* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: गौतम बुद्ध - त्रिपिटक (इ.स.पू.पहिलं शतक)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/४/२३

गौतम बुद्ध - त्रिपिटक (इ.स.पू.पहिलं शतक)

'एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो.एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन संपूर्ण जगाला बदलू शकतं,'असं म्हटलंय गौतम बुद्धानं ! 


गौतम बुद्धाची विचारधारा अंतर्भूत असलेला 'त्रिपिटक' हा बौद्ध धर्माचा अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय प्राचीन असा ग्रंथ आहे.हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेला असून बुद्धाचं महापरिनिर्वाण होईपर्यंतची सगळी प्रवचनं यात संग्रहित केली गेली आहेत.या ग्रंथाची रचना इ.स.पूर्व ५०० ते इ.स.पूर्व १०० मध्ये केली गेली असून हा ग्रंथ कोणा एका व्यक्तीनं लिहिला नसून या ग्रंथनिर्मितीची कहाणी खूपच रोचक आहे.


'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रीतीनं कसं जगावं याविषयी सांगितलं आहे.दुःख, समुदय,निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्यं बुद्धाने सांगितली आहेत.

'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला,तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो.'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,

कारण स्वतःचा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे,' 

असं बुद्धाने म्हटलंय.

पाली भाषेत धर्म या शब्दाला धम्म,भिक्षू शब्दाला भिक्खू,गौतमाला 'गोतम' आणि ' त्रिपिटक या शब्दाला 'तिपिटक' असं संबोधलं गेलंय आणि त्यामुळेच बौद्ध धर्म न म्हणता 'बौद्धधम्मीय' अशा पाली भाषेतल्या शब्दांचाच प्रयोग करतात.'त्रिपिटक' या ग्रंथानुसार धम्म म्हणजे परस्परसापेक्ष आणि परस्परनिरपेक्ष यांच्यामध्ये योग्य असं संतुलन ठेवून व्यक्ती,कुटुंब आणि समाज यांचं सर्वोत्तम कल्याण साधणारी आणि त्यांना निकोप आनंद देणारी जीवन

शैली म्हणजे तथागतांचा धम्म ! ज्यानं यथार्थ ज्ञान प्राप्त केलं आहे त्याला पाली भाषेत 'तथागत' असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच गौतम बुद्धाला

देखील 'तथागत' या नावानंही संबोधलं जातं.


गौतम बुद्धांचं मूळ नाव सिद्धार्थ.हा सिद्धार्थ होता तरी कोण ?


फार फार पूर्वी भारत देश जंबुद्वीप या नावानं ओळखला जायचा.महासागरांनी वेढलेल्या प्रदेशाला जंबुद्वीप असं म्हणत.जंबुद्वीपात भारत,पाकिस्तान,श्रीलंका,

अफगाणिस्तान,नेपाळ, तिबेट,भूतान,बांगलादेश,ब्रह्मदेश (आजचं म्यानम्यार) हे देश समाविष्ट होते.भारताच्या ईशान्य कोपऱ्यात त्या काळी शाक्य वंशाच्या राजांची सत्ता होती.राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी इ.स.पूर्व ५६३ मध्ये राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी इथे झाला होता.सिद्धार्थचा जन्म होताच सातव्या दिवशीच त्याच्या आईचं निधन झालं आणि राजा शुद्धोधनानं बाळ सिद्धार्थचं संगोपन चांगलं व्हावं म्हणून महामायाची बहीण गौतमी हिच्याशी विवाह केला.वयाच्या १९ व्या वर्षी सिद्धार्थचा विवाह राजकुमारी यशोधरा हिच्याशी झाला.सिद्धार्थ ते गौतम बुद्ध या प्रवासाची गोष्ट सांगताना अनेक दंतकथांचा वापर करण्यात आला आहे.


या दंतकथांमधली एक कथा म्हणजे : लहानपणापासून सिद्धार्थचं जीवन खूप लाडाकोडात गेलं होतं.दुःख म्हणजे काय असतं याची यत्किंचितही कल्पना सिद्धार्थला नव्हती.एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ राज्यातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला असताना त्याला रस्त्यात जराजर्जर अवस्थेतला एक वृद्ध, रोगानं ग्रस्त एक मनुष्य,मृत व्यक्ती आणि एक संन्यासी अशा चार व्यक्ती दिसल्या.त्यांना पाहून सिद्धार्थला खूपच धक्का बसला.

जसा माणसाचा जन्म होतो,तसाच त्याचा मृत्यूही अटळपणे होतोच;या जन्ममरणाचा फेरा कुणालाच चुकलेला नाही,ही गोष्ट आपल्या बरोबर असलेल्या सैनिकांशी बोलताना त्याला कळली. सिद्धार्थला त्याच वेळी यशोधरेला राहुल नावाचा पुत्र झाल्याची बातमी कळली.एकीकडे तो मृत्यूचं दृश्य बघत होता,तर दुसरीकडे जन्माचा आनंद साजरा होत होता.हे सगळं बघून सांसारिक गोष्टींमधली निरर्थकता त्याच्या लक्षात आली.राजपुत्र सिद्धार्थच्या मनात जीवनाबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी वयाच्या २९ व्या वर्षी एके दिवशी तो आपली राजवस्त्रं आणि सगळ्या सुखसुविधा यांचा त्याग करून बाहेर पडला.


