* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: माणुसकी शिकवणारी 'हडळ '.. 'Strike' that teaches humanity..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२५/१०/२३

माणुसकी शिकवणारी 'हडळ '.. 'Strike' that teaches humanity..

मी नववीत असेन बहुधा.साता-यातुन मी त्यावेळी आजीकडे आलो होतो ऊन्हाळ्याच्या सुट्टीला.मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, ढग दाटुन यायचे पण पाऊस पडायचा नाही.खुप रडावंसं वाटतं,मन भरुन येतं,पण रडु येत नाही तसंच काहिसं ! 


त्या दिवशी आजीबरोबर माझी काहितरी वादावादी झाली होती,रागानं दिवसभर जेवलो नव्हतो,तीनेही बोलावलं नाही.रागाच्या तिरीमिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. 


संध्याकाळचे ७ वाजले असावेत.अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत पहले आप पहले आप म्हणुन निरोप देत असावेत... 


निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरु झाला,

काळोख पडला आणि काय होतंय कळायच्या आत धो धो पाऊस सुरु झाला.मी चिंब... ! 


पावसापासुन बचाव करायचा म्हणुन जवळच्याच एका घरात शिरलो. 


घर कसलं ? पत्रे,गोणपाट लावुन केलेला तो एक निवारा होता.आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे... ! 


आम्ही जीथे रहायचो,तीथे एक पन्नाशीची बाई रहायची.शेजारच्या आयाबाया तीला "हडळ" म्हणायच्या.ती दिसायलाही होती तशीच. 


डावा डोळा एकदम बारीक,या डोळ्यात काळं बुब्बुळ नव्हतंच,आख्खा डोळा पांढराफेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत, आतलं बुब्बुळ तीच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं,या वयातही चेहरा सुरकुतलेला,पांढरे केस पिंजारलेले,तोंडात मोजके दात,

त्यातुन समोरचा एक पडलेला,दुसरा ओठातुनही बाहेर आलेला,अंगावर लुगडं घातलंय की चुकुन अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं, रंगही इतका काळा,की काळ्या रंगानं लाजावं.!


एकुण अवतार भेसुर ! 


त्यांत बोलणं असं की भांडल्यागत... ! 

प्रत्येक वाक्यात शिवी... ! 


कुणीही हिच्या नादी लागत नसे,समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना,अपशकुन व्हायचा त्यांना,कोणत्याही सण समारंभात हिला जाणिवपुर्वक बाजुला ठेवायचे.

लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल अशी भिती घालायचे... !


तीला जादुटोणा येतो,तीच्या घरात कवट्या आहेत वैगेरे असंही  बोललं जायचं...


हे घर तीचंच... ! 


मी नेमका याच घरात शिरलो होतो.


पत्र्याच्या त्या घरात मंद चुल पेटली होती,शेजारचा टेंभा (जुन्या डब्यात राॕकेल भरुन,जुनी नाडी टाकुन,उजेडासाठी वात पेटवलेली असे, गावाकडचा जुगाड) मिणमिणता प्रकाश देत होता. 


ती चुलीशेजारीच बसली होती,त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात... केस तसेच पिंजारलेले... चुल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तीच्या भेसुर चेह-यावर पडला होता.मुळचाच भिषण चेहरा अजुन भितीदायक वाटत होता. विरुद्ध बाजुला तीचीच सावली जमिनीवर पडली होती. 


एकुण वातावरण भितीदायक ! 


मी घाबरलो, पण बाहेर पडायची सोय नव्हती... 


'काय रं...?' घोग-या आवाजात ती गरजली. 


'काय नाय,ते आपलं भायेर पाऊस म्हणुन...' मी पायानं जमिन टोकरत चाचरत बोललो. 


ती बसली होती... समोर काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. 


पुर्वी डालड्याचा पिवळा डब्बा मिळत असे, त्यावर कसल्याशा झाडाचं चित्रं असे.डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक ऊपयोग असत.कुणी डाळी तांदुळ त्यांत साठवत असत,कुणी टमरेल म्हणुनही वापरे.तीनं याच डब्यात पाणी भरुन ठेवलं होतं.डब्बा काटवटी शेजारी.

