'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे (म्हणजे,जगात असा कोणताही विषय नसेल, ज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही),असा समज सर्वत्र आहे.कारण,भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्र,
व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे.अनेक धर्मांतल्या तत्त्वज्ञांनी,विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी
भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे.महात्मा गांधींपासून अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेनं प्रभावित करून सोडलं आहे.
"जेव्हा जेव्हा मनात शंकांचं काहूर माजतं आणि समोर फक्त नैराश्य दिसतं;दूर क्षितिजापर्यंत आशेचा एकही किरण दिसत नाही,अशा वेळी भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाचा आधार मला मिळतो आणि त्या परिस्थितीतही माझ्या चेहऱ्यावर हासू फुलतं.भगवद्गीतेचं ध्यान केल्यानं आयुष्यात रोज नवा आनंद आणि नवा अर्थ प्राप्त होतो,"
असं म्हटलंय महात्मा गांधी यांनी!फक्त हिंदूंचाच नव्हे तर ओडिसी, इलियाडसारख्या ग्रीक महाकाव्याइतकाच महत्त्वाच्या आणि मानवी इतिहासातल्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक प्राचीन ग्रंथ म्हणून भगवद्गीता ओळखली जाते.म्हणूनच न्यायालयात भारतामधल्या भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायला लावलं जातं आणि मगच आरोपी असेल,साक्षीदार असेल किंवा फिर्यादी असेल ते आपलं म्हणणं मांडतात.या पवित्र ग्रंथावर हात ठेवल्यावर तो सत्यच कथन करेल,असा एक विश्वास बाळगला जातो.'गीतोपनिषद' किंवा 'योगोपनिषद' या नावांनी म्हणजेच वेदांच्या शेवटच्या रचनेतला भगवद्गीता एक ग्रंथ मानला जातो.भगवद्गीतेला उपनिषदाचा दर्जा दिला गेला आहे. तत्त्वज्ञानावर आधारलेला हा ग्रंथ आहे.गीता म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरानं म्हणजेच श्रीकृष्णानं (श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूचं रूप असं मानलं जातं.) युद्धाच्या वेळी अर्जुनाला आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगांत कसं वागावं याबद्दल सांगितलं आहे.मूळ संस्कृत 'भाषेमध्ये असलेल्या भगवद्गीतेमध्ये एकूण १८ अध्याय असून ७०० श्लोक आहेत.भगवद्गीतेची निर्मिती ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतकं झाली असावी असं मानण्यात येतं.मात्र याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही.तसंच भगवद्गीता ही महाभारतात असल्यानं ती व्यास ऋषींनी लिहिली असावी असं मानण्यात येतं.काही अभ्यासकांच्या मते भगवद्गीता ही मूळ महाभारतात नव्हतीच,तर ती महाभारतात नंतर समाविष्ट करण्यात आली असावी.अशी अनेक मतमतांतरं असली तरी भारतामध्ये पूर्वीपासून अनेक विषयांवरचं ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असल्यानं भगवद्गीतेची प्राचीनता कोणीही नाकारत नाही.भगवद्गीतेमधलं तत्त्वज्ञान हे कालातीत असल्याचंही मानण्यात येतं.याचं कारण कुठल्याही काळात यातलं तत्त्वज्ञान मानवी जीवनाला लागू पडतं.असं म्हणतात,सुमारे ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने आपला शिष्य अर्जुन हा युद्धभूमीवर संभ्रमावस्थेत असताना त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजे भगवद्गीता आहे.अर्थात है समजून घेण्यासाठी आधी आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल.कुरुक्षेत्रात जन्म झालेले भरत वंशातले धृतराष्ट्र आणि पांडू है दोन भाऊ होते.