१९६१-७०च्या दशकातील ही कहाणी वाचकांना मानवी स्वभावाबद्दलच दुःखद सत्य उघडकीस आणणारी ही कहाणी आहे.आपण 'जे करतो' त्याबद्दल ही कहाणी नसून आपण 'जे करत नाही' त्याची ही कहाणी आहे. दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंना अटक झाली,त्यांना देशातून हाकलून देण्यात आलं,त्यांची हत्या झाली.
त्याबद्दल जर्मन,डच,फ्रेंच,ऑस्ट्रियन आणि युरोपभरातल्या अन्य लोकांनी स्वतःची बाजू मांडताना केलेल्या दाव्याचे प्रतिध्वनी या कहाणीत ऐकू येतात.ते लोक म्हणाले होते की, विअर हाबेन एस निश्ट गेवूस्ट म्हणजे 'आम्हाला याची काही कल्पनाच नव्हती.' तो दिवस होता १३ मार्च,
१९६४ पहाटेचे सव्वातीन वाजले होते.कॅथरिन सुसान जिनोवेजेने तिची लाल फियाट अंधारातून जेमतेम दिसणाऱ्या 'नो पार्किंग' खांबावरून पुढे नेली आणि ऑस्टिन स्ट्रीटवरील सबवे स्थानकाबाहेर थांबवली.सगळे जण तिला 'किटी' म्हणूनच ओळखायचे.ती उत्साहाचा खळाळता झराच होती.अठ्ठावीस वर्षांच्या किटीला नृत्याचं वेड होतं.'मोकळा वेळ कमी आणि मित्रमैत्रिणी जास्त'
असा तिचा प्रकार होता. किटीला न्यू यॉर्क शहर खूप आवडायचं. तिथे तिला अगदी मनासारखं वागता येई.इथे ती स्वतंत्र होती.त्या रात्री बाहेर फारच थंडी होती आणि मैत्रिणीला भेटायला घरी जायची किटीला कोण घाई झाली होती.त्या एकत्र राहायला लागून आजच एक वर्ष झालं होतं.आणि किटीला मेरी अँनला बिलगून झोपण्याची इच्छा होती.गाडीचे दिवे बंद करून,दरवाजे लॉक करून ती त्यांच्या छोट्याशा घराच्या दिशेनं जाऊ लागली.तिचं घर तिथून १०० पावलांपेक्षाही कमी अंतरावर होतं.परंतु हा आपल्या जीवनातील शेवटचा तास आहे हे किटीला माहिती नव्हतं.
"अगं आई गं,त्याने मला भोसकलं,मला मदत करा.मदत करा मला..'पहाटेचे ३.१९ झाले होते.तिच्या किंकाळ्या रात्रीला चिरत गेल्या.त्या एवढ्या तीव्र होत्या की,
शेजारीपाजारी जागे झाले.बऱ्याच घरांमधले दिवेही लागले.खिडक्या उघडल्या गेल्या,रात्रीच्या अंधारात आवाजांची कुजबुज ऐकू येऊ लागली.कुणीतरी सगळ्यांना सांगितलं,'त्या मुलीकडे लक्ष देऊ नका,सोडा तिला" परंतु किटीचा मारेकरी परतला,त्याने दुसऱ्यांदा तिला चाकू भोसकला,कोपऱ्यासी धडपडत ती पुन्हा ओरडली,"मी मरतेय रे,कुणी तरी या रे" पण कुणीही बाहेर आलं नाही,कुणीही मदत करायला साधं बोटही उचललं नाही.त्याऐवजी डझनभर शेजारी एखादा'रिअँलिटी शो'
टीव्हीवर पाहावा तसे आपापल्या खिडक्यातून पाहत राहिले.एका जोडप्यानं तर खिडकीपाशी बसायला खुच्या आणल्या आणि नीट दिसावं म्हणून दिवेही मंद केले.मारेकरी तिसऱ्यांदा आला तेव्हा ती तिच्या इमारतीच्या जिन्याच्या पायथ्याशी पडलेली होती.वरती मेरी अँन गाढ झोपलेली होती.तिला तर यातलं काही कळलंच नव्हतं.किटीच्या मारेकऱ्याने तिला पुन्हा पुन्हा भोसकलं.पोलीस ठाण्यात पहिला फोन गेला तेव्हा पहाटेचे ३.५० झाले होते.फोन करणाऱ्या शेजाऱ्याने 'आता आपण काय करावं' या विचारमंथनात बराच काळ घालवला होता.दोन मिनिटांत पोलीस अधिकारी तिथे पोहोचले; परंतु तोवर खूप उशीर झाला होता.त्या फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितलं,"मला या भानगडीत पडायचं नव्हतं."
