* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मी माझ्यासोबत केलेला प्रवास..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/६/२३

मी माझ्यासोबत केलेला प्रवास..

'एक वैश्विक नियम आहे,तो असा ! जो शोधेल त्याला सापडेल आणि जो दार वाजवेल,त्याच्यासाठी ते उघडले जाईल.! कारण केवळ संयम,अभ्यास आणि अथकपणे केलेला पाठपुरावा यांच्या सहाय्यानेच माणूस ज्ञान मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाऊ शकतो.!


खरंच हे ज्ञानच होतं मला समजून घेण्याचं कारण "आपण जसा विचार करतो, तसेच आपण असतो." हे जेम्स ॲलनचे सूत्र मूलगामी व सर्वव्यापी आहे आणि ते माणसाच्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून उरते.


यातही हे सर्वसमावेशक सूत्र आपल्या मनावर सतत अधिराज्य गाजवत असते.माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक स्थिती आणि प्रसंग यांना विचार सहज स्पर्श करू शकतात,एकूणच माणूस म्हणजे अक्षरशः त्याचे विचारच असतात. यातही त्याचे व्यक्तित्व हे त्याच्या विचारांची गोळाबेरीज असते.असे म्हटले, तर ते अतिशयोक्त ठरू नये." हा पुस्तकातील उतारा मला जीवन जगण्यासाठी उपकारक ठरला.


दुसऱ्या दिवशी परभणीमध्ये कृषी विद्यापीठाच्या आवारात अनेक प्रकारची पक्षी येतात त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला लवकर जायचं आहे असं आदल्या रात्री आमचं ठरलं होतं.मी तर तयारच होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ५.०० ते ५.३० वाजता आम्ही कृषी विद्यापीठाच्या आवारात जाऊन अनेक प्रकारचे पक्षी त्यांचे निरीक्षण केले.त्या पक्षांचे वैशिष्ट, त्यांचा आवाज,

त्यांचे राहणीमान,त्यांचे घरटे,ते बांधण्यासाठी आवश्यक असणारे झाड झाडावरील फांदी अशा अनेक वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण माहितीद्वारे माझ्या ज्ञानामध्ये खूपच नवीन वाढ झाली.


निसर्गाशी माणसाचं असणारं नातं हे जन्मोजन्मीच आहे.हे सत्य मला याठिकाणी सापडलं.निसर्ग माणसाशिवाय राहू शकतो पण माणूस निसर्गाशिवाय राहू शकत नाही.


आमचे परममित्र सुभाष ढगे साहेब हे ९.०० वाजता त्यांच्या महाविद्यालयाकडे जाणार होते. त्यांच्याकडे मला सोपवुन माणिक पुरी साहेबांना त्यांच्या शाळेकडे रवाना व्हायचे होते.आम्ही बरोबर नऊ वाजता महाविद्यालयात पोहोचलो. सुभाष ढगे साहेब म्हणाले माझा माझा तास आहे.मी येतो तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा तोपर्यंत शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी साहेब समोरून आले.त्यांची ओळख झाली व आम्ही कार्यालयात गेलो.

तिथे थोडी चर्चा झाल्यानंतर मी माझ्यासोबत घेऊन गेलेलो. 'कुणाला सांगू नका' हे पुस्तक भेट दिले.तोपर्यंत डॉ.संजय आश्रोबा मोरे जीवशास्त्र प्राध्यापक त्यांची व माझी भेट झाली.आम्ही दोघेही महाविद्यालय बघण्यास गेलो.ते मला आपल्या बैठक खोलीमध्ये घेऊन गेले.त्या ठिकाणी त्यांची व माझी शिक्षण या विषयावर विस्तृत चर्चा झाली.त्याच्या खोलीमध्ये माणसाचा खरा सांगाडा होता.ते म्हणाले मी याच्याशी बोलतो संवाद साधतो.मला आश्चर्य वाटलं. मी शहारलो कारण सरांनी मला नकळत एक नवीन जीवनतत्व शिकवलं होतं.मी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.मला असं जाणवलं की तो सांगाडा मला सांगत होता.तू नेहमी फिरत रहा इतरांना आपलं करत राहा.त्यांच्याशी मनापासून सुसंवाद साधत रहा‌ 'मेल्यानंतर आपल्याला भरपूर झोपायचं आहे आता तरी जागे राहा.' हे बेंजामिन फ्रेंकलिंन यांच्या वाक्याची मला प्रकर्षाने आठवण झाली. मी भेटेल त्या व्यक्तीशी संवाद साधत होतो. त्यांच्याशी जिवाभावाचं बोलत होतो


