* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मी थोडक्यात बचावलो.. I narrowly escaped..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/१२/२३

मी थोडक्यात बचावलो.. I narrowly escaped..

माझा हा ब्रिजवरचा पहारा चालू असतानाच्या काळात इबॉटसन आणि त्याची पत्नी जीन पौरीवरून रुद्रप्रयागला आले.बंगल्यात इतक्या जणांची सोय होणं शक्य नसल्याने मी माझा बाडबिस्तरा आवरला आणि यात्रामार्गाच्या पलीकडे डोंगरावर थोडं उंचावर माझा चाळीस पौडांचा तंबू ठोकला.ज्या जनावराने आसपासच्या सर्व गावात कित्येक दरवाजांवर ओरखडे काढून दरवाजे फोडण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यापासून संरक्षण देण्यासाठी तसा हा तंबू अगदीच असमर्थ होता म्हणून मी आणि माझी माणसं त्या तंबूच्या भावती काटेरी कुंपण घालण्याच्या कामाला लागलो.या जागेवर सावली धरणारं एक भलं थोरलं पियरचं झाड तिथे उभं होतं.त्याच्या फांद्या आमच्यामध्ये येत असल्याने मी माझ्या माणसांना ते तोडायला सांगितलं.झाड अर्धवट तोडल्यावर माझ्या लक्षात आलं की दिवसा ऐन उन्हाच्या काळात आम्हाला सावलीच मिळणार नव्हती.त्यामुळे मी माझ्या माणसांना सांगितलं की सगळं झाड तोडण्याऐवजी फक्त मध्ये येत असलेल्या फांद्याच तोडा.तंबूवर पंचेचाळीस अंशाचा कोन करून झुकलेलं हे झाड कुंपणाच्या पलीकडे होतं.रात्री जेवणं झाल्यावर कुंपणाच्या प्रवेशद्वारामध्ये काटेरी झुडूपं बसवताना अचानक माझ्या लक्षात आलं की जर बिबळ्या झाडावर चढून तंबूवर आलेल्या फांद्यावर आला तर त्याला तंबूत शिरणं सहज शक्य होतं.पण रात्र बरीच झाली होती आणि आत्ता लगेच तरी काहीच करता येण्यासारखं नव्हतं.आजची एक रात्र जर बिबळ्याने आम्हाला सूट दिली तर उद्या मी ते काम करू शकणार होतो.आम्ही एकूण आठ जण होतो.माझ्या माणसांसाठी माझ्याकडे तंबू नव्हते.माझा विचार होता की ते इन्स्पेक्शन बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये इबॉटसनच्या माणसांबरोबर झोपतील.पण याला त्यांनी नकार दिला.त्यांचं म्हणणं असं की तंबूत जेवढा मला धोका आहे तेवढाच त्यांना असू शकतो.माझा आचारी (त्या रात्री मला कळलं की तो खूप घोरायचा) हाताच्या अंतरावर माझ्या शेजारी झोपला होता व त्याच्या पलीकडे एकमेकांना चिकटून मी नैनितालहून आणलेले सहा गढवाली नोकर झोपले होते.आमच्या संरक्षणव्यवस्थेतील कच्चा दुवा म्हणजे ते झाड होतं... मी त्याचाच विचार करत झोपेच्या अधीन झालो. त्या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाश होता. जवळजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मला बिबळ्या झाडावर चढतानाचा आवाज ऐकायला आला. माझ्या बेडवरची भरलेली रायफल उचलून मी चटकन उठलो आणि काटेकुटे लागू नयेत म्हणून पायात स्लीपर्स सरकवल्या.तेवढ्यात अर्धवट तोडलेल्या झाडाच्या दिशेने फांद्या तुटल्याचा जोरदार आवाज आला आणि लगेचच माझा आचारी 'बाघ बाघ' असा ओरडला.दोन ढांगांमध्ये मी तंबूच्या बाहेर आलो पण वळून रायफल रोखेपर्यंत तो बिबळ्या बांधावरून उतारा वरच्या एका शेतात दिसेनासा झाला. हे शेत साधारण चाळीस यार्ड रुंद होतं आणि ते लागवडीखाली नव्हतं.त्या कुंपणाच्या प्रवेशद्वारामधलं झुडुप उचकटून मी त्या शेताकडे धावलो आणि तिथे उभं राहून समोरची, झाडं-झुडपाचं जंगल माजलेली आणि मोठाले खडक असलेली संपूर्ण टेकडी नजरेखालून घातली.पण दूर डोंगरावरून आलेल्या एका कोल्ह्याच्या अलार्म कॉलवरून मला कळलं की सावज आता रेंजच्या बाहेर गेलंय!


