डिक्शनरीप्रमाणे भाषेची व्याख्या करायची झाल्यास,
एकमेकांशी संवाद साधताना आपण जे साधन वापरतो ते म्हणजे भाषा.या दृष्टिकोनातून विचार केला तर पृथ्वीच्या सजीव सृष्टीत फक्त मानव जातीतच भाषेचा वापर होतो असे म्हणावे लागेल,कारण या संकल्पनेची व्याप्ती मानवकेंद्रित आहे.पण जंगलातून झाडांचं एकमेकांशी संभाषण चालत असेल का,हे जाणून घेणं रोचक ठरणार नाही का?पण ते एकमेकांशी संवाद तरी कसा करत असतील? झाडं काही आवाज काढत नाहीत,वाऱ्याने
एकमेकांवर घासून फांद्यांची करकर आणि पानांची सळसळ ऐकू येते,मात्र त्यात झाडाला काही श्रेय नाही.असं लक्षात आलंय की झाडं एका निराळ्याच पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतात.त्यासाठी ते गंधाचा वापर करतात.गंधाच्या वापरातून संभाषण' हे कसं शक्य आहे? अहो,ही गोष्ट काही आपल्याला अगदीच अनोळखी नाही.नाहीतर आपण अत्तर आणि सुगंधाचा वापर कशाला केला असता?आणि अत्तर वापरलं नाही तरीही आपला गंध कळत नकळत दुसऱ्यांना काहीतरी सांगून जात असतोच की! काही लोकांना वास येतच नाही.तरीही आपण दुसऱ्याच्या गंधाकडे आपोआप आकर्षित होत असतो.आपल्या घामातील'फेरोमोन्स' या रसायनामुळे प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट गंध असतो आणि हे 'फेरोमोन्स'च आपल्या जोडीदाराच्या निवडीत आपल्याला निर्णायक मदत करतात.थोडक्यात,
आपल्या वंशवाढीसाठी कुणाला निवडावे,हे ठरवण्यात 'फेरोमोन्स'ची भूमिका महत्त्वाची आहे.
म्हणजे गंधाची गुप्त भाषा मानवालाही कळते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.चार दशकांपूर्वी आफ्रिकन सव्हानामध्ये शास्त्रज्ञांना एक शोध लागला.काही जिराफ अम्ब्रेला थॉर्न अकेशिया (बाभूळ) झाडांची पालवी खात होते,जे साहाजिकच त्या झाडांना पसंत नव्हतं.काही क्षणातच त्या झाडांनी आपल्या पानांमध्ये विषारी द्रव्य सोडायला सुरुवात केली.आपण इथे नकोसे आहोत असा संदेश त्या जिराफांना मिळाला आणि ते निघून गेले.पण ते शेजारच्या झाडाकडे वळले का? नाही! सुमारे शंभर यार्ड दूर जाऊन त्यांनी परत आपली खादाडी सुरू केली.याचं कारण फारच आश्चर्यकारक आहे.ज्या झाडांवर जिराफांचा फराळ चालू होता त्या झाडांनी हवेत इथिलिन नावाचा एक गॅस सोडला.यामुळे आजूबाजूच्या झाडांना काहीतरी संकट असल्याचा संदेश मिळाला.मग तेही आपल्या पानातून विषारी रसायन सोडायला लागले.जिराफही हुशार होते ते सव्हानाच्या अशा भागात गेले जिथे संदेश पोहोचला नसेल किंवा वाऱ्याच्या उलट्या दिशेला चालू लागले.इतरांना खबर पोचवणारा वायू वाऱ्याबरोबर वाहत जातो आणि उलट्या दिशेच्या झाडांना जिराफ येत असल्याची सूचना मिळालेली नसते.फक्त आफ्रिकेतच नव्हे तर आपल्या भागातील जंगलातही अशा प्रकारचा संवाद चालू असतो. आपल्या पालवीची चराई होत असताना झाडाला ज्या वेदना होतात त्याची नोंद बीच,स्प्रूस आणि ओक प्रजातीची झाडंही ठेवतात.जेव्हा एखादा सुरवंट पान खायला सुरुवात करतो तेव्हा जखमेच्या भोवतालच्या ऊतीमध्ये बदल होतो. त्या ऊती काही विद्युत संदेश सोडतात.जखम झालेल्या मानवी ऊतीमध्येही हेच दिसतं.आपल्या मेंदूला असा संदेश काही मिली-
सेकंदात पोहोचतो,पण वनस्पतीत त्याचा प्रवास मिनिटाला एक तृतीयांश इंच इतका संथ असतो.
त्यामुळे संरक्षण रसायनांचे काम सुरू होईपर्यंत काही तास जातात.वनस्पतींचे जीवनचक्र संकटसमयीसुद्धा असेच संथ गतीने चालते.पण याचा अर्थ असा नव्हे की झाडांचे आपल्या अवयवात काय चालू आहे.
