* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सत्याचे प्रयोग - मोहनदास करमचंद गांधी (१९२७)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१७/६/२३

सत्याचे प्रयोग - मोहनदास करमचंद गांधी (१९२७)

गांधीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधार्थ व्यतीत केलं.म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मकथेचं नाव 'सत्याचे प्रयोग' असे ठरवलं. सुरुवातीला ते 'परमेश्वर सत्य आहे' असं म्हणत, नंतर मात्र त्यांनी 'सत्य हाच परमेश्वर' असं ठामपणे म्हटलं.त्यांच्या या आत्मकथेत अहिंसेचं तत्त्वज्ञान मांडलं.अहिंसेचं पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक असल्याचं ते म्हणत असत.'सत्याचे प्रयोग' ही गांधीजींची आत्मकथा वाचायला अतिशय ओघवती,साधी आणि रोचक असून तिच्यात एका व्यक्तीचं अतिशय प्रांजलपणे केलेलं पारदर्शी कथन आहे.



या भूतलावर गांधींसारखा हाडामांसाचा मनुष्य खरोखरच होऊन गेला आहे,यावर भावी पिढ्या विश्वासही ठेवणार नाहीत.'असं विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईननं म्हटलं होतं आणि हे उद्गार किती खरे आहेत याची प्रचीती वारंवार येत राहते.


मोहनदास करमचंद गांधी यांना अख्खं जग महात्मा,तर भारतातही राष्ट्रपिता या विशेषणांनी ओळखतं.बॅरिस्टर झालेला एक तरुण,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गानं लढा देतो हे चित्र जगासाठी अद्भुत तर होतंच, पण एखाद्या चमत्कारासारखंही होतं.गांधीजींचा आयुष्याचा पट बघताना तो किती मोठा आणि व्यापक आहे हे जाणवतं.गांधीजी कळण्यासाठी ते समजून घेत घेत प्रवास करावा लागतो. 


गांधीजींच्या राजकीय,सामाजिक प्रवासाबरोबरच त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवास जाणून घेण्याविषयीची उत्सुकता वाढते.त्यासाठी 'सत्याचे प्रयोग' ही त्यांची आत्मकथा वाचलीच पाहिजे.या आत्मकथेच्या प्रतींची विक्री ५० लाखांच्या वर झाली आहे.


१९४४ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी सगळ्यात पहिल्यांदा गांधीजींना 'राष्ट्रपिता' या उपाधीनं संबोधलं.


देशातले लोक त्यांना 'बापू' अशी प्रेमानं हाक मारत.

रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना 'महात्मा'असं म्हटलं.

२ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिवस भारतात गांधी जयंती म्हणून,तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.


१९२५ ते १९२९ या काळात 'नवजीवन' या साप्ताहिकात गांधींजींनी लेख प्रसिद्ध केले.'यंग इंडिया' नावाच्या इंग्रजी आवृत्तीतून याच लेखांचं भाषांतर प्रकाशित होत असे.

नंतर हे सर्व लेख 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात आले.'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात गांधीजींचा बालपणापासून १९२१ पर्यंतचा प्रवास चित्रित केला आहे.यात आपलं लहानपण आणि अनेक आठवणी,बालविवाह,आपल्या आई-वडिलांबरोबर आणि पत्नीबरोबर असलेलं नातं,शिक्षणानिमित्त इंग्लंडचा प्रवास,दक्षिण आफ्रिकेतलं वास्तव्य आणि तिथलं सामाजिक काम,धर्माविषयीचं त्यांचं मत,भारतात परत येणं आणि सामाजिक आणि राजकीय कार्यातला त्यांचा सहभाग वगैरे मुद्दे यात येतात.पहिल्यांदा 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तकरूपात १९४८ साली अमेरिकेत 'पब्लिक अफेअर्स प्रेस ऑफ वॉशिंग्टन डीसी इथे प्रकाशित झालं. मूळ गुजराती भाषेत असलेले  हे पुस्तक महादेव देसाई यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केलं.यातला काही भाग महादेव देसाई यांचे मित्र आणि सहकारी प्यारेल नैय्यर यांनी भाषांतरित केला. सुरुवातीला या पुस्तकाची किंमत अवघी रुपया इतकी होती.त्या वेळी गुजराती आवृत्तीच्या ५० हजार प्रती विकल्या गेल्या होत्या.


