आता बोटीने आपला शेवटचा प्राणांतिक सूर मारला.
तडफडत ती समुद्रात काटकोनात उभी राहू लागली.अखेर तिच्यावरच्या रंगीबेरंगी प्रखर दिव्यांची एक शेवटची उघडझाप झाली. सगळीकडे डोळ्यात काजळ ओतणारा काळोख पसरला.आता सर्वत्र किंकाळ्या-आरोळ्यांनी थैमान मांडले.इतके जीवन मृत्यूचे भयाण तांडव सुरू असतानाही त्या भोवतालच्या निर्मम निसर्गावर साधा ओरखडाही उठत नव्हता.आता हळूहळू सारेच विकल,शांत होऊ लागले.
हेलकावे खात जिवंतपणाच्या साऱ्या खुणा पुसून टाकीत आता टायटॅनिक सागरतळाशी विसावली.ही बोट बुडणारी नाही,अशी उद्दाम घमेंडसुद्धा तिच्या बरोबरच तळाला गेली. तिच्यासोबत फेडरल बँकेला विरोध करणारे बेंजामिन गुग्गेनहेम,इसीडोर स्टोउस आणि जॉन जेकब अॅस्टर हे अमेरिकन आर्थिक जगतातले अनभिषिक्त सम्राटही संपले.त्यांच्या जाण्यासाठी तर १४०० लोकांना (ज्यात बेलफास्टचे शेकडो प्रोटेस्टंट्स होतेच) मृत्यू आला नाही ना? त्यांच्या जाण्याची तर ही तयारी नव्हती?
शतकापूर्वी घडलेला हा एकमेव भयानक अपघात,पण तो अपघात नसून घातपात असण्याची दाट शंका रेंगाळावी असे काही अनुत्तरित प्रश्न आहेत..
१.जे पी मॉर्गन एकाचवेळी आंतरराष्ट्रीय मर्कंटाइल मरीन व्यवसायप्रमुख,टायटॅनिक आणि फेडरल रिझर्वचा मालक असणे हा योगायोग वेगळे संकेत देतो..
२.या लायनरचा मालक जे पी मॉर्गनने पहिला प्रवास करायचा म्हणून स्वतःसाठी या बोटीवर मुद्दाम खाजगी प्रासाद आणि स्वतंत्र डेक बांधला होता.मात्र १० एप्रिलला त्याने अचानक त्याचे प्रवासाचे तिकीट रद्द केले आणि तो बायकोबरोबर फ्रान्समधल्या एका बेटावर विश्रांतीसाठी निघून गेला.हा काय केवळ योगायोग ?
३.जे. पी. मॉर्गनने प्रवास रद्द करण्यासाठी जरी आपल्या आजाराचे कारण दिले,तरी दोन दिवसांनी तो फ्रान्समध्ये ठणठणीत असलेला लोकांनी पहिला.
४.जे पी मॉर्गनप्रमाणेच 'व्हाईट स्टारलाईनर' या शिपिंग कंपनीचा सीइओ जोसेफ ब्रूस इस्मे आणि त्याची बायको ज्युलिया आणि मुले वेल्समध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसले.
५.जे. पी. मॉर्गनने साउथहॅम्प्टनहून बोट सुटण्याआधी
,तिच्यावरील महागडे ब्राँझचे सात पुतळे उतरवून घेतल्याची नोंद आहे.
६.जे. पी. मॉर्गनचा जवळचा मित्र मिल्टन हेर्सेने पण आपले तिकीट अचानक कॅन्सल केले.अमेरिकेतील हेर्से फूड साम्राज्याचा हाच मालक.
७.धातू हा बर्फापेक्षा कठीण असतो.बर्फ कठीण असता तर त्याच्याच बोटी बनवल्या असत्या. दुसरे बर्फ ही तरंगणारी वस्तू आहे,मग ती बोटीचा तळ एखाद्या कलिंगडासारखा कसा काय कापून काढेल?
८.आईसबर्ग असण्याची माहिती नसणारा कप्तान स्मिथ तर नव्हता.त्याला अटलांटिकची खडान् खडा माहिती होती.यानंतर आईसबर्ग असण्याचे अनेक इशारे त्याच्या ऑफिसर्सकडून त्याला मिळाले होते.मग त्याने त्याकडे दुर्लक्ष का केले ?
९.प्रचंड आईसबर्ग दिसत असतानाही,व्हाईट स्टार
लाईनरचा सीइओ जोसेफ ब्रूस इस्मेने कप्तानाला बोट फुलस्पीडला (२२ नॉट) आदेश देण्याचे कारण काय? इथे नोंद घेण्याजोगे म्हणजे,हा ब्रूस इस्मे मात्र या अपघातातून बचावला.
१०.बोटीवर पुरेशा लाईफ बोटी नव्हत्या.कारण?
११.बोटीने मुळात नसलेला मार्ग का घेतला? कोणाच्या सांगण्यावरून ?
१२.बोटीवरचा एकही क्रू मेंबर का वाचला नाही?
१३.कधीही न बुडणारे असे तंत्रज्ञान असणारी बोट तिच्या पहिल्याच प्रवासात बुडणे हे जरा चमत्कारिक आहे.'न बुडणारे' अशी जाहिरात करण्यामागे असणाऱ्या तांत्रिक कारणात या बोटीला सोळा वॉटरटाईट कंपार्टमेंटस होते,
पण त्यांची उंची मात्र पुरेशी ठेवली गेली नव्हती.याचे दिलेले कारण हास्यास्पद आहे कारण व्हाईट स्टार
लाईनला आपल्या पहिल्या वर्गाच्या जागा म्हणे कमी करायच्या नव्हत्या ?
१४.या बोटीवर सगळ्या विविध भागांना जोडणारे तीस लाख रिव्हेटस् होते,यातले काही रिव्हेटस् नंतर समुद्राच्या तळातून आणून त्यांचे निरीक्षण केले गेले,तेव्हा असे नोंदले गेले आहे की,ते अत्यंत दुय्यम दर्जाचे होते.बोटीने आईसबर्गला धडक दिली तेव्हा बाहेरच्या रिव्हेटसचे डोके तुटले (हे कधीही घडत नाही) आणि टायटॅनिकचे बाह्यभाग तातडीने एकमेकांपासून विलग होऊ लागले.
अत्यंत उच्च दर्जाचे रिव्हेटस् वापरले असते तर बोट बुडाली नसती.
१५.पत्रकार सिनान मोलोनी असा संशय व्यक्त करतो की,ज्या पद्धतीने टायटॅनिक आईसबर्गवर आदळल्यावर तिच्या वक्रभागाच्या कडेवरच फाटत गेली;त्या अर्थी आधी तिच्या त्या भागात तिच्यात कुठेतरी कोळशाने पेट घेतला असावा.आणि हे तिचा प्रवास सुरू होण्याआधी घडल्याची दाट शक्यता आहे.या घातपाती आगीने तिचा सांगाडा जोड असण्याच्या ठिकाणी मुद्दाम तकलादू करण्यात आला असावा.
१६.टायटॅनिकच्या दोन बहिणी होत्या.त्यांची नावे आरएमएस ऑलिम्पिक आणि एचएमएचएस ब्रिटानिका.
यापैकी ब्रिटानिका १९९६ ला एजियन समुद्रात बुडाली.
मनुष्यहानी तीस.दुसरी आर. एम. एस. ऑलिम्पिक,जी जुनी आणि एक अपघात झालेली शिप होती.ज्या अपघाताची कोणतीही भरपाई विमा कंपनीने व्हाईटस्टार लाईन शिपिंग कंपनीला दिली नव्हती.त्यामुळे तिला बुडवून टायटॅनिक बुडाली असे जाहीर करणे,हे एक विमावसुलीचे कारस्थान होते असेही सांगितले आहे.याचा पुरावा म्हणून,पुढे १९३५ साली आर. एम. एस. ऑलिम्पिक (जी मुळात टायटॅनिक असणार होती) सेवेतून निवृत्त केली गेली आणि तिला तोडण्याच्या वेळी जे वुडपॅड 'नेलींग व्हाईट स्वान' हॉटेलला विकले गेले,त्या पॅनेलच्या फ्रेमवर सर्वत्र '४०१' असा नंबर होता.आणि हाच बेलफास्टमध्ये बोट बांधणीच्या वेळी टायटॅनिकच्या भागांना दिला होता.ऑलिम्पिकच्या सर्व भागांना ४०० हा नंबर होता.याचा अर्थ ह्या बोटींची नावे बदलली गेली कारण अदलाबदली लक्षात येऊ नये ? याला दुजोरा देणारी अजून एक गोष्ट अशी की,जेव्हा ही टायटॅनिकची जाहिरात केली जात होती, तेव्हा वापरलेली अंतर्भागाची सजावटीची सर्व छायाचित्रे ही ऑलिम्पिकची होती.
