* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सत्याचे प्रयोग - मोहनदास करमचंद गांधी (१९२७)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/६/२३

सत्याचे प्रयोग - मोहनदास करमचंद गांधी (१९२७)

आयफेल टॉवर म्हणजे प्रदर्शनातलं एक मोठं खेळणं असल्याप्रमाणे लोक वरपर्यंत चढून तो पाहत होती.

जोपर्यंत आपण मोहाला बळी पडतो,तोपर्यंत आपण एक लहान मूलच आहोत आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयफेल टॉवर,असं गांधीजींनी 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात म्हणून ठेवलंय.


दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी शिक्षणातल्या आपल्या प्रयोगांमुळे फक्त मोठ्या मुलाला अहमदाबादच्या हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी ठेवलं;पण बाकी मुलांना शाळेत न पाठवता घरीच शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. गांधीजींच्या शिकवण्यात नियमितपणा नसायचा. आपण मुलांना पुस्तकी शिक्षण देऊ शकलो नाही,असं गांधीजींनी म्हटलं आहे.त्यामुळे मुलांच्या आपल्या बाबतीत नेहमीच तक्रारी राहिल्या.याचं कारण इतर शिकलेल्या मुलांची आणि त्यांची भेट होत असे,त्या वेळी आपण शाळेत न गेल्याचं,कुठलीच पदवी नसल्याचं दुःख मुलांना सतावत असे.असं असलं तरीही आपल्या मुलांना अनुभवाच्या शाळेतलं शिक्षण मिळालं,असं गांधीजी म्हणतात.


तसंच त्यांना आपल्या आई- वडिलांचा सहवास मिळाला. साधेपणा आणि सेवाभाव कृत्रिम शिक्षणातून त्यांच्यामध्ये रुजला नसता.या सगळ्या गोष्टींचा पश्चात्ताप आपल्याला जराही होत नाही,असंही गांधीजींनी लिहून ठेवलंय.


गांधीजींच्या अनेक मित्रांनी त्यांना,'तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण न देऊन त्यांचे पंख छाटले,त्यांना बॅरिस्टर वगैरे पदव्या मिळाल्या असत्या तर तुमचं काय बिघडलं असतं,

त्यांना त्यांच्या आवडीनुसार आयुष्याचा मार्ग ठरवण्याच्या स्थितीपर्यंत त्यांना का येऊ दिलं नाही,असं वागणं हे तुमच्या अभिमानाचं आणि अज्ञानाच फळ आहे'अशी टीकाही आपल्या मित्रांनी आपल्यावर केली, असं गांधीजींनी म्हटलं.


'पहिल्या पाच वर्षांत मूल जेवढं शिकत तेवढं पुढल्या सबंध आयुष्यात शिकू शकणार नाही. मुलाचं खरं शिक्षण आईच्या पोटात असल्यापासूनच सुरू होतं.आईची गरोदर असतानाची प्रकृती,तिचा त्या काळातला आहार-विहार,या सगळ्यांचा वारसा घेऊन मूल जन्म घेतं आणि पुढली अनेक वर्षं ते आपल्या आई-वडिलांचं अनुकरणही करतं.

रतिसुखाला एक स्वतंत्र वस्तू समजणं म्हणजे अज्ञान असून जननक्रियेवर जगाचं अस्तित्व अवलंबून आहे,' असंही त्याच वेळी गांधीजींनी म्हटलं.


आफ्रिकेतून भारतात परत येण्याच्या वेळी गांधीजींना अनेक भेटवस्तू मिळाल्या. कस्तुरबांनाही पन्नास गिनींचा हार मिळाला.या सगळ्या भेटवस्तू मौल्यवान होत्या.त्या भारतात घेऊन जायच्या की नाही याबाबतीत गांधीजींच्या मनात संभ्रम तयार झाला.आपण या मौल्यवान वस्तू आणि दागिने यांचा ट्रस्ट करायचा त्यांचा इरादा होता.

