* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कुणालाच हुकूम चालवणं आवडत नाही. No one likes to be dictated to.

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/१२/२३

कुणालाच हुकूम चालवणं आवडत नाही. No one likes to be dictated to.

एकदा मला 'अमेरिकन बायोग्राफी' ची डीन मिस इडा टाखेल बरोबर जेवण करण्याची संधी मिळाली.मी त्यांना सांगितलं की मी हे पुस्तक लिहितेय.त्यानंतर आम्ही या अंतिम महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करू लागलो की लोकांना कसं प्रभावित करावं.त्यांनी मला सांगितलं की जेव्हा ती ओवेन डी.यंगची जीवनगाथा लिहीत होती तेव्हा तिनं एका माणसाची मुलाखत घेतली जो तीन वर्षांपासून त्याच ऑफिसमध्ये बसत होता.ज्यात मिस्टर यंग बसत होते.या व्यक्तीचं म्हणणं होतं की या तीन वर्षांत त्याने ओवेन डी.यंगना कुणालाही आदेश देताना ऐकले नाही.ते नेहमी सल्ला देत,आदेश नाही.ओवेन डी.यंग कधीच असं म्हणत नसत,"असं करा वा तसं करा," वा " हे करू नका ते करू नका." त्याऐवजी ते म्हणत,"तुम्ही यावर विचार करू शकता." किंवा "हे काम करावं असं तुम्हाला वाटतं का ?" बरेचदा ते पत्र डिक्टेट केल्यावर आपल्या कर्मचाऱ्याला विचारत असत,"तुम्हाला हे कसं वाटतंय?"आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याद्वारे लिहिलं गेलेलं पत्र वाचल्यावर ते म्हणत,"कदाचित हे वाक्य असं लिहिणं जास्त चांगलं राहील." ते लोकांना स्वतः आपली चूक सुधारण्याची संधी देत असत.त्यांनी कधी आपल्या हाताखालच्या लोकांना काम करण्याची आज्ञा दिली नाही.त्यांनी लोकांना काम करण्याची आज्ञा दिली नाही.ते लोकांना आपलं काम करू देत,


जेणेकरून ते आपल्या चुकांपासून स्वतःच शिकत.या त-हेच्या तंत्राने समोरच्याला आपली चूक सुधारणे सोपे जाते.त्यामुळे त्याच्या सन्मानाला ठेच पोहोचत नाही आणि त्याच्यात आपण महत्त्वपूर्ण आहोत ही भावना जागृत होते. त्यामुळे विद्रोहाची नव्हे तर सहयोगाची भावना प्रबळ होते.


कडक आदेश दिल्याने जी आक्रोशाची भावना निर्माण होते ती बराच दीर्घ काळपर्यंत कायम राहते,मग भलेही तो आदेश स्पष्टपणे चूक दुरूस्त करण्यासाठी दिला गेला असेल.


डॅन सँटारॅली व्यामिंग,पेनसिल्वानियाच्या एका व्होकेशनल स्कूलमध्ये शिक्षक होते.त्यांनी आमच्या वर्गात सांगितलं की त्यांच्या एका विद्यार्थ्याने एकदा शाळेच्या बाहेर चुकीच्या जागी कार पार्क केली,ज्यामुळे रहदारीत अडचण येत होती.दुसरा एक शिक्षक वर्गात आला आणि त्याला रागावत त्याने विचारलं,"कुणाची कार रस्त्यात उभी आहे ?" जेव्हा कारवाला मुलगा उभा राहिला,तेव्हा त्या शिक्षकानं ओरडून म्हटलं, "त्या कारला तिथून तत्काळ हटव,नाहीतर मी तिच्या चारी बाजूंना साखळी बांधून बाहेर फेकून देईन." चूक त्या विद्यार्थ्याचीच होती.त्याला तिथे कार उभी करायलाच नको होती.परंतु त्या दिवसापासून केवळ तो विद्यार्थीच नव्हे तर त्या वर्गातली सगळी मुलं त्या शिक्षकाचा द्वेष करू लागली.या घटनेनंतर त्यांनी आपल्याकडून पूर्णपणे त्या शिक्षकास बेजार करण्याचे आणि त्याला त्रास देण्याचे प्रयत्न केले.

या गोष्टीला दुसऱ्या पद्धतीने सांगता आले असते.तो शिक्षक मैत्रीपूर्ण स्वरात विचारू शकला असता,"रस्त्यात उभी केलेली कार कुणाची आहे?" आणि त्यानंतर ही सूचना देऊ शकला असता की जर ती कार तिथून हटवली तर इतर कार्सना येण्याजाण्यास सुविधा होईल.हे ऐकून तो विद्यार्थी आनंदाने कार हटवायला तयार झाला असता आणि तो व त्याचे सहपाठी त्या शिक्षकावर अजिबात चिडले नसते.


