आयुर्वेद..
५,००० वर्षांपूर्वी भारतात आयुर्वेदाचा जन्म झाला असं मानलं जातं.आयुर्वेदाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात.त्यातली एक कथा अशी,
की पुराणात भगवान विष्णूचा अवतार मानला जाणारे धन्वंतरी मुनी हे देवांचे वैद्य होते,तर सुश्रुत मुनी हे जेव्हा देव आणि दानव समुद्रमंथन करत होते, तेव्हा हातात अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी पृथ्वीतलावर अवतरले अशी कथा आहे.धन्वंतरी मुनींनी आपलं वैद्यकशास्त्राचं ज्ञान सुश्रुत या त्यांच्या शिष्याला दिलं.या दोघांनी मिळून शल्यक्रियेविषयी एक पुस्तक लिहिलं.ते पुस्तक नागार्जुन नावाच्या औषधशास्त्राशी संबंधित माणसाच्या हाती लागलं.त्यानं ते नीट जतन केलं आणि पुढे नेलं.ते जगातल्या पहिल्या काही शल्यविशारदांपैकी एक असले पाहिजेत.आयुर्वेदाची पाळंमुळं रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.हळदीची रोगप्रतिबंधकशक्ती,रोगांचा अटकाव करणारे मिठाचे गुणधर्म या सगळ्या गोष्टींबरोबर एकूणच औषधी वनस्पती वापरून बहुतेक सारे आजार बरे करण्याची कल्पना प्रथम त्यांनीच मांडली.किंबहुना आज सर्रास वापरली जाणारी प्लास्टिक सर्जरी ते त्या काळातच करायचे! फक्त त्यांची पद्धत कालानुरूप अतिशय ओबडधोबड असे,इतकाच काय तो फरक.त्यांच्या सगळ्या शस्त्रक्रिया भुलेविनाच होत असल्या तरी त्या बहुतेक वेळा यशस्वी व्हायच्या हे विशेष! त्यांच्या कौशल्यामुळे विक्रमादित्याच्या दरबारातल्या नवरत्नांमध्ये नंतर त्यांचा समावेश झाला.
आयुर्वेदाबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. ख्रिस्तपूर्व १३०० च्या सुमाराला भारतात रोगाच्या एका भयानक साथीनं थैमान घातलं होतं! त्यात लाखो माणसं दगावली. पुराणकथांमध्ये चरक मुनींनी लिहून ठेवलंय,की 'या भयानक संकटातून काय मार्ग काढायचा यावर विचार करण्यासाठी अनेक ऋषिमुनी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जमले.त्यांनी भारद्वाज मुनींना स्वर्गात देवांचा राजा असलेल्या इंद्राकडे पाठवून वैद्यकीय उपचारां -
विषयीचं ज्ञान पृथ्वीवर आणायला सांगितलं.भारद्वाज मुनींनी त्यानुसार दीर्घायुष्यासाठी काय करायला हवं याविषयी इंद्राशी चर्चा करून मिळवलेली माहिती घेतली आणि पृथ्वीवर परत येऊन आत्रेय मुनींना दिली.त्यातून आत्रेय मुनींनी तक्षशिला प्रांतामध्ये आयुर्वेदाविषयीचं गुरुकुल सुरू केलं.त्यामुळेच आत्रेय मुनींना भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक मानलं जातं.त्यांच्या अग्निवेश,
भेल,जतुकर्ण,पराशर,हरित आणि क्षरपाणी या सहा शिष्यांनी वैद्यकीय विषयांवर अनेक प्रबंध लिहिले.
संस्कृतमधल्या आयुर्वेद या शब्दाचा सोपा अर्थ निरोगी दीर्घायुष्याचं ज्ञान असा लावता येईल.आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे ज्ञान.आयुर्वेदामध्ये माणसाचं आचरण आणि त्याचा आहार,स्वच्छता,व्यायाम आणि दिनक्रम यांच्याविषयी महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत.
सुरुवातीचं आयुर्वेदाचं ज्ञान चरक आणि सुश्रुत या दोघांनीच मिळून बनलेलं होतं. पण नंतर वाग्भटांनी लिहिलेला 'अष्टांग हृदय' नावाचा तिसरा प्रकारही आला.त्यात चरक आणि सुश्रुत यांच्या पद्धतींचा अर्क एकत्र करून थोडक्यात मांडलेला आहे.
सुश्रुतसंहितेमध्ये कुष्ठरोगाविषयी लिहिलेलं आढळतं.यात माणसाच्या संवेदना बोथट होतात, हातापायांची बोटं झडतात,शरीराचा आकार बेढब होतो,हातापायांवर व्रण उमटतात आणि नाक झडून चपटं होत जातं या सगळ्या लक्षणांची वर्णनं आहेत.ग्रीकांनी हा रोग भारतातून आपल्याकडे नेला आणि रोमनांनी मग तो इजिप्तमधून युरोपात पसरवला असं मानलं जातं.तसंच १८१७ साली पार्किन्सननं वर्णन केलेल्या पार्किन्सन्स डिसीज या रोगाशी अतिशय मिळतीजुळती वर्णनं कंपवात या नावानं सुश्रुतसंहितेमध्ये वाचायला मिळतात! सुश्रुतसंहितेमध्ये अनेक प्रकारच्या शल्यक्रियांविषयीही कमालीच्या अचूकतेनं लिहिलेलं आहे.उदाहरणार्थ,मोतीबिंदूवरच्या जवळपास आजच्या युगातल्या शस्त्रक्रियेचं वर्णन सुश्रुतांनी लिहिलेलं होतं.!
सगळ्या रोगांची मुळं वात,पित्त आणि कफ अशा तीन प्रकारच्या प्रकृतींच्या असंतुलनामध्ये असतात असं म्हटलं आहे.तसंच माणसाच्या शरीरात रस,रक्त,मांस (स्नायू), मेद (चरबी), अस्थी (हाड),मज्जा (हाडाच्या आतला चरबीसारखा मऊ पदार्थ),आणि शुक्र (वीर्य) असे सात महत्त्वाचे धातू असतात असं आयुर्वेद मानतं.आयुर्वेदाच्या उपचारपद्धतींमध्ये प्रामुख्यानं रुग्णाला विविध प्रकारची तेलं चोळणं,काढे आणि औषधं देणं,एनिमा देणं,त्याचं शरीरमर्दन करणं आणि शल्यक्रिया करणं यांचा समावेश होतो. पंचकर्मही आयुर्वेदात करतात. त्यात वमन,
विरेचन,नस्य,बस्ती,रक्तमोक्षण अशा पाच प्रकारे औषधोपचार केला जातो.तसंच गोमूत्र आणि गाईचं शेण या गोष्टींमध्ये जंतुनाशक तत्त्वं भरपूर प्रमाणात असल्यानं त्यांचा औषधांमध्ये वापर करावा असं आयुर्वेद मानतं.
इतर गोष्टींबरोबरच आयुर्वेदाचंही वर्णन भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या व्यास ऋषींनी आपल्या 'वेद' या नावानं ओळखल्या गेलेल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं होतं. त्याचे चार मुख्य भाग मानले जातात.ते म्हणजे ऋग्वेद,सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ऋग्वेदामध्ये सगळ्यांच्या अस्तित्वाविषयी लिहिलेलं आहे.तसंच विविध रोग आणि त्यांच्यावरच्या उपचारपद्धती यांचंही वर्णन त्यात आहे.
विश्वाची निर्मिती झाली तेव्हा त्यात पृथ्वी, जल,
अग्नी,वायू आणि आकाश या पंचमहाभूतं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटकांचा समावेश होता असं मानलं जातं. माणूस हा विश्वामधलाच एक भाग असल्यामुळे त्याच्याही शरीरात हे पाच घटक असतातच,असं आयुर्वेद मानतं.
मग या घटकांचं माणसाच्या शरीरात असणारं प्रमाण किती असतं यावरून त्याची प्रकृती ठरते.यातूनच आयुर्वेदात वात,पित्त आणि कफ या दोषांविषयीची चर्चाही आढळते.
साहजिकच माणसाच्या शरीरात जेव्हा पंचमहाभूतांचं प्रमाण बिघडतं तेव्हा या तीन गोष्टींचं प्रमाण आणि संतुलनही बिघडतं असा त्यामागचा सिद्धान्त आहे.
उदाहरणार्थ,जेव्हा माणसाच्या शरीरात उष्णता वाढते तेव्हा पित्तदोष वाढतो,कोरडेपणा वाढला की वातदोष वाढतो आणि ओलेपणा वाढला की कफदोष वाढतो.असं काही झालं की माणूस आजारी पडतो,असं आयुर्वेद मानतं.हे सगळं होण्याचं कारण म्हणजे माणसाच्या सवयी,मन किंवा आजूबाजूचा परिसर यामध्ये बदल होतो.