गांधीजींचे जवळचे सहकारी आणि स्नेही यांच्या आग्रहामुळेच 'सत्याचे प्रयोग' किंवा 'आत्मकथा' प्रत्यक्षात साकारली गेली.एखादी आत्मकथा जेव्हा लिहिली जाते

,तेव्हा अनेक लोक तिला प्रमाण मानून स्वतः कसं वागायच हे ठरवत असतात.अशा वेळी त्यांची दिशाभूल झाली तर? अशी शंका एका स्नेहान गांधीजींजवळ बोलून दाखवली.त्या वेळी आत्मकथेच्या नावानं आपण आपल्या आयुष्यात केलेले सत्याचे प्रयोग याबद्दल आपण लिहू या असं गांधीजींनी ठरवलं.आपले प्रयोग हे पूर्णपणे अचूक आहेत,असा दावा गांधीजींनी कधीही केला नाही.

आपण आपलं तटस्थपणे आत्मपरीक्षण करून एक एक भावना तपासून आपल्याला जे काय सांगायचं आहे तेच मांडल आहे,असं गांधीजींनी म्हटलं आहे.तसंच आपले लिखाण प्रमाणभूत मानू नये;आपल्या प्रयोगांना दृष्टांतरूप मानून इतरांनी आपापले प्रयोग त्याच्या क्षमतेनुरूप करावेत,असंही त्यांनी सांगितलं.


'सत्याचे प्रयोग' या पुस्तकातल्या पहिल्या भागात लहानपणी लपूनछपून मांसाहार करणं,धूम्रपान करणं,मद्य पिण दागिन्यांची चोरी करणं अशा अनेक गोष्टींबद्दल गांधीजींनी लिहिलं आहे.त्या वयात हरिश्चंद्राच्या नाटकाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला.दुसरा प्रभाव हा 'श्रावण पितृभक्ती' या नाटकाचा त्यांच्या मनावर झाला. श्रावणबाळाचं आपल्या आई-वडिलांवर असलेलं प्रेम आणि भक्ती बघून त्यांचं अंतःकरण भरून आलं.वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबाशी झालेलं लग्न,त्यांच्याबरोबरचं असलेलं त्यांचं नातं, वडिलांचा मृत्यू आणि त्या वेळी त्यांच्या मनाला लागलेला एक प्रसंग,परदेशी प्रवास,

बॅरिस्टर होणं या सगळ्या गोष्टी पुस्तकाच्या पहिल्या खंडात गांधीजींनी मांडल्या आहेत.


पुस्तकाच्या दुसऱ्या भागात किंवा खंडात गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतल्या प्रवासाविषयी आणि तिथल्या परिस्थितीविषयी लिहिलं आहे. दक्षिण आफ्रिकेत त्यांना रेल्वेमधून ते केवळ काळे आहेत म्हणून धक्के मारून खाली उतरवण्यात आलं होतं.या घटनेचा त्यांचा मनावर खूप परिणाम झाला.त्यांच्यावर लिओ टॉलस्टॉय या विचारवंताचा खूप प्रभाव पडला.


तिसऱ्या भागात १८९६ साली गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतरचा काळ चित्रित करण्यात आला आहे. १९०१ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा मोठा प्रभाव पडला.१९०१ ते १९०६ या काळात गांधीजींनी ब्रह्मचर्य पालन या आपल्या प्रयोगाला वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाचं स्थान दिलं.


