त्या विशिष्ट नरभक्षक बिबळ्याला केवळ पगमार्क्सवरून ओळखू शकेन असे कोणतेही फोटोग्राफ्स किंवा इतर साधनं मला उपलब्ध नव्हती.त्यामुळे अशी निश्चित माहिती मिळेपर्यंत आसपासच्या सर्व बिबळ्यांना आरोपी समजणं आणि मिळेल ती पहिली संधी घेणं याशिवाय गत्यंतरच नव्हतं.रुद्रप्रयागला पोचलो त्याच दिवशी मी दोन बोकड खरेदी केले.दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यातल्या एकाला मी यात्रामार्गावर मैलभर अंतरावर एका ठिकाणी बांधलं आणि दुसऱ्याला घेऊन मी अलकनंदा ओलांडली व झाडाझुडपांच्या जंगलातून जाणाऱ्या एका पायवाटेवर बांधलं... आदल्या दिवशी याच ठिकाणी मला एका मोठ्या वयस्कर बिबळ्याचे बरेच जुने पगमार्क्स सापडले होते.दुसऱ्या दिवशी दोन्ही ठिकाणी भेट दिल्यावर मला नदी पलीकडचा बोकड मेलेला आढळला आणि त्याचा काही भाग खाल्लासुद्धा गेला होता.या बोकडाला बिबळ्यानेच मारलंय हे सरळ कळत होतं,पण खाल्लं मात्र एखाद्या लहान प्राण्याने होतं; बहुदा पाईन मार्टिनने !
(पाईन मार्टिन हा प्राणी म्हणजे आज 'येलो थ्रोटेड मार्टिन' म्हणून ओळखला जाणारा प्राणी असावा.हा साधारण मुंगुसासारखा किंवा 'व्हीझेल'सारखा दिसतो.)
त्या दिवसभरात नरभक्षकाची कोणतीही खबर न मिळाल्याने मी त्या बोकडाजवळ संध्याकाळी बसायचं ठरवलं आणि बोकडापासून ५० यार्डावर एक छोटंसं झाड बघून त्याच्या फांदीवर साधारण दुपारी दोनच्या सुमारास जागा घेतली. तिथे मी जवळजवळ तीन तास बसलो पण तेवढ्या वेळात कोणत्याही जनावरांकडून किंवा पक्ष्यांकडून बिबळ्या आसपास असल्याचे निर्देश मिळाले नाहीत.अंधार पडायला लागल्यावर मी झाडावरून उतरलो,बोकडाच्या गळ्याला बांधलेली दोरी सोडली (आदल्या रात्री त्याला मारल्यावर ही दोरी तोडण्याचीही तसदी बिबळ्याने घेतली नव्हती.) आणि बंगल्याकडे पावलं वळवली.मी मगाशीच कबूल केलंय की मला नरभक्षक बिबळ्यांचा फारच कमी अनुभव होता.पण नरभक्षक वाघांचा मात्र भक्कम अनुभव गाठीशी होता.
त्यामुळे झाड सोडल्यापासून ते बंगल्यावर पोचेपर्यंत अचानक हल्ला होऊ नये म्हणून मी सर्व तऱ्हेची दक्षता घेतली आणि माझं सुदैव की मी सावध राह्यलो कारण दुसऱ्या दिवशी अगदी लवकरच उठून बाहेर पडलो तसे मला बंगल्याच्या फाटकापाशीच एका मोठ्या नर बिबळ्याचे ताजे पगमार्क्स मिळाले.ह्या पगमार्क्सचा माग घेतला तेव्हा तो माग कालचा मेलेला बोकड जिथे पडला होता त्यापासून जवळच,पायवाटेला छेदून जाणाऱ्या एका घळीपर्यंत गेलेला आढळला.
आता ज्या बिबळ्याने इतक्या लांब माझा पाठलाग केला होता तो नक्कीच नरभक्षक असणार! त्यामुळे तो दिवसभर मी शक्य तेवढी तंगडतोड करत वाटेत लागेल त्या गावातल्या लोकांना सावध करत राह्यलो की बिबळ्या आता नदीच्या आपल्या बाजूला आहे.खबरदारी घ्या !