आचाऱ्याने मला नंतर सांगितलं की तो उताणा झोपला असताना त्याला फांदी तुटल्याचा आवाज आला आणि जसे त्याने डोळे उघडले तसं त्याने झडप घालण्याच्या पवित्र्यात असलेल्या बिबळ्याच्या डोळ्यातच पाहिलं! दुसऱ्याच दिवशी आम्ही ते झाड संपूर्ण तोडून टाकलं आणि कुंपण मजबूत केलं.त्यानंतर काही आठवडे आम्ही तिथे मुक्काम करूनही आमची झोपमोड कधीच झाली नाही.


जिन ट्रॅप ..


आसपासच्या गावातून बिबळ्याने दरवाजे फोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या काही बातम्या आणि पायवाटांवरचे त्याचे पगमार्कस यावरून समजत होतं की तो आसपासच कुठेतरी आहे.इबॉटसन आल्यानंतर काही दिवसातच आम्हाला रुद्रप्रयागपासून दोन मैल अंतरावरच्या एका गावातून बिबळ्याने एक गाय मारल्याची खबर मिळाली.मी त्या दिवशी गवताच्या गंजीवर बसून ज्या ठिकाणी रात्र जागून काढली त्या ठिकाणापासून अर्धा मैलावर हे गाव होतं.गावात आल्यानंतर आम्हाला दिसलं की बिबळ्याने एका छोट्या घराचा दरवाजा तोडून आत बांधलेल्या काही गायींपैकी एक गाय मारली होती आणि दरवाजातून बाहेर नेता न आल्याने तिथेच सोडून देऊन थोडंफार मांस खाऊन गेला होता.हे एका खोलीचं घर गावाच्या मध्यभागीच होतं.जरा निरीक्षण केल्यानंतर कळलं की शेजारच्याच घराच्या भिंतीला थोडं भगदाड पाडलं तर आम्हाला भक्ष्य दिसू शकणार होतं.या घराच्या मालकाचीच ती गाय असल्याने, आमची योजना त्याने आनंदाने मान्य केली. बरोबर आणलेली सॅण्डविचेस खाऊन,वर मस्तपैकी चहा ढोसून झाल्यावर आम्ही त्या घरात जागा घेतली.आम्ही ती संपूर्ण रात्र जागून काढली पण बिबळ्या काही आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला गावकऱ्यांनी गाव फिरवून आणलं आणि गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या घरांमध्ये शिरायच्या प्रयत्नात दारं खिडक्यांवर बिबळ्याने उमटवलेले ओरखडे दाखवले.त्यातल्या त्यात एका दरवाजावर सर्वात जास्त आणि खोल नख्यांच्या खुणा होत्या; हाच तो दरवाजा... जो तोडून त्या अनाथ मुलाचा बळी गेला होता.एकदोन दिवसांनी अजून एक खबर आली की बंगल्यापासून काही अंतरावर डोंगरावरच्या एका गावात बिबळ्याने अजून एक गाय मारली आहे.

यावेळीही त्याने एका घरात गाय मारली होती आणि तिला दरवाजापर्यंतच ओढून नेऊन काही भाग खाल्ला होता. दरवाजाच्या बरोबर समोर फक्त दहा यार्डावर गवताची एक सोळा फूट उंचीची गंजी नीट रचून जमीनीपासून दोन फूट उंच एका मोठ्या लाकडी फलाटावर ठेवली होती.

आम्हाला खबर सकाळी अगदी लवकर मिळाली होती त्यामुळे तयारीला संपूर्ण दिवस मिळत होता आणि आम्ही जे 'मचाण' त्या दिवशी बांधलं ते आजपर्यंत बांधल्या गेलेल्या मचाणांमध्ये सर्वात चांगलंच नव्हे तर,सर्वात कलात्मकही होतं.


सर्वात आधी आम्ही ती पूर्ण गंजी सोडवली आणि फलाटाच्या चारही बाजूंनी बांबू ठोकले. याच बांबूच्या आधाराने,खालच्या फलाटाच्या दोन फूटावर दुसरा एक फलाट तयार केला.नंतर गंजी परत रचून दोन इंच मेशवायर नेट गंजीभोवती पांघरली;फक्त खालचा प्लॅटफॉर्म व जमीन यांच्यामधली जागाच मोकळी सोडली. त्यानंतर जाळीच्या भोकांमधून गवतकाडी घालून पसरून ठेवली आणि आता ही गंजी अगदी पूर्वीसारखी दिसायला लागली.हे काम इतकं बेमालूम झालं होतं की दोन दिवस गावात नसलेला त्या गंजीचा दुसरा भागीदार जेव्हा तिथे आला तेव्हा वर बांधलेला दुसरा प्लॅटफॉर्म दाखवेपर्यंत त्याचा विश्वासच बसत नव्हता की ह्या गंजीवर काही काम झालेलं आहे.सूर्यास्ताच्या सुमारास मोकळ्या ठेवलेल्या जागेतून सरपटत आम्ही आमच्या 'मचाणा'त शिरलो आणि मागचं प्रवेशद्वार बंद करून टाकलं.इबॉटसन माझ्यापेक्षा थोडा बुटका आहे त्यामुळे त्याने वरच्या प्लॅटफॉर्मवर जागा घेतली. त्यानंतर आम्ही दोघांनी आमच्या समोरच्या गवतात बंदुकांसाठी एक बीळ पाडलं.एकदा बिबळ्या आल्यानंतर एकमेकांशी कोणताही संपर्क ठेवणं शक्य नसल्यामुळे आम्ही ठरवून टाकलं की ज्याला प्रथम बिबळ्या दिसेल त्याने शॉट घ्यावा.रात्री टिपूर चांदणं असल्याने आम्हाला दोघांनाही शूटिंग लाईटची गरज नव्हती.रात्रीची जेवणं झाल्यानंतर सर्व काही चिडीचिप झालं आणि साधारण दहा वाजण्याच्या सुमारास आमच्या मागच्या डोंगरावरून बिबळ्या येत असलेला मला ऐकायला आला.गंजीजवळ आल्यावर तो एकदोन क्षण स्तब्ध उभा राह्यला आणि नंतर मी बसलेल्या प्लॅटफॉर्मच्या खालून सरपटत यायला सुरुवात केली.माझ्याबरोबर खाली... त्याचं डोकं व माझी बैठक यामध्ये फक्त लाकडाच्या फळीच्या जाडी एवढंच अंतर उरलेलं असताना तो परत थांबला... आणि परत एकदा सरपटत पुढे जायला सुरुवात केली.आता अगदी एक दोन सेकंद... की त्याचं डोकं प्लॅटफॉर्मच्या बाहेर येणार आणि मला तीन-चार फूटावरचा शॉट मिळणार अशी मी अपेक्षा करत असतानाच माझ्या वरच्या प्लॅटफॉर्मचा मोठ्ठा आवाज झाला आणि त्याचक्षणी बिबळ्या उजव्या बाजूने बाहेर सटकला व आलेल्या मार्गाने पसार झाला.मी आत असल्याने मला तो एकदाही दिसला नव्हता.पायात पेटके आल्याने इबॉटसनने थोडी जागा बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नातच तो आवाज झाला होता.या घटनेची भीती घेतल्याने बिबळ्याने ते भक्ष्य कायमचं सोडून दिलं आणि दुसऱ्या रात्री तो परत आला नाही.दोन दिवसानंतर रुद्रप्रयाग बाजाराच्या वरच्या अंगाला तीनशे चारशे यार्डावर आणखी एक गाय मारली गेली.या गायीचा मालक एका खोलीच्या घरात राहत होता.इकडच्या तिकडच्या लाकडी फळ्या वापरून केलेल्या पार्टीशनने त्याने त्या खोलीचे स्वयंपाकघर व बैठकीची खोली असे दोन भाग पाडले होते.तो माणूस त्या दिवशी स्वयंपाकघराचं दार बंद करायला विसरला होता.रात्री स्वयंपाकघरातून आलेल्या आवाजाने तो जागा झाला तर त्याला चंद्रप्रकाशात भिंतीच्या लाकडी फळ्यांच्या फटीमधून बिबळ्या दिसला.तो एकामागोमाग एक फळी उचकटायचा प्रयत्न करत होता आणि इकडे हा माणूस घामाघूम होऊन थरथरत होता. शेवटी काही जमत नाहीये असं बघून बिबळ्याने नाद सोडला व घराशेजारच्या गोठ्यात गव्हाणीमध्ये चरत असलेल्या गायींपैकी एकीला त्याने मारलं,दावे तोडले आणि चांगला ताव मारल्यावर तिला काही अंतर ओढून नेऊन तिथेच सोडून दिलं.गाय जिथे पडली होती त्याच्याजवळ डोंगराच्या अगदी कडेला एक बऱ्यापैकी मोठं झाड होतं व त्याच्या फांद्यावर एक मोठी गंजी रचून ठेवली होती.याच नैसर्गिक मचाणावर बसायचं आम्ही ठरवलं.या झाडापासून खाली सरळ दोनशे-तीनशे फूट कडाच होता.नरभक्षकाला मारण्यात मदत करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शासनाने

