्धासाठी वेगळी रणनीती आखावी लागते,असं सन त्सू म्हणत असे.या १३ प्रकरणांमध्ये युद्धातली सैनिकांची तळ ठोकण्याची जागा, प्रत्यक्ष युद्ध,आक्रमण करण्याचं नियोजन, सैन्याचा पवित्रा,

आदेश,उणिवा आणि बलस्थानं, युद्धाच्या भूभागाची माहिती,सैन्याची निवड या सगळ्यांविषयी त्यानं लिहिलंय.

तसंच गुप्तहेरांचा उपयोग गरज असली तरच करावा,असं सन त्सूचं मत होतं;तसंच युद्ध फार दीर्घकालीन असू नये.

कारण अशी युद्धं खूप हानिकारक असतात, असंही सन त्सू म्हणायचा.


आपल्या शत्रूला जाणण्यासाठी सर्वप्रथम आपणच आपला शत्रू बनलं पाहिजे आणि कठोर आत्मपरीक्षण केलं पाहिजे.कुठलाही नेता जबरदस्तीनं इतरांवर लादला जाऊ शकत नाही, तर त्याच्या कामानं आणि उदाहरणानं तो नेता बनला पाहिजे;युद्धाची खरी कला म्हणजे प्रत्यक्ष युद्ध होण्यापूर्वीच शत्रूला नामोहरम करणं,एक हुशार सेनापती तोच,जो अतिशय सहजपणे युद्धात विजय मिळवतो;युद्धामध्ये कुठल्याही साधारण गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये, युद्धातली सगळी सामग्री ही विध्वंस करणारीच असते,'असं सन त्सून या पुस्तकात नमूद केलं.


'द आर्ट ऑफ वॉर' या पुस्तकाचा अभ्यास केवळ युद्धातले नेतेच करत नाहीत तर चीन,जपान,रशिया,व्हिएटनाम आणि अमेरिका या देशांतल्या डावपेच (स्ट्रॅटेजी) ठरवणाऱ्या गटांनीही केला. चीनच्या नागरी युद्धाच्या वेळी माओ-त्से-तुंग यानं या पुस्तकाचा अभ्यास करून अनेक स्ट्रॅटेजीज त्या युद्धात वापरल्या होत्या.आजही अनेक सैनिकी शाळांमध्ये या पुस्तकाचा वापर केला जातो.

माओ-त्से-तुंगच्या लिखाणानंतर जगभरात कम्युनिस्ट विचाराच्या लोकांना 'द आर्ट ऑफ वॉर' या पुस्तकानं प्रभावित केलं.चीनचा एक राजा हो-लू यानं सन त्सूला विचारलं होतं की,युद्धकला कुठल्या क्षेत्रात, कोणावर लागू केली जाऊ शकते?या प्रश्नाचं उत्तर सन त्सून तत्काळ 'हो' म्हणून दिलं. म्हणूनच केवळ युद्धासाठीच नाही तर व्यवसाय, उद्योग,व्यवस्थापन,खेळ आणि राजकारण या क्षेत्रांतही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.


ज्ञान,प्रामाणिकपणा,परोपकार,कठोरता आणि साहस या पाच गुणांची युद्धासाठी नितांत आवश्यकता असल्याचं सन त्सू म्हणतो.'द आर्ट ऑफ वॉर' या पुस्तकाचा पहिल्यांदा अनुवाद फ्रेंच भाषेत १७८२ साली,तर इंग्रजी भाषेत १९०५ साली करण्यात आला.यानंतर जगभरात अनेक देशांत अनेक भाषांत या पुस्तकाचा अनुवाद झाला.

खरं तर 'द आर्ट ऑफ वॉर' हे खूप लांबलचक पुस्तक नसून अतिशय सुटसुटीत आहे आणि इंटरनेटवर मोफत डाऊनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.


'द आर्ट ऑफ वॉर'नंतर युद्धनीतीविषयी लिहिलेल्या अनेक पुस्तकांची लाटच आली. जपानमधल्या मियामोटो मुशाशी या योद्ध्यानं 'ए बुक ऑफ फाइव्ह रिंग्ज' हे पुस्तक लिहिलं आणि ते खूपच लोकप्रिय झालं.१९७४ साली या पुस्तकाला पुनर्प्रसिद्ध करून पुन्हा एकदा धूम उठवली होती.कार्ल फॉन क्लॉसविट्झ यानं लिहिलेलं 'ऑन वॉर' आणि लिडेल हार्ट यानं लिहिलेलं 'स्ट्रॅटेजी' ही पुस्तकंही खूप गाजली. इटलीमधल्या मॅकियावेलीचं 'प्रिन्स' हे पुस्तक तर जगप्रसिद्ध झालं.


'जो काळाची पावलं ओळखून त्यानुसार वागतो आणि आपल्या योजना आखतो,तोच यशस्वी होतो;कालबाह्य कल्पनांना चिटकून बसणारा कधीच यशस्वी होत नाही' असं त्यानं या पुस्तकात म्हटलेलं आजही लागू होतं. 


इतकंच नव्हे तर महाभारताचा अभ्यास केला तर त्यात रणनीती,नेतृत्व,राज्याची अर्थव्यवस्था, मंत्रिगण आणि त्यांची कर्तव्य,हेरगिरी, शत्रूविषयीचे डावपेच अशा अनेक गोष्टींवर सविस्तर विवेचन दिलं आहे.मीरा उबेरॉयनं लिहिलेल्या 'लीडरशिप सिक्रेट्स फ्रॉम द महाभारता' या पुस्तकात असे अनेक उल्लेख पानोपानी सापडतात!असं असलं तरी 'द आर्ट ऑफ वॉर' या पुस्तकानं जो इतिहास घडवला, तो दुसऱ्या कुठल्याही पुस्तकानं घडवला नाही.चीनमध्ये सन त्सूच्या जीवनावर आणि या पुस्तकावर दीर्घ मालिका,चित्रपट आणि अनेक नाटकं निर्माण झाली.थोडक्यात,सन त्सू आणि त्याचं 'द आर्ट ऑफ वॉर' हे कालातीत ठरलं हेच खरं !


" विजय त्या लोकांना मिळतो,ज्यांनी सातत्यानं आत्मपरीक्षण केलं,सुधारणा केली आणि नैतिकतेचा विकास केला."


●सन त्सू


२० एप्रिल २०२३ या लेखमालेतील पुढील लेख


२६/४/२३

देव अंतराळवीर होते का ? भाग शेवटचा

मन्ना मशीन तेच करीत होते.सकाळचे दंवबिंदू आणि एक प्रकारची बुरशी (Chlorella) यापासून प्रत्येक दिवशी सर्वांना पुरेल एवढे अन्न ते मशीन तयार करीत होते.या पळापळीत जे अन्न मिळते आहे ते खाऊन गप्प बसायचे सोडून त्या परिस्थितीतही तक्रार करणाऱ्या लोकांना मोजेस विचारतो की,तुमची निदान उपासमार होत नाही हे काय कमी आहे?नाहीतर तुम्ही काय खाणार होता.?


