साधारणपणे मी माझ्या व्याख्यानांचा समारोप असा करतो :आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतः जबाबदार असतो. आता असं बोलल्यावर लोकांना त्यांच्यावर येत असलेली जबाबदारी पेलवत नाही आणि त्यामुळे त्यांना मी फारसा आवडतही नसेन.आपल्या आयुष्यासाठी आपणच जबाबदार या विचारानं त्यांच्या मनावर ओझंच येतं.माझ्या एका व्याख्यानाच्या अशा समारोपानंतर एक महिला इतकी अस्वस्थ झाली की,
आपल्या पतीला घेऊन ती मला स्टेजमागे भेटायला आली.तिनं माझ्या समारोपाच्या वाक्याचा अश्रूंच्या लोंढ्यासह विरोध एक केला. "माझ्या आयुष्यातल्या काही शोकाकुल करणाऱ्या घटना मला अजिबात नको होत्या आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यासाठी मी स्वतःच जबाबदार आहे?" हा प्रश्न तिनं मला विचारला. "तुमचं हे वाक्य तुम्ही बदलायला हवं " ती मला आग्रह करू लागली.मलाही हे जाणवलं की, इतरांच्या मनात अपराधी भावना निर्माण व्हावी, हा काही माझा हेतू नाही.
माझ्या त्या वाक्यानं लोकांच्या मनात अपराधी भावना निर्माण होत आहे.सामान्यतः आपण आपल्या समस्यांसाठी दुसऱ्या कोणावर तरी ठपका ठेवण्यात फार तत्पर असतो.आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट घटना दुसऱ्या कोणाच्या तरी वागण्यामुळे निर्माण होत आहेत,असं समजण्याची आपली वृत्ती असते,तिलाच माझ्या त्या समारोपाच्या वाक्यानं धक्का बसत होता.मग मी विचार केला, त्या महिलेशी चर्चा केली,समारोपाचं वाक्य असं बदललं की,मग ती महिला संतुष्ट झाली. ते वाक्य मी असं केलं :
तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असता;पण केव्हापासून? तर तुम्हाला जेव्हा समजतं की,तुम्हीच तुमच्या आयुष्यातल्या गोष्टींना जबाबदार आहात,तेव्हापासून तुम्हाला जेव्हा ते माहीतच नव्हतं,तेव्हाच्या काळातल्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला अपराधी समजू नका.
जागरूक पालक असणं म्हणजे काय,हे माहीत नसताना तुम्ही पालकत्व पार पाडलं असेल आणि त्यात काही चुका झाल्या असतील, तर त्याबद्दल तुम्हाला दोष देता येणार नाही; पण जागरूक पालकत्व म्हणजे काय,हे समजल्या
नंतरही तुम्ही तुमच्या मुलांना वाढवताना चुका केल्या तर मात्र तुम्ही अपराधी ठराल.एकदा का तुम्हाला हे सत्य समजलं की, मग तुम्ही तुमच्या वर्तणुकीत योग्य ते बदल करालच...
आता आपण पालकत्वाविषयी बोलतोच आहोत, तर हेही लक्षात घ्या की,तुम्ही तुमच्या सगळ्या मुलांसाठी समान पालक नसता.प्रत्येक मुलाच्या बालपणाच्या वेळी तुम्ही स्वतः वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असता,ज्याचा आपोआपच तुमच्या वागण्यावर परिणाम होत असतो. शिवाय,तुम्ही सगळी मुलंही एकसारख्या स्वभावाची नसतातच.त्यांच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो.मी आधी असं समजत होतो,की माझ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या दोन अपत्यांबाबतीत मी समान वागलो होतो; परंतु जेव्हा नीट विश्लेषण करून पाहिलं,
तेव्हा मला कळलं,की असं नव्हतं.माझं पहिलं अपत्य जन्माला आले,तेव्हा माझ्या करिअरची सुरुवात होत होती.अति काम आणि त्यासोबतच काम टिकण्याबाबतची खात्री नसणं,यामुळे मी जरा तणावातच असे;पण दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या वेळी मी स्थिरावलो होतो,संशोधक म्हणून ख्याती मिळाली होती,
मला आत्मविश्वास आला होता.यावेळी मी माझ्या अपत्यांबरोबर जास्त वेळ घालवू शकत होतो.
