असाच एके दिवशी नेहमीच्या जागेवर भिक्षेकरी तपासण्यासाठी गेलो असताना,चांगल्या कपड्यातली एक आजी लगबगीने माझ्या कडे आली आणि काहीही कळण्याआधीच माझा हात हातात घेवुन कपाळाला लावून हमसुन हमसुन रडायला लागली .
मला काहीच कळेना... !
खूप वेळ ती माझ्या गळ्यात पडुन नुसती रडत होती... आम्हाला पाहुन रस्त्यावरचे लोक फोटो काढत होते.
लोकांना दुस-याचा तमाशा पहायला आवडतो..! आपलं ठेवायचं झाकुन,आणि दुस-याचं पहायचं वाकुन.... !!!
आजीचा रडण्याचा भर ओसरल्यावर मी तिची चौकशी केली,म्हणाली... मला एक मुलगा आहे, सुन आहे,नातवंडं आहेत,खुप गणगोत आहेत.परंतु माझं सर्व मी मुलाला नावावर करुन दिल्यावर तो आता लक्ष देत नाही.सुन खायला देत नाही,उठता बसता मरत का नाहीस म्हातारे? असे टोमणे मारते.अजुन किती दिवस फुकट खाणार गं ? असं विचारते.
मी फुकट खात नाही हो डाॕक्टर ... माझ्या नावावरचं घर मी त्यांच्या नावावर केलंय... खरंतर ते माझ्या घरात राहतात...मी नाही... पण मी ते बोलुन दाखवत नाही !
सुनेन नातवंडांना माझ्याविषयी काहीतरी भरवलंय,ही छोटी मुलंही मला घालुन पाडुन बोलतात.मुलाला हे सांगितलं तर,मुलगा दारू पिऊन मलाच मारहाण करतो.
मला जगायचं नाही डॉक्टर... बाळ गर्भारपणात पोटातुन लाथ मारतं,तेव्हा प्रत्येक आईला आनंदच होत असतो... पण सर्वस्व देवुनही म्हातारपणात या वयात पोरगा लाथ मारतो ते सहन होत नाही हो..!
डाॕक्टर ,मला कसलंतरी इंजेक्शन देऊन गुपचुप मारून टाका... मी वाटलं तर कागदावर अंगठा देते.... पण मला मारुन टाका...आता नाही सहन होत....असं म्हणून ती गळ्यात पडून पुन्हा रडू लागली...मला तिचं रडू पहावेना.!
तीची कशीबशी मी समजूत काढली आणि म्हणालो मी काय मदत करू शकतो तुम्हाला आजी ?खरं तर मी फक्त भीक मागणाऱ्या समाजासाठीच काम करतो,तरीही मी काहीतरी प्रयत्न करेन.आजी जगण्याला वैतागली होती, सारख्या मरणाच्या गोष्टी करत होती. तिला त्या घरात परत जायचंच नव्हतं.ब-याच वेळाने आजी म्हणाली माझी कुठं आश्रमात सोय होईल का ?
हा प्रश्न ऐकून मीच शहारलो...कारण सध्या कोरोना च्या काळात कोणताच वृद्धाश्रम नवीन लोकांना स्वीकारत नाहीय. अशाही परिस्थितीत मागच्या दोन आठवड्यांपूर्वी एका बाबांची कशीतरी सोय लावली होती, त्यांची "शाल" हृदयात जपुन ठेवली आहे, ठेवणारच आहे.... पण आता या आजीची सोय कुठे करावी मला काही कळत नव्हतं..!
मला हो म्हणणं शक्य नव्हतं आणि नाही म्हणणं जड जात होतं...! आजीच वय ८० असावं...
या वयात धडधाकट मुलाने तिला सांभाळण्याऐवजी तो तिला मारतो हे ऐकून अंगावर काटा आला...मी म्हटलं,
आजी तुझ्या मुलाला मी भेटतो आणि त्याच्याशी बोलतो, माझी भेट करून दे.'
आजी म्हणाली, 'नाही बाळा, तो तुलाही मारेल आणि मलाही मारेल, मला त्याच्या पुढे नेऊ नकोस... ' थरथर कापत आजी म्हणाली... घाबरून थरथर कापणा-या मुलाला आयुष्यंभर हात देवुन, पदरात घेणारी आई, आज मुलाच्या भितीनंच थरथर कापत होती.... !
मला वाईट वाटलं... !
मी म्हणालो, 'मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊया का ?'
हातातल्या पिशवीशी सुरकुतलेल्या हातांनी चाळा करत ;खाली बघत,डोळ्यात पाणी आणून ती माऊली म्हणाली,"नको रे बाळा,पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर,पोलीस त्याला खूप मारतील...
माझ्या लेकराला कुणी मारलेलं मला नाही सहन होणार ...! ती पुन्हा रडायला लागली…म्हातारीची ही वाक्यं ऐकुन मीच गलबललो... आयला,म्हातारे तु मला रडवलंस म्हणत, आता मीच तीच्या गळ्यात पडलो... स्वतः इतक्या विपन्नावस्थेत असुनही ती माझ्या पाठीवर सुरकुतलेला हात फिरवत धीर देत म्हणाली.... उगी ... उगी... तु का रडतोहेस बेटा... ? तुला काही त्रास आहे का ? सांग हो मला.... !
ती पुन्हा आई झाली होती ... आणि मी नुकतंच जन्मलेलं बाळ... ! सुरकुतलेला हा हात म्हणजे... हजार चिंध्या एकत्र करुन,टाके मारुन शिवलेली "वाकळ" वाटली मला... जगातली सारी ऊब या वाकळीत एकवटलेली असते... !
रजई,ब्लँकेट,शाॕल ही नुसती थेरं आहेत...
पांघरायला वाकळ आणि डोक्यावर म्हातारीचा सुरकुतलेला हात हेच ख-या श्रीमंतीचं लक्षण..!
आ धार देते ती आई !
आ पलं म्हणते ती आई !!
आ सुदे रे म्हणत पोटात घेते ती आई !!!
'ई' श्वराची 'आ' ठवण होवुच देत नाही ती आई..! पोटात घेते ती "माती"... पोटातुन जन्म देते ती "माता" फरक एका वेलांटीचा !
इतका त्रास देणाऱ्या मुलाला पोलीस मारतील या कल्पनेनं ती माऊली शहारली.मी पोलीस कंप्लेंट करणार नाही,याचं तीनं वचन घेतलं माझ्याकडुन तरीही म्हणाली,नकोच माझा त्रास त्यांना,जगुदे सुखानं...जमलं तर कर सोय माझी...नाहीतर मारुन टाक..तीने मला पर्यायच नाही ठेवला..!
आता कुणाला फोन करू मला काही कळेना !
या काळात तीला कुणी स्विकारणार नाही,मला माहित होतं.... ! मला छोटा भाऊ समजणाऱ्या एक ताई आहेत,त्या परभणी मध्ये एक छोटासा वृद्धाश्रम चालवतात. त्यांना भीत-भीत फोन लावला.त्यांनी हो म्हणण्याची अपेक्षाच नव्हती,परंतु आजीची सर्व परिस्थिति ताईला सांगितली.वर आजीशी व्हिडिओ कॉल वर बोलणं करून दिलं.
ताईला म्हणालो, 'या आजीशी आजच ओळख झालीये माझी... पण हिच्यात मला माझी आई दिसते...या वयात मुलगा तीला मारतो,या माराने कदाचित तीचा जीव जाईल.... आणि माराने नाही गेला तर उपासमारीनं जाईल,उपासमारीनंही नाही गेला तर सुनेच्या टोमण्यांनी तीचा जीव जाईल... !
मला ती जगायला हवी आहे...,मरेल तेव्हा मुलगा म्हणुन अंत्यसंस्कार मीच करणार आहे !'