पण हे अन्न बनविण्यासाठी ऊर्जेचे साधन काय? त्याचे उत्तर आजच्या तंत्रज्ञानावरून मिळते. छोटी अणुभट्टी! कित्येक वर्षे चालू राहणारे आणि ऊर्जा देणारे मन्ना मशीन ही एक छोटी अणुभट्टी होती.हिमालयात अमेरिकेच्या सेन्ट्रल इन्टलिजन्स एजन्सीने अशीच एक छोटी अणुभट्टी ठेवली होती आणि तिच्या शक्तीचा उपयोग चीनवर लक्ष ठेवण्यासाठी,अनेक तऱ्हेची संवेदनाक्षम यंत्रे वापरण्यासाठी होत होता.हे प्रकरण आज आपल्याला नवीन नाही.हल्लीचेच आहे.


अशा तऱ्हेची अणुभट्टी धोकादायक किरणोत्सर्ग सोडणारच.पण त्याने कोणी मृत्युमुखी पडत नाही.पण केव्हा? तिच्या कायम सान्निध्यात राहिले नाही तर ! ती वापरायची कशी ही माहिती असेल तर !


पण पुराणकाळात अणुभट्टी बांधून घेणारे हे देव कोण?

पुराणकाळातल्या आणखी एका 'चमत्कारा'चा सुद्धा उलगडा झाला आहे.असे म्हणायला हरकत नाही.त्याला कारण मार्सेलीसमधील एक घटना आहे.


१९६४ मध्ये मार्सेलीस येथील रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रो अकौस्टिक्स (Research Institute of Electro Accoustics)

नवीन जागेत हलवण्यात आली.अनेक जणांना काही दिवसातच डोकेदुखी,मळमळणे वगैरे गोष्टींचा त्रास

व्हायला लागला.काही जण थरथर कापायलाच लागले.प्रथम वाटत होते की कोणत्या तरी किरणोत्सर्गाचा हा परिणाम आहे म्हणून! संवेदनशील यंत्रे घेऊन सर्व इमारतीची तपासणी करण्यात आली तेव्हा लक्षात आले की हा किरणोत्सर्गाचा वगैरे प्रकार नाही.तर एका व्हेन्टिलेटरमधून अगदी कमी कंपन

संख्येच्या ध्वनिलहरी आत जात आहेत व आवाजाच्या वेगापेक्षा कमी अशी कंपने सर्व इमारतीत निर्माण करीत आहेत व त्यामुळे हा त्रास होतो आहे.


काही शोधांना सुदैव कारणीभूत ठरते.तसाच प्रकार आता घडला.या संस्थेचे प्रमुख ग्लादिमीर गावरू हे २० वर्षे ध्वनिलहरींचा अभ्यास करीत होते.त्यांच्या मनात आले की जी गोष्ट चुकुन घडली आहे.ती प्रयोग करून मुद्दाम घडवून आणता आलीच पाहिजे.त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिली ध्वनिबंदूक बनवली.हवा येण्यासाठी ठेवलेल्या उंचीवरच्या झडपेतून अति दाबाखाली असलेली हवा ६१ ट्यूब्स् मधून हळुहळू सोडण्यात आली की ज्यामुळे १९६ हर्टझ् संख्या असलेल्या ध्वनिलहरी निर्माण होतील.घडला तो प्रकार भयानक होता.या नव्या इमारतीच्या भिंतींना तडे जायला लागले.त्याच्या आतल्या सहकाऱ्यांच्या पोटात गोळे यायला लागून त्यांची आतडी आणि पोटे पिळवटून जायला लागली.त्यांनी ताबडतोब त्यांचे उपकरण बंद केले.


त्यांनी प्रयोग चालूच ठेवले.त्यांनी २००० वॅट शक्तीची 'मृत्युची तुतारीच' बनवली की जिच्यातून ३७ हर्टझ कंपनसंख्येच्या ध्वनिलहरी निघतील. या उपकरणाची मार्सेलीसमध्ये चाचणी करता येणेच शक्य नव्हते.कित्येक मैलांच्या परिसरातील इमारतीच नाहीतर कोसळून पडल्या असत्या.आज ७५ फूट लांबीची फक्त ३ हर्टझ कंपनसंख्येच्या ध्वनिलहरी निघणारी तुतारी ते बनवीत आहेत.


भविष्यकाळाचे भीषण दृश्य डोळ्यांसमोर उभे होत असतानाच पुन्हा बायबलकडे वळल्याशिवाय राहवत नाही.'देवाने संरक्षण दिलेल्या जमातीने आपले पायसुद्धा ओले न करता नदी पार केली.आणि जेरिको शहराला वेढा घातला. शहराभोवती २१ फूट रूंदीचे तट होते.एका ठिकाणाहून त्यांना आपल्या तुताऱ्या फुंकण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यांनी आपल्या तुताऱ्या फुंकल्या.सर्व लोक ओरडत होते आणि ही तटबंदी संपूर्ण कोसळून आडवी झाली.

लोक चालतच शहरात गेले आणि त्यांनी जेरिकोवर कब्जा केला.' धर्मगुरू आणि इतरांनीही बेंबीच्या देठापासून आरडाओरडा केला असता आणि हजारो तुताऱ्या फुंकल्या असत्या तरी जेरिकोच्या तटबंदीला काही झाले नसते.पण या तुताऱ्या साध्या नव्हत्याच का?आज आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येते की अतिशय कमी कंपनसंख्येच्या ध्वनिलहरी सोडणाऱ्या जर या तुताऱ्या असतील तर जेरिकोची तटबंदी कोसळवण्याची त्यांची निश्चितच ताकद होती.


'एक्झोडस' हा बायबलचाच एक भाग.त्यामध्ये मोजेस एकदा देवाला 'तू दर्शन का देत नाहीस' म्हणून विचारतो.

तेव्हा देव म्हणतो,'तू माझा चेहरा बघू शकणार नाहीस.जो माणूस माझा चेहरा पाहील तो जिवंत राहू शकणार नाही.' जुन्या सर्व महाकाव्यात या बाबतीत आश्चर्यकारक साम्य आहे.सुमेरियन लोकांचे 'गिलगामेशचे महाकाव्य' बायबलहून जुने असावे.बायबलसारखेच त्यात देवाचे शब्द आहेत.'कोणत्याही मानवाने देव राहतात त्या पर्वतावर येता कामा नये.जो देवाकडे तोंड वर करून पाहील तो मृत्युमुखी पडेल.'


देव आणि मानव नजरेला नजर का देऊ शकत नव्हते? समोरासमोर का उभे राहू शकत नव्हते? देवांनी त्यांचा मुखवटा कधीच का उतरवला नाही? देवांची इच्छा नव्हती की मानवाने त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून? का? कुठल्या धोक्याची जाणीव देवांना होती?


काही वेळा तर वाटते की सर्वच जुन्या ग्रंथांची उत्पत्तीसुद्धा एका ठिकाणी झाली असेल आणि नंतर ते वेगवेगळ्या प्रकारांनी जगातल्या सर्व देशात पोहोचले असतील.


वेगवेगळ्या तहांनी लिहिलेले जुने धर्मग्रंथ कायमच उजेडात येत आहेत.आजपर्यंत अज्ञात असलेले धर्मग्रंथसुद्धा देवांचे दैदिप्यमान रथ, देवपुत्र,रथांची चाके आणि ते सोडत असलेल्या धुराबद्दल लिहितात.तसाच विचार केला तर अगदी ॲडम आणि ईव्हच्या काळापासून दैदिप्यमान अंतराळयानांचा उल्लेख आहे. ईव्हने आकाशात पाहिले तर चार भव्य गरुडांनी ओढलेला प्रकाशमान रथ तिला दिसला.तो ॲडम जवळ येऊन थांबला.तेव्हा त्याच्या चाकातून धूर येत होता.देवांच्या अंतराळयानांचा उल्लेख केला की प्रकाश,धूर,चाके या गोष्टींचा उल्लेखही न चुकता येतो आणि हे सर्व धर्मग्रंथ या दैदिप्यमान रथांबद्दल हेही सांगतात की कोणत्याही मर्त्य मानवाला त्यांचा भव्य-दिव्यपणा कधीही शब्दात सांगता येणार नाही.


