ॲलेक इडन ..
विज्ञानातील अनेक संकल्पनांचा शोध भारतातच लागला,असे दावे केले जातात.पण त्या संकल्पनांचं मूळ शोधत पुरावे गोळा करण्याचे कष्ट आपल्या कोणी इतिहासप्रेमीने घेतल्याचं ऐकिवात नाही.या पार्श्वभूमीवर परदेशातला एखादा शास्रज्ञ उठतो आणि परक्या देशातल्या भलत्या ज्ञानशाखेच्या शास्त्रज्ञाचं मूळ शोधत फिरतो,ही गोष्ट केवळ अजब म्हणायची
२५ मे १८४२ हा दिवस विज्ञानाच्या क्षेत्रातील एक अविस्मरणीय दिवस मानला जायला हवा. त्या दिवशी एका पाथरवटाच्या मुलाने प्रागमधील रॉयल बोहेमियन सोसायटीच्या सभेत एका शोधनिबंधाचं वाचन केलं.त्या निबंधाचं शीर्षक होतं,'ऑन द कलर्ड लाइट्स ऑफ द डबल स्टार्स अँड सर्टन अदर हेवनली बॉडीज'. शोधनिबंध वाचणाऱ्या तरुण शास्त्रज्ञाचं नाव होतं क्रिस्तियान डॉपलर हा शोधनिबंध दीडशे वर्षांनंतरही विज्ञानात एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल असं त्या काळात स्वतः डॉपलरलासुद्धा वाटलं नसेल!
'द्वैती तारे आणि इतर आकाशस्थ पिंडांच्या रंगीत प्रकाशाविषयी' असं अवघड नामाभिधान मिरविणाऱ्या या सिद्धांतात आज ज्याला 'डॉपलर तत्त्व' असं म्हटलं जातं ती संकल्पना अतिशय सोप्या भाषेत मांडलेली होती.या संकल्पनेचा उपयोग पुढे संरक्षण साधनांमध्ये उपयुक्त ठरलाच;पण त्याखेरीज खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान,
दिशादर्शन,भूशास्त्र आणि मुख्यतः वैद्यकाच्या अनेक शाखांनी या डॉपलर परिणामाचा फायदा करून घेत प्रगती केली. वैद्यकशास्त्रात 'डॉपलर सोनोग्राफी' हा शब्द परवलीचा बनला आहे.प्रसूतिशास्त्रात गर्भाच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी ते आज अनिवार्य साधन आहे.याशिवाय हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे विकार,मेंदू आणि चेतासंस्थेचं रोगनिदान,तसंच शस्त्रक्रिया अशा अनेक ठिकाणी डॉपलर परिणाम कळीचं काम करतो आहे.त्यामुळेच आज सर्वसामान्यांच्या तोंडीही 'डॉपलर सोनोग्राफी' हा शब्द सहज ऐकू येतो. पण हा डॉपलर कोण होता,असं विचारलं तर आपल्या सर्वांचीच बोलती बंद होऊन जाईल. जगभरात;एवढंच नव्हे,तर डॉपलरच्या मायदेशी- ऑस्ट्रियातही १९८८ पर्यंत डॉपलर जवळपास विस्मरणात गेला होता.डॉपलरच्या संकल्पना वापरल्या जात होत्या;पण त्याचा इतिहास मात्र जग विसरलं होतं.