मन आणि शरीर यांना जडणारे विकार आणि त्यांच्यावर आवश्यक असणारे उपचार यांचंही वर्णन त्यात केलेलं आहे.उदाहरणार्थ,वात प्रकृतीच्या लोकांना मलावरोध,
सांधेदुखी, अस्वस्थपणा हे आजार जडण्याची शक्यता जास्त असते.पित्त प्रकृतीच्या लोकांना जळजळ, रोगसंसर्ग,शरीराच्या आत व्रण पडणं हे विकार जडण्याचं प्रमाण जास्त असतं.कफ प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वजन जास्त असणं,त्यांना मधुमेह होणं आणि हृदयाचे आजार होणं या गोष्टी आढळतात.
दोषांबरोबरच आयुर्वेद माणसाच्या शरीरातल्या धातू आणि मल या आणखी दोन गोष्टींना महत्त्वाचं मानतं.धातू हे माणसाच्या शरीराच्या रचनेशी संबंधित असतात.असे एकूण ७ धातू आणि मल म्हणजे शरीरातल्या अनावश्यक गोष्टी बाहेर टाकून देण्याचं काम करणाऱ्या गोष्टी.असे ३ प्रकारचे मल म्हणजे स्वेद (घाम), पुरिष (विष्ठा),आणि मूत्र (लघवी) असतात.
अथर्ववेदामध्ये अनेक आजारांचं आणि उपचारांचं वर्णन केलेलं आहे.त्यात मुख्यत्वे संधिवात,अपस्मार,कावीळ,
हत्तीरोग आणि हृदयविकार यांच्याविषयी लिहिलेलं आढळतं.सुरुवातीच्या उपचारपद्धती जादू किंवा धार्मिक बाबींवर आधारित असायच्या.यासंबंधी दोन पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आढळतं.एक म्हणजे चरक मुनींचं रोग आणि त्यांच्यावरचे उपचार यांचं वर्णन असणारं चरकसंहिता आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रियांविषयीचं धन्वंतरी मुनींच्या बनारसमध्ये राहणाऱ्या सुश्रुत या शिष्याचं सुश्रुतसंहिता.चरकसंहिता हा एक भन्नाटच प्रकार आहे.अतिशय विस्तारानं सगळ्या आजारांचं आणि त्यावरच्या उपचारांचं वर्णन असलेल्या या ग्रंथात तब्बल १२० प्रकरणं आहेत! त्यांचे सूत्र,निदान,शरीर,इंद्रिय, चिकित्सा,कल्प आणि सिद्धी असे ८ विभाग पाडलेले आहेत.सुश्रुतसंहितेतल्या शल्यक्रियेविषयीची माहिती
देखील ८ विभागांमध्येच लिहिलेली आहे. हे ८ विभाग म्हणजे आयुर्वेदाची खासियत,काया चिकित्सा, बाल चिकित्सा,ग्रह चिकित्सा,शल्य चिकित्सा, शल्यक तंत्र,
अदाग तंत्र,रसायन तंत्र आणि वजीकरण तंत्र ही ती ८ तंत्र आहेत.!
प्रसूतीच्या वेळी काही अडचण आली तर शस्त्रक्रिया (सिझेरियन) करून मुलाला आईच्या पोटातून सुखरूप बाहेर काढलं जावं अशी कल्पना काही काळानं आली.
हिंदू धर्म सुरुवातीपासूनच सोशिकपणा आणि कर्म करत राहणं या गोष्टींवर भर देत आला असताना भारतातून वैद्यकीय क्षेत्रात इतकं योगदान कसं मिळालं असेल असा प्रश्न अनेकांना पडतो.याचं उत्तर क्लिष्ट असलं तरी योगाभ्यास हा त्याचा एक मोठा पैलू मानला पाहिजे.मोहेंजोदडोमध्येसुद्धा योगमुद्रा कोरलेल्या आढळल्या.तसंच बुद्ध धर्मातले मुनी आणि जोगिणी रोग्यांवर उपचार करण्यासाठी इस्पितळ बनवत होते. याचाही इतिहासात उल्लेख आढळतो.दक्षिण भारत आणि सिलोन (आता श्रीलंका) इथंही स्थानिक प्रथांनुसार वैद्यकीय उपचारांमध्ये सतत प्रगती होत गेली.तमिळ लोकांच्या उपचारपद्धती अथर्ववेदापेक्षा वेगळ्या होत्या.
'सिद्ध' नावाच्या प्रसिद्ध तमिळ उपचारपद्धतीची सुरुवात बोगर आणि रामदेवर नावाच्या दोघांनी केली असं मानलं जातं.बोगर चीनमध्ये जाऊन आला होता तर रामदेवनं मक्केला जाऊन अरबांना अल्केमीचं तंत्र शिकवलं होतं.
