शइकडे प्लेटो आदर्शभूत राज्याची स्वप्ने खेळवीत असता,
तिकडे ग्रीक शहरे शुद्र व निरर्थक युद्धांनी व क्षुद्र वैरांनी स्वतःचा नाश करून घेत होती! अथेन्स विरूद्ध कॉरिन्थ,
कॉरिन्थ विरुद्ध थीब्स विरुद्ध स्पार्टा व स्पार्टी विरुद्ध अथेन्स असा चक्रव्यूह होता,परस्परद्वेष व परस्पर संशय यांचे हे असे कधी न संपणारे रहाटगाडगे,द्वेषमत्सराचे हे चक्र जणू गमतीने फिरत होते.विषारी,मारक असा हा खेळ खराच; पण त्यातच त्यांना जणू रस वाटत होता.
गोडी वाटत होती! बारीक- सारीक गोष्टीसाठीही ते एकदम युद्ध पुकारीत. युद्धही एक नित्याची,मामुली बाब बनली. उत्तमोत्तम माणसे रणांगणावर मरत होती.सारी ग्रीक संस्कृती विनाश पावणार असे दिसत होते. साऱ्या ग्रीक संस्कृतीवर गडप होण्याची वेळ आली होती.अथेन्समधील आयसॉक्रेटिससारख्या काही मुत्सद्दयांनी हा धोका ओळखला व आपल्या राष्ट्राचे प्राण वाचावेत,म्हणून ग्रीसचे एक संयुक्त संस्थान बनवावे असे त्यांनी सुचविले.
तो विचार उत्कृष्ट होता;परंतु तो प्रत्यक्षात यावा,ती योजना अंमलात यावी यासाठी ज्याची योजना करण्यात आली,तो माणूस योग्य नव्हता.चुकीच्या माणसाची निवड झाली.
मॅसिडोनियाचा राजा फिलिप्स याच्यावर हे संयुक्त संस्थान बनविण्याचे काम सोपविण्यात आले.मॅसिडोनिया म्हणजे ग्रीस देशाचा उत्तर भाग हा जरा रानटी होता.इतर भागांइतका सुसंस्कृत नव्हता.सर्व ग्रीकांचे एक संयुक्त राष्ट्र बनविण्यासाठी आयसॉक्रेटिसने दिलेले आमंत्रण त्याने स्वीकारले.फिलिप्सने मॅसिडोनियन लोकांची एक सेना उभारलेली होतीच;ती बरोबर घेऊन युद्धाने त्रस्त झालेल्या व कंटाळून गेलेल्या या द्वीपकल्पावर तो तुटून पडला व त्याने सारी स्वतंत्र ग्रीक शहरे जिंकून त्यांचे एक संयुक्त राष्ट्र बनविले.अशा रीतीने ग्रीक गुलामांचे हे संयुक्त राष्ट्र जन्माला आले.
राजा फिलिप हा अलेक्झांडरचा बाप.फिलिप सुशिक्षित;
पण जंगली मनुष्य होता.तो ग्रीक लोकांच्या ज्ञान-विज्ञानाचे कौतुक करी.त्याने त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.त्यांची संपत्ती लुटण्याला तो अधीर झाला.तो सायरसच्या नमुन्याचा योद्धा होता.तो युद्ध पुकारावयाला भिणारा नव्हता.तो स्वतः सैन्याबरोबर असे. त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती.त्याला सारे जग खेळवावयाला हवे होते.इराणवर हल्ला करण्यासाठी त्याने आधी ग्रीस हातात घेतला.तो ग्रीसमधून पर्शियावर उडी मारणार होता. साम्राज्ये निर्मिण्याची अपूर्व बुद्धिमत्ता असणाऱ्यांमध्ये फिलिप हा 'साम्रज्यांचा संस्थापक' या नात्याने अद्वितीय होता. त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर सर्वत्र त्याचा शब्द म्हणजे कायदा होता.एपिरसच्या राजाची मुलगी ऑलिम्पियस ही त्याची पत्नी. तिच्याच पोटी अलेक्झांडर जन्मला.ती धर्मवेडी होती.ती आपल्या नवऱ्याचा फार तिरस्कार करी व त्याचे जीवन करता येईल तितके दुःखी करणे,हा आपला धर्म मानी.तो चिडावा,
संतापावा,म्हणून ती म्हणे,"अलेक्झांडर माझ्या पोटचा असला तरी तो तुमचा नाही!तो एक देव पुत्र देवोद्भव आहे." या दंतकथेवर फिलिपचा विश्वास होता की नाही कोण जाणे,परंतु अलेक्झांडरचा मात्र मरेपर्यंत संपूर्ण नसला,तरी अर्धवट विश्वास होता. अलेक्झांडर अनेकदा आग्रहाने सांगे, "मी दैवी आहे- देवापासून जन्मलो आहे."