तो इतिहास पहिल्यांदा जगासमोर आणला तो ॲलेक इडन या अमेरिकी न्यूरोसर्जनने प्रा.इडन आपल्या कामात डॉपलर तंत्रज्ञानाचा वापर करत होते.त्याचा वापर करून अत्याधुनिक तंत्र विकसित करण्यातही त्यांचा हातभार होता.उदा.गर्भावस्थेत मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्याने गर्भात दोष तयार होतो आणि परिणामी गर्भ दगावतो.गर्भ दगावण्याच्या एकूण घटनांमध्ये अशा घटनांचं प्रमाण तब्बल पाच टक्के होतं.हे प्रमाण कमी करता यावं यासाठी इडन यांच्यासह अन्य दोन संशोधकांनी सोनोग्राफी आणि डॉपलर परिणाम एकत्र करून एक नवं तंत्र विकसित केलं होतं.या तंत्राबद्दल व्याख्यान देण्यासाठी इडन यांना डल्लास बेधील टेक्सास विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातून आमंत्रण आलं होतं.डॉ.कॅप क्लार्क या इडन यांच्या गुरूंनीच ही व्याख्यानमाला आयोजित केली असल्याने ते आमंत्रण स्वीकारणं इडन यांना भाग होतं.व्याख्यान त्यांनी विकसित केलेल्या नव्या तंत्राबद्दल द्यायचं असलं तरी त्याची सुरुवात डॉपलर तंत्राबद्दल आणि डॉपलर या शास्त्रज्ञाबद्दल माहिती देऊन करावी,असं इडन यांच्या मनात आलं.डॉपलरबद्दल माहिती सांगून त्याच्या संशोधनातून नवनवीन तंत्रं कशी विकसित होत गेली हे सांगणं आपलं कर्तव्य आहे असं त्यांना वाटत होतं.म्हणून त्यांनी डॉपलरबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की डॉपलरचं खरं नाव आणि जन्मतारखेपासूनच माहितीत गोंधळ आहे.त्याचं जन्मगाव,जन्मतारीख आणि जन्मनाव याबाबत एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकासह इतर चार मान्यवर संदर्भग्रंथांमधील माहितीत ताळमेळ नव्हता. काही ठिकाणी डॉपलरचं नाव योहान क्रिस्तियान डॉपलर असं होतं,तर इतरत्र ते क्रिस्तियान योहान तेच जन्मतारखेबद्दल काही ठिकाणी डॉपलरचा जन्म सॉल्झबुर्ग इथे १८०३ मध्ये झाला,अशी माहिती मिळत होती,तर इतरत्र हे वर्ष १८०५ किंवा १८०८ असंही नोंदवलेलं होतं. त्याचं वर्णन कुठे जर्मन पदार्थवैज्ञानिक आणि गणिती असं केलं गेलं होतं,तर कुठे त्याची नोंद ऑस्ट्रियन पदार्थवैज्ञानिक अशी होती.असाच घोळ त्याच्या मृत्यूच्या स्थळाबद्दल आणि तारखेबद्दलही होताच.त्याचा मृत्यू व्हेनिसमध्ये झाला,असं बहुतेक माहितीस्रोतांचं म्हणणं असलं तरी तो व्हिएन्ना किंवा प्रागमध्ये मरण पावला,अशीही माहिती उपलब्ध होती.दुसरीकडे इडन आपल्या विद्यार्थिदशेपासून जो वैद्यकीय शब्दकोश वापरत होते त्यात डॉपलर परिणामाला अमेरिकन गणिती क्रिस्तियान डॉपलर (१८०३- १८५३) यांचं नाव देण्यात आलं होतं. दुसऱ्या एका विश्वकोशात डॉपलरचं वर्णन 'ऑस्ट्रियात जन्मलेला गणिती आणि पदार्थवैज्ञानिक' असं होतं.मात्र,त्यापुढे त्याने अमेरिकेत राहून केलेल्या कार्याबद्दल माहिती होती,पण डॉपलरच्या अमेरिकेतल्या वास्तव्याबद्दलची माहिती इडन यांना कुठेच आढळली नाही.चार-पाचशे वर्षांचा (गोरा) इतिहास प्राणपणाने जपणाऱ्या अमेरिकेत कुठेही डॉपलरचं स्मारक किंवा त्याच्या नावाची एकही संस्था नाही हे कसं,हा प्रश्नही इडनना सतावू लागला.
त्यामुळे व्याख्यानाची तयारी बाजूला ठेवून इडन यांनी चक्क डॉपलर यांची माहिती काढण्यासाठी अभ्यास रजा घेऊन युरोपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.सॉल्झबुर्ग,
व्हिएन्ना,प्राग आणि व्हेनिस ही चार शहरं डॉपलरच्या इतिहासाशी जोडलेली होती.ही शहरं प्रख्यात असली तरी ती पर्यटनाच्या दृष्टीने डॉपलरशी संबंधित ठिकाणांचे पत्ते शोधून तिथल्या रहिवाशांकडून दोनशे वर्षांपूर्वी वास्तव्यास असलेल्या एका जवळजवळ अप्रसिद्ध माणसाची माहिती मिळवणं हे सोपं काम नव्हतं.
प्रत्येक ठिकाणी त्यांना आश्चर्याचे धक्के बसत होते.काहींनी डॉपलर हे नाव ऐकलं होतं खरं,पण त्यापलीकडे त्यांना डॉपलरची काहीच माहिती नव्हती.
