'रिपब्लिक' या ग्रंथाच्या पहिल्या भागात प्लेटोनं न्याय आणि आदर्श समाज याबद्दल,तर दुसऱ्या भागात तत्त्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिसऱ्या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा याविषयी लिहिलंय. माणसाचं विश्वबंधुत्व,सुप्रजननशास्त्र(यूजेनिक्स), समाजवाद,साम्यवाद (कम्युनिझम),स्त्री-वाद(फेमिनिझम),
संतती नियमन (बर्थ कंट्रोल), मुक्तप्रेम (फ्री - लव्ह),मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नैतिकतेचे मापदंड,मालमत्तेवर
सार्वजनिक मालकी,स्त्रिया आणि मुलं हे सगळं प्लेटोनं 'रिपब्लिक' मध्ये मांडलं आहे.
ख्रिस्तपूर्व ३८० मध्ये प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञानं 'रिपब्लिक' नावाचा एक ग्रंथ लिहिला.या ग्रंथामध्ये खरं तर प्लेटोचा मित्र आणि त्याचा गुरू असलेला सॉक्रेटिस यानं त्याच्याबरोबर केलेला संवाद होता.
सॉक्रेटिस प्रत्येक गोष्टीबद्दल शंका व्यक्त करायचा आणि प्रश्न उपस्थित करायचा.तरुणांमध्ये यामुळे तो खूपच लोकप्रिय होता.त्या वेळच्या प्रस्थापितांना हे मुळीच आवडणारं नव्हतं.म्हणून सॉक्रेटिस तरुण मुलांना बिघडवतोय,असे त्या वेळच्या उच्चभ्रू लोकांनी सॉक्रेटिसवर आरोप दाखल केले.त्याला अंधारकोठडीत टाकलं आणि इतकंच नाही तर त्याला हेमलॉक नावाचं विषही प्यायला दिलं.
सॉक्रेटिस आणि थ्रेसिमॅक्स नावाच्या त्याच्या विरोधकात जी चर्चा झाली,ती न्याय या विषयाला धरून झाली आणि त्यांच्यातलं संभाषणच प्लेटोनं 'रिपब्लिक' या ग्रंथात मांडलं.
'रिपब्लिक' हा ग्रंथ म्हणजे सॉक्रेटिस आणि प्लेटो या दोन महादिग्गजांना एकाच वेळी भेटण.! प्लेटोच्या आयुष्यातलं आणि जगावर प्रभाव पाडणारं हे एक उत्कृष्ट कार्य समजलं जातं.या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यानं न्याय आणि आदर्श समाजाबद्दल भाष्य केलं,तर दुसऱ्या भागात तत्त्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिसऱ्या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा याविषयी त्यानं लिहिलंय.
'न्याय' ही संकल्पना काय आहे याविषयी विचार करता करता प्लेटोनं आपल्या आयुष्यात ज्या अनेक गोष्टी,
कल्पना किंवा तत्त्वं आहेत त्या सगळ्यांना स्पर्श केला.
यामध्ये माणसाचं विश्वबंधुत्व,सुप्रजननशास्त्र (युजेनिक्स), समाजवाद,साम्यवाद (कम्युनिझम),स्त्री-वाद(फेमिनिझम),
संतती नियमन (बर्थ कंट्रोल), मुक्तप्रेम ( फ्री - लव्ह),मुक्त अभिव्यक्ति-स्वातंत्र्य,नैतिकतेचे एक किंवा दोन मापदंड,
मालमत्तेवर सार्वजनिक मालकी,स्त्रिया आणि मुलं अशा अनेक गोष्टींविषयीच्या तत्त्वांविषयी प्लेटोनं विचार केला आणि ते सगळं त्यानं 'रिपब्लिक' मध्ये मांडलं.जे योग्य आहे तसंच माणसानं वागावं असं त्याला वाटत असे.
अशा तऱ्हेचं न्याय्य जग निर्माण करण्याच्या मागे तो लागला होता आणि त्यातून 'रिपब्लिक' या ग्रंथाचा जन्म झाला.
