ख्रिस्तपूर्व काही शतकांच्या दरम्यान भारतात आयुर्वेदानं चांगलीच प्रगती केली होती.पण याच वेळी पाश्चिमात्य देशांमध्ये आणि नंतरच्या काळात काही प्रमाणात भारतामध्येही सगळं विश्व हे सर्वशक्तिमान देवाच्या इच्छेनुसार आणि नियंत्रणानुसार चालतं ही समजूत मूळ धरायला लागली होती.त्यामुळे माणूस समोर दिसणाऱ्या जिवंत गोष्टींचं निरीक्षण करण्याऐवजी ध्यानधारणा,
भक्ती आणि उपासनेतून न दिसणाऱ्या अज्ञात देवाचा शोध घेत होता.या गोष्टींमध्ये सगळ्याच धर्मांतले धर्मगुरू,
साधू,संत आणि भोंदू बाबा आघाडीवर होते आणि सर्वसामान्य माणसांनी त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरूनच जाणं अपेक्षित होतं.यामुळेच मग जो माणूस विज्ञानाची कास धरेल त्याला वाळीत टाकलं जाणं स्वाभाविकच होतं. त्यावेळच्या कायद्यानुसार विज्ञानवादी लोक पापी होते. त्यामुळे साहजिकच कोणत्याही गोष्टीचा असा अभ्यास करणारे लोक आणि त्यांच्या अभ्यासातून आलेली निरीक्षणं आणि निष्कर्ष कुणीही जपून ठेवायचा प्रयत्न केला नाही.
याला अपवाद म्हणजे प्राचीन ग्रीक लोकांनी हे बदलायचा प्रयत्न केला.ग्रीक लोक मुळातच कुतूहल असणारे,
बडबडे,वाद-चर्चा करणारे, हुशार,चुळबुळे आणि हे कधीकधी असंबद्ध वाटावेत असे होते! ग्रीकांमध्येही अनेक धार्मिक रूढी, परंपरा आणि अनेक देवदेवता होत्या. गंमत म्हणजे जगातल्या सगळ्याच धर्मांत अनेक खुळचट परंपरा आणि अंधश्रद्धा असूनही जगातल्या प्रत्येकच माणसाला आपलाच धर्म योग्य,लॉजिकल आणि प्रगत वाटतो! हिंदूंमध्ये देवीच्या कोपामुळे देवी हा रोग होतो.अशी समजूत होती तशीच ग्रीकांमध्ये अपोलो नावाच्या देवतेच्या कोपामुळे माणसाला रोग होतात अशी धारणा होती! त्यामुळे त्या त्या देवतेची पूजाअर्चा केल्यानं, तिला नैवेद्य दिल्यानं किंवा बळी चढवल्यानं रोग बरा होतो अशा अनेक समजुती जनमानसात घट्ट रुजल्या होत्या.
विशेष म्हणजे अशा पार्श्वभूमीवर त्याही काळात ग्रीकांमध्ये काही चांगले तत्त्ववेत्ते निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू हे चित्र बदलायला लागलं.
ख्रिस्तपूर्व ६०० मध्ये त्या काळातल्या आयोनियामध्ये म्हणजेच आताच्या तुर्कीमध्ये येणाऱ्या एजियन बेटांच्या भागांत अनेक तत्त्वज्ञ होऊन गेले.या लोकांनी अंधश्रद्धेचा पगडा झुगारून निखळ ज्ञान जगापुढे आणण्याचा मार्ग स्वीकारला.या सगळ्याची सुरुवात थेल्स या तत्त्वज्ञापासून होते.
