माझ्या या अपयशी मोहिमेवरून गारठलेल्या, थकलेल्या अवस्थेत रुद्रप्रयागची वाट उतरत असताना मी अतिशय निराश झालो होतो. अगदी कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरी कमनशीबाने माझ्याबरोबर आणि आख्ख्या गढवाली जनतेबरोबर रडीचा डाव खेळला होता.
जिथे नरभक्षकाचा संबंध येतो तेव्हा या सर्व पहाडी मुलुखातली माणसं मला अतिंद्रिय शक्ती प्राप्त झालेली व्यक्ती मानतात;मला ते कितीही आवडत नसलं तरीही..!
मी त्यांच्या मदतीला येतोय ही बातमी इथे माझ्या आगमना अगोदरच पोचली होती.रुद्रप्रयागच्या कित्येक मैल अगोदर जी जी माणसं मला वाटेत भेटली,शेतात काम करत असताना ज्यांनी ज्यांनी मला पाह्यलं त्या सर्वांनी अतिशय विश्वास दाखवून मला ज्याप्रकारे शुभेच्छा दिल्या तो सर्व प्रकार अत्यंत हृदयस्पर्शी होता,पण तितकाच अस्वस्थ करणाराही ! जसजसा मी रुद्रप्रयागच्या जवळ येत गेलो तसतशी त्याची तीव्रता वाढतच गेली.
माझ्या रुद्रप्रयागमधल्या नाट्यमय प्रवेशाला जर कोणी साक्षीदार असता तर त्याला विश्वास ठेवणं कठीण गेलं असतं की मी एखादा जगज्जेता नसून स्वतःच्या मर्यादाचं भान असलेला एक सामान्य माणूस होतो! मला जाणीव होती की हे जे काही काम आपण हातात घेतलंय ते काम माझ्या ताकदीपलीकडचं आहे.अतिशय रौद्र,अवघड आणि पहाडी प्रदेशातल्या पाचशे चौ.मैलांमधल्या जवळजवळ पन्नास-साठ बिबळ्यांमधून नरभक्षकाला हुडकून त्याला मारायचं काम अशक्यप्रायच वाटत होतं आणि जसजसा मी हा नितांत सुंदर प्रदेश पहात गेलो तसतसं मला ते अधिकच अशक्य वाटायला लागलं.पण माझ्या ह्या भावना त्या लोकांपर्यंत पोचणं शक्य नव्हतं.त्यांच्या दृष्टीने कित्त्येक नरभक्षकाच्या तावडीतून इतरांना सोडवणारा अशी माझी प्रतिमा होती आणि आताही मी तशाच कामासाठी गढवालला आलो होतो. त्यातही,आल्यापासून २४ तासांच्या आत मी नरभक्षकाला माझ्याकडचा बोकड मारायला भाग पाडलं होतं आणि अंधार पडल्यावरही जंगलात राहायचा धोका पत्करून त्या बिबळ्याला अलकनंदा नदी ओलांडून नदीच्या या बाजूला यायला प्रवृत्त करू शकलो होतो.
