वन्य पशूची चिकित्सा करण्याचं काम तसं खूप आकर्षक,
मनोरंजक असतं.पशुचिकित्सकासमोर बऱ्याच वेळा त्याला आव्हान करणाऱ्या केसेस उभ्या राहतात.क्वचित केव्हातरी एखाद्या प्राण्याचा सामान्य वाटणारा आजार असं काहीतरी नाजूक स्वरूप धारण करतो,की मग त्याला वाचवण्याकरता अतिशय वेगानं हालचाली नि इलाज करावे लागतात.प्राण्यांच्या इलाजांव्यतिरिक्त पशु
चिकित्सकासमोर कधीकधी मोठ्या बिकट समस्या पण उभ्या राहतात.त्या समस्यांशीही त्याला मग सामना करावा लागतो.या संदर्भात गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलेल्या एका पाणघोड्याची हिप्पोपोटेमसची विलक्षण केस मला प्रकर्षानं आठवते.एक दिवस तिसऱ्या प्रहरी मँचेस्टरच्या प्राणिसंग्रहालयात हर्क्युलिस नावाच्या एका पाणघोड्याचं आगमन झालं.जाड आणि मजबूत पोलादी गज असलेल्या एका बऱ्याच मोठ्या आणि भक्कम पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून या स्वारीला लंडनहून पाठवण्यात आलं होतं. पाणघोडा हे मोठं जबरदस्त जनावर असतं. त्याच्याशी कोणत्याही प्रकारची सलगी अगर चेष्टामस्कारी करता येत नाही.हा भयंकर प्राणी अतिशय वेगानं मुसंडी मारून हल्ला करतो; इतकंच नव्हे तर हा फार वाईट प्रकारे चावतो देखील!एखाद्या प्रचंड रणगाड्याप्रमाणे तो चाल करू येतो आणि रणगाड्याप्रमाणेच त्यालाही थोपवणं अशक्य असतं.त्याची मुसंडी जबरदस्त असते.हक्युर्लसनं बोटीच्या प्रवासादरम्यान काही दंगामस्ती करू नये म्हणून लंडनहून त्याची रवानगी करण्यापूर्वी त्याला 'फॅन्सीक्लायडीन' या गुंगीच्या औषधाचं इंजेक्शन टोचण्यात आलं होतं.पूर्ण शुद्धीवर असलेल्या स्थितीत त्यानं बोटीवर जर काही उत्पात केला असता,तर तो केव्हाही हितावह ठरला नसता.म्हणून खबरदारी म्हणून त्याला गुंगीचं औषध टोचण्यात आलं होतं.प्राणिसंग्रहालयात पोहोचल्यानंतर, पिंजऱ्यातून बाहेर काढण्यापूर्वीही त्याला याच औषधाचा आणखी एक डोस टोचावा,अशी सूचनाही लंडनहून आली होती.ज्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून हर्क्युलिसला पाठवण्यात आलं होतं त्या पिंजऱ्याच्या वरच्या मोकळ्या भागावर मी चढलो.निसर्गतः टणक कातडी असलेल्या त्या अवाढव्य प्राण्याकडे मी नजर टाकली. ते जनावर अगदी शांतपणे उभं होतं.कदाचित त्याला मी गुंगीच्या इंजेक्शनचा दुसरा डोस दिलाही नसता,पण त्यापूर्वी एखाद्या पाणघोड्याला पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा अनुभव मी घेतलेला नव्हता.न जाणो लंडनहून आलेल्या सूचनेबरहुकूमगुंगीच्या इंजेक्शनचा दुसरा डोस न देता मी त्याला पिंजऱ्याबाहेर काढलं;आणित्याने जर धिंगाणा घातला तर? याच विचारामुळं उगाच धोका नको म्हणून मी
फॅन्सी क्लायडीनचा एक डोस इंजेक्शनमध्ये भरून घेतला.सिरिंजवर मी एक अतिशय मजबूत अशी सुई बसवली,कारण हे इंजेक्शन पाणघोड्याच्या कातडीत द्यायचं होतं.मग पिंजऱ्याच्या गजांमधून हात आत घालून हर्क्युलिसच्या कुल्ल्यावर विवक्षित ठिकाणी इंजेक्शनची सुई मी जोरानं खुपसली आणि सिरिंजचा दट्टया दाबला.थोड्याच वेळात औषधाचा योग्य तो परिणाम झाला.हर्क्युलिसचे कान निर्जीवपणे खाली पडले; आणि त्याच्या प्रचंड मोठ्या जबड्यामधून लाळ टपकू लागली.
मग मी त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.ज्या हौदवजा तलावात पाणघोड्याला सोडण्यात येणार होतं,त्या तलावासमोरच हर्क्युलिसचा पिंजरा ठेवलेला हेता.पिंजऱ्याचं पाठचं दार तलावाकडे तौंड करून होतं.त्या दाराची कडी काढून ते उघडण्यात आलं.हर्क्युलिसनं मागे मागे चालत बाहेर पडावं आणि कुणावर हल्ला करू नये असा यामागचा उद्देश होता;परंतु उलट्या चालीनं बाहेर पडायची हर्क्युलिसची तयारी नव्हती.मग पिंजऱ्याचं दार तलावाच्या दिशेनं फिरवून अगदी सावधपणे आम्ही त्याच्या पिंजऱ्याचं दार उघडलं आणि एका बाजूला उभे राहून काय होतं ते पाहू लागलो.
हर्क्युलिसनं आपल्या मोठमोठ्या नाकपुड्या फेंदारून बेपर्वाईनं जोरानं वास घेतलं आणि आपल्या नव्या घराचा धोडासा अंदाज घेतला.झोपेमुळं- गुंगीमुळं जड झालेल्या आपल्या पापण्या फडफडवून त्यानं प्रयत्नपूर्वक समोर पाहिलं आणि त्याच्या नजरेला गरम पाण्यानं भरलेला मोठा तलाव समोर दिसला. चमकदार निर्मळ पाणी असलेल्या त्या तलावाच्या पृष्ठभागावरून हलक्या वाफा निघत होत्या.अर्धवट निद्रित अवस्थेत हर्क्युलिस आपल्या पिंजऱ्यामधून बाहेर पडला आणि हळूहळू पावलं टाकत डुलत डुलत स्वारी तलावाच्या काठाशी पोहोचली.तोंड खाली करून,नाकपुड्या फेंदारून तलावांतल्या पाण्याचा त्यानं वास घेतला.काही क्षण हुंगल्यासारखं केलं.तलावाचं पाणी बहुधा त्याला पसंत पडलं असावं;आणि म्हणूनच की काय अगदी हळुवारपणे तो तलावाच्या त्या स्वच्छ पाण्यात हर्क्युलिसला शांतपणे शिरताना पाहून आम्हाला समाधान वाटलं.हर्क्युलिस पोहत तलावाच्या मध्यभागी गेला;आणि मग एखादी जडशीळ शिळा पाण्याखाली जावी त्याप्रमाणे त्याचा प्रचंड देह अचानक उभाच्या उभा तळाशी गेला! गुंगीच्या औषधामुळे त्याला झोप लागली असावी आणि त्यामुळे शरीरावरलं नियंत्रण सुटून तो पाण्याखाली गेला होता.काही मिनिटं उलटली,पण तो वर आला नाही.त्याला मी फॅन्सीक्लायडीनचा दुसरा डोस दिलेला होता आणि मग तलावाच्या उष्ण पाण्यात सोडलं होतं. उष्ण पाण्यामुळे गुंगीच्या त्या औषधाचा प्रभाव मोठाच भयंकर सिद्ध झाला.पूर्ण शुद्धीवर असताना पाणघोडा पाण्याच्या पृष्ठभागाखाली कित्येक मिनिटं श्वास रोखून पाहू शकतो; परंतु श्वासोच्छ्वास करण्याची वेळ येते तेव्हा त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर यावंच लागतं, पण अर्धवट बेशुद्ध अवस्थेत हर्क्युलिस पाण्याच्या तळाशी गेला होता.त्या स्थितीत त्याचा श्वास अडला असेल हा भयानक विचार माझ्या मनात आला;आणि मी विलक्षण हादरलो.
भयाची एक थंड शिरशिरी माझ्या सर्वांगात सरसरत गेली.गुंगीच्या औषधामुळे आलेल्या बेहोषीमुळे जर हर्क्युलिसला पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याचं भान राहिलं नाही,तर गुदमरून पाण्याच्या तळाशीच त्याला मृत्यू येईल. हा भयंकर विचार माझं काळीज पोखरू लागला.बाजूला उभ्या असलेल्या प्राणिसंग्रहालयाच्या पाहून मी मोठ्यांदा ओरडलो, 'लवकर जा! आणि काही मजबूत दोरखंड घेऊन या! जल्दीऽऽ!' प्राणिसंग्रहालयाचे रखवालदार धावतच दोरखंड घेऊन आले. हर्क्युलिस जिथे बुडाला होता,तिथे पाण्याच्या पृष्ठभागावर हवेचे बुडबुडे वर येत होते.मग एक मिनिटही वाया न घालवता मी आणि प्राणिसंग्रहालयाचा प्रमुख रखवालदार मॅट केली.आम्ही दोघांनी कपडे काढले;आणि जांघियावर आम्ही दोघं तलावात उतरलो.तलावाच्या पाण्यात डुब्या घेत आम्ही तलावाच्या तळाशी पोहोचलो.
रखवालदाराने दिलेले दोर आम्ही आमच्या बरोबर घेतलेलेच होते. पाण्याखाली वापरण्याचे गॉगल्स लावल्याविना दोरखंडांनी हर्क्युलिसला बांधणं हे काही सोपं काम नव्हतं.आम्ही पाण्याच्या तळाशी उभ्या असलेल्या त्या पाणघोड्याजवळ पोहोचलो. गुंगीमुळे त्याला झकास झोप लागलेली होती. त्याच्या फेंदारलेल्या नाकपुड्यांमधून उच्छ्वासाची हवा बाहेर पडत असल्यामुळे हवेचे मोठमोठे बुडबुडे पाण्यातून वर जात होते.मी हर्क्युलिसच्या मागल्या दोन पायांखालून दोरखंड घालत तो त्याच्या दोन्ही बाजूंनी वर आणला; आणि त्याच्या कमरेवर गाठी मारल्या.मॅट केलीनं त्याच्या पुढल्या दोन पायांखालून - छातीवरून दोरखंड घेऊन त्याच्या खांद्यावर गाठी मारल्या. पाण्यात जास्त वेळ दम काढता येत नसल्यामुळे पाण्याबाहेर येऊन नि पाण्यात दोन-तीनदा डुब्या घेऊन हर्क्युलिसला मजबूतपणे बांधण्याचं काम आम्ही पूर्ण केलं आणि त्याला बांधलेल्या दोरांची टोकं घेऊन तलावाबाहेर आलो.दरम्यान प्राणिसंग्रहालयाच्या नोकरांनी कप्प्यांचे चार स्टँड त्या तलावाच्या काठावर आणून ठेवले होते.दोन तलावाच्या एका बाजूला तर दोन दुसऱ्या बाजूला मग त्या कप्प्यांवरून आम्ही आणलेले चारही दोर त्यांनी वर घेतले आणि मग चार टोकांकडून ते चारही दोर ते जोर लावून हळूहळू वर ओढू लागले.त्या वजनदार पाणघोड्याला पाण्यातून वर खेचणं म्हणजे सोपं का काम होतं? पण काही मिनिटांत प्रेमदेवता व्हीनस पाण्यातून बाहेर यावी त्याप्रमाणे हर्क्युलिस महाशयांचा देह पाण्यातून हळूहळू वर आला.प्राणी मित्रांच्या जगात -विजय देवधर,चंद्रकला प्रकाशन पाणघोड्याची शारीरिक बनावट अशी असते,की त्याला धरायचं झालं,तर कोणत्याही बाजूनं नीट पकडता येत नाही;आणि म्हणूनच हर्क्युलिसला तलावातून बाहेर आणणं अशक्य होतं.म्हणून मग आम्ही तो शुद्धीवर येईपर्यंत त्याला तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावरच तरंगत ठेवण्याचं ठरवलं. तो शुद्धीवर आल्यानंतर आम्हाला त्याच्या निकट जाता येणार नव्हतं,म्हणून त्याच्या पुढल्या व मागल्या पायांखालून दोन नवे दोर आडवे घालून ते कप्प्यांवरून घेऊन तलावाच्या बाजूला फरशीवर असलेल्या हुकांना आम्ही बांधले.मग अगोदर तो पाण्याखाली असताना त्याच्या शरीरावर बांधलेले दोर सोडवून घेतले. नव्या दोरांमुळे हर्क्युलिसचं शरीर तर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहिलं;परंतु त्याचं जड तोंड पाण्यात लोंबकळू लागलं.म्हणून मग त्याच्या तोंडाभोवती एक मोठा टॉवेल गुंडाळून त्याची वर गाठ मारून वरून लोंबकळत राहील अशा एका हुकामध्ये तो टॉवेल अडकवून टाकला.अशा प्रकारे एक प्रकारचा झूला करून त्यात आम्ही हर्क्युलिस महाराजांच्या मस्तकाची स्थापना केली.आता त्याचा जबडा आणि नाक पाण्याच्या बाहेर अधांतरी स्थितीत राहिलं.दाढदुखीनं हैराण झालेल्या एखाद्या माणसानं आपल्या तोंडाभोवती मफलर गुंडाळून बसावं असाच काहीसा हर्क्युलिसचा अवतार आता दिसत होता.पण त्याची ही सगळी व्यवस्था लावता लावता आम्हाला मात्र अक्षरशःघाम फुटला होता.काहीही असो,पण गुंगीच्या औषधाच्या अंमलाखाली गुदमरून मरण्यापासून आम्ही त्याला वाचवलं होतं.दोरखंडांच्या झोपाळ्यावर पाण्यात तरंगत आता स्वारी स्वस्थपणे श्वासोच्छ्वास करत होती.अद्याप त्याची गुंगी पूर्णपणे उतरली नव्हती.काही तास उलटले.