लॅमेच स्क्रोल मध्येही एका चमत्कारिक प्रसंगाचे वर्णन आहे.त्यातही सर्व लेखन उपलब्ध नाही पण जे सापडले आहे.त्यातही कितीतरी परिच्छेद नाहीसे झाले आहेत;पण शिल्लक राहिलेल्यांचा अर्थ लावता एक कथा नक्कीच सांगण्यासारखी आहे.


नोहाचे वडील लॅमेच बऱ्याच काळानंतर घरी परततात.

अचानकपणे ! घरात शिरतात तर त्यांना अगदी गोरा गोरा पान आणि सुंदर मुलगा घरात दिसतो.त्यांच्या कुटुंबात अजिबात न शोभणारा.लॅमेच संशयाने पछाडला जातो.

आणि बायकोला सांगतो की हा मुलगा त्याचा असणे शक्यच नाही.तो तिच्यावर नाना आरोप करायला लागतो.सर्व पवित्र गोष्टींची शपथ घेऊन ती सांगते की,लॅमेचला वाटते त्याप्रमाणे लॅमेच नसताना कोणत्या सैनिकापासून,अनोळखी वाटसरूपासून किंवा इतर देवपुत्रांपासून तो मुलगा झालेला नाही. (पुन्हा हे देवपुत्र कोण हा प्रश्न आलाच) पण लॅमेचचा विश्वास बसणे शक्यच नसते.तो त्याच्या बापाकडे याबाबत सल्ला विचारायला जातो.झालेला प्रकार ऐकून तोही विचारात पडतो.या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तो मोठ्या कष्टाने प्रवास करीत शहाण्या इनोचकडे जातो.त्या मुलाचा बाप कोण याची शहानिशा होणे आवश्यकच असते.तो मुलगा देवपुत्रांसारखा गोरा,देखणा कसा दिसतो, कुटुंबातले इतर सर्वजण कसे अगदी वेगळे दिसतात.हे सर्व तो इनोचला समजावून सांगतो. सर्व ऐकल्यावर इनोच त्याला म्हणतो की मानवाची वर्तणूक पाहून देवाचा कोप झालेला आहे.आणि तो लवकरच मानवाचा नाश करणार आहे.ज्या मुलावर त्या सर्वांचा संशय आहे तो या हत्याकांडातून वाचणार आहे आणि नंतर नवीन जग निर्माण करणार आहे.तेव्हा तू तुझ्या मुलाला,लॅमेचला सांग की त्याच्या या मुलाचे नाव नोहा असे ठेव आणि त्याचा व्यवस्थित सांभाळ कर.लॅमेचला तसे करण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो.


या कथेतील आश्चर्यकारक भाग म्हणजे होणाऱ्या जलप्रलयाची आगाऊ माहिती नोहाच्या आजोबांनासुद्धा देण्यात आली होती.इनोचही साधासुधा माणूस नव्हताच.

आख्यायिकेप्रमाणे इनोचसुद्धा काही काळानंतर देवाच्या दैदिप्यमान रथात बसून अंतर्धान पावला होता.कोणत्या तरी अंतराळवीरांनी पृथ्वीवरील स्त्रियांशी संबंध ठेवून मुद्दामच निर्माण केलेली ही मानवजात आहे का,असा गंभीर प्रश्न हे वाचल्यावर आपल्यासमोर उभा राहत नाही? नाहीतर पुनः पुन्हा देवपुत्रांनी,धिप्पाड अशा माणसांनी अशा जमाती निर्माण करायला का हातभार लावला असता? जेव्हा जेव्हा प्रयोग फसले,योग्य अशी निर्मिती झाली नाही तिथे अशा प्रजेचा नाशच घडवून आणण्यात आला असावा.


महाप्रलय हे ऐतिहासिक सत्य आहे.पण होणाऱ्या जलप्रलयाची आगाऊ कल्पना जर नोहाच्या आजोबांना देण्यात आली होती.बोट कशी बांधायची यांच्या सूचना नोहाला शेकडो वर्षे आधी देण्यात आल्या होत्या,तर जलप्रलय ही नैसर्गिक आपत्ती नक्कीच नव्हती.आणि तो दैवी कोपही नव्हता.

योजनाबद्ध रितीने काही निवडक व्यक्ती सोडून इतरांचा नाश करण्याची,संहार करण्याची कल्पना होती,व त्यासाठीच मुद्दाम जलप्रलय घडवून आणला अशीच शक्यता दिसते.


आजच्या काळात मुद्दाम योग्य व्यक्ती जवळ आणून अत्यंत बुद्धिमान संतती निर्माण करण्याचा प्रयोग कुणालाही मूर्खपणाचा वाटणार नाही.अशी बुद्धिमान जमात निर्माण करण्याच्या 'देवांच्या' प्रयत्नांचा उल्लेख जगातील सर्व धर्मग्रंथात आहे.कित्येक ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की देवांना हवी होती तशी,त्यांच्यासारखी दिसणारी प्रजा अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतरच निर्माण झाली.टिआहुआन्कोची आख्यायिका काय सांगते?जगन्माता होण्यासाठीच दैदिप्यमान अंतराळयानातून एरियाना ही स्त्री आली होती म्हणून ना ?


अशीही शक्यता आहे की ज्या अज्ञात अंतराळवीरांनी अति प्राचीन काळात पृथ्वीला भेटी दिल्या होत्या,

त्यांच्याचसारखे कदाचित आपण दिसत आहोत! या देवांनी आपल्या पूर्वजांकडे कसला 'नैवेद्य' मागितला होता याचा कधी तरी विचार केला आहे? धूप आणि चंदन आणि प्राण्यांचा बळी असल्या सटरफटर गोष्टींचा नाही.


त्यांनी मागितलेल्या गोष्टींची यादी पाहिली तर त्यात आढळतात मिश्रधातूंपासून बनविलेल्या नाणी वगैरेंसारख्या गोष्टी की ज्यासाठी तंत्रज्ञानात बरीच प्रगती आवश्यक आहे.ऐतिहासिक काळातील धातू गाळण्याच्या भट्टीत तांबे कसे शुद्ध केले असेल ते कळत नाही.काही गुहांमध्ये सापडलेला कॉपर सल्फेटचा साठा मात्र अशाच काही गोष्टींची शक्यता दाखवतो.कारण तो साठा कमीत कमी ५००० वर्षांपूर्वीच्या काळातील आहे.


आपले अंतराळवीर कधी कुठल्या ग्रहावर उतरले आणि तेथील जमाती आपल्या मानाने फारच मागासलेल्या असतील,तर त्यांचे 'देव' म्हणूनच स्वागत होईल पण याचीही काही खात्री नाही म्हणा ! समजा,आपले अंतराळवीर चुकून अशा ग्रहावर उतरले की जेथील बुद्धिमान जीवन आपल्याहून फारच प्रगत आहे,तर काय होईल? कोण हे रानटी आणि मागासलेले लोक आता अंतराळयाने घेऊन फिरायला लागले आहेत अशी टवाळकीसुद्धा होईल.!