या माझ्या पहिल्या यशानंतर त्या बाईचा बळी गेला होता.मी पुढची मनुष्यहानी टाळण्याचा माझ्या दृष्टीने खूप प्रयत्न केला होता पण तो फसला.या घटनेमुळेच मला लगेचच पुन्हा एकदा नरभक्षकाशी संपर्क साधण्याची संधी मिळाली होती.काल त्या गावातल्या माणसांबरोबर डोंगर चढत असताना माझ्या यशापयशाचा अंदाज बांधला तेव्हा मला खात्री वाटली की यशाची शक्यता दोनास एक तरी होती;अगदी या बिबळ्याची एका भक्ष्यावर दोनदा न येण्याची सवय माहीत असून व त्या अंधाऱ्या रात्रीत माझ्याकडे शूटींग लाईट नसूनसुद्धा! जेव्हा मी मायकेल कीनला गढवालला जाण्याची माझी तयारी आहे असं सांगितलं तेव्हा त्याने मला विचारलं होतं की आवश्यक ती सर्वसाधनसामग्री माझ्याकडे आहे का? जेव्हा त्याला समजलं की माझ्याकडे इलेक्ट्रिक शूटींग लाईटचीच कमी आहे व त्यासाठी मी कलकत्याला टेलिग्राम करणार आहे तेव्हा त्याने मला वचन दिलं की यासाठी शासनाकडून वाट्टेल ती मदत मिळेल व मी रुद्रप्रयागला पोचण्याच्या आत उत्कृष्ट दर्जाचा इलेक्ट्रिक शूटींग लाईट तेथे पोचला असेल.मी रुद्रप्रयागला पोचल्यानंतर जेव्हा मला कळलं की अजूनही लाईट आलेला नाही तेव्हा मला जरा वाईट वाटलं.पण रात्रीसुद्धा पुरेसं दिसण्याची माझी क्षमता गृहीत धरूनच मी यशापयशाचं गुणोत्तर दोनास एक असं तोललं होतं.म्हणूनच आज रात्री काम तमाम झालंच पाह्यजे या जिद्दीने मी बरोबर जास्तीची रायफल व शॉटगन घेतली होती. जेव्हा गंजीवरल्या माझ्या बैठकी
वरून मी समोरच्या एकूण दृश्याचा आढावा घेतला - कमी रेंजवरून शॉट घेण्याची संधी,माझा शॉट चुकला व बिबळ्या फक्त जखमी झाला तरी त्याला हमखास मृत्यूच्या दाढेत अडकवणारा गनट्रॅप- तेव्हा मात्र मला यशाची खात्री खूपच जास्ती वाटू लागली. पण... नंतरचं ते वादळ,माझ्या क्षमतेचाही काही उपयोग होऊ नये इतकी अंधारी रात्र आणि त्यात इलेक्ट्रिक लाईट नसणे... सरतेशेवटी प्रयत्न फसलाच व हे अपयश काही तासातच दहशतीखाली असलेल्या गढवालच्या रहिवशांना समजणार होतं ! थोडा व्यायाम,कढत पाण्याने आंघोळ आणि जेवण यामुळे नेहमी निराश मूडवर चांगला परिणाम होतो.डोंगर उतरून बंगल्यावर आल्यावर गरम पाण्याने आंघोळ आणि नंतर भरपेट नाश्ता झाल्यावर मी हळूहळू या 'कमनशीबाच्या' विचाराच्या गर्तेतून बाहेर आलो व एकूण सर्वच अपयशाचा सारासार विचार करायला लागलो.जमीनीत घुसलेल्या गोळीमुळे आलेलं नैराश्य हे वाळूवर सांडलेल्या दुधासारखंच होतं आणि जर अजूनही बिबळ्याने अलकनंदा नदी ओलांडली नसेल तर माझ्याकडे संधी होती कारण आता माझ्याकडे त्या शूर माणसाने वादळाची व मृत्यूची पर्वा न करता आणलेला लाईट होता.
आता त्या बिबळ्याने नदी ओलांडली आहे की नाही हे तपासणं सर्वप्रथम आवश्यक होतं.दोन झुलत्या पुलांवरून हे शक्य आहे याची खात्री असल्याने ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी कामाला लागलो.डोक्यापासून काही इंचावरून सुसाटत गेलेल्या जड रायफलच्या बुलेटमुळे बिबळ्याला बसलेला धक्का कितीही जोरदार असला तरी त्यानंतर स्वच्छ उजेड पडण्याच्या मधला वेळ इतका कमी होता की तेवढ्या वेळात तिथून ते चटवापिपल पुलापर्यंतचा १४ मैल रस्ता पार करणं बिबळ्याला अशक्य होतं.त्यामुळे मी माझं सर्व लक्ष फक्त रुद्रप्रयागमधल्या पुलावरच केंद्रित करायचं ठरवलं.या पुलाकडे तीन वाटा येत होत्या.एक उत्तरेकडून,दुसरी दक्षिणेकडून आणि त्या दोन पायवाटांच्या मधून रुद्रप्रयाग बाजाराकडून येणारी चांगले मळलेली एक वाट होती.या पायवाटा तपासल्या
नंतर मी पूल ओलांडला आणि चांगल्या अर्ध्या मैलापर्यंत केदारनाथ रस्ता व तीन दिवसापूर्वी तो बोकड मारला गेला ती पायवाटही तपासली.बिबळ्याने नदी ओलांडली नाही याची खात्री झाल्यानंतर मी दोन्ही ब्रिज बंद करून त्या बिबळ्याला,नदीच्या माझ्या बाजूला स्थानबद्ध करण्याच्या नियोजनानुसार कामाला लागलो.योजना अतिशय साधी सरळ होती आणि नदीच्या या बाजूला पुलाच्या अगदी जवळ राहणाऱ्या रखवालदाराचं सहकार्य मिळालं तर हमखास यशस्वी होण्यासारखी होती.जवळ जवळ तीस मैल लांबीच्या मोठ्या पट्ट्यात नदीच्या दोन्ही तीरांवरच्या गावांमधलं दळणवळण व संपर्क तोडणं हे वाचताना फार कठीण वाटेल,पण प्रत्यक्षात तितकंसं कठीण गेलं नाही.
कारण नरभक्षकाने लादलेल्या संचारबंदीमुळे हा ब्रिज रात्रीच्या वेळात ओलांडण्याचं धैर्य तिथं कोणाकडेही उरलं नव्हतं.पुलाला आधार देणाऱ्या दोन्ही बाजूच्या पोलादी केबल्स ज्या टॉवर्सच्या आधाराने खेचल्या होत्या त्यांच्या कमानीमध्ये काटेरी झुडपं लावून ते बंद केले गेले.त्यानंतर ते बंद असल्याच्या व मी पहारा देत असल्याच्या काळात एकाही माणसाने पूल ओलांडायची परवानगीसुद्धा मागितली नाही.
मी डाव्या तीरावरच्या टॉवरवर एकूण वीस रात्री पहारा दिला व या रात्रींचा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही.नदीकाठच्या पुढे आलेल्या मजबूत खडकांवर ते टॉवर्स बांधले होते आणि त्या टॉवर्सवरचे आठ फूट लांब व चार फूट रुंद प्लॅटफॉर्म् स भन्नाट वाऱ्यामुळे गुळगुळीत झाले होते.टॉवर्सची उंची वीस फूट होती.या प्लॅटफॉर्मच्या वर पोचण्याचे दोनच मार्ग होते. मनोऱ्याच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या भोकातून जाणाऱ्या आणि पुढे साठ फुटांवर जमीनीत खोलवर गाडलेल्या केबल्सवरून लटकत जाणे किंवा एका तकलादू शिडीवरून चढून जाणे.मला दुसरा मार्ग त्यातल्या त्यात बरा वाटला.कारण त्या केबल्सवर एक घाणेरड्या वासाचं काळपट बुळबुळीत आवरण चढलं होतं;ते एकतर हाताला चिकटायचं किंवा कपडे कायमचे खराब होण्याची भीती होती.ही 'शिडी' म्हणजे सुतळीने सैलसर बांधलेल्या आडव्या समांतर काठ्या एकमेकांना जोडणारे विषम लांबीचे दोन बांबू होते.ही शिडी प्लॅटफॉर्मच्या खाली चार फुटांपर्यंतच पोचायची.सर्वात वरच्या काठीवर तोल सांभाळत उभं राहून गुळगुळीत प्लॅटफॉर्मवर माझे तळहात रोवून केवळ तेवढ्याच पकडीवर,
देवावर हवाला ठेवून त्या प्लॅटफॉर्मवर चढता यायचं,
हा प्रकार म्हणजे एक डोंबाऱ्याचा खेळ होता व तो दररोज खेळूनही माझी भीती काही कमी झाली नाही.हिमालयातल्या या भागातल्या सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडेच वाहतात.आणि ज्या खोऱ्यातून त्या वाहतात त्या खोऱ्यातला वारा सूर्योदय तसेच सूर्यास्ताला दिशा बदलतो. दिवसाउजेडी हा वारा 'डाडू' म्हणून ओळखला जातो व तो दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतो.रात्री मात्र तो उलट्या दिशेने वाहतो.
मी प्लॅटफॉर्मवर जागा घेण्याच्या सुमारास हा वारा पडलेला असायचा.नंतर जसजसा प्रकाश कमी होत जाई तसतसा हलक्या झुळकीपासून सुरू होऊन त्याचा वेग वाढत जायचा आणि मध्यरात्रीपर्यंत त्याने झंझावाताचं रूप धारण केलेलं असे.प्लॅटफॉर्मवर आधाराला पकडण्यासाठी काहीच नव्हतं.घर्षण वाढवण्यासाठी किंवा वाऱ्याचा दाब कमी करण्यासाठी पालथं झोपलं तरी साठ फूट खाली खडकावर फेकलं जायची भीती असायचीच.
