सत्यजित पाटील यांचे कुब्र नावाचे पुस्तक बऱ्याच वेळा फेसबुक वर पाहण्यात आले आणि माणिक पुरी सरांकडून ऐकण्यात आले होते.पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हापासून त्यावरील चित्र आणि विषय काय असेल याविषयी उत्सुकता लागली होती.सदरील पुस्तक माणिक पुरी सरांनी पाठवून दिले.काही दिवस पुस्तक हातात घेता आले नाही.पण डोळ्यासमोरून चित्र आणि विषय बाजूलाही सारता आला नाही.शेवटी पुस्तक उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली.अतुल देऊळगावकर सरांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेच्या सुरुवातीला फ्रेड्रिक नित्शे यांचं ' परमेश्वराचा मृत्यू झाला आहे' हे वाक्य वाचून विचारात पडलो. पुस्तक वाचत शेवटाकडे जाताना या सृष्टीला जगवणारा ,वाचवणारा कोण आहे..? खरा परमेश्वर कोण आहे...? हे स्पष्ट होतं आणि तो म्हणजे मला निसर्ग वाटतो.याचा पालनकर्ता निसर्गाचा ऱ्हास करणारा कोण...? हे पण स्पष्ट होतं तेव्हा फ्रेड्रिक नित्शे यांच्या वाक्याचं प्रयोजन कळू लागतं.आणि या निसर्गाचा म्हणजेच परमेश्वराचा खून करणारा माणूस असल्याची जाणीव होते.प्रस्तावना वाचल्यानंतर पुस्तकाविषयीचे आकर्षण अधिकच वाढू लागले. प्रस्तावनेतून पुस्तकाच्या विषयांमध्ये घुसण्याचा मार्ग सहज आणि सोपा झाला.
'कुब्र' म्हणजे काय.. हे समजायला लागले.सत्यजित पाटील यांनी ताडोबाचे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे केलेलं अरण्यवाचन,निरीक्षण,समजून घेतलेल्या सूक्ष्म नोंदीचा समावेश कुब्रमध्ये केला आहे.सत्यजित पाटील यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळे त्यातील सत्यता वर्णनातून दिसून येते.
जंगल पाहत फिरत असताना त्यांनी काळ -वेळ, साथ- संगत पाहिलेली नाही.जंगल म्हणजे त्यांचा श्वास असल्याची अनुभूती कुब्रमधील वर्णन वाचताना होते.ते एका ठिकाणी म्हणतात की 'घड्याळाला चिकटून असलेलं चित्त मुक्त असू शकत नाही.' म्हणून ते घड्याळ सुद्धा सहसा वापरताना दिसून येत नाहीत..इतकच नाही तर जंगल वाचन करत असताना जंगलात कॅमेरा न वापरता मनाच्या स्मृती पटलात सर्व नोंदी जशाच्या -तशा टिपून घेतात.हे पाहून त्यांचं खूप कौतुक करावंसं वाटतं.
कुब्रमध्ये वेगवेगळ्या प्रकरणाला दिलेली नावं खूप छान आहेत.त्यावरून त्या प्रकरणात काय असेल याची उत्सुकता लागून राहते.यातील प्रसंगाच्या नोंदी वाचताना लेखकांनी निरीक्षणाच्या वेळी दाखवलेला संयम,केलेले धाडस,क्षणांची आतुरतेने पाहिलेली वाट, यासाठी धरलेला धीर या सगळ्या गोष्टी अलौकिक आणि थक्क करणाऱ्या वाटतात.या नोंदीची काही उदाहरणं आपण पाहूयात म्हणजे त्यांनी निरीक्षणासाठी केलेले धाडस आपल्याला दिसून येईल...
जंगलातून फिरत असताना आपण एखाद्या प्राण्यांना पाहण्यासाठी जात असतो.परंतु त्याचवेळी एखादा प्राणी सुद्धा आपल्याला पाहत असतो.अशावेळी आपण कानांची दृष्टी करून दूरचे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बऱ्याच वेळा इतर प्राण्यांच्या वर्तन आणि आवाजावरून काही प्राण्यांची चाहूल लागते.थोडक्यात वाघाची चाहूल लागल्यावर सावध करण्यासाठी कोतवाल हा पक्षी अधिक विश्वसनीय असल्याची त्यांनी नोंद केलेली आहे.कोतवाल हा पक्षी दोन किलोमीटर अंतरावर वाघ असतानाच विशिष्ट आवाजाद्वारे सावधानतेचा इशारा देऊन टाकतो. याबाबतीत मोर ही इशारा देतो.परंतु मोराचा अंदाज एवढा अचूक असेल याची खात्री नाही ही त्यांनी अनुभवांती केलेली नोंद आहे.
जंगल म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा खजिना असलेली खाण असते.या ठिकाणी खूप मोठी जीवसृष्टी वाढत असते,राहत असते.परंतु या ठिकाणी बऱ्याच वेळा माणसांच्या चुकीमुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे आग लागून वणवा पसरतो आणि अनेक जीवजंतू,वनस्पती,
प्राणी, पक्षी नष्ट होऊन जातात.जे नुकसान कधीही भरून निघू शकत नाही.हे नुकसान टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात.यामध्ये फायर लाईन (जाळ रेषा) तयार केल्या जातात .या फायर लाईनमुळे आग एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच जाऊ शकते आणि पुढे नियंत्रणात आणण्याची शक्यता वाढवता येते . फायर लाईनच्या जागेवर उठणाऱ्या गवताचे त्यांचे निरीक्षण मला खूप महत्त्वाचं वाटतं . फायर लाईन केल्या नंतर तेथील गवत उन्हाळ्यात दरवर्षी जाळलं जातं.परंतु या फायर लाईनवर पावसाळ्यात नव्याने एकाच जातीचं सर्वत्र गवत उगव लेल दिसतं. हे गवत कुळात असलेल्या बियांचे गवत असतं.ही कुसळं अग्नीरोधक असतात.यामुळे कुसळातील बियांचं आगीपासून संरक्षण होतं.बाकीचं सर्व गवत बियासगट जळून जाते आणि उरतं ते फक्त कुसळाचं बीज.जे पाऊस आल्यानंतर पुन्हा फायर लाईन दरम्यान उगवतं आणि आख्खी फायर लाईन या कुसळाच्याच गवताने भरून जाताना दिसून येते.इतकं बारकाईचं निरीक्षण या ठिकाणी दिसून येतं. 'जो तगतो तोच जगतो' हा सिद्धांत या ठिकाणी आठवतो.गवताच्या बाबतीतली इतकी बारकाईची नोंद मी यापूर्वी कुठेही वाचली नव्हती.ही मला खूप नवलईची आणि महत्त्वाची गोष्ट वाटते.
जंगल भ्रमंती दरम्यान त्यांना काही प्राण्यांमधील दिसून आलेली साहचर्याची नोंद या पुस्तकामध्ये आढळून येते.
अनेक प्राणी एकमेकांच्या संगतीने राहतात,विविध माध्यमातून सहकार्य करताना दिसून येतात.चितळ,हरीण आणि लंगूर नेहमीच एकत्र दिसतात.कारण लंगूर झाडावर राहतात आणि त्यामुळे वाघ किंवा शिकारी प्राणी येत असल्याची सूचना ते विशिष्ट आवाजातून चितळांना देत असावेत म्हणून ते सोबत राहत असावेत.ही सहकार्याची वृत्ती मानवांमध्ये वाढत गेली तर आज समाजात दिसून येणारी तेढ, वादविवाद कमी होण्यास खूप मदत होईल असे वाटते.
जंगल निरीक्षण करत असताना आपण फार सावधगिरीने जंगल पाहिलं पाहिजे.जंगलाचा आणि जंगलातील प्राण्यांचा सन्मान केला पाहिजे.त्यांच्या घरात जाऊन आपल्याकडून चुकीची कृती घडता कामा नये.कारण ते आपल्यापेक्षा अधिक संवेदनशील असतात. म्हणून जनावरांना आपले अस्तित्व आधीच कळत असतं.त्यामुळेच ते आपल्याला टाळून दुसरी वाट निवडतात.माणसांना टाळणं ही प्राण्यांची पहिली प्रतिक्रिया असते.असं सत्यजित पाटील यांनी निरीक्षणाअंती मांडलेलं मत आहे.
हे मला खरं वाटतं.प्राण्याची भाषा,तरंग संवेदनावर आधारित असतात.आपले तरंग प्राणी ओळखतात आणि बऱ्याचदा आपल्याला वाट मोकळी करून देतात.म्हणून आपण पुन्हा - पुन्हा त्यांच्या वाटेवर जाणे बरे नाही.
जंगलातील मोठ्या प्राण्यांबरोबर अगदी छोटे प्राणी सुद्धा महत्त्वाचे असतात.याची नोंद सत्यजित पाटलांनी घेतलेली दिसून येते.कीटक वर्गातील पिंपळ माशी ची नोंद महत्वपूर्ण वाटते.अशा नोंदी मुळातून वाचल्या पाहिजेत.पिंपळमाशा किंवा यासारख्या छोट्या - छोट्या माशा नष्ट झाल्या तर मोठ-मोठे वृक्ष नष्ट होतील.
वातावरणाच्या एकंदर तापमानात सतत वाढ होत राहिली तर पिंपळमाशीच्या आयुष्य काळावर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे जंगलाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.
या पुस्तकातील चक्करघीनी हा लेख अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो.या लेखातून लेखकाची जीवन -मृत्यू कडे बघण्याची दृष्टी दिसून येते . चक्करघीनी म्हणजेच जीवाच्या सृजनापासून ते देहाच्या विसर्जनापर्यंत होणारी प्रक्रिया या लेखांमध्ये मांडलेली आहे निसर्गाच्या चक्करघीनीत कोणीही लहान किंवा मोठा नाही , कोणी कमी महत्त्वाचा किंवा अति महत्त्वाचा असेही नाही.पण यातल्या एकाचेही अस्तित्व नष्ट होणं म्हणजे कालांतराने कदाचित काही लाख वर्षांनी या चाकाला खीळ बसणं होय आणि हे सृष्टीला परवडणार नाही.अगदी मधमाशी सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही.मधमाशीच्या नोंदी खूप महत्त्वाच्या वाटतात.मोहोळाचं पोळ असतं त्या पोळ्यातील कांदा नेमका कोणत्या ठिकाणी असतो याची नोंद खूप महत्त्वाची वाटते.मधमाशांच प्रजनन कसं होतं…? कामगार किंवा सैनिक माशा किती जन्माला याव्यात?
राणी माशा किती तयार झाल्या पाहिजेत?याचं सुद्धा नियोजन मधमाशा करत असतात. कीटकांना सुद्धा संवेदना,स्मृति असते.ते चेहरे लक्षात ठेवत असल्याची माहिती या लेखातून मिळाली.एखाद्या पोळ्यात दोन किंवा तीन राणी माशा जन्माला आल्या तर काही काळानंतर त्या राणीमाशी काही नरांना घेऊन नव्याने पोळ निर्माण करतात.ही मधमाशांमधील कुटुंबाची सामाजिकता अत्यंत महत्त्वाची वाटू लागते.ही गोष्ट माणसांनी स्वीकारली असावी म्हणून तर मोठे कुटुंब झालं की काही दिवसांनी त्या कुटुंबाचे वेगवेगळे कुटुंब झालेले दिसून येतात.
प्रत्येक जीव आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करत असतो आणि अस्तित्व टिकवतो.
आपल्या घरात दिसणाऱ्या पालीवर काही अटॅक झाला तर ती शेपूट तोडून पळून जाते.त्याच पद्धतीने गडद तपकिरी रंगाची गांडूळ लेखकांना एक वेळा दिसली.