जगभरच्या लोकांनी तर टायटॅनिकच्या मेडन प्रवासाला पैसे मोजले होते,ऑलिम्पिकच्या नव्हे! यामुळे काही लोकांची अशी दृढ समजूत आहे की,जी टायटॅनिक म्हणून बुडाली ती खरंतर ऑलिम्पिकच होती.अजून एक भाग असा की, याच ऑलिम्पिकचा २० सप्टेंबर १९११रोजी वीटच्या किनाऱ्यावर (isle of Wight) जो अपघात झाला होता.त्या अपघातादरम्यान ती एचएमएस हॉक नावाच्या बोटीवर आदळली होती.. तिचे एकंदर अपघात खर्चाचे बिल आणि इतर विम्याच्या न मिळणाऱ्या कव्हरेजने मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागणार होते. यावेळी टायटॅनिकच्या बांधणीला सुरुवात होणार होती.आता मॉर्गनने नुकतीच विकत घेतलेली व्हाईट स्टार लाईन शिपिंग कंपनी,समोर उभा येऊन ठाकलेला ऑलिम्पिकचा हा खर्च,शिवाय ऑलिम्पिक बंद असल्याने होणारे उत्पन्नाचे नुकसान आणि शिवाय अवाढव्य टायटॅनिकची बांधणी हे सर्व आर्थिकदृष्ट्या झेपणारे गणित नव्हते.यावर एक नामी उपाय म्हणून एक योजना आखली गेली.योजना कुटिल असणे सुसंगत होते कारण आता 'व्हाईट स्टार लाईन'चा मालक होता जे पी मॉर्गन! त्याच्या आर्थिक नफ्याच्या गणितांनी एक मोठ्ठा डाव टाकला.
आरएमएस ऑलिम्पिकलाच नवीन टायटॅनिक म्हणून समोर आणा,तिची डोळ्यांचे पारणे फेडणारी,अशक्य अशी लालसा निर्माण करणारी जागतिक जाहिरात करा.लोकांना तिच्या मेडन प्रवासाची भुरळ पाडा.तिचा शक्य तितका मजबूत विमा करा आणि मग ती बुडवून आपला सगळा तोटा भरून काढा.
अगदी सुरुवातीला ही गुप्त खलबते झालेली चौकडी म्हणजे जे पी मॉर्गन,जे ब्रूस इस्मे,लॉर्ड पिरी आणि थॉमस अँड्र्यूज.दोन्ही बोटींच्या नेमप्लेट आणि नंबरवर लक्ष नसणाऱ्यांना हे काहीच कळले नसतेएकदा प्लान ठरला आणि मग यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या. ऑलिम्पिकचे रूपडे पालटू लागले.तिच्यावर असणाऱ्या अनंत प्रवाशांच्या पाऊलखुणा आणि सांडलेल्या विविध द्रव्याचे डाग असणाऱ्या जुन्या लाकडी फ़्लोरिंगवर तातडीने महागडी कार्पेट्स टाकण्यात आली.
टायटॅनिकच्या बी डेकवर तोपर्यंत बांधलेल्या केबिन्स तातडीने ऑलिम्पिकच्या प्रोमोनेडवर लावण्यात आल्या. ऑलिम्पिकचे रूपडे नवे कोरे वाटावे यासाठी सगळ्या गोष्टी नीट आखल्या गेल्या.
एक फरक नंतर उघडकीस आला.तो म्हणजे ऑलिम्पिकच्या सी डेकवर असणारे पोर्ट होल्स! जेव्हा टायटॅनिकची बांधणी सुरू असताना छायाचित्रे घेतली होती,तेव्हा तिथे समान असे चौदा पोर्ट होल्स दिसले होते,पण जेव्हा तिने साउथहॅम्पटन सोडले त्यावेळेच्या छायाचित्रात मात्र सोळा असमान असे पोर्ट होल्स तिच्यावर दिसतात.