या खडकांवरून कोसळल्यावर तिथून सरळ अलकनंदाच्या गोठवण्याऱ्या पाण्यातच जलसमाधी! खरंतर साठ फूट खाली धारदार खडकांवर आपटल्यानंतर पाण्याच्या तापमानाबद्दल विचार करण्याची गरजच नाही, पण गंमतीशीर गोष्ट म्हणजे जेव्हा म्हणून मला खाली कोसळण्याची भीती वाटायची तेव्हा तेव्हा माझ्या मनात खडकाचा नव्हे तर गोठवणाऱ्या पाण्याचाच विचार यायचा! या त्रासाच्या भरीत भर म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर अगणित मुंग्या होत्या आणि त्या कपड्यांमध्ये शिरून कातडी सोलून काढायच्या.या वीस रात्रीमध्ये ती कमानीतीलं झुडुपं काढली जायची आणि आणि या सर्व काळात फक्त एकच प्राणी तो पूल ओलांडून गेला...
एक कोल्हा!
दरदिवशी पुलावर येताना माझ्या बरोबर माझी माणसं ती शिडी घेऊन यायची आणि मी शिडीवरून वर गेलो की माझ्या हातात रायफल दिल्यावर शिडी घेऊन निघून जायचे.दुसऱ्या दिवशी तिथे आलो तेव्हा आम्हाला एक ढगळ लाल पांढरी कफनी घातलेला माणूस दिसला. त्याच्या डोक्यावर,छातीवर काहीतरी चमकत होतं,हातात चांदीचा क्रॉस होता आणि तो केदारनाथच्या दिशेकडून येत होता.पुलावर पोचल्यावर तो माणूस वाकला व समोर क्रॉस धरून डोकं झुकवलं.अशा स्थितीत काही क्षण राह्यल्यावर त्याने क्रॉस उंच धरला,परत ताठ उभा राह्यला,
काही पावलं टाकली व परत वाकून डोकं झुकवलं.संपूर्ण पूल त्याने या पद्धतीने ओलांडला.माझ्या शेजारून जाताना त्याने सलाम केला पण तो त्याच्या प्रार्थनेत मग्न असल्याने मी त्याच्याशी काही बोललो नाही. डोक्यावरच्या आणि छातीवरच्या कपड्यांवर मगाशी जे काही चमकताना दिसत होतं ते चांदीचे छोटे छोटे क्रॉसच होते.या सर्व प्रकाराबाबत माझ्याप्रमाणेच माझ्या माणसांचीही उत्सुकता चाळवली गेली.तो नदीकाठचा चढ चढून रुद्रप्रयाग बाजाराच्या दिशेने जात असताना त्यांनी मला विचारलं की नक्की हा काय प्रकार असावा? तो कोणत्या देशातून आला असावा ? तो ख्रिश्चन होता हे तर उघड दिसत होतं पण आमचं प्रत्यक्ष संभाषण न झाल्याने बाकी काही तपशील कळला नव्हता. पण त्याचे लांब काळे केस,काळी कुळकुळीत दाट दाढी व चेहरेपट्टी ह्यावरून तो उत्तर भारतातलाच असावा असा माझा अंदाज होता.मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन
दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या माणसांनी आणलेल्या शिडीवरून उतरून बंगल्याकडे निघत असताना मला रस्त्यालगतच्या मोठ्या शिळेवर उभा राहून नदीकडे निरखून पाहत असलेली ती घोळदार डगल्यातील व्यक्ती परत दिसली.मला पाह्यल्यावर तो शिळेवरून उतरून माझ्याकडे आला आणि हसून ओळख दिली.मी त्याला इथे येण्याचा उद्देश विचारल्यावर तो म्हणाला की तो फार दूरवरून गढ़वाली लोकांना छळणाऱ्या सैतानी दुष्टात्म्या
पासून त्यांना मुक्ती देण्यासाठी आलाय.हे सर्व तो कसं काय करणार या माझ्या पुढच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं की तो वाघाची एक प्रतिमा तयार करणार आहे व नंतर मंत्र म्हणून त्या दुष्टात्म्याला प्रतिमेत प्रवेश करायला भाग पाडणार आहे.त्यानंतर ती प्रतिमा गंगेमध्ये लोटून देणार आहे,तिथून ती वाहत वाहत सागराला मिळेल.त्यानंतर परत तो दुष्टात्मा इथल्या लोकांना त्रास देणार नाही.