समाप्त…


२४/४/२३

देव अंतराळवीर होते का?

बायबलमध्ये गूढ गोष्टी खूप आहेत आणि परस्पर विरोधीही,जिनिसीस म्हणजे जग निर्मितीची सुरुवात,पण ती अगदी भूरचनेच्या शास्त्राला धरूनच लिहिलेली आहे.हे लिहिणाऱ्याला कसे माहीत होते की प्रथम खनिजे निर्माण झाली,मग वनस्पती जीवन आणि नंतरच प्राणी निर्माण झाले म्हणून ?

मानव प्राण्याच्या निर्मितीची वेळ आल्यावर देव म्हणतो,'आता आपण मानव प्राणी निर्माण करू या की जो अगदी आमचीच प्रतिकृती असेल.'

देव अनेक वचनात का बोलतो?

'मी' नाही, 'आम्ही !'

'माझ्यासारखा' नाही तर 'आमच्यासारखा ! '

जगातला एकमेव देव बोलत असेल तर त्याने एक वचनात

का बोलू नये?

'मग पृथ्वीवरील लोकसंख्या वाढायला लागली आणि मुलीही जन्माला यायला लागल्या.जेव्हा देवपुत्रांनी या मुली पाहिल्या तेव्हा स्वतःच्या बायका म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला.' एकच अति प्राचीन देव इस्रायलमध्ये असताना हे देवपुत्र कुठून आले?


 पूर्वी पृथ्वीवर धिप्पाड माणसे होती.पृथ्वीवरील स्त्रिया आणि देवपुत्रांची मुलेही तशीच धिप्पाड होती.


सर्व जगातील सर्व देशांच्या महाकाव्यात, टिआहुआन्को,

एस्किमो यांच्या पुराणकथात,सारखे हे धिप्पाड लोक पानापानातून डोकावत असतात.ही धिप्पाड माणसे होती कोण?अजस्त्र दगड सहज एकमेकांवर चढवून प्रचंड इमारती बांधणारे हेच आपले पूर्वज होते ?की तांत्रिक ज्ञानात तरबेज असलेले परग्रहांवरील अंतराळवीर ते हेच?


बायबलमध्ये सोडोम आणि गोमारा या शहरांवर कोसळलेल्या आपत्तीचे अत्यंत खळबळजनक वर्णन आहे.या शहरातले लोक इतके पापी बनलेले असतात की त्यांचा नाश करण्याचे देवाने ठरविलेले असते.मात्र लॉट कुटुंबातील माणसांना वाचविण्याची देवाला इच्छा असते.


शहराच्या वेशीवरच लॉट बसलेला असताना देवाने पाठविलेले दोन 'देवदूत' त्याच्याकडे येतात.हे देवदूत दिसायला तरी माणसांसारखे असावेत;कारण लॉट त्यांना ओळखतो आणि आग्रहाने घरी घेऊन जातो.शहरात अनाचार तर इतका बोकाळलेला की या पाहुण्यांवर सुद्धा सोडोममधल्या लोकांची 'वाईट' नजर पडते.पण पाहुणे पडले शेवटी देवदूतच! त्यांच्यामागे लागलेल्या एका टोळक्यातील सर्वजणांना ते एक फटक्यात आंधळे करून टाकतात.


देवदूत लॉटला सांगतात की,या शहरात तुझी मुले,मुली,

जावई,नातेवाईक वगैरे कोणी असतील तर त्यांना ताबडतोब शहराबाहेर काढ.या शहराचा नाश होणार आहे. लॉट त्याप्रमाणे इतरांना सांगतो पण लॉटची कुणीच नातेवाईक मंडळी लॉटने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवीत नाहीत.सहाजिकच आहे;अशा बातमीवर कोण एकदम विश्वास ठेवणार !


पहाट होते.मग मात्र देवदूत सांगतात की आता तू निदान तुझी बायको आणि दोन मुली यांना बरोबर घे आणि वेळ न दडवता इथून निघ. शहराच्या नाशाची वेळ जवळ येत आहे.तरीही लॉट कांकू करायला लागल्यावर ते या सर्वांचा हात धरूनच शहराबाहेर येतात आणि सांगतात की जीव वाचवायचा असेल तर आता धावत सुटा मागे सुद्धा वळून बघू नका आणि पर्वतात पळून जा.घाई करा.याहून जास्ती आम्ही काहीच करू शकणार नाही.


हे सर्व वाचल्यावर सोडोमच्या रहिवाशांना नव्हती अशी माहिती त्या देवदूतांना होती असे नाही वाटत ? शहराच्या नाशाची वेळ ठरलेली होती. जवळ येत होती.आणि त्याची कल्पना देवदूतांना होती असे नाही वाटत ? 


सोडोमला खरोखर काय घडले ? सर्व शक्तिमान देवाला शहराचा नाश करण्यासाठी वेळापत्रकाची जरुरी का भासावी ? देवदूतांच्या घाईचा दुसरा अर्थ काय लावायचा? घटके घटकेला शहराचा नाश होण्याचा क्षण जवळ येत होता याची पूर्ण जाणीव त्या देवदूतांना होती असे यावरून नाही वाटत? मग ती वेळ निश्चितपणे आधीच ठरलेली असली पाहिजे.


पर्वतांवरच का जायचे? मागे वळून का पहायचे नाही ? गंभीर गोष्टींबद्दल विचारू नयेत असे प्रश्न आहेत खरे हे.


जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब पडल्यापासून त्यांच्या विध्वंसक शक्तीची पूर्ण कल्पना आपल्याला आली आहे.

किरणोत्सर्गाने काय हाहा:कार उड़तो हे आपल्याला ठाऊक आहे.क्षणभर समजा की सोडोम आणि गोमारा या शहरांचा नाश अगदी विचारपूर्वक,ठरवून करण्याचे ठरविले होते.धोकादायक किरणोत्सर्गी पदार्थ आणि त्याचबरोबर शहरातील लोक यांचा नाश करण्याची कालबद्ध योजना आखली होती. त्यामुळेच शहराच्या नाशाचा क्षण अगदी अटळ होता.लॉटसारख्या कुटुंबातील जे लोक वाचावेत अशी देवाची इच्छा होती ते स्फोटाच्या केंद्रबिंदूपासून कित्येक मैल लांब पर्वतात असणेच आवश्यक होते.कारण अणुस्फोटापासून निर्माण होणारा धोकादायक किरणोत्सर्ग पर्वतावरील खडकच शोषून घेऊ शकतात,अडवू शकतात.


तरीही लॉटची बायको मागे वळून पाहते आणि क्षणार्धात मरून पडते.मग गंधक आणि अग्नी यांच्या वर्षावाने देव शहराचा संपूर्ण नाश घडवतो.दुसऱ्या दिवशी एखाद्या भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर सर्व शहरावर पसरलेला दिसत होता असे वर्णन आहे.


आपल्या पूर्वजांपेक्षा आपण कमी धार्मिक आहोत असे मुळीच नाह.पण अंधश्रद्धा आपल्याकडे कमी आहे.