प्लेटोचं 'रिपब्लिक' म्हणजे एक आदर्श राज्य किंवा युटोपियाच होता.जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या आयुष्याचं ते एका तऱ्हेनं चित्रणच होतं.त्याच्या 'रिपब्लिक'मध्ये मुलाची वाढ कशी होईल,कोणी कोणी काय काय काम करावीत याचं सखोल वर्णन प्लेटोनं केलेलं आहे. त्याच्याप्रमाणे रिपब्लिकमध्ये जन्मलेली सगळी मुलं ही सगळ्या टोळीची एकत्रितपणे म्हणजेच सगळ्यांची असतील.कुठल्याही एका माणसाचं ते मूल नसेल.त्यातली सगळ्यात चांगले पुरुष निवडून,त्यातल्या सगळ्यात चांगल्या स्त्रिया निवडून त्यांचं मीलन झाल्यानंतर जी मुलं होतील ती मुलं सगळ्या टोळीनं वाढवायची,अशी त्याच्यामध्ये एक कल्पना होती.यालाच सुप्रजननशास्त्र किंवा युजेनिक्स म्हणतात. कुणीही स्वतःस्वतंत्र व्यक्तिगत लग्न करणं किंवा व्यक्तिगत कुटुंब थाटणं अशी कल्पनाच 'रिपब्लिक'मध्ये नव्हती.मुलं झाली रे झाली की ती ताबडतोब सरकारनं चालवलेल्या पाळणाघरात हलवली जातील,असंही त्यात लिहिलं होतं.त्यामुळे कुठल्याही आई-वडिलांनी आपल्या मुलांवर हक्क दाखवता कामा नये, असंही त्याचं मत होतं.तसं केल्यामुळे सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण होईल आणि कुणीही एकमेकांवर आपल्या मुलांविषयीचा हक्क लादणार नाही,कारण सगळी मुलं सगळ्यांची असतील अशी त्याची ही थिअरी होती. थोडक्यात,ते एक कम्यून होतं,असं प्लेटोचं म्हणणं होतं.
आई-वडिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'रिपब्लिक' नुसार कुठलाही पुरुष कुठल्याही स्त्रीबरोबर लैंगिक संबंध ठेवू शकत होता. थोडक्यात,आज ज्याला आपण नीतिमत्ता म्हणतो तशा प्रकारची नीतिमत्ता प्लेटोला अभिप्रेत नव्हती.त्यामुळे ज्या वेळी ज्या पुरुषाला ज्या स्त्रीबरोबर जायचं असेल आणि तिची संमती असेल तेव्हा त्यांनी फ्री लव्ह म्हणजे मुक्तपणे प्रेम करावं,असं प्लेटोचं म्हणणं होतं.
कोणाच्याही खासगी आयुष्यात सरकारनं अजिबात डोकावता कामा नये,असं त्यानं लिहिलं होतं.मुलांच्या वाढीबाबत तर प्लेटोच्या कल्पना फारच गंमतीशीर होत्या.
मुलांनी जन्मापासून ते वयाच्या २०व्या वर्षापर्यंत फक्त व्यायाम आणि संगीत यांच्यावरच भर द्यावा आणि याच गोष्टी शिकाव्यात.त्यामुळे समतोल राहतो,असं त्याचं म्हणणं होतं.संगीतामुळे मनाचा समतोल राहतो आणि व्यायामामुळे शरीराचा; आणि त्यामुळे जगामध्ये अराजक किंवा गोंधळ माजणार नाही,असं प्लेटो म्हणत असे.
