प्लेटोच्या त्या अमर ग्रंथांचे नाव 'रिपब्लिक'असे आहे.या रिपब्लिकमध्ये प्लेटोने आपले ते आदर्श जगत् मांडले आहे.प्लेटोच्या रिपब्लिकची आपल्याला नीट कल्पना येण्यासाठी आपण त्या रिपब्लिकमधील नागरिकांच्या जीवनाकडे पाहूया.जन्मल्यापासून मरेपर्यंत ते आपले जीवन कसे कंठतात,ते पाहू या.
त्या रिपब्लिकमधील मुले म्हणजे सामाजिक सामुदायिक संभोगाची फळे आहेत.उत्कृष्ट संतती जन्मावी म्हणून उत्कृष्ट पुरुषांचा उत्कृष्ट स्त्रियांशी संयोग घडवून आणावयाचा.पुरुषांची या स्त्रियांवर जणू सामुदायिक मालकी! वैयक्तिक विवाह नाहीत,खासगी कुटुंबे नाहीत! मुले जन्मताच शासनसंस्थेने ती ताब्यात घ्यावयाची आईबापांपासून घेऊन त्यांना सरकारी बालसंगोपनगृहात नेऊन ठेवायचे.आईबापांना मुले आणि मुलांना आईबाप ओळखता येत नाहीत असे होईल,तरच मानवी विश्वबंधुत्व कल्पनेत न राहता प्रत्यक्षात येणे शक्य होईल; कारण अशा साम्यवादी शासनसंस्थेत प्रत्येक जण खरोखरच दुसऱ्याचा भाऊ होणे शक्य होईल.आईबापांनी आपले लैंगिक अनुभव त्या त्या ठरवीक व्यक्तीपुरतेच मर्यादित ठेवावेत असे नाही.मुले सरकारच्या स्वाधीन केल्यावर त्यांना स्वेच्छाविलास करण्याची इच्छा असेल,तर त्यांनी खुशाल तसे करावे.परंतु त्यांनी अशा संभोगातून मुले जन्माला येऊ देता कामा नयेत.त्यांनी गर्भपात करण्याची दक्षता घ्यावी.अशा रीतीने अनिर्बंध प्रेमाची गोष्ट व्यक्तीच्या सारासार विवेकतेवर सोपवून दिली आहे.या बाबतीतही स्त्रियांना व पुरुषांना सारखीच मोकळीक. नागरिकांच्या खासगी जीवनात सरकारने लुडबूड करू नये.आता त्या मुलांकडे वळू या.जन्मत:च मुलास सरकारी संगोपनगृहात पाठवावयाचे.या सर्व मुलांना ती वीस वर्षांची होईपर्यंत एकत्र शिक्षण द्यावयाचे.या प्राथमिक शिक्षणात संगीत आणि शरीरसंवर्धक व्यायाम यांचा अंतर्भाव व्हावा.
व्यायामाने शरीर प्रमाणबद्ध व सुंदर असे होईल.संगीताने आत्म्याचे सुसंवादीपण वाढेल, मनाची प्रसन्नता वाढेल.
"ज्या माणसाच्या आत्म्यात संगीत नाही,तो विश्वासार्ह नाही." अशा माणसाचे मन खुरटलेले असते,पंगू व विकृत असते;अशाचे वासनाविकार असंयत असतात; तिथे ताळ ना तंत्र,संयम ना विवेक, सद्सदाबद्दलच्या अशा माणसाच्या कल्पना सदैव दूषित व विकृत असतात. त्याची सद्सद्विवेक शक्तीच जणू भ्रष्ट होते.संगीत म्हणजे प्लेटोला परम ऐक्य वाटे,परम सुसंवादिता वाटे.संगीत ऐकू येणारे असो वा ऐकू न येणारे असो;ते बाह्य वा आंतरिक असो, ध्वनीचे असो वा आकाशातील ताऱ्यांचे असो, सर्व विश्वाच्या पाठीमागे संगीताचे परम तत्त्व आहे;ते नसते तर या जगाचे,या विश्वाचे,कधीच तुकडे झाले असते व जगात साराच स्वैर गोंधळ माजला असता.सर्वत्र अव्यवस्थेचे साम्राज्य पसरले असते.संगीत म्हणजे विश्वाचा प्राण, विश्वाचा आत्मा.ग्रह-तारे म्हणजे विश्वाचे शरीर, हे संगीत जर या विश्वशरीरात नसेल,संगीताचा प्राण जर या पृथ्वीत नसेल.तर ही पृथ्वी म्हणजे निःस्सार वाटेल.मग पृथ्वी म्हणजे केवळ जळून गेलेला कोळसा.केवळ निःसार राख! स्वर्गात व अंतरिक्षात जर संगीत नसेल.या अनंत ताऱ्यांत व ग्रहांत जर संगीत नसेल,तर हे तारे,हे सारे तेजोगोल,
म्हणजे चिमूटभर राखच समजा.
म्हणून प्रत्येकाच्या शिक्षणात संगीत हा महत्त्वाचा व आवश्यक भाग असला पाहिजे.मुलगा व मुलगी वीस वर्षांची होण्यापूर्वी त्यांना संगीताचे सम्यक् शिक्षण दिले पाहिजे.तसेच व्यायामाचेही. ज्या शाळांतून हे शिक्षण द्यावयाचे,त्या शाळा मुलांमुलींसाठी अलग नकोत.एकत्रच शिक्षण असावे.मुलामुलींनी एकत्र काम करावे.एकत्र खेळावे.व्यायाम करताना मुलगे व मुली यांनी कपडे काढले पाहिजेत.प्लेटो म्हणतो,"माझ्या आदर्श राज्यातील स्त्रियांना सद्गुणांची भरपूर वस्त्रे असतील." खोटी लज्जा करायची काय ? मूर्खपणाचे लाजणे नको.
मानवी शरीर उघडे दिसले म्हणून त्यात लाजण्यासारखे किंवा अश्लील वाटण्यासारखे काय आहे? तिथे असमंजसपणे हसण्याची थट्टामस्करी करण्याची जरुरी नाही.मुलांच्या शिक्षणात घोकंपट्टी नको,कंटाळवाणे
पणाही नको;केवळ पढीकपणा नको, केवळ हमालीही नको; केवळ बैठेपणा व पुस्तकीपणा नको;केवळ शारीरिक श्रमही नको.शिक्षणाचा बोजा न वाटता ते परम आनंदप्रद वाटले पाहिजे.शिक्षण म्हणजे आपला छळ असे मुला-मुलींना वाटता कामा नये.योग्य अशा गुरुजनांच्या देखरेखीखाली सर्वसाधारण मुलाला मनाची व शरीराची योग्य वाढ करून घेता येईल, ते भरपूर खेळेल व भरपूर ज्ञानानंदही मिळवील.शाळा म्हणजे मनोबुद्धीचा आखाडा,
बौद्धिक क्रीडांगण,तिथे विचारविनिमयाचा मनोहर खेळ खेळण्यात मुले सुंदर स्पर्धा करतील,ज्ञानांत व विचारांत एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी पराकाष्ठा करतील,
स्वतःमधील उत्कृष्टत्व प्रकट करण्यासाठी धडपडतील.
वयाची वीस वर्षे होईपर्यंत अशा प्रकारचे शारीरिक व मानसिक शिक्षण या आदर्श राज्यव्यवस्थेत मुलांना दिले जाईल.मुले वीस वर्षांची झाली म्हणजे एकदा चाळण मारायची निवड करायची.पुढे आणखी शिकायला जी असमर्थ असतील,त्यांना शूद्र वर्गात घालावयाचे.त्यांनी शारीरिक श्रम उचलायचे,तसेच वैश्यकर्मही उचलायचे.
शेतकरी कामकरी व वैश्य हे सारे या वर्गात.आदर्श राज्यव्यवस्थेत हे हीन धातू यांना काढून टाकल्यावर जे राहतील,त्यांचे शिक्षण पुढे चालू करायचे.
