पीट बार्लो माझा जुना मित्र होता.तो सर्कसमध्ये काम करत असे.त्याने आपलं पूर्ण जीवन सर्कस अन् मनोरंजक शो करण्यात घालवलं होतं. जेव्हा पीट नवीन कुत्र्यांना प्रशिक्षण देत असे, तेव्हा मला ते दृष्य पाहायला आवडत असे.मी बघत असे की जेव्हा कुत्र्यात थोडी सुधारणा झाली,की पीट त्याची पाठ थोपटायचा,त्याची स्तुती करायचा आणि त्याला मासाचा तुकडा द्यायचा.ही काही नवी गोष्ट नव्हती.जनावरांना प्रशिक्षित करणारे लोक पूर्व कालापासून याच तंत्राचा वापर करत आले आहेत.
मला नवल वाटतं की आम्ही कुत्र्यांना बदलवणाऱ्या याच कॉमनसेंसच्या तंत्राचा वापर माणसांना बदलायला का करीत नाही.आम्ही चाबकाच्या भितीऐवजी कौतुकाचा वापर का करीत नाही? आम्ही टीकेऐवजी प्रशंसेचा उपयोग का करीत नाही ? आम्हाला थोड्याशा सुधारणे
साठीसुद्धा स्तुतीचा वापर करायला हवा. यामुळे समोरच्या व्यक्तीला सुधारण्यात प्रोत्साहन व प्रेरणा मिळते.आपलं पुस्तक 'आय हॅवन्ट मच, बेबी बट आय ॲम ऑल आय गॉट यात मनोवैज्ञानिक जेस लायर लिहितात,"स्तुती मानवाच्या मनासाठी सूर्याच्या सुखद प्रकाशासारखी असते.त्याविना त्याच्या व्यक्तित्वाचं फूल फुलत नाही.
तरीही आपल्यापैकी बहुतांश लोक इतर
लोकांबरोबरच्या आपल्या व्यवहारात निंदेच्या बोचऱ्या हवेला उत्तेजन देतात आणि आपल्या सहकाऱ्यांना प्रशंसेच्या ऊबेपासून वंचित ठेवतात."
मी जेव्हा आपल्या आयुष्यात मागे वळून पाहतो, तेव्हा मला असं आढळतं की प्रशंसेच्या काही शब्दांनी माझं भविष्य पूर्ण बदलून दिलं होतं. तुम्ही हीच गोष्ट आपल्या जीवनाबाबत नाही का म्हणू शकणार? इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत,ज्यामुळे प्रशंसेच्या जादूच्या छडीने कुणाचं जीवनच बदलून गेलं.उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी दहा वर्षाचा एक मुलगा नेपल्सच्या एका फॅक्टरीत काम करत होता.तो एक गायक होऊ इच्छित होता,पण त्याच्या संगीत शिक्षकाने त्याच्या उत्साहावर पाणी घालत म्हटले,
,"तू कधीच गायक बनू शकत नाही.तुझ्या आवाजात काही दम नाही.असं वाटतं की जणू हवेने शहरं खाली पडताहेत." पण,त्या मुलाच्या आईने,जी एक गरीब शेतकरी होती,तिने आपल्या मुलाला कवटाळले.त्याची स्तुती केली आणि त्याला म्हटलं,तिला ठाऊक आहे की तो एक गायक बनू शकतो आणि त्याच्यात सुधारणा होते आहे.एवढंच नाही तर आपल्या मुलाच्या संगीत प्रशिक्षणाचे पैसे जमवायला तिने अनवाणी राहणं पसंत केलं.गरीब मातेने कौतुक केल्याने आणि प्रोत्साहनामुळे त्या मुलाचं जीवन बदलून गेलं.त्याचं नाव एनरिको कैसरो होतं आणि तो आपल्या काळचा सर्वांत मोठा व प्रसिध्द ऑपेरा गायक झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लंडनचा एक युवक लेखक बनू इच्छित होता.पण त्याला असं भासत होतं की प्रत्येक गोष्ट त्याच्या विरोधात होती. तो फक्त चारच वर्षं शाळेत गेला होता.त्याचे वडील कर्ज न चुकवल्यामुळे जेलमध्ये गेले होते आणि तो अनेकदा उपाशी राहत असे.