पालकांच्या अजून एका घट्ट समजुतीबद्दल मी त्यांना काही सांगू इच्छितो.ही समजूत म्हणजे मुलांची हुशारी किंवा चलाखी वाढवण्यासाठी त्यांना बाजारात उपलब्ध असलेले असंख्य शैक्षणिक खेळ गरजेचे असतात.नाही, पालकांनो,असं मुळीच नाही.तुम्ही त्यांच्याबरोबर घालवत असलेला वेळ,त्यांच्याशी बोलणं, खेळणं यामुळे त्यांची हुशारी वाढते,बाजारी शैक्षणिक खेळांमुळे नव्हे.(मेंडिस आणि पीर्स २००१.) पालकांनी मुलांना वेळ दिला, त्यांच्यासोबत ते राहिले,त्यांचे कुतूहल शमवणारे खेळ पालकच मुलांबरोबर खेळले,त्यांच्या निर्मितीक्षमतेला वाव मिळेल,अंस त्यांना वागू दिलं तर हे सगळं मुलांच्या विकासाला फार फार उपयोगी पडतं,त्यांच्या आयुष्यात हेच कामाला येतं.
अर्थातच मानवाला त्याच्या बालपणात काय हवं असतं,तर प्रेमानं केलेलं पालनपोषण आणि भरपूर लोकांचा सहवास,ज्यातून ते बालक चालणं,बोलणं,रीतिरिवाज शिकतं. अनाथालयातल्या बालकांना केवळ पाळण्यात ठेवून वेळच्यावेळी अन्न,पाणी,औषधं इतकंच दिलं जातं,ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात त्या सगळ्यांबद्दल खूप प्रेम असेल असं नसतंच. त्या अश्राप बालकांना कधी प्रेमळ हास्य,घट्ट मिठ्ठी किंवा गालावरचा पापा मिळत नाही, त्यांच्या विकासात अतिशय गंभीर समस्या येतात.
रोमानियातल्या अशा एका अनाथालयातल्या मुलांचा अभ्यास मेरी कार्लसन यांनी केला.त्या हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयातल्या मज्जाजैवशास्त्रज्ञ आहेत. प्रेमाचा स्पर्शही न होता,केवळ अन्नपाणी वेळच्या वेळी देऊन वाढवलेल्या त्या मुलांची वाढ योग्य तऱ्हेनं न होता खुंटली आणि त्यांचं वागणं सामान्य मुलांसारखं न राहता विचित्र झालं,असं त्यांना या अभ्यासातून दिसून आलं.
कार्लसन यांनी या अनाथालयातल्या काही महिने ते तीन वर्ष,या वयोगटातल्या साठ मुलांचा अभ्यास केला.या मुलांच्या लाळेतून त्यांनी त्यांच्या रक्तातलं कॉर्टिसोलचं प्रमाण तपासलं. ज्या मुलांच्या रक्तात कॉर्टिसोलची पातळी जास्त होती,त्यांच्या वाढीवर जास्त विपरीत परिणाम झाला, असं त्यांना दिसून आलं. (होल्डन१९९६.)