आमच्यासाठी एक जिनट्रॅप पाठवला होता.पाच फूट लांब आणि चाळीस किलो वजनाचा हा सापळा म्हणजे एक भीतीदायक प्रकरण होतं. तीन इंची लोखंडी दात असलेल्या या सापळ्याचा जबडा दोन ताकदवान स्प्रिंगमुळे बंद होत असे व या स्प्रिंग दाबून ठेवण्यासाठी दोन दोन माणसं लागत.गायीला तिथे टाकल्यानंतर बिबळ्या पायवाटेवरून चाळीस यार्ड रूंदीच्या एका शेतामधून जाऊन एका तीन फूटी बांधांवरून उडी मारून पुढचं शेत ओलांडून गेला होता.ह्या शेताच्या पलीकडे दाट झुडपी जंगल असलेली टेकडी होती.वरच्या आणि खालच्या शेतांमधल्या या तीन फूटी बांधाच्या पायाशीच आम्ही हा सापळा लावला व त्याने बरोबर त्या सापळ्यावरच पाय ठेवावा म्हणून पायवाटेच्या दोन्ही बाजूला आम्ही काटेरी झुडुपांच्या फांद्या पसरून ठेवल्या.

सापळ्याच्या एका बाजूला अर्धा इंच जाडीची एक साखळी होती व त्याच्या टोकाला ३ इंच व्यासाची एक लोखंडाची कडी होती.आम्ही एक भक्कम लाकडी खुंट या कड्यातून घालून जमीनीत घट्ट ठोकून टाकला आणि सापळा जमीनीला पक्का जखडून ठेवला.


अशी सर्व साग्रसंगीत व्यवस्था झाल्यावर जीन इबॉटसन माझ्या माणसांबरोबर बंगल्यावर परतली नंतर मी आणि इबॉटसन झाडावर चढून गंजीवर बसलो.एक काठी आमच्यासमोर टांगून त्याच्यावरून काही गवत सोडून आम्ही चांगलं लपण तयार केलं.आता आम्ही आरामात वाट पहात बसलो.मनात खात्री होती की यावेळेला तरी बिबळ्या आमच्या जाळ्यात अडकणारच !

संध्याकाळी आभाळ गच्च भरून आलं.रात्री नऊपर्यंत तरी चंद्र उगवण्याची शक्यता नसल्याने आम्हाला इलेक्ट्रीक लाईटवरच अवलंबून राहावं लागणार होतं.हा शूटींग लाईट म्हणजे एक फारच अवघड प्रकरण होतं.पण यावेळी मीच शॉट घ्यावा असं इबॉटसनचं म्हणणं पडल्याने मी तो माझ्या रायफलला जोडला.अंधार पडला आणि साधारण अर्ध्या तासाने अचानक गायीच्या दिशेकडून आम्हाला एकापाठोपाठ एक अशा डरकाळ्या ऐकायला आल्या... शेवटी बिबळ्या सापळ्यात फसला होता. लाईट लावल्यावर मला दिसलं की पायाला लटकणारा ट्रॅप घेऊन तो बिबळ्या मागेमागे जातोय.मी घाईघाईतच माझ्या ०.४५० रायफलचा शॉट घेतला.ही बुलेट साखळीला लागली त्यामुळे त्या साखळीपासून ट्रॅप अलग झाला.आता जमीनीपासून ट्रॅप मोकळा झाल्याने बिबळ्याने पायाला लटकणाऱ्या ट्रॅपसकट मोठमोठ्या झेपा घेत शेत ओलांडलं... मागोमाग माझ्या डाव्या बॅरलमधली बुलेट व इबॉटसनच्या शॉटगनची दोन काडतुसं फायर केली गेली.पण हे सर्व नेम चुकले.माझ्या रायफलमध्ये बुलेट भरताना माझ्याकडून काहीतरी झालं असावं पण तो लाईट काही केल्या लागेना.बिबळ्याच्या डरकाळ्या आणि पाठोपाठ बंदुकांचे चार आवाज ऐकून रुद्रप्रयाग बाजारमधले तसेच आसपासच्या छोट्या गावांमधले लोक घरातून पाईनच्या मशाली घेऊन बाहेर पडले आणि चहू‌बाजूंनी त्या ठिकाणी येऊ लागले.जास्त जवळ येऊ नका असं ओरडून सांगण्याचा काहीही फायदा नव्हता कारण त्या सर्वांचा मिळून इतका गोंगाट होत होता की त्यांना आमच्या सूचनाही ऐकायला येणं अशक्य होतं.मी हातात रायफल असताना घाईघाईत झाडावरून उतरलो तर इबॉटसननेही पटकन् पेट्रोल लॅम्प पेटवला आणि पंप केला.हा लॅम्प आम्ही झाडावर आमच्याबरोबरच नेला होता. लांब दोराच्या सहाय्याने इबॉटसनने तो जमीनीवर सोडला व स्वतः उतरून मला येऊन मिळाला.त्यानंतर आम्ही दोघंही बिबळ्याच्या दिशेने जायला लागलो.शेताच्या मध्यभागी एक खडक वर आल्यामुळे उंचवटा तयार झाला होता.इबॉटसन हातातला कंदील उंच धरून आणि मी रायफल खांद्याला लावून त्या शेतातून चालत हळूहळू आम्ही त्या उंचवट्याच्या जवळ येऊ लागलो.उंचवट्याच्या पलीकडे एक खोलगट जागा होती आणि त्या खड्ड्यात आमच्याकडेच तोंड करून तो बिबळ्या गुरगुरत झेप घेण्याच्या तयारीत मुरून बसला होता.माझी बुलेट त्याच्या डोक्यात घुसते न घुसते तोच आम्हाला सर्व बाजूंनी माणसांचा वेढा पडला आणि ते लोक बिबळ्याच्या धडाभोवती अक्षरशः आनंदाने नाचायला लागले.


माझ्या समोरचं जनावर आकाराने खूपच मोठं होतं,आदल्या दिवशी त्याने पार्टिशन तोडून आतल्या माणसाचा बळी घ्यायचा प्रयत्न केला होता आणि डझनभर माणसं ज्या भागात मारली गेली होती तिथेच तोही मारला गेला होता;तो नरभक्षकच असणार अशी खात्री पटण्यासारखी सर्व कारणं होती तरीही मला आतून वाटत होतं की मी त्या बाईच्या प्रेताजवळ ज्या बिबळ्यासाठी रात्रभर जागलो होतो तो हा नव्हे! हे खरं होतं की एका अंधाऱ्या रात्री मी त्याची फक्त पुसटशी बाह्याकृती पाहिली होती पण तरीही मला आतून वाटतं होतं की बांबूला बांधलं जाणारं ते जनावर म्हणजे 'रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या' नव्हे.इबॉटसन पतीपत्नी,त्यांच्यामागे बिबळ्याचा मृतदेह बांबूला बांधून घेऊन जाणारी माणसं अशी आमची वरात रुद्रप्रयाग बाजारावरून बंगल्याकडे निघाली.त्या सर्वांमध्ये मी एकच माणूस असा होतो की ज्याचा 'रुद्रप्रयागचा नरभक्षक' संपलाय यावर विश्वास नव्हता. डोंगर उतरताना माझ्या मनात पूर्वी घडलेल्या एका घटनेबद्दल विचार येत होते. ही घटना मी लहान असताना आमच्या हिवाळी निवासस्थानापासून जवळच घडली होती व नंतर काही वर्षांनी 'Brave Deeds' (किंवा बहुतेक 'Bravest Deeds' असावं) या पुस्तकात तिचा उल्लेखही केला गेला होता.या घटनेचे दोन नायक होते.इंडियन सिव्हील सव्हींसचा स्मिटन व फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ब्रेडवूड.