पुस्तकाच्या चवथ्या भागात पहिल्या महायुद्धाची परिस्थिती दाखवत गांधीजींचा त्या काळातला प्रवास,

स्वातंत्र्याविषयीचा विचार,तुरुंगवास अशा गोष्टींबद्दल बोललं गेलंय.शाकाहार,मातीचे आणि पाण्याचे प्रयोग,

इंग्रजांशी झालेली ओळख,प्लेग,सत्याग्रहाची सुरुवात,

उपवास,शिक्षणविषयक विचार,याबद्दल या भागात गांधीजींनी लिहिलं आहे.


पाचव्या भागात तुरुंगवास,पुण्यातला गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबरोबरचा प्रसंग, शांतिनिकेतन,आश्रमाची स्थापना,अहिंसा, सत्याग्रह,'नवजीवन' आणि 'यंग इंडिया',

राष्ट्रीय सभेत प्रवेश,खादी,चरखा,पहिल्या महायुद्धाची समाप्ती,स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार याविषयी गांधीजींनी लिहिलेलं आहे.


गांधीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधार्थ व्यतीत केलं.म्हणूनच त्यांच्या आपल्या आत्मकथेचं नाव 'सत्याचे प्रयोग' असंच आहे. सुरुवातीला ते परमेश्वर सत्य आहेत,असं म्हणत. नंतर मात्र त्यांनी सत्य हाच परमेश्वर,

असं ठामपणे म्हटलं.त्यांच्या या आत्मकथेत अहिंसेचं तत्त्वज्ञान मांडलं आहे.


अहिंसेचं पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक असल्याचं ते म्हणत असत. 


'सत्याचे प्रयोग' ही गांधीजींची आत्मकथा वाचायला अतिशय ओघवती,साधी आणि रोचक असून त्यात एका व्यक्तीचं अतिशय प्रांजलपणे केलेलं पारदर्शी कथन आहे.

गांधीजींचं आयुष्य आणि त्यांच्या संकल्पना यांच्या -

बद्दलचा अत्यंत महत्त्वाचा असा हा दस्तावेजदेखील आहे.


गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी गुजरात राज्याच्या काठियावाडजवळ पोरबंदर इथे करमचंद गांधी आणि पुतळीबाई गांधी या दांपत्याच्या पोटी झाला.

वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचं लग्न कस्तुरबा यांच्याशी झालं प्राथमिक शिक्षण राजकोट इथे झाल्यानंतर १८८७ साली गांधीजींनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यानंतर ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले.१८९१ साली म्हणजे सुमारे चार वर्षांनी ते आपला कायद्याचा अभ्यास पूर्ण करून भारतात परतले.त्यांनी वकिली सुरू केली,पण वकिलीत त्यांना फारसं यश मिळालं नाही.गांधीजी आणि कस्तुरबा या दांपत्याला हरिलाल,मणिलाल,रामदास आणि देवदास अशी चार मुलं होती.


लहान असताना गांधीजी स्वभावानं अत्यंत लाजाळू आणि भिडस्त होते.त्यांना व्यायाम आणि खेळ यांचा खूप कंटाळा होता आणि ते या गोष्टी टाळत असत.मात्र त्यांनी व्यायामाचा शिक्षणाशी काय संबंध असतो याविषयीची आपली मतं किती चुकीची होती हे मान्य केलं. शारीरिक शिक्षणाला मानसिक शिक्षणाबरोबरच शिक्षणात महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे,असं त्यांनी म्हटलं.


चांगलं हस्ताक्षर असलं पाहिजे,असाही गांधीजींचा आग्रह असे.गांधीजींचं स्वतःचं अक्षर सुवाच्य नसल्याची खंत त्यांना होती.शिक्षणामध्ये चांगलं हस्ताक्षर असण्याची गरज नाही,ही आपली लहानपणाची समजूत किती चुकीची होती हेही त्यांनी पुढे नमूद केलं.चांगलं अक्षर हे विद्येचं आवश्यक अंग असून मुलांनी आधी रेखाचित्रं काढावीत आणि मग अक्षरं गिरवायला शिकावीत,असं त्यांनी म्हटलं.


