पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रशासकीय हद्द आमच्या पार्कच्या मागे चिखली गावाजवळच्या साने वस्तीजवळ संपत होती.त्यापुढे देहू आणि आळंदी ही भक्ति संप्रदायातली गावं जोडणाऱ्या रस्त्यावर टाळगाव चिखली नावाचं गाव आहे. पुष्पक विमानातून सदेह वैकुंठाकडे निघालेल्या संत तुकाराम महाराजांचे आवडते टाळ त्यांच्या हातातून निसटले आणि या गावात पडले. म्हणून या गावाचं नाव टाळगाव चिखली पडलं अशी आख्यायिका आहे.
या गावात एकदा एक मजबूत बांध्याचं बॉनेट जातीचं तरणंबांड माकड आलं.गावात साक्षात हनुमान आला म्हणून जनसामान्यांपासून ते पाटील-सरपंचापर्यंत सगळेच सुखावले.त्या मारुतीरायालाही दररोज नैवेद्य मिळू लागल्याने त्याने आपला पुढचा प्रवास रद्द करून गावातच मुक्काम ठोकला.चिखलीमध्ये ते चांगलं रमलं. सुरुवातीला सगळ्यांनाच या माकडाचं कौतुक होतं;पण लवकरच त्याच्या मर्कटलीला सुरू झाल्या आणि गावकरी वैतागू लागले.एकदा ते गावातल्या शाळेत जाऊन पोहोचलं.एका मुलाला धक्का देऊन त्याच्या हातातली जिलेबी पळवली.दुसऱ्या दिवशी एका मुलीच्या हातातला साबुदाणा खिचडीचा डबा हिसकावायचा प्रयत्न केला,पण मुलीनेही दोन्ही हातांनी तो घट्ट धरून ठेवला.त्यामुळे माकडाने तिच्या हाताचा चावा घेतला आणि डब्यासकट खिचडी पळवली. तिसऱ्या दिवशी गावातल्या केळ्यांच्या हातगाडीवर उडी मारून दोन-चार केळी मटकावली.
चिडलेल्या केळीवाल्याने त्याला मारण्यासाठी दगड उचलल्यावर माकडाने त्याच्या गालाचा चावा घेऊन धूम ठोकली. जाताना केळीचे दोन-चार घडही जमिनीवर फेकले.एकदा गावातला बेवडा रात्री तर्र होऊन एका देवळात झोपला होता.काही वेळात हे माकड महाशय सरळ त्याच्या कुशीत जाऊन झोपले.दारुड्याला जाग आली आणि तो कुशीवर वळला.त्याची ही हालचाल माकडाला आवडली नसावी.माकड चिडून गुरकावलं. रात्रभर बेवडा माकडाला घाबरून एकाच प्रस्थतीत गुमान बसून राहिला.एका भटक्या कुत्र्यालाही या माकडाने चांगला प्रसाद दिला. त्वेषाने भुंकणाऱ्या त्या कुत्र्याचा कान एका हाताने उचलून दुसऱ्या हाताने त्याच्या थोबाडीत मारून ते पसार झालं.
मारूतीरायाच्या आगमनामुळे आनंदी झालेल्या लोकांनी प्रशासनाकडे तक्रारी करायला सुरुवात केली.
आमच्याकडेही अनेक तक्रारी आल्या. आम्ही एक- दोनदा गावात जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला;पण त्या हुशार माकडाने दरवेळी आम्हाला चकवलं.अशातच या माकडाने आणखी एक उपद्व्याप केला आणि त्यामुळे तो अलगद आमच्या तावडीत सापडला. चिखलीतल्या एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारं कुटुंब बाहेरच्या खोलीत झोपलं होतं. कामावर जाण्यासाठी घरातले काका लवकर उठले.त्यांनी चहाचं आधण गॅसवर ठेवलं.चहा उकळू लागला.शेजारच्या छपरावरून हे माकड त्यांच्या हालचाली पाहत होतं.त्या काकांनी चहा कपांमध्ये ओतला आणि ते घरच्यांना उठवायला बाहेरच्या खोलीत आले.तेवढी संधी साधून माकड खिडकीतून स्वयंपाकघरात शिरलं आणि अधाश्यासारखं चहा पिऊ लागलं.त्या काकांनी हे दृश्य पाहिलं.मात्र,त्यांनी प्रसंगावधान राखून स्वयंपाकघराचं दार बंद करून घेतलं आणि गॅलरीमधून धावत जाऊन बाहेरच्या बाजूने खिडकीही लावून घेतली.सगळ्या गावाला दिवसरात्र त्रास देणारं माकड स्वतःच्या हावरटपणामुळे आणि या काकांच्या प्रसंगावधानामुळे ट्रॅप झालं होतं.आम्हाला निरोप मिळाल्यावर नेवाळे आणि आमचे वॉचमन बोराटेअण्णा माकड पकडण्यासाठीची मोठी रिंग स्टिक घेऊन माझ्या स्कूटरवरून तिकडे रवाना झाले आणि तासाभरात माकडासहित ट्रिपलसीट पार्कला परतले.