शेवटी,त्याला उंदरांचा सुळसुळाट असलेल्या एका गोदामात बाटल्यांवर लेबल लावण्याचं काम मिळालं.
लंडनच्या झोपडपट्टी व गटाराच्या वातावरणातून आलेल्या अजून दोन मुलांबरोबर तो रात्री गोदामात झोपी जात असे. त्याला आपल्या लेखनाच्या क्षमतेवर इतका कमी विश्वास होता,की त्यानं आपली हस्तलिखिताची पहिली प्रत रात्रीच्या अंधारात टपालाच्या पेटीत गुपचुपपणे टाकली होती,जेणेकरून त्याची कुणी टर न उडवो.
एकामागोमाग एक त्याच्या कथा नाकारल्या गेल्या.शेवटी मात्र तो महान दिवस उजाडला जेव्हा त्याची एक कथा स्वीकारली गेली.हे खरं आहे की त्याला तिच्यासाठी एकही पैसा मोबदला म्हणून मिळाला नाही,पण एका संपादकाने त्याची स्तुती केली.एका संपादकाने त्याला मान दिला.तो इतका रोमांचित झाला होता की रस्त्यांवर तो आनंदाने बागडत फिरत होता आणि त्याच्या गालांवरून आनंदाश्रू ओघळत होते.आपल्या कथेला मिळालेल्या प्रशंसेमुळे,सन्मानामुळे त्याचं जीवनच बदलून गेलं.कारण त्याला जर हे प्रोत्साहन मिळालं नसतं तर तो आयुष्यभर त्या उंदरांनी भरलेल्या गोदामात बाटल्यांना लेबलं लावत बसला असता.तुम्ही कदाचित त्या युवकाचं नाव ऐकलं असेल.त्याचं नाव होतं चार्ल्स डिकन्स.
लंडनचाच आणखी एक किशोर ड्राय गुड्स स्टोअरमध्ये कारकून होता.त्याला पहाटे पाच वाजता उठावं लागत असे,दुकानात झाडू मारावा लागत असे आणि रोज चौदा तास अतिशय काबाडकष्ट करावे लागत.दोन वर्षे हे बेकार काम करून करून तो कंटाळून गेला होता.एक दिवशी तो सकाळी उठला आणि नाइलाजाने वाट न बघता,पंधरा मैल चालत जाऊन आपल्या आईला भेटायला गेला,जी हाऊसकीपरचं काम करीत होती.तो अतिशय दुःखी होता.त्याने आईला आपली दुःखद कहाणी सुनावली.तो रडत होता.त्यानं हेही सांगितलं की त्या दुकानात त्याला अजून काही काळ काम करावं लागलं तर तो आत्महत्या करेल.मग त्याने आपल्या जुन्या शाळा शिक्षिकेला एक दीर्घ आणि दुःखद पत्र लिहिलं.त्या पत्रात त्याने लिहिलं होतं की त्याचं हृदय विदीर्ण झालंय आणि आता तो जगू इच्छित नाही.त्याच्या जुन्या शिक्षिकेने त्याची स्तुती केली अन् त्याला आश्वस्त केलं की तो खरोखरंच बुध्दिमान आहे आणि चांगल्या जीवनाचा हक्कदार आहे.तिने त्याला शाळा शिक्षकाचे काम देण्याचा प्रस्तावही दिला.
या प्रशंसेनं त्या मुलाचे भविष्यच बदलून गेले आणि त्यामुळे इंग्रजी साहित्यावर अमीट प्रभाव पडला.कारण नंतर याच किशोरानं अनेक उत्तम पुस्तकं लिहिली आणि आपल्या लेखणीच्या जोरावर लाखो-करोडो डॉलर्स कमावले.तुम्ही कदाचित या लेखकाचंही नाव ऐकलं असेल. त्याचं नाव होतं एच.जी. वेल्स.
टीकेऐवजी प्रशंसा ही बी.एस.स्किनरच्या शिक्षणाची मूळ अवधारणा होती.या महान समकालीन मनोवैज्ञानिकाने जनावरे व मानवांवर केलेल्या प्रयोगांनी हे सिध्द केलं की जेव्हा टीका कमी अन् प्रशंसा अधिक असते तेव्हा लोकांना चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि दुर्लक्षामुळे चांगली कामं कोमेजून जातात.