हर्क्युलिसवरला गुंगीच्या औषधाचा अंमल हळूहळू ओसरू लागला.थोड्याच वेळात तो पूर्णपणे शुद्धीवर आला.दोरखंडांनी आपल्याला पाण्याच्या पृष्ठभागावर का टांगून ठेवलं आहे,हे काही त्याच्या लक्षात येईना.त्यातून सुटण्याकरता तो जोरानं धडपड करू लागला.तो आता पूर्ण शुद्धीवर आला असून,आता स्वतःची काळजी घेण्याइतपत सावध झाला आहे,अशी आमची खात्री पटली;आणि दोरखंडांच्या झोपाळ्यातून त्याची सुटका करायचं आम्ही ठरवलं.प्रथम त्याच्या डोक्यावरचा लोखंडी हुक वरून थोडा सैल करून,खाली सोडून त्याच्या जबड्या भोवतालचा टॉवेल काढून घेतला.जबडा मोकळा होताच हर्क्युलिसनं आपलं तोंड पाण्यात घुसळलं.मग कप्प्यांवरले दोन बाजूंचे दोर आम्ही सोडले आणि दुसऱ्या बाजूंनी ते ओढून घेतले. पोटाखालचे दोरखंड मोकळे होताच हर्क्युलिसनं आपलं सबंध अंग घुसळलं;आणि तो झटदिशी तलावाच्या तळाशी गेला.आपला भला मोठा जबडा पाण्याच्या वर आणत फुर्रऽऽफुर्रऽऽ करत त्यानं पाणी उडवलं;आणि मग आपल्या भल्या मोठ्या नाकपुड्या फेंदारून त्यानं दीर्घ श्वास घेतला.ते पाहून आम्ही सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.त्याच्या बाबतीतला धोका आता टळला होता.थोड्याच दिवसांमध्ये हर्क्युलिस पाणघोडा प्राणिसंग्रहालयात चांगला रुळला.त्याला आपला तलाव भारी आवडू लागला.त्याला ज्या तलावात ठेवलं होतं,त्या तलावात पाण्यात जगणाऱ्या हिरव्यागार वेलवनस्पती सोडलेल्या होत्या, तलावात काही कृत्रिम झरेही सोडण्यात आले होते.तलावात काही ठिकाणी काँक्रीटची कृत्रिम बेटं तयार केलेली होती.ज्या उष्णदेशीय प्रदेशातून हर्क्युलिस आलेला होता,तसलंच वातावरण इथं निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळे हर्क्युलिस अगदी खूश झाला;आणि मौजेनं त्या तलावात राहू लागला.पण त्याच्या आगमनाचा इतर काही प्राण्यांना उपद्रव होऊ लागला.कारण,ज्या तलावात हर्क्युलिसला ठेवण्यात आलं होतं,त्याच तलावात इतरही काही प्राणी राहत होते.अमेरिकेत आढळणारे टार्पोर नावाचे सस्तन प्राणी, कॅपिबारा नावाचे उंदरासारखे एक विशिष्ट प्रकारचे प्राणी,पाणबदकं आणि अन्य जातीचे पाण्यात राहणारे पक्षी त्या तलावात वस्ती करून होते आणि हर्क्युलिस याच गोष्टीचा फायदा उठवू लागला.तलावाच्या कुठल्याही भागात तो दडून बसत असे;आणि मोका मिळताच जो समोर दिसेल तो कुठलाही प्राणी तो झडप घालून पकडत असे आणि गट्ट करून टाकत असे.मी बऱ्याच ठिकाणी पाणघोड्यांना वेली, वनस्पती आणि पाणकंद खाऊन जगताना पाहिलेलं आहे; पण आमच्या प्राणिसंग्रहालयात आलेल्या हर्क्युलिस पाणघोड्याचा नूर काही वेगळाच होता.शाकाहाराबरोबरच त्याला मांसाहाराचाही जबरदस्त शौक होता !