रात्री-अपरात्री नागरिकांनी आणून दिलेल्या प्राणी-पक्ष्यांसाठी तात्पुरती सोय म्हणून माझ्या बंगल्याच्या आवारात काही पिंजरे ठेवलेले होते,त्यापैकी एका मजबूत पिंजऱ्यात या धिप्पाड माकडाची रवानगी केली.रात्रभर तो घशातून आख्याऽऽऽ आख्याऽऽऽ असा आवाज काढत होता.त्यामुळे त्याचं नावच आक्क्या पडलं.ही रिंग स्टिक म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.रिंग स्टिक म्हणजे एखादा लहानखुरा प्राणी विनासायास पकडण्यासाठी अत्यंत सोपं असं बेसिक साधन.ही एक साधी रिंग असते.तिला एक थोडासा लांबट पाइप हँडल म्हणून जोडलेला असतो.त्या रिंगभोवती एखादी दणकट पिशवी किंवा पोत्याचं तोंड कायमस्वरूपी शिवून टाकलं की झाली रिंग स्टिक तयार.बॅडमिंटनच्या जुन्या रॅकेटपासूनही बेसिक रिंग स्टिक तयार होऊ शकते.माकड पकडण्यासाठी हे सर्वांत चागलं साधन आक्क्या येण्याआधीच आम्ही पार्कच्या एका कोपऱ्यात दीड एकर जागेवर मंकी हिलची उभारणी सुरू केली होती.आम्हाला आज ना उद्या पार्कवर माकडं आणायची होतीच.त्याचा विचार करून हे काम सुरू केलं होतं.रस्तारुंदीमुळे कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरातून काढून आणलेल्या दोन पिंपळ,एक वर्ड आणि आणि एका उंबराच्या झाडाचं इथे पुनर्रोपण केलं होतं.त्या चारही वृक्षांनी आमच्याकडे आल्यावर बाळसं धरलं आणि नव्या मातीत ते नव्या जोमाने वाढू लागले. या मंकी हिलमध्ये सभोवताली १५ फूट रुंदीचा 'वेट मोट' तयार केला.'वेट मोट' म्हणजे पाण्याच्या खंदकाने चारही बाजूने वेढलेली जागा.खंदकाची खोली फार तर तीन फूटच! पण त्यापुढे सुमारे पंधरा फूट उंचीची भिंत बांधून काढली.बाहेरील प्रेक्षकांना मात्र तीन फूट भिंतीवरून मंकी हिलवरील माकडांच्या कसरती पाहता येतील अशी सोय केली.चारही झाडांच्या फांद्यांना मजबूत सुती दोरखंड बांधून एकमेकांना जोडले.त्यामुळे प्रेक्षकांना मंकी जंपिंग,रिव्हर क्रॉसिंग अशा अनेक माकडलीला नेहमीच पाहायला मिळतील अशी आमची अपेक्षा होती. 'वेट मोट' मध्ये एका वेळी सुमारे सहा लाख लिटर पाणी मावू शकत होतं.त्या पाण्याचा पुनर्वापर बागेसाठी केला जाईल अशी योजना होती.त्यासाठी आम्ही रेन गन आणि पाच एचपीची मोटारही बसवून घेतली.अशा रीतीने मर्कट परिवारासाठी तयारी तर जय्यत झाली होती.आता हा परिवार तिथे दाखल होण्याचीच खोटी होती.पण गंमत अशी,की आक्क्याला तिथे सोडलं आणि काही दिवसांतच आमच्याकडे गौरी नावाची एक मादी दाखल झाली.