मॅसिडोनियाच्या राजाच्या राजवाड्यातील जीवनात सदोदित काही ना काही धर्मविधी चाललेले असावयाचेच;
त्यांत भांडणे, मारामाऱ्या,द्वेषमत्सर यांचेही मिश्रण असे.आई अलेक्झांडरला फूस देई व तो बापाचा अपमान करी.राजवाड्यात एकदा एक मोठी मेजवनी चालली होती,पिता व पुत्र दोघेही दारू पिऊन बेहोश झाले होते.
अलेक्झांडरने फिलिपचा अपमान केला,बाप मुलाला भोसकण्यासाठी धावला.पण सुरा नीट खुपसण्याइतकी शुद्ध त्याला नसल्यामुळे तो तोल जाऊनजमिनीवर पडला.आणि भावी आयुष्यात व्यभिचार, बदफैलीपणा व दिग्विजय करण्यास अलेक्झांडर वाचला.अशा वातावरणात अलेक्झांडर वाढला. पित्याने त्याला ग्रीक शिक्षण चांगले मिळावे म्हणून खटपट केली.त्याने मुलासाठी अती उत्कृष्ट व नामांकित शिक्षक जमविले.
कवी, तत्त्वज्ञानी,संगीतज्ज्ञ,वैय्याकरणी,अलंकार शास्त्रज्ञ,सारे राजवाड्यात येऊन अलेक्झांडरला सुसंस्कृत करू लागले,त्याला माणसाळवू लागले.कारण तो जरा रानवट होता.त्याला थोडी तरी माणुसकी यावी म्हणून हे सारे आचार्य खटपट करू लागले.या नामांकित शिक्षकांत जगप्रसिद्ध ॲरिस्टॉटल हा होता.ॲरिस्टॉटल म्हणजे विद्वत्तेचे व ज्ञानाचे आश्चर्यकारक भांडार ! एका लहानशा डोक्यात इतक्या विद्या मावत तरी कशा? शंभर माणसांचे ज्ञान त्याच्या एकट्याच्या डोक्यात होते.तो सर्व विषयांवर सारख्याच अधिकाराने लिहू व बोलू शके राजकारण,
नाटक,काव्य,सृष्टिज्ञान,वैद्यक,मानसशास्त्र,इतिहास,तर्क,ज्योतिर्विद्या,नीतिशास्त्र,गणित,अलंकार
शास्त्र,प्राणिशास्त्र थोडक्यात बोलावयाचे तर सर्व ज्ञाने व विज्ञाने त्याच्यासमोर हात जोडून उभी राहत.तरीही त्याला अलेक्झांडरवर फारसा परिणाम करता आला नाही.