डब्ब्यातलं पाणी पीठावर शिंपडुन ती पीठ तिंबत होती. 


मांजरानं उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती, इकडुन तिकडे फिरवत होती, मध्येच चापट्या मारत होती,मध्येच पीठाचा गालगुच्चा घेत होती. 


मी हा खेळ पाहण्यात रंगुन गेलो ! 


शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तीनं तोडला... दोन हाताच्या तळव्यात धरुन या लचक्याला तीनं गोल आकार दिला... आणि हातातुन पडु न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारु लागली,दोन्ही बाजुंनी ढोलकी बडवतात तसं...! 


एका क्षणी तर जादु झाली...या गोल गोळ्यापासुन एक सुंदर गोलाकार अशी ताटाएव्हढ्या आकाराची पोळी तयार झाली.माझी आजी पोळपाटावर भाकरी थापते,हिनं हवेतच ती केली.हिच्या अंगात नक्की जादुटोणा असावा अशी माझी खात्री पटली. 


यानंतर तीने बनवलेली ती कलाकृती धाप्पदिशी, चुलीवरल्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली.डब्ब्यातनं पाणी घेवुन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवरनं फिरवला.शेणानं सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होतं,तीनं आधी ते पदराला पुसलं,उलथनानं तव्याला थोडं ढोसुन चुलीवरल्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली. 


उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरनं काढुन चुलीच्या तोंडावर तीला धग लागेल अशी ठेवली…आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला... ती टम्म फुगली... दिवसभर मी फुगलो होतो तस्साच ! 


तीचं माझ्याकडं लक्ष नव्हतंच.बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. 


पत्र्याबाहेर अंधार,नुकताच पडुन गेलेला पाऊस,हवेत झोंबरा गारवा,पत्र्याच्या आत चुलीमुळं निर्माण झालेली ऊबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग ! 


मी आशाळभुतपणे भाकरीकडं पहात होतो. 

तीचं माझ्याकडं लक्ष गेलं. 

म्हणाली,'खातु का भाकर... ?' 

'छ्या..छ्या... नको मला..' एकदम हो कसं म्हणणार ?


एखादी गोष्ट मनापासुन हवी असतांना,ती मिळत असतां,नको म्हणणं काय असतं,हे त्या नको म्हणणाऱ्याला कळेल ! 


तोंडानं नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेह-यावर ओघळतातच,मनात असलं - नसलं तरी !

डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालावर ओघळ यावेत तसे... ! तीला या अंधारातही ते दिसलं असावं. 


म्हणाली,' हिकडं ये...' 

जावु का नको ? मी घुटमळलो... 

'ये रं ल्येकरा,माज्याजवळ बस... ये हिकडं ...' 


मी प्रथमच तीचा हा नाजुक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो.मायेनं भिजलेला तो आवाज होता...तरीही,जवळ बोलवुन भाकरीबरोबर ही मलाच खावुन टाकणार नाही ना ? या विचारानं मी घाबरलो... तीनं पुन्हा हाक मारली,

मी पाय ओढत तीच्या दिशेनं घाबरत निघालो. 


मी जवळ येतांना पाहताच ती गालातल्या गालात मंद हसली,मी असं हसतांना या आधी कधीच पाहिलं नव्हतं.का हसली असेल ती अशी ? 


मी आणखी घाबरलो,आता पळायची सोय नव्हती,तीनं माझे हात धरले होते.


माझे थरथरते हात तीने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं.चुलीजवळ असुनही मला कापरं भरलं.ती पुन्हा हसली,ओठाबाहेर आलेला दात मला अजुन भ्या दावत होता...


'कवापस्नं जेवला न्हाईस ?' डोक्यावर हात फिरवत मायेनं तीनं विचारलं. 


'सकाळपस्नं...' मी चाचरत बोललो. 


शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती,तीनं ती पदरानं पुसली,त्यावर ती गरमगरम भाकरी ठेवली. 


मी अजुनही साशंक होतो,ती पुढं काय करणार मला माहित नव्हतं.तीच्याबद्दल लोक कायकाय बोलतात ते सारं आठवलं.अंगावर शहारे आले...


'तु भाकर खायाला सुरवात कर,मी तवर भाजी करते' या वाक्यानं माझी तंद्री भंगली. 


तेव्हढ्यात तीनं,बाजुला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली,दुस-या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. 


किटलीतलं तेल कढईत टाकलं,किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तीनं बोटानं पुसुन घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली... 'रोजच्या रोज आंगुळ झाल्यावर,डोस्क्याला त्याल लावावं... कसं भुतावानी झाल्यात क्यास... !' असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं. 


मी तीच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं,वाटलं मला सांगते तर मग हि का लावत नसेल डोक्याला तेल ? 


भुतावानी हा तीच्या तोंडुन आलेला शब्द ऐकुन मी अजुन घाबरलो. 


तीला याचं काही सोयरसुतक नव्हतं.शांतपणे जरा लांब हात करुन तीने मग लसणाची गड्डी काढली,जमिनीत उकरुन केलेल्या उखळात टाकली,वरवंट्यानं दणादणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली.उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसुन घेतलं...


यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधारानं उठली आणि कसल्याशा फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली. 


बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळुन तट्दिशी तोडला आणि आख्खी मेथीची गड्डी तीनं अक्षरशःहातानं कुस्करुन कढईत टाकली.ना निवडणं,ना साफ करणं,ना देठ काढणं...! 


मेथी गरम तेलात पडली,अगोदरच खमंग तळला गेलेला तांबुस लसुण जणु मेथीची वाट बघत होता... मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर "छिस्स्स" असा आवाज आला.


हा आवाज मी अजुन विसरलो नाही,विसरुच शकत नाही. 


यानंतर तीने,पुन्हा उलथन घेतलं,पदराला पुसलं, भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं...! 


कढईतुनच चिमटीत धरुन तीनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. 


मी तीच्याकडे नुसता पहात होतो. माझ्या गालावरनं खरबरीत हात फिरवत म्हणाली, 'खा ल्येकरा खा... सकाळधरनं उपाशी हायस बाबा... ' 


यानंतर मी त्या गरमगरम भाजी भाकरीवर तुटुन पडलो,मला आठवतं,मी त्यावेळी दोन भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती.


अन्न हे पुर्णब्रम्ह याची प्रथमच जाणिव झाली. पोट तुडुंब भरलं होतं,मनही ! 


मी सहज पाहिलं काठवठीत,तीच्यापुरत्या असणा-या पीठाच्या सर्व भाकरी मी खाल्ल्या होत्या,फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती,डब्ब्यात अजुन पीठ शिल्लक असेल की नाही ते मला माहीत नव्हतं. 


मला माझीच लाज वाटायला लागली. 


गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणिव होते,ऊपाशीपोटी नाही !


चुलीजवळ बसुन मला घाम आला होता,मी तीच्याजवळ जात म्हणालो,'मावशी,आता तु काय खाशील ?' 


आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तीला मावशी म्हटलं असावं. 


तीच्या डोळ्यांतुन घळाघळा पाणी वहायला लागलं.गरागरा फिरणारे डोळे कुठंच ठरत नव्हते, हुंदका येत होता,त्यालाही ती दाबत होती...


तीने ओठ मुडपले होते,त्यांतुनही एक दांत डोकावत होताच. 


मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरला तीनं घाम पुसला. 


या पदरातुन मला वास आला शेणानं सारवलेल्या जमिनीचा,उखळात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा,माझ्याच घाबरट घामाचा आणि तीच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा !


या पदरानं मी सुगंधी झालो ! 

आता मला तीची भिती वाटत नव्हती. 


जगात आपलं म्हणुन कुणीही नसलेली एक समाजानं टाकलेली बाई,तीच्याही नकळत आई होवुन गेली ! 


पदरालाही किती पदर असतात ना ? वरवर फाटका

दिसणारा पदर किती मजबुत असु शकतो?


प्रत्येक आई मुलाचं नातं,पदरापासुन सुरु होतं... पदराशी संपतं... ! 


या दोन पदरांतला काळ म्हणजे आयुष्य !


आयुष्यांत मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठंही मिळाली नाही ! 


इंटरनॅशनल कंपनीत काम करतांना अनेकानेक फाईव्ह स्टार हाॕटेलात राहिलो,जेवलो. 


मेनुकार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधुन शोधुन मी मलई मेथी,बादशाही मेथी,लबाबदार मेथी,शाही मेथी कोफ्ता,

कश्मिरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. 


छे ! 


स्टारवाल्या हाॕटेलात फक्त स्टारच असतात,पण मायेचा चंद्र नसतो,चांदणं नसतं !


दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो... चकाचाँद करणारे भगभगीत दिवे इथं काय कामाचे ? 


कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी 

चव उत्पन्न होते ती करणा-याच्या मनातुन ! 


करणा-याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाला दुषित करत नाही !


संपुर्ण स्वच्छता पाळुन शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नंही बाधतंच,पण कसलीही स्वच्छता न पाळता,मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया,तेल आणि मिठात सोडली जाते तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होवुन जाते !


लोक याच मायाळु मावशीला हडळ म्हणायचे, का तर तीचा चेहरा भेसुर होता...


आपण चेहरा आणि कपड्यांवरुन माणसाबाबत आडाखे तयार करतो... ब-याच वेळा ते चुकतात. 


चेह-यावर रंग लावुन कलाकार मंडळी नाटक करतात,पण कोणताही रंग न लावता "नाटकं" करतात काही मंडळी,त्यांना काय म्हणावं ?


एखाद्याचं कौतुक करायला पट्कन शब्द सापडत नाहीत,भांडतांना मात्र झटपट त्यांना ते आठवतात.. याला काय म्हणायचं ? 


ज्यांना आपण आयुष्यंभर "चुकीची माणसं" समजत असतो,तेच आपल्याला कधीतरी "बरोबर अर्थ" समजावुन सांगतात... मग ते चुकीचे कसे काय ?दुस-याच्या चुका या चुका,पण आपल्या चुका म्हणजे "अनुभव" असं कौतुकानं सांगणाऱ्यांना काय म्हणावं ?  


असे दुटप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर "हडळ" म्हणुन शिक्का मारतात !


एखाद्याला बहिष्कृत करतात...


या मावशीला मी गावाकडं गेल्यावर अधुन मधुन भेटायचो. 


मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असतांना एकदा भेटायला गेलो होतो.वय झालं होतं.खंगुन खाटेवर पडली होती.

आताशा तीला दिसत पण नव्हतं.... 


वयानुरुप चेहरा आणखी भेसुर झाला होता आणि आयुष्यं बेसुर ! 


जवळ कुणी जायचंच नाही.


मी भेटायला गेलो.स्मरणशक्ती ढासळलेली.तीनं ओळखलं नाही. शकाही आठवणी करुन दिल्या... मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. 


मान वळवुन पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालतांना हसली होती पुर्वी... गुढ... गालातल्या गालात !


'काय आणुन देवु म्हातारे तुला ? ' मी हातात हात घेवुन प्रेमानं विचारलं. 


ठिगळ लावलेल्या,अंगावर चुकुन पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडं तीनं क्षीणपणानं बोट दाखवलं. 


'लुगडं...?' मी बरोबर ओळखलं. 


मी झट्दिशी उठलो,घरी जावुन माझ्या आजीची दोनचार लुगडी घेवुन येण्यासाठी...


तीने हातानंच खुण करत कुठं चाललास असं विचारलं.मी ही खुणेनंच सांगितलं, 'लुगडं घेवुन येतो...!' 


तीनं मला परत खुणेनंच जवळ बोलावलं...मी खाली वाकलो... 


ती कानाजवळ येवुन एकेक शब्द तोडत बोलली... 'जुनं तुज्या आज्जीचं लुगडं मला नगो, नव्वं कोरं आन... घडी मीच मोडनार... मरना-या मान्साला जुनं दिवु न्हाई काई... माज्या पोरानं मला नवं लुगडं आनलं,ह्येजातच माझा आनंद... ' हे बोलुन ती पुन्हा गुढ हसली... ! 


तीचं बोलणं ऐकुन मी शहारलो स्वतःच्या मरणाविषयी इतकी अलिप्तता ...? 


बरं तीनं कसं ओळखलं असेल ? मी जुनं लुगडं आणायला उठलोय,नवं नाही ते... ! 


मी विद्यार्थीदशेत... नवं लुगडं आणायला माझ्याकडं कुठले पैसे त्यावेळी ...? 


पण,पुढच्यावेळी आलो की घेवुन येईन असं सांगुन मी उठलो होतो. 


पुढं काही दिवसांनी डाॕक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो.गाव चांगलंच सुधारलं होतं. 


म्हातारीचं घर मात्र पडुन गेलं होतं...पत्रे गंजले होते,ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटुन पडली होती एका कोप-यात लोळागोळा होवुन... गांव खरंच सुधारलं होतं !


शेजारी उभ्या असणा-या एकाला खुणेनं विचारलं,' म्हातारी कुठंय ?' 


तंबाखुची पिंक टाकत तो म्हणाला होता,'कोन ती हाडळ व्हंय ? आरं ती मेली की कवाच... कोन नव्हतं तीला...' 


पुढचं मला ऐकुच आलं नाही... ! 


कोण नव्हतं तीला ???


कसं सांगु... ? 


ती मेली नाही... माझ्या मनात ती कायम जीवंत आहे...! 


कोण कसं नव्हतं ? 

मनातुन तीनं मुलगा मानलं होतं मला ! 

आई होवुन ती गेली...! 

मलाच मुलगा होता आलं नाही... !!!


प्रत्येकवेळी आपलं मुल भेटत होतं,म्हणुन ती तशी गुढ हसली असेल का ? 


यानंतरही मी अनेकवेळा गावाला गेलो.पण गल्लीत फिरतांना हे पडकं घर मी टाळतो. 


मला भिती वाटते आणि लाजही ! 


फट्कन समोर येवुन ती नव्वं कोरं लुगडं मागेल ही भिती... आणि मी तीला ते कधी देवु शकलो नाही याची लाज ! 


डाॕक्टर झाल्यानंतर पैसे होते रग्गड माझ्याकडे... पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो, त्या अर्थानं मी ही गरीबच की ! 


माणसाकडं पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही...! 


या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो,वेदना कमी होतात,तेव्हा त्या पैशाची "लक्ष्मी" होते, नायतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी


खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत... बाकीचे नुसतेच धनिक ! नोटा आणि नाण्यांचे धनी !!!


तीच्या पडक्या घराला लोक हाडळीचं घर म्हणतात,मी त्याला आईचं स्मारक समजतो ! 


ती गेली... माझ्या डोक्यावर एका न पेलणा-या लुगड्याचं ओझं ठेवुन गेली... ! 


तीच्या घराजवळनं जातांना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा... ! 


का कोण जाणे... त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच...


आणि उगीचंच भास होतो...तुटलेली ती जीर्ण खाट... माझ्याकडं बघत मंद मंद हसते आहे, गालातल्या गालात... तसंच गुढ... !!!


आणि मी पाय ओढत एकटाच  तिथुन चालायला लागतो, कुढत... कुणीच नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा ... !!! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स

या जगात अजूनही अवलिया आहेत.अशाच अवलियांपैकी एक अवलिया या अवलियास त्याच्या महान कार्यास माझा सलाम..