भोळसटपणाही कमी आहे.देवाने मानवाची निर्मिती केली खरी पण आपल्या कृत्याचा त्याला नंतर पश्चात्तापच झाला असावा.कारण नंतर त्यानेच स्वतःच्या निर्मितीचा नाश केला.अपरंपार दयाळू देवाने पक्षपातीपणा करून त्याच्या आवडत्या काही जणांवर दया दाखवावी आणि इतरांचा नाश घडवून आणावा ही कल्पना आपल्या डोळ्यांसमोर,मनासमोर देवाची म्हणून जी प्रतिमा हजारो वर्षापासून आहे तिच्याशी संपूर्णतः विसंगत आहे असे नाही वाटत?


ओल्ड टेस्टमेंटमध्ये देव किंवा देवदूत प्रचंड आवाज करीत आणि धुराचे लोट सोडीत कसे येत याची अनेक वर्णने आहेत.कल्पकतापूर्ण पण स्पष्ट आणि वास्तव अशी वर्णने इझिकेलची आहेत.


इझिकेल हा एक धर्मगुरू होता.कोणत्याही गोष्टीचे वर्णन करण्याची त्याची हातोटीही विलक्षण होती.त्याच्या शिकवणुकीचा छोटासा भागच पुस्तकरूपाने बायबलमध्ये आहे.


उत्तरेकडून प्रखर प्रकाश पाडीत,धुराचे लोट सोडीत,वाळवंटातील वाळू उडवीत देवांचे चमकदार अंतराळयान कसे येते याचे तो वर्णन करतो.

सर्वशक्तिमान देव आपली अंतराळयाने ठराविक दिशेनेच का आणत होते ? ते सर्वशक्तिमान असतील तर त्यांना केव्हाही, कसेही,कुठेही जाता यायला पाहिजे.सामर्थ्यशाली देवांना काहीच अशक्य नसावे ना? पृथ्वीचे भ्रमण लक्षात घेऊन आज आपण आपली अंतराळयाने ठराविक दिशेने सोडतो आणि परत आणतो पण देवांनासुद्धा ही गोष्ट का लक्षात ठेवावी लागत होती.? देवांचे रथ उतरताना किंवा उडताना होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे वर्णन इझिकेलने केलेले आहे. एवढेच नव्हे तर त्या रथातून दुसरी वाहने कशी बाहेर पडतात यांचीही वर्णने तो करतो. अमेरिकेने वाळवंटात किंवा दलदलीच्या प्रदेशात उपयोगी पडणारी जी वाहने बनवली आहेत,त्या वाहनांचीच आठवण इझिकेलच्या वर्णनावरून येते.


आणि शेवटी एक दिवस इझिकेल अंतराळातून देववाणी ऐकतो, 'मानवपुत्रा ऊठ! मी तुझ्याशी बोलतो आहे.'

आणि इझिकेलने आवाज ऐकले.घोंघावणाऱ्या वाऱ्यासारखे,फडफडणाऱ्या पंखांसारखे आणि निरनिराळ्या चाकांचे.या गोष्टी तरी इझिकेलने अनुभवानेच लिहिल्या आहेत याबद्दल आपल्याला शंका नसावी.


देव त्याला सांगतात की जगात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आता त्यांचेच आहे. त्यांनी इझिकेलला अंतराळयानातून वर नेऊन सांगितले की त्यांनी मानवजातीचा पूर्ण त्याग केलेला नाही.डोळे असून आंधळेपणाने आणि कान असून बहिरेपणाने वागणाऱ्या लोकांमध्ये तो राहत आहे.एकूण मानवजातीची सुधारणा करण्याचे काम त्यालाच करायला पाहिजे. त्याप्रमाणे त्याला ते सल्ला देतात.या सर्व अनुभवांचा इझिकेलवर झालेला परिणाम नेहमीच त्याच्या लिहिण्यात दिसतो.


इझिकेलशी कोण बोलले? कोणत्या तऱ्हेचे देव होते ते? परंपरेनुसार आपली जी देवांची व्याख्या आहे तसे ते देव नसावेत.कारण ते सर्वशक्तिमान वाटत नाहीत.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता त्यांना वाहनांची जरुरी पडत होती. मग कोण होते ते?


मोजेस इजिप्तमधून ज्यू लोकांना घेऊन बाहेर पडतो त्यावेळी इजिप्शियन सेना त्याच्या पाठलागावर असतेच.एकदा समुद्र दुभंगून हे लोक पुढे जातात.आणि तो पुन्हा जोडला जातो आणि पाठलाग करणाऱ्या इजिप्शियन सेनेचा नाश होतो;ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे.या संबंध प्रवासात देवाने ज्यू लोकांना कशी मदत केलेली असते?


दिवसा आकाशातील ढगांचा एक स्तंभ ज्यू लोकांना मार्गदर्शन करायचा तर रात्रीच्या वेळी एक अग्निचा स्तंभ की ज्यामुळे त्यांना प्रकाशही मिळत असे.हे काही हवामानाचे चमत्कार नव्हते.आपल्याला देवाने कशी मदत दिली आहे याबद्दल मोजेसने दिलेलीच ही माहिती आहे.


देव जेव्हा सिनाई पर्वतावर उतरतो तेव्हा तो ज्वाळा आणि धूर सोडीतच उतरतो.सर्व परिसर हलल्यासारखा वाटतो.

पुन्हा उतरल्याबरोबर तो मोजेसला सांगतो की या टेकडीभोवती कुंपण घाल म्हणजे कोणीही माझ्याजवळ येऊ शकणार नाही.


या गोष्टीतून देव अंतराळवीर होते असे नाही वाटत? पण बहुधा त्यांची संख्या कमी असावी. त्यांच्याकडे अंतराळयानेही कमी असावीत. नाहीतर या सर्व लोकांना त्यांनी अंतराळयानातूनच हलवले असते की! ढगांचा स्तंभ आणि अग्निचा स्तंभ ही अंतराळयानेच असू शकतात,नाहीतर कित्येक दिवस आणि कित्येक रात्री त्यांनी त्यांच्याबरोबर प्रवास केला नसता.इजिप्शियन सैन्याचा नाश करण्यात त्यांचाही हात होताच.बरेच जण म्हणतात, ओहोटीच्या वेळेला ज्यू लोकांनी समुद्र पार केला.

आणि भरतीच्या समुद्राने इजिप्शियन सैन्याचा नाश झाला.ज्या इजिप्शियन लोकांनी पहिल्या प्रथम वर्षांचे ३६५ दिवस असे भाग पाडले.


ज्यांना नाईल नदीचे पूर वगैरेसारख्या गोष्टींची पुरेपूर माहिती होती,त्यांना भरती ओहोटी आणि त्यांच्या वेळा माहीत नसणे असे म्हणणे अगदी हास्यास्पद आहे,नाही? इजिप्शियन सैन्य वेड्यासारखे त्यांच्या मागे लागल्याने त्यांचा नाश झाला नाही.तर देवाने योजना आखूनच त्यांचा संपूर्ण निःपात घडवून आणला होता.ढगांचा स्तंभ ज्यू लोकांच्या पुढून मागे आला,ढगांच्या स्तंभामुळे इजिप्शियन लोकांना काही दिसेनासे झाले पण ज्यू लोकांच्या मागे असलेल्या अग्निच्या स्तंभामुळे त्यांना मात्र प्रकाशही मिळत होता.हे सर्व वर्णन काय दर्शविते?