बुद्धाच्या जन्माची आणखी एक दंतकथा प्रसिद्ध आहे.जगाला वाचवण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे अशा मुलाचा जन्म झाला आहे,अशी घोषणा करण्यासाठी सगळे देव एकत्र झाले. त्या वेळी महामाया राणीनं एक आठवडाभर चाललेल्या मेजवानीत भाग घेतला होता.

 नंतर ती आपल्या देखण्या वेशात रथात बसलेली असताना तिला झोप लागली.त्या वेळी तिला हिमालयात नेलं गेलं आहे,असं स्वप्न पडलं.तिथे एका सोन्याच्या महालात एका पांढऱ्या हत्तीच्या रूपात तिला भावी बुद्ध स्वप्नात दिसला.त्यानंतर तिथल्या विद्वानांनी आता बुद्धाचा जन्म होईल आणि तोच जगातल्या पापांचं शालन करेल,

अशी भविष्यवाणी केली. त्याप्रमाणे बुद्ध जन्मला,अशी ही दंतकथा सांगितली जाते.


या आणि अशा अनेक दंतकथांवर बौद्ध धर्माचे आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक डॉ.धर्मानंद कोसंबी,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.आ. ह.साळुंखे यांसारख्या अनेक विचारवंतांनी अशा दंतकथांची चिकित्सा करून त्यांचं खंडन केलं आहे.


काही कथांप्रमाणे आपल्या शिक्षणातल्या त्रुटी भरून काढण्यासाठी सिद्धार्थ काही विद्वान ब्राह्मणांकडे गेला.त्यांनी सिद्धार्थला हिंदू धर्मातल्या काही गोष्टी शिकवल्या.त्यातून त्याला त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली,पण त्याचं पूर्ण समाधान झालं नाही.त्यानं आपल्या वैभवशाली आयुष्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याचं ठरवलं.स्वतःला शिक्षा म्हणून अत्यंत साधं आणि काटकसरीनं राहणं आणि कंदमुळे आणि फळ हाच आहार ठेवणं,फरशीवर झोपणं आणि अन्य शारीरिक कष्ट उपसणं यात आनंद मानणं असं सगळं सुरू ठेवलं.या काळात त्याला काही शिष्यही मिळाले,पण अद्याप त्याच्या कल्पना परिपक्व झाल्या नसल्यानं त्यातले काही जण निघून गेले.


एका कथेप्रमाणे सहा वर्षे भटकल्यानंतर सिद्धार्थ

गया शहराजवळच्या एका भल्यामोठ्या वृक्षाखाली (बोधिवृक्ष) काहीही अन्नपाणी घेता चक्क ४९ दिवस आणि ४९ रात्री बसून स्वतः चा शोध घेत राहिला,त्या जंगलात काढलेल्या सात आठवडयांच्या कालावधीत त्याच्यात पूर्ण कायापालट झाला आणि सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाला.


आपल्याला आता काय करायचंय कळल्यानंतर सिद्धार्थ आनंदित झाला.त्यान आता आपले पूर्वीचे अनुयायी गोळा केले.त्यानंतर त्यानं आपलं पहिलं प्रवचन दिलं माणसाला आयुष्यात तीनच पर्याय असतात असं त्यानं सांगितलं.


 पहिला म्हणजे जगातल्या भौतिक सुखाच्या मागे धावणं,सिद्धार्थ आत्तापर्यंत याच स्वार्थी आणि निरर्थक मार्गानंन चालला होता.दुसरा म्हणजे स्वत:तलं चैतन्य नष्ट करणं आणि पूर्वी केलेल्या पापांबद्दल पश्चात्ताप करून स्वत: अपराध्यासारखं वागणं,सिद्धार्थ याही अवस्थेतून गेला होता,पण या अवस्थेतही आत्मक्लेश केल्यानंतरही त्याला आत्मशांती मिळाली नव्हतीच.बुद्धाच्या मते तिसरा पर्याय किंवा तिसरा मार्ग म्हणजे मध्यम मार्ग.या मार्गावरून चालल्यानं सुख आणि शांततामय आयुष्य जगता येणार होतं.


