माणिक पुरी साहेबांसोबत त्यांच्या निवासस्थानी गेलो.मी शाळा सोडली आहे पण शाळेने मला अजून सोडलेले नाही.याठिकाणी निवासी शाळा आहे.रणजीत पुरी सर,
किरण पुरी सर,या दोन भावांसोबत ही शाळा मोठ्या संस्कारशील पध्दतीने चालवली जाते.शिक्षण,शिक्षणाप्रती ओढ,विद्यार्थ्यांप्रती तळमळ दिसुन आली.सुट्टी सुरु असल्याने विद्यार्थ्यांशी सुसंवाद घडू शकला नाही.
आवरल्यानंतर सात्विक जेवण करून संतुष्ट झालो. इतक्या वेळेत आचार्य ग्लोबल अकॅडमीचे संस्थापक आमचे जेष्ठ बंधूच जणू आम्हाला घेऊन जाण्याकरिता आले.गळाभेटी भेटी झाल्या.मी व माणिक पुरी साहेब त्यांच्यासोबत त्यांच्या शाळेला भेट देण्यासाठी व त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी गेलो.
मुलांची घरी जाण्याची वेळ संपत आली होती.तरीही आम्ही आलो आहोत म्हटल्यानंतर मुलांना फुलणार्या फुलांसारखा आनंद झाला.खरंच त्या शाळेचं ब्रीद वाक्य आहे. " माणसं घडवणारी शाळा" मी बारकाईने निरीक्षण केलं.
"औपचारिक शिक्षण असो वा नसो तरीही जोपर्यंत प्रत्येकाचं बोलणं गांभीर्याने ऐकून घेतलं जातं,तोवर प्रत्येकाने त्यात दिलेलं योगदान भरीवच असतं हे संशोधकांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे." याचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवला.
तेथील वातावरण झाडे निसर्गरम्य परिसर शिक्षकांची शिकवणारी तळमळ,विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असावं,यशस्वी आयुष्याचे ते माणकरी असावेत.ही भावना मला त्यांच्या वागण्यातून त्यांच्या विनम्र स्वभावातून जाणवली.
मुलांसोबत शिक्षण शिक्षणाचे मूल्य, परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन,यशस्वी होण्याचा मार्ग कष्टातून जातो.
अशा सर्व जीवनाला स्पर्श होणाऱ्या गोष्टी बाबत मी त्यांच्याशी सुसंवाद साधला.मी त्यानंतर माझ्या सोबत आलेले निसर्गप्रेमी व प्राणी अभ्यासक माणिक पुरी साहेबांना बोलण्याची विनंती केली. त्यांनीही निसर्गाच्या पशुपक्ष्यांच्या प्राण्यांच्या जगण्याच्या आश्चर्यकारक गमती जमती सांगत. एक नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात भर घातली.वेळ थोडा होता मुलांना भूक लागली होती.
त्यामुळे वेळेचे भान ठेवून त्यांना घरी जाण्यास सांगितले.
आम्ही शाळा,शाळेचा परिसर,शिक्षणाची पद्धत,वाचनालय अनेक गोष्टी पाहिल्या.मला तर ही माझीच शाळा वाटली. त्यांनी केलेला पाहुणचार मनापासून दिलेला सन्मान या गोष्टी माझ्यासाठी भावनिक पातळीवर खूप महत्त्वाच्या होत्या.ही अपूर्ण भेट आहे तशी स्थिर ठेवून आम्ही त्यांची परवानगी घेऊन निरोप घेतला.व पुढील भेटीचे नियोजन केले.
जिथे मुक्तता असते,तिथे स्वातंत्र्य असतेच,असे बील आयर्स,अमेरिकन शिक्षण तज्ञ म्हणत असे. हे स्वतंत्र घेऊन मी पुढील प्रवासाला निघालो.
'दुसऱ्यातल्या चांगल्या मूल्यांना व गुणांना आपल्याला चांगले म्हणता आले पाहिजे.त्यांना आपल्याला मनापासून दाद देता आली पाहिजे. - व्हॉल्तेर' यांच्या वाक्याची पुनरावृत्ती मी परभणी मध्ये पावलोपावली भेटेल त्या व्यक्तीकडून शिकत होतो स्वतःला रुपांतरीत करत होतो.
त्यानंतर आमचे परममित्र सुभाष ढगे साहेब यांच्या घरी मला सोडून माणिक पुरी सर ऑनलाइन कार्यक्रमामध्ये समाविष्ट झाले.
सर्व लोकांमध्ये असणारी एकसमनता माझ्या मनाला भावली.या सर्व व्यक्ती सर्वश्रेष्ठ व महान आहेत.
प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या जबाबदार पदावर कार्यान्वित आहे.त्यांचं दिवसाचं व्यस्त वेळापत्रक ठामपणे ठरलेलं आहे.तरीही त्यांनी मी एकटा राहू नये म्हणून माझ्या काळजी पोटी अतिशय काटेकोरपणे वेळापत्रक केले होते.प्रत्येक व्यक्ती ठराविक वेळी ठराविक ठिकाणी मला पुढील ठराविक जबाबदार व्यक्तीकडे अलगत पोहोच करीत होती.