शिक्षणामध्ये मातृभाषेशिवाय हिंदी ही राष्ट्रभाषा,तसंच संस्कृत,फारसी,अरबी आणि इंग्रजी भाषाही असायला हव्यात,असं ते म्हणत.शिकत असताना धर्माचं योग्य शिक्षण मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.धर्म म्हणजे आत्मभान,धर्म म्हणजे आत्मज्ञान,असं त्यांनी धर्माबद्दल म्हटलं.


लहानपणी बिड्यांची थोटकं चोरून पिणं आणि ती मिळाली नाहीत तर बिड्यांसाठी पैशांची चोरी करणं हेही उद्योग आपण केल्याचं गांधीजींनी लिहिलं आहे.या गोष्टी मिळवण्याबाबतीत आपण परावलंबी आहोत आणि म्हणून आपण आत्महत्या केली पाहिजे असंही त्यांनी ठरवलं. धोतऱ्याच्या बिया खाल्ल्या तर माणूस मरतो, असं ऐकल्यामुळे त्यांनी काही बियादेखील खाल्ल्या.


आत्महत्येच नियोजन करणं सोपं,पण प्रत्यक्षात

ती अमलात आणणं कठीण काम असल्याच लक्षात आल्यावर त्यांनी तो विचार सोडून दिला.


पैसे चोरल्याची सवयदेखील त्यांनी अशीच सोडली.

आपल्या वडिलांजवळ चिठ्ठी लिहून त्यांनी माफी मागितली आणि पुन्हा कधीही अस करायचं नाही याचा निश्चय केला.स्वतःच्या चुकांकडे अलिप्तपणे,

तटस्थपणे पाहणं आणि त्या चुका दुरुस्त करणं हे सातत्यान केल्यामुळेच ते महात्मा झाले.सत्य आणि अहिंसा हीच त्यांची दोन शस्त्रं होती.


गांधीजींनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा प्रसंग खूप प्रामाणिकपणे कथन केला आहे.गांधीजींचे वडील भगंदराच्या (फिस्तुला,मूळव्याधीसारखा त्रास) विकाराने अंथरुणाला खिळून होते.अनेक वैद्यांचे उपाय सुरू होते.

डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता,पण वैद्यांनी मात्र त्यांचं उतारवय लक्षात घेऊन शस्त्रक्रिया करू नये, असा सल्ला दिला होता,गांधीजी आपल्या वडिलांचे पाय चेपत असत आणि त्यांची सेवा करत असत.त्याच वेळी कस्तुरबांना दिवस गेले होते. वडिलांचे पाय चेपत असतानाही गांधीजींच्या मनात कामवासनेचेच विचार असत. कधी एकदा आपण पत्नीकडे शयनगृहात जातो असं त्यांना वाटत असे.ज्या रात्री गांधीजींचे वडील वारले,त्या वेळी रात्री साडेदहा-अकराच्या

गांधीजींच्या काकांनी 'तू जा झोपायला,मी त्यांच्याकडे बघतो,असं म्हटल आणि गांधीजी खुशीतच आपल्या शयनकक्षात पोहोचले. कस्तुरबा गाढ झोपेत असतानाही त्यांनी त्यांना उठवलं.कस्तुरबांच्या गरोदरपणाच्या त्या परिस्थितीमध्ये दोघांमधले संबंध खरं तर त्याज्य होते,पण तरीही गांधीजींना त्याशिवाय काहीही सुचायच नाही.तशा परिस्थितीत गांधीजींना आपले वडील गेल्याची बातमी नोकराने दिली. वडिलांच्या अखेरच्या क्षणीही आपल्या मनात कामवासनेनं घर केलं होतं याची खंत त्यांना कायमच तीव्रतेनं वाटत राहिली.