मुलांची समजूत गांधीजी घालू शकले.मात्र या गोष्टीसाठी कस्तुरबा अजिबात तयार झाल्या नाहीत.या वस्तूंची मुलांना आवश्यकता भासत नसली,मलाही भासत नसली तरी पुढे आपल्या येणाऱ्या सुनांसाठी या वस्तू गरजेच्या आहेत.असं कस्तुरबांचं म्हणणं होतं.या वस्तू गांधीजींमुळे जरी मिळाल्या असल्या तरी त्यांच्या प्रत्येक कामात आपण रात्रंदिवस राबलो आहोत,असं कस्तुरबांचं म्हणणं होतं.अखेर गांधीजींनी कस्तुरबांना राजी करून एक ट्रस्ट ट्रस्ट केला.आणि सार्वजनिक कामासाठी त्यांचा उपयोग व्हावा असं ठरवलं. त्यांना आपल्या या कृत्याचा कधीही पश्चात्ताप झाला नाही.सामाजिक कार्यकर्त्याला अशा भेटवस्तू मिळाल्या तरी त्यानं त्या घेऊ नयेत,असं मत गांधीजींनी 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात व्यक्त केलं आहे.


१९०१ साली काँग्रेसची महासभा कलकत्त्याला असणार होती. त्यात सहभागी होऊन बोलण्यासाठी गांधीजीही गेले होते.त्या वेळी तिथली घाण,पाणी आणि दुर्गंधी बघून गांधीजींच्या अंगावर शहारे आले.त्यांनी तिथल्या स्वयंसेवकांना ती घाण दाखवली आणि ती साफ करायला सांगितली तेव्हा त्यांनी आपले खांदे उडवत ते काम भंग्यांचं आहे,असं सांगितलं.त्या वेळी गांधीजींनी स्वतः केरसुणी घेऊन घाण साफ केली;पण त्या वेळी इतरांना मात्र त्या घाणीविषयी काहीही वाटत नव्हतं ही गोष्ट गांधीजींच्या लक्षात आली.


गांधीजींनी कलकत्ता ते राजकोट प्रवास केला, तेव्हा ते काशीलाही थांबले.तिसऱ्या वर्गाच्या डब्याने प्रवास केल्यामुळे डब्यातल्या शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट होती. लोकांनी वाट्टेल तिथे थुंकून,कचरा टाकून,बिड्या ओढून,तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणं अशी घाण केलेली होती.डब्यातले लोक मोठमोठ्याने बोलत होते.काशीत उतरल्यावर एका पंड्याच्या घरी गांधीजींनी राहायचं ठरवलं.काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेल्यावर तिथली स्थिती पाहून गांधीजींना खूपच वाईट वाटलं.अरुंद अशा घसरड्या गल्ल्यांमधून त्यांना जावं लागलं. माश्यांनी उच्छाद मांडलेला होता.दुकानदारांची कलकल अखंड चालू होती.ज्या ठिकाणी परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी ध्यान लावायचं तिथे अशी परिस्थिती पाहून गांधीजी खंतावले. तिथली लबाडी,कुजलेल्या निर्माल्याची दुर्गंधी, सगळं बघून गांधीजींना तिथे दक्षिणा ठेवावीशी वाटेना.

तरीही त्यांनी एक पै ठेवली तेव्हा तिथल्या पंड्यानं गांधीजींना शिव्याशाप द्यायला सुरुवात केली.त्यानंतरही गांधीजी काशीला दोन वेळा गेले,पण तिथली परिस्थिती मात्र 'जैसे थे' च असल्याचं त्यांना अनुभवायला मिळाली.


'क्रिटिक'चा उपसंपादक मि.पोलाक आणि गांधीजी यांची ओळख झाली आणि त्यांनी 'अन्टू धिस लास्ट' हे रस्किनचं पुस्तक गांधीजींना भेट दिलं.त्या पुस्तकानं गांधीजींवर मोठा प्रभाव टाकला.या पुस्तकाचं गांधीजींनी पुढे 'सर्वोदय' या नावानं भाषांतरही केलं.आपल्यामध्ये असलेल्या गोष्टी त्यांना रस्किनच्या पुस्तकात सापडल्या.त्या पुस्तकात म्हटलं होतं, 'सर्वांच्या कल्याणात आपलं कल्याण आहे. वकील असो की न्हावी,दोघांच्याही कष्टाची किंमत एकसारखी असायला हवी.अंगमेहनतीचं शेतकऱ्याचं जगणं हेच खरं जगणं'अशा प्रकारच्या पुस्तकातल्या सिद्धांतांनी गांधीजींना आपल्या कामाची दिशा स्पष्ट झाली आणि त्यातूनच त्यांनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केली.या आश्रमात त्यांच्या हाकेला साद देत मि.पोलाकदेखील आले आणि ते त्या आश्रमात रमले.


