* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: १.२ पाश्चिमात्य वैद्यक : ग्रीस

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/६/२३

१.२ पाश्चिमात्य वैद्यक : ग्रीस

ॲरिस्टॉटल


ॲरिस्टॉटल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकाच्या अखेरीला शरीराच्या अभ्यासाला सुरुवात केली.ॲरिस्टॉटलच्या कल्पना गमतीशीरच होत्या.त्यानं विश्वातल्या वस्तूंची एक शिडीच बनवली होती.सर्वात खाली निर्जीव वस्तू,नंतर वनस्पती,मग वेगवेगळे प्राणी आणि शेवटी माणूस अशा त्या शिडीच्या ११ पायऱ्या होत्या.त्याच्या मते,आपण मेंदूऐवजी हृदयामुळे विचार करू शकतो आणि मेंदूचं काम रक्त थंड करणं हे असतं! त्याचा समकालीन डायोकल्स ऑफ कॅरिस्टॉस यानं प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरविच्छेदनासंबंधी एक पुस्तक लिहिलं.अशा प्रकारचं पुस्तक लिहिणारा तो पहिलाच. मग इसवीसन पूर्व २८० च्या सुमाराला हिरोफिलसनं माणसाच्या शरीराची रचना आणि त्यातल्या अवयवांविषयी अभ्यास केला.त्यानं डोळ्यांचं विच्छेदन (डिसेक्शन) केलं. त्याच काळात इरॅसिस्ट्रस या त्या काळच्या वैज्ञानिकानं मेलेल्या माणसाच्या मेंदूचं विच्छेदन केलं.माणसाची हालचाल कशी होते,तसंच त्याला वेगवेगळ्या जाणिवा आणि संवेदना कशामुळे होतात हे अभ्यासायचं होतं.त्यानं तोपर्यंत चालत आलेल्या अनेक समजांना हास्यास्पद ठरवलं.त्याच्या मते माणसाचं सगळं शरीर हे एखाद्या यंत्रासारखं चालतं आणि त्यात काही विशेष नसतं.


अथेन्स


ग्रीकांचं बायॉलॉजीचं ज्ञान आणि एकूणच विज्ञानाची प्रगती ॲरिस्टॉटलच्या काळात (ख्रिस्तपूर्व ३८४ ते ३२२) शिखरावर पोहोचली होती.स्वतः ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्वज्ञानाचा कळसबिंदूच होता.ॲरिस्टॉटल हा उत्तर ग्रीसमध्ये राहत होता.तो अलेक्झांडर द ग्रेट याचा गुरू होता.ॲरिस्टॉटलनं अथेन्समध्ये लायसियम नावाचं विद्यापीठ काढलं होतं.ते फारच प्रसिद्ध होतं. त्या काळी ॲरिस्टॉटल हा सगळ्यात हुशार आणि बुद्धिमान म्हणावा असा माणूस होता. त्यानं भौतिकशास्त्र,अवकाशविज्ञान,

तत्त्वज्ञान आणि बायॉलॉजी अशा जवळपास सगळ्याच विषयांवर लिहिलं.आज आपण त्याला त्यानं मांडलेल्या अवकाश विज्ञान आणि भौतिकशास्त्रातल्या मतांमुळे ओळखतो. या विषयांतली त्याची अनेक मतं आणि तत्त्वं पूर्णपणे चुकीची होती हेही आता आपल्याला माहीत आहे.तरीही त्याच्याइतका महत्त्वाचा विचारवंत त्याच्या अगोदर आणि नंतर कित्येक शतकं झाला नाही.या विश्वातल्या अनेक गोष्टींचं निरीक्षण करून त्या सगळ्यांना एकसूत्री तत्त्वात बांधणारा तो पहिलाच तार्किक विचारवंत असला पाहिजे. त्यामुळेच विज्ञान,तत्त्वज्ञान,राजकीय विचार अशा कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना ॲरिस्टॉटलला वगळून आपण पुढे जाऊच शकत नाही.त्यानं आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अंगाच्या खिडकीत डोकावून बघायला शिकवलं.


ख्रिस्तपूर्व ३८४ साली मॅसेडोनिया जवळ जन्मलेला ॲरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता.सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो यानं सुरू केलेल्या अॅकॅडमीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ॲरिस्टॉटल हा खूपच हुशार मानला जायचा. प्लेटोचा कल नैतिकतेकडे जास्त होता. निसर्गातलं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा तो ते गणितानं मांडायचा प्रयत्न करत असे आणि इथेच ॲरिस्टॉटलचे प्लेटोबद्दल मतभेद होते. त्यामुळे प्लेटोही ॲरिस्टॉटलला आपली परंपरा चालू ठेवणारा वारस असं मानतच नसे.