कार्लसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माकडं आणि उंदीर यांच्यावरही याबाबतीत संशोधन केलं आहे.पिलांना होणारा आईचा स्पर्श आणि रक्तातलं कॉर्टिसोल यांचा त्यांच्या विकासावर काय परिणाम होतो,याचा अभ्यास त्यांनी केला. त्यात त्यांना असं दिसून आलं की,आईच्या स्पर्शाचा पिलांवर अतिशय चांगला परिणाम होतो,
अमेरिकेच्या मानवी आरोग्य आणि बालविकास विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे माजी निर्देशक
जेम्स प्रिस्कॉट यांनीही याबाबत संशोधन केलं आहे.माकडांच्या ज्या नवजात पिलांना आईचा स्पर्श मिळत नाही,ती त्यांच्या पुढच्या आयुष्यात हिंसकपणे वागतात, असं प्रिस्कॉट यांना दिसून आलं.(प्रिस्कॉट १९९६ आणि १९४०.) प्रिस्कॉट यांनी असाच अभ्यास मानवजातीसाठीही केला.यात त्यांनी विविध संस्कृतींच्या समाजांच्या तुलनात्मक नोंदी केल्या. त्यात त्यांना असं आढळून आलं,की ज्या समाजात मुलांना प्रेमानं वागवलं जातं, आई-वडिलांचा सहवास आणि वागणुकीची मोकळीक मिळते,योग्य वयात योग्य तऱ्हेनं लैंगिक शिक्षणही दिलं जातं,तो समाज शांत जीवन जगतो.
शांततेनं जीवन जगणाऱ्या समाजांमध्ये त्यांना एक गोष्ट विशेषत्वानं लक्षात आली.ती म्हणजे,या समाजात बालकांना त्यांच्या आई-वडिलांचा नुसता सहवासच मिळतो असं नाही,तर त्यांना आई-वडिलांची शारीरिक जवळीकही खूप जास्त प्रमाणात मिळते.हे पालक दिवसेंदिवस आपल्या तान्ह्यांना आपल्या कडेवर किंवा पाठीवर वागवतच आपापली कामं करतात,असं प्रिस्कॉट यांना आढळून आलं. याउलट,ज्या समाजांमध्ये तान्ह्यांना,
बालकांना आणि किशोरांना मायेच्या स्पर्शापासून दूर ठेवण्याचीच प्रथा आहे,त्या समाजातली बालकं पुढच्या आयुष्यात रुक्ष,कठोर स्वभावाची आणि सहजपणे हिंसक होणारी असतात,असं दिसून आलं आहे.
अशा समाजातल्या मुलांना,ज्यांना मायेचा स्पर्श मिळालेला नसतो त्यांना ज्ञानेंद्रियांबाबतची अजून एक समस्या भेडसावते. शरीरानं जाणून घेण्यासारख्या संवेदना,उदा.दाब,वेदना, इतर
ओळखण्याची शक्ती त्यांच्यात कमी झालेली दिसते.
या समस्येसोबतच एक लक्षण चिकटूनच येतं,ते म्हणजे त्यांचं शरीर तणावाच्या संप्रेरकांची उसळणारी पातळी खाली आणू शकत नाही.ही स्थिती म्हणजेच हिंसक वागणुकीची पूर्वस्थिती असते.
अमेरिकन समाजात दिसून येणाऱ्या मोठ्या हिंसाचार मागची कारण आपल्याला या संशोधनावरून समजून येतील.आपली सध्याची वैद्यकीय आणि सामाजिक स्थिती अशी आहे की ज्यात मुलांना फार जवळ घेणं,रात्रभर कुशीत झोपवणं,कडेवर घेऊन फिरणं हे फारसं शिष्टसंमत समजले जात नाही.इथेच नेमक चुकते.याहूनही भयंकर म्हणजे आपले डॉक्टर्स पालकांना अशी सूचना देतात की,बाळाला स्वतंत्र करा,सारखं सारखं त्याच्या रडण्याकडे लक्ष पुरवत बसू नका,त्याच त्याला झोपू दे,तुम्ही थोपटून झोपवू नका... आधुनिक वैद्यकशास्त्राचं नैसर्गिक प्रक्रियेवर हे सरळसरळ भयंकर अतिक्रमण आहे.