इतकेच काय;पण राजघरण्यातील कोणावरच त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.फिलिप, अलेक्झांडर,
ऑलिम्पिस,ही तीनही माणसे 'ग्रीक संस्कृतीची पूजक' म्हणून मिरवीत;परंतु ते नुसते सोंग होते.ग्रीक संस्कृतीच्या झिरझिरीत बुरख्याखाली त्यांचा रानवटपणा लपलेला होता. ही तीनही माणसे अंतरंगी रानमांजरासारखीच दुष्ट व हलकट होती.फिलिप पर्शियावर स्वारी करावयास निघणार,तोच त्याचा खून झाला. त्याच्या पत्नीच्याच चिथावणीमुळे तो खून झाला असे म्हणतात.मृत सम्राटाला जो मान दिला गेला होता,तोच मारेकऱ्यांच्याही प्रेतास मिळावा, तितक्याच थाटाने व समारंभाने मारेकऱ्याचाही देह पुरला जावा,असा हट्ट तिने धरला होता.
फिलिप मेला,तेव्हा अलेक्झांडर वीस वर्षांचा होता.
कसलेल्या व शिस्तशीर सैन्याचा तो मालक होता.
पूर्वेकडील देशांवर तुटून पडावयाला सारी सिद्धता होती.सैनिक अपूर्व अशा सेनानीची जणू वाटच पाहत होते.ज्याला कल्पनाशक्ती व प्रतिभा आहे,अहंकारआहे,
साहसी वृत्ती आहे.परिणामांचा विचारही न करता जो बेछूटपणे पुढे जाईल.सर्व जगावर स्वामित्व मिळविण्याचे कार्य हाती घेण्याइतपत ज्याच्याजवळ हिंमत व कौशल्य आहे,असा सेनापती सैन्याला हवा होता. अशा सेनापतीच्या नेतृत्वाखाली वाटेल तिथे जावयाला ते तयार होते.हे सारे गुण तर अलेक्झांडरच्या ठायी होतेच,पण यांशिवाय आणखीही पुष्कळ होते.आपल्या कर्तृत्वाविषयी अद्यापि कोणाला काही शंका असेल,तर ती दूर करण्यासाठी तो एकदम उभा राहिला. मॅसिडोनियाच्या उत्तरेकडील जाती-जमातींना त्याने शरण यावयास लावले आणि नंतर मॅसिडोनियाचे जू झुगारून देऊन पुन्हा स्वंतत्र होऊ पाहणाऱ्या इतर ग्रीक शहरांवर तो विजेसारखा चालून गेला.फिलिपच्या मरणाची वार्ता ऐकून ही शहरे बंड करून उठली होती. अलेक्झांडरने थीब्स शहराला वेढा घातला व फारशी अडचण न पडता ते जिंकून घेतले. आपल्या रक्ताळ मुठीचा इतरही सर्व ग्रीक लोकांना कायमचा धाक बसावा म्हणून त्याने थीब्स शहराचा संपूर्ण विध्वंस केला,शहरातील सहा हजार लोकांस ठार मारले व तीस हजार लोकांना गुलामकरून बाजारात विकले.
नंतर तो दक्षिणेकडच्या ग्रीक राज्यांकडे वळला. जिथे जिथे तो जाई,तिथे तिथे त्याच्याभोवती खुशामत्ये गोळा होत,त्याची खोटी स्तुती करीत, कोणी त्याला भेटी देत.
बंडखोर ग्रीकांना प्रायश्चित्त मिळालेच होते,त्यामुळे नीट धडा शिकून त्यांनी अलेक्झांडर हाच आपला पुढारी अशी घोषणा केली व ते त्याच्या पूर्वेकडील विस्तृत प्रदेशावरच्या स्वारीत सामील झाले.अलेक्झांडरने ग्रीस देशात सर्वत्र विजय संचार केला.त्याला कोणीही कोठेच विरोध केला नाही असे नाही.तलवारीने विरोध करणारे जरी त्याला फारसे भेटले नाहीत,तरी निराळ्याच रीतींनी त्याला गप्प बसविण्याचे प्रकार काही ठिकाणी झाले,
अलेक्झांडरविषयी आपणास खरोखर काय वाटते हे त्याच्या तोंडावरसांगण्याइतपत धैर्य व स्वातंत्र्य असलेले काही लोक अद्यापि होते.अलेक्झांडर जेव्हा कॉरिन्थ येथे आला,तेव्हा वीराला शोभेसे त्याचे स्वागत झाले.हजारोंनी जयघोष केले.पण तिथे जमा झालेल्या स्तुतिपाठकांत त्याला डायोजिनीस दिसेना.