त्या दिवशी तरी काही विशेष घडलं नाही पण दुसऱ्या दिवशी गुलाबराईच्या पलीकडच्या जंगलात फेरफटका मारून परत आल्यावर ब्रेकफास्ट करत असतानाच एक माणूस घाईघाईने बंगल्यात आला आणि मला सांगितलं की आदल्या रात्री बंगल्याच्या वरच्या डोंगरावरल्या एका गावात एका बाईचा बळी गेलाय.हाच तो पहाड,की जिथून तुम्ही त्या नरभक्षकाच्या पाचशे चौ.मैलांच्या इलाक्याचं विहंगम् दृश्य बघितलं होतंत !
काही मिनिटातच मी मला पाहिजे त्या सर्व वस्तू जमवल्या.एक जास्तीची रायफल व शॉटगन, काडतुसं मजबूत दोर,माझ्या फिशिंगची लाईन आणि माझी माणसं व तो गाववाला यांना बरोबर घेऊन मी तो अवघड चढ चढायला सुरुवात केली.हा दिवस जरा गरमच होता आणि तीन मैल अंतर जरी फार नसलं तरी जवळजवळ तीन-चार हजार फुटांचा तो चढ चढून गावात पोचलो तेव्हा आम्ही घामाने निथळत होतो.पोचल्या पोचल्याच बळी गेलेल्या त्या बाईच्या नवऱ्याकडून सर्व हकिगत आम्हाला ऐकायला मिळाली.चुलीच्या उजेडात संध्याकाळची जेवणं आटोपल्यानंतर त्याच्या बायकोने सर्व भांडीकुंडी एकत्र केली आणि ती घासण्यासाठी दरवाजाकडे गेली.आणि इकडे नवरा निवांतपणे हुक्का प्यायला बसला.दरवाजा उघडल्यावर ती बाई पायरीवर बसली.त्याचक्षणी भांडी गडगडत खाली पडल्याचा आवाज आला.नक्की काय झालंय हे कळण्याइतपतही तिथे उजेड नव्हता. दोन-तीन हाका मारूनही काहीच उत्तर न आल्याने नवरा पटकन उठला व त्याने घाईघाईने दरवाजा लावून घेतला."मयत झालेल्या व्यक्तीचं शरीर मिळवण्यासाठी मी जीवाचा धोका पत्करण्यात काय मतलब होता साहेब?" हे त्याचं तत्त्वज्ञान कितीही निर्दय वाटत असलं तरी तर्कनिष्ठ होतं.नंतर मला हेही समजलं की त्याला जे काही दुःख झाल्याचं दिसत होतं ते त्याची बायको गेल्यापेक्षा काही दिवसांनी अपेक्षित असलेल्या मुलाच्या वारसाच्या विचारामुळेच होतं.-" जिथे बिबळ्याने तिला उचललं होतं,तो दरवाजा एका तीन-चार फूट रुंदीच्या बोळात उघडत होता.हा बोळ पन्नास-साठ यार्ड लांब होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत घरं होती.भांड्यांचा आवाज व त्यानंतरच्या नवऱ्याच्या हाका ऐकल्यावर त्या बोळातल्या प्रत्येक घराचं दार क्षणार्धात घट्ट बंद झालं. जमीनीवरच्या खाणाखुणांवरून कळत होतं की त्या बाईला तोंडात धरून बिबळ्याने बोळातूनच तिला ओढत नेलं होतं.नंतर तिला ठार मारल्यानंतर डोंगर उतारावरून काही अंतर जाऊन उतारावरची एक दोन शेतं पार करून एका छोट्याशा घळीत नेलं होतं.इथेच त्याने काही भाग खाल्ला होता व इथेच त्याने तिचे दयनीय अवस्थेतले अवशेष टाकून दिले होते.