गांडूळ हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हातात धरलेला भाग तेवढाच गांडूळानी तोडून टाकला आणि उर्वरित गांडूळ लपून बसण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.हे वाचताना 'सर सलामत तो पगडी पचास' ही म्हण आठवते.प्राणी खूप हुशार असतात.त्यांची प्रत्येक कृती ही अनुभवातून आलेली असते.त्यामागे त्यांच्या अनेक पिढीचे चिंतन असतं असं वाटतं. प्राण्यांमधील हुशारपणा जाणून घेतल्यानंतर माणसातील शहाणपणाच्या मर्यादा सुद्धा हळू-हळू लक्षात येऊ लागतात.जंगलात त्यांना दीप्तीवान म्हणजे चमकणारी गोम दिसली. निरीक्षणाअंती त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरात एक रसायन असतं.ते विकर हवेच्या संपर्कात आलं आणि प्राणवायुशी विकराचा संयोग झाला की ते प्रकाशतं आणि त्यातून हिरवा,निळसर,थोडा पांढरा प्रकाश दिसू लागतो.
यामुळे प्राण्यावर हल्ला करणारा प्राणी गोंधळून जातो आणि दीप्तीवान गोमीचा जीव वाचतो.प्रत्येक जीवाला आपला जीव कशा पद्धतीने वाचवला पाहिजे याची सर्व सोय निसर्गाने उपलब्ध करून दिलेली आहे,फक्त त्याचा योग्य वेळी वापर करता आला पाहिजे हे या दीप्तीवान गोमीला वाचताना कळून आले.
माणसाप्रमाणे प्राणी सुद्धा आजारी पडतात. त्यावेळी ते निसर्गातीलच वनस्पतींचा उपयोग करतात.वटवाघळे पोट दुखू लागली तर बेहडाचे देठाकडचे पाने खाताना दिसून येतात.लंगुर वानर करंजीचे पानं खात असताना शेंड्याकडील टोकाकडीलच पानाचा भाग खातात.कारण पानाच्या वरील भागात अलकाईड नावाचं रसायन असतं आणि हे रसायन आरोग्याला घातक असल्यामुळे ते पानाचा टोकाकडील भाग खातात,इतकच नव्हे तर वाघासारखा प्राणी शिकार केल्यानंतर शिकार केलेल्या प्राण्याचा आतड्याचा भाग आधी दूर नेऊन फेकून देतो.तो भाग खाण्याचं टाळतो.यामुळे ती शिकार दोन ते तीन दिवस व्यवस्थित रित्या टिकून राहते. प्राण्यांमधील हे शहाणपण माणसाला घेता आलं तर माणसांचं सुद्धा आरोग्य चांगले राहू शकते. अन्न कसं आणि किती खाल्लं पाहिजे या गोष्टी सुद्धा प्राण्यांकडून शिकण्यासारख्या आहेत.
अणूवृक्ष संदर्भातील लेख मुळातून वाचण्यासारखा आहे.अणूवृक्ष म्हणजे करोडो जिवाणू एकत्र येऊन बनलेलं एक सूक्ष्म झाड असतं.सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या जागी हे हमखास आपणास आढळून येत. यासंदर्भातील निरीक्षण अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत.
प्राण्यांमधील समन्वय,साहचर्य आणि कळपाची एकता ही वाखण्यासारखी आहे.आकाराने आणि शक्तीने लहान प्राणी कितीतरी मोठ्या असणाऱ्या प्राण्यांची सहजरीत्या शिकार करू शकतात, कारण त्यांच्यात असलेली संघभावना आणि आपल्या कळपाविषयी असलेली निष्ठा महत्त्वाची असते.रान कुत्रे कळपाने राहून मोठ्या -मोठ्या सांबराची सहजरित्या शिकार करतात. जेव्हा सांबरच्या पिल्लाची शिकार होते तेव्हा शिकार झालेल्या पिल्ल्याच्या आईची मनस्थिती वाचताना आपलंही मन गलबलून जाते.पण हा निसर्गाचा नियम आहे.कळपाचे नैसर्गिक सावधपण हे भीतीतून जन्माला येत नाही तर तो एक सहज भाव असतो. याउलट माणूस जंगलात वावरतो तो भीतीचा पूर्वग्रह सोबत घेऊन.माणसाचं सावधपण हे नैसर्गिक नसतं आणि म्हणून जंगलात वावरताना माणसाच्या मनाला सतत भीतीचे दंश होत राहतात.
कोळ्यांचे शहाणपण हे खूप विशेष वाटलं. कोळी जाळे विणून कीटकांची शिकार करून खात असतात.यातील काही कोळी हे दिवसा जाळं पडद्याप्रमाणे गुंडाळून ठेवतात आणि रात्रीला ते जाळं सोडून त्यात कीटकांना अडकवतात.त्यांच्यातील संवेदनशीलता खूप महत्त्वाची आणि हुशारपणाची वाटली.एखाद्या भुसभुशीत ठिकाणी गोल छोट्या आकाराचा खड्डा केलेला असतो.त्यामध्ये सुद्धा कोळी राहतात हे नव्याने कळाले.आम्ही त्याला लहानपणी हल्ल्या असं म्हणत होतो.त्यात मुंगी वगैरे टाकली तर ते खाण्यासाठी तो हल्ल्या वर यायचा त्यालाच ' सिंहमुंगी 'म्हणतात असे यातून कळाले. कोळ्यांची संवेदनशीलता ही खूप महत्त्वाची वाटत.ती अतिशय नाजूक स्पंदन सुद्धा ओळखतात.
प्राणी त्यांच्यातील शहाणपण सृष्टीतील अन्य घटकांचे अहित करण्यासाठी वापरत नाहीत. त्यांच्या शहाणपणाच्या कृतीने निसर्गचक्रात समतोलपणा राहतो.याउलट माणसाचा शहाणपणा स्वतःसहित सगळ्यांचे अहित आणि सृष्टीचा विध्वंस करणारे आहे. जंगलातील साधन संपत्तीचे म्हणजे झाडांची आणि प्राण्यांची शिकार करण्यासाठी माणूस आपला शहाणपणा अतिरेकापर्यंत जाऊन वापरतो. याचा परिणाम जंगलाचा सौंदर्य आणि जंगलाचा प्राण संपण्यावर होतो.जंगलातील झाड ही त्या जंगलाचा श्वास असतात.प्राण्यांचा निवारा असतात.ती झाडं कापण्यासाठी माणसं अनेक प्रकारचे उपाय करत असतात.यातील कंपनघागर हे प्रकरण खूप मनाला विचार करायला लावते.
जंगलातील वृक्ष तोडत असताना तोडण्याच्या साधनांचा कुऱ्हाडीचा आवाज दूरपर्यंत जाऊन वनरक्षकांना कळू नये म्हणून त्या ठिकाणी वृक्षातोड करणारे लोक एक पाण्याची घागर भरून ठेवतात ,कारण झाड तोडताना होणाऱ्या आवाजाची कंपने ही घागर शोषून घेते आणि कुऱ्हाडीचा आवाज दूरपर्यंत जात नाही.
ही गंभीर बाब लेखकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी केलेली कार्यवाही खूप धाडसी वाटू लागते.माणसाचा शहाणपणा हा कोणाच्या हिताचा आहे …हा प्रश्नही निर्माण होतो.शहराची भूक भागवण्यासाठी सागवानाची सर्रासपणे कत्तल केली जाते हे खूप घातक आहे.हे कुठेतरी थांबायला हवे.
हिरवा वनवा हे प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. नाव वाचल्याबरोबर वाचकाचे मन आकर्षित होते. जंगलात भारतीय वनस्पती बरोबर काही परकीय वनस्पती अतिशय वेगाने वाढत आहेत. या परकीय वनस्पतींना नष्ट करणारे कीटक या ठिकाणी नसल्यामुळे त्या फोफावत आहेत. यामुळे भारतीय मूळ वनस्पती आणि गवताचे अस्तित्व धोक्यात येताना दिसत आहे . थोडक्यात आपल्या भागात सर्रासपणे वाढणारी टणटणी किंवा घाणेरी नावाची वनस्पती अति वेगाने वाढत असताना भारतीय वनस्पती आणि गवतांना पाठवून गळपाटून टाकत आहे . यासोबतच भूतगांजा सारखी वनस्पती सुद्धा भारतीय रानगवतांचा प्राण घेत आहे . तृणगवतावर जगणाऱ्या प्राण्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
या वनस्पती नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.या गोष्टीकडे सुद्धा लेखकाने आपले लक्ष वेधलेले आहे.अशा हिरव्यागार वनस्पती अतिशय वेगाने वाढत आहेत.ज्या पर्यावरणाला घातक आहेत.यालाच लेखकाने 'हिरवा वनवा' ही दिलेली उपमा अतिशय समर्थक आणि योग्य वाटू लागते.