थेल्स ऑफ मिलेट्स हा ख्रिस्तपूर्व सातव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेलेला गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता.आजच्या तुर्कस्तानात तो राहात होता. त्याला वेगवेगळ्या वस्तू स्वतः तयार करून पाहायला आवडायच्या, त्यानं त्या काळी सूर्यग्रहणाचं आधीच भाकीत केलं होतं.हे जग कशाचं बनलेलं आहे? याचं उत्तर दैवी गोष्टींत नाही तर निसर्गनियमांमध्ये शोधा असा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा पाश्चिमात्य जगात तो पहिलाच तत्त्वज्ञ होता. आज आपल्याला या विचारामध्ये प्रचंड महत्त्वाचं काही वाटणारही नाही.पण या अचाट विश्वात फेकल्या गेलेल्या माणसानं पहिल्यांदाच भूतंखेतं, देवदेवता वगैरेंपेक्षा कारणमीमांसेनं या विश्वाच्या अस्तित्वाचा अर्थ लावायचा प्रयत्न केला होता हे त्या काळी खूपच धाडसाचं आणि विद्वत्तेचं होतं. ख्रिस्तपूर्व ५४६ साली भरलेले ऑलिम्पिक्स गेम्स बघताना त्याचा मृत्यू झाला.यानंतर ३० च वर्षांनी इथेच पायथॅगोरसचा जन्म झाला. त्यानंतर ३०० वर्षांनी युक्लिडचा जन्म झाला.
थेल्सला ग्रीक परंपरेतला पहिला तत्त्वज्ञ म्हटलं जातं.दुर्दैवानं थेल्सनं स्वतः लिहिलेलं काहीही साहित्य आज उपलब्ध नाही.
प्रत्येक गोष्ट ही कोणत्या देवतेच्या इच्छेनुसार न होता कोणत्यातरी विशिष्ट कारणामुळे होते हे या ग्रीक तत्त्वज्ञांनी मांडलं आणि इथूनच विज्ञानाच्या पायाभरणीला सुरुवात झाली.यातूनच हे विश्व कसं निर्माण झालं?दिवस आणि रात्र कसे निर्माण होतात ? गतीला नियम आहेत का? अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरू झाला.या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणारे हे पहिले काही ग्रीक तत्त्वज्ञ आणि त्यांनी केलेलं बरंचसं काम आज नामशेष झालंय. यापैकी काही लोकांची नावं आणि त्यांची काही मध्यवर्ती तत्त्वं इतिहासाला ज्ञात आहेत. यापैकी रॅशनॅलिझम (तर्कसंगतता) हे एक तत्त्व आहे. विश्व कसं चालतं याची आपण कारणमीमांसा करू शकतो असं तत्त्व नॅशनॅलिझममध्ये मांडलं आहे. त्या वेळी अस्तित्वात असलेली रोमन साम्राज्यंही नष्ट झाली,पण या तत्त्वज्ञांची नावं आणि शिकवण आजही पुनरुच्चारित केली जात.
आयोनिया
आयोनियामध्ये असा एक माणूस होता, की ज्यानं प्राण्याच्या उपयोगापेक्षा प्राण्याच्या शरीराच्या आत नेमकं काय असतं आणि कोणता अवयव कसा काम करतो हे शोधण्यासाठी पहिल्यांदाच एक प्राणी काळजीपूर्वक कापला आणि त्यानं त्या प्राण्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली.याच क्षणी कत्तलेचं रूपांतर शरीरविच्छेदनात (डिसेक्शन) आणि त्या माणसाचं रूपांतर पहिल्या बायॉलॉजिस्टमध्ये झालं.!
आणि त्याच वेळी रॅशनॅलिझमनं पहिल्यांदा बायॉलॉजीत प्रवेश केला! आयोनियामधल्या या माणसाचं नाव होतं,अल्केमॉन!
ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या या अल्केमॉननं प्राण्याच्या डोळ्यांतल्या नव्हेजचं वर्णन करून ठेवलं आहे.त्यानं अंड्यात वाढणाऱ्या कोंबडीच्या पिलाचं निरीक्षण करून त्याबद्दल लिहून ठेवलं आहे. यामुळेच तो अॅनॅटॉमीचा आणि एंब्रियॉलॉजीचा पहिला विद्यार्थी मानला जातो. अल्केमॉननं कानापासून घशाला जोडणाऱ्या बारीक नळीचंही (युस्टेशियन ट्यूब) वर्णन करून ठेवलं आहे.याचा शोध तर सोळाव्या शतकातल्या बार्टोलोमियो युस्टॅशी यानं लावला असं आपल्याला माहीत असतं. पण खरं तर अनेक वर्ष अल्केमॉनचं हे ज्ञान हरवलं होतं आणि ते तब्बल दोन हजार वर्षांनी पुन्हा सापडलं !