निघण्यापूर्वी देव मोजेसला 'आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' बांधण्याच्या स्पष्ट सूचना देतो आणि ती कशी बांधायची याची प्रतिकृतीही दाखवतो. भक्कम काठ्या किती घ्यायच्या,कुठल्या मापाच्या घ्यायच्या,किती किती अंतरावर बांधायच्या,ती उचलणाऱ्यांनी वस्त्रे कशाची बनवलेली घालायची,चपला कुठल्या घालायच्या याबद्दल अगदी सविस्तर आणि तपशिलवार सूचना देवाने दिलेल्या असतात.


एका तऱ्हेची 'आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' या नावाने ओळखली जाणारी ही पेटी नेहमीच वेगळ्या तंबूत ठेवली जायची आणि फक्त ठराविक लोकांनाच त्या तंबूत जायची परवानगी होती.इतरांना मज्जाव होता.ही आर्क सर्वांनाच पुढे अत्यंत त्रासदायक आणि धोकादायक ठरते. नंतरच्या कथेप्रमाणे फिलीस्टाईन ही दुसरी जमात एकदा इस्त्रायलच्या ज्यूंचा पराभव करते. या आर्कचे त्यांना किती महत्त्व वाटत असते हे फिलीस्टाईन या दुसऱ्या जमातीने नेहमीच पाहिलेले असते.ती आर्क ते प्रथम 'लुटून' घेऊन जातात.पण ती काय आहे,कशी वापरायची याची त्यांना माहिती नसते.त्यांच्या एकच गोष्ट ताबडतोब लक्षात येते.

तिच्याजवळ जाणारे नेहमी आजारी पडत आहेत तर कधी कधी मृत्युमुखीही पडत आहेत.


तेव्हा ती कोणीच जवळ ठेवेना.प्रत्येक जण ती पुढल्या शहरात पाठवून द्यायला लागला.प्रत्येक शहरात तोच प्रकार घडू लागला.तिच्याशी संबंध येणाऱ्यांचे केस झडत असत,त्यांना ओकाऱ्या ( देव ?छे! परग्रहावरील अंतराळवीर ! बाळ भागवत मेहता पब्लिशिंग हाऊस ) व हालहाल होऊन लोक मरत असत.बघता बघता पन्नास हजार लोक या आर्कचे बळी झाले. ही 'लूट' फिलीस्टाईन जमातीला पचेना.त्यांनी शेवटी ती गाडीत घालून तिला दोन गायी बांधल्या व ती चक्क परत केली.


"आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' हा खरोखर काय प्रकार होता? इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ जॉर्ज ससून आणि प्राणीशास्त्रज्ञ रॉडनी डेल यांनी अनेक जुन्या धर्मग्रंथांवरून कसून शोध केला. त्याप्रमाणे त्यांनी ती बांधली व त्यांच्या लक्षात आले की ती पेटी म्हणजे एक प्रकारचे यंत्रच होते.त्याचा उपयोग इजिप्तमधून पळणाऱ्या ज्यू लोकांना अन्नपुरवठा करण्यासाठी केला जात होता.प्रोटीनने समृद्ध असे अन्न ! मन्ना! आणि हे बनवण्याचे यंत्र,मन्ना मशीन- आर्क ऑफ दि कव्हेनन्टमधून नेण्यात येत होते.


हजारो स्त्री,पुरूष,मुले वाळवंटातून प्रवास करीत निघाली.त्यांच्या अन्नपाण्याची काय सोय होती? त्या उजाड वाळवंटात होतेच काय? मग कोणत्या विश्वासावर मोजेस त्यांना घेऊन निघाला होता? कारण एकच! देवांनी (अंतराळवीरांनी) या सर्वांना पोसण्याची आधीपासूनच तयारी केली होती आणि मोजेसला ते माहिती होते. 


(+)५०° सेंटिग्रेड आणि (-) १०० सेंटिग्रेड एवढा उष्णतामानात एका दिवस, रात्रीत फरक करणाऱ्या त्या उजाड वाळवंटात हजारो लोकांना घेऊन जाण्याचा धोका नाहीतर मोजेसने पत्करलाच नसता.

आज आपल्याला माहीत आहे की काही प्रकारच्या बुरशी पेट्रोलसुद्धा गिळंकृत करतात आणि त्यामधून प्रोटीनयुक्त खाण्यालायक अन्न निर्माण करतात.

माणूस शरीरातून जी घाण बाहेर टाकतो त्यातूनही प्रक्रिया केल्यावर प्रोटीनने समृद्ध असे अन्न निर्माण करता येते.


राहिलेला लेख पुढील भागात..

२२/४/२३

गौतम बुद्ध - त्रिपिटक (इ.स.पू.पहिलं शतक) भाग २

'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रीतीनं कसं जगावं याविषयी सांगितलं आहे.बुद्धानं दुःख,

समुदय,निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्ये सांगितली आहेत.बुद्धानं सांगितलेल्या आर्य

सत्यांमध्ये पहिल्यांदा दुःख आहे.त्यानंतर त्या दुःखाचा समुदय म्हणजेच त्या दुःखाची कारणं आहेत आणि नंतर त्या दुःखाचा निरोध म्हणजेच त्या दुःखाचं निवारण आहे.त्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे दुःख निवारणाचा मार्गही सांगितला आहे. बुद्ध म्हणतात,आनंद दोन प्रकारचे असतात.

आपल्याला हवं ते मिळालं की आनंद होतो.खरं तर हा आनंद क्षणिक असतो आणि काही क्षण यात आनंद मिळाल्याचा केवळ भास होतो.खरं तर आपण या क्षणिक आनंदाच्या हव्यासासाठी दुःखालाच आमंत्रण देत असतो आणि दुसरा आनंद समाधी अवस्था प्राप्त झाल्यावर मिळतो.हा खरा आनंद असल्याचं बुद्ध सांगतो.तसंच दुःखाचं कारण मनुष्य नेहमीच दुसऱ्याकडे बोट दाखवून सांगतो.दुसऱ्या कोणामुळे तरी आपल्याला दुःख भोगावं लागतंय असं त्याला वाटत राहतं.तो नेहमी याबाबतीत दुसऱ्याला दोष देत राहतो.मात्र आपली स्वतःची न संपणारी तृष्णा आणि भूक हेच खरं तर दुःखाचं कारण असतं आणि तेच मनुष्याला समजत नाही.

त्याला जे हवं,ते मिळाल्यावर त्यानं सुखी व्हायला हवं;पण प्रत्यक्षात तसं होत नाही.ती गोष्ट मिळाल्या

नंतर पुन्हा दुसऱ्या गोष्टीची तहान त्याच्या मनात निर्माण होते.तसंच इतरांपेक्षा मी जास्त चांगला आहे असं दाखवत राहणं या हव्यासापोटीदेखील मनुष्य दुःखाला आमंत्रण देत राहतो.त्यामुळे बुद्ध सांगतात की,इतरांना दोष न देता,स्वत:च्या अंतर्मनात माणसानं डोकावून बघायला हवं.'मी' आणि 'माझा' हे शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकले पाहिजेत आणि अंतर्मनात डोकावून बघितलं तर दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग सहजपणे सापडतो. 


दुःखाच मूळ कारण समोरचा नसून आपणच आहोत हे सत्य जेव्हा मनुष्याला कळतं,तेव्हा त्याला त्या दुःखाला दूर करण्याचा मध्यम मार्ग किंवा उपायही सापडतो.