डायोजिनीस हा या जगात कशातही काही अर्थ नाही.सारे पोकळ व भोंगळ,दिखाऊ व व्यर्थ आहे असे मानणारा 'सिनिक' होता.कॉरिथ मधल्या एकाच माणसाला अलेक्झांडर किंमत देई,तो म्हणजे डायोजिनीस.त्यानेही आपली स्तुती करावयास यावे असे अलेक्झांडरला वाटत होते;पण तो वृद्ध पाखंडी आला नाही. कॉरिन्थजवळच्या एका खेड्यात तो शांतपणे व निश्चितपणे बसला होता.
जेत्यांचा गर्व व सम्राटांचा दिमाख दोहोंविषयी तो बेपर्वा होता, त्याला त्याचे काडीइतकेही महत्त्व वाटत नव्हते, तो मॅसिडोनियन सैन्याची ती प्रचंड व विजयी मिरवणूक पाहावयाला आला नाही की विजयी राजाचे दर्शन घडावे म्हणून त्याने धडपडही केली नाही.डायोजिनिस आपणाकडे येत नाही असे पाहून अलेक्झांडरनेच त्याच्याकडे जावयाचे ठरविले.डायोजिनीस एकटाच सूर्यप्रकाशात ऊन खात बसला होता.तिथे जाऊन मैत्रीची व उदारपणाची बतावणी करीत त्याने विचारले, 'मी तुम्हाला काय देऊ? तुमच्यासाठी मी करण्यासारखे काही आहे काय?" 'होय' तो वृद्ध व बेरकी डायोजिनीस म्हणाला,"एक गोष्ट तुम्ही खास करू शकाल; सूर्यप्रकाशाच्या व माझ्या दरम्यान तुम्ही उभे आहात,तेवढे दूर व्हाल तर बरे."
त्या म्हाताऱ्याच्या या उद्धटपणाबद्दल त्याला शासन न करता विचार चिंतन करण्यासाठी त्याला तिथेच सोडून अलेक्झांडर निघून गेला! ॲरिस्टॉटलचा शिष्य तो उगीच नव्हता झाला.तो आपल्या एका खुशामत्यास म्हणाला,"मी जर अलेक्झांडर नसतो तर डायोजिनीस होणे मी पसंत केले असते." या म्हणण्यावर उत्तर द्यावेसे डायोजिनीस याला वाटलेच असते,तर तो म्हणाला असता,"मी जर डायोजिनीस नसतो तर अलेक्झांडरखेरीज दुसरा कोणीही व्हावयाला मी तयार झालो असतो."
अलेक्झांडर अती महत्त्वाकांक्षी होता.त्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याच्या डोक्यातील सारे तत्त्वज्ञान पिटाळून लावले होते,इतर सारे विचारही पार हाकलून दिले होते.तो मागेपुढे पाहणारा नव्हता, तो बेछूट व बेदरकार असा केवळ सैतान होता! जेथे पाऊल टाकण्यासही इतरांस भय वाटे.तिथे तो खुशाल उडी घेई व निःशंकपणे घुसे,जे सर्वस्वी अशक्य वाटे,त्याबाबतही तो जुगार खेळे व बहुतकरून विजयी होई.एखादी दुस्तर नदीही अलेक्झांडर सहज तरून जाई.एखाद्या दुर्लघ्य डोंगरावरून शत्रूला हुसकावयाचे असेल तर तो ती टेकडी चढून जाई व शत्रूला पळावयाला लावी.देव नेहमी त्याच्या बाजूने लढतात,अशी लोकांची समजूत झाली होती.