ज्याला संगीत आवडत नाही त्या माणसावर आपण विश्वाससुद्धा ठेवू नये,असं त्याचं म्हणणं होतं. संगीतामधली हार्मनी आणि समतोलपणा आपल्या जगाला एकसंध ठेवायला मदत करतं आणि म्हणून संगीत महत्त्वाचं आहे,असं त्याचं म्हणणं होतं.यात गंमत अशी की,शिकत असताना,व्यायाम करत असताना मुलं आणि मुली यांनी पूर्ण नग्नावस्थेत व्यायाम केला पाहिजे,असं त्याचं म्हणणं होतं.याचं कारण मानवी शरीर हे उदात्त आणि सुंदर आहे;त्यात लाज बाळगण्यासारखी कुठली गोष्ट आहे? आपण आपल्या गुणांची वस्त्र परिधान केलेली असतात.त्यामुळे या बाह्य वस्त्रांची गरजच काय, असंही प्लेटो म्हणत असे.शिकण्यात आणि शिकवण्यातही खूप मजा यायला पाहिजे,ते कंटाळवाणं होऊ नये म्हणून प्लेटो अतिशय दक्ष होता.
वयाच्या २०व्या वर्षानंतर या मुलांनी काय करायचं? त्यांच्यामधले जे सशक्त तरुण असतील,जे पुढे जाऊ शकतील आणि जे पुढे शिक्षण घेऊ शकतील अशी मंडळी वेगळी करायची आणि जी पुढे शिक्षण घेऊ शकणार नाहीत,ज्यांची क्षमता नाही अशी मुलं वेगळी करायची,
असं प्लेटो म्हणायचा.जे खालच्या क्षमतेचे असतील ते शेतकरी,कामगार किंवा मजूर होतील किंवा उद्योजकसुद्धा होतील,असं प्लेटोचं म्हणणं होतं.थोडक्यात,
उद्योजकांनासुद्धा तो खालचाच समजायचा.तसंच जे याच्यापुढे शिक्षण घेऊ शकतील अशा लोकांनी वयाच्या २० ते ३० वर्षांपर्यंत विज्ञान,गणित,अंकगणित, भूमिती आणि खगोलशास्त्र या शाखांमध्ये शिक्षण घ्यावं,असं त्याचं म्हणणं होतं;पण अंकगणित किंवा भूमिती शिकताना त्याचा उपयोग करावा असं मात्र त्याला फारसं वाटत नसे.गंमत म्हणजे पूल बांधताना,शेती करताना किंवा कुठलीही यंत्र बनवताना या गणिताचा उपयोग करणं म्हणजे तो खालच्या दर्जाचं समजत असे.हा गणिताचा उपयोग नाही.याचं कारण त्या वेळी ग्रीसमध्ये विकासामध्ये आपल्या आजूबाजूची भौतिक परिस्थिती सुधारण्यापेक्षा आपल्या आत्म्याची आणि मनाची शांती यात आपली प्रगती व्हावी अशी त्यांची समजूतच होती आणि प्लेटोचीही तशीच समजूत होती.
'रिपब्लिक' प्रमाणे ३० वय झाल्यावर म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर या मुलांना आणखी एक परीक्षा द्यावी लागत होती.या परीक्षेत जे पास होणार नाहीत,ते मात्र या शिक्षणातून बाहेर पडतील.अशांना प्लेटो 'मध्यमवर्गीय' म्हणायचा आणि अशांनी सैन्यात भरती होऊन देशाचं रक्षण करावं,असं तो म्हणायचा,प्लेटोला युद्ध आवडत नसे.त्यामुळे या सैन्यांनी आक्रमण कधी करू नये,फक्त संरक्षण करावं,असं त्याचं म्हणणं होतं. यातून जे उरलेले असतील,त्यांनी मात्र तत्त्वज्ञान शिकावं,असं त्याचं मत होतं,तत्त्वज्ञानाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राज्यकर्ते म्हणून काम करावं,असं प्लेटो म्हणायचा.