ज्या घळीत हा मृतदेह पडला होता ती उतारावरच्या शेताच्या एका कडेला होती व त्या शेताच्या दुसऱ्या बाजूला शेजारच्याच शेताच्या कडेला चाळीस यार्डावर एक छोटंसं निष्पर्ण झालेलं आक्रोडाचं झाडं होतं.या झाडाच्या फांद्यांवर जमीनीपासून चार फुटांवर सहा फूट उंचीची गवताची गंजी रचून बांधली होती.याच गंजीवर बसायचं मी ठरवलं.
मृतदेहाच्या अगदी शेजारून एक पायवाट घळीपर्यंत गेली होती.याच वाटेवर त्या बाईच्या मारेकऱ्याच्या पावलांचे ठसे उमटले होते आणि हे ठसे आदल्यारात्री बोकडापासून ते बंगल्यापर्यंत माझा पाठलाग करणाऱ्या बिबळ्याच्या पगमार्क्सी तंतोतंत जुळत होते.
हे पगमार्क्स एका खूप मोठ्या आकाराच्या वयस्क बिबळ्याचे होते व चार वर्षापूर्वीच्या त्या रायफल शॉटमुळे मागच्या डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे अगदी वेगळे काढता येत होते.
गावातून मी दोन मजबूत बांबू घेतले आणि जो बांध वरच्या व खालच्या शेतांमधून जात होता, त्याच्या जवळच मी ते खोलवर ठोकून घेतले. त्या बांबूना मी जास्तीची रायफल व शॉटगन बांधली.त्याच्या ट्रीगर्सना माझी फिशिंगची रेशमी दोरी बांधून ट्रीगरगार्ड्स भोवती गुंडाळून घळीपलीकडे ठोकलेल्या लाकडाच्या खुंट्यापर्यंत ताणून बांधून टाकली.जर आदल्या रात्रीच्याच वाटेवरून बिबळ्या भक्ष्यावर आला तर या फिशिंग लाईन्स खेचल्या जाऊन स्वतःवर गोळ्या झाडून घेण्याची शक्यता होती आणि अगदी दुसऱ्या वाटेवरून आला व भक्ष्यावर असताना मी शॉट घेतला तरीही परत जाण्याचा प्रयत्न करत असतानाही हीच शक्यता होती.
बिबळ्या त्याच्या नैसर्गिक रंगामुळे आणि मृतदेहावर एकही कपडा नसल्यामुळे दोन्हीही त्या अंधाऱ्या रात्री मला नीट दिसणार नव्हते म्हणून दिशेचा अंदाज यावा या हेतूने मी घळीतून एक पांढुरका दगड शोधून आणला आणि भक्ष्यापासून माझ्या बाजूला दोन फुटांवर खालच्या शेताच्या कडेला ठेवून दिला.
आता हे सर्व रणभूमीचं नियोजन मनासारखं झाल्यावर मी गंजीवरलं जरासं गवत बाजूला काढलं आणि थोडं माझ्या पाठीशी,थोडं समोर कमरेपर्यंत येईल असं पसरून गंजीत आरामात जागा घेतली.माझं तोंड भक्ष्याकडे आणि पाठ झाडाकडे असल्याने बिबळ्याने मला पाहण्याची शक्यताच नव्हती;अगदी तो कोणत्याही वेळी आला तरी!एकदा मारलेल्या भक्ष्यावर परत न येण्याची त्याची ख्याती माहीत असूनही आज तो येणार याबद्दल मला संपूर्ण खात्री होती.
दमछाक करणारा चढ चढून परत नंतरच्या या सगळ्या धावपळीमुळे माझे कपडे अजूनही ओलेच राह्यले होते.