धृतराष्ट्र हा जन्मापासूनच अंध असल्यानं तो मोठा असूनही राज्यपद हे लहान असलेल्या पांडूला मिळालं होतं.पांडूला पाच मुलं,तर धृतराष्ट्राला १०० मुलं होती.पांडूची मुलं पांडव म्हणून,तर धृतराष्ट्राची मुलं कौरव म्हणून ओळखली जात होती.तरुण वयातच पांडूचा मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर,भीम,अर्जुन,नकुल आणि सहदेव या पांडूच्या पाच मुलांचं संगोपन काही काळ राजपदावर बसलेल्या धृतराष्ट्राने केलं.कौरव आणि पांडव यांना गुरू द्रोणाचार्य यांनी क्षत्रिय विद्येत प्रवीण केलं.आपण वयानं ज्येष्ठ असल्यामुळे आता आपल्याच मुलांना राजपदावर बसण्याचा अधिकार असला पाहिजे असं धृतराष्ट्राला वाटत होतं.त्यातच धृतराष्ट्राचा मोठा मुलगा.दुर्योधन हा पांडवांचा द्वेष करत असे.त्यानं धृतराष्ट्राच्या मदतीने पांडवांना ठार मारून राज्य बळकावण्याचं ठरवलं.या कामात त्याला त्याचा मामा शकुनी याची नेहमीच साथ मिळत असे.मात्र पांडवांना त्यांचा काका विदुर आणि त्यांचा मामेभाऊ श्रीकृष्ण यांनी वाचवलं. विदुर आणि श्रीकृष्ण पांडवांचं वेळोवेळी रक्षण करत असले,तरी कौरव कट-कपट करण्यात कमी नव्हते.त्यांनी पांडवांना एकदा द्यूत हा खेळ खेळण्याचं आव्हान दिलं.या खेळात पांडव एक एक गोष्ट हरत गेले.अखेर त्यांच्याजवळ लावण्यासाठी काहीही शिल्लक राहिलं नाही.अशा वेळी त्यांनी आपली पत्नी द्रौपदी हिला खेळात उभं केलं.या वेळी श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं;पण पांडव या खेळात आपलं राज्य गमावून बसले आणि त्यांना १३ वर्ष वनवास भोगण्याची शिक्षा मिळाली.१३ वर्षांच्या वनवासानंतर परत आल्यावर पांडवांनी दुर्योधनाकडे आपलं राज्य परत मागितलं, तेव्हा दुर्योधनानं सपशेल नकार दिला.इतकंच नाही तर सुईच्या टोकावर मावेल इतकी भूमीसुद्धा मी देणार नाही,असं उर्मटपणे उत्तर त्यानं पांडवांना दिलं.खरं तर आत्तापर्यंत वेळोवेळी पांडवांनी नेहमीच समंजसपणाची भूमिका घेतली होती; पण क्षत्रिय असल्यानं राज्य करणं हा आपला धर्म असून आता आपण युद्ध करायलाच हवं हे त्यांच्या लक्षात आलं.
युद्धाचा निर्णय होण्याआधी श्रीकृष्णानं मध्यस्थाची भूमिका बजावत दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला;पण दुर्योधनानं काहीही ऐकायला नकार दिला आणि शेवटी युद्ध होणार हे नक्की झालं.या युद्धात श्रीकृष्ण हा पांडवांच्या बाजूनं उभा राहिला. त्यानंच अर्जुनाच्या रथाचं सारथ्यही केलं.या युद्धामध्ये अर्जुनाची मन:स्थिती खूपच द्विधा झालेली होती.आपण आपल्याच भावांशी, स्नेह्यांशी लढणार या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं.युद्धभूमीवर धारातीर्थी पडलेले आपल्याच माणसांचे मृतदेह पाहण्यापेक्षा आपण युद्धात माघार घेतलेली बरी,असे विचार त्याच्या मनात डोकावायला लागले.अशा वेळी अर्जुनाच्या मनात आलेले प्रश्न आणि त्यांना श्रीकृष्णाने दिलेली उत्तर आणि त्याला करून दिलेली कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवद्गीता आहे.कुठल्या परिस्थितीत कसं वागायला हवं याचं मार्गदर्शन श्रीकृष्ण अर्जुनाला करतो.श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या संवादात आयुष्याचं तत्त्वज्ञान आहे. ज्ञान आहे आणि माहिती आहे. तसंच वेगवेगळ्या प्रसंगांतली उदाहरणं आहेत आणि अनेकविध उपमाही आहेत.मनुष्याला योग आणि वेदान्त याविषयीचं मार्गदर्शन यात केलं आहे. तसंच अशा प्रकारे वागल्यास माणसाचं आयुष्य सुखाने व्यतीत करता येऊ शकतं हेही या ग्रंथात सांगितलं आहे.'भगवद्गीता' या ग्रंथामुळे माणसाला ज्ञान मिळतं,समाधान मिळतं आणि अखेर आनंदही मिळतो.