'डॉपलर? म्हणजे तो पदार्थवैज्ञानिक? तो सॉल्झबुर्गचा होता होय ? असेल असेल!' 'डॉपलर परिणाम ? हो,शाळेत काही तरी शिकलोय,पण आता त्याबद्दल काही आठवत नाही बुवा!'अशा प्रतिक्रिया त्यांना ऐकायला मिळत होत्या
बहुतेकांनी डॉपलर हे नाव 'सोनोग्राफी'च्या संदर्भात ऐकलं होतं.फक्त एकानेच 'हवामानाच्या अंदाजात त्याचा उपयोग करताहेत म्हणे!' अशी प्रतिक्रिया दिली.पण तरीही इडन यांनी नेटाने डॉपलरबद्दल माहिती असणारी मंडळी शोधून काढली.या सर्वांनी मिळून उपलब्ध माहितीच्या आधारे डॉपलरचं एक छोटेखानी चरित्र लिहिलं होतं.इडन यांच्या व्याख्यानासाठी तेवढी माहिती पुरेशी होती.पण अजूनही त्या चरित्रात अनेक गाळलेल्या जागा होत्या.व्याख्यान पार पडलं, पण इडनना स्वस्थता लाभेना.ते पुन्हा एकदा युरोपात दाखल झाले.त्यांचा पहिला मुक्काम होता सॉल्झबुर्गला. सॉल्झबुर्गमध्ये डॉपलर ज्या घरात जन्माला आला तिथे दर्शनी भागात त्याच्या नावाची फरशी बसवण्यात आल्याचा संदर्भ इडन यांना नगरपालिकेच्या दफ्तरी सापडला.'१९०३ मध्ये डॉपलरच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही फरशी बसवण्यात आली होती. 'डॉपलरच्या जन्मशताब्दीचं स्मरण कुणाला झालं याची माहिती मात्र उपलब्ध झाली नाही',असे डॉ.इडन लिहितात.ते घर 'डॉपलर हाऊस' म्हणून कुणालाच ठाऊक नव्हतं.त्याची ओळख गेली शंभराहून अधिक वर्ष तिथे राहणाऱ्या 'जेझेल्सवर्गर' यांचं घर म्हणूनच होती. जेझेल्सबर्गर कुटुंब सॉल्झबुर्गमधलं एक मोठं व्यापारी कुटुंब होतं.त्यांनी एकोणिसावं शतक सरता सरता ते घर विकत घेतलं होतं.युद्ध संपलं तेव्हा त्याची मालकी फ्राऊ लिझेलोट्टे जेझेल्सबर्गर लानिक यांच्याकडे होती.युद्धात त्या घराचं नुकसान झाल्यामुळे ते पाडायचं ठरत होतं;पण फ्राऊ लिझेलोटेंनी तसं घडू दिलं नाही. इडन त्यांना भेटले तेव्हा त्या पंचाहत्तरीच्या होत्या.घर वाचवण्यासाठी त्या खूप झगडल्या होत्या.ते घर ज्या चौकात आहे त्या चौकालाही डॉपलरचं नाव दिलेलं नाही.तो चौक हान्स माकार्ट प्लाट्झ म्हणून प्रसिद्ध होता. सॉल्झबर्गमध्ये क्रिस्तियान डॉपलरचं नाव दिलेली केवळ एक गल्ली अस्तित्वात होती;तीही शहराच्या आडबाजूला.१९०३ मध्ये डॉपलरची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली त्या वेळी प्रागमध्ये त्याच्या शोधनिबंधांचा एकत्रित संग्रह तसंच त्याच्या वैज्ञानिक कार्याचं महत्त्व सांगणारं परिशिष्ट असलेला ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला होता,याचा शोध इडन यांना या मोहिमेत लागला. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रा.एफ.जे. स्टुडनिक यांनी म्हटलं होतं,'मोझार्टमुळे प्रसिद्ध असलेल्या त्या शहरात (सॉल्झबुर्ग) डॉपलरच्या कीर्तीला साजेलसं स्मारक होईल अशी आशा करू या. साल्झाक नदीच्या काठच्या त्या रम्य शहरात शंभर वर्षांपूर्वी एका सामान्य पित्याच्या पोटी जन्मलेल्या या असामान्य पुत्राची त्याच्या जन्मगावाने योग्य ती दखल घ्यायला हवी.'
यानंतर इडन जसजसे डॉपलरबद्दलची माहिती खोदत गेले तसतसे त्यांना एकावर एक धक्के बसू लागले.
खाणींमधला संगमरवर काढून त्याच्या वस्तू बनवणाऱ्या पाथरवट डॉपलर घराण्यातील इतर सदस्यांची सॉल्झबुर्गमध्ये भरपूर माहिती उपलब्ध होती,पण एखाद्या नामांकित घराण्यातील वाया गेलेल्या मुलाचा उल्लेख जसा टाळला जातो,तशी परिस्थिती शास्त्रज्ञ डॉपलरबाबत होती.डॉपलर कुटुंब मूळचं ऑस्ट्रिया-बव्हेरियाच्या सीमाप्रदेशातलं.ते १६७० मध्ये सॉल्झबुर्गजवळच्या वीहॉस्सेन या खेड्यात आलं.त्याच वर्षी तिथल्या चर्चमध्ये अँड्रियस डॉपलरचा मारियाशी विवाह झाल्याची नोंद सापडते.हा अँड्रियस ग्रॉसगमेन इथल्या ॲडम टॉपलरचा मुलगा.ही मंडळी आधी टॉपलर असं आडनाव लावत.
ॲडम हा शेतकरी होता.ॲडम टॉपलरचं कुटुंब १६३५ सालच्या प्लेगच्या साथीत गेलं होतं.त्याने वडिलोपार्जित शेती करायला सुरुवात केली,तरी अँड्रियसला संगमरवरी मूर्ती बनवण्याची कला अवगत होती. ॲडम टॉपलरच्या वडिलांचं नाव लिओनहार्ट टॉपलर,त्यांचा पहिला उल्लेख ग्रॉसगमेन इथे १६०५ मध्ये आढळतो.
वीहॉस्सेनला आल्यावर टॉपलर हे नाव डॉपलर झालं.
डॉपलर कुटुंबीयांच्या वंशवृक्षाची माहिती इडन यांनी अतिशय तपशिलात नोंदवली आहे.त्यावरून त्यांनी किती परिश्रमपूर्वक आणि खोलात जाऊन काम केलं होतं हे स्पष्ट होतं,त्याचप्रमाणे युरोपमध्ये जुन्या नोंदी किती काळजीपूर्वक ठेवल्या जातात हेही दिसून येतं.१६७५ मध्ये दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर अँड्रियस आणि मारिया यांचा मुक्काम हिम्मेलराइश या नव्या वसाहतीत हलला.
तिथे १६७७ मध्ये त्यांना मुलगा झाला- जॉर्ज.या जॉर्जचा पणतू म्हणजे क्रिस्तियान,१७९२ मध्ये या मूर्तिकारांच्या घराण्यातल्या योहान इव्हेंजेलिस्ट डॉपलरचं थेरेसा सिल्युस्तर हिच्याशी लग्न झालं. या जोडप्याचं तिसरं अपत्य २९ नोव्हेंबर १८०३ या दिवशी सकाळी अकराच्या ठोक्याला जन्माला आलं.तो क्रिस्तियान.या मुलाला डॉपलर कुटुंबाच्या छिन्नी- हातोडा या पारंपरिक अवजारांपेक्षा कागद,दौत,टाक या साधनांमध्ये जास्त रस होता.लहानपणी क्रिस्तियान सतत आजारी पडत असे.
त्यामुळे तो अतिशय अशक्त होता.मूर्तिकला हे तसं ताकदीचं काम असल्यामुळे तो त्या कामापासून दूरच राहिला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी क्रिस्तियानला सॉल्झबुर्ग इथल्या जर्मन शाळेत पाठवलं.
त्याला लहानपणापासूनच गणिताचं वेड होतं.या जर्मन शाळेत त्याचा हा कल ओळखू येऊ लागला आणि तिथूनच क्रिस्तियानच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
१८२२ मध्ये डॉपलरला पुढील शिक्षणासाठी व्हिएन्नाला पाठवण्यात आलं.व्हिएन्ना येथील बहुउद्देशी तंत्रवैज्ञानिक संस्थेतल्या नोंदी इडन यांना बघायला मिळाल्या.डॉपलर हा अभ्यासू, कष्टाळू,प्रामाणिक विद्यार्थी असल्याची नोंद या शाळेच्या दप्तरी आढळते.पण डॉपलरला मात्र इथलं शिक्षण रुचत नव्हतं.ते चाकोरीबद्ध आणि एकसुरी असल्यामुळे तो पुन्हा सॉल्झबुर्गला परतला.त्याचं प्रगतिपुस्तक पाहून डॉपलरला इतरांपेक्षा कमी काळात इथला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची खास परवानगी देण्यात आली होती असं लक्षात येतं.या काळात डॉपलर स्थानिक रुपर्ट महाविद्यालयात पदार्थविज्ञान आणि गणितावर व्याख्यानं देत असे,एवढी प्रगती त्याने केली होती. शिवाय त्यातून त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवला जात होता ते वेगळंच.त्या काळी पदवीसाठी तत्वज्ञान विषय शिकणं सक्तीचं असे. तत्त्वज्ञान शिकता शिकता डॉपलरने फ्रेंच, इटालियन आणि इंग्रजी भाषाही शिकून घेतल्या. याच काळात डॉपलर कविता करू लागला होताच,पण त्याच ललित लेखनही प्रसिद्ध होऊ लागलं होतं.यातल्या काही कविता आणि लेखनाचे नमुने डॉपलरचा नातू ॲडॉल्फने जपून ठेवले आहेत,असं इडनना या शोधाशोधीत कळलं.अर्थातच इडन यांनी ॲडमडॉल्फना गाठलं.ॲडॉल्फ यांनी जे निबंध जपून ठेवले होते त्यातला एक इडनना महत्त्वाचा वाटला.तो म्हणजे, 'ऑन अ स्ट्रेंज कॅरॅक्टरिस्टिक ऑफ द ह्युमन आय'. हा निबंध १८२५ ते १८२८ दरम्यानचा असावा.
सॉल्झबुर्गमधलं शिक्षण संपल्यावर १८२९ मध्ये डॉपलर सहाय्यक व्याख्यातापदावर व्हिएन्नाच्या तंत्रशिक्षण संस्थेत रुजू झाला.डॉ.इडनही व्हिएन्नातल्या या संस्थेत पोहोचले.
तिथेही डॉपलरसंबंधी बरीच कागदपत्रं तपासता आली.
डॉपलरने या तंत्रशिक्षण संस्थेत शुद्ध गणितातल्या सहायक व्याख्यातापदासाठी अर्ज केला होता.
(हटके भटके-निरंजन घाटे-समकालीन प्रकाशन)
तिथले गणिताचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख यांनी डॉपलरसह एकूण चारजणांची मुलाखत घेतली.डॉपलरबद्दल त्यांनी हा शेरा लिहिला आहे- 'डॉपलरने एक वर्ष सॉल्झबुर्गमध्ये लॅटिन शिकण्यात घालवलं, त्यामुळे त्याचा गणिताशी वर्षभर संबंध तुटलेला आहे.त्यामुळे तो व्याख्यातापदाला न्याय देऊ शकणार नाही.'त्या फायलीत डॉपलरला मिळालेल्या पहिल्या नकारपत्राची प्रतसुद्धा जपून ठेवलेली आहे.
जून १८२९ मध्ये डॉपलरने त्याच संस्थेतील प्राध्यापक ॲडाम फॉन बुर्ग यांच्याकडे पुन्हा एक अर्ज पाठवला.
फॉन बुर्गनी डॉपलरला सॉल्झबुर्ग इथे तो लॅटिन शिकत असतानाही गणिताचे पाठ दिले होते.फॉन बुर्गनी डॉपलरची आपला सहायक म्हणून नेमणूक केली.पगार होता.प्रतिवर्षी ६०० गिर्ड्स आणि घरभाडे भत्ता ६० गिर्ड्स.शिवाय त्याला काही शिकवण्या घेण्याची परवानगीही मिळाली.ही नेमणूक दोन वर्षांसाठी होती. १८३१ मध्ये त्याला आणखी दोन वर्षांसाठी याच पदावर नेमणूक मिळाली. याच काळात डॉपलरने आपला पहिला शोधनिबंध प्रसिद्ध केला. 'अ काँट्रिब्युशन टु द थिअरी ऑफ पॅरलल्स' असं या निबंधाचं शीर्षक होतं. पुढच्या वर्षी त्याचा स्थिरविद्युतनिर्मिती मागचं तत्त्व मांडणारा शोधनिबंधही त्याच तंत्रनिकेतनाच्या वार्षिक अंकात प्रसिद्ध झाला. डॉपलरच्या नेमणुकीची मुदत संपत आली तेव्हा त्याने नोकरीसाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये अर्ज करायला सुरुवात केली;पण त्याला नवी नोकरी मिळत नव्हती.
उर्वरित भाग २१.१२.२३ या लेखामध्ये..