त्यामुळे ॲरिस्टॉटलनं स्वत:ची 'लायसियम' नावाची अॅकॅडमी काढली. तो तिथं आपल्या शिष्यांना घेऊन फिरता फिरता गप्पा मारत मारत शिकवत असे.त्यामुळेच त्याच्या शिष्यांना पुढे 'पेरीपॅटेटिक्स' म्हणजे चालणारे किंवा फिरणारे असं म्हणायला लागले.


आपण इथं का आहोत? आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे? या सगळ्या विश्वामागे कुठली तरी योजना असली पाहिजे वगैरे विचार त्याच्या डोक्यात घोळत.प्रत्येक गोष्टीमध्ये ही निसर्गाची योजना शोधणाऱ्या त्याच्या 'टेलिओलॉजी' या तत्त्वज्ञानाचा विज्ञानाच्या प्रगतीवर पुढची अनेक शतकं परिणाम होणार होता.ॲरिस्टॉटलनं एकूण १५० प्रबंध लिहिले त्यातले आज फक्त ३०च उपलब्ध आहेत. त्यात त्यानं तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी),

नैतिकता (एथिक्स), राजकारण (पॉलिटिक्स),सौंदर्यशास्त्र (अस्थेटिक्स), भौतिकशास्त्र (फिजिक्स), खगोलशास्त्र (अस्ट्रॉनॉमी) आणि जीवशास्त्र (बायॉलॉजी) या सगळ्याच विषयांवर लिहिले.या लेखांमधून त्याचे जगाविषयीचे, विज्ञानाविषयीचे आणि अध्यात्माविषयीचे विचार कळतात. 


गंमत म्हणजे त्या काळी अध्यात्माला 'मेटॅफिजिक्स' म्हणजे फिजिक्सच्या पलीकडचं असं म्हटलं जायचं. या नावाला खरं तर काही वैज्ञानिक कारण नसून यामागचं कारण फारच मजेशीर होतं. 


ॲरिस्टॉटलच्या लायब्ररीत अध्यात्माची पुस्तकं

फिजिक्सच्या पुस्तकांच्या पलीकडे ठेवलेली असायची.

म्हणून फिजिक्सच्या पलीकडचं म्हणून फिजिक्सच्या पलीकडचं म्हणून अध्यात्माला 'मेटॅफिजिक्स' असं गमतीशीर नाव पडलं !


पण महत्त्वाची गोष्ट अशी,की ॲरिस्टॉटलनं बायॉलॉजीमध्येही खूपच काम केलं आहे.समुद्री जिवांबद्दल त्याला विशेष प्रेम होतं हे आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल.त्यानं 'नॅचरल हिस्ट्री' या आपल्या पुस्तकात समुद्री जिवांबद्दलची निरीक्षणं नोंदवली आहेत.योग्य,सुसंबद्ध आणि व्यवस्थित निरीक्षणं करून त्यानं चक्क ५०० प्रकारच्या प्राण्यांची नोंद केली होती! ॲरिस्टॉटलनं लिहिलेली बायॉलॉजीबद्दलची पुस्तकं ही त्यानं लिहिलेल्या पुस्तकांमधली सगळ्यात सुंदर, सुसंगत आणि वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर होती.


माशांप्रमाणेच समुद्रात राहात असूनही डॉल्फिन हे सस्तन प्राणी आहे विचार ॲरिस्टॉटलनंच पहिल्यांदा मांडला होता हे पाहिलं की आश्चर्य वाटतं.


बायॉलॉजीचा अभ्यास करताना निसर्गातल्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या रचना वेगवेगळ्या प्रमाणात क्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या असतात असं त्याच्या लक्षात आलं होतं.

त्यामुळे साधी रचना असलेले प्राणी जीवनाच्या सर्वात खालच्या पायरीवर असावेत आणि अधिकाधिक विकसित होत गेलेले प्राणी वरच्या पायऱ्यांवर असावेत असं त्याला वाटत होतं.त्यानं या कल्पनेला 'जीवनाची शिडी' असं म्हटलं होतं. पण तरीही इतक्या जवळ पोहोचूनही कोणत्याही प्रगत प्राण्याची जात आधीच्या कमी विकसित प्राण्यापासून उदयाला येत असावी का हा विचार त्याच्या मनात दूरवरही डोकावला नव्हता हे विशेष! अर्थात,ही संकल्पना उत्क्रांतिवादात येते. पण तरी ॲरिस्टॉटलच्या या कामामुळे त्यानं झूऑलॉजी (प्राणिशास्त्र) या बायॉलॉजीच्या शाखेचा पाया रचला हे नक्की.त्यामुळेच ॲरिस्टॉटलला 'फादर ऑफ झूऑलॉजी' म्हणतात.


आपल्या सभोवती इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत की सगळ्यांची नोंद आणि माहिती ठेवणं आपल्या आवाक्यातलं काम नाही असं त्याला वाटलं होतं.पण तरीही प्राण्यांचे वेगवेगळे गट पाडले पाहिजेत आणि त्यांची गटवार नोंदणी व्हायला हवी असा अगदी नवीनच विचार ॲरिस्टॉटलनं त्याच वेळी मांडून ठेवला होता हे विशेष! अर्थात, ही कल्पना जरी खूपच महत्त्वाची होती तरी हे काम प्रचंड अवघड होतं. या कल्पनेमुळे ॲरिस्टॉटल आपल्या काळापेक्षा जवळपास २००० वर्ष पुढे होता.त्यामुळेच हे काम करायला पुढे अठराव्या शतकात कार्ल लिनियस हा बॉटनिस्ट जन्म घेणार होता.


अजून तर बॉटनी या बायॉलॉजीच्या शाखेचाही उगम झाला नव्हता.बॉटनीची कल्पना मात्र याच काळातला थिओफ्रॉस्ट्स हा ॲरिस्टॉटलचाच विद्यार्थी मांडणार होता.कारण ॲरिस्टॉटलनं जरी प्राण्यांबद्दल काम केलं होतं तरी त्यानं वनस्पतींकडे फारसं लक्ष दिल नाही असं दिसतं.


ॲरिस्टॉटलच्या मृत्यूनंतर त्यानं स्थापन केलेल्या विद्यापीठाची धुरा त्याचाच शिष्य थिओफ्रॉस्ट्स (ख्रिस्तपूर्व ३७१ ते २८७) याच्या खांद्यावर आली.

थिओफ्रॉस्ट्सन लायसियम विद्यापीठाची जबाबदारी तर व्यवस्थित पार पाडलीच,पण त्यानं बॉटनी या बायॉलॉजीच्या शाखेचाही पाया घातला.त्यानं जवळपास ५०० वनस्पतींची काळजीपूर्वक निरीक्षणं करून त्यांची नोंद केली होती.


थिओफ्रॉस्ट्स हे त्याचं खरं नाव नव्हतं.त्याचं खरं नाव हे टायरॅट्मस होतं.पण टायरॅट्मस जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बोलायला लागायचा तेव्हा सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहायचे,इतक्या रसाळपणे तो एखादा विषय मांडायचा. त्याच्या याच गुणामुळे ॲरिस्टॉटलनं त्याचं नाव थिओफ्रॉस्ट्स म्हणजे ग्रीकमध्ये 'वाणीची रसाळता' असं ठेवलं होतं.ॲरिस्टॉटलचा तो आवडता शिष्य होता.त्याची आकलनक्षमता आणि ग्रहणक्षमता खूपच चांगली होती.त्यामुळे लायसियममध्ये आल्यानंतर काहीच काळात ॲरिस्टॉटलनं त्याला आपल्या लेखनकार्यात सामावून घेतलं.


त्यावेळच्या प्रथेप्रमाणे थिओफ्रॉस्ट्सनं तत्त्वज्ञान, भाषा,व्याकरण,भौतिकशास्त्र आणि एथिक्स याही विषयांमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. तरीही त्याला वनस्पतींबद्दल जास्त आकर्षण होतं असं त्याच्या अभ्यासावरून लक्षात येतं. 


लायसियममध्ये असताना ॲरिस्टॉटलनं प्राण्यांवर अभ्यास केला आणि त्याच वेळी थिओफ्रॉस्ट्सनं वनस्पतींचा अभ्यास केला अशा नोंदी आहेत. याच काळात साधारणपणे ख्रिस्तपूर्व ३३५ मध्ये ॲरिस्टॉटल जेव्हा अलेक्झांडरला शिकवायला अलेक्झांड्रियामध्ये गेला,तेव्हा थिओफ्रॉस्ट्सही त्याच्या सोबत होता.


थिओफ्रॉस्ट्सनं त्यावेळच्या प्रचलित विषयांवर तर लिहिलंच,पण त्याच्या लिखाणाचा मुख्य हेतू हा ॲरिस्टॉटलनं सुरू केलेलं नॅचरल सायन्सवरचं लिखाण पुढे नेणं हा होता.त्यानं लिहिलेल्या पुस्तकांपैकी 


'हिस्टोरिया प्लँटारम' म्हणजेच 'द एन्क्वायरी इनटू प्लँट्स' आणि 'ऑन द कॉजेस ऑफ प्लँट्स' या वनस्पतींवरच्या दोन पुस्तकांनी वनस्पतिशास्त्राचा पायाच रचला. यामुळेच थिओफ्रॉस्ट्सला वनस्पतिशास्त्र म्हणजे 'बॉटनीचा पितामह' म्हटलं जातं.


थिओफ्रॉस्ट्सनं लिहिलेल्या 'द एन्क्वायरी इनटू प्लँट्स' या पुस्तकाचे तर दहा खंड होते.त्यात त्यानं त्याला आढळलेल्या जवळपास सगळ्याच वनस्पतींची त्यांचे उपयोग,खाण्यायोग्य वनस्पती, त्या आढळणारी ठिकाणं,

त्यांचा आकार,त्यांच्या पानाफुलांची रचना अशा जवळपास सगळ्याच अंगांनी निरीक्षणं आणि अभ्यास करून वर्णनं लिहिली होती.पहिल्या पुस्तकात झाडांच्या अवयवांबद्दल लिहिलं आहे,दुसऱ्या प्रकरणात झाडांच्या पुनरुत्पादनाबद्दल लिहिलं आहे. तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या पुस्तकांत त्या झाडांची इतर वैशिष्ट्यं आणि त्यांचे उपयोग लिहिलेले आहेत.सहाव्या पुस्तकांत लहान झुडपांबद्दल (श्रब्ज) लिहिलं आहे.सातव्या पुस्तकात खाण्यायोग्य बियांच्या झाडांबद्दल लिहिलं आहे.आठव्या पुस्तकात डिंक,रबर, ताडी,चीक असे वेगवेगळे स्राव तयार करणाऱ्या झाडांबद्दल लिहिलं आहे.


'ऑन द कॉझेस ऑफ प्लॅट' हे पुस्तक खरं तर आठ खंडांचं होतं.पण त्याचे आता सहाच खंड उपलब्ध आहेत.या खंडांमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड कशी करावी याचं सविस्तर वर्णन त्यानं लिहून ठेवलं आहे.गंमत म्हणजे झाडांची पानं,फुलं,फळं यांच्या वासांबद्दलही त्यानं चक्क एक पुस्तक लिहिलं आहे.


झाडांच्या योग्य वाढीसाठी वातावरण आणि माती हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात हे त्यानं ओळखलं होतं.त्यानं काही वनस्पतींना नावंही दिली.त्यामुळेच बॉटनीमध्ये काही वेळा झाडांच्या नावांच्या उल्लेखानंतर थिओफर (Theophr) असा त्याच्या नावाचं संक्षिप्त रूपही लिहिलेलं पाहायला मिळतं.गंमत म्हणजे नावाचं असं संक्षिप्त रूप (L) लिनियसनं दिलेल्या नावांमागेही दिसून येतं


अलेक्झांड्रिया


अलेक्झांडर द ग्रेट यानं पर्शियन राज्य जिंकून घेतल्यानंतर संपूर्ण मेडिटेरियन भागात ग्रीक संस्कृती वेगानं पसरली.

अलेक्झांडरचेच पाईक (फॉलोअर्स) असलेल्या टॉलेमीच्या अखत्यारित इजिप्त आलं. त्यानंतर नव्यानंच वसलेल्या अलेक्झांड्रियात ग्रीकांचे घोळके स्थलांतरित व्हायला लागले.अलेक्झांड्रिया हे लवकरच शिक्षणाच आणि संशोधनाचं केंद्र बनलं.तिथे मोठं म्युझियम (वस्तुसंग्रहालय) बांधलं गेलं. अलेक्झांड्रियाच्या विद्यार्थ्यांची लवकरच हुशार गणिती,अवकाशविज्ञान,

भूगोल आणि भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ख्याती पसरायला लागली.याही ठिकाणी ख्रिस्तपूर्व ३०० मध्ये हिरोफिलस आणि ख्रिस्तपूर्व २५० मध्ये हिरोफिलसचाच शिष्य इरॅसिस्ट्स हे दोन महत्त्वाचे बायॉलॉजिस्ट्स होऊन गेले.