अखेर त्याला आयुष्य सुखकर करून मोक्षाचा मार्ग शोधायला मदत होते,असं मानण्यात आल्यामुळे या ग्रंथाला 'मोक्षशास्त्र' असंही म्हटलं गेलं आहे.भारतीय संस्कृतीत रामायण आणि महाभारत ही दोन पर्व अतिशय महत्त्वाची मानली जातात. त्यातल्या महाभारत या पर्वामध्ये भीष्मपर्वात भगवद्गीतेविषयी सांगण्यात आलं आहे. महाभारतातल्या २५ ते ४२ अध्यायांमध्ये भगवद्गीतेविषयी सांगण्यात आलं आहे.संस्कृत भाषेत असलेला हा मूळ ग्रंथ इतक्या ओघवत्या आणि छंदात्मक भाषेत लिहिला गेला आहे,की वाचताना त्या श्लोकांना आपोआपच एक लय आणि एक नाद प्राप्त झाल्यामुळेच भारतात अनेक ठिकाणी भगवद्गीता गायलीही जाते.भगवद्गीतेतल्या जे अठरा अध्यायाची नावं अर्जुनविषादयोग,सांख्ययोग,
कर्मयोग, ज्ञानसंन्यासयोग,कर्मसंन्यासयोग,
आत्मसंयमयोग,ज्ञानविज्ञानयोग,अक्षरब्रह्मयोग,
राजविद्याराजगुह्ययोग, विभूतियोग,विश्वरूप-दर्शनयोग,भक्तियोग,क्षेत्रक्षेज्ञविभागयोग,गुणत्रयविभागयोग, पुरुषोत्तमयोग,दैवासुर संपविभागयोग, श्रद्धात्रयविभागयोग आणि मोक्षसंन्यासयोग अशी आहेत.भगवद्गीतेतल्या १८ अध्यायांना ज्याप्रमाणे १८ नावं आहेत,त्याचप्रमाणे गीतेलाही १८ नावांनी संबोधलं जातं.गीता,गंगा,गायत्री,सीता,सत्या,
सरस्वती,ब्रह्मविद्या,ब्रह्मवल्ली,त्रिसंध्या,मुक्तगेहिनी,अर्धमात्रा,चिदानंदा,भवग्नी,भय नाशिनी,वेदत्रयी,परा,
अनंता आणि तत्त्वार्थ ज्ञानमंजिरी अशी ती नावं आहेत.रोज जर या १८ नावांचं स्मरण केलं तर माणसाला पुण्य लाभतं,असाही एक समज हिंदुधर्मात प्रचलित आहे.भगवद्गीतेमध्ये एकूण ६० विषयांवर बोललं गेलंय.परमेश्वराची भक्ती, त्या भक्तीचे प्रकार,परमेश्वराचं स्मरण केल्यानं मिळणारे फायदे,माणसानं कुठल्या प्रकारे कर्म केलं पाहिजे,परमेश्वराला शरण जाणं,स्वतःचं प्रबोधन,शत्रूवर विजय मिळवणं,योगाभ्यास, समाधीभ्यास,परमेश्वराची प्रशंसा,संसार,नरक कसा टाळावा,आहार कसा असावा,साधना कशी करावी,
लोकसंग्रह कसा करावा किंवा असावा, मोहाचा त्याग कसा करावा,ज्ञानप्राप्ती कशी करावी,स्वधर्मपालन कसं करावं,स्थितप्रज्ञता अंगी कशी बाणवावी अशा प्रकारचे विषय यात मोडतात.भगवद्गीतेच्या १८ अध्यायांपैकी पहिल्या अध्यायामध्ये काय आहे? कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन आपल्या रथासह दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा असून त्याला त्या युद्धाचे भयंकर परिणाम डोळ्यासमोर दिसत होते आणि अशा वेळी आपण आपल्याच माणसांना मारून युद्ध जिंकून काय मिळवणार आहोत,असा प्रश्न पडला आणि मनोधैर्य खचल्यानं तो युद्ध करायला नकार देतो.दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाची कानउघाडणी करतो.