गांधीजींनी 'सत्याचे प्रयोग' त्या आत्मकथेत आश्रमातले अनेक प्रसंग,खादी आणि त्या अनुषंगानं चरख्याचा शोध,

सत्याग्रह,अहिंसेची ताकद,स्वतःचे सहकारी याबद्दल खूप आत्मीयतेनं लिहिलं आहे.तसंच 'नवजीवन' आणि 'यंग इंडिया' या साप्ताहिकांविषयीदेखील एक प्रकरण यात आहे.१९२१ नंतर गांधीजींचं संपूर्ण जगणं हे सार्वजनिक झालं.त्यामुळे आपली कुठलीही कृती कोणाला ठाऊक नाही, असं झालं नाही,असं त्यांनी म्हटलं आणि आपलं आत्मकथेचं लिखाण इथंच थांबवलं.


गांधीजींनी जेव्हा पुणे शहराला भेट दिली,तेव्हा ते लोकमान्य टिळकांना भेटले,तसंच रामकृष्ण भांडारकर,

गोपाळ कृष्ण गोखले आणि सर फिरोजशहा यांनाही भेटले.'सर फिरोजशहा मला हिमालयासारखे वाटले;

लोकमान्य समुद्रासारखे वाटले,गोपाळ कृष्ण गोखले गंगेसारखे वाटले. तिच्यात स्नान करता येण्यासारखं होतं,पण हिमालय चढून जाणं अशक्य होतं,तसंच समुद्रात बुडण्याची धास्ती जास्त असते;पण गंगेच्या मांडीवर खुशाल खेळावं,तिच्यावर होडी खेळवावी,'असं गांधीजींनी पुण्याच्या भेटीबद्दल म्हणून ठेवलंय.


१९०६ सालापासून गांधीजींनी ब्रह्मचर्य पालन करायला सुरुवात केली.सुरुवातीचे त्यांचे अनेक प्रयत्न असफल झाले.आपल्या पत्नीशी चर्चा करून,तिची संमती घेऊनच त्यांनी ब्रह्मचर्यपालनाचा निर्धार केला.


आपल्या वासनांवर नियंत्रण मिळवण्यात गांधीजी यशस्वी झाले.या प्रयोगात मसाल्याशिवायचा साधा माफक नैसर्गिक स्वरूपातला आहार गांधीजींनी घ्यायला सुरुवात केली.आपल्या इंद्रियांचं दमन करण्यासाठी त्यांनी उपवासाचेही प्रयोग केले.उपवास करत असलेली व्यक्ती विचारानं मात्र पंचपक्वान्न चाखत असेल तर त्या उपवासाला काहीच अर्थ नाही.त्यामुळे उपवास करताना विरक्तीची भावना मनात निर्माण व्हायला हवी.

ब्रह्मचर्यपालनात उपवास अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचं गांधीजींनी म्हटलं.


'सत्याचे प्रयोग' या गांधीजींच्या आत्मकथेत तीन प्रकरणं गोपाळ गोखलेंच्या सहवासातल्या काळातले आहेत.

गांधीजी गोपाळ कृष्ण यांना खूपच मानत.त्यांनीही गांधीजींना आपला सख्खा धाकटा भाऊ असावा अशी वागणूक दिली. गांधीजींचं स्वावलंबन,उद्यमशीलता, नियमितपणा यांचा प्रभाव गोखलेंवरही पडला होता.

गोखले आपल्या कामाचा एक क्षणही वाया घालवत नसत.त्यांचं संपूर्ण जगणं हे देशकार्यासाठीच वाहिलेलं होतं.त्यांच्या बोलण्यात कधीच अहंकार,दंभ,खोटेपणा गांधीजींना आढळला नाही.भारताचं पारतंत्र्य आणि गरिबी या दोन गोष्टी त्यांना सतत डाचत असत.गोखलेंना रानडेंबद्दल खूप आदर होता. त्यांच्या बोलण्यातून ते सतत 'रानडे असे म्हणत...' असं बोलून पुढे वाक्याची सुरुवात करत असत.


'सत्याचे प्रयोग' याशिवाय गांधीजींनी अनेक पुस्तकं लिहिली.त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या त्यांच्या संघर्षावर 'दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह','हिंद स्वराज','गांधी विचार दर्शन: अहिंसा विचार','गांधी विचार दर्शन:राजकारण', 'गांधी विचार दर्शन: अहिंसा विचार,'गांधी विचार दर्शन : सत्याग्रह प्रयोग,' 'गांधी विचार दर्शन:,सत्याग्रहाची जन्मकथा','गांधी विचार दर्शन: हरिजन','नैतिक धर्म' आणि 'माझ्या स्वप्नांचा भारत' इतकं लिखाण केलं.