तरीही तर्कसंगत (नॅशनॅलिस्टिक) बायॉलॉजीची सुरुवात खऱ्या अर्थानं केली ती हिप्पोक्रॅट्सनं. हिप्पोक्रॅट्सचा जन्म ख्रिस्तपूर्व ४६० मध्ये ग्रीसमधल्या कॉस बेटावर झाला.कॉसच्या बेटावर अस्क्लेपियस नावाच्या ग्रीक आरोग्यदेवतेचं मंदिर होतं. त्या काळचं ते मंदिर म्हणजे आजच्या मेडिकल कॉलेजसारखंच होतं. आणि तिथं शिकणारे प्रिस्ट्स हे आजच्यासारखे वैद्यकीय ज्ञान घेऊन बाहेर पडणारे डॉक्टर्सच असायचे!
यात हिप्पोक्रॅट्सनं मोलाची भर घातली. त्या वेळच्या अस्क्लेपियस मंदिराला हिप्पोक्रॅट्सनं खूप मोठ्या सन्मानपूर्वक पदावर नेऊन पोहोचवलं. पण हे करताना त्यानं अंधश्रद्धा किंवा देवभोळा ढोंगीपणा बाजूला सारून पूर्णपणे तार्किक दृष्टिकोन निर्माण केला. हिप्पोक्रॅट्सच्या मते निरोगी माणसाच्या शरीरात सगळे अवयव सुसंगतपणे वागत असतात.पण जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा हा समतोल ढासळलेला असतो. त्या वेळी अशा माणसाला शुद्ध हवा,साधं सात्त्विक अन्न आणि विश्रांती हे सगळं देऊन त्याच्या शरीरातला ढासळलेला समतोल पुन्हा पूर्वपातळीवर आणणं हे वैद्यकाचं काम आहे असं हिप्पोक्रॅट्सचं म्हणणं होतं. ख्रिस्तपूर्व ४०० दरम्यान त्यानं 'ऑन द सॅक्रिड 'डिसीज' नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यानं 'कोणताही रोग होण्याशी देवदेवतांचा किंवा भूताखेतांचा काहीही संबंध नसतो. रोग होण्याला काहीतरी कारण नक्कीच असतं आणि प्रत्येक रोगाला काहीतरी उपचारही असलेच पाहिजेत' ठासून सांगितलं आहे.अर्थात,अनेक रोगांची कारणं आणि त्यावरचे उपाय त्या वेळी माहीत नसले तरी त्याही रोगांच्या उपचारावर हेच तत्त्व लागू पडतं हे त्यानं ठासून सांगितलं आहे.
थोडक्यात, त्यानं 'आपलं शरीर स्वतःच स्वतःला बरं करायचा प्रयत्न करत असतं आणि आपण त्या शरीराला बरं होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण केलं पाहिजे' असं सुचवलं. हिप्पोक्रॅट्सनं नंतर स्वतःच एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं. त्याच्या मृत्यूनंतरही ते अनेक शतकं चालू राहिलं. गंमत म्हणजे त्या काळातल्या डॉक्टर्सवर हिप्पोक्रॅट्सचा इतका प्रभाव होता, की त्याच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी किंवा शतकांनी
इतरांनी लिहिलेल्या कागदपत्रांवर आणि पुस्तकांवरही त्याचंच नाव घातलं गेलं होतं !
आज प्रत्येकाला वैद्यकाची पदवी मिळते तेव्हा जी हिप्पोक्रॅट्स ओथ (शपथ) घ्यावी लागते तीही मुळी हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलीच नाहीये! त्याच्या मृत्यूनंतर ती किमान सहा शतकांनी ती लिहिली गेली असं लक्षात आलंय.गेल्या हजारो वर्षांमध्ये त्या शपथेत अनेक बदल झालेले असले,तरी आजही प्रत्येक डॉक्टरला या व्यवसायात पडण्यापूर्वी ही शपथ घ्यावी लागते.