या सगळ्या प्रशिक्षणामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये पूर्ण समानता प्लेटोला अभिप्रेत होती.शिक्षणानंतर पाच वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण झालं की,ही मंडळी आता प्रत्यक्ष कृतीसाठी तयार झाली आहेत,असं त्याचं म्हणणं होतं. वयाच्या ३५ शी नंतर त्यांनी राज्य कसं चालवावं याचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स केला पाहिजे,अशी प्लेटोची एक धारणा होती.प्रत्यक्ष राज्य चालवण्याअगोदर त्यांना एकंदरीत समाजाचं, तिथल्या परिस्थितीचं,तिथल्या कायद्याचं आणि तिथल्या प्रश्नांचं गांभीर्य कळायला पाहिजे आणि मगच त्यांनी राज्यकर्ते व्हायला पाहिजे. थोडक्यात,त्यांनी अँप्रेंटिसशिप केली पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं आणि ही अँप्रेंटिसशिप प्लेटोच्या मते १५ वर्ष चालणार होती.५० वय ओलांडलं आणि या सगळ्या पायऱ्या त्यानं ओलांडल्या,की तो तत्त्वज्ञ हा राजा (फिलॉसॉफर किंग) झाला,असं प्लेटोचं म्हणणं होतं.असे तत्त्वज्ञ आणि अशी तयार झालेली माणसं जर शासक किंवा राज्यकर्ती झाली तर एक चांगलं आदर्श राज्य निर्माण होईल,असं प्लेटोला वाटायचं.म्हणूनच तत्त्वज्ञांनी राज्य करावं किंवा राज्यकर्त्यांनी तरी तत्त्वज्ञ व्हावं,असं प्लेटो नेहमी म्हणायचा.हे तत्त्वज्ञ शासक उच्च वर्गातले असले पाहिजेत आणि त्यांनीच राज्य करावं असं प्लेटो म्हणे.या वर्गाखाली आणखी दोन वर्ग होते.एक म्हणजे सैनिकांचा आणि दुसरा म्हणजे शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांचा.या दोन्ही वर्गांनी तत्त्वज्ञ राज्यकत्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत
,असं प्लेटो म्हणायचा.तसंच आश्चर्य म्हणजे राजाकडे खासगी मालमत्ता असता कामा नयेत,असं प्लेटोनं सांगितलं.तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांनी जनतेबरोबर राहावं,
जनतेबरोबर उठावं,बसावं, जेवावं,झोपावं; त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही, असं त्याला नेहमी वाटायचं राज्यकत्यांसाठी वेगळी व्यवस्था करायला हवी,असं त्याला वाटत नसे.वैयक्तिक स्वार्थ आणि स्वतःची वैयक्तिक संपत्ती नसेल तर ते नेहमी न्यायाच्या बाजूनेच काम करतील,असं प्लेटोला वाटत असे.
'रिपब्लिक' ग्रंथ जगासमोर आणणारा प्लेटो होता तरी कोण ?
प्लेटोचा जन्म हा ख्रिस्तपूर्व ४२४ मध्ये ग्रीस देशातल्या एजना या अँथेन्स नगरामध्ये झाला. त्याचं खरं नाव ॲरिस्टोकल्स असं होतं;पण ग्रीक भाषेत प्लेटॉन म्हणजे रुंद आणि प्लेटोचे खांदे रुंद असल्यामुळे प्लेटो हे नाव त्याला बहाल झालं होतं. त्याचं लहानपण सुखात गेलं.प्लेटो कुस्ती खेळण्यात पटाईत होता.
लहानपणापासून प्रकृतीनं तो दणकट असल्यामुळे त्यानं सैनिक म्हणूनही काम केलं. तसंच तो दिसायलाही देखणा असल्यामुळे त्याच्यामागे अनेक तरुण- तरुणींचे घोळके असत.तो तरुणपणी कविताही करत असे. आपण खूप मोठा कवी होण्याची स्वप्नं तो बघत असे.
वयाच्या २० व्या वर्षी एकदा एका स्पर्धेसाठी आपलं संगीत नाटक द्यायला जात असतानाच त्यानं वाटेत चाललेलं सॉक्रेटिसचं भाषण ऐकलं.सॉक्रेटिसच्या बोलण्याकडे तो इतका आकर्षिला गेला,की त्यानं आपल्या कविता चक्क जाळून टाकल्या.प्लेटोन सॉक्रेटिसचं शिष्यत्व पत्करलं.