पण त्यातल्या त्यात कोरड्या राहिलेल्या जॅकेटमुळे मात्र थंडीपासून थोडं संरक्षण मिळत होतं.आता मी माझ्या गुबगुबीत व आरामशीर बैठकीवर बसून रात्रीच्या पहाऱ्यासाठी सज्ज झालो.मी माझ्या माणसांना जाताना सांगितलं होतं की,सकाळी मी परतेपर्यंत किंवा फार उशीर झाला तरी उन्हें चढेपर्यंत त्यांनी मुखियाच्याच घरात थांबावं.(मी बांधावरून गंजीवर सहज चढलो होतो आणि नरभक्षकासाठीही ते तितकच सहज शक्य होत.)
सूर्य मावळतीला गेला होता व मावळत्या सूर्याच्या तिरप्या किरणांखाली निळसर गुलाबी दिसणाऱ्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या खोऱ्याचं दृश्य पाहणं म्हणजे डोळ्यांना मेजवानीच होती;संधीप्रकाश संपून अंधार केव्हा पडला ते मला समजलंसुद्धा नाही.
रात्रीच्या संदर्भात 'अंधार' ही संकल्पना सापेक्ष आहे व त्याला निश्चित परिमाण नाही.एखाद्या माणसाला अतिशय गडद काळी वाटणारी रात्र दुसऱ्याला साधी अंधारी वाटू शकते तर तिसऱ्याला बऱ्यापैकी दिसू शकेल इतपतच गडद वाटते.आयुष्यातली कित्येक वर्ष जंगलात काढल्यामुळे मला स्वतःला कोणतीही रात्र कधीच संपूर्ण अंधारी वाटत नाही... फक्त आकाश ढगांनी आच्छादलेलं नसेल,तर... अर्थात याचा अर्थ असा नव्हे की मला दिवसाइतकं रात्रीसुद्धा दिसू शकतं.
पण किमान जंगलात रस्ता चुकू नये इतपत मला बऱ्यापैकी दिसू शकतं.भक्ष्याजवळ मी जो पांढरा दगड ठेवला होता तो केवळ एक खबरदारी म्हणून;नाहीतर चांदण्याच्या आणि हिमालयाच्या रांगांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे नेम धरण्याइतपत उजेड मला नक्कीच मिळेल असं मला वाटलं.
पण बहुतेक आज माझं नशीब जोरावर नसावं कारण जरा अंधार पडतो न पडतो तोच विजा चमकू लागल्या आणि दूरवर ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला.काही मिनिटातच संपूर्ण आकाश ढगांनी आच्छादून गेलं व पावसाचे मोठमोठे थेंब पडायला सुरुवात झाली.त्याचवेळी घळीत एक दगड घरंगळत गेल्याचा आवाज आला आणि काही मिनिटानंतर माझ्या गंजीखालच्या गवताच्या काड्या पावलांखाली दबल्याचा आवाज आला.बिबळ्या आला होता. इकडे सोसाट्याचा थंडगार वारा माझ्या ओल्या कपड्यांमधून शीळ घालत असताना,धो धो पावसात मी कुडकुडत असताना तो मात्र माझ्या गंजीच्या छपराखाली कोरडा ठणठणीत आणि उबदार ठिकाणी बसला होता.मी अनुभवलेल्या कित्येक वादळांपैकी आजचं वादळ जरा विलक्षणच होतं.हे वादळ ऐन भरात असताना मला त्या छोट्या गावाच्या दिशेने जाणारा एक कंदील दिसला.तो कंदिल एवढ्या वादळी रात्री घेऊन जाणाऱ्या त्यामाणसाच्या धैर्याचं मला मनोमन कौतुकच वाटलं,मला काही तासांनी कळलं की एक इलेक्ट्रिक शूटींग लाईट माझ्यापर्यंत पोचवण्यासाठी त्या माणसाने पौरीवरून वादळ आणि बिबळ्याची दहशत याची पर्वा न करता तीस मैलांची मजल मारली होती.हा लाईट देण्याचं आश्वासन मला शासनाकडून मिळालं होतं.
