जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,
जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे.
असं बोरिक पास्तरनाक यांनी म्हटलेलं आहे.
प्रत्येक व्यक्तींवर कुणाचातरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा या पुस्तकांनीच मला सांगितलं तुझ्यावर प्रभाव हा फक्त तुझाच हवा !
वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.'
याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा, प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो.
कोणतं ही पुस्तक आपण घेताना त्याची किंमत देऊन आपण ते खरेदी करतो.त्या पुस्तकाचे मालक बनतो.पण ज्यावेळी आपण ते पुस्तक वाचतो त्यावेळी ते पुस्तक आपलं बनतं.आपण ते पुस्तक समजून घेतो.त्यावेळी आपण पुस्तकाचे बनतो.मला वाटतं आपण पुस्तकाचं बननं हे खूप महत्वाचे आहे.
पुस्तकांना मला माझी असण्याची जाणीव करुन दिली.त्यांच्यामुळेच मी दररोज रूपांतरित होत आहे.
बदलत आहे.माझ्या दृष्टीकोनामध्ये अमुलाग्र बदल घडवण्यात ही पुस्तके माझ्या जीवना पलीकडे आहेत.स्वतःबद्दल समजून घेण्यासाठी मोठ्या नम्रतेची गरज असते.स्वतःला जाणणे हा एका नवीन जीवनाचा प्रारंभ आहे.स्वतःला समजून घेतले कि विश्व जाणता येते.आपण काय आहोत,हे पाहणे हाच एक मोठा अविस्मरणीय साक्षात्कार असतो.आपण कशाचेही दडपण न घेता मोकळेपणाने जगू शकतो.
त्यासाठी आपण ज्या जगात राहतो, त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा रोजच्या जीवनाला मोकळे -
पणाने सामोरे जायला हवे.हे मला पुस्तकांनीच प्रेमळपणे सांगितले.
एका श्रीमंत माणसाला साक्षात अनुभवाविषयी विलक्षण आकर्षण असते.एके दिवशी तो एका सुंदर बेटाची आपल्या राहण्यासाठी निवड करतो.तिथे तो अनेक वर्षे राहतो.निसर्गाच्या सहवासात आपण इथे खूप वर्षे राहिलो,
आता आपण आपल्या मुळ ठिकाणी परत जायला हवे असे त्याला वाटायला लागते.खरे तर तो त्या बेटावर तब्बल तीस वर्षे राहिलेला असतो.जेव्हा तो परत आपल्या मूळ स्थानी ( गावी ) येतो.तेव्हा निरनिराळ्या माध्यमातील लोक-पत्रकार त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या बंगल्यावर येतात. ज्या बेटावर तो श्रीमंत वास्तव्याला असतो,ते बेट खरोखरीच अप्रतिम असते,
सगळे त्याला विचारायला लागतात.ते निसर्गरम्य बेट कसे आहे?तीस वर्षाच्या या बेटावरील अनुभवाविषयी सविस्तर सांगा ना?या बेटावरील जंगली जनावरांचा तुम्हाला काही अनुभव आला का? या बेटावरचे पर्यावरण व ऋतूचक्र कसे होते? बदलत्या हवामानाचा तुम्हाला त्रास झाला नाही का? इतकी वर्षे तुम्ही या बेटावर राहिलात,त्या बेटाच्या वैशिष्ट्यांविषयी,निसर्गसौंदर्यांविषयी विस्ताराने सांगा ना? असे एक ना अनेक प्रश्न लोकांनी त्या श्रीमंत माणसाला विचारले.त्याने ते सगळे प्रश्न ऐकले आणि तो म्हणाला -
अरे देवा, इतके ते बेट निसर्गरम्य व सुंदर होते,मी हे जर आधी जे ऐकले असते, तर त्या बेटाचा, तिथल्या निसर्गाचा-बदलत्या ऋतुचक्राचा मी अधिक मनापासून अनुभव घेतला असता.!
पत्रकार जेव्हा त्याला सारे प्रश्न विचारतात,तेव्हा त्याला त्या बेटाविषयी कुतूहल वाटायला लागते.मग त्याच्या लक्षात येते की,
आपण त्या बेटावर वर्षे राहिलो खरे,पण प्रत्यक्षात आपले त्या बेटाशी काहीच नाते नव्हते,आपण तसे काहीच पाहिले नाही,ना कुठला विशिष्ट अनुभव घेतला.आपण फक्त ऋतुचक्र ढकलत,तिथे जगत राहिलो.