जंगलावर या ना त्या प्रकारे सतत आक्रमण सुरू असतं.हे कुठेतरी थांबायला हवे नाहीतर हे जंगल नष्ट व्हायला आणि सृष्टी भस्म व्हायला वेळ लागणार नाही.डॉ.सलीम अली एका ठिकाणी म्हणतात की " मानव जात नाहीशी झाली तर या वनस्पती,पक्षी, प्राणी यांचे काही बिघडणार नाही पण ही जीवसृष्टी नष्ट झाली तर मानवजात मात्र जगू शकणार नाही ." हे मानवांनी आता शिकलं पाहिजे पुढच्या पिढींना आपण काय देणार आहोत? यावर विचार केला पाहिजे.पर्यावरण समृद्ध करण्यासाठी या प्राण्यांकडून आपल्याला काही शिकता येईल का? याचा विचार केला पाहिजे कारण या सृष्टीतील वनस्पती,प्राणी यांचं अस्तित्व असेपर्यंत आणि त्यांचे अस्तित्व नष्ट झाल्यानंतर ते या पर्यावरणासाठी पोषक असतात. वनस्पतीची वाळून गेलेली लाकडं ही जंगलातच राहिली तर पावसाच्या पाण्याने ती कुजून मातीत मिसळून जातात,त्यामुळे ती माती समृद्ध होते.समृद्ध झालेल्या मातीत अनेक वनस्पती जिवाणू तयार होतील. जी जंगल समृद्ध करणारी असतील.माणसाचं मात्र असं नाही माणूस जंगलाला खायला उठलेला आहे . जंगल समृद्ध करण्यासाठी वनस्पती प्राणी जीवन वाढवतात म्हणून तरी माणसाने त्यांच्या मनातील निसर्ग उद्ध्वस्त करणारे विषाणू मारून टाकावेत.हा विचार हे कुब्र वाचल्यानंतर वाचकाच्या मनात निर्माण होतो.( कुब्र लेखक सत्यजीत पाटील,प्रकाशन - शब्दालय)
कुब्रमध्ये तिन्ही ऋतूंचं वर्णन केलेले आहे.प्रत्येक ऋतूचे वर्णन वेगवेगळ्या प्रकरणात अनुभव मांडले आहेत.हे वर्णन लेखकाने आपल्या तन-मन-धन आणि जंगलावरील निष्ठेपायी केले आहे.यासाठी त्यांनी केलेले धाडस आणि संयमाने केलेले निरीक्षण याची खरोखर कमाल करावी वाटते वाक्यरचना करताना क्रियापदांचा काही ठिकाणी वापर नसल्याने वाक्य तोडल्यासारखी वाटतात.तरीही वाचनाची आतुरता मात्र कायम राहते.
अतुल देऊळगावकर यांची प्रस्तावना आणि वसंत आबाजी डहाके यांनी केलेली पाठ राखण आणि पुस्तकातील लेखकांचे निरीक्षण अनुभव यामुळे हे पुस्तक अतिशय सुंदर झाले आहे वाचकाच्या मनात जंगला विषयी प्रेम आणि डोळ्याला जंगलाकडे पाहण्याची दृष्टी देणारे आहे.
आवडते शिक्षक,भरपुर वाचन करणारे आमचेही मार्गदर्शक मित्र माधव गव्हाणे (सॉक्रेटिस ) यांनी केलेले पुस्तक परीक्षण
स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...! एमर्सन एकदा हेन्री डेव्हिड थोरोला म्हणाला होता.
माधव गव्हाणे यांनी केलेली ही 'स्व' ची चिकित्साच आहे.