* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: विचार करायला लावणारी माणुसकी..!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२/६/२३

विचार करायला लावणारी माणुसकी..!

घड्याळात रात्रीच्या नऊचे टण ठण टण टण टोल पडले तसे तशी माझी चिंता अधिकच वाढली.माझेसमोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं,त्यांचा अंत्यविधी करायचा होता.पंधरा मजली या इमारतीत हजारों कुटुंबे होती,पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही.

शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं.जो तो आपापल्या कोषात मग्न,दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल,संगणक,whats app,face book,twitter, instagram च्या आभासी जगात व्यस्त.


सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली.प्रत्येकाचे RIP,भावपूर्ण श्रध्दांजली,ईश्वर मृत्म्यास शांती देवो,तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती,ओम शांती सारख्या मेसेजेसनी whats app फुल झालं.vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं,केलंय आपण सांत्वन हीच धारणा सगळ्यांची.पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही,मदत करणे तर दूरच.


बरे माझे नातेवाईकही भरपूर,सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे.बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं.


"चांगल्या डाॅक्टरला दाखवा,ट्रिटमेंट करा,काळजी करु नका,होतील बाबा बरे,अशा संदेशांनी,होय संदेशचं आभासी जग.कोणी video call वरही बोलले,पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार.


प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची,कोणाच्या घराचं बांधकाम,मुलांच्या परीक्षा,नोकरीतून रजा न मिळणं,कोणाचा भराला आलेला शेती हंगाम,अर्थात कोणी येणार नव्हतंच.


"अहो,काहीतरी करा ना.रात्र वाढतेय,पिंटू ही पेंगुळलाय,पण झोपत नाही आहे.आजोबांना सारखं उठवायला सांगतोय,कसं समजावू त्याला."


" होय ग..मी प्रयत्न करतोय, कोणाला तरी बोलावतो मदतीला "


साडेनऊचा टोल घड्याळाने दिला.हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं,जुन्या काळातलं,टण टण टोल देणारं,माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं,

अनेकवेळा दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं.


दुपारपासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले.

जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले,"नाही जमणार हो मला यायला,माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे,त्याला आणायला जायचंय"


चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो...अरे भाईसाब मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे,उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे...


तेराव्या माळ्यावरील मायकल फर्नांडीस म्हणाला,"आलो असतो रे,पण आज आमची अल्कोहोल अँनानिमसची मिटींग असते दर रविवारी,प्रबोधनात्मक भाषण तर असतेच,पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते. घाबरु नकोस.धीर धर,स्वतःला सांभाळ."


सी विंगमधील पराडकरांकडे गेलो तर,अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं अशा (मौतीत जाणं,सुतकीय कार्य ) प्रसंगी आज नाही येता येणार मला.


शेजारचा"स्वामीनाथन" नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील "सुत्रावे" विक एंडला गेलेला.


दुसर्‍या माळ्यावरील "कोटनाके" कवी संमेलनासाठी जाणार होते.प्रत्येकाची काही ना काही कामे घाबरू नको,

येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये.


काय करू..?आज पावसानेही हैराण केलेलं.दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती,आता त्याचाही जोर वाढला होता,मला तर भडभडून आलं.


मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती,पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता. 


शेवटी मनाचा निग्रह करून उठलो,माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता.

हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता.


"संतोष"माझा काहिसा कापरा,आर्त,दाटलेला,अवरूध्द

स्वर ऐकून तो म्हणाला,"काय झालं साहेब,,,काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी"


अरे दुपारी बाबा वारले,आता दहा वाजत आलेत,अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही.मदतच नाही मिळाली रे मला कोठे."


"ओह...बाबा गेलेत.आपण करू बाबांची अंतेष्टी.काळजी करू नका.माझे चार दोस्त आताच बोलावतो.करू आपण सगळं व्यवस्थित"त्याने फटाफट मोबाईलवरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला.


ये महेश,येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील,?होय आपल्या बाबासारखेच आहेत ते,या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे.दिनेश,शिवा,आणि मधुकरलाही सांगशील.सगळं कसं फटाफट झालं पाहिजे,रात्र वाढतेय,पाऊसही हैराण करतोय.


संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्यापासुन तर तिरडी बांधण्यापर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली.


"मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो." "अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा,माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही,बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही."


चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली.बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला,संतोषनं मला सावरलं,माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत,मला मुखाग्नी द्यायला लावला.

पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला.बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला.

चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला," चला दादानु,घरी चला...वहिनी वाट बघत्याल" संतोषनं मला घरी सोडलं. 


"येतो दादा"...

"थांब संतोष" मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या," घे संतोष"..हे काय दादानु,पैसे नकोत मला." 


"अरे तुम्ही खर्च केलात,वेळेवर धावून आलात,ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती,याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे,पण शेवटी हा व्यवहार आहे,घ्या हे पैसे" दादानु.."तुमचे बाबा आमचे बी बाबाचं की.नको मला पैसे.


शेवटी काय असतं दादानु,'माणूस मरतो हो,माणुसकी नाही.इथे व्यवहार गौण ठरतो दादा,येतो मी…


वहिनीस्नी सांभाळा,पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो.


बाहेर पाऊसही आता मंदावला होता.बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती.


या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती.


नरदेह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा.


डाॅ.शैलजा करोडे

नेरूळ नवी मुंबई