माझा प्रवास हा मला स्वतःला शोधण्याचा प्रवास होता.मी मेनन पिस्टन रिंग ( टोप - संभापूर )या कंपनीमध्ये कामाला आहे.आठ तास काम केल्यानंतर दोन तास वाचन करतो.साधारणतः दोन ते तीन वर्षांपूर्वी शाहू महाराजांचा एक लेख जो आमचे कवी लेखक माधव गव्हाणे साहेब यांनी लिहिला होता.तो आदरणीय सदाशिव वारे बागणी सांगली जिल्हा यांच्याकडून मला मिळाला.लेख अप्रतिम होता मग मी माधव गव्हाणे साहेबांना फोन केला.त्यापासून मी दररोज त्यांना फोन करतो.निसर्गाशी समरस असणारी व्यक्ती सदाशिव वारे यांच्यामुळे मला लाभली.मी त्यांचा आभारी आहे.त्यानंतर माधव गव्हाने साहेबांनी तुफानातील दिवे आदरणीय विठ्ठल भुसारे उपशिक्षणाधिकारी साहेबांचा फोन नंबर दिला.आमच्यात सुसंवाद सुरु झाले.ऑनलाईन कार्यक्रम झाले.आरक्षण का व कशासाठी? हा लेख मा.सुभाष ढगे यांनी लिहिला होता.या लेखांमधून आमचा सुसंवाद सुरू झाला.संवेदनशील मने जोडत गेलो.हे जोडण्याचं काम माधव गव्हाणे साहेबांनी केलं. त्यानंतर रामराव गायकवाड साहेब,रामराव बोबडे साहेब,गोलू पटवारी,
विष्णू मोरे साहेब गटविकास अधिकारी सेलू,मनोहर गायकवाड,आचार्य ग्लोबल अकॅडमीचे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी तळमळणारे मनोहर दादा सुर्वे, डॉ.संजय मोरे जीवशास्त्राचे प्राध्यापक,ज्यांच्या चेहर्यामध्ये मला निसर्ग दिसतो.असे आमचे मित्र माणिक पुरी,शरद ठाकर,छगन शेरे दादा, तुकाराम मगर,आम्ही मोबाईल माध्यमातून बोलत होतो.या सर्व व्यक्ती मोठ्या मनाच्या सर्वांना सामावून घेणाऱ्या लहान लोकांना महान करणार्या आहेत.मग मी ठरवलं या महान लोकांना भेटून आपण महान व्हायचं मी परभणीला व सेलू या गावी जाणार आहे.
मी न पाहिलेल्या मित्रांना भेटण्यासाठी माझ्याकडे होता विश्वास .. विश्वास / समजूत म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल असलेली खात्री वा हमी ..!
माझ्या मनातील जो विश्वास माझ्यातील क्षमतेचा सर्वोत्तम विनीयोग करून मला सर्वार्थाने व समग्रपणे कार्यान्वित करतो,तो माझ्यासाठी नेहमीच सत्य बनतो.- आंद्रे गाईड
१५ तारखेनंतर या निरोप मिळाला.माझी तयारी सुरू झाली.मनातूनच मी प्रवासाला सुरुवात केली.माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील मी माझ्यासाठी केलेला हा पहिलाच प्रवास त्यामुळे मला सर्वांना भेटण्याची ओढ होती.MH 26 BE 3230 या शर्मा ट्रॅव्हलसाठी मेनन पिसँटन रिंग कंपनीतूनच अमर पाटील व सुजय पाटील साहेब यांनी बुकिंग करून माझ्या प्रवासावर शिक्कामोर्तब केले.रात्री नऊ वाजता माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.
आदरणीय विठ्ठल भुसारे साहेब,सुभाष ढगे साहेब,मनोहर सुर्वे साहेब,माणिक पुरी साहेब त्यांचे फोन येतच होते.
माझ्यासाठी परभणी हे दुसरं घर आहे.याची मला सर्वप्रथम जाणीव झाली.रात्री दहा वाजता मी फोन बंद करून झोपी गेलो.१६ तारखेला बरोबर पहाटे ४.४५ मिनिटांनी विठ्ठल भुसारे साहेबांचा फोन आला.मी औरंगाबादला तातडीच्या कामासाठी जात आहे.तुम्हाला घेऊन येण्याकरिता माणिक पुरी येतील.परभणी माझ्यासाठी आनंदाचे ठिकाण झाले.सकाळी ९ ते ९.३० दरम्यान मी परभणीत दाखल झालो. आपली गाडी परभणीत न जाता अनुसया टॉकीज जवळ थांबेल.अशी सूचना देण्यात आली.
" मी शेजारी प्रवास करणाऱ्या व्यक्तीला याबाबत विचारले. त्यांनी मला प्रतिप्रश्न केला आपण या ठिकाणी नोकरीला आहात का?मी नाही असे उत्तर दिले.मग सुट्टी काढून गावी आलात का?मी त्यांना म्हणालो नाही.फक्त मित्रांना भेटण्याकरीता आलो आहे.कोल्हापूरहून त्यांनी आवंढा गिळला. लगेच पुढचा प्रश्न विचारला आपली आणि त्यांची ओळख कशी मी म्हणालो आम्ही प्रत्यक्ष भेटलेलोच नाही.त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला." मला घेण्याकरिता माणिक पुरी साहेब आले होते.
कोल्हापूर मधून बसल्यापासून परभणीमध्ये दाखल होईपर्यंत नऊ ते दहा वेळा फोन करणारे विठ्ठल भुसारे साहेब व सुभाष ढगे साहेब यापैकी विठ्ठल भुसारे साहेबांची भेट संध्याकाळी होणार होती.पण सुभाष ढगे साहेब मात्र माझी वाट पाहत थांबले होते.आमच्या भेटीचा संगम झाला.साहेब महाविद्यालयाकडे गेले.
ही सर्व प्रवासाला निघण्याची चाललेली गडबड पाहून आमच्या वडिलांनी काळजीपोटी मला विचारले परभणीला आपलं कोणीही ओळखीचं नाही.आणि तु पहिल्यांदाच निघालेला आहे तिथे तू कसा राहणार? कसा पोहचणार तुला घेण्यासाठी कोणी नाही आलं तर तू काय करणार? मी हसून सांगितलं आण्णा आपण स्वतःला जेवढं ओळखतो तेवढेचं लोकं आपल्याला ओळखत असतात.मी घरी नसताना त्यांनी माझ्या पत्नीला (सौ.मेघाला) विचारले तो परभणीला निघाला आहे.तुला काय त्याची काळजी वाटते का नाही.? त्यावेळी ती त्याच विश्वासाने म्हणाली ते जाण्या अगोदरच त्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांचे मित्र आलेले असतात.त्यामुळे मला त्यांची काळजी करायचं काहीच कारण नाही.
कारण मित्र आणि मैत्री ही अनोळखी कधीच नसते.
● विजय कृष्णात गायकवाड