सॉक्रेटिसच्या काळात आपण जन्माला आलो, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे,असं प्लेटो म्हणायचा.सद्गुण म्हणजेच ज्ञान,असं सॉक्रेटिस म्हणायचा.प्लेटोचंही तेच मत झालं होतं. प्लेटोच्या काळात गुलाम,स्त्रिया आणि मुलं यांना राजकारणात भाग घ्यायला परवानगी नव्हती.
प्लेटो ३० वर्षांचा असताना सॉक्रेटिसवर मुलांची मनं भडकवण्याचा आरोप होऊन त्याला मृत्युदंड देण्यात आला.प्लेटोच्या समोर हे सगळं घडल्यामुळे प्लेटोला अतोनात दुःख झालं.पळून जाण्याची शक्यता असूनदेखील सॉक्रेटिसनं मृत्युदंड स्वीकारला याचा प्लेटोवर खूप मोठा परिणाम झाला.त्यामुळे राज्यव्यवस्थेतच बदल केला पाहिजे,राज्यव्यवस्थेतच चूक असली पाहिजे नाही,तर सॉक्रेटिसचे प्राण गेले नसते, असं प्लेटोला वाटायला लागलं आणि आदर्श राज्यव्यवस्था कुठली याचा शोध घेण्याचं प्लेटोनं ठरवलं.तुरुंगात असताना सॉक्रेटिसनं जे काही संभाषण केलं त्याला 'डायलॉग्ज' म्हणतात; ते डायलॉग्ज प्लेटोनं नंतर लिहून काढले.हे जे डायलॉग्ज आहेत ते प्रत्यक्ष सॉक्रेटिसचे आहेत का प्लेटोनं त्यात स्वतःचेही विचार मांडले आहेत याच्याविषयी बरीच मतमतांतरं आहेत;पण त्यामधून सॉक्रेटिसचे आणि प्लेटोचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.
ख्रिस्तपूर्व ३९९ मध्ये प्लेटोन अँथेन्स सोडलं आणि ख्रिस्तपूर्व ३८६ पर्यंत म्हणजे जवळजवळ १३ वर्षं तो चक्क अज्ञातवासात गेला.त्या वेळी त्याच्या मनात अनेक वादळ उठली होती. त्यानं ३० शासकांच्या राजवटी बघितल्या आणि त्यांचं अपयशही बघितलं.त्यानंतर येणाऱ्या लोकशाही राजवटीत तरी चांगली समाजराज्य व्यवस्था निर्माण होईल असं त्याला वाटलं होतं; पण याच राजवटीत त्यानं आपला परममित्र आणि गुरू सॉक्रेटिस याचा मृत्युदंडही बघितला होता.त्यामुळे त्याचा कुठल्याही राज्यव्यवस्थेवरचा आणि सरकारवरचा विश्वासच उडाला होता.जर तत्त्वज्ञच राज्य चालवायला लागले किंवा राज्यकर्तेच तत्त्वज्ञ बनले तरच जी राज्यव्यवस्था निर्माण होईल ती आदर्श असेल, असं त्याचं ठाम मत बनलं.हे सगळं आपल्याला "रिपब्लिक'मधल्या सातव्या पत्रामध्ये (सेव्हन्थ लेटर) वाचायला मिळतं..