रॉकी माउंट,नॉर्थ कॅरोलिनाचे जॉन रिंगेल्सपॉनी आपल्या मुलांवर हाच प्रयोग करून पाहिला.जसं बहुतांश परिवारांमध्ये होतं,तसं या परिवारामध्येसुध्दा मुलांशी संवाद फक्त त्यांच्यावर ओरडतानाच होतो आणि अशा बहुतांश वेळी अशा प्रकारानंतर मुलं सुधारण्याऐवजी बिघडतातच.या समस्येला सोडवायचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता.मिस्टर रिंगेल्सपॉने या स्थितीला सुधारायला आमच्या अभ्यासक्रमात शिकलेल्या सिध्दान्तांना पाळण्याचा निश्चय केला.
त्यांनी सांगितलं - "आम्ही त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याऐवजी त्यांची स्तुती करण्याचा निर्णय घेतला.हे सोपं नव्हतं कारण ते अनेकदा गडबडीचं काम करीत.
आम्हाला स्तुती करण्यालायक काम शोधायला कठीण गेलं. आम्ही अशा गोष्टी शोधून काढल्या आणि एक दोन दिवसातच त्यांच्या खोड्या कमी झाल्या.जी घोट्याळ्याची कामे ते करत होते,तीसुद्धा कमी झाली.नंतर आणखी काही चुका कमी झाल्या.ते आमच्या प्रशंसेच्या लायक बनण्याचा प्रयत्न करीत होते.ते योग्य कामे करण्यासाठी खूप मेहनत करीत होते.आम्हा दोघांनाही यावर विश्वास बसत नव्हता.उघडच आहे की असं खूप काळ चाललं नाही,पण एकदा त्यांच्यात हा बदल घडून आल्यावर त्यांचा सामान्य व्यवहार जसा विकसित झाला,तो आधीपेक्षा सरस होता.आता आम्हाला त्यांच्यावर ओरडण्याची,रागावण्याची गरज नव्हती.मुलं चुकीची कामं करण्याऐवजी योग्य कामं करीत होती.कारण मुलांकडून झालेल्या चुकांवर टीका करण्यापेक्षा त्यांच्यात झालेल्या किंचित का होईना,सुधारणेची प्रशंसा केली गेली."
हेच तत्त्व नोकरीतसुध्दा उपयुक्त ठरतं.वुडलँँड हिल्स इथल्या कीथ रोपरने या सिध्दान्ताला आपल्या कंपनीत एका परिस्थितीत आजमावून पाहिलं.त्याच्या प्रिंट शॉपमध्ये एक असं काम आलं जे अतिशय चांगल्या प्रतीचं होतं.ज्या प्रिंटरने ते काम केलं होतं त्याच्याकडे एक नवीन कर्मचारी आला होता,ज्याला नोकरी सांभाळणं कठीण झालं होतं.त्याचा वरिष्ठ त्याच्या नकारात्मक वागणुकीमुळे त्रस्त होता आणि गंभीरतेनं त्याला नोकरीतून काढून टाकायचा विचार करीत होता.जेव्हा मिस्टर रोपरला या स्थितीबद्दल सांगितलं गेलं तेव्हा ते स्वतःत प्रिंट शॉपमध्ये गेले आणि त्या तरुणाशी बोलले.ते म्हणाले की त्याचं काम बघून ते एवढे खुश झाले आहेत आणि त्यांनी हेसुद्धा सांगितलं की मागच्या काही काळापासून त्यांच्या दुकानात होणाऱ्या कामांपैकी हे काम उत्कृष्ट होतं.त्यांनी हे स्पष्ट केलं की त्याचं काम का श्रेष्ठ होतं आणि कंपनीसाठी त्या तरुणाचं योगदान किती महत्त्वाचं होतं.तुम्हाला असं वाटतं का,की यामुळे कंपनीसाठी त्या तरुण प्रिंटरच्या वागणुकीत बदल घडून आला? काहीच दिवसात चमत्कार झाला.त्याने आपल्या अनेक सहकाऱ्यांना या चर्चेबद्दल सांगितलं आणि म्हटलं की कंपनीत कुणी तरी आहे जो चांगल्या कामाची कदर करतो.त्या दिवसानंतर तो एक प्रामाणिक आणि समर्पित कर्मचारी आहे. मिस्टर रोपरने त्या युवकाशी लबाडी करून असं नाही म्हटलं, "तुझं काम चांगलं आहे." त्यांनी स्पष्टपणे त्याचं काम का चांगलं आहे हे त्याला सांगितलं.क्षुद्र,लबाड बोलण्याऐवजी काही विशेष गुणांबद्दल स्तुती केली गेली होती,म्हणून ही स्तुती त्या युवकासाठी अर्थपूर्ण झाली होती. प्रत्येकास स्तुती आवडते,पण ही स्तुती जेव्हा एखाद्या खास गुणाला घेऊन केली जाते तेव्हा आम्हाला कळतं की,स्तुती प्रामाणिक आहे, समोरचा आम्हाला मूर्ख बनवत नाही आहे किंवा आम्हाला फक्त खुश करायला बोलत नाही आहे.
