सॉक्रेटिसला काही तासांतच हेमलॉक विषाचा प्याला दिला जाणार होता.
शिष्यांबरोबर त्याची शेवटची भेट सुरू होती.क्रेटो
या शिष्याने त्याला विचारलं,गुरुवर्य, तुमच्यावर अंतिम संस्कार कसे करायचे? तुम्हाला पुरायचं की जाळायचं?
सॉक्रेटिस म्हणाला,अंतिम संस्कार? कसले अंतिम संस्कार? त्यात 'अंतिम' काय आहे? मला जे विष देतायत,
त्यांची अशी समजूत आहे की मी विष पिऊन मेलो की माझा अंत होईल? तुम्ही तर माझे शिष्य... तुमची अशी समजूत कशी झाली? लक्षात ठेवा,मला विष देणाऱ्यांची नावं कोणाच्या लक्षात राहणार नाहीत,पण,मी मात्र आणखी हजारो वर्षं मरणार नाही.
एका राजाच्या दरबारात एक सूफी फकीर आला.तो…
राजाला म्हणाला,तुझी काय आकांक्षा आहे?
राजा म्हणाला,सामान्य माणूस ज्याची आकांक्षा करतो,ते सगळं माझ्यापाशी आधीपासूनच आहे,भरपूर आहे.तुम्ही मला असं काहीतरी द्या,जे परम कसोटीच्या क्षणी उपयोगी पडेल.
फकिराने एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद एका अंगठीत बंद केला.ती अंगठी राजाकडे दिली आणि म्हणाला,जेव्हा कोणताही मार्ग उरणार नाही,सर्व बाजू बंद होतील,हाच परम कसोटीचा क्षण आहे,अशी खात्री होईल,त्या वेळीच ही अंगठी उघड.
आणि लवकरच राजाच्या दुर्दैवाने हा प्रसंग आला.
शेजारच्या राजाने बेसावध क्षणी आक्रमण केलं आणि त्याचं सैन्य राजधानीपर्यंत पोहोचलं.राजाला राजवाड्यातून पळ काढावा लागला.शत्रुसैन्याची एक तुकडी त्याच्या पाठलागावर होती.राजा घोडा दौडवत डोंगरदऱ्यांतून एका कड्याच्या टोकावर पोहोचला.येणारी एकच वाट. त्यावर कोणत्याही क्षणी येण्याच्या तयारीत शत्रू. दुसरीकडे एक दुर्गम कडा.
राजाने अंगठी उघडली.कागदावर लिहिलं होतं,
हेही निघून जाईल.
घोड्यांच्या टापा जवळ येतायत…थेट प्राणांवरचं संकट,
आता कसं निघून जाईल,कसं टळेल,असं कसं लिहिलंय या कागदावर,अशा विचारांत असतानाच राजाचा पाय निसटला आणि तो दरीत कोसळला.
राजाचा घोडा स्वाराविना पाहून शत्रुसैन्याला राजाचा अंत ओढवल्याचं लक्षात आलं आणि विकट हास्य करत ते निघून गेले…
… कड्याच्या टोकाला एका झुडपाच्या आधाराने लटकत असलेला राजा वर आला.त्याने लपत छपत जवळचं गाव गाठलं. राजा मरण पावला,असं समजून इतस्तत:पांगलेले त्याचे सैनिक पुन्हा एकत्र आले.त्यांनी नव्या ताकदीने शत्रूवर हल्ला चढवला आणि आक्रमण परतवून लावलं.
शत्रूला धडा शिकवला.
राजाची हत्तीवरून मिरवणूक निघाली.जल्लोष. विजयाची धुंदी,ढोलताशांचा कडकडाट,ऐश्वर्याचं,वैभवाचं प्रदर्शन,
चकचकाट,लखलखाट,जयजयकार आनंदाचे चीत्कार…
राजाने पुन्हा अंगठी काढली.पुन्हा वाचलं,हेही निघून जाईल.
त्या क्षणी तो आतल्या आत स्थिरावला आणि हसला..आता तो राजा होताच,पण, संन्यस्त राजा.
'अनामिक' जसं माझ्यापर्यंत आलं होत तसं आपल्यापर्यंत स्वगत पोहोच केले आहे.
पुढील भागात.. फुले दांपत्य आणि त्यांचा लढा..