पुढे आणखी दहा वर्षे म्हणजे मुले तीस वर्षांची होईपर्यंत त्यांना विज्ञानविद्या शिकवायची.अंकगणित,भूमिती,
ज्योतिर्विद्या हे विषय शिकवायचे.हे विषय व्यवहारोपयोगी म्हणून नाही शिकवायचे,तर सौंदर्यदृष्टी यावी,प्रमाणबद्धता यावी,म्हणून शिकवायचे.अंकगणिताचा उपयोग केवळ बाजारात देवघेवीसाठी करणे हे कमीपणाचे आहे,असे प्लेटोच्या आदर्श राज्यामधील प्रतिष्ठित सज्जन मानीत.
गणिताचा उपयोग हिशोबासाठी किंवा इमारती बांधण्यासाठी,पूल बांधण्यासाठी किंवा यंत्रे करण्यासाठी करणे हे आदर्श राज्यातील सन्मान्य नागरिक कमी प्रतीचे मानीत.प्लेटो या बाबतीत समकालीन ग्रीकांशी सहमत होता.ग्रीक लोकांना यांत्रिक संशोधनात किंवा भौतीक सुधारणा करण्यात गोडी वाटत नसे,त्यांना ती आवड नव्हती.तिकडे त्यांची प्रवृत्ती नसे.मूर्त व प्रत्यक्ष इंद्रियगम्य ज्ञानापेक्षा अमूर्त व अप्रत्यक्ष इंद्रियातीत ज्ञानाकडेच ते भरारी मारू पाहत. अंकगणिताचा अभ्यास प्लेटोच्या मते फक्त दोन गोष्टींसाठीच करणे बरे.वस्तूंच्या दृश्य विविधतेतून शाश्वत एकतेकडे जाण्यासाठी तत्त्वज्ञान्याला गणिताचे साह्य होते;दुसरी गोष्ट म्हणजे लष्करी सेनापतीला त्यायोगे आपले शिपाई नीट रांगांत उभे करता येतात,त्यांच्या चारचारांच्या रांगा करता येतात,
निरनिराळ्या छोट्या-मोठ्या पलटणी करता येतात.
दहांच्या,शंभराच्या, हजारांच्या अशा टोळ्या करता येतात.गणिताचा सखोल अभ्यास फक्त तत्त्वज्ञानी व सेनानी यांनीच करावा.तीस वर्षांचे वय होईपर्यंत मुलांचा विज्ञानाचा अभ्यास पूर्ण होईल. आणि मग पुन्हा चाळण मारायची, पुन्हा निवड. अधिक उच्च शिक्षण घेण्यास जे असमर्थ ठरतील त्यांना बाजूस काढायचे, त्यांचा मध्यम वर्ग बनवायचा. शिपायांचा, सैनिकांचा, लढवय्यांचा हा वर्ग. आदर्श राज्याचे हे पालनकर्ते, रक्षणकर्ते.प्लेटो जरी परम थोर विचारस्त्रष्टा होता तरी चिनी, हिंदू व ज्यू यांची थोर दृष्टी त्याच्याजवळ नव्हती. शांतीचे ध्येय ग्रीक मनोबुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचे होते. अती उत्कृष्ट असे ग्रीक मत, अती सुसंस्कृत व परमोन्नत असे ग्रीक मतसुद्धा शांतीचा आदर्श कल्पू शकत नव्हते. प्लेटोच्या आदर्श राज्यात सैनिकांना महत्त्वाचे कार्य आहे. 'सैनिकांशिवाय राष्ट्र' ही गोष्ट 'गुलामांशिवाय राष्ट्र' याप्रमाणेच अशक्य वस्तू आहे असे प्लेटोला वाटे.राज्य म्हटले म्हणजे तिथे दास हवे तसे सैनिकही हवे..! प्लेटोच्या भव्य-दिव्य प्रतिभेचे व अपूर्व बुद्धिमत्तेचे कौतुक वाटते.आपणास त्याच्याबद्दल परत आदर वाटतो. परंतु युद्धावरचा त्याचा विश्वास व गुलामगिरीला त्याने दिलेली परवानगी या दोन गोष्टींचा कलंक त्याच्या प्रतिभाचंद्रिकेला लागलेला आहे.
आपण दोन वर्ग पाहिले.शेतकरी,कामकरी व व्यापारी यांचा खालचा वर्ग व नंतर हा क्षत्रियांचा दुसरा मध्यम वर्ग. विसाव्या वर्षी ज्यांची मनोबुद्धी कमी दर्जाची दिसेल त्यांचा खालचा वर्ग, तिसाव्या वर्षी मनोबुद्धीचा अधिक विकास करून घ्यायला जे असमर्थ दिसतील, त्यांचा मध्यम वर्ग. या दोन चाळण्यांनंतर जे उरतील. त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावयाचा.आता ही तीस वर्षांची वेचक मुले आहेत. आदर्श राज्यकारभार चालवण्यास योग्य अशी ही मंडळी. प्लेटोच्या आदर्श राज्यात लैंगिक समानता आहे. स्त्री-पुरुषांना विकासाची, गुणवर्धनाची, पूर्ण मोकळीक आहे, समानता आहे. दोघांनाही समान शिक्षण, समान संधी. जीवनाची महत्त्वाची कामे अंगावर घेताना स्त्री-पुरुषांना कोणतेही स्थान आपापल्या योग्यतेनुरूप घेण्याची मुभा आहे. पाच वर्षे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यावरही अभ्यासक्रम पूर्ण झाला असे नाही. चांगला राज्यकारभार चालवायला ही मुले अद्याप समर्थ नाही झाली, अजून कसोटी आहे. विचारांच्या राज्यातून प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उतरून त्यांनी आता परीक्षा द्यावयाची. दुसऱ्यांच्या जीवनाला वळण देण्याची जबाबदारी उचलण्यापूर्वीच जीवन काय आहे हे त्यांनी अनुभवले पाहिजे, जगातील टक्केटोणपे त्यांनी खाल्ले पाहिजेत, पंधरा वर्षे प्रत्यक्ष जगात त्यांनी वावरले पाहिजे. आता वय पन्नास वर्षांचे होईल. आता तत्त्वज्ञानी राजेराण्या व्हायला ती सारी समर्थ ठरतील. आदर्श राज्यात तत्त्वज्ञानीच शास्ता होण्यास पात्र असतो. तत्त्वज्ञानी तरी शास्ते झाले पाहिजेत किंवा शास्त्यांनी तरी तत्त्वज्ञानी बनले पाहिजे. जोपर्यंत अशी स्थिती येत नाही, तोपर्यंत जगातील दुःखांचा अंत होणार नाही. "शिक्षणामुळे व नैसर्गिक योग्यतेमुळे तत्त्वज्ञानी हेच उत्कृष्ट स्त्री-पुरुष.शासनसंस्थेने जे उत्कृष्ट स्त्री-पुरुष निर्माण केले, ते म्हणजे हे तत्त्वज्ञ; आणि जे उत्कृष्ट आहेत.त्यांनीच राज्यकारभाराचे सुकाणू हाती घेणे योग्य. या तत्त्वज्ञानी शासकांचा शेवटचा, तिसरा, परमोच्च वर्ग.खालच्या व मधल्या वर्गांनी या उच्च वर्गाचे ऐकलेच पाहिजे. या उच्चवर्गीय शास्त्यांत प्रामाणिकपणा असावा म्हणून त्यांची खासगी मालमत्ता असता कामा नये. त्यांचे जे काही असेल ते सारे सामुदायिक ते सार्वजनिक भोजनालयात जेवतील,बराकीतून झोपतील. स्वार्थी वैयक्तिक हेतू नसल्यामुळे हे शास्ते लाचलुचपतीच्या अतीत राहतील.एकच महत्त्वाकांक्षा सदैव त्यांच्या डोळ्यांसमोर असेल आणि ती म्हणजे मानवांमध्ये न्यायाची कायमची प्रस्थापना करणे.आदर्श शासनपद्ध तीचे असे हे संपूर्ण चित्र आपण पाहिले.या आदर्श राज्यपद्धतीच्या नगरीच्या दरवाजावर "न्यायाची नगरी ती ही "अशी अक्षरे आपण खोदून ठेवू या. या न्यायाच्या नगरीत शिरून तिच्यातील काही मनोहर विशेष,काही प्रसन्न व गमतीचे प्रकार, पाहू या.पहिली गोष्ट म्हणजे,या तत्त्वज्ञानी शासकांनी ग्रीकांचा धार्मिक आचार्य व उद्गाता महाकवी जो होमर त्याला व त्याच्या महाकाव्यांना हद्दपार केले आहे.त्या महाकाव्यांतील देव वासनाविकारांनी बरबटलेल्या मानवाप्रमाणे आदळआपट करतात. इलियडमधील देवदेवता पोरकट वाटतात.किती त्यांचे अहंकार ! किती त्यांचे काम-क्रोध.असला हा धर्म निकामी आहे,त्याची शुद्धता केली पाहिजे,त्याच्यातील सारा रानटीपणा नष्ट केला पाहिजे.दुष्ट रूढी,भ्रामक कल्पना,चमत्कार, इत्यादी गोष्टी धर्मांतून हद्दपार केल्या पाहिजेत. मानवी बुद्धीला न पटणारा,तिच्याशी विसंगत असणारा असा धर्म असण्यापेक्षा धर्मच नसलेला बरा.
प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये देवदेवतांची ही अशी दुर्दशा आहे.परंतु मानवा- मानवांतील संबंध कसे राखायचे ? मानवांतील व्यवहार कसे चालवायचे? मुख्य गोष्ट म्हणजे या सर्व व्यवहारांत न्यायबुद्धी असावी.केवळ धंदेवाईकपणा ही गोष्ट त्याज्य आहे.ती मानवाचा अधःपात करणारी आहे.धंदेवाईक माणसाला यशस्वी रीतीने धंदेवाईक होणे व प्रामाणिकही असणे या दोन्ही गोष्टी कशा साधतील ?
प्लेटोच्या आदर्श राज्यात गुन्हेगारांना करूणेने वागविण्यात येते,त्यांच्यावर अंकुश असतो,बंधने असतात;
परंतु त्यांना शिक्षा देण्यात येत नाही. मनुष्य गुन्हा करतो:
कारण त्याला नीट शिक्षण मिळालेले नसते.ज्याला स्वतःचे ज्ञान नाही,आपल्या सभोवतालच्या बंधूंविषयीही ज्याला ज्ञान नाही.अशा अज्ञानी पशुसम मनुष्याची कीवच करायला हवी.खोडसाळ व दुष्ट घोडा फटके मारून साळसूद होणार नाही.वठणीवर येणार नाही.ज्या मनुष्याला सामाजिक बुद्धी नाही.सर्वांशी मिळून-मिसळून कसे वागावे; सर्वांच्या हितसंबंधास अविरोधी वर्तन कसे ठेवावे,हे ज्याला कळत नाही,अशा मनुष्याला केवळ बहिष्कृत किंवा अस्पृश्यप्रमाणे मानून तो सुधारेल असे नाही.गुन्हेगार वेडा असेल तर त्याचे वेडेपण तुम्ही दूर केले पाहिजे.तो अज्ञानी असेल तर तुम्ही त्याचे अज्ञान दूर केले पाहिजे.परंतु सूडबुद्धीने तुम्ही त्याला कधीही,केव्हाही,
शासन करता कामा नये,शिक्षा देता कामा नये.
मानसिक रोगटपणाप्रमाणेच शारीरिक रोगटपणाही अज्ञानजन्यच असतो.काळजी घेतली तर रोगराई बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल.आरोग्य वाढवता येईल.परंतु ज्यांचे रोग दुःसाध्य आहेत त्यांना मरायचे असेल,आत्महत्या करायची असेल,तर कारुण्यबुद्धीने त्यांना तशी परवानगी देण्यात येईल.कारण घुटमळणाऱ्या व कंटाळवाण्या रोगापेक्षा मरण बरे.
वकील म्हणजे एक पीडाच,परंतु आदर्श राज्यात त्यांची जरुरी राहणार नाही.या अनावश्यक आपत्तींचा त्रास प्लेटोच्या राज्यात नाही.कारण जेथे ज्ञान आहे,
समंजसपणा आहे,तिथे कोर्टकचेऱ्यांची फिर्यादांची वगैरे जरुरीच नाही. आदर्श राज्यात कायदे फारच थोडे असतील आणि त्यांचा अर्थ करणे सोपे व सरळ असेल. आदर्श राज्यातील तत्त्वज्ञानी शास्त्यांस पुरतेपणी माहित असते की,एखादा नवीन कायदा करणे म्हणजे गुन्हेगारांचा आणखी एक नवीन वर्ग निर्माण करणे होय.भाराभर कायदे केल्याने गुन्हे कमी होत नसतात.आदर्श राज्यांतील तत्त्वज्ञानी राज्यकर्ते स्वतःचे नियंत्रण कसे करावे, स्वत:वर संयम कसा ठेवावा,हे जनतेस शिकवतील तर मग देखरेख करण्याची,पोलीस वगैरे राखण्याची फारशी जरुरी राहणारच नाही.
आदर्श राज्यातील शासनसंस्था एकच गोष्ट सदैव पाहील.प्रजेचे हित,मंगल कसे होईल,प्रजेला सुख कसे लाभेल,याच एका गोष्टीकडे तेथील शास्ते रात्रंदिवस पाहतील.सुख,स्वास्थ्य,शांती, निरामयता,इत्यादी गोष्टी प्रजेस देणे हे शासकाचे काम राहील.
इमर्सन म्हणतो,"मला आरोग्य द्या व प्रकाश द्या.मग मी मोठ्या सम्राटांचा दिमाखही हास्यास्पद करीन.त्यांच्याहून मी अधिक सुखी व खूष असेन."
प्लेटोच्या दृष्टीने आरोग्य,समाधान व प्रकाशपूर्ण आयुष्य-सौंदर्यमय असा हा जीवनक्रम म्हणजे सुखाची सीमा होय.निळ्या आकाशात 'सुंदर सोनेरी' प्रकाश असावा,
तसे जीवनात सुखसमाधान असावे,सौंदर्य असावे.प्लेटोचे ध्येय काय?सौंदर्याचे जीवन,न्यायाचे जीवन,प्रेममय जीवन,
'सत्यं शिवं सुंदर'चे जीवन,प्लेटोचे हे ध्येय आहे.प्लेटोच्या तत्त्वज्ञानात हे तिन्ही शब्द जणू समानार्थकच आहेत.
सज्जन मनुष्य म्हणजेच सुखी मनुष्य,सुखी असणे म्हणजेच सज्जन असणे.चांगले असणे;आणि हा सज्जन नेहमी न्यायी असतोच.जो सुखी व सज्जन असतो, त्याच्या जीवनात अविरोध असतो.त्याच्या जीवनात प्रमाण असते,
मेळ असतो,म्हणून त्याच्या जीवनात शांतीचे संगीत असते.असा मनुष्य सौदर्यासाठी तहानलेला असतो.सर्वत्र मधुरता असावी,सुंदरता असावी,अशी उत्कंठा व असोशी त्याला असते.सौदर्य सर्वत्र व्हावे, दिसावे,म्हणून तो प्रयत्न करीत राहतो; सौंदर्यांसाठी तो धडपडतो.आपल्या सुंदर मुलांच्या रूपाने,कलात्मक कृतींच्या रूपाने किंवा उदात्त व उदार अशा कर्माच्या रूपाने,तो स्वतःमधील सौंदर्यच प्रकट करीत असतो. शारीरिक,बौद्धिक व आंतरिक सौदर्य तो मूर्त करू पाहतो.सौंदर्य ही अमृताची जननी आहे. जिथे सौंदर्य आहे तिथे अमरता आहे.सौंदर्य असेल,तर अमृतत्वाचा अमरपट्टा मिळेल.सुंदर वस्तू निर्मून आपण मृत्यूवर विजय मिळवतो, मरणाला जिंकून घेतो.
बुद्ध प्रेमधर्मांचे आचार्य,कन्फ्यूशियस न्यायाचे उद्गाते,
जेरेमिया शांतीचा संदेश देणारे आणि प्लेटो सौंदर्याचे महान सद्गुरू,सौंदर्याची उपासना प्लेटो शिकवितो.त्याने अशी एक नगरी बांधली की,ज्यामध्ये थोर मानव नांदत.ही नगरी प्रकाशदेवतेला,अपोलोला त्याने अर्पण केली.ही नगरी त्याने तारामंडळात ठेवून दिली.अशा हेतूने की भविष्यकालीन शिल्पकारांनी आदर्श म्हणून स्वतःच्या क्रांतिकारक स्वप्नांसाठी एक दिव्य उदाहरण म्हणून,
तिच्याकडे सदैव बघावे.परंतु केवळ नवीन समाजसृष्टीचे एक स्वप्न खेळवून, एक दिव्यचित्र रंगवूनच,समाधान मानणारा प्लेटो नव्हता.कन्फ्यूशियसप्रमाणे स्वतःच्या तात्त्विक व ध्येयवादी विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने धडपड केली.रायराक्यूसचा राजा डायोनिशियस त्याने प्लेटोला आदराने बोलावले. प्लेटो सिसिली येथे गेला.त्याने डायोनिशियसला शहाण्या माणसांप्रमाणे राज्य कसे करावे,हे शिकविले.परंतु प्लेटोचे काही क्रांतिकारक विचार ऐकून तो राजा घाबरला त्याने प्लेटोला गुलाम
करून विकले व प्लेटोच्या क्रांतीतून स्वतःला वाचविले.
प्रामाणिक व न्यायी राज्यपद्ध तीला जग अद्याप तयार नव्हते.प्लेटोच्या एका शिष्याने त्याची खंडणी भरली आणि प्लेटो मुक्त झाला;त्याचे स्वातंत्र्य त्याला मिळाले.तो पुन्हा अथेन्सला आला,आणि आपल्या त्या तत्त्वज्ञान मंदिराच्या उपवनात बसून तो पूर्वीप्रमाणे पुन्हा तात्त्विक विचार देत राहिला,आपली उपनिषदे देत राहिला.
कितीतरी वर्षे असा हा महान ज्ञानयज्ञ त्याने चालविला होता;प्रकाश देत होता आणि तो एक्याऐंशी वर्षांचा झाला.
एका तरुण मित्राचे लग्न होते.आशीर्वाद देण्यासाठी म्हणून तो तिथे गेला होता.तिथे लग्नातील थट्टाविनोद चालला होता.सर्वत्र गडबड,हशा,आनंद होता.तो आनंदी गोंधळ त्याच्या प्रकृतीस मानवला नाही.तो थकला. 'माफ करा' असे म्हणून तो जरा विश्रांती घेण्यासाठी,थोडी झोप घ्यावी,डुलकी घ्यावी म्हणून शेजारच्या खोलीत गेला. इकडे थट्टामस्करीस ऊत आला.खानपानगान जोरात चालले.त्या लग्नाच्या वऱ्हाडाला जणू त्या थकल्या- भागलेल्या वृद्ध तत्त्वज्ञान्याची विस्मृतीच झाली!इकडे हा सारा धांगडधिंगा चालला असता थोडी विश्रांती मिळावी म्हणून तो तिकडे धडपडत होता.परंतु त्या पलीकडच्या खोलीत प्लेटोला गाढ झोप लागली होती.शेवटची गाढ झोप.या जगातील अर्थहीन आवाज,निरर्थक गोंगाट अतःपर त्याची शांती भंगविणार नाहीत.त्याची विश्रांती मोडणार नाहीत.तत्त्वज्ञानांचा हा सम्राट,याला शेवटी समदृष्टी अशा त्या मृत्यूदेवाच्या आदर्श राज्यातील आमंत्रण आले.
१७.१०.२३ या लेखातील पुढील शेवटचा भाग…