हा सगळा तपशील रॉबिन गार्डीनरच्या "The Ship Never Sink' या पुस्तकात आहे.
अजून एक न झालेली रहस्यमय उकल - जे. पी. मॉर्गन आणि टायटॅनिक आपण जे. पी. मॉर्गन आणि जॉन जेकब अॅस्टर यांच्या संबंधांचे अजून एक परिमाण पाहू.त्याकाळी एक निकोला टेस्ला नावाचा एक कुशाग्र संशोधक होता.(अजूनही टेस्ला नावाची वीज पुरविणारी आणि इलेक्ट्रिक कार्स बनविणारीही कंपनी आहे) त्याच्याकडे मॉर्गन आणि अॅस्टर दोघांनीही आपले पैसे गुंतविले होते.मॉर्गनचा हेतू त्याच्या बुद्धिमत्तेवर पैसा मिळविणे हा होता.मात्र अॅस्टर आणि टेस्ला जानी दोस्त होते.टेस्ला करीत असलेल्या एका महत्त्वाच्या संशोधनात पैसा कमी पडला असे अॅस्टरला कळले आणि त्याने तातडीने त्याला त्याकाळी ३०,००० डॉलर्स दिले.कशासाठी? तर टेस्लाने असे तंत्रज्ञान विकसित केले,ज्यामुळे वीज उत्सर्जित होईल आणि लोक आपल्या घरापाशी रीसिविंग पोल उभारून ती फुकट घेऊ शकतील.त्याने लाँग आयलंडवर प्रायोगिक तत्त्वावर एक असा टॉवर उभारला आणि मॉर्गन आणि अॅस्टरला नव्या संशोधनाबद्दल सांगितले. मॉर्गनसारख्या अमेरिकेत वीजपुरवठ्याचे काम करणाऱ्या एका कॉर्पोरेट माफियाला हे कसे झेपणार? मग विजेतून मिळणाऱ्या अमाप नफ्याचे काय ?अॅस्टरने मात्र टेस्लाला, "गो अहेड,लागेल तितका पैसा देतो." असे सांगितले.
आता एकीकडे फेडरल रिझर्व्हला,बेंजामिन गुग्गेनहेम, इसीडोर स्ट्रोउस आणि जॉन जेकब अॅस्टर यांचा विरोध वाढत चालला होता, दुसरीकडे स्ट्रोउस टेस्लाचे हे प्रकरण आणि व्हाईट स्टार लाईनरचा मालक जे. पी. मॉर्गन असणे, हे तीन मुद्दे केवळ योगायोग आहेत की या मुद्यातून एक सूत्र सामोरे येते ? बघूया.
● हे तीन अमेरिकन आर्थिक मातब्बर आणि त्यांची लोकप्रियता ही फेडरल रिझर्व्हची निर्मिती आणि अनेक नफेखोर ऊर्जा प्रकल्पात मोठा अडसर होती.या तिघांनी अत्यंत तगडी अशी राजकीय ताकद त्या विरोधात उभी केली असती कारण यातला इसीडोर हा थेट अमेरिकन काँग्रेसचा सदस्य होता. ते एकदा गेले की मग या बँकेच्या स्थापनेला लोकविरोध नसणार आणि झालेही तसेच.२३ डिसेंबर १९१३ ला कुप्रसिद्ध फेडरल बँक अस्तित्वात आली. ● टेस्लाचा जिवलग मित्र गेला आणि मग त्याचे सारे संशोधन पैशाअभावी थांबले.
● पण या तिघांना मॉर्गनने गोळ्या का घातल्या नाहीत.
एक अख्खी बोट बुडवायचे काय कारण? पण खून झाला असता तर नक्कीच त्याची सखोल चौकशी झाली असती.