प्लेटोच्या तत्त्वज्ञानाकडे जर बघायचं असेल तर त्या वेळची परिस्थिती काय होती हे बघावं लागेल.प्लेटो अँथेन्समध्ये वाढला.अँथेन्स म्हणजे ग्रीसमधला डोंगर-टेकड्यांचा एक प्रदेश होता.त्या वेळी ग्रीस छोट्या छोट्या सिटी स्टेट्समध्ये म्हणजे नगर राज्यांमध्ये विभागलं गेलं होतं.अँथेन्समध्ये ४-५ हजार लोक राहात असत.तिथे लोकशाही पद्धतीनं राज्यकारभार चालत असे.सर्व पुरुषांना त्या वेळी राज्यकारभारात सहभागी होता येत असे. अँथेन्सशेजारी जी नगर राज्यं होती,तिथे मात्र वेगवेगळ्या तऱ्हेची राज्यव्यवस्था होती. ग्रीसमध्ये त्या वेळी अँथेन्स आणि स्पार्टा अशी दोन नगर राज्य म्हणजे "सिटी स्टेट्स' होती. त्यामध्ये खूप मिन्नता होती. म्हणजे अथेन्स हे सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेलं लोकशाही राज्य होतं,तर स्पार्टा मात्र क्रीडा म्हणजे खेळ आणि युद्ध या क्षेत्रांत प्रगत असलेल मूठभर श्रीमंतांचं शासन असलेलं राज्य होतं.या दोन नगर राज्यांमध्ये जे युद्ध झालं ते बेलोपोनेशियन युद्ध म्हणून ओळखलं जातं. या युद्धामध्ये अँथेन्सचा पराभव झाला.या पराभवाची कारणं शोधताना प्लेटोन आपले राजकीय विचार मांडायला सुरुवात केली. ते विचारसुद्धा सॉक्रेटिसच्या "डायलॉग्जवरच आधारलेले होते.प्लेटोला तीन महत्त्वाचे प्रश्न खुणावत होते.'न्याय म्हणजे काय?' तसंच 'राज्य कोणी करावं' आणि 'कसं राज्य करावं?' असे मूलभूत प्रश्न प्लेटोन स्वतःला विचारले आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं 'रिपब्लिक ग्रंथाचा जन्म झाला.
"रिपब्लिक' या ग्रंथात प्लेटोनं त्याच्या आदर्श राज्याच्या कल्पना मांडल्या होत्या.चित्रकार आणि संगीतकार यांना समाजबाह्य ठरवावं,असं तो म्हणत
असे.गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून थोपवावं,त्यांचं मन वळवावं,पण त्यांना शिक्षा करू नये,असं प्लेटो म्हणत असे,कारण त्यांच्यातली गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांच्या अज्ञानातून निर्माण झालेली आहे आणि आपण त्यांना ज्ञान दिलं की,त्यांची ही प्रवृत्ती कमी होईल,असे प्लेटोला वाटत असे.
प्लेटोच्या 'रिपब्लिक मध्ये वकिलांना तो दुष्ट म्हणायचा.
जिथे ज्ञान आहे तिथे खरं तर खटले आणि कायदा यांची गरजच राहणार नाही,असं तो म्हणायचा.'रिपब्लिक' मध्ये जे काही कायदे असतील ते थोडेच असतील.ते सोपे आणि लोकांना समजतील असे असतील.याचं कारण कोणताही नवीन कायदा निर्माण केला की,तो तोडण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते तोडणारे बरेच निर्माण होतील,असंही प्लेटोला वाटत असे.तसंच राज्यकर्त्याचे मुख्य काम हे प्रजेला आनंदी ठेवणं आणि त्यांचं आरोग्य सांभाळण हेच आहे.असं तो म्हणायचा.
आपली कारणमीमांसा आपल्या मेंदूत आपलं स्पिरिट आपल्या हृदयात,तर आपली भूक आपल्या पोटात दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीतल्या कण्यातल्या 'मॅरोज'नं एकमेकांशी जोडलेल्या असतात,असं प्लेटोला वाटायचं.गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या भावना आपल्या रक्तवाहिन्यांमधून वाहतात, असंही तो म्हणायचा.आपल्या स्मृती या मेणाच्या ब्लॉकसारख्या असतात,त्यावर आपण काही कोरलं तर जसं ते टिकून राहतं तशीच आपली स्मृती असते आणि काही मेण जसं वितळत तसंच काहींच्या फारसं लक्षात राहत नाही, असंही तो म्हणायचा.आपण आपला अनुभव आपल्या मनाच्या कोऱ्या पाटीवर लिहीत असतो आणि त्यातूनच आपलं ज्ञान वाढतं, असं प्लेटोचं म्हणणं होतं.