अनेक तज्ज्ञांच्या मते दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेचा खरा सार आहे.
वासांसि जीर्णानि यथा विहाय ।
नवानि गृह् णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥
यात युद्धानं मरण पावलेल्यांविषयी अर्जुन
विचार करताना श्रीकृष्ण त्याला म्हणतो, की मृत्यू म्हणजे दुसरं काही नसून मनुष्य आपली जीर्ण किंवा जुनी वस्त्रं टाकून नवी वस्त्रं धारण करतो,म्हणजेच नवा जन्म घेतो.त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस.तसंच यात महत्त्वाचा श्लोक आहे तो म्हणजे :
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगो €
स्त्वकर्मणि ॥४७॥
मनुष्यानं आपलं काम करत राहिलं पाहिजे.मात्र काम करत असताना त्याचं फळ मिळेल,ही अपेक्षा ठेवून काम करू नये.माणूस आपल्या इच्छा आणि वासना सोडतो,
तेव्हा तो खरा समाधानी होतो.आयुष्य जगताना अकर्म,कर्म आणि विकर्म असे तीन प्रकार असून कर्म म्हणजे मनुष्य करत असलेली कृती,तर फळाची अपेक्षा न करता केलेली कृती म्हणजे अकर्म आणि हिंसक,भयंकर अशी कृती म्हणजे विकर्म, असं श्रीकृष्णानं सांगितलं आहे.या जगात ज्ञानासारखं दुसरं महत्त्वाचं काही नाही.
ज्ञानी पुरुषाची समदृष्टी असते.म्हणजेच तो सगळ्यांकडे
सारख्याच दृष्टीनं बघतो.आपल्या इंद्रियांवर नियंत्रण कसं मिळवावं याविषयी योगाबद्दलची विस्तृत माहितीदेखील भगद्गीतेत सांगितली आहे.अभ्यासापेक्षा ज्ञान गहन असून ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कृती करून मिळणाऱ्या फळाचा त्याग जास्त श्रेष्ठ असून,कर्मफलत्याग यापेक्षाही शांती ही श्रेष्ठ असते,असं भगवद्गीता सांगते.