रेल्वेपूर्वीचा हा काळ होता.हे दोघं एका अंधाऱ्या वादळी रात्री मुरादाबादहून कालाढुंगीला डाकगाडीने चालले होते.रस्त्याच्या एका वळणावर त्यांच्या गाडीवर एका पिसाळलेल्या हत्तीने हल्ला केला.गाडीवान आणि दोन घोड्यांना ठार मारून त्याने गाडी उलथीपालथी करून टाकली.ब्रेडवूडकडे रायफल होती,ती केसमधून बाहेर काढून,जोडून लोड करत असताना स्मिटन गाडीवर चढला व त्याने सॉकेटमधून खेचून एक उरलासुरला दिवा मिळवला.अतिशय मंद प्रकाश देणारा हा दिवा हातात उंच धरून स्मिटन त्या हत्तीकडे चालत गेला आणि ब्रेडवूडला शॉट घ्यायला सोपं जावं म्हणून हत्तीच्या डोक्यावर प्रकाश पडेल असा धरला.मला हे मान्य आहे की पिसाळलेला हत्ती आणि बिबळ्या यात फरक आहे.पण... स्वतःच्या सुरक्षेसाठी संपूर्णपणे जोडीदारावर अवलंबून असताना जखमी व पिसाळलेल्या हत्तीला,मृत्यूची पर्वा न करता डोक्यावर कंदील धरून सामोरं जाणं,यासाठी निधडी छातीच हवी! गेल्या कित्येक वर्षात प्रथमच आज रुद्रप्रयाग बाजारातला प्रत्येक दरवाजा रात्र असूनही उघडा होता व बायकामुलं उंबरठ्यावर उभी होती.भोवती उभं राहून पोरांना नीट पाह्यला मिळावं म्हणून दर पावलागणिक बिबळ्याचं धूड जमीनीवर ठेवावं लागत असल्यानं आमची वाटचाल मंदगतीने चालू होती.

बाजाराचा रस्ता संपल्यावर सर्व माणसं गटागटानं घरी परतली आणि आमच्या माणसांनी विजयी वीराच्या थाटात बिबळ्याचं ते धूड बंगल्यावर आणलं.माझ्या कॅम्पवर येऊन हातपाय धुवून मी बंगल्यावर गेलो आणि मी व इबॉटसन तो बिबळ्या नरभक्षक असावा की नसावा यावर आपापली मतं मांडायला लागलो. शेवटी यातून काहीच निष्पन्न न निघाल्यामुळे आम्ही या निर्णयावर आलो की इबॉटसनला कामासाठी पौरीला जायचं असल्याने व मलाही इतक्या दिवसांच्या रुद्रप्रयागमधील वास्तव्यामुळे थकवा आल्याने दुसरा दिवस बिबळ्याची कातडी काढण्यात व वाळवण्यात घालवावा आणि तिसऱ्या दिवशी आपापल्या घरी निघावं. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून रात्रीपर्यंत त्या शेकडो माणसांनी आम्हाला बंगल्यावर येऊन भेट दिली व त्यातल्या बहुतेक लोकांनी तो नरभक्षकच आहे असं ठामपणे सांगितल्यामुळे इबॉटसन्सचंच म्हणणं खरं असल्याची त्यांना खात्री वाटू लागली.फक्त माझ्या विनंतीवरून दोन गोष्टी त्याने केल्या.'यापुढेही खबरदारीच्या उपाययोजना शिथिल करू नका' अशी सूचना त्याने सर्वांना दिली आणि शासनाला नरभक्षकाच्या शिकारीबद्दल लगेच टेलिग्राम करण्याचं टाळलं!


दुसऱ्या दिवशी पहाटेच प्रवासाला सुरुवात करायची असल्याने आम्ही सर्व लवकर झोपलो. सकाळी लवकर उठून 'छोटा हाजरी' (ब्रेकफास्ट) घेत असताना मला खाली रस्त्यावरून काही माणसांचे आवाज आले.


हे थोडंसं अनैसर्गिक वाटल्याने मी "आता यावेळी इथे काय करताय?" असं ओरडून विचारलं.मला पाहिल्यावर त्यातली चार माणसं डोंगर चढून थोडं वर आली आणि मला सांगितलं की त्यांच्या गावच्या पटवारीने त्यांना माझ्याचकडे एक महत्त्वाची खबर द्यायला पाठवलंय... चटवापिपल पुलापासून मैलभर अंतरावर अलकनंदाच्या पलीकडच्या बाजूला आणखी एका बाईचा बळी गेला होता! ०२.१२.२३ या लेखमालेतील पुढील लेख..