ही महत्त्वाची वस्तू फक्त काही तास लवकर माझ्या हातात पडली असती तर? पण 'जर आणि तर'ला वास्तवात तसा काहीही अर्थ नसतो.! आणि अशी खात्री तरी कोण देऊ शकत होतं की बिबळ्याने गळ्यात दात रुतवले नसते तरी पुढे बळी गेलेल्या माणसांना दीर्घायुष्य लाभलं असतं?
आणि समजा लाईट वेळेवर आला असता तरीही माझ्याकडून त्या रात्री बिबळ्याची शिकार झालीच असती याची तरी काय शाश्वती होती ? मला अगदी हाडांपर्यंत गोठवल्यानंतर शेवटी पाऊस थांबला आणि ढगही हळूहळू विरळ व्हायला सुरुवात झाली होती.तेवढ्यात अचानक तो पांढरा दगड दिसेनासा झाला आणि बिबळ्या खात असतानाचा आवाज ऐकायला आला. आदल्या रात्री त्याने घळीत बसून त्या बाजूने भक्ष्य खाल्लं होतं आणि आजही तसंच होईल असं गृहीत धरून मी तो दगड भक्ष्यापासून माझ्या बाजूला ठेवला होता.बहुतेक पावसामुळे घळीत छोटी छोटी डबकी तयार झाली होती व ती टाळण्यासाठी बिबळ्याने खाण्यासाठी आज ही नवी जागा निवडली होती आणि तसं करताना तो बरोबर त्या दगडाच्या समोरच आला असणार.ह्या प्रकारची मी अपेक्षाच केली नव्हती. पण बिबळ्याच्या सवयी माहीत असल्याने मला फार काळ थांबावं लागणार नाही याची खात्री होती.दहा मिनिटांनी मला पुन्हा एकदा तो दगड दिसायला लागला आणि अगदी लगेचच गंजीच्या खाली मी आवाज ऐकला.काहीतरी फिकट पिवळसर आकृती गंजीखाली अदृश्य झाली.हा फिकट रंग त्याच्या वयामुळे असावा पण चालताना त्याने जो आवाज केला त्याचं कोडं मला अजूनही उलगडलेलं नाही.स्त्रियांच्या रेशमी वस्त्रांच्या सळसळीसारखा तो आवाज होता.गवतामुळे झाला म्हणावं तर गंजीखाली तसं गवत नव्हतंच !काही काळ जाऊ दिल्यानंतर मी रायफल खांद्याला लावली व दगड परत दिसेनासा होईल त्याक्षणी ट्रीगर दाबण्याच्या तयारीने दगडावर नेम धरून ठेवला.
पण एवढी जड रायफल तुम्ही किती वेळ खांद्याला लावू शकता यालाही मर्यादा असते.ती मर्यादा ओलांडल्यानंतर स्नायूंना विश्रांती देण्यासाठी मी रायफल खाली ठेवली.मी असं केलं मात्र आणि दुसऱ्यांदा तो दगड दिसेनासा झाला.
पुढच्या दोन तासात हाच घटनाक्रम तीनदा घडला.शेवटी वैतागून नैराश्याच्या भरात तो बिबळ्या गंजीखाली अदृश्य होत असताना मी वाकलो आणि अस्पष्ट दिसणाऱ्या त्या आकृतीच्या दिशेने गोळी झाडली.शेताचा इथला भाग या ठिकाणी २ फूट रूंद होता व जेव्हा दुसऱ्या दिवशी मी तो तपासला तेव्हा मला त्या २ फूट जागेत बंदुकीच्या बुलेटने पडलेलं भोक दिसलं आणि त्याच्याबरोबर बिबळ्याच्या मानेवरचे काही केसही आढळले.यापुढे मात्र सकाळपर्यंत मला काहीही दिसलं नाही.सूर्य उगवल्यावर मी माझ्या माणसांना गोळा केलं आणि रुद्रप्रयागच्या वाटेवरचा डोंगर उतरू लागलो.त्या बाईचा नवरा व त्याचे नातलग ते उरलेले अवशेष अंत्यविधीसाठी घेऊन गेले.
२३.०९.२३ या लेखातील पुढील भाग…