त्या मूळच्या शपथेचा सारांश असा : मी अपोलो देवतेची शपथ घेऊन सांगतो, की मी माझ्या वैद्यकीय व्यवसायाशी अतिशय प्रामाणिक राहीन. तसंच मी हे काम करत असताना ज्या ज्या लोकांशी माझा संबंध येईल त्या सर्वांशी मी सहानुभूतीनं वागेन. मी भ्रष्टाचार करणार नाही.मी माझ्या ज्ञानाचा वापर फक्त आजारी माणसांना बरं करण्यासाठी करेन.मी कुणालाही कधीही विषारी औषध देणार नाही.मी कुठल्याही स्त्रीला तिच्या गर्भाचा नाश होण्यासाठी कधीही कुठलंही औषध देणार नाही.मी रुग्णांच्या खासगी बाबींविषयी किंवा त्यांच्या आजारांविषयी दुसऱ्यांशी उगीच चर्चा करणार नाही.मी कोणत्याही घरात गेलो तर तिथे मी रुग्णाला बरं करण्याचा सर्वतोपरीनं प्रयत्न करेन.मी जाणूनबुजून काहीही वेडंवाकडं करणार नाही.
हिप्पोक्रॅट्सच्या नावावर इतकं लिखाण प्रसिद्ध झालं,की ते सगळं काम त्यानं एकट्यानं केलेलं असणं शक्यच नाही असं अनेकांचं मत आहे. किंबहुना त्यातला बराच भाग त्याचे विद्यार्थी आणि हिप्पोक्रॅट्सचे समकालीन असलेल्या समविचारी डॉक्टर्सनी लिहिलेला असला पाहिजे, असं म्हटलं जातं.त्याच्या नावावर इतकं लिखाण प्रसिद्ध आहे,की हिप्पोक्रॅट्सनं एकट्यानं ते करायला १०४ वर्ष लागली असती !
हिप्पोक्रॅट्स नावाचे सात जण एकाच कुटुंबात होते आणि त्या सगळ्यांनी मिळून हे काम केलेलं होतं असाही एक समज आहे!
हिप्पोक्रॅट्स किती साली वारला याविषयीही गोंधळ आहे.काहीजणांच्या मते तो वयाच्या ८३ व्या वर्षी वारला,तर काही जणांच्या मते वयाच्या ९० व्या वर्षी.काही जण तर तो १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असताना वारला असं मानतात.
दुसरी गोष्ट म्हणजे हे लिखाण हिपोक्रॅटसनंच लिहिलं असावं असं लिखाण चक्क एपिलेप्सी, म्हणजे फिट्स किंवा अपस्मार या आजाराबाबत बद्दल सापडतं.या आजारात रुग्णाचा स्वतःच्या स्नायूंवरचा ताबा जातो आणि बघणाऱ्याला विचित्र वाटावेत असे झटके रुग्णाला यायला लागतात. यात हा रुग्ण स्वतःच्या इच्छेन अशा हालचाली करत नाहीये हे स्पष्ट कळतं.मग अशा वेळी हे नक्की भूतबाधा किंवा तशाचकसल्यातरी दैवी गोष्टीचा
परिणाम असावा यावर त्या वेळच्या कुणाचाही विश्वास बसला असता.शिवाय हा मेंदूचा किंवा नव्र्व्हस सिस्टिमचा आजार असावा असे त्या काळी कुणालाही कळणं शक्यच नव्हतं.
अशा परिस्थितीत हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलं वर्णन,
त्यातला तर्क आणि सुसंगतपणा पाहिला की हिप्पोक्रॅट्स खरोखरच विज्ञानाच्या वाटेवरचा पहिल्या काही वाटसरूंमधला एक होता याची खात्रीच पटत जाते.
या सगळ्यामुळे एखाद्याला आधुनिक बायॉलॉजीची सुरुवात कधी झाली याबद्दल एकच माणूस,एकच पुस्तक आणि एकच तारीख हवी असेल तर त्याचं उत्तर ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलं 'ऑन द सॅक्रिड डिसीज' हे असेल.! त्यामुळेच इतिहासात हिप्पोक्रॅट्सचा उल्लेख अनेकदा वैद्यकशास्त्राचा जनक म्हणून केला जातो.