विशेष म्हणजे यात सजीव सृष्टीच्या निर्मितीबद्दलही श्रीकृष्णानं सांगितलं आहे.रजो तमो-सत्त्वगुणांविषयी सखोल माहिती यात आहे.माणसाच्या वृत्ती त्याला माणूस म्हणून आणि राक्षस म्हणून कशा घडवतात याविषयी गीता बोलते.काम,क्रोध आणि लोभ ही विनाशाकडे जाणारी लक्षणं असून माणसानं या तिन्ही गोष्टींपासून दूर राहायला हवं.भगवद्गीतेमधला १८ वा अध्याय खूप महत्त्वाचा असून त्यात आयुष्य जगताना माणूस दोन मार्ग निवडू शकतो आणि मोक्ष प्राप्त करू शकतो,असं म्हटलं आहे.पहिला मार्ग म्हणजे सांख्य मार्ग याचाच अर्थ संन्यासी होऊन चालण्याचा मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोगाचा,श्रीकृष्ण कर्मयोगाचा मार्ग जास्त चांगला,असं म्हणतो.फक्त कर्म करताना तटस्थ बुद्धी,फळाची इच्छा न धरता मार्गक्रमण, इंद्रियांवरचा निग्रह किंवा नियंत्रण,
परमेश्वर आणि भक्ती,स्वधर्माला जाणणं,अशा अनेक गोष्टींबद्दल बोललं गेलंय.एकूणच मानवी जीवन जगताना ते अर्थपूर्ण,समाधानी आणि समृद्ध होण्याच्या पायऱ्या भगवद्गीता सांगते.खरं तर भगवद्गीता म्हणजे आयुष्य समृद्ध करण्यासाठी चढायची एक एक पायरी आहे. भगवद्गीतेच्या अध्ययनामुळे आत्मपरीक्षण,संयम,
ध्यान,योग, दया यांचं ज्ञान प्राप्त होतं.अनेक प्रसंगांत माणसाचं मन द्विधा होतं आणि मनात कोलाहल माजतो.
अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नाही.अशा वेळी गीतेच्या पठणानं त्याचं मन शांत होतं.भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्य-देखील मांडला आहे.त्यामुळे त्यावर वेळोवेळी टीकाही झाली आहे.माणसाला भगवद्गीता सत्य आणि सदाचार यांचा मार्ग दाखवते.भगवद्गीतेनं सांगितलेल्या मार्गावरून जो चालेल त्याच आयुष्य उजळून निघेल असं मानलं जातं.भगवद्गीतेची शिकवण जो आचरणात आणल त्याचं जीवन सुखकर तर होतंच,पण भगवद्गीतेची सगळ्यात महत्त्वाची शिकवण म्हणजे आपण कुठलीही अपेक्षा न करता आपलं काम आणि कर्तव्य करत पुढे जाणं होय.थोडक्यात,भगवद्गीतेची ही शिकवण माणसाला निःस्वार्थीपणाचे धडे देते. निःस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उन्नतीची पहिली पायरी समजली जाते.कठीण प्रसंगात परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य,संकटांशी दोन हात करण्याचं सामर्थ्य ती देते.तसंच आयुष्याकडे बघण्याची समतोल दृष्टीही भगवद्गीताच देते.आपल्या राग,लोभ,
संताप या भावनांना काबूत ठेवण्याची ताकद मनुष्याला तीच देते.माणसाला विवेकशील बनवण्याचं सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आहे.मनातले नकारात्मक विचार घालवून सकारात्मक विचारांची ज्योत तेवायला तीच मदत करते.
ज्याप्रमाणे मनुष्य आपली जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे मृत्यू म्हणजे मनुष्य आपलं वृद्धावस्थेमुळे जीर्ण झालेलं शरीर त्यागून नवीन शरीर धारण करतो, असं भगवद्गीता सांगते.त्यामुळे माणसानं मृत्यूला घाबरू नये आणि शोक करू नये असे यातून ती सूचित करते आत्मा असून त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही,असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे.तसंच जन्म आणि मृत्यू हे अटळ असून त्यांचं दुःख करू नये,काम क्रोध आणि लोभ या तीन गोष्टी मनुष्याला नरकाकडे नेतात त्यामुळे माणसाने या तिन्हींचा त्याग केला पाहिजे असं भगवद्गीता सांगते.भगवद्गीता फक्त वाचायचाच ग्रंथ नाही,तर तो सांगितला जातो आणि एकलाही जातो आणि मुख्य म्हणजे तो आचरणात आणण्याचे प्रयत्न केले जातात.
अपुर्ण..
जग बदलणारे ग्रंथ