सरांच्या घरी विश्रांती घेतली राहिलेल्या अपूर्ण भेटी पूर्ण करत गेलो.थोड्याच वेळात आनंदी व्यक्तिमत्व जाधव साहेब आले.त्यानंतर डॉ. संजय मोरे सर आले.थोडीशी चर्चा झाली प्रवास करून आल्यामुळे विश्रांती मिळावी म्हणून जाधव सरांच्या घरीच थोडी विश्रांती घेतली.
त्यानंतर संध्याकाळी माणिक पुरी साहेबांच्या सोबत "आसाराम लोमटे (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक) कवीमित्र हनुमान व्हरगुळे संत साहित्याचे अभ्यासक अनिल स्वामी अशा अभ्यासु व आकर्षक व्यक्तिमत्त्वांच्या सोबत दोन तास आनंदी वातावरणात घालवले.
दोन तासांमध्ये घेण्यासारखे मला भरपूर मिळाले.
"अस्तित्वात असणे म्हणजे संबंधात असणं हे मला आतुरतेने जाणवले." पुन्हा उद्या भेटायला या प्रेमपुर्वक आग्रहाचा स्वीकार करून मी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो.त्या रात्रीचे भोजन जाधव साहेब,मनोहर सुर्वे साहेब यांच्यासोबत झाले.सुभाष ढगे साहेब कामानिमित्त वेळाने आले.नंतर मी माणिकपुरी साहेबांच्या घरी विश्रांतीसाठी गेलो.
'प्रत्येकाने स्वतः अगदी स्वच्छ राहिले पाहिजे.तेव्हाच गोष्टी योग्य प्रकारे घडत जातील.तुमची दृष्टी शुद्ध करा आणि मग तुम्हाला कळेल की,त्यात तुम्हाला काहीही करायचे नाहीये.' हे पुस्तकातील वाक्य मी वर्तमानात जगलो.
माणिक पुरी साहेबांसोबत राहणं म्हणजे निसर्गासोबत राहणं याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणजे जीवनातील आनंदाचे कारंजे त्यांच्या सोबत रहाणं म्हणजे मी माझ्यासोबत राहण्यासारखं होतं.
२४ जून २०२३ या प्रवासातील पुढील प्रवास,प्रवास पुढे सुरुच आहे,तो पुढील लेखामध्ये..
● विजय कृष्णात गायकवाड
माणुसकी कधीही सुट्टीवर जात नाही..
मी स्वतः एक चांगली व्यक्ती झालो,की जगातील एक वाईट व्यक्ती कमी झालेले समाधान मला मिळेल.या सर्वश्रेष्ठ विचाराचा प्रभाव मला जाणवला.आपण चांगले बनलो की चांगुलपणा आपली पाठ कधीच सोडत नाही.हा विचार अधोरेखित करणारी एक गोष्ट मला ऐकण्यास मिळाली.ती गोष्ट कोल्हापूरचे आमचे मित्र विनायक पाटील यांनी मला सांगितली.दर सोमवारी मला सुट्टी असते.या सुट्टीदिवशी मी माणुसकी व माणसांना भेटायला जातो.दिनांक २६.०६.२०२३ या दिवशी सकाळी डॉ.सरवदे साहेब (C.P.R.शासकीय रुग्णालय,कोल्हापूर )
यांना भेटलो.राजर्षी शाहु राजांना अभिवादन करुन त्यांचे दर्शन घेवून निरोप घेतला.डॉ.सरवदे साहेब फोटो पुजनासाठी गेले.
सुजल पांचाळ त्यांच्याशी पुस्तक वाचना संदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली.विनायक पाटील यांना भेटण्यासाठी फोन केला त्यांना भेटल्याशिवाय कोल्हापूरला आल्यासारखं वाटत नाही.आज आम्ही तब्बल तीन ते चार तास एकत्र होतो.विषय होता माणूस,माणुसकी आणि चांगुलपणा गाडीवरून फिरत असताना.त्यांनी एक गोष्ट सांगितली.
ही गोष्ट ऐकल्यानंतर मला सर्वप्रथम जाणीव झाली.ती ही कि माणूस सुट्टीवर जातो पण माणुसकी कधीही सुट्टीवर जात नाही.
एक बर्फ तयार करणारी फॅक्टरी होती.त्या ठिकाणी साधारणत:पाचशे कामगार काम करायचेत.या कामगारांमध्ये एक असा कामगार होता.ज्याचा स्वतःचांगला बनण्यावर व चांगुलपणावर विश्वास होता.हा कामगार सकाळी कामावर येताना.व काम करून परत घरी जात असताना न चुकता सुरक्षारक्षकाला नमस्कार करत असायचा.हा त्याचा अनेक महिन्यांचा न चुकणारा क्रम होता.सर्वकाही नेहमीप्रमाणे व्यवस्थित चालू होतं.पण एक दिवस या व्यवस्थितपणाला थांबावं लागलं.घटनाच तशीच घडली होती.