'मला या भानगडीत पडायचं नव्हतं,हे
ते पाच शब्द सगळ्या जगभरात घुमले.
सुरुवातीला किटीचा 'खून' हा न्यू यॉर्क शहरात त्या वर्षी घडलेल्या ६३६ खुनांपैकी एक होता. एक जीवनज्योत अकाली विझली,एक प्रेम अकाली अस्तंगत हरपलं आणि शहर आपण त्या 'गावचं'च नसल्यासारखं पुढे चालू लागलं;परंतु दोन आठवड्यांनी ती गोष्ट पेपरात छापून आलीच आणि थोड्याच काळात किटीची हत्या इतिहासाच्या पुस्तकांतही समाविष्ट झाली.
ती कहाणी समाविष्ट होण्याचं कारण तो मारेकरी किंवा बळी पडलेली किटी हे नव्हते तर हा खून नुसतं बघत राहणारे बघे होते.
(ह्युमनकाइंड - रूट्गर ब्रेगमन,अनुवाद - सविता दामले,मजुंल पब्लिशिंग हाऊस)
२७ मार्च,१९६४,गुड फ्रायडे या दिवशी प्रसारमाध्यमातील वादळ सुरू झालं.न्यू यॉर्क टाइम्समध्ये पहिल्या पानावर बातमी आली,'खून पाहणाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं नाही.'त्या लेखाची सुरुवातच अशी होती की,'क्यू गार्डन येथे एका मारेकऱ्याने एका तरुणीला थोड्या थोड्या अंतराने तीनदा येऊन भोसकलं;परंतु क्वीन्स परिसरातील प्रतिष्ठित,कायदेपालन करणारे ३८ नागरिक अर्ध्या तासाहूनही अधिक काळ ते दृश्य नुसतेच बघत राहिले.त्या बातमीत पुढे लिहिलं होतं,'एका गुप्तहेराच्या म्हणण्यानुसार केवळ एक फोन त्यांनी केला असता तर किटी आज जिवंत असती.ग्रेट ब्रिटन ते रशिया आणि जपान ते इराण - सर्वत्र किटी बातमीचा विषय बनली.'सोव्हिएत वृत्तपत्र 'इझवेस्तियाने लिहिलं की,'भांडवलवादाच्या जंगलनीतीचा हा पुरावाच आहे.ब्रुकलिनमधील एका धर्मोपदेशकानं म्हटलं की,'येशूला सुळावर देणाऱ्या समाजाइतकाच अमेरिकन समाजही विकृत बनला आहे.तर एका सदरलेखकाने आपल्या सदरातून देशबांधवांचा धिक्कार करत लिहिल की,ते दुसऱ्याच्या भावनांची कदर न करणारे,भ्याड आणि अनीतिमान लोक आहेत.किटी राहत होती त्या क्यू गार्डन परिसरात पत्रकार,छायाचित्रकार आणि टीव्हीच्या ताफ्याने एकच गर्दी केली.हा परिसर खूप चांगला, व्यवस्थित,
प्रतिष्ठित शेजाऱ्यापाजाऱ्यांचा आहे, यावर त्यांचा विश्वासही बसत नव्हता.कारण,तसं जर होतं तर या परिसरातले रहिवासी एवढी अंगावर काटा आणणारी बेपर्वा वृत्ती कशी काय दाखवू शकले होते?कुणीतरी दावा केला की, टेलिव्हिजनने सगळ्यांच्या संवेदना बधिर करून टाकल्या,तर दुसरा म्हणाला की,'नाही,या स्त्रीवादाने पुरुषांचं रूपांतर नामर्दात करून टाकलं आहे'.आणखी काहींना वाटलं की,'मोठ्या शहरात कुणीच कुणाला ओळखत नसल्याचा हा परिणाम आहे'.होलोकॉस्ट झाल्यावर जर्मन लोक बोलले होते,त्याची आठवणच हा प्रसंग करून देत होता का? कारण त्यांनीही आपल्याला काहीही माहिती नसल्याचा दावा केला होता.आम्हाला कल्पनाच नव्हती काही असं म्हणाले होते ते.न्यू यॉर्क टाइम्सचे महानगरीय संपादक एब रोझेन्थाल यांनी केलेलं विश्लेषण खूप लोकांना पटलं.एब हा त्या काळातला आघाडीचा पत्रकार होता.त्याने लिहिलं,'ऑस्टिन स्ट्रीटवरील इमारतींमध्ये आणि घरांमध्ये जे काही घडलं त्यातून मानवी परिस्थितीचं एक भयानक वास्तवच नजरेसमोर आलं.'
जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.
थांबा अजून गोष्ट पुढे आहे.ती पुढील लेखामध्ये..