तो सरळ,साधाभोळा प्लुटार्क लिहितो, "पॅपिलियन किनाऱ्याजवळील समुद्राच्या लाटा तेथील खडकाळ टेकड्यांच्या अगदी पायथ्यापर्यंत येतात.पण अलेक्झांडरला नीट जाता यावे म्हणून या लाटाही मागे हटल्या व त्यांनी त्याला रस्ता दिला."
जेव्हा त्याने फोनिशियनांच्या टायर शहराला वेढा घातला.
तेव्हा तेथील लोकांनी शहरांतील अपोलो देवाचा पुतळा दोरखंडांनी जाम बांधून टाकला व 'आता कसा अपोलो अलेक्झांडरच्या बाजूला जातो,पाहू या' असे ते स्वतःशी म्हणाले.त्या देवाने आपणास सोडून अलेक्झांडरकडे जाऊ नये.म्हणून त्यांनी त्याला खिळे मारून जागच्याजागी खिळवून टाकले.पण प्लुटार्क सांगतो,
"टायरमधील जनतेचे ते सारे प्रयत्न झुगारून देऊन अपोलो अखेर अलेक्झांडरकडे गेला तो गेलाच.त्याचे शरीर दोरखंडांनी व खिळ्यांनी जखडून टाकण्यात आले असले तरी मन मोकळेच होते;त्यामुळे अपोलोचा आत्मा अलेक्झांडरच्या वतीनेच लढला."
अलेक्झांडर आश्चर्यकारक वेगाने आशियातील देश एकामागून एक घेत चालला.त्याला हे असंभाव्य विजय सारखे मिळत गेल्यामुळे त्याचे शत्रूही एक प्रकारच्या भोळसट आदराने त्याच्याकडे पाहू लागले.हा कोणी देवच आकाशातून पृथ्वीवर अवतरला आहे असे त्यांस वाटू लागले.अलेक्झांडर एकाच वेळी अनेक ठिकाणी असतो अशा कथा पसरू लागल्या. त्याच्याविरुद्ध शत्रूनी उभरलेल्या प्रचंड फौजा न लढता आपोआप मोडल्या.
शत्रूचे सैनिक लढनासेच झाले.त्या प्रचंड सेनांचा पराजय अलेक्झांडरने नाही केला,तर अलेक्झांडरविषयी त्यांना वाटणाऱ्या भीतीने केला..
अलेक्झांडर वेडा होता खराच,पण तो तेजस्वी वेडा होता.त्याचे वेडेपण क्षुद्र नव्हते;त्यातही एक प्रकारची ऐट होती.आपण देव आहोत असे त्यालाही वेडाच्या लहरीत वाटे.देव समजून आपली पूजाअर्चा लोकांनी करावी,असा आग्रह तो धरी.एकदा त्याच्या मांडीवर प्रहार झाला. तेव्हा इतरांच्या रक्ताप्रमाणेच आपलेही रक्त आहे असे पाहून त्याला विस्मय वाटला,कारण अमर अशा देवांच्या नसांतून जे दिव्य रक्त वाहते,तेच आपल्याही नसांत आहे अशी त्याची समजूत होती.लढाईच्या वेळी तो आकाशातील देवतांना आपल्या साहाय्यास बोलावी;तो त्यांना उद्देशून म्हणे,"मी तुमचा भाईबंद आहे,मी मर्त्य नाही,हे विसरू नका."त्याचे उत्कट व निष्ठावंत भक्तही त्याचा हा अहंकारी पागलपणा पाहून कधी कधी थक्क होऊन जात ! स्वतःच्या क्षुद्र अहंकाराच्या आरशात तो आपले रूप पाही.जगातल्या साऱ्या क्षुद्र व दुबळ्या लोकांमध्ये आपण ज्यूपिटर प्रमाणे शोभत आहोत असे त्याला वाटे.ज्यूपिटर म्हणजे ग्रीकांचा युद्धदेव,जणू, ग्रीकांचा देवेन्द्रच! अधिक पुढे जावयाचे नाही असे ठरविल्यावर
हिंदुस्थानातून जेव्हा तो परत फिरला,तेव्हा त्याने आपल्या घोड्यांचे लगाम,चिलखताचे तुकडे व शिरस्त्रांणांचे भाग मुद्दाम मागे ठेवले.या साऱ्या वस्तू हेतुपुरस्सरच आकाराने प्रचंड अशा बनविण्यास आल्या होत्या.त्या पाहून मॅसिडोनियन सैन्यांतील लोक व घोडे प्रचंड आकाराचे,अजस्र होते,असे हिंदुना वाटावे,असा हे अवशेष ठेवण्यात त्याचा हेतू होता.त्याला स्वतःचे सर्व काही पवित्र वाटे.