नेहमीप्रमाणे सर्व कामगार कामावरती आले.
नेहमीप्रमाणे या कामगार ने सुरक्षारक्षकाला नमस्कार केला.व आपुलकीने विचारपूस करून चौकशी केली.
नमस्कार करण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी काही सेकंदाचा वेळ लागत असे.नेहमीप्रमाणे काम संपले सर्वजण आपापल्या घरी जाण्याच्या तयारीला लागले. जाण्यापूर्वी बर्फ बनवण्यासाठी ( - 0 डिग्री अंश सेल्सिअस तापमान ठेवून फॅक्टरी बंद करुन सर्वजन घरी निघून गेले.पण त्या सर्वामध्ये तो नमस्कार करणारा माणूस नव्हता.कामात व्यस्त असल्यामुळे त्याला वेळेचे भान राहिले नाही.व तो एकटाच काम करत राहिला.बर्फ बनण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.आणि या बदललेल्या वातावरणाची त्याला जाणीव झाली.आपण या ठिकाणी अडकून पडलेलो आहोत,हे समजले कमालीची थंडी वाढली.आता आपल्याला कोणीही सोडवायला येणार नाही,आणि आपण असेच मरून जाणार या विचाराने त्याला रडू आले.काय करावं हे सुचत नव्हतं.मदतीसाठी कोणताही दरवाजा मोकळा नव्हता.
यामध्ये वेळ गेला आणि कोणीतरी दरवाजा उघडला.
निराश झालेल्या त्या कामगाराला हा चमत्कार वाटला.
जीव वाचवणारा देवदूत कोण आला होता.?हा अविस्मरणीय,व अकल्पनीय प्रसंग त्याला पुन्हा रडवून गेला.त्या सुरक्षारक्षकाने विचारले आत कोणी चुकून राहिलं आहे का ? कोणतीही संधी न सोडता पळत तो त्या रक्षकाजवळ गेला.समोर पहातो तर कोण ? देवदूत हा दुसरा कोणीही नसून आपण ज्याला दररोज नमस्कार करतो,ज्याची विचारपूस करतो तोच प्रत्यक्ष आहे.हे पाहून त्याने धावत जाऊन त्याची गळा भेट घेतली व त्याचे मनापासून जीव वाचवल्याबद्दल वारंवार आभार मानले.
ती दोघेजण बाहेर आली.आपण सुखरूप आहोत.हे पाहूनच त्या कामगाराला स्वर्गीय आनंद झाला.त्याने त्या सुरक्षारक्षकाला विचारले की,तुम्ही दररोज कोणी मागे चुकून राहिला आहे का,याची खात्री करता का? यावेळी त्या रक्षकाने दिलेले उत्तर ऐकून त्याचा चांगुलपणावरील विश्वास द्विगुणीत झाला.त्या रक्षकाने दिलेले उत्तर होते.
नाही,मी दररोज खात्री करत नाही.? मग आजच तुम्ही खात्री का केली.?त्यांने पुन्हा दुसरा प्रश्न विचारला.त्यावेळी त्या सुरक्षारक्षकाने दिलेले उत्तर हे सांगत होते,की माणुसकी कधीही सुट्टीवर जात नाही.तो सुरक्षारक्षक उत्तरा दाखल म्हणाला,आपल्या फॅक्टरीमध्ये पाचशे कामगार काम करतात.तर या कामगारांपैकी फक्त आणि फक्त तुम्ही एकमेव असे आहात जे कामावर येताना आणि कामावरून परत घरी जात असताना मला न चुकता नमस्कार करून माझी विचारपूस करता.आज सकाळी तुम्ही मला नमस्कार करून गेला.पण आज संध्याकाळी फॅक्टरी बंद झाल्यानंतर सर्व कामगार घरी निघाले.सर्व कामगार निघून गेले.पण नमस्कार हा निरोपाचा शब्द माझ्या कानी आला नाही.दररोज संध्याकाळी न चुकता केला जाणारा नमस्कार आज चुकला होता. ( जो कधीच चुकत नव्हता.)
तेव्हाच माझ्या मनात शंका निर्माण झाली व खात्री करण्यासाठी मी आलो,आणि पाहतो.तर तुम्ही
मला या ठिकाणी सापडलात.तुम्हाला सुखरूप पाहून मला तुमच्या पेक्षाही जास्त आनंद झाला.हा तुमच्या नमस्काराचा व चांगुलपणाचा परिणाम आहे."मी तुम्हाला वाचवले नाहीच.तुम्हाला खऱ्या अर्थाने वाचवले आहे,ते तुमच्या नमस्काराने आणि तुमच्या चांगुलपणाने."
कदाचित तो नमस्कार व विचारपूस करणारा माणूस आपण असू शकतो.