गौतम बुद्धांच्या असंख्य शिष्यांपैकी कश्यप यांनी लहान मुलांच्या आजारांवर अनेक उपाय सुचवले.त्यांचा भर लसणाच्या औषधी गुणधर्मांचा जास्तीतजास्त प्रमाणात वापर करण्यावर असे.हिप्पोक्रॅट्सच्या शपथेतल्यासारखेच नियम भारतीय डॉक्टर्स पाळायचे.
त्यात भर म्हणजे कुठल्याही विवाहित स्त्रीवर तिचा नवरा हजर असल्याशिवाय उपचार केले जाऊ नयेत असाही एक संकेत होता!
आयुर्वेदात माणूस आजारी पडण्याच्या सहा पातळ्यांचं वर्णन केलं आहे.पहिल्या पायरीत माणसाच्या शरीरात एक किंवा अनेक दोषांची प्रमाणाबाहेर वाढ होते.दुसऱ्या पायरीत हे दोष इतके वाढतात,की त्यांचे दुष्परिणाम जाणवायला लागतात.तिसऱ्या पायरीत हे दोष हाताबाहेर जातात,आणि आता ते दृश्य स्वरूपात माणसाच्या शरीरावर दिसायला लागतात.चौथ्या पायरीत हे दोष माणसाच्या शरीराची दुर्बल किंवा आधी व्याधिग्रस्त झालेली जागा हुडकून ती आपणच बळकावून टाकतात.पाचव्या पायरीत माणूस पूर्णपणे रोगी किंवा आजारी झालेला असतो.सहाव्या आणि शेवटच्या पायरीत माणसाला दोषांवर आधारित ठरावीक प्रकारच्या व्याधी होतात.त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करणारे डॉक्टर्सही त्यांच्या उपचारपद्धतींमध्ये रुग्णाच्या तब्येतीचा इतिहास,त्याच्या सवयी,राहणीमान आणि त्याला कोणते दोष प्रमाणाबाहेर सतावतात हे बघूनच उपचार करतात.
बरेचदा या उपचारांची सुरुवात त्याच्या शरीराच्या शुद्धीकरणानं होते.कारण रोग्याच्या शरीरात साठलेल्या विषारी प्रवृत्तींना (किंवा दोषांना) बाहेर काढलं नाही तर त्या शरीरात आणखी पसरतात,असं आयुर्वेद मानतं. तसंच या प्रवृत्ती शारीरिकच नव्हे तर मानसिकही असू शकतात.उदाहरणार्थ,कधीकधी नैराश्याचे झटके येणं हा एक प्रकारचा रोगच माणसाला भेडसावत असू शकतो.
अशा वेळी त्या माणसाला राग का येतो याकडे बारीक लक्ष ठेवून तो बाहेर पडू देणं आणि तो परत येऊ नये. यासाठी हळूहळू उपाय योजणं ही मात्रा असू शकते.राग येताना आपल्याला काय वाटतं याकडे रुग्णानं लक्ष देणं आणि तसं परत होऊ नये यासाठी विचार करणं अशी ही उपचारपद्धती बरेचदा अतिशय यशस्वी ठरते!छातीत साठून राहिलेला कफ किंवा पोटात सतत अपचन होऊन येणारे गॅसेस अशा शारीरिक दोषांना बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेकदा पंचकर्म केलं जातं.पंचकर्म म्हणजे ओकाऱ्या काढणं,रेचकाचं सेवन करणं,एनिमा घेऊन मलाद्वारे दोष बाहेर टाकणं,नस्यक्रिया करून नाकातून दोष बाहेर टाकणं आणि दूषित रक्ताला वाहू देणं या पाच क्रिया.यामुळे अनेकांना त्यांच्या त्रासातून मुक्तता मिळते अशी आयुर्वेदाची तत्त्वं आहेत.
नंतरच्या काळात मुस्लिमांच्या आक्रमणानं अरबी औषधपद्धतींची भारताला ओळख करून दिली. मग त्यात ग्रीक वैद्यकांची आणि गेलनच्या शोधांची भर पडणार होती.अकराव्या शतकात तुर्कस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या भारतीय भूमीवरच्या आक्रमणाबरोबरच युनानी उपचार पद्धतीही भारत
भूमीवर आली.आजही ही उपचारपद्धती वापरणारे हकीम नावाचे वैद्य आहेतच !
११ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग