* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: असे ही एक स्मारक - Such a memorial..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/१०/२३

असे ही एक स्मारक - Such a memorial..

ते काॕटवर बसलेले बाबा दिसतात का ?अं..हो तेच ! 


आपण त्यांना पाहु शकतो पण ते आपल्याला नाही पाहु शकत... कारण त्यांना दिसतच नाही... ! 


अं...हं... पण त्यांना अंध म्हणायचं धाडस नाही होत.नजर नसेलही डोळ्यात कदाचीत,पण तरीही त्यांना एक दृष्टी आहे... !


नजर आणि दृष्टी मध्ये फरक आहे... दोन वाक्यं वाचायला नजर लागते.. त्याचा अर्थ कळायला दृष्टी !


समोरच्याला पहायला नजर लागते... समोरच्याच्या मनातलं पहायला दृष्टी ! 


लहानपणी शाळेत प्रत्येकजण चौकोन,त्रिकोण, काटकोन,

लघुकोन,विशालकोन शिकतो... दृष्टिकोन शिकायचा राहुनच जातो !


आयुष्याच्या भुमितीत,आपणच आपल्याभोवती एक न दिसणारं वर्तुळ आखुन घेतो,आपल्याही नकळत ... 


यात एक चौकोनी कुटुंब असतं... 


मी,माझं आणि मला या 'त्रि' कोनांच्या बाहेरचं जगच नाही असं समजुन जगणं सुरु होतं....


संकुचित कसं व्हायचं असतं ते लघुकोनानं शिकवलेलंच असतं... 


विशालकोन सुद्धा आस्तित्वात असतो...हे कळेपर्यंत आयुष्याचा काटकोन झालेला असतो... 


आपणही एकदा विशालकोन होवु म्हणता म्हणता... समिकरणं बदलत जातात... हिशोब मांडता मांडता सगळेच कोन मोडुन पडतात आणि मग उरते फक्त सरळ रेषा...


आपले सगळेच कोन हरवुन बसतात... आणि शेवटी प्रश्न उरतो आता मी कोण ? 


या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत... आयुष्याची भुमिती कळण्याआधीच... या सरळ रेषेला भुई मातीत घेते कायमचीच...!


असो ! 


नीट पाहिलं ? या बाबांना पायही नाहीत...! 


हे अंध आणि अपंगही... ! 


पण यांना डोळे नसुनही दृष्टी आहे आणि पाय नसुनही उठुन उभं राहण्याचं बळ अजुन आहे..! 


अंध असुनही दृष्टी असणं आणि पाय नसुनही बळ असणं यालाच दिव्य अंगं म्हणतात...! 


ज्यांच्याकडे हि अंगं आहेत ते दिव्यांग !

शहाणपण आणि अनुभवही असेच... !


शहाणपणाला पाय असतात,ते चालु शकतं,पण डोळे नसतात...! अनुभवाला दिसु शकतं,डोळे असतात पण पाय नसतात...ते स्वतंत्र चालु शकत नाही ! 


एकटं शहाणपण आणि एकटा अनुभव असुन काहीच कामाचे नाहीत !


अशावेळी शहाणपणानं,अनुभवाला पाठकुळीवर घ्यावं... अनुभव दाखवेल त्या दिशेनं शहाणपणानं मग चालत रहावं... ! 


असं चालणं म्हणजेच जगणं... नाहीतर फक्त भोगणं ...! 


तर... बाबांचे लहानपणीच डोळे गेले... पण पाय मात्र धडधाकट होते. 


रेल्वेमध्ये काही न् काही विकायचा व्यवसाय ते करायचे.

ऊत्तम चाललं होतं.पुढे लग्न झालं.दोघं एकमेकांना पुरक ! 


एक मुलगी झाली... त्यानंतर मुलगा...! 


यथावकाश मुलीचं लग्न करुन दिलं.मुलगा लहान होता,त्याला शिकायची भारी हौस... ! म्हणायचा,पप्पा खुप शिकायचंय मला... ! पप्पाही त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत सांगायचे... बाळा भरपुर शीक,मोठा हो ! 


मी वचन देतो तुला,शिक्षणासाठी काही कमी पडु देणार नाही... ! पण... हे घडायचं नव्हतं...


एके दिवशी रेल्वेतुन गडबडीने उतरतांना पाय घसरला, पायांवरुन रेल्वे गेली... थोड्यावेळापुर्वी असणारे पाय सोडुन गेले... !


पुर्ण अपंग होवुन घरात झोपुन राहिले.पायातली वेदना आणि डोक्यातले विचार... दोन्हींच्या कळा मस्तकात जायच्या ! खायचे प्यायचे वांधे... आता मुलाला शिकवणार कसं ? 


परिस्थिती मार्ग दाखवते.... 


बाबांच्या पत्नीनं आता चार घरी घरकाम सुरु केलं... कसंतरी घर पुन्हा चालु लागलं ...


बाबांची पत्नी बाबांचं सारं करायची ! 

पण हे सुद्धा व्हायचं नव्हतं ! 


मध्यंतरी बाबांच्या पत्नीच्या पायाला काहीतरी झालं,

पायाला गँग्रीन झालं... निदान होवुन ऊपचार सुरु होईतो... डाॕक्टरांनी जाहिर केलं,यांचेही पाय कापावे लागतील नाहीतर जगण्याची शाश्वती नाही... ! 


बाबांच्या पत्नीचाही पाय कापावा लागला... !


आता कुणी कुणाचं करायचं ?  दोघेही अंथरूणावर पडुन...!


मुलगा रात्र रात्र रडत रहायचा... ! तिघांच्याही डोळ्यांपुढं पुर्ण अंधार... ! कुणीतरी जाणुनबुजुन हे घडवुन आणलंय असं वाटावं अशी परिस्थिती !


लोक भेटायला - बघायला यायचे... पोकळ सांत्वन करुन निघुन जायचे... 


दिवसा भरलेलं घर... रात्री रिकामं व्हायचं आणि मागे उरायचे तीन जीव...अंधारात तळमळणारे.!


ताजमहालाचंही असंच ...! 


दिवसा बघायला,कौतुक करायला आख्खी दुनिया लुटते... पण रात्रीच्या अंधारात सोबतीला कुणी थांबत नाही इथं ... ! नदीच्या काठावर थंडीनं कुडकुडत,आयुष्याच्या अंधारात तोही तळमळत असतो एकटा ... जीवाची लाही लाही होत असते एकटेपणामुळे...! त्याची घुसमट होत असते... घुमटाच्या आत... आणि लोक याच घुमटाकडं पाहुन म्हणतात... वाह ताज !!!


सौंदर्यालाही शाप असतो हेच खरं....! 


बाबांच्याही सुंदर आयुष्याला असंच गालबोट लागलं होतं.बाबांच्या डोळ्यापुढं होतं... पोराचं आयुष्य...त्याचं शिक्षण,आणि शिकवण्याचं त्याला दिलेलं वचन !


नविन झालेली जखम,जुन्या जखमांच्या वेदना कमी करते,हेच खरं !


पत्नीचं दुःख्खं पाहुन ते स्वतःचं दुःख्खं विसरले...! 

पुन्हा काम करायचं ठरवलं त्यांनी...


घरातल्या पाटाला चाकं जोडली आणि त्यावर बसुन हातानं ढकलत ते इकडुन तिकडे फिरायला शिकले. 


लोक पायात मोजे घालुन त्यावर बुट घालतात... बाबा हातात बुट घालतात... ! 


पाटावर बसुन रस्त्यांवर हात घासत जातांना हाताला इजा होवु नये म्हणुन...


पायाचं काम,आता हात करायला लागले... ! 


परिस्थितीनुसार,जो स्वतःला बदलतो तोच टिकतो या जगात ! 


जग सुंदरच आहे... हातांनीही कधीतरी पायाशी येण्याचं मोठेपण दाखवलं तरच... ! 


पाटावर बसुन,दारोदारी जावुन काम शोधणं सुरु झालं...! 


दारावर आलेला हा भिकारीच आहे असं समजुन,लोक पाच दहा पैसे अंगावर फेकत... काम नाही !


पाचदहा पैशांत लोकांना पुण्य विकत हवं असतं... !


मेलेल्या माणसाला खांदा देवुन पुण्य मिळवण्यापेक्षा,

जमिनीवर पडलेल्याला हात देवुन उठवण्याने पुण्य जास्त मिळतं... ! 


हात द्यायचा कि खांदा ... ज्याने त्याने ठरवावं...! 


आता,सकाळी काम शोधायला निघायचं आणि संध्याकाळी परत यायचं, हे रोजचंच झालं...! 


एके दिवशी भकास आयुष्यं घेवुन,रस्त्यावर ते विचार करत बसले असतांनाच, भिकारी समजुन दोन-चार जणांनी पुढ्यात अजुन पैसे फेकले... !


बाबांचं मन आता पालटायला लागलं... लोक काम नाही,पण भीक मात्र सहज देतात... !


त्यांना पुण्य साठवायचं असतं आणि आपल्याला भाकरी !


काळानुसार गरजा बदलतात हेच खरं...!


त्या दिवसापासुन रोज चुल पेटायला लागली... ! 


चुलीत लाकडं ढणाढणा जळायची... आणि सोबत बाबांचं मनही आणि मानही ! 


आता मन मेलं आणि याचदिवशी आणखी एका भिक्षेक-याचा जन्म झाला... !


बाबा रोज याच जागेवर येवुन बसु लागले... मिळणाऱ्या भिकेत घर आणि पोराचं शिक्षण सुरु ठेवलं... !


स्वतःचा आत्मसन्मान बाजुला सारुन ! 


हे असं एक दोन नाही तर तब्बल 11 वर्षे चाललं... ! 


माझी,यांची भेट ९ जुन २०१९ ची ! 


औषधं देता देता यांच्याशी सुर जुळले... आणि न जमलेलं गाणं ते माझ्यापाशी गात राहिले... मी ऐकत गेलो ... !


या गाण्याला ना कसला सुर,ना कसला ताल, ना कसली लय... ! तरीही कुठं तरी खोलवर रुतुन बसणारं... हे गाणं मुक्तछंदातलं...!  


'एक सर्वसामान्य आयुष्य जगणारा माणुस आज परिस्थितीपायी भिक मागतो... बाबा खुप वाईट वाटतं मला.' मी बोलुन गेलो. 


'नाही डाॕक्टर,मी विसरलोय जुनं सारं आता. अहो विस्मरण हा आजार आहे म्हणतात.


पण खरं सांगु ? विस्मरण हे आपल्याला मिळालेलं एक वरदान आहे.एखाद्या गोष्टीचं सारखं स्मरण होणं हा खरा आजार ! अहो विस्मरण झालं नसतं तर माणुस जगुच शकला नसता.आपण पडलो होतो, हे जर विसरलोच नाही तर उठुन उभं रहायची आठवण कशी येणार ?' ते हसत बोलले होते. 


डोळ्यांची जागा रिकामी आहे यांच्या... 


पण या पोकळ जागेत मला सारं विश्व दिसलं या वाक्यानं...! 


'एकाही नातेवाईकाने मदत केली नाही तुम्हाला बाबा ?' मी शेजारी बसत विचारलं होतं. 


माझ्या आवाजाचा अंदाज घेत माझ्याकडे पहात ते खोल आवाजात बोलले,'आपल्याकडे पैसा - पद - प्रतिष्ठा जर असेल तरच नाती आपल्याला जवळ घेतात. 


पैसा - पद - प्रतिष्ठा यांपैकी मात्र आपल्याजवळ काहीच नसेल तर ना-ती तुमची,ना-ती माझी !' 


'ना-ती तुमची,ना-ती माझी !' खरंय बाबा,मी आवंढा गिळला. 


अहो डाॕक्टर,पैसा पद प्रतिष्ठा असेल तर नुसतं जवळ जाताच सारी बंद दारं आपोआप उघडतात... मात्र एकदा का हे तुमच्याकडनं गेलं की उघड्या दारावर टकटक केली तरी आतुन कुणी आपल्याकडे ढुंकुन पहात नाही... पाहिलंच तर पाहणाऱ्याच्या नजरेत भाव असतो... ऐ,चल हो पुढं ! 


या अर्थानं आपणही सारे भिकारीच !' हातात घातलेला बुट नीट करत ते बोलले.रस्त्यावरच्या शाळेत तयार झालेलं बाबांचं तत्वज्ञान ऐकुन मी थरारलो...!


'तसे आले होते काही लोक मदत करायला... किमान तसं त्यांना दाखवायचं होतं.ते किनाऱ्या किनाऱ्याने फिरत होते... पण ते येईपर्यंत आम्ही केव्हाच बुडुन गेलो होतो...सापडणार कसे ?' ते पुन्हा हसले,त्यांच्या त्या केविलवाणं हसण्यानं, रडण्यालाही लाज वाटावी...


'बुडण्याचं दुःख्खं नसतं डाॕक्टर,आपल्याला पोहता येत नाही याचंही दुःख्खं नसतं... पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःख्खं !' 


डोळे नसलेल्या जागेतुन आता अश्रुंची धार लागली होती...ऊगम सापडत नसलेला,तरीही समोरुन वहात असलेला झरा असाच असावा का ?


असे कितिक झरे वाहतात आणि नंतर आटुन जातात...! 


'बाबा, तुमच्या पत्नीने खुप साथ दिली तुम्हाला... तुम्ही दोघं एकमेकांबरोबर होतात म्हणुन निभावलं.' मी त्यांचा हात हाती धरुन म्हणालो. 


'हो, खरंय ते...! पण डाॕक्टर तुमच्या गणिताच्या पुस्तकात असतात तशी गणितं आयुष्यात घडत नाहीत.'


'दोन मधुन एक वजा झाला तर प्रत्येकवेळी एक उरतोच असं नाही.पाय गेल्यावर आमच्या दोघांतुन मी वजा झालो तेव्हा ती शुन्य झाली होती... आमच्या आयुष्याच्या गणितात दोन वजा एक बरोबर शुन्य झालं होतं...!' 


खरंच पुस्तकातलं ज्ञान काहीवेळा पुस्तकातल्या पानांतच मिटुन राहतं... पिंपळाच्या जपलेल्या पानासारखं! 


कालांतरानं त्याची नक्षीदार जाळी होते... दिसायला दिसते छान... याच जाळीला आपण फ्रेम करुन भिंतीवर लावतो पदवी म्हणुन... !


पुस्तकातल्या ज्ञानानं पदवी मिळते ... पण, माणुस म्हणुन पद मिळवायचं असेल तर पुस्तकाबाहेरच यावं लागतं !


पदवीच्या या जाळ्यात मग आपणच अडकत जातो... खुप काही मिळवता - मिळवता,... बरंच काही हरवुन येतो...! 


 'बाबा, मी काय मदत करु तुम्हाला ? ' बाबांच्या पाटाला हात  लावुन मी विचारलं. 


'काय मदत करणार आता डाॕक्टर ? राहुद्या चाललंय तेच बरं आहे.' ते शुन्यात बघत म्हणाले असावेत.त्यांच्यापुढं सारंच शुन्य होतं. 


'बाबा, मुलाचं शिक्षण करु,ट्रस्टच्या माध्यमांतुन...' मी चाचरत बोललो. 


ते तिसरीकडे पहात हसत म्हणाले... 'बघा प्रयत्न करुन,तो तयार होईल की नाही माहित नाही... !' 


'म्हणजे ?' 


'डाॕक्टर,तुम्ही घरी या,त्याच्याशीच बोला...' बाबांनी हसत पुन्हा हातातला बुट सावरला. 


यानंतर पत्ता घेवुन एकेदिवशी मी त्यांच्या घरी  पोचलो.


वाळुत मणी शोधावा तसं मी त्या झोपडपट्टीतुन बाबांचं घर शोधलं...! 


बोळाबोळांतुन वाट काढत मी घरात आलो... ! 


६x६ फुटांचं हे घर ! 


ते काॕटवर बसलेले बाबा दिसतात का ?

अं ... हो हेच ते ... ! 


पत्र्याच्या या घरांत लख्ख उजेड ! घर अतिशय स्वच्छ आणि लखलखीत ! 


एका कोपऱ्यात लोखंडी काॕट,त्यावर अनेक ठिकाणी शिवलेली पण स्वच्छ चादर... काॕटखाली नीट रचुन ठेवलेली अंथरुणं आणि शिस्तीत मांडलेली भांडीकुंडी.


दुस-या कोपऱ्यात देव्हारा...! त्यात लावलेली अगरबत्ती मंद जळत सुवास देत होती... 


एका ठिकाणी बाबांचा मुलगा,जमिनीवर पोतं टाकुन,त्यावर पुस्तकं मांडुन अभ्यास करत होता... 


उरलेल्या ठिकाणी स्वयंपाक सुरु होता... ! बाजुला बसल्येय ती बाबांची पत्नी ! 


पातेल्यात भात घातला असावा.शिजत असलेल्या भाताला इतका सुंदर सुवास येतो... मला आजच कळलं... !


पत्र्याच्या या घरात खुप प्रसन्न वाटत होतं ! 


अगरबत्ती आणि भाताचा वास एकमेकांत मिसळुन अजब मिश्रण तयार झालं होतं... ! 


भुक आणि भक्ती या पत्र्याच्या घरात आज एक झाली असावी का ?


भिंतीवर टांगलेला एक स्वच्छ आरसा,त्यालाच अडकवलेला एक कंगवा... ! 


मी सहज आरशात पाहिलं... मला  माझ्यासह ते तिघेही आरशात दिसले... 


भिंतीवरच्या त्या आरशाने चौघांनाही एकत्र चौकटीत घेत "कोन" साधला होता... 


आणि याबरोबरच "मी कोण" हा प्रश्नही आता माझ्यापुरता सुटला होता... ! 


मी मुलाला विचारलं, 'काय करतोहेस सध्या...?' 


सर सुक्ष्मजीवशास्त्र या विषयामध्ये ग्रॕज्युएशन करतोय मी...! 


मी उडालोच.... ! 


भीक मागत बाबांनी पोराला सुक्ष्मजीवशास्त्र सारख्या किचकट विषयाच्या डिग्रीपर्यंत ओढत आणला ? 


आश्चर्यानं मी बाबांकडे पाहिलं.या बाबांच्या पाया पडावं !  


'Greattt यार,मला तुझा अभिमान आहे...' मी त्याच्याजवळ जात म्हणालो.


'तुला माहित आहे,बाबांची अवस्था सध्या बिकट आहे,माझी संस्था आहे,लोकांच्या आश्रयावर ती चालते,या माध्यमांतुन तुला आम्ही शिक्षणासाठी मदत करु शकतो... !' मी थोडक्यात त्याला सर्व सांगितलं. 


'सर, तुम्ही भिका-यांनी भीक मागु नये म्हणुन प्रयत्न करता ना ?' चेह-यावरची रेषाही न हलवता तो  म्हणाला.


'हो...' मी बोलुन गेलो. 


'मग ? मलाही तुम्हाला भिकारीच बनवायचं आहे का ?' तो शांतपणे  पुस्तकं आवरत म्हणाला. 


'म्हणजे ... ?' मी घाम पुसत आश्चर्यानं बोललो.


'सर,पप्पांनी आजपर्यंतचं माझं शिक्षण भिकेवरच केलं... माझ्यापायी त्यांना भीक मागावी लागली,याची बोच मला आयुष्यंभर टोचणार आहेच.' तो मान वळवत म्हणाला. 


'खरंय ते,त्यावेळी इलाज नव्हता मित्रा, परिस्थितीनुसार जे वाट्याला आलं ते त्यांनी केलं,आज आपण ही परिस्थिती बदलु शकतो.' मी समजावलं. 


'तुम्ही एका माणसाची भीक थांबवुन आता त्याच्या पोराला भीक घालुन,आणखी एक भिकारी तयार करताय असं नाही वाटत सर तुम्हाला ?' त्याने माझ्यावर नजर रोखत विचारलं. 


मी अचंबीत झालो ! 


मला या शब्दांचा राग आला आणि वाईटही वाटलं... 


म्हटलं, ' तुला काय म्हणायचंय नेमकं बोल मित्रा... मी तुला मदत करायला आलोय... भीक द्यायला नाही.भिक आणि मदत यात फरक आहे.पण,ठिक आहे,तुझी स्वतःचीच इच्छा नसेल तर माझी बळजबरी नाही.' निघण्याच्या तयारीनं नाराज होवुन मी जायला उठलो. 


'सर...' पाठीमागनं आवाज आला त्याचा,मी वळुन पाहिलं. 


 'मी सुद्धा तेच म्हणतोय,भीक नको,मदत करा मला...! पुढचं वाक्य त्यानं पुर्ण केलं.


' वेडा आहेस का रे तु ? इतकावेळ मी काय बोलतोय मग मघापासुन ?' वैतागुन मी बोललो. 


यावर त्याने हात जोडले आणि म्हणाला, ' सर पार्ट टाईम जाॕब बघा मला,मी शिकत शिकत काम करेन... काम करत करत शिकेन... मिळणाऱ्या पैशांत मी माझं शिक्षण करुन, कुणीतरी होवुन आईबापाला सुखात ठेवेन !' 


'आज तुम्ही मला शिक्षणाला मदत केलीत तर उद्याही तुम्ही आणखीही अशीच काहीतरी मदत करावी असं मला वाटेल,तुम्ही ती  करालही ! पण,याची मला सवय लागेल... आणि मी कायम तुमच्यावरच अवलंबुन राहीन, स्वावलंबी व्हायला मला वावच मिळणार नाही...

शिक्षणाची मला भीक नको,नोकरीची मदत करा...' आता त्याच्या डोळ्यात पाणी होतं.


मी भारावुन गेलो... बाणेदारपणा आणि स्वाभिमान हे शब्द पुस्तकांतले... आज प्रत्यक्षच मी अनुभवत होतो... ! 


भीक म्हणजे दुस-याला आपल्यावर

अवलंबुन ठेवणं.! मदत म्हणजे दुस-याला 

स्वावलंबी बनवणं ...!


अवलंबुन नका ठेवु त्यांना आपल्यावर, स्वावलंबी बनवा ! 


घसा फाटेपर्यंत रोज मी हेच बोलत असतो. 

हे पोरगं आज माझीच वाक्यं बोलतंय... ! 


माझ्या डोळ्यांतुन पाणी वहायला लागलं... उठुन त्याला मिठी मारत म्हणालो, 'आज मला तुझ्या तोंडुन ही वाक्यं ऐकुन एक लढाई जिंकल्याचा भास होतोय...!'


बोलता बोलता मी बाबांकडे पाहिलं... 


त्यांना दिसत काहीच नव्हतं,पण आजुबाजुला चाललंय ते सर्व कळत होतं.त्यांच्या चेह-यावर अतिव समाधान होतं आणि चेह-यावरुन वहात होता उगम नसलेला झरा ! 


म्हणाले, 'डाॕक्टर, मनात असुनही आम्हाला स्वाभिमान जपता नाही आला...परिस्थितीनं भिकारी म्हणुन जगायला लावलं... आयुष्यात पोराला बाकी काही देता आलं नाही...पण स्वाभिमान मात्र भरभरुन दिलाय त्याला ... मी भिकारी म्हणुन जगलो... पण त्याने तसं जगु नये,हिच शिकवण  दिली आयुष्यंभर ...! 


चला या निमित्तानं त्याची परिक्षा झाली,तो पास झाला आयुष्याच्या या परिक्षेत !' असं म्हणत ओंजळीत चेहरा लपवुन ते ढसाढसा रडायला लागले... ! 

काय बोलावं ? 

सर्व शब्द आणि भावना थिट्या पडतात.

अशा माणसांपुढे ! 


यानंतर बाबा व त्यांच्या पत्नीसाठी मी सुद्धा नोकरी शोधली पण मिळाली नाही...


म्हणुन घरबसल्या औषधांची पाकिटं करणे वैगेरे अशी माझ्याचकडे यांना कामं देवुन संस्थेला मिळणाऱ्या डोनेशन मधुन या दोघांना पगार चालु केला आहे. 


बाबा आता भिक मागत नाहीत, कुणी विचारलं तर अभिमानानं ते सांगतात, मी आणि माझी बायको सोहम ट्रस्टमध्ये काम करतो. 


मुलाच्या म्हणण्यानुसार त्याला पार्ट टाईम जाॕब शोधुन दिलाय,तो स्वतः कमवत शिकतो,घरही चालवतो... पुर्ण स्वावलंबी होवुन ! 


पाच पैशांचीही मदत घेण्याचं त्यानं नाकारलं आहे... ! 


सुक्ष्म जीवशास्त्रातली मास्टर डिग्री पुर्ण करुन या विषयांत त्याला नविन संशोधन करायचं आहे...सायंटिस्ट होणं हे त्याचं स्वप्नं आहे ! 


त्या दिवशी त्यांच्या घरातुन बाहेर पडतांना, एकानं विचारलं,डाॕक्टर इकडं या झोपडपट्टीत काय करत होता ? अच्छा,तुमच्या त्या पांगळ्या भिका-याच्या घरी गेला होता काय ?


पांगळा कोण ? जगातला सर्वात सशक्त बाप आहे तो... ! सर्व असुनही कारणं देणारे आपण  पांगळे असतो ! 


मी परत वळुन त्या पत्र्याच्या शेडकडे पाहिलं... 


शेड कसलं ते ?


एका श्रीमंत बापाचा महाल होता तो... ! 

एका भावी सायंटिस्ट ची प्रयोगशाळा होती ती ! 

इथंच तो घडतो आहे !!! 


आज या ठिकाणी मी आलो... भविष्यात जगातली लोकं येतील...एव्हढा मोठा सायंटिस्ट आधी कुठं रहात होता ते पहायला... ! 


आजचं हे शेड... उद्याचं स्मारक आहे... ! 

हे स्मारक आहे एका बापाच्या जिद्दीचं ! 

हे स्मारक आहे एका पोराच्या स्वाभिमानाचं ! 

हे स्मारक आहे एका भिक्षेक-यांनं सोडलेल्या भिकेचं ! मी मनोमन नतमस्तक आहे या स्मारकापुढं !


९  जुन २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर


तळटिप - एकदा साहेबांना मी फोन लावला होता.हे माझे प्रेमळ मित्र आहेत.त्यावेळेस त्यांच्याशी बोलत असताना.चकवा चांदण या पुस्तकातील एक प्रसंग सांगितला जो पुढीलप्रमाणे होता.


" इफ यू आर लुकिंग फॉर 

अ मेमोरियल,लुक अराउंड " 

" स्मारक शोधत असाल तर आजूबाजूला बघा." 


हुगो वुड या वनाधिकाऱ्याच्या समाधीवरील एका शिळेवरील स्पष्ट दिसत नसणारी अक्षरे.. यावेळी उत्तर देताना त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान..


'स्मारक शोधू नका.... असं काहीतरी करा.... स्वतःचा स्मारक बनेल'- डॉ.अभिजीत सोनवणे.