आशियातील एका नव्या शहराला त्याने आपल्या
घोड्याचे व दुसऱ्याला आपल्या कुत्र्याचे नाव दिले! त्याची ही आत्मप्रदर्शनाची बारात,त्याची ही जाहिरातबाजी तिरस्करणीय व किळसवाणी वाटते.जेव्हा त्याची विजयी सेना कार्यानियांतून जात होती,तेव्हा त्याने एका प्रचंड व्यासपीठावर मेजवानी मांडली होती! ते व्यासपीठ आठ घोडे ओढीत होते व त्यावर खान-पान चालले होते! त्या चालत्या व्यासपीठावर तो आपल्या खुशमस्कऱ्यांसह खात-पीत बसला होता. शहरामधून मूर्खाची ती मिरवणूक गेली,तेव्हा मॅसिडोनियन मेजवानीमधील पोकळ ऐट व क्षुद्र अवडंबर पाहून पौर्वात्य दिङ्मूढ झाले! हा मूर्खपणा की पराक्रम,हे त्यांना समजेना.
त्याची वृत्ती इंग्लंडमधील हवेप्रमाणे चंचल होती. त्याचा स्वभाव क्षणाक्षणास पालटे.एका क्षणात तो सौम्यपणा सोडून सैतानीपणा स्वीकारी! एकदा त्याच्या सेना वाळवंटातून जात असता एका शिपायाने आणून दिलेले पेय त्याने नाकारले;कारण,सेनापतीनेही सर्वसामान्य शिपायांबरोबर तहान सोसली पाहिजे,त्यांचे जीव तहानलेले व्याकूळ होत असता आपण पेय पिणे योग्य नव्हे,असे त्याला वाटले.पण पेय देणाऱ्या एका नोकराकडून त्याचा चुकून अपमान झाला. त्याबरोबर त्याने दोन्ही हातांनी त्याचे केस धरून त्याचे डोके जोराने भिंतीवर आपटले!त्याचे डोके ठिकाणावर असे,तेव्हा तो होमर वाची,नशेच्या भरात त्याने आपला प्रियतम मित्र क्लायटस याला ठार मारले,पण शुद्धीवर आल्यानंतर त्याला झालेला पश्चात्ताप त्याच्या दारूच्या धुंदीतील खुनशीपणाइतकाच तीव्र होता. स्तुती करणाऱ्यांना तो लुटीतील भाग देई.पण
कॅलिस्थेनिस नामक एक तत्त्वज्ञानी त्याची देव म्हणून पूजा करीना,म्हणून त्याने त्याला फाशी दिले! त्याचा सर्वांत मोठा डरायस नामक शत्रू मेला तेव्हा तो रडला.पण रोजची करमणूक म्हणून तो हजारो युद्धकैद्यांची कत्तल करी!
तो स्वतःच्या प्राणांविषयी जसा बेफिकीर होता, तसाच इतरांच्याही प्राणांविषयी बेपर्वा होता. त्याचा,
एक आवडता शिपाई आजारी पडला व वैद्यांच्या सल्ल्याप्रमाणे न वागल्यामुळे मेला.पण अलेक्झांडरने 'या वैद्याने माझा शिपाई मारला' असे म्हणून त्या वैद्याला क्रॉसवर चढविले! तरीही त्याचे मित्रवियोगाचे दुःख कमी होईना, तेव्हा त्याचा विसर पडावा म्हणून तो अकस्मात् एका शहरावर चालून गेला व त्याने तेथील सर्व नागरिकांची कत्तल करून त्याने त्यांचा आपल्या मृत मित्राला बळी दिला.