टेस्ला,इतर अनेक अमेरिकन उद्योगपती आणि या तिघांवर प्रेम करणाऱ्या असंख्य अमेरिकन नागरिकांनी मोठ्ठा गोंधळ घातला असता आणि त्यामुळे,पुढे अनेक वर्षे याच विषयावर चर्चा सुरू राहिली असती. बुडालेल्या बोटी
सोबत हे सारेच शांत,नीरवपणे संपले.मॉर्गनला हे सारे बुडतील;लाईफ बोटीने वाचवले जाणार नाहीत असे कसे वाटले? कदाचित मॉर्गनला यांच्या नैतिकतेची खात्री असावी.या तिघांनाही लाईफ बोटीवर जायची विनंती करण्यात आली होती,पण बोटीवरील प्रत्येक स्त्री आणि लहान मूल गेल्याशिवाय यांनी जाण्याचे नाकारले.
अॅस्टरच्या वाचलेल्या बायकोने ह्याचे अत्यंत हळवे असे वर्णन केले आहे.
महायुद्धाशिवायचे हे या शतकातले सगळ्यात मोठे कारस्थान.या घटनेचे कारण रोमन कॅथॉलिक चर्चचे आदेश की आर्थिक सूत्रधारांचे डावपेच ? का दोन्हीही? या मागे कोणीही असो पण असल्याच कोणत्यातरी बुरख्या
आडून केलेले हे या शतकातले पहिले दहशतवादी कृत्य!
ज्याने अमेरिकन लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या फेडरल रिझर्व्ह सिस्टीमला प्राणपणाने विरोध केला,त्या अब्राहम लिंकनच्याच मृत्यूदिनी, (१४ एप्रिल) ज्यावेळी टायटॅनिक बोट अटलांटिक
मधील त्या अवाढव्य बर्फखंडावर आपटून फुटली आणि त्याच वेळी 'फेडरल रिझर्व्ह'ला निर्माण होऊ शकणारा तो विरोधही कायमचा संपला.
अमेरिकेच्या फेडरल बँकेचा तत्कालीन चेअरमन बर्नार्के ५ आणि ६ नोव्हेंबर २०१० रोजी,जॅकील बेटांवर जाऊन त्या फेडरल रिझर्व्हच्या स्थापनेची आठवण मनात जपून आला,त्याचवेळी टायटॅनिक सागरतळाशी विसावून शतक उलटायला आले होते,पण इतक्या कालखंडानंतरही तिची नष्ट होण्याची अज्ञात रहस्ये,तिची मती गुंगविणारी कहाणी यांचे गारूड मात्र अद्यापही कायम आहे.तिच्या अजस्त्र देहासोबतच तिचे सत्य मात्र कायमचे अटलांटिकच्या निर्मम समुद्रात १२,५०० फूट खोल तळाशी,काळाच्या कराल पाण्यात बुडून गेले आहे.
या लायनरचा मालक जे. पी. मॉर्गन ३१ मार्च १९९३ ला सेंट रेगीस,रोम या कॅथलिक परगाण्यात मरण पावला.
म्हणजे टायटॅनिक बुडाल्यानंतर जवळपास एक वर्षाने आणि फेडरल रिझर्व्ह स्थापन होण्याच्या आधी नऊ महिने.ज्याने या दोन्ही कारस्थानात महत्त्वाची भूमिका बजावली,त्याचा मृत्यू या दोन घटनांच्या आगेमागे व्हावा हा एक काव्यगत न्याय !
जाता जाता - १८८६ मध्ये ख्यातनाम ब्रिटिश लेखक विल्यम टी. स्टेडने एक कथा लिहिली, तिचे शीर्षक होते.
'How the Atlantic mail steamer went down?' यातील तपशील आणि टायटॅनिकची दुर्दैवी कहाणी यांचे अनेक धागे आश्चर्यकारकरित्या जुळतात.जणू त्या पुस्तकाला स्मरून ती बुडविली असे वाटत राहते,पण त्यावरही कडी करणारा,अजून एक थरारक भाग असा की,हाच विल्यम स्टेड टायटॅनिकवरचा एक दुर्दैवी प्रवासी होता.स्टेड या घटनेत मरण पावला,पण त्याच्या द्रष्टेपणाला मात्र टायटॅनिकने कायमचे अमर केले आहे.
दिनांक ०३.१०.२३ लेखातील शेवटचा भाग..
संपूर्ण..