गौतम बुद्धांनी 'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये अष्टांग योगाविषयी सांगितलं आहे.खरं तर महर्षी पतंजलीनं या अष्टांग योगाविषयी पहिल्यांदा माहिती दिली.यम,नियम,आसन,

प्रत्याहार, प्राणायाम,ध्यान,धारणा आणि समाधीविषयी सांगितलं;पण सर्वसामान्य लोकांना समाधी म्हणजे काय हे नीटपणे समजलं नव्हतं.ते बुद्धानं त्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं.बुद्धान आयुष्यात येणाऱ्या दुःखाविषयी वक्तव्य केलं.त्यानं दुःखाच्या निवारणासाठी अष्टांग मार्ग (उपाय) सांगितले.

पहिला अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी!बुद्धानं प्रत्येक वेळी 'सम्यक' हा शब्द वापरला आहे. सम्यक या शब्दाचा अर्थ म्हणजे मध्यम मार्ग होय,तर पहिला अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे जे आहे ते तसंच बघणं.आपले पूर्वग्रह, आपली समजूत त्यामध्ये न आणता निरपेक्षपणे ती गोष्ट बघणं.दुसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक संकल्प ! जे करण्यायोग्य आणि करण्यासारखं आहे त्याचा संकल्प करणं.तिसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक वाक् होय.जसं आहे तसं आणि तेच बोलणं.थोडक्यात,मनात एक आणि बाहेर एक असं बोलायचं नाही.चवथा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक कर्म.याचा अर्थ आपलं अंतःकरण जे सांगतं त्याप्रमाणे कृती करणं. इतरांचं ऐकून कुठलीही गोष्ट न करणं.पाचवा मार्ग सम्यक जीविका,सम्यक जीविका म्हणजे उपजीविकेसाठी उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधणं.मात्र हे करताना कुठल्याही हानिकारक मार्गाचा अवलंब न करणं.

सहावा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक प्रयास,सम्यक प्रयास म्हणजे कुठल्याही कामासाठी आळस न बाळगता आवश्यक ते प्रयत्न करणं.सातवा अष्टांग

मार्ग म्हणजे सम्यक स्मृती,सम्यक स्मृतीनुसार योग्य गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि निरर्थक गोष्टी विसरून जाव्यात.आठवा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक समाधी,

सम्यक समाधी म्हणजे कुठल्याही मादक द्रव्याचा आधार न घेता समाधीवस्थेला पोहोचणं होय.


'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये बुद्धकाळातल्या भारताची राजनीती,अर्थनीती,सामाजिक आहेत.व्यवस्था,

शिल्पकला,संगीतकला,वेशभूषा, पेहराव,रीतिरिवाज,

ऐतिहासिक,भौगोलिक आणि व्यापाराची परिस्थिती असे अनेक विषय मांडले आहेत.तसंच बौद्ध भिक्खूंनी कसं आचरण केलं पाहिजे याविषयीचे नीतिनियमही यात सांगितले आहेत.यात जातककथाही सामील आहेत.हिंदू धर्मामध्ये रामायण आणि महाभारत यातल्या कथांना जे महत्त्व किंवा जे स्थान आहे,तेच स्थान बौद्ध धम्मामध्ये जातक कथांना आहे.जातक गोष्टींचा आधार घेऊन सांगितला आहे.यातून माणसाला अनेक दृष्टांत दिले आहेत.या कथांचं साहित्यिक मूल्यही खूप महत्त्वाचं आहे.जातक कथा एक प्रकारे बोधकथाच आहेत.जातक कथा आज जगभर पसरल्या.गौतम बुद्धानं कुठल्याही चमत्कारांकडे माणसाचं लक्ष वेधलं नाही. आकाशात कुठली तरी शक्ती आहे किंवा कुठला तरी गुरू बसलेला आहे किंवा कुठल्या तरी मंत्राचं पठण करा,अशा कुठल्याही गोष्टींचं अवडंबरसुद्धा बुद्धानं सांगितलं नाही.

अशा गोष्टी करून सगळं काही आलबेल होईल,अशी खोटी आशा बुद्धानं दाखवली नाही,तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपलीच असल्याचं बुद्धानं सांगितलं.आपली चूक निस्तरणं,आपली चूक कळल्यावर ती पुन्हा न करणं या गोष्टी आपल्याच हातात असतात,असं बुद्ध सांगतो. स्वर्ग,नरक आणि पुनर्जन्म अशा गोष्टींना बुद्धानं पूर्णपणे नाकारलं आहे.


बौद्ध धम्म ईश्वर आणि आत्मा अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही.आपलं कर्म हेच आपल्या जीवनात सुख आणि दुःख आणतं,असं बौद्धधम्मीय मानतात.'क्रोधाला प्रेमानं,वाईटाला चांगुलपणानं,

स्वार्थाला औदार्यानं आणि खोटारड्या व्यक्तीला खरेपणानं जिंकलं जाऊ शकतं,असं बुद्धानं सांगितलं. 

चांगल्या आणि आपल्याला आवडणाऱ्या कामाचा शोध घ्या आणि त्या कामात स्वतःला झोकून द्या आणि मग बघा तुम्हाला निर्भेळ आनंद कसा भरभरून मिळतो,असंही बुद्ध म्हणत असे.


गौतम बुद्धानं जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत त्यावर सखोल भाष्य केलं आहे.मनुष्याचा आहार कसा काय आणि किती असला पाहिजे यावरही त्यानं 'त्रिपिटक'मध्ये सांगितलं आहे. खरं तर,सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेती आणि शेतकरी,या विषयात बुद्धाचा अभ्यास आजही चकित करणारा आहे असं म्हटलं जातं,की राजा शुद्धोधन हा शाक्यवंशीय असल्यानं ही मंडळी व्यापक प्रमाणात शेती करत आणि त्यामुळे राजपुत्र सिद्धार्थचा बराच काळ शेतजमिनीवरची निरीक्षणं करण्यात गेला होता. 'त्रिपिटक' या ग्रंथात चांगली पिकं येण्यासाठी कशा प्रकारची जमीन असायला हवी याविषयी बोलताना त्यानं सुपीक आणि नापीक जमिनीविषयी सांगितलं आहे.तसंच शेतजमिनीतले आठ प्रकारचे दोष सांगितले आहेत.कधी,कुठल्या प्रकारची पिके घ्यायला हवीत,त्यात पाण्याचं प्रमाण कसं असायला हवं इथपासून अनेक बारीकसारीक गोष्टी गौतम बुद्धानं सांगितल्या आहेत.त्यामुळेच बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गौतम बुद्धाला 'भूमिपुत्र' असं म्हटलं आहे. 'भूमिपुत्र', 'तथागत' प्रमाणेच गौतम बुद्धाला 'सुगत' या नावानंही संबोधलं जातं.ज्यानं सत्यापर्यंत, सर्वोत्तम ध्येयापर्यंत सम्यक रीतीनं गमन केलं आहे त्याला 'सुगत' असं म्हटलं जातं! व्यापाराविषयीदेखील बुद्धान 'त्रिपिटक' मध्ये सविस्तर विवेचन केलं आहे.स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट उल्लेखही त्यानं या ग्रंथात केला आहे.