बालकांना पालकांची माया मिळणं,हा त्यांचा नैसर्गिक हक्क आहे,तो हक्कच या अशा विकृत समजुतीमुळे हिरावून घेतला जात आहे.या समजुती विज्ञानावर आधारित आहेत हा समज आहे आणि नैसर्गिक पद्धतीपासून दूर जाऊन या वेडगळ आणि क्रूर पद्धतीनं मुलांना वाढवलं जात असल्यामुळेच अमेरिकन समाजात हिंसाचार थैमान घालत आहे.www.violence.de.
या वेबसाईटवर,स्पर्श आणि हिंसाचाराचं नातं सांगणारं पूर्ण संशोधन उपलब्ध आहे.
मग,अभावग्रस्त पार्श्वभूमीवर वाढलेल्या रोमानियन मुलांचं काय?चांगली पार्श्वभूमी नसूनही त्यातली काही मुलं चांगली कशी वागत.त्यांची 'जनुक' चांगल होती म्हणून? तुम्हाला आतापर्यंत समजलंच आहे,की मी जनुकांवर इतका विश्वास ठेवत नाही.शक्यता अशी आहे, की ही बालकं गर्भावस्थेत असताना त्यांच्या आई-वडिलांनी नीट काळजी घेतली असेल आणि मग अनाथालयातलं पोषण मिळून एकूणात ही मुलं चांगल्या वागणुकीची झाली असतील.
मुलं दत्तक घेणाऱ्यांनीही यातून धडा घेण्यासारखा आहे.ही मुलं त्यांनी दत्तक घेतली, तेव्हापासूनच त्यांचा जन्म सुरू झाला,असा विचार या पालकांनी करू नये.ती मुलं आधीच त्यांच्या नैसर्गिक आई-वडिलांच्या वागण्यानुसार घडलेली असण्याची शक्यता दत्तक पालकांनी नेहमी लक्षात ठेवावी.ते त्या आई-वडिलांना नको असण्याची भावना त्या बालकानं सहन केली असणार.त्यातल्या काही सुदैवी मुलांना घडणीच्या काळात प्रेमळ काळजीवाहक मिळाले असण्याची शक्यता असू शकते.दत्तक मूल घेणाऱ्या पालकांना जर गर्भावस्थेतही बालकाची घडण होते,याची कल्पना नसेल तर त्यांच्या आणि दत्तक मुलांच्या एकत्र आयुष्यात समस्या उद्भवू शकतात.हे मूल मनाची पाटी कोरी घेऊन त्यांच्या आयुष्यात आलेलं नाही,हे त्यांना समजून घ्यावं लागेल. 'द बायोलॉजी ऑफ बिलीफ,अनु.शुभांगी रानडे -बिंदू,साकेत प्रकाशन'
(तसं तर कुठलंच मूल जन्माला येताना मनाची पाटी कोरी ठेवून येतच नाही, गर्भावस्थेत असताना ते काही गोष्टी ग्रहण करून मगच जन्माला आलेलं असतं.)
दत्तक पालकांनी हे सत्य एकदा समजून घेतलं, की मग त्यांचं मुलांसह आयुष्य सोपं होईल, प्रसंगी मुलांच्या काही समजुती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत,हे त्यांना कळेल आणि ते त्याप्रमाणे वागू शकतील.
नैसर्गिक किंवा दत्तक आई-वडिलांनी एक गोष्ट नीटपणे समजून घेतलीच पाहिजे तुमच्या मुलाची जनुक ही त्यांच्या क्षमतेच्या संभाव्य शक्यता फक्त दाखवतात त्यांचं नशीब नाही.त्यांच्या क्षमता पूर्णपणे विकसित होतील, असं वातावरण त्यांना मिळू देणं, हे तुमच्या हातात असतं.