गांधीजी अनेक नियम फक्त स्वतःलाच लागू करत नसत,

तर अनेकदा ते आपल्या जवळच्यांवरही लादत असत.

त्यांना ते मान्य आहेत किंवा नाहीत याचा विचारही ते करत नसत.एकदा कस्तुरबांनी त्यांना खादीची साडी ही वजनानं खूप जड असून आपल्याला काम करताना ती सांभाळणं कठीण होत असल्याचं सांगितलं.त्यांना अशा जड साडीपेक्षा वजनाने हलकी साड़ी जिने काम करणं सुसह्य होईल अशी हवी होती;पण गांधीजींनी समोरच्या व्यक्तीची अडचण समजून घेण्याऐवजी कस्तुरबांना चक्क 'तू आजपासून स्वयंपाक करू नकोस,असं सांगितलं.

आपल्या पत्नीविषयी गांधीजींची संशयी वृत्ती सुरुवातीच्या काळात खूपच मोठ्या प्रमाणात होती.तसंच हट्टी स्वभावामुळे ते आपल्यातल्या कमकुवतपणाचा राग कस्तुरबावर काढत.


शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यासाठी गांधीजींना अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागला. जातसभा बोलावण्यात आली आणि त्यात आजवर कोणीही मोढ वाणी परदेशी गेलेला नव्हता.त्यांनी आपल्या धर्मात समुद्र ओलांडून जाण्यास मनाई असल्याचं सांगितलं.तसंच परदेशी मांसाहार वगैरे करावा लागत असल्यानं धर्माचं पालन होणार नाही हेही सांगितलं;पण आपण विद्याभ्यास करायला जाणार असून आपण मांसाहारापासून दूर राहू असं गांधीजींनी सांगितलं,पण तरीही जातीच्या लोकांना गांधीजींचं उत्तर आवडलं नाही.आपल्या जाण्याच्या निर्णयावर गांधीजी ठाम असल्याचं पाहून त्यांनी चिडून गांधीजींना जातीतून (जग बदलणारे ग्रंथ,दीपा देशमुख,) बहिष्कृत करण्यात येईल,असे सांगितलं इतकंच नाही,तर परदेशी जाण्यासाठी जो कोणी त्यांना पैशांची किंवा इतर मदत करेल त्याला दंड करण्यात येईल,असा ठराव केला.

त्या ठरावाचा गांधीजींवर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यांनी त्या सर्व अडथळ्यांवर मात करून १८८८ मध्ये मुंबई बंदर सोडलं.


१८९० मध्ये गांधीजी पॅरिसमध्ये गेले.तिथे त्यांनी अनेक स्थळांना भेट दिली.प्रसिद्ध अशा आयफेल टॉवरलाही त्यांनी भेट दिली.गंमत म्हणजे त्यांनी आयफेल टॉवरबद्दल खूपच मजेशीर विधान केली.खरं तर त्यांनी आयफेल टॉवरची उंची,प्रशंसा,टीका सगळं काही ऐकलं होतं,


पण आयफेल टॉवरची निंदा करणाऱ्यांमध्ये लिओ टॉलस्टॉय हाही होता टॉलस्टॉयनं म्हटलं होतं,'आयफेल टॉवर हे माणसाच्या ज्ञानाचं नसून मूर्खपणाचं लक्षणं आहे.या जगात तंबाखूचं व्यसन सगळ्यात वाईट आहे.

बिडी पिणाऱ्याची अक्कल नको ते काम करायला प्रवृत्त होते आणि तो हवेत इमले बांधू लागतो.त्याप्रमाणेच आयफेल टॉवर हा अशाच व्यसनाचा परिणाम आहे गांधीजींना टॉलस्टायचं म्हणणं पटलं आणि त्यांनाही

आयफेल टॉवरमध्ये यत्किंचितही सौंदर्य दिसले नाही.


राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..