हे बोलणं ऐकतानाच या माझ्या ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
आजीशी बोलणं झाल्यावर काहीही विचार न करता ताई मला म्हणाल्या,'दादा,आईला पाठवून दे लवकरात लवकर परभणीला...तू जर तिला आई म्हणत असशील तर माझी सुद्धा ती आईच झाली की रे ! आणि आपण आपल्या आईला असं रस्त्यावर कसं सोडणार ? तीला सांग, तुला एक मुलगी पण आहे म्हणावं... ! मी आपली आई म्हणून सांभाळ करीन तिचा...!
मी मनातूनच ताईला साष्टांग नमस्कार घातला.!
सख्खा मुलगा सांभाळत तर नाहीच, उलट मारहाण करतो आणि ही कोण कुठली ताई केवळ माझ्या शब्दाखातर या आजीला आपली आई म्हणून आयुष्यंभर सांभाळण्याची प्रतिज्ञा करते... !
ताई तुला प्रणाम माझा... !
आजी काल मंगळवारी मला भेटली.
आज आणि उद्या म्हणजे बुधवार,गुरुवार दोन दिवस सर्व कागदपत्रे, पोलीस स्टेशन आणि इतर काही कायदेशीर बाबी पुर्ण करण्यात मला दोन दिवस तरी लागतीलच.
शेवटचे दोन दिवस आजी त्या घरात कसेतरी काढ असं तिला सांगून आलोय.आईला नेल्यावर,भविष्यात दारुड्या मुलाने आणि सुनेने माझ्याविरुद्ध काही कांगावा करायला नको म्हणून त्या मतदारसंघातील नगरसेवक यांनाही मध्यस्थ म्हणून मी घेतलं आहे.या शुक्रवारी दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी आठ वाजता आजीला मी परभणीला पाठवून देत आहे.सायंकाळी ती परभणीला पोचेल. सौ सुनीताताई अहिरे या माझ्या ताई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परभणी मध्ये वृद्धाश्रम चालवत आहेत.यांच्याचकडे आपण आजीची सोय करणार आहोत. आजीला भेटुन मी हे सर्व सांगितलं...म्हणालो, 'म्हातारे मज्जा आहे तुझी,आता कायम लेकीकडं राहशील...!'
आजी म्हणाली,'अरे लेकीकडं पहिल्यांदाच जाणार मी, तीला साडी चोळी नको करायला ? जावईबापुलाही काहीतरी द्यावे लागेल... अधिक मास चालु आहे... तु काय म्हणतोस ?'
दात नसलेल्या तोंडातुन आजी हरखुन बोलत होती.
मी गंमतीनं म्हणालो,'म्हातारे,न पाहिलेल्या लेकीला साडीचोळी, न पाहिलेल्या जावयाला अधिक महिन्याचं काहितरी गिफ्ट... आणि तुझ्या समोर उभ्या असलेल्या लेकाला काय ?'
यावर ती आवेगानं माझ्या जवळ आली आणि माझं डोकं स्वतःच्या खांद्यावर टेकवत म्हणाली, 'माज्या सोन्या तुला अखंड आशिर्वाद ... !'
सुरकुतलेला तो हात आणि मळलेला तो पदर माझ्या अश्रुंनी भिजला नसता तरच नवल..! हा अखंड आशिर्वाद डोक्यावर घेवुन मी वाट बघतोय शुक्रवार च्या संध्याकाळची..!
याच संध्याकाळी आजी सुनिताताई ला भेटणार आहे...संध्याकाळीच दिवस आणि रात्रीची गळाभेट होत असते... मी ही वाट बघतोय,माय लेकींच्या गळा भेटीची... ! सरत चाललेला सुर्य आणि उगवणारा चंद्र भेटतील याच दिवशी... !
मी ? .... मी कोण... ?
मी फक्त अखंड आशिर्वाद घेतलेला....
साक्षीदार,या गळाभेटीचा !
बुधवार २३ सप्टेंबर २०२०
डाॕ.अभिजीत सोनवणे - भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर
डाॕक्टर फाॕर बेगर्स