जगविख्यात मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यानं 'टू हॅव ऑर टू बी' या आपल्या ग्रंथात गौतम बुद्धाविषयी सातत्यानं गौरवोद्गार काढले आहेत.दुःखाच्या प्रश्नावर बोलताना एरिक फ्रॉमनं आवर्जून बुद्धाच्या विचारांचा दाखला घेऊन मांडणी केली आहे.


'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला,तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो.'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,कारण स्वत:चा शोध


गौतम बुद्धानं कुठल्याही चमत्कारांकडे माणसाचं लक्ष वेधलं नाही.आकाशात कुठली तरी शक्ती आहे किंवा कुठला तरी गुरू बसलेला आहे किंवा कुठल्या तरी मंत्राचं पठण करा,अशा कुठल्याही गोष्टींचं अवडंबरसुद्धा बुद्धानं सांगितलं नाही.अशा गोष्टी करून सगळं काही आलबेल होईल,अशी खोटी आशा बुद्धानं दाखवली नाही,तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपलीच असल्याचं बुद्धानं सांगितलं. आपली चूक निस्तरणं,आपली चूक कळल्यावर ती पुन्हा न करणं या गोष्टी आपल्याच हातात असतात.

असं बुद्ध सांगतो.


स्वर्ग,नरक आणि पुनर्जन्म अशा गोष्टींना बुद्धानं पूर्णपणे नाकारलं आहे.बौद्ध धम्म ईश्वर आणि आत्मा अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही. आपलं कर्म हेच आपल्या जीवनात सुख आणि दुःख आणतं, असं बौद्धधम्मीय मानतात. 'क्रोधाला प्रेमानं, वाईटाला चांगुलपणानं, स्वार्थाला औदार्यानं आणि खोटारड्या व्यक्तीला खरेपणानं जिंकलं जाऊ शकतं, असं बुद्धानं सांगितलं. चांगल्या आणि आपल्याला आवडणाऱ्या कामाचा शोध घ्या आणि त्या कामात स्वतःला झोकून द्या आणि मग बघा तुम्हाला निर्भेळ आनंद कसा भरभरून मिळतो, असंही बुद्ध म्हणत असे.


गौतम बुद्धानं जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत त्यावर सखोल भाष्य केलं आहे. मनुष्याचा आहार कसा काय आणि किती असला पाहिजे यावरही त्यानं 'त्रिपिटक'मध्ये सांगितलं आहे. खरं तर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेती आणि शेतकरी. या विषयात बुद्धाचा अभ्यास आजही चकित करणारा आहे.असं म्हटलं जातं,की राजा शुद्धोधन हा शाक्यवंशीय असल्यानं ही मंडळी व्यापक प्रमाणात शेती करत आणि त्यामुळे राजपुत्र सिद्धार्थचा बराच काळ शेतजमिनीवरची निरीक्षणं करण्यात गेला होता.'त्रिपिटक' या ग्रंथात चांगली पिकं येण्यासाठी कशा प्रकारची जमीन असायला हवी याविषयी बोलताना त्यानं सुपीक आणि नापीक जमिनीविषयी सांगितलं आहे.तसंच शेतजमिनीतले आठ प्रकारचे दोष सांगितले आहेत.कधी, कुठल्या प्रकारची पिके घ्यायला हवीत,त्यात पाण्याचं प्रमाण कसं असायला हवं इथपासून अनेक बारीकसारीक गोष्टी गौतम बुद्धानं सांगितल्या आहेत.त्यामुळेच बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गौतम बुद्धाला 'भूमिपुत्र' असं म्हटलं आहे. 'भूमिपुत्र', 'तथागत' प्रमाणेच गौतम बुद्धाला 'सुगत' या नावानंही संबोधलं जातं.ज्यानं सत्यापर्यंत, सर्वोत्तम ध्येयापर्यंत सम्यक रीतीनं गमन केलं आहे त्याला 'सुगत' असं म्हटलं जातं! व्यापाराविषयीदेखील बुद्धान 'त्रिपिटक' मध्ये सविस्तर विवेचन केलं आहे.स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट उल्लेखही त्यानं या ग्रंथात केला आहे.


जगविख्यात मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यानं 'टू हॅव ऑर टू बी' या आपल्या ग्रंथात गौतम बुद्धाविषयी सातत्यानं गौरवोद्गार काढले. आहेत. दुःखाच्या प्रश्नावर बोलताना एरिक फ्रॉमनं आवर्जून बुद्धाच्या विचारांचा दाखला घेऊन मांडणी केली आहे. 'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला, तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो. 'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,कारण स्वत:चा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे असं समजा,'असं बुद्धानं म्हटलंय. 


आपल्या मतांच्या बाबतीत दुराग्रही न राहता लवचीक राहण्याचा सल्ला बुद्ध देतो.'अत्तदीप व्हा,'असं गौतम बुद्धानं म्हटलं.याचा अर्थ अत्तदीप म्हणजे हा माणसाला स्वतःचा कणा देणारा विचार असून जीवन जगण्यासाठी स्वतः च्या प्रत्येक कृतीची जबाबदारी माणसानं स्वत च घेतली पाहिजे आणि निर्भयपणे,प्रसन्नपणे जीवनाला सामोरं गेलं पाहिजे.'मी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका,तर कुठल्याही प्रश्नाची चिकित्सा करा,प्रश्न विचारा आणि त्यानंतर डोळसपणे निर्णय घ्या'असंही बुद्ध म्हणतो. आपल्या वाणीची चार दुश्चरितं बुद्धानं सांगितली आहेत.ती म्हणजे खोटं बोलणं,चहाडी करणं,कठोर बोलणं आणि वायफळ बोलणं! याउलट वाणीची चार सुचरितं म्हणजे सत्य बोलणं,चहाडी न करणं,मधुर बोलणं आणि अर्थपूर्ण बोलणं.! विख्यात भारतीय इतिहासकार डी. डी. कोसंबी यांनी बोधिसत्त्व हे बुद्ध आणि त्यांच्या धम्मावर मराठीतून नाटक लिहिलं आणि १९४५ मध्ये ते ग्रंथरूपात प्रसिद्धही केलं.हे नाटक चार अंकी आहे.इतिहासातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या अनेक धर्माचा खोलवर अभ्यास केला आणि त्यांना बौद्ध धम्मातल्या तत्त्वांची व्यापकता भावली. त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी अस्पृश्यतेचा कलंक मिटवत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ज्या वेळी स्त्रिया आणि शूद्र यांना समाजात अतिशय दुय्यम स्थान होतं,अशा वेळी बौद्ध धम्मानं या वर्गाला आपलंसं केलं,त्यांच्यात समतेचं मूल्य पेरलं.आज जगभरात ५३. कोटी इतकी बौद्धधम्मीय लोकांची लोकसंख्या आहे. एकूण लोकसंख्येच्या ७% लोक बौद्धधम्मीय आहेत.बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सम्राट अशोकाचं प्रचंड मोठं योगदान आहे.भारत,चीन, जपान,इंडोनेशिया,कंबोडिया असा हा जगभर पसरलेला एक मोठा आणि महत्त्वाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा धम्म आहे.म्हणूनच बौद्ध धम्माचे संस्थापक गौतम बुद्ध आणि 'त्रिपिटक' या ग्रंथाला मार्गदर्शक मानून बौद्ध धम्माचे अनुयायी आज वाटचाल करतात!


एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो. एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन संपूर्ण जगाला बदलू शकतं.


गौतम बुद्ध


समाप्त..