हाल्डेन - हॅमिल्टन यांनी आप्त निवडीच्या सिद्धान्तात मांडणी केल्याप्रमाणे रक्ताच्या नात्यांवर अनेक प्राणिजातींत जिव्हाळ्याचे संबंध पोसलेले आहेत.
माकडिणी आपल्या पोटाला लटकलेल्या पिल्लांना जिवापाड सांभाळतात. मधमाशा तर आपल्या बहिणी-भाचरांना वाचवण्यासाठी प्राणार्पण करायला तयार असतात.पण प्राणिसमाज निव्वळ नात्यागोत्यांच्या संबंधांवरच उभारलेले आहेत असे नाही.
उत्क्रान्तीच्या ओघात मुंग्या,मधमाशा या प्रगत संघप्रिय कीटांच्या संघजीवनाची सुरुवात कागदमाशा ह्या गांधिलमाशांच्या एका वंशापासून झाली.कागदमाशा या आहेत वनस्पतींचे धागे सोलून आणून त्यांचे पोळे बनवून जथ्याने राहणाऱ्या संघजीवनाच्या अगदी प्राथमिक पायरीवरच्या गांधिलमाशा.मधमाशांत, मुंग्यांत एकच फळलेली राणी नव्या संघाची सुरुवात करते.ही राणी नंतर तिला साहाय्य करणाऱ्या कामकरी,सैनिक मुलींपेक्षा रंग-रूप-आकाराने खूपच वेगळी असते.पण कागदमाशांची संघस्थापना होते एकसारख्या एक,फळलेल्या आणि म्हणून अंडी घालायला साऱ्या समर्थ असलेल्या मूठभर माद्या एकत्र येऊन.त्या बहिणी-बहिणी असू शकतात,पण नेहमीच असतात असेही नाही.अशा कदाचित काहीही नाते-गोते नसलेल्या चमूतल्या एकीलाच राणी बनता येते.
एकटीच पिल्लावळ निर्माण करते.इथे आप्त निवडीचा सिद्धान्त लागू होत नाही.मग निसर्गनिवडीत हे कसे साधते? असे दिसते–एकेकट्या कागदमाशीने स्वतःच्याच
बळावर पोळे बांधून पिल्ले वाढवायला पाहिले तर ती - यशस्वी होऊ शकत नाही.पण चार-पाच जणींनी 'परस्परा करू सहाय्य,एकीतच आहे बळ' म्हटले तर त्यांच्या हाती यश पडण्याची शक्यता खूप वाढते.ह्या अनेकदा अगदी मर्यादित संख्येच्या,पाच- दहा फळलेल्या कागदमाशांच्या समूहात सगळ्या माशा एकमेकींना नीट ओळखून असतात,एकमेकींचे सामर्थ्य रेटारेटी करत जोखतात,आणि मग कोणा एकीला सगळी अंडी घालणारी राणी बनू देतात.ज्या प्रारंभी राणी बनू शकत नाहीत,त्यांनाही आशा असते की कदाचित प्रथम यशस्वी झालेली राणी कमकुवत झाली,काही अपघाताला बळी पडली, तर आपल्याला राणी बनण्याची संधी मिळेल. अशा घटना अनेकदा घडतातही.असे होऊन वेगवेगळ्या राण्यांची पिल्ले त्या संघात सामील झाली तर तीही काही एकमेकांची भावडे नसणार.तेव्हा काही अंशी स्वतःच्याच भावंडांना मदत करण्याच्या जोडीला इतरही काहीही नाते नसलेल्या जातभाई - जातबहिणींशी ते मनापासून हातमिळवणी करतात.स्वतःला कधी ना कधी संधी मिळेल अशा जबर आशेच्या जोरावर…
तांबुसमाशी आणि वाघमाशी या दोघीही दोन प्रकारच्या कागदमाशा आहेत.दोन्ही जाती मांसाहारी आहेत.किडे,कोळी मारून खातात. तांबुसमाशा असतात इंचभर लांब,सडपातळ. वाघमाशा आहेत दुपटीने मोठ्या,
जाडजूड,पोटावर वाघासारखे काळे पिवळे पट्टे मिरवणाऱ्या.त्यांच्या प्रचंड पोळ्यांत हजारो जणी राहतात;आसपासच्या - किड्या-मकोड्यांची बेहद्द शिकार करतात.त्यांचे आवडते खाद्य आहे तांबुसमाशांच्या अळ्या.. निसर्गाच्या अजब रहाटगाडग्यातून प्रेम आणि द्वेष,ममता आणि क्रूरता,अगदी सहजगत्या,एकामागून एक कशा वर येत राहतात.तांबुसमाशा वाघमाशा यांच्या संघर्षातून निसर्गाची निवड कशी मायेचे - क्रौर्यात रूपांतर करू शकते याची एक विलक्षण घटना मी स्वतः डोळ्यांनी पाहिली आहे.