शत्रूकडील सेनापती त्याच्या हाती पडत,तेव्हा त्यांना कधीकधी तो अत्यंत उदारपणे वागवी,तर कधी कधी जवळच्या झाडावर फाशी देई. अलेक्झांडरची स्वारी कशी वागेल हे त्या त्या प्रसंगी त्याची जी लहर असेल,तीवर अवलंबून असे.एखाद्याला ठार करावे असे त्याच्या मनाने घेतले,की तो स्वतःच आरोप करणारा,न्याय देणारा व न्यायाची अंमलबजावणी करणारा म्हणजे ठार मारणारा बने.शत्रूना छळण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढण्यातही त्याचे डोके कमी चालत असे नाही.प्लुटार्क म्हणतो, एकदा दोन झाडे वाकवून त्यांच्यामध्ये त्याने एका कैद्याला बांधविले व मग मुद्दाम वाकवून भिडविलेली ती झाडे एकदम सोडून देण्याचा हुकूम केला.तसे करताच ती झाडे इतक्या वेगाने आपल्या मूळ स्थितीतच गेली की,त्या दुर्दैवी कैद्याचे उभे दोन तुकडे झाले व प्रत्येक झाडाने त्याचे अर्धे अर्धे रक्तबंबाळ शरीर उचलून वर नेले व जणू विजयाची ढाल म्हणून मिरवले! त्या कैद्याचा अशा राक्षशी छळवणुकीने वध केल्यावर अलेक्झांडर होमर वाचीत पडला! त्याच्या बहुमूल्य वस्तूंत होमरच्या काव्यांची एक सुंदर प्रत सदैव असे.इलियडमधील युद्धप्रसंग वाचणे आपणास फार आवडते असे तो म्हणे, इलियडमधील समर-वर्णने वाचूनच तो युद्धप्रिय बनला.विजयध्वजा सर्वत्र मिरवावी,अजिंक्य म्हणून सर्वत्र गाजावे असे त्याला त्यामुळेच वाटू लागले होते.होमरच्या काव्यांनीच त्याला समर स्फूर्ती दिली होती.तो लढत नसे किंवा होमरही वाचीत नसे,तेव्हा तो दारू पिऊन पडत असे. रणांगणांवरील पराक्रम असोत किंवा दुसरी दुष्कृत्ये अथवा व्यसने असोत,तो सर्वच बाबतीत इतरांवर ताण करी.जेथे जाऊ तिथे आपण बिनजोड असलो पाहिजे असेच जणू तो म्हणे! सामान्य लोकांइतपत अतिरेक त्यास पसंत पडत नसे.त्याचा अतिरेक अमर्याद,अतुल असे.तो पिऊ लागला,की पिंपेच्या पिंपे रिकामी करी आणि मग दारूच्या धुंदीत एखाद्या मत्त देवाप्रमाणे वाटेल ते करीत सुटे.एकदा तो एक मेजवानी देत असता एका वेश्येचा सन्मान करीत होता; नशा केलेली ती रमणी त्याला म्हणाली,"इराणी राजाच्या राजवाड्याला आग लावा.
आणि त्याने आग लावली! एकदा तर त्याने एक फारच मोठी गंमत केली.दारू पिण्याची मॅरेथॉन शर्यत लावून सर्वांत जास्त दारू पिणारास त्याने सोन्याचा मुकुट बक्षीस म्हणून ठेवला ! ज्याने तो सुवर्णमुकुट मिळविला तो तीन गॅलन दारू प्याला होता! पण त्या नशेतच तो मेला.दुसरे एकेचाळीस जणही त्या स्पर्धेत भाग घेऊन मरण पावले." एकदा नाचरंग,मेजवानी असा स्वैराचार रात्रंदिवस सारखा चालल्यामुळे तो तापाने आजारी पडला व थोड्याच दिवसांनी ख्रि.पू. ३२३ या वर्षी तो मरण पावला.