प्लेटोचा आत्म्यावर विश्वास होता.आज आपण ज्याला मन म्हणतो,त्याला प्लेटो आत्मा म्हणायचा.आपल्या शरीरापेक्षा आपला आत्मा ही एक वेगळी गोष्ट असते,
त्यामुळे आपलं शरीर नष्ट झालं तरी आत्मा जिवंतच असतो,असं त्याला वाटायचं,आपल्याकडेही आत्मा अमर आहे,अस आपण म्हणतो तसाच हा प्रकार होता. आपली बुद्धी मात्र आपल्या डोक्यात असते, असं प्लेटोला वाटायचं.प्लेटोनं त्याच्या मानसशास्त्रामध्येही भूमिती आणली होती. त्याच्या मते गोलाकार हा परिपूर्ण असा आकार असतो.माणसाचं डोकं हे सर्वसाधारणपणे गोलाकार असल्यामुळे त्यातला मेंदू हाच आपलं मन नियंत्रित करत असला पाहिजे,असं त्याचं मत होतं.खरं तर त्याचं मत बरोबर असलं तरी ते मत विचित्र अशा युक्तिवादानं तयार झालेलं होतं.
पृथ्वी,जल,वायू आणि अग्नी यातूनच माणसाच्या प्रकृती तयार झाल्या.माणसाच्या सारं काही निमूटपणे स्वीकारण्याच्या वृत्तीचा संबंध पाण्याशी,संतापीपणाचा संबंध अग्रीशी, उदासीनतेचा संबंध पृथ्वीशी आणि उत्साही वृत्तीचा संबंध हवेशी असून जेव्हा या चारही वृत्ती एकत्र होतात तेव्हा माणूस चैतन्यमय दिसतो आणि या चारही वृत्तींचा समतोल साधलेला मनुष्य समाधानी असतो.कुठल्याही वृत्तीचा अतिरेक झाला,तरी त्या माणसांत दोष निर्माण होतो,असं प्लेटोचं तत्त्वज्ञान होतं आणि त्या काळचा इटलीतला जगविख्यात असलेला चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची याच्यावर प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा खूप मोठा प्रभाव होता.
प्लेटोच्या डिक्शनरीमध्ये त्याच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ब्युटी म्हणजे सौंदर्य,जस्टिस म्हणजे न्याय,लव्ह म्हणजे प्रेम या जवळपास सारख्याच आणि महत्त्वाच्या कल्पना होत्या.
फक्त थिअरी मांडून प्लेटोचं समाधान होत नव्हतं.त्याला हे आदर्श चित्र प्रत्यक्षात उतरवायचं होतं.त्यामुळे चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशिअस प्रमाणेच त्यानं आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डायोनिसिअस यानं जेव्हा प्लेटोला राज्यविषयक
सल्ला द्यावा म्हणून आमंत्रण दिलं तेव्हा तो सायराक्यूसला गेला आणि तिथल्या सम्राटाला राज्य कसं करायचं याविषयी धडे द्यायला सुरुवात केली;पण डायोनिसि हा फक्त राजा होता.तो काही तत्त्वज्ञ नव्हता आणि त्यामुळे प्लेटोच्या क्रांतिकारी कल्पना त्याला आवडल्या नाहीत आणि त्यानं प्लेटोला चक्क मृत्युदंड देण्याची धमकी दिली.या वेळी प्लेटोच्या काही मित्रांनी मध्यस्थी केली आणि त्यामुळे प्लेटोची सुटका झाली.
वयाच्या ८१ व्या वर्षी एका मित्राच्या लग्नसमारंभाला गेला असताना तिथले आवाज सहन न झाल्यानं तो विश्रांती घेण्यासाठी शेजारच्या खोलीत गेला आणि विश्रांती घेत असतानाच प्लेटोचा मृत्यू झाला.आज प्लेटो आणि सॉक्रेटिस नसले,तरी ते 'रिपब्लिक' या ग्रंथाच्या रूपात आपल्या मनात कायम असतील आणि आहेत यात काही शंकाच नाही !
संगीतामुळे मनाचा समतोल राहतो आणि व्यायामामुळे शरीराचा.- प्लेटो
१७ जून २०२३ या लेखमालेतील पुढील लेख.