त्या काळी बायॉलॉजी,फिजिऑलॉजी किंवा ॲनॅटॉमी शिकण्यासाठी मानवी शरीराचं विच्छेदन करणं हा ख्रिश्चन धर्मानुसार दखलपात्र गुन्हा होता.त्यामुळे बायॉलॉजिस्टना असा अभ्यास करण्यावर खूपच बंधनं होती.पण या लोकांनी उघडपणे नाही,पण आपल्या खासगी (प्रायव्हेट ) प्रयोगशाळेत मानवी प्रेतं मिळवून यावर नक्कीच अभ्यास केला होता. हिरोफिलसनं मानवी मेंदूवर बराच अभ्यास केला होता.माणसाच्या मेंदूकडे लक्ष देणारा हिरोफिलस हा पहिलाच वैज्ञानिक होता. माणसाची बुद्धी ही माणसाच्या मेंदूत असते अशी थिअरीच त्यानं ठामपणे मांडली होती. याआधी अल्केमॉन आणि हिप्पोक्रॅट्स हेही मेंदू हा बुद्धीला कारणीभूत असतो असं मानत होते. पण ॲरिस्टॉटल मात्र मेंदू हा शरीरातली उष्णता कमी करतो असं म्हणत होता.हिरोफिलसनं तर आपल्या शरीरातल्या इतर अवयवांकडून मेंदूकडे जाणाऱ्या सेन्सरी आणि मोटर नर्व्हज शोधल्या होत्या! त्यानं लिव्हर,स्प्लीन आणि डोळ्यांतला रेटिनाही पाहिला होता.त्यानं ओव्हरीज आणि प्रोस्टेट ग्लँड्स यांचंही वर्णन करून ठेवलं होतं. पुढे इरॅसिस्ट्रसनं मानवी मेंदूचे सेरेब्रम आणि सेरेबेलम असे दोन भाग असतात हेही निरीक्षण करून नोंदवून ठेवलं होतं.याशिवाय माणसाच्या मेंदूवर प्राण्याच्या मेंदूपेक्षा जास्त सुरकुत्या असतात हेही त्यानं पाहिलं होतं.त्यामुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा जास्त हुशार असावा असा तर्कही त्यानं केला होता.


हिरोफिलसनं आपला शिष्य इरॅसिस्ट्रस याच्यासोबत अलेक्झांड्रियामध्ये स्कूल ऑफ ॲनॅटॉमीची स्थापना केली.प्लिनीच्या मते तर इरॅसिस्ट्रस हा ॲरिस्टॉटलच्या मुलीचा मुलगा म्हणजे ॲरिस्टॉटलचा चक्क नातू होता! आणि तिथे हिरोफिलस आणि इरॅसिस्ट्रस या दोघांनी मिळून ॲनॅटॉमीवर बरंच संशोधन केलं.प्राण्यांचं डिसेक्शन करणारा इरॅसिस्ट्रस हा पहिलाच मानावा लागेल.त्यानंच पहिल्यांदा प्राण्याच्या शरीरातल्या धमन्या आणि शिरा यांच्यातला फरक ओळखला.पण धमन्यांमध्ये हवा भरलेली असते असं तो मानत होता.शिवाय,

शरीरातल्या न्यूमावरही त्याचा विश्वास होता.पण अशा

प्रकारे प्राण्यांचं आणि कधीकधी माणसांचं डिसेक्शन केल्याबद्दल हिरोफिलस आणि इरॅसिस्ट्स यांना ख्रिश्चन धार्मिक लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं.


इरॅसिस्ट्रसच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी माहिती मिळते.पण त्याच्याबद्दल एक आख्यायिका फारच प्रसिद्ध आहे.


इरॅसिस्ट्रस हा सिलेयुकस राजाच्या दरबारात वैद्य होता. त्याची पहिली पत्नी वारल्यानं त्यानं स्ट्राटोनिस नावाच्या सुंदर महिलेशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला एक मुलगीही झाली.एकदा या सिलेयुकस राजाचा पहिल्या राणीपासून झालेला मोठा मुलगा अँटिओचस फारच आजारी पडला.दिवसेंदिवस त्याची तब्येत ढासळायला लागली.नंतर तर त्यानं स्वतः ला सगळ्यांपासून दूर एकांतवासातच बंदिस्त करून घेतलं.त्यामुळे राजानं इरॅसिस्ट्रसला पाचारण केलं. 