जॉन  रस्किनच्या 'अनटू धिस लास्ट' या पुस्तकाच त्यांनी गुजराती भाषेत भाषांतरही केलं.त्यांनी अर्थशास्त्र,

शाकाहार,आहार आणि स्वास्थ्य,धर्म,सामाजिक परिवर्तन अशा अनेक विषयांवर विपुल लेखन केलं. गांधीजी प्रामुख्यानं गुजरातीमध्ये लिखाण करत,पण त्याबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषांतरित पुस्तकांचं परीक्षणही करत असत.गांधीजीच पूर्ण लिखाण भारत सरकारनं 'संकलित महात्मा गांधी' या नावानं प्रकाशित केलं असून त्याचे जवळजवळ १०० खंड आणि ५० हजार पृष्ठसंख्या आहे.गांधीजींवरही अनेकांनी पुस्तकं लिहिली,त्यात दुई फिशरनं लिहिलेलं 'महात्मा गांधी',तुषार गांधी लिखित 'लेट अस किल गांधी',थॉमस वेबर लिखित 'गांधी',

प्यारेलाल आणि सुशिल नैय्यर लिखित 'महात्मा गांधी',वि. स.खांडेकर लिखित 'दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी',

प्रमोद कपूर लिखित 'गांधी',नारायणभाई देसाई लिखित 'अज्ञात गांधी' आणि रावसाहेब कसबे लिखित 'गांधी : पराभूत राजकारणी, विजयी महात्मा' ही पुस्तकं विशेष उल्लेखनीय आहेत.


ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर रिचर्ड अॅटनबरो यानं गांधीजींच्या आयुष्यावर १९८१ साली इंग्रजी चित्रपट प्रदर्शित केला.या चित्रपटानं आठ ऑस्कर पुरस्कार जिंकून एक विक्रम नोंदवला होता.हिंदीसह जगातल्या बहुतांश भाषांमध्ये या चित्रपटाचं भाषांतर झालं.या चित्रपटात बेन किंग्जले या ब्रिटिश अभिनेत्यानं गांधीजींची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. तसंच हा चित्रपट अत्यंत यशस्वी चित्रपट म्हणून ओळखला जातो.

२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची भूमिका अतिशय अप्रतिमरीत्या साकारली होती.शफाअत खानचं 'गांधी आडवा येतो' हे नाटकही खूपच गाजलं. याशिवाय 'हे राम','गांधी विरुद्ध गांधी','मोहन से महात्मा'सह अनेक चित्रपट आणि नाटकं गांधींच्या व्यक्तिरेखेवर बेतलेली आहेत. गांधीविचारांवर आधारितदेखील अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे.


१९३० साली 'टाइम' या नियत कालिकानं गांधीजींना 'मॅन ऑफ द इयर' म्हणून सन्मानित केलं.३० जानेवारी १९४८ या दिवशी नथुराम गोडसे यानं आपल्या सहकाऱ्यांसमवेत गांधीजींवर गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


गांधीजी म्हणत,'तुम्ही मला कैद करू शकता,माझा छळ करू शकता,माझं शरीर नष्ट करू शकता,पण माझ्या मनाला कधीच कैद करू शकणार नाहीत.' 'जग बदलायचं असेल तर आधी स्वत:ला बदला,'असं त्यांचं म्हणणं होतं.गांधीजींचा प्रभाव जगभर कालही होता,आजही आहे आणि उद्याही राहील.


 २००० साली प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं,तेव्हा साहित्यिक ,नेते,शास्त्रज्ञ,

कलाकार अशा सगळ्यांना मागे टाकत दोन व्यक्तींना जास्त मतं पडली.पहिली व्यक्ती होती,जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन आणि दुसरी व्यक्ती होती महात्मा गांधी!


'इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल,' असं व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबेटन यांनी म्हटलं होतं.गांधीजींचं नाव जगभरात अढळपणे कोरलं गेलंच,पण त्याचबरोबर २० व्या शतकातलं १०० पुस्तकांमधलं 'सत्याचे प्रयोग' हे गांधीजींचं पुस्तक सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी पुस्तक म्हणून ओळखलं जातं.!


प्रत्येक माणसाची गरज भागवण्यासाठी पृथ्वी सक्षम आहे,पण त्याची हाव भागवण्यासाठी नाही.- महात्मा गांधी


१६ जून २०२३ या लेखातील शेवटचा भाग..