प्रश्न विचारल्यावर केवळ आदेशच आनंददायक होत नाही तर समोरच्याची रचनात्मकता पण प्रेरित होते.जर लोकांना असं वाटलं की तो निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग आहे,तर ते अधिक चांगल्या तऱ्हेने ते काम करतील.


इयान हे आफ्रिकेतल्या मॅकडोनॉल्ड मशीनचे पार्ट बनवायच्या कारखान्यात जनरल मॅनेजर होते.त्यांना एक मोठी ऑर्डर मिळणार होती.अट ही होती की त्यांना खूपच कमी वेळात माल पुरवायचा होता.त्यांना हे माहीत होतं की ते इतक्या कमी वेळात मालाचा पुरवठा करू शकणार नाहीत.कारखान्यात आधीच्या ऑर्डर्सचा माल तयार होत होता आणि या मोठ्या ऑर्डरची समयसीमा इतकी कमी होती की हे काम अशक्य वाटत होतं.इयानने मजूरांना कामाची गती वाढवा आणि उत्पादन करा असं सांगितलं नाही.त्याऐवजी त्याने सर्वांना एकत्रित केले आणि पूर्ण परिस्थिती विशद केली.त्याने सांगितले की जर ही ऑर्डर त्यांना मिळाली तर त्यांच्या कंपनीला खूप लाभ होईल आणि जर ती वेळेवर दिली गेली तर मजूरांनासुद्धा त्यामुळे लाभ होईल.मग त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली.


"आम्ही असं काही करू शकतो का की आम्हाला ही ऑर्डर मिळेल?""कुणाच्या डोक्यात असा काही उपाय आहे का,ज्यामुळे ही ऑर्डर घेणे आणि वेळेवर पूर्ण करणे शक्य होईल?" "असा काही उपाय आहे का ज्यामुळे आम्ही आमच्या कामाच्या वेळात बदल करून जी समयसीमा दिलीय,ती पूर्ण करू?" 


कर्मचाऱ्यांनी अनेक उपाय सुचवले आणि त्यांनी ती ऑर्डर घ्यायलाच हवी असे आग्रहाने म्हटले. त्यांनी 'आम्ही हे करू शकतो.' या भावनेने काम केलं,त्यामुळे त्यांना ऑर्डर तर मिळलीच,पण मालाचे उत्पादन आणि पुरवठा अगदी वेळेवर झाला.


केवळ थेट आदेश देण्याऐवजी प्रश्न विचारा.

३०.११.२३ या लेख मालेतील पुढील भाग..


आदरणीय डॉ.रवींद्र श्रावस्ती यांच्याकडून घेण्यात आलेली ही वाचनासंदर्भातील चिंतनशील अशी नोंद


१९५३ मध्ये चार्ली मंगर २९ वर्षांचे होते.त्यांचा नुकताच घटस्फोट झाला होता.राहायला घर नव्हते.तत्कालीन काळात अमेरिकेत घटस्फोट हा मोठा सामाजिक कलंक मानला जात असे..घटस्फोटानंतर अचानक लगेच त्यांचा वर्षांचा मुलगा टेडी याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.

त्यांच्या मुलाचा कॅन्सर असाध्य होता.त्यांच्याजवळ वैद्यकीय विमा नव्हता.


मुलाच्या कॅन्सर उपचारासाठी चार्ली मंगर यांचे सगळे पैसे संपले.ते कर्जबाजारी झाले.चार्ली रोज टेडीला हॉस्पिटलमध्ये भेटायचे -- आणि मग बाहेर येऊन रडत रस्त्यावर फिरायचे.टेडीचे वयाच्या ९ व्या वर्षी निधन झाले.चार्ली आतून तुटले,घटस्फोट आणि नंतर लगेच पोटच्या गोळ्याला गमावले.राहते घर गेले,

संसार तुटला, कर्जबाजारी झाले.अशा परिस्थितीत  ९९.९९% लोक दारू,ड्रग्ज किंवा आत्महत्येकडे वळले असते. चार्ली मंगेर यांनी असे काहीच केले नाही.त्यांना वाचनाची भारी आवड होती.सतत पुस्तकं वाचण्याची सवय असल्यामुळे त्यांना कदाचित पुस्तकांमधून या वाईट काळाला तरुन जाण्याचे धैर्य मिळाले असावे.


वयाच्या ५२ व्या वर्षी डोळ्यांच्या अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या एका डोळ्याला अंधत्व आले.हे अंधत्व इतके गंभीर होते की,त्यांची एक दिवस दोन्हीं डोळ्यांनी पूर्णतः अंध होण्याची शक्यता होती.