मरणसमयी तो केवळ तेहतीस वर्षांचा होता; पण एवढ्या लहान वयात इतके देश उद्ध्वस्त करणारा,मानवांवर इतके अन्याय करणारा,त्यांच्यावर दुःखाच्या इतक्या प्रचंड राशी ओतणारा,त्यांच्या अशी कत्तली करणारा प्राचीन इतिहासात दुसरा कोणी आढळेलसे वाटत नाही.
अलेक्झांडरचे अवास्तव स्तोम माजविणाऱ्या इतिहाकारांनी त्याच्याभोवती एक तेजोवलय निर्माण करून ठेवले आहे.जे जे उच्च आहे,थोर आहे,सद्गुणी आहे, त्या सर्वांची आदर्शभूत मूर्ती म्हणजे अलेक्झांडर असे त्यांनी लिहून ठेवले आहे.नवनवी पुरे-पट्टणे वसविणारा,रानटी जातींना माणसाळविणारा,राष्ट्राराष्ट्रांत व्यापार बाढविणारा रस्ते बांधून दळणवळण वाढविणारा,इत्यादी प्रकारे त्याचे वर्णन करण्यात येत असते.परंतु अशा या दुष्ट-शिरोमणीला,या हडेलहप्पी सैतानाला,अशा रीतीने दिव्य संतपण दिलेले पाहून शिसारी येते! संस्कृती,सुधारणा यांचा थोडाही विचार या घमेंडखोराच्या डोक्यात येत नसे.अलेक्झांडर फक्त अलेक्झांडरलाच पूजी. अलेक्झांडरचीच पूजा,
अलेक्झांडरचीच स्तुती! त्याने शहरे बांधली तशीच धुळीसही मिळविली ! ती उभारणी वा संहारणा त्याच्या स्वत:च्या वैभवासाठी होती.मानवजातीचा विचारही त्याच्या डोक्यात शिरत नसे.जी थोडीफार शहरे त्याने वसविली,त्यांबद्दल त्याचे पोवाडे गाण्यात येतात; पण त्याने शेकडो शहरांची राखरांगोळी केली त्याचे काय? अलेक्झांडरच्या युद्धामुळे ग्रीक संस्कृतीची बीजे आशियाभर पेरली गेली असे मानणे हा केवळ मूर्खपणा होय.वस्तुतः त्याने संस्कृतीची बीजे पेरली नसून सूडाची, द्वेष-मत्सरांची व भावी युद्धांची मात्र बीजे सर्वत्र पेरली.
युरोपची संस्कृती पूर्वेकडे पसरली ती खरोखर अलेक्झांडरच्या तलवारीमुळे नव्हे,तर सोलोन,
हिराडोटस,प्लेटो यांसारख्या ग्रीक कवींनी व तत्त्वज्ञान्यांनी केलेल्या कामगिरीमुळे. जग सुधारावे,ते अधिक उदार व सुसंस्कृत करावे, त्याची अधिक चांगली सहकारी संघटना करावी,अशी भव्य ध्येये अलेक्झांडरच्या डोळ्यांसमोर कधीही नाचली नाहीत! अशा ध्येयांनी त्याचे अहंकारी मन कधी उच्च बनलेच नाही.आपल्या बुसिफालस नामक घोड्याला त्याने जसे फटके मारून वठणीवर आणले, त्याच्यावर स्वार होता यावे म्हणून त्याला ज्याप्रमाणे माणसाळविले,त्याप्रमाणे मानवांवर आपणाला सत्ता गाजविता यावी म्हणून त्याने त्यांना तलवार दाखवून हीन-दीन केले.
२४.०८.२३ या भागातील पुढील भाग..