यावर नियंत्रण नाहीं.मुळांवर काही संकट बेतलं तर पूर्ण झाडाला ते कळतं आणि पानातून गंधित सुरक्षा द्रव्यं सोडली जातात.या द्रव्यांचा साठा केला जात नाही,ती त्याक्षणी लाईफ आणि त्या कामासाठी बनवली जातात.झाडात अशी वेगवेगळी द्रव्यं बनवण्याची क्षमता असते त्यामुळे काही क्षण तरी त्यांना स्वतःवरच्या हल्ल्यापासून रक्षण करता येतं.झाडांना आपले मित्र कीटक आणि शत्रू कीटकांची अचूक ओळख असते.प्रत्येक कीटकाची लाळ वेगळी असते,त्यावरून झाडाला कीटक ओळखता येतो.झाडांकडून कीटकांना ओळखण्याची प्रक्रिया इतकी अचूक असते की झाड त्यानंतर अशी 'फेरोमोन्स' हवेत सोडतात जी त्या विशिष्ट कीटकांना खाणाऱ्या विशिष्ट भक्षकांनाच आकर्षित करतात.ते उपकारक भक्षक मग या त्रासदायक कीटकांना खाऊन टाकतात आणि झाडांची मदत करतात. उदाहरणार्थ,एल्म आणि पाईनच्या झाडांकडून एका परोपजीवी माशीला आमंत्रण दिलं जातं. ती माशी झाडावर येऊन पान खाणाऱ्या सुरवंटामध्ये आपली अंडी घालते.माशीची पिल्लं मोठी झाली की सुरवंटाला आतून खायला ते सुरुवात करतात मरण पावण्याची ही नक्कीच आल्हाददायी पद्धत नाही! पण याचा परिणाम म्हणजे त्या कीटकांपासून झाडाची सुरक्षा होते आणि वाढ होत राहते.झाडांना कीटकांची लाळ ओळखता येते म्हणजे त्यांच्यात अजून एक क्षमता आहे,ती म्हणजे चवीची पारख.गंधाची एक मर्यादा म्हणजे वाऱ्याने तो लगेच उडून जातो आणि फार फार तर शंभर एक यार्डाच्या परिसरातच दरवळतो.पण वास झपाट्याने पसरतो त्यामुळे या मार्गाने संकटाचा इशारा आपल्या इतर भागांना तत्काळ पोचवता येतो.एखाद्या कीटकाचा इशारा देण्यासाठी झाडाला विशिष्ट सूचना देण्याची गरज नसते. झाडांनी सोडलेला मूलभूत रासायनिक इशारा प्राणी जगताला ओळखू येतोच आणि त्यांना कळतं की झाडावर हल्ला झाला आहे.भुकेल्या कीटक- भक्षकांना खाद्यापासून दूर राहणे अशक्य असते.मग त्यांची मेजवानीच झडते.झाडं स्वत:ची सुरक्षा स्वत: ही करू शकतात. उदाहरणार्थ,ओक प्रजातीच्या झाडांच्या पानांत आणि सालात कडू विषारी टॅनिन द्रव्य असतं.हे खाऊन काही कीटक मरतात तर काहींना त्याची कडू चव सहन होत नाही.
विलो वृक्षात अशाच प्रकारचं सालिसिलिक अँसिडचं उत्पादन होतं. आपण या अँसिडचा वापर अँस्प्रिन औषधात करतो त्यामुळे विलो झाडाच्या सालापासून बनवलेला चहा आपल्याला डोकेदुखीसाठी आणि तापावर उपयुक्त असतो. पण अशा प्रकारची सुरक्षाप्रणाली राबवण्यात झाडाला खूप वेळ लागतो.त्यामुळे स्वसुरक्षेसाठी झाडांना रासायनिक द्रव्यं आणि गंध यांचा दुहेरी वापर करावा लागतो.
संकटसमयी झाड फक्त गंधाचा वापर करून गप्प बसत नाही,कारण जिकडे वारं पोहोचणार नाही तिथले आपले काही बांधव त्यापासून वंचित राहतील.बॅनकुवर येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या सुसन सीमार्ड यांनी असा शोध लावला की एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी झाडं आपल्या मुळाला जखडलेल्या बुरशीच्या जाळ्यातून (फंगल नेटवर्क) रासायनिक संदेश पाठवू शकतात.'आणि आश्चर्य म्हणजे मुळातून फक्त रसायनाद्वारे बातम्या दिल्या जात नाहीत तर त्यासाठी झाडांकडून इलेक्ट्रिक इम्पल्स म्हणजे विद्युत लहरींचा वापरही होतो.यांचा वेग सेकंदाला एक तृतीयांश इंच इतका असतो.आपल्या शरीराच्या मानाने हा वेग खूपच मंद म्हणायला हवा.पण जेलीफिश आणि काही अळ्यांच्या मज्जातंतूंतून धावणाऱ्या संदेशाचा असाच वेग असतो.