मी हे सगळं सांगतोय,त्याकडे बरेच लोक आकर्षित होतात,बौद्धिकदृष्ट्या त्यांना ते पटतं, माझी पालकत्वावरची पुस्तकं त्यांना वाचायला हवी असतात;
पण माझं असं मत आहे,की केवळ बौद्धिकदृष्ट्या पटणं हे पुरेसं नाही.मी तुम्हाला पालकत्वावरची पुस्तकं वाचायला सांगत नाहीच.मलासुद्धा बुद्धीला हे आधी सगळं माहीत होतंच.नुसतं माहीत असणं किंवा वाचणं पुरेसं नाही.ते सगळं कृतीत आणलं पाहिजे.
सजग पालकत्व ही फक्त समजून घेण्याचीच नाही,तर सदैव आचरणात आणण्याची गोष्ट आहे,हे लक्षात घ्या. केवळ पुस्तक वाचून आता आपण सजग पालक आहोत हे समजणं म्हणजे,एखाद्या रोगासाठी एक गोळी घेऊन,आता तो रोग बरा होईल,असं समजण्यासारखंच आहे.
असं आपोआप काही होत नसतं.पोहावं कसं,हे फक्त समजून घेऊन तुम्ही बुडताना वाचू शकाल का? नाही ना? त्यासाठी तुम्हाला पाण्यात हातपाय मारून तरंगण्याची कृती करावीच लागेल.तसंच आहे जागरूक पालकत्व.
तुम्हाला ते प्रत्यक्ष आचरणात आणावं लागेल.
मी तुम्हाला आव्हान देतो.घ्या हा जागरूक पालकत्वाचा वसा.तुमच्या मुलांची कोवळी सुप्त मनं अनावश्यक भीती आणि बंधनांपासून मुक्त ठेवा.त्यांना माया,प्रेम,विश्वास द्या.सर्वांत महत्त्वाचं म्हणजे,जनुकांवरच सगळं काही अवलंबून असतं,हा समज उपटून टाका.तुमच्या मुलांच्या गुणांचा जास्तीतजास्त विकास करणं तुमच्या हातात आहे,त्यातूनच तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्यही बदलू शकता.आपल्या मुलांशी मनाने सदैव प्रेमात गुंफलेले राहा,मग बघा आयुष्य किती सुखद असतं.तुम्ही तुमच्या जनुकांना बांधील नाही. तुमचं आणि तुमच्या बालकांचं सुंदर आयुष्य घडवणं तुमच्या हातात आहे.
मी पेशींच्या,संरक्षणाच्या आणि वाढीच्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला सांगितलं आहे.तेच ज्ञान वापरा आणि आपलं शरीर वाढीच्या प्रतिसादाच्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ राहील,याचा प्रयत्न करा.म्हणजेच नेहमी आनंदात राहा,परिस्थिती बदलता आली नाही, तरी स्वतःचा दृष्टिकोन बदलता येतो,तो बदला आणि नेहमी समाधानी राहा. त्यानंतरच तुमचं शरीर तणावरहित,
निरोगी राहील.हेच तत्त्व तुमच्या लहानग्यांसाठीही वापरा.त्यांना माया,विश्वास,सुरक्षिततेची भावना पुरेपूर अनुभवू द्या,मग बघा त्यांची आयुष्यं कशी बहरतील पुढे जाऊन.
एक लक्षात ठेवा.मुलांच्या सुदृढ विकासासाठी मोठी नामवंत शाळा, मोठमोठी महागडी खेळणी,तुमचं प्रचंड उत्पन्न, यातलं काहीही महत्त्वाचं नसतं.मुलांच्या सुदृढ आणि सर्वांगीण विकासासाठी केवळ एक गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे.प्रेम,माया.
निष्प्रेम आयुष्याला काही अर्थ नसतो प्रेम म्हणजेच जीवनाचं जल,ते हृदयानं आणि आत्म्यानं पिऊन घ्या…
ब्रूस एच.लिप्टन ( पिएच.डी.)