हिप्पोक्रॅट्सच्या मते माणसाच्या विचारांचे तीन भाग पाडता येतात.वैचारिक गोष्टी माणसाच्या मेंदूत घडतात,
आत्मा माणसाच्या हृदयात असतो आणि विविध प्रकारच्या संवेदना आणि जाणिवा माणसाच्या यकृतात असतात.हिप्पोक्रॅट्सच्या अगोदर ख्रिस्तपूर्व ४९० ते ४३० मधल्या एम्पेडोकल्सनं म्हणून ठेवलं होतं,की जगातल्या सगळ्या गोष्टी आग,हवा,जमीन आणि पाणी या चार मूळ घटकांपासून बनलेल्या असतात.मग ती गोष्ट कुठलीही असू द्या,अगदी दगडासारखी साधी वस्तू असो की माणसाच्या शरीरासारखी विलक्षण क्लिष्ट बाब! अर्थातच, नंतर यात काही तथ्य नाही हे कळणार होतं.पण ते कळायला अनेक शतकांचा कालावधी पार करणं भाग असणार होतं.
एखाद्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला त्या रुग्णाविषयी सगळी माहिती असली पाहिजे असं हिप्पोक्रॅट्सला वाटे.त्याच्या खाण्याच्या सवयी,तो राहतो तिथला परिसर,तो कुठे आणि काय काम करतो,वगैरे. ही खरंच महत्त्वाची कल्पना होती.आणि हे हिप्पोक्रॅट्सला त्या काळी सुचणं हेही खरंच ग्रेट होतं! पण त्या काळी ज्ञानाला मर्यादा होत्या.उदाहरणार्थ,
ज्या भागात मलेरियाची साथ यायची तिथं बहुधा ओलसर भाग असे आणि त्यात अनेक छोट्या छोट्या वनस्पती उगवलेल्या असायच्या,हे कळायचं. पण तिथं डासांची वाढ जास्त सुकर होते हे मात्र हिप्पोक्रॅट्सला उमगलेलं नव्हतं.त्यामुळे वनस्पती आणि रोग यांचाच काहीतरी संबंध असला पाहिजे असं त्याला वाटे!
त्यातून गोंधळ म्हणजे हिप्पोक्रॅट्सचा ज्योतिषावर गाढ विश्वास होता.सूर्य,चंद्र,तारे आणि ग्रह यांच्या फिरण्याचा वगैरे मानवी आरोग्यावर खूप परिणाम होतो असं त्याला वाटे. किंबहुना ज्या डॉक्टरचा ज्योतिषावर विश्वास नाही त्याला डॉक्टर मानताच कामा नये,असं तो म्हणे.पण त्याचबरोबर धार्मिकतेचा आणि देवाचा आरोग्याशी काहीही संबंध नसतो असंही त्याला वाटे.त्या काळात त्याला असं वाटणं हे जबरदस्तच होतं।
हिप्पोक्रॅट्सचा ह्युमरिझम नावाच्या संकल्पनेवर दृढ विश्वास होता. या संकल्पनेनुसार माणसाच्या यकृतात चार प्रकारचे द्रव किंवा रस निर्माण होत असतात.त्यांचे रंग वेगवेगळे असतात. त्यांच्यापैकी रक्त हे लाल द्रव माणसाला जिवंत बनवतं.पिवळं द्रव माणसाला शूर बनवतं.काळं द्रव माणसाला उदास बनवतं.पिवळा किंवा हिरवा कफ माणसाला मंद करून सोडतो. प्रत्येक माणसाच्या शरीरात हे चारही द्रव असतात,आणि त्यांच्या मिश्रणानुसार माणसाचा स्वभाव आणि त्याचं आरोग्य या गोष्टी ठरतात. जेव्हा हे चार द्रव योग्य प्रमाणात मिसळलेले असतात तेव्हा माणसाचं सगळं ठीकठाक सुरू असतं.पण जेव्हा त्यांचं प्रमाण बिघडतं तेव्हा माणूस आजारी पडतो.
आज हे सगळं वाचून आपल्याला गंमत वाटली तरी हजारो वर्ष ही ह्युमरिझमची संकल्पना अतिशय लोकप्रिय होती.!
११ जानेवारी २०२३ लेखमालेतील पुढील लेख..