लक्षात ठेवा,आम्ही सगळेच प्रशंसा आणि सन्मानाचे भुकेले आहोत आणि ते मिळवायला काहीही करू शकतो.पण आम्हाला कुणालाच खोटी स्तुती केलेली आवडत नाही.कुणालाच लबाडी आवडत नाही.या पुस्तकातले सिद्धान्त तेव्हाच परिणामकारक ठरतील जेव्हा तुम्ही खऱ्या दिलाने आपलं म्हणणं सांगाल.मी तुम्हाला लबाडी करण्याच्या युक्त्या सांगत नाहीये,जीवन नवीन तन्हेने जगायचा सिध्दान्त शिकवतोय.तुम्ही लोकांना बदलण्याबद्दल विचार करताय का? जर तुम्ही आणि मी लोकांना प्रेरित करू शकू,ज्यांच्या संपर्कात आम्ही राहतो,तर आम्हाला हे कळून येईल की त्यांच्यात किती शक्यता,किती खजिने सुप्तावस्थेत आहेत. आम्ही त्यांना बदलण्यापेक्षा अधिक काहीतरी करू शकतो.
आम्ही अक्षरशः त्यांचा कायापालट करू शकतो.
अतिशयोक्ती? तर मग विलियम जेम्सचे बुध्दिमत्तापूर्ण शब्द ऐका,जे अमेरिकेचे सर्वश्रेष्ठ मनोवैज्ञानिक व दार्शनिकांपैकी एक आहेत : (डेल कार्नेगी-मित्र जोडा- मंजुल पब्लिशिंग हाऊस-अनु- कृपा कुलकर्णी )
'आम्ही जे होऊ शकतो,त्याच्या तुलनेत आम्ही फक्त अर्धेच जागृत झालेले असतो.आम्ही आपल्या क्षमतांचा फार कमी भागच वापरू शकतो.आम्ही आपल्या शारीरिक व मानसिक योग्यतांचा खूप लहानसा हिस्सा उपयोगात आणतो.मानव आपल्या संभावना पूर्ण कामात आणत नाही.त्याच्यापाशी खूपशा अशा क्षमता आणि शक्ती असतात,ज्यांचा उपयोग करण्यात तो सर्वसाधारणतः असफल ठरतो.'होय,तुमच्यातसुध्दा अशी बलस्थानं आणि क्षमता आहेत ज्यांचा उपयोग करण्यात तुम्ही सर्वसाधारणपणे असफल असता.ज्या शक्तींचा तुम्ही पूर्णपणे उपयोग करीत नाही आहात,त्यापैकी एक आहे लोकांची स्तुती करण्याची आणि त्यांना प्रेरित करण्याची जादूई क्षमता.ज्यामुळे त्यांच्यातल्या शक्यतांचे दोहन केले जाईल.
टीकेच्या तुषारांनी योग्यता कोमेजून जाते,पण प्रोत्साहनाचं खतपाणी मिळाल्यावर ती बहरास येते.थोड्याशा सुधारण्याची सुद्धा स्तुती करा आणि प्रत्येक सुधारण्याची स्तुती करा. दिलखुलास मुक्त कंठानी स्तुती करा.
१६.१२.२३ या लेखमालेतील पुढील भाग..