बुद्ध हा मूर्तिपूजेच्या विरुद्ध होता.धार्मिक विधी आणि सण यांच्यावरही त्याचा विश्वास नव्हता. माणूस हाच त्याच्या केंद्रस्थानी होता.आपणच आपलं भविष्य घडवू शकतो.देव नाही.तसंच तो आपल्याच कृत्यानं आणि वागणुकीनं मोक्षापर्यंत जाऊ शकतो,कुठल्याही धार्मिक विधींमुळे नाही, असं तो म्हणे.सिद्धार्थनं केलेली अथक भ्रमंती आणि त्या प्रवासातले अनुभव आणि तपश्चर्या यांनी सिद्धार्थला बिहारमधल्या बुद्धगया या स्थानावर ज्ञानप्राप्ती झाली.राजपुत्र सिद्धार्थचं आता गौतम

बुद्धामध्ये रूपांतर झालं होतं आणि त्यानं जो धम्म स्थापन केला,त्याचं नाव बौद्ध धम्म ! हा बौद्ध धम्म पुढे जगभर पसरला. आपला पहिला उपदेश वाराणसीजवळच्या सारनाथ या ठिकाणी बुद्धानं दिला.या पहिल्या उपदेशपर प्रवचनाला धम्मचक्र प्रवर्तन असं संबोधलं जातं.बौद्ध धम्माचे नीतिनियम,बुद्धानं सांगितलेले विचार एका ग्रंथात समाविष्ट आहेत.आणि या ग्रंथाचं नाव आहे 'त्रिपिटक' किंवा 'तिपिटक' संपूर्ण आयुष्य बुद्ध आपली शिकवण देत राहिला.त्याचं वय ८० पेक्षा जास्त झालं होतं आणि त्याला आपला मृत्यू समोर दिसायला लागला होता.त्याचे शिष्य त्याच्याभोवती जमून रडायला लागले होते. 


'तुमच्यानंतर तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही,'असं ते त्याला म्हणाले,तेव्हा बुद्ध त्यांना म्हणाला, 'माझी जागा कोणी घेण्याची गरजच नाही.माझे विचारच आता जगाला दिशा दाखवतील!'


ज्या वेळी गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, त्या वेळी सुभद्र नावाच्या भिक्खूनं आता आपल्याला बुद्धानं सांगितलेले विचार पाळायची काही आवश्यकता नाही,असं इतरांना म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून इतर बौद्ध भिक्खू खूपच चिंतित झाले.कुठलेही नीतिनियम न पाळता सुभद्रच्या ( जग बदलणारे ग्रंथ,दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन ) म्हणण्याप्रमाणे स्वैरपणे जगायचं हे या इतर भिक्खूंना मान्य नव्हतं.त्यामुळे ५०० भिक्खूंनी एकत्र येऊन बुद्धाचे विचार आणि बुद्धानं केलेला उपदेश हे सगळं काही संग्रहित करायचं ठरवलं.सगळ्यांनी एकत्र येऊन सहा ते सात महिने अहोरात्र काम करून 'पहिली बुद्ध धम्मसंगती' तयार केली.म्हणजेच त्रिपिटक या ग्रंथाची निर्मिती केली.यानंतर १०० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा ७०० बौद्ध भिक्खू एकत्र आले आणि त्यांनी सहा महिने काम करून 'दुसरी धम्मसंगती' तयार केली.या दुसऱ्या धम्मसंगतीत पहिल्या धम्मसंगतीचं मजबूत करण्याचं काम केलं गेलं होतं.थोडक्यात, पहिल्यापेक्षा दुसरी धम्मसंगती जास्त अपडेटेड व्हर्जनमध्ये होती. त्यानंतर २३६ वर्षांनी 'तिसरी धम्मसंगती' तयार करण्यात आली आणि ही तयार करण्यात सम्राट अशोकानं पुढाकार घेतला होता.सम्राट अशोकानं १००० भिक्खूंना एकत्रित करून ही धम्मसंगती तयार केली.हिला तयार करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर श्रीलंकेचा राजा वटगामणी यानं 'चवथी धम्मसंगती' ५०० भिक्खूंना घेऊन सहा महिन्यांच्या कालावधीत तयार केली. यानंतर १८७१ साली बर्मा (आणि आताचं म्यानम्यार) देशाच्या राजान 'पाचवी धम्मसंगती' तयार करण्यात पुढाकार घेतला आणि ही धम्मसंगती मंडाले पर्वतावर तयार झाली.यानंतर 'सहावी धम्मसंगती' पुन्हा बर्मा देशाचे तत्कालीन पंतप्रधान बुनो यानं अपडेट केली.बुनोनं भारत, चीन,जपान,थायलंड अशा जगभरातल्या देशांमधल्या २५०० बौद्ध भिक्खूंना निमंत्रित केलं आणि दोन वर्षांच्या कालावधीत पहिल्या पाच धम्मसंगतीपेक्षाही ही 'सहावी धम्मसंगती' आणखीनच बळकट केली.इतकंच नाही तर बुनोनं 'त्रिपिटक' ग्रंथाची छपाईदेखील केली.

आणि त्यानंतर मात्र ही सहावी धम्मसंगती किंवा 'त्रिपिटक' हा ग्रंथ सर्वत्र वापरला गेला.'त्रिपिटक' या ग्रंथात एकूण १७ ग्रंथांचा समावेश आहे. म्हणजेच बुद्धधम्माच्या 'त्रिपिटक'ची निर्मितीची सुरुवात ५०० भिक्खूंपासून सुरू झाली आणि त्यात पुढे अनेक जण सामील झाले.


… अपूर्ण