सुभाष ढगे साहेब आल्यानंतर त्यांनी माझी इतरांसोबत ओळख करून दिली.आमची वाचन, पुस्तकाचं जीवनातील महत्वाचे स्थान या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली.याचदरम्यान साहेबांनी 'महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजीचे लेखक डॉ. आनंद पाटील साहेब कोल्हापूर यांच्याशी फोनवर संवाद साधला.त्यानंतर डॉ. नितीन शिंदे इस्लामपूर सफर विश्वाची या पुस्तकाचे लेखक यांच्याशी संवाद झाला. साहेबांनी घरातून जेवणाचा डबा आणला होता.आम्ही तिथेच सोबत बसून तो खाल्ला. साहेबांना नातेवाईकांच्या विवाह समारंभांमध्ये जायचं असल्याकारणाने त्यांचे सहकारी मित्र शेवाळे सरांना सांगितले.तुमच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी देत आहे.हे आमचे मित्र विजय गायकवाड कोल्हापूरहून आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत.यांना सुरक्षित 'विठ्ठल भुसारे साहेब'(उपशिक्षणाधिकारी) परभणी याच्यांकडे सोडून यायचे.'रोज' हॉटेल समोर गेल्यानंतर विजयराव साहेबांना फोन लावतील.तुम्ही लवकरच त्यांना घेऊन जा साहेबांचा फोन आला होता.

आम्ही रोज हॉटेलच्या समोर गेलो.साहेबांना फोन लावला साहेबांनी त्यांच्या कार्यालयाकडे घेऊन येण्यास सांगितले.कार्यालयात गेल्यानंतर तुफानातील दिवे शिक्षण क्षेत्रातील 'विठ्ठल' शिक्षणाबद्दल तळमळ,कळवळा,ध्यास,

असं सर्वसमावेशक,विस्तृत,धबधब्यासारखं खळखळणारं व्यक्तिमत्व काही थोड्या अंतरावरच खुर्चीमध्ये विराजमान होतं.मास्क घातला होता.मला या भेटीची उत्कंठा होती.हा राम व भरत यांचा मिलाफ होता. क्षणाक्षणाने मी या भेटीच्या ओढीने स्वतःमध्ये उत्क्रांत होत होतो.एकमेकांची नजरानजर झाली. मनाची मनाला खूणगाठ पटली.आणि त्या ठिकाणी उच्च असा पारलौकिक अध्यात्मिक संगम झाला.इतका आनंद झाला.जणू तो माझ्यासाठी पुनर्जन्म सोहळाच होता.प्रवास कसा झाला.काय त्रास झाला नाही ना.अनेक विषयावरती आपुलकीने,प्रेमाने सुसंवाद झाला. साहेब मला म्हणाले विजयराव आज दिवसभर फक्त तुम्ही माझ्यासोबत गाडी मध्ये बसून राहायचं.व माझ्या सोबत फिरायचं.माझ्यासाठी ती आनंदाची पर्वणी होती.आम्ही तातडीने नावकी या शाळेच्या आनंता भुसारे या शिक्षकांचा विवाह तरोडा जि. परभणी या ठिकाणी होणार होता.साहेब पोहोचल्या नंतरच अक्षता पडल्या साहेबांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले.साहेबांच्या मनाचा इतका मोठेपणा मला जवळून अनुभवास मिळाला. प्रत्येक ठिकाणी ते न चुकता माझी ओळख करून देत होते.मला महान बनवत होते.कारण महान व्यक्तीच लहान लोकांना महान करतात. जवळच असणाऱ्या शाळेला साहेबांसोबत भेट दिली.त्यानंतर जेवण करून आम्ही राजयोग मंगल कार्यालय परभणी याठिकाणी जाधव राठोड यांच्या विवाह स्थळी भेट देऊन सर्वांना भेटून स्नेह भोजन झाल्यानंतर गिरगाव या गावाकडे रवाना झालो.


संध्याकाळी ७.०० वाजता आम्ही परभणी मध्ये परत आलो. मी साहेबांसोबत आठ तास होतो. त्यांना मी जवळून अनुभवलं,त्यांचं निरीक्षण केलं. व मी थक्क झालो.


"प्रत्येक व्यक्ती हा ग्रंथ असतो.फक्त तो आपणास वाचता आला पाहिजे."


आम्हा सर्वांना एका सूक्ष्म अशा प्रेमाच्या धाग्यामध्ये एकत्रित करून नवीन नाती निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व,माणसांना जोडणारा मानवी संवेदनशील मनाचा मानवी सेतू,ज्यांना त्यांचे सहकारी मित्र प्रेमाने भविष्य म्हणतात असे आमचे आदरणीय मित्र माधव गव्हाणे साहेबांचा फोन येत होता.उद्या लवकर निघा..! विठ्ठल भुसारे साहेबांनी उद्याचं जेवण आमच्या घरी असा प्रेमपुर्वक मोठ्या मनाने निरोप घेतला. व सुभाष ढगे यांच्या घरी जेवण करून माणिक पुरी साहेबांच्या घरी विश्रांतीसाठी आलो.


२७ जून २०२३ या प्रवासातील पुढील प्रवास,

प्रवास पुढे सुरुच आहे,तो पुढील लेखामध्ये..


विजय कृष्णात गायकवाड