मी काही वर्षांपूर्वी आमचे चार वर्षे बंद करून ठेवलेले घर उघडले.त्या बंदिस्तीत तांबुसमाशांना छान निवारा मिळाला होता.जागोजागी,सांदी-कोपऱ्यात,फडताळांत त्यांची पोळी होती. काहींवर चार-पाच,तर काहींवर सत्तर-ऐंशी जणींचे तांडे होते.तांबुसमाशा डंख मारू शकतात,
तेव्हा कोणीही त्यांची पोळी झटक्यात काढून टाकली असती.पण समाजप्रिय कीटकांच्या माझ्या प्रेमापोटी मी बहुतेक सारी पोळी राखून ठेवली.निरीक्षणाला सगळ्यात सोयीचे होते गच्चीच्या कोपऱ्यातले एक पोळे. तासन्तास न्याहाळत त्याच्या नोंदी ठेवायला लागलो.पोळ्यात किती षट्कोनी दालने आहेत, त्या उघड्या दालनांत किती अंडी,
किती अळ्या आहेत,किती दालनांना झाकण घालून कोश बनताहेत,किती प्रौढ माशा खपताहेत,शिकार करून आणून एकमेकींना,अळ्यांना भरवताहेत, नवी दालने बांधताहेत.सारे नाटक पाहण्यात रंगून गेलो.सहा महिने त्या गच्चीवरच्या पोळ्याची भरभराट होत राहिली.बघता-बघता प्रौढ माशांच्या पाचापासून पंचाहत्तर झाल्या.अन् मग एक दिवस अवतरली एक वाघमाशी.सगळ्या तांबुसमाशा बिचकून पोळ्याच्या कडे कडेला गप्प उभ्या राहिल्या.वाघमाशी सावकाश एक-एक अळी,कोशाचे छप्पर फोडून आतली माशी खात राहिली.निम्मी - शिम्मी दालने रिकामी करून उडून गेली.आता मात्र त्या पोळ्याला अवकळा आली.नवी अंडी घातली जात होती,अळ्या वाढत होत्या.
त्या पिल्लांना त्यांच्या बहिणी,मावशा चारत होत्या,
अंजारून- गोंजारून साफ करत होत्या. काही अळ्या कोशावस्थेत प्रवेश करत होत्या. पण दर चार-पाच दिवसांनी वाघमाशी आपली हजेरी लावत होती.बहुतांश चिल्ला-पिल्लांना फस्त करून जात होती.असे बारा-तेरा आठवडे गेले.प्रौढांची संख्या रोडावत जाऊन विसावर आली.पण ताबुसमाशानी अजून हाय खाल्ली नव्हती.
मनापासून वंशवेलीला खतपाणी घालण्याचे काम चालू होते.
अन् एक दिवस माझ्या डोळ्यासमोर सारे चित्र बदलले.दर चार-पाच दिवसांनी येऊन डल्ला मारून जाणारी वाघमाशी नुकतीच हजेरी लावून गेली होती.ती वैरीण गेली,आणि तांबुसमाशांची काहीतरी खलबते सुरू झाली.
गांधिलमाशा एकमेकींना सतत नानाविध रासायनिक संदेश देत असतात.तेव्हा हा सवाद झाला असणार वासांच्या भाषेत.मला पूर्ण अगम्य.पण अखेर निर्णय झाला.असावा की आता गाशा गुंडाळून दुसरीकडे जायलाच पाहिजे.अशा प्रौढ माशा एकदा उडून गेल्या की त्यांनी मागे सोडलेली चिल्ली-पिल्ली जगण्याची सुतराम शक्यता नाही. इतके दिवस निसर्गप्रेरणेतून त्या या अर्भकांची काळजी घेत होत्या.त्यांच्यातल्या अनेक माशा कुंवार राहून आपल्या बहिणी- भाचरांना,किंवा केवळ इष्टमैत्रिणीच्या संततीला सांभाळत होत्या. निसर्गाच्या लेखी ह्या वात्सल्याला मोल होते.
पण,आता पिल्लांना तसेच हकनाक सोडून जाणे ह्या हिशोबात बसत नव्हते.एवीतेवी त्या पिल्लांचे दिवस भरलेच होते.त्याऐवजी त्यांना खाल्ले तर नवी वसाहत स्थापन करायला गांधिलमाशांना तेवढीच अधिक शक्ती मिळणार होती.आता येणाऱ्या कठीण परिस्थितीत त्या तगून राहतील, नवे पोळे बांधू शकतील,पुन्हा वंशवेली फुलवू शकतील ही शक्यता अधिक बळकट होणार होती.तेव्हा ज्या पिल्लांना अर्ध्या तासापूर्वी अंजारले- गोंजारले,भरवले जात होते,त्यांचाच आता फडशा पाडणे हा निसर्गचक्रात शहाणपणा ठरत होता.अन् मी डोळे विस्फारून बघता बघता तांबुसमाशा,अगदी वाघमाशी इतक्याच जोषाने, आपल्याच रक्ताची कच्ची बच्ची खायला लागल्या.इतके दिवस एका - वेळी मोजक्या माशा पोळे सोडून जायच्या,त्यांच्यातल्या कोणी ना कोणी नेहमीच पिल्लांना सांभाळत थांबायच्या.पण आता सारी दालने रिकामी झाली,तशा साऱ्याच्या साऱ्या,एकदम उडून गेल्या.पुन्हा कधीच न परतण्यासाठी.
ही शोकांतिका माझ्या मनाला चटका लावून गेली.पण त्याबरोबरच मला काय होते आहे हे उमगल्याचे समाधान होते.खरा ज्ञानानंद कधी होतो?एखादी चक्रावून टाकणारी,
आगळी घटना घडते,आणि आपण तिचा अर्थ लावू शकतो
तेव्हा चार्ल्स डार्विनने समजावले आहे की उत्क्रान्तीच्या ओघात जीवांचे आनुवंशिक गुणविशेष सतत पारखले जात असतात.त्या गुणांच्या धारकांना स्वतःचे,किंवा आपल्या रक्ताच्या नातेवाइकांचे संरक्षण व वंशवर्धन करण्यात ते किती मदत करतात,ह्या निकषावर. निसर्गाच्या सुपात जीवरूपी दाण्यांची अहर्निश पाखडणी सुरू असते.या पाखडणीत त्यांच्यावर कधी कधी प्रेम चिकटते;तसेच कधी कधी क्रौर्यही !
१७ मे २०२३ या लेखमालेतील पुढील लेख..