इरॅसिस्ट्रसलाही अँटिओचसला नेमकं काय झालंय ते कळेना.नंतर स्ट्राटोनिस जेव्हा अँटिओचसच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करते तेव्हा अँटिओचसचं हृदय जोरात धडधडतं, त्याला कापरं भरतं,त्याचा वर्ण लाल होतो हे इरॅसिस्ट्रसनं ताडलं.त्यानंतर त्यानं याबद्दल अँटिओचसला विचारल्यावर आपण आपल्याच सावत्र आईच्या प्रेमात पडलो असल्याची कबुली त्यानं इरॅसिस्ट्रसपाशी दिली.आणि बापाच्या भीतीनं आपण आपल्या प्रेमाबद्दल कुणालाही न सांगता असं एका खोलीत स्वतःला बंद करून संपून जाण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यानं कबूल केलं.आता इरॅसिस्ट्रसपुढे पेच उभा राहिला.अँटिओचसचं डायग्नोसिस होत नाही असं म्हटलं तर खोटं बोलल्यासारखं होईल आणि स्वतःच्या डोळ्यांदेखत तरुण उमद्या अँटिओचसला प्रेमात झुरून मरताना पाहावं लागेल.आणि खरं सांगावं तर राजा आपल्याला मृत्युदंडही द्यायला मागेपुढे पाहणार नाही. मग त्यानं सांगितलं,की अँटिओचस आपल्याच म्हणजे इरॅसिस्ट्रसच्याच बायकोच्या प्रेमात पडलाय झालं! मग राजा इरॅसिस्ट्रसला आपली बायको अँटिओचसला देऊन टाक असं म्हणत त्याच्या मागेच लागला.यावर इरॅसिस्ट्स म्हणाला, "अशी माझी बायको कशी काय मी दुसऱ्या कुणाला देऊन टाकू? महाराज,माझ्या जागी तुम्ही असला असता तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही तुमची बायको दिली असती का ?" यावर सिलेयुकस म्हणाला, "होय तर, मी माझी बायको नक्कीच दिली असती."आता इरॅसिस्ट्रस तत्काळ उत्तरला,"महाराज, देऊन टाका मग तुमची

बायको.तुमचा मुलगा तुमच्याच बायकोच्या प्रेमात पडला आहे !" यावर आपला शब्द राखणाऱ्या सिलेयुकसनं आपली सौंदर्यवती बायको आणि शिवाय काही राज्य आपल्या प्रिय मुलाला देऊन टाकलं आणि इरॅसिस्ट्रसच्या मुत्सद्दीपणाबद्दल त्यालाही भरभक्कम मानधन दिलं !


बायॉलॉजीच्या अभ्यासाची इतकी चांगली सुरुवात झाल्यानंतर मात्र अलेक्झांड्रिया विद्यापीठातल्या अभ्यासानं वेगळंच वळण घेतलं.आता इथे विज्ञानापेक्षा एथिक्स,मॉरल फिलॉसॉफी आणि व्हेटोरिक अभ्यासच जास्त व्हायला लागले.शिवाय आता रोमनांचं राज्यही आलं होतं.या सगळ्यात मध्ये मध्ये युद्ध आणि लढाया यांचीही धुमश्चक्री चालायची.त्यामुळे आयोनियन्समध्ये सुरू झालेली आणि जवळपास चार शतकं चाललेली ही परंपरा लयाला जायला लागली होती.


यामध्ये बायॉलॉजी या विषयाचं बरंचसं नुकसान झालं.काही धर्मामध्ये मानवी शरीर हे देवाची निर्मिती असल्यामुळे ते पवित्र असतं अशीही धारणा होती.त्यामुळे माणसाला त्याची चिरफाड करण्याचा काही अधिकार नाही असा विचार वर येत होता.तर काही धर्मांमध्ये मृत्यूनंतरचं जीवन जगण्यासाठी माणसाला त्याच्या शरीराची आवश्यकता असते,नाहीतर त्याचा आत्मा भरकटून जाईल अशी समजूत असल्यानं मृत शरीरांची चिरफाड न करता ती तशीच जपून ठेवली पाहिजेत असा विचार होता.थोडक्यात, माणसानं प्राण्यांच्या किंवा माणसांच्या शरीराची चिरफाड करणं हे आताच्या तत्त्वात न बसल्यामुळे कायद्यानं यावर बंदी घातली गेली. त्यामुळे बायॉलॉजीची प्रगतीच खुंटली होती.


१० जून २०२३ या लेखमालेतील पुढील भाग..