त्याचा उद्देश तो सफल करू शकेल की नाही याबद्दल मला कितीही शंका असली तरी त्याने स्वतःहून स्वीकारलेल्या कार्याबद्दलची त्याची निष्ठा आणि विश्वास याचं मात्र मला मनोमन कौतुकच वाटलं. दररोज मी बंगल्याकडे निघत असताना तो तिथे आलेला असायचा व संध्याकाळी टॉवरवर परत यायचो तेव्हाही तो त्याचे बांबू,
दोऱ्या,रंगीबेरंगी कापडं- चिंध्या यांच्या सहाय्याने 'वाघ' बनवण्याच्या कामात मग्न असायचा.त्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं असताना एकदा मोठं वादळ आलं आणि त्याची ती कलाकृती पूर्ण उद्ध्वस्त झाली. पण... ठीक आहे... गाणी गुणगुणत पुन्हा एकदा त्याने त्याचं काम सुरू केलं! सरतेशेवटी घोड्याएवढ्या आकाराचा व कोणत्याही प्राण्याशी साधर्म्य न साधणारा असा तो 'वाघ' त्याच्या पसंतीस उतरेल इतपत तयार झाला.
कुठल्याही प्रकारचा 'तमाशा' चालला असेल तर एकतरी पहाडी माणूस त्याची मजा चाखल्याशिवाय राहील काय? एका लांब काठीला तो 'वाघ' बांधून जेव्हा त्याला नदीकाठची उतरंड उतरून नदीच्या वाळवंटावर नेलं जात होतं तेव्हा जवळपास शंभर-दीडशे माणसं त्या वरातीत सामील झाली होती आणि त्यातले काही जण भांडी,ढोल-ताशे व तुताऱ्या वाजवत होते.नदीच्या वाळवंटात ती प्रतिमा सोडण्यात आली. डोक्यावर तसेच छातीवर क्रॉसेस लावलेला आणि हातात सहा फूट उंच क्रॉस घेतलेला तो माणूस वाळूत गुडघ्यावर बसला आणि अतिशय तन्मयतेने मंत्र म्हणून त्याने त्या दुष्ट्यात्म्याला त्या प्रतिमेत प्रवेश करायला भाग पाडलं.शेवटी तुताऱ्या,ढोल यांच्या गजरात ती भलीथोरली प्रतिमा गंगेच्या प्रवाहात लोटण्यात आली. मिठाई,फुलं यांचा नैवेद्य अर्पण करून शेवटी ती प्रतिमा तिच्या सागराकडच्या अंतिम प्रवासाला लागली.दुसऱ्या दिवशी तो साधू तिथं दिसला नाही.तेव्हा नदीवर सकाळी आंघोळीला आलेल्या काही माणसांना मी विचारलं की तो ढगळ कफनीवाला कुठे आहे, तो कुठे गेला? त्यावर ते म्हणाले, 'साधूपुरुष कुठून येतात हे कुणी सांगू शकेल का साहेब? आणि कोठे चाललात असा प्रश्न तरी त्यांना कोण विचारू शकतो का?'
कपाळाला चंदनाचा गंध लावलेली,त्याला साधूपुरुष म्हणणारी व कालच्या समारंभात भाग घेतलेली सर्व मंडळी हिंदू होती! पासपोर्ट,ओळखपत्र बगैरे काहीही प्रकार अस्तित्वात नसलेल्या आणि धर्माचा प्रभाव असणाऱ्या या देशात भगवी कफनी घालून,भिक्षेचा कटोरा हातात घेऊन किंवा छाती व डोक्याला क्रॉस लावून कोणीही माणूस अगदी खैबरखिंडीपासून ते कन्याकुमारीपर्यंत सहज भटकू शकेल... आणि त्याला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही याबद्दल माझी खात्री आहे.
३१.१०.२३ या लेखमालेतील पुढील भाग..