पिंपरी- चिंचवड शहरात एका घरात ती वाढलेली होती. मोठी झाल्यावर सांभाळणं अवघड झालं म्हणून त्यांनी तिला आमच्याकडे आणून सोडली. आक्क्याची आणि तिची जोडी चांगली जुळली. मंकी हिलच्या प्रशस्त आवारात काही दिवस हे दोघं राजा-राणीच वावरत होते.
थोड्या दिवसांनी शहरात आणखी एक माकड दिसल्याचा कॉल आला.एम.आय.डी.सी.च्या वॉटर प्लॅटमध्ये एक लहानखुरं माकड कुठून तरी भटकत आलं होतं.संपत पुलावळे नावाच्या आमच्या कीपरने त्याला पकडून आणलं,म्हणून त्याचंही नाव आम्ही 'संपत' ठेवलं! आक्क्या आणि गौरी त्याला कसं स्वीकारतात हा आमच्यापुढे प्रश्नच होता.कारण माकड हा टोळीत राहणारा प्राणी आहे.ही टोळीही वैशिष्ट्यपूर्ण असते.
त्यात सत्तेची उतरंड असते. ती मान्य असेल तरच ते माकड टोळीत टिकतं. आक्क्या हा तसा आक्रमक होता.त्याने संपतला डेप्युटी म्हणून स्वीकारलं,आणि संपतनेही ते स्थान मान्य केलं.
काही दिवसांनी पिंपरी परिसरात आम्हाला आणखी एक माकडीण मिळाली.तीही संपतसारखी लहानखुरी.
आमच्याकडे सर्वप्रथम आलेल्या राणीची आठवण म्हणून तिचं नावही राणीच ठेवलं ठेवलं.त्यानंतर दाखल झाली ती राजी.आम्हाला निगडी गावठाणात सापडलेली माकडीण,
अशा रीतीने आमचं मंकीहिल नव्या कुटुंबासह स्थिरावलं.
आक्क्या कुटुंबप्रमुख,गौरी त्याची पट्टराणी संपत डेप्युटी,
राणी आणि राजी सेकंड आणि थर्ड इन रो।
माकडांचे मंकी-हिलवरचे दिवस मजेत चालले होते.त्यांना दररोज पाच-सहा किलो मिश्र भाजी आणि फळं लागायची, कोबी,फ्लॉवर,लाल भोपळा,टोमॅटो,काकडी,
मका आणि पालेभाज्या असं सगळं काही असे त्यात.
संपत पुलावळे दिवसभर मंकी हिलवर थांबून माकडांना लोकांनी खायला देऊ नये याची काळजी घेत असे.पण तरी त्याची नजर चुकवून लोक फुटाणे, खारे दाणे,
बॉबी,शेव,चिवडा असं काही ना काही आत टाकतच.
माकडंही चवीने ते मटकावत. महिन्यातून दोन वेळा आम्ही मंकी हिलची संपूर्ण स्वच्छता करत असू.ही स्वच्छता म्हणजे मोठा कार्यक्रमच असायचा.आमच्याकडे वीस फुटी मोठी लोखंडी शिडी होती.ती शिडी आम्ही खंदकावरून आत जाण्यासाठी वापरत असू. माकडांना चुचकारून,खाणं दाखवून,प्रसंगी धमकावून इनडोअर सेक्शनमध्ये ट्रॅप केलं जाई. मग आम्ही सर्वजण झाडू,खराटे,बादल्या,विळे,खुरपी,बांबू,तारा,पक्कड,झाडाच्या फांद्या कापायची कात्री अशी अवजारं घेऊन अंतराळवीरांच्या थाटात स्प्रिंगसारख्या वर-खाली हलणाऱ्या शिडीवरून एक-एक पाऊल धीराने टाकत पंधरा फुटांचा पाण्याचा खंदक ओलांडून मंकी हिलवर जात असू.एकदा सकाळी आत गेलं की थेट दुपारी जेवायलाच बाहेर.जेवण उरकून पुन्हा मंकी हिल.कधी कधी संध्याकाळी मंकी हिलवर बसूनच वडापाव पार्टी व्हायची.हे काम कधी दोन,तर कधी तीन दिवसही चालायचं.आतलं गवत,वाळलेली पानं काढणं, लोकांनी टाकलेलं प्लास्टिक आणि इतर कचरा साफ करणं,
पाण्यावर तरंगणारी घाण,पानं वगैरे काढणं,वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या छाटणं, तुटलेले दोरखंड नव्याने बांधणं असं काम चाले. हा पाक्षिक कार्यक्रम उरकल्यावर मंकी हिल पुन्हा एकदा नव्यासारखं चकाकू लागे.सोयरे वनचरे - अनिल खैर,समकालीन प्रकाशन
एकदा संध्याकाळी निगडीच्या जकात नाक्यावरून कॉल आला.जकात भरायला थांबलेल्या एका गाडीच्या नंबर प्लेटला एक माकड कुत्रं बांधण्याच्या साखळीने बांधून कोणीतरी पसार झालं होतं.संध्याकाळची वेळ होती.
आम्ही तिथे पोहोचलो,तेव्हा ते माकड खूपच चिडलेलं होतं.जवळ गेलं की दात विचकून अंगावर धावून येत होतं.त्याने आम्हाला चांगलं तासभर झुलवलं.शेवटी रिंग स्टिकमध्ये पकडून पार्कला परतलो.त्याचं नाव आम्ही ठेवलं पांडू,पांडू मंकी हिलवर आला तेव्हा आमचं माकडांच कुटुंब तिथे सेटल झालेलं होतं.त्यामुळे आता त्याला ही जुनी मंडळी कसं स्वीकारतात याची मला उत्सुकता होती.पांडूला आधी दोन दिवस इनडोअर सेक्शनमधल्या क्वारंटाइनमध्ये ठेवलं.सगळी माकडं सतत इनडोअरमध्ये ये-जा करू लागली.नव्या पाहुण्याची ओळख करून घेऊ लागली.आक्क्याही नव्या मेंबरला भेटला. त्याला पाहून पांडू थोडासा दबला;पण आक्क्याने शांतपणे आपला उजवा हात पिंजऱ्याच्या गजातून पांडूच्या डोक्यावर ठेवला.जणू तो पांडूला अभय देत होता आणि त्याला कुटुंबात स्वीकारल्याचं सांगत होता.क्वारंटाइन पीरियड संपल्यावर पिंजऱ्याचं दार उघडून आम्ही पांडूला मंकी हिलवर मुक्त केलं.पांडूने संपूर्ण परिसराचा फिरून अंदाज घेतला.दरम्यान,आक्क्याने पिंपळाच्या झाडावरच्या आपल्या नेहमीच्या जागेवर बसून फांद्या गदागदा हलवल्या आणि आपणच ग्रूप लीडर असल्याचं दाखवून दिलं.पांडूसकट सर्वांनी ते मान्य केलं.मंकी हिलवर पांडू चांगल्यापैकी रुळू लागला.आक्क्याची नजर चुकवून तो मध्येच राणी किंवा राजीशी घसट करायचा.संपतपेक्षा तो आकाराने मोठा होता.त्याची ताकदही संपतपेक्षा जास्त होती.त्यामुळे राणी आणि राजीलाही हा नवा धाडसी सवंगडी मित्र आणि प्रियकर म्हणून आवडू लागला.हा प्रकार संपतला अजिबात सहन झाला नाही;पण पांडूशी खुल्लमखुल्ला वैर घेणं त्याला परवडणारं नव्हतं. तो नाराजी दाखवायचा,पण करू काही शकायचा नाही.
हळूहळू पांडू टोळीमध्ये दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला.हे स्थानांतर पाहणं मजेचं होतं.जंगलच्या कायद्याबद्दल खूप काही शिकवणारंही.आक्क्याच्या मान्यतेने कीपरकडून मिळालेल्या खाद्याचं इन्स्पेक्शन पांडू करायला लागला.पांडूचा 'ओके' मिळाल्यावर सर्वांत आधी आक्क्या खाऊन घेत असे.तो आधी लाल भोपळ्याच्या बिया कडाकड चावून खायचा. त्यानंतर केळी,डाळिंब,सफरचंद,मक्याचं कणीस, काकडी,टोमॅटो आणि शेवटी पालक,मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या.
इतर डेझर्ट खाऊन पोट भरल्यावर तो पिंपळावरच्या त्याच्या जागी बसून ख्ख्याँक ख्व्याँक असं ओरडत झोके घ्यायचा.त्यानंतर त्याची पट्टराणी गौरी जेवून घेत असे.
पांडू मंकी हिलवर येण्यापूर्वी गौरीपाठोपाठ उरलेल्या सगळ्यांचं एकत्र वनभोजन होत असे;पण पांडू आल्यापासून गौरीचं जेवण झाल्यावर तो जेवायला लागला. आपलं जेवण आटपून तो आक्क्या आणि गौरी बसलेल्या पातळीच्या खाली वडाच्या झाडावर जाऊन बसायचा.संपत,राणी आणि राजी मात्र कायमच उंबराच्या झाडावर अगदी जमिनीलगत वावरत असत.पांडूने त्या तिघांच्याही वरची पोझिशन स्वतःच्या उपजत गुणांनी मिळवली. आक्क्याची त्याबाबत काही तक्रार नव्हती.
संपत मात्र या प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ झाला होता. एक तर पांडूने त्याचं दोन नंबरचं स्थान तर पटकवलं होतंच,
पण आक्क्याचा डोळा चुकवून तो राजी किंवा राणीला एखाद्या फांदीआड किंवा टेकाडामागे भेटू लागला होता.
त्यामुळे आज ना उद्या संपत त्याला आडवा जाणार असं आम्हाला वाटू लागलं होतं. - आणि तसंच झालं.एकदा दुपारी जेवण उरकून सर्व माकडं आराम करत होती.
कोणाचं लक्ष नाही असं पाहून पांडू हलकेच झाडावरून उतरून टेकाडामागे गेला. राजीही त्याच्या पाठोपाठ गेली.झोपेचं सोंग घेत संपत हा सर्व प्रकार पाहत होता.
पांडू आणि राजीची प्रणयक्रीडा सुरू असतानाच संपत हळूच त्यांच्याजवळ पोचला आणि ची.. ची.. ची. असं किंचाळत खोट्या आविर्भावात पांडूपासून लांब पळू लागला.त्यामुळे राजी सोडून सर्वांनाच वाटलं की पांडूने संपतला हाणलं.झालं! टोळीचा म्होरक्या आक्क्यानेही त्वरित दखल घेतली आणि वीस-बावीस फुटांवरून सरळ पांडूपुढेच उडी घेतली.आक्क्याचे डोळे आग ओकत होते. मानेभोवतालच्या आयाळीचे केस रागाने विस्फारले गेले होते.त्याने पांडूवर जबरदस्त चाल केली.ती पांडूला झेपणं शक्य नव्हतं.आपण लढाई हरणार हे माहीत असूनही पांडूने उत्कृष्ट डाव टाकले;परंतु आक्क्याच्या ताकदीपुढे तो कमी पडू लागला.आक्क्याने त्याचं मानगुट पकडून त्याला थेट मंकी हिलच्या खंदकातच लोळवला.हा अपमान आणि पराभव पांडूला सहन झाला नाही.
आक्क्याच्या चाव्याने तो जखमी झाला होता,थंडगार पाण्यात पडून काकडलाही होता;पण तरीही बहुधा बुद्धीने सावध असावा.मंकी हिलच्या बाहेर असणाऱ्या बोगनवेलीच्या झाडाची एक फांदी आत झुकली होती.
पांडूने सर्व शक्तीनिशी त्या फांदीवर उडी घेतली आणि क्षणार्धात तो मंकी हिलवरून पळून गेला.आम्ही अतिशय कल्पकतेने उभारलेल्या मंकी हिलवरून पळून जाणं तसं सोपं नव्हतं.पण त्या वेळी आमच्या पार्कचे माळीबुवा नेमके दीर्घ रजेवर असल्याने बाहेरच्या फांद्या छाटायचं राहून गेलं होतं.हुशारीने तेवढी संधी साधून पांडू पसार झाला.आम्हाला सगळ्यांनाच त्याचं वाईट वाटलं.खूष झाला तो फक्त संपत !
३०.०८.२३ या लेखमालेतील पुढील लेख