अशा सगळ्या घडामोडी चालू असतांना चार्ली मंगर यांचे वाचन वेड अधिक जोमाने वाढले होते.ते सतत नवनवीन गोष्टी शिकत असत त्यासाठी ते सतत नवनवीन पुस्तक वाचून काढीत.आपल्याला पूर्ण अंधत्व येऊ शकते त्यामुळे नंतर पुस्तकं वाचता येणार नाहीत या शक्यतेचा सामना करण्यासाठी  त्यांनी ब्रेल लिपी शिकून घ्यायला सुरुवात केली होती.


पण तरीही त्यांचा दुसरा डोळा शाबूत राहिला. मरणाच्या दिवसापर्यंत ते दररोज (एकाच डोळ्याने) १५ तासाहून अधिक वेळ वाचन करत असत. 


 बर्कशायर हॅथवेचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांचे काम हे मुख्यत्वे खूप वाचन करणे आणि चिंतन करणे हेच होते.

त्यामुळे त्यांची निर्णयक्षमता बेतोड होती.आणि त्यांच्या निर्णयांना वॉरेन बुफे सुद्धा च्यँलेंज करत नसत. 


पुस्तकांविषयी बोलतांना चार्ली मंगर म्हणत:


"माझ्या संपूर्ण आयुष्यात,मी असे कोणतेही ज्ञानी लोक पहिले नाहीत जे खूप वाचन करत नाहीत - एकही नाही,शून्य.वॉरन किती वाचतो - मी किती वाचतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.आमच्या आजूबाजूच्या लोकांना वाटते की मी आम्ही दोन पाय आणि दोन हात चिकटलेले पुस्तकं आहोत." 


चार्ली मंगर ९९ वर्षे जगले.वैयक्तिक आयुष्यातील संकटांना,आरोग्याच्या प्रश्नांना हसत हसत सामोरे गेले.

त्यांच्या बोलण्यात, वागण्यात एखाद्या अध्यात्मिक दृष्ट्या प्रगल्भ माणसाची उंची होती.ते नेहमी आनंदी असत. आपल्या ज्ञानाचा,वाचनाचा वापर फक्त अर्थार्जनासाठीच नाही तर एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी त्यांनी केला.

वॉरेन बफे हे चार्ली मंगर यांना आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट आणि इंटेलिजन्ट समजत.वॉरेन बफे यांच्या बरोबर मंगर यांनी बरेच दिवस काम केले आणि गुंतवणूक विश्वावर आपला ठसा उमटवला.


स्वतः वर इतके संकटं येऊनही ते पुन्हा कसे उभे राहू शकले असे विचारल्यावर ते म्हणाले होते, "सेल्फ पिटी म्हणजे स्व-सहानुभूती म्हणजे आपल्या संकटकाळात जगाची किंवा स्वतःची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न ही मोठी विनाशकारी प्रवृत्ती असते"


त्यांच्या भाषेत: - "सामान्यपणे,मत्सर,राग,सूड आणि स्व-सहानुभूती या विचारांच्या विनाशकारी पद्धती आहेत.

स्व-सहानुभूती (सेल्फ पिटी) हा तर वेडेपणा आहे.प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्व-सहानुभूतीच्या वेडेपणात वाहून जातांना बघाल,तेव्हा त्याचे कारण काय आहे याची मला पर्वा नाही,तुमचे मूल कर्करोगाने मरत आहे, तुमचे सगळे जग तुमच्याभोवती ढासळत आहे. या वेळी स्व-सहानुभूती किंवा जगाची सहानुभूती शोधून तुमची परिस्थिती सुधारणार नाहीये. संकटांना सामोरे जाण्याचा हा एक हास्यास्पद मार्ग आहे.तुमच्या जीवनात तुमच्यावर भयंकर वार होतील,नियती तुमच्यावर भयानक रीतीने अन्याय करेल तरीसुद्धा काहीही झाले तरी स्व सहानुभूतीने काहीच फरक पडत नाही. 


संकटकाळात काही लोक आणखी भरारी घेऊन उठतात आणि काही लोक कोसळून पडतात. स्व-सहानुभूती शक्यतो तुम्हाला कोसळवणार हे लक्षात घ्या.तिथे मला एपिक्टेटसची वृत्ती सर्वोत्तम वाटते.

आयुष्यातील प्रत्येक दुर्घटना ही तुम्हाला पुन्हा नाविन्याची उभारी घेण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे असे त्याला वाटत होते.जीवनातील प्रत्येक दुर्घटना म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची संधी घेऊन येते आणि तुमचे काम स्व-सहानुभूतीमध्ये बुडून जाणे नाही,तर त्या भयंकर आघाताचा आपल्या आयुष्याला अधिक विधायक पद्धतीने आकार देण्यासाठी उपयोग करणे हे आहे."


चार्ली मंगर यांना विनम्र अभिवादन.त्यांच्या शिकवणी आयुष्यभर साथ देतील.