एकदा का अशा ताज्या बातम्या प्रसारित झाल्या की लगेच इतर ओक संरक्षणासाठी त्याच्या धमन्यांतून टॅनिन सोडू लागतात.झाडांच्या मुळांचा विस्तार त्यांच्या पानांच्या विस्तारापेक्षा दुप्पट तरी असतो. त्यामुळे आपल्या शेजारच्या झाडाच्या मुळांना त्यांना नक्कीच जोडून घेता येतं.तरीही त्यात काही अपवाद आहेत.
जंगलात काही एकलकोंडे वृक्ष असतात ज्यांना इतरांशी संबंध ठेवायचा नसतो.अशा झाडांचा परिसंस्थेत सहभाग नसल्याने त्यांच्याकडून संकट सूचना अडवल्या जातात का? सुदैवाने याचे उत्तर नाही असं आहे.संदेश पोचवण्याच्या कामात बुरशी मध्यस्थाचं काम करतात. इंटरनेटच्या फायबर ऑप्टिक तारेप्रमाणे बुरशी काम करतात.बुरशीचे सूक्ष्म तंतू जमिनीत सर्वत्र पसरून त्यांचं एक घनदाट जाळं तयार झालेलं असतं.जंगलातून एक चमचा माती घेतली तर काही मैल तंतू त्यात असतात.'हायफी'हे त्यांचं शास्त्रोक्त नाव.' काही शतकाच्या कालावधीत एका बुरशीचं जाळं काही चौरस मैल,म्हणजे संपूर्ण जंगलात पसरलं जातं.या जाळ्यातून झाडांचे संदेश जंगलात पसरू शकतात आणि कीटक,दुष्काळ किंवा इतर संकटांचा इशारा सर्वांना पोचतो.सीमार्डने शोधालेल्या या जाळ्याला 'नेचर' या प्रसिद्ध नियतकालिकाने 'वूड वाईड वेब" असं नाव दिलं आहे,ज्याचा आज विज्ञानात वापर केला जातो.पण या जाळ्यातून किती आणि कोणत्या प्रकारच्या माहितीची देवाण-घेवाण होते,याचा आपला अभ्यास अजून प्राथमिक अवस्थेतच आहे. सीमार्डच्या संशोधनात असंही दिसलं की भिन्न प्रजातीची झाडं एकमेकांचे स्पर्धक असले तरी ते एकमेकांच्या संपर्कात असतात.आणि यांना मदत करणाऱ्या बुरशीचा या सर्वांमध्ये तालमेल बसवणं,समेट घडवणं आणि माहिती व पोषकद्रव्यांचं समान वाटप करणं याकडेच कल असतो.कारण त्यातून त्यांचा स्वतःचा फायदा असतो.एखादं झाड जेव्हा कमकुवत होतं तेव्हा अशा प्रकारे संवाद साधण्याची आणि स्वत:ची सुरक्षा करण्याची त्याची क्षमता कमी होते. कीटक दुर्बल झाडांची निवड करतात त्यामागे हेच कारण असावे.कीटकांना झाडांनी दिलेला संकटाचा इशारा जाणवत असावा.
झाडाच्या पानाचा चावा घेऊन कदाचित कीटक तपासात असतील की झाड संकटाचा संदेश पाठवू शकत आहे का? जर झाड मौन राहिलं तर ते आजारी तरी असेल किंवा बुरशीच्या जाळ्यापासून तुटलेलं तरी असेल.अशा वेळेस कीटकाची मेजवानीच असते.! कमकुवत झाडांप्रमाणेच जंगलातले एकलकोंडे वृक्षसुद्धा संकटापासून सुरक्षित नसतात,कारण त्यांना आजूबाजूला काय चाललं आहे याची कल्पना नसते.एका सहजीवी जंगलात असा संवाद फक्त झाडांमधून चालत नाही तर गवत आणि झुडपं ही अशाप्रकारे आपापसात संवाद करतात.पण एखाद्या शेताला भेट दिली तर तिथे मात्र वनस्पती चूपचाप बसलेली असतात.शेतीत निवडक पैदास पद्धतीमुळे (सिलेक्टिव्ह ब्रीडिंग) वनस्पतींची दुसऱ्यांबरोबर संवाद साधण्याची क्षमता नाहीशी झाली आहे.जमिनीखालून किंवा वरून ते एकमेकांशी बोलू शकत नाहीत,म्हणजे एका प्रकारे ते मूकबधीर असतात आणि त्यामुळे कीटकांची सहज शिकार बनतात.
आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांचा अतिवापर होण्यामागचं हे एक कारण आहे.जर शेतकऱ्यांनी जंगलाकडून धडा घेतला तर कदाचित आपल्या शेतीत ते थोडी जंगली झाडांचा रानवा आणून शेतातल्या पिकांना 'बोलते' करू शकतील.झाडं आणि कीटकांतील संवाद फक्त संरक्षण आणि आजारपणाबद्दल नसतो.आपल्या विकसित प्रगल्भ घ्राणेंद्रियांच्या आधारे आपण याचा अनुभव घेतच असतो.झाडांच्या आसपास उल्हसित करणारा सुगंध दरवळत असतो,तेव्हा ही झाडं कीटकांना मंद सुगंधी आमंत्रण देत असतात,त्याबद्दल मी बोलतो आहे.फुलोरे तुमच्या-आमच्यासाठी किंवा उगीचच सुगंध सोडत नाहीत.फळणारी झाडं,विलोज आणि चेस्टनट हे सुगंधाचा वापर करून परिसरात हिंडणाऱ्या मधमाशांना आकर्षित करतात. आपल्या फुलावर बसून दुसरीकडून आणलेल्या परागाची धूळ उडवल्याबद्दल त्या मधमाशांना फुलातला मकरंद इनामात मिळतो.फुलाचे विशिष्ट रंगरूप म्हणजे कीटकांना एक संदेश असतो.त्यांच्या दृष्टीत जंगलाच्या हिरव्या आच्छादनात रंगीत फुलं म्हणजे चवदार फराळाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे फलकच असतात.म्हणजे गंध,दृष्टी आणि विद्युत प्रवाहाचा वापर करून झाडं बोलतात.(मुळांच्या टोकाशी चेतापेशीच्या माध्यमातून विद्युत प्रवाहाच्या रूपात).पण आवाज आणि श्रवणाचं काय? जरा पुन्हा त्याकडे वळू.प्रकरणाच्या सुरुवातीला मी म्हटलं की झाडं बधीर असतात पण नवीन संशोधनाने यावरही शंका घेतली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मोनिका गॅगलिओनो यांनी ब्रिस्टल आणि फ्लोरेंसच्या संशोधकांबरोबर अक्षरशः जमिनीला कान लावून झाडांचे आवाज ऐकण्याचा प्रयोग केला."प्रयोगशाळेमध्ये झाडांचा अभ्यास करणं शक्य नसतं,त्यामुळे धान्याच्या बियांच्या छोट्या रोपांवर त्यांनी हा प्रयोग केला.प्रयोग सुरू झाल्यावर मुळांच्या तडतडण्याचा आवाज त्यांच्या उपकरणात नोंदला गेला.या रोपांची मुळं २२० हर्ट्स फ्रिक्वेन्सीचा आवाज करत होती. पण मुळांच्या तडतडण्याचं काय कौतुक? साधं लाकूड जरी स्टोव्हमध्ये जाळलं तरी हा आवाज येतोच की!पण या तडतडण्याच्या आवाजामुळे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की,या आवाजाचा परिणाम वेगळ्या रोपांवर होतोय.त्यांनी नीट निरीक्षण करायला सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात आलं की,प्रयोगशाळेतील ज्या धान्याच्या बिया प्रत्यक्ष प्रयोगात नव्हत्या त्यांची मुळं ही या आवाजाला प्रतिसाद देत हाती.ज्या दिशेला २२० हर्ट्सचा आवाज येत होता त्या दिशेला त्यांची टोकं वळत होती.प्रयोगशाळेतल्या गवताला या फ्रिक्वेन्सीच्या ध्वनिलहरी ऐकू येत होत्या तर! झाडं ध्वनिलहरींचा वापर करून बोलतात यावर अधिक जाणून घ्यायची माझी उत्सुकता आता वाढली,कारण हे माणसांपेक्षा फार काही वेगळं नव्हतं.आपणही आवाजाच्या माध्यमातूनच एकमेकांशी बोलतो.झाडांच्या जीवनाचं गुपित उलगडण्याची ही गुरुकिल्लीच तर नसेल ना? आपल्याला बीच,ओक आणि पाईन वृक्षांची खुशाली कळाली तर काय मजा येईल!दुर्दैवाने आपलं यातलं संशोधन फारच कमी आहे.तिथे पोहोचायला आपल्याला अजून खूप काळ लागेल.पण इतकं लक्षात ठेवा,की पुढल्या वेळेस जंगलातून चालताना काही तडतड किंवा चरचर ऐकू आली तर ती फक्त वाऱ्याचीच असेल असं नाही बरं!
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
१५ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग