* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मध्ययुगातलं बायॉलॉजी.. Biology in the Middle Ages..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/१२/२३

मध्ययुगातलं बायॉलॉजी.. Biology in the Middle Ages..

मध्ययुगात ख्रिश्चन धर्मानं बराच जोर धरला होता.जिथे जिथे ख्रिश्चन गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केला.ग्रीसमध्ये आयोनियनांनी विज्ञानाचा पाया घातला होता.त्याला ख्रिश्चनांचा विरोध नव्हता,पण विश्वाची निर्मिती किंवा त्यातल्या सजीवांची निर्मिती यांची मुळं आपण शोधू नयेत असं त्यांचं मत होतं.त्यांच्या मते हे म्हणजे देवाच्या कामात माणसानं ढवळाढवळ करण्यासारखंच होतं.आणि नेमका हाच म्हणजे निसर्गाचे नियम शोधण्याचा घाट ग्रीकांनी घातला होता. 

आणि आता सगळीकडेच ख्रिश्चनधर्मीयांचं वर्चस्व होतं.

त्यामुळे विशुद्ध जीवशास्त्राचा (बायॉलॉजी) अभ्यास करणं दुरापास्तच झालं होतं.त्यामुळे हे विश्व आणि माणूस कसे निर्माण झाले याचे नियम प्रयोग करून शोधण्यापेक्षा बायबलमध्ये शोधावेत असं त्यांना वाटत होतं! निसर्गाचे नियम देव आणि त्याचे देवदूत असलेले संत यांनाच कळतात आणि त्यांनाच त्यात बदल करण्याचे अधिकार आहेत.आपण माणसांनी ते शोधायचा विचार करू नये अशी ख्रिश्चनांची समजूत होती.या सगळ्या वातावरणामुळे एकूणच विज्ञानाची,कलांची आणि सगळ्या समाजाचीच प्रगती खुंटली होती.यामुळेच या काळाला 'डार्क एजेस' म्हणतात.पण याही काळात काही विद्वानांनी आहे ते ज्ञान जतन करायचा प्रयत्न केला,हे विशेष! अर्थात,या काळात सगळीकडेच अंधकार होता असं नाही. अरब प्रांतात अनेक प्रकारचे अभ्यास या काळात चालू होते.अरबांनी मुहम्मद पैगंबरांच्या नेतृत्वाखाली इस्लाम धर्म स्वीकारला होता. आणि ते अरब पेनिन्सुलाच्या बाहेर आले आणि नैऋत्य आशिया आणि उत्तर आफ्रिका या भागांत वस्ती करायला लागले. इ.स. ७३० मध्ये, मुहम्मदांच्या काळाच्या एक शतकानंतर मुस्लिम अशा ठिकाणी पोहोचले,की त्यांच्या पूर्वेला कॉन्स्टॅन्टिनोपल आणि पश्चिमेला फ्रान्स होता. त्यामुळे त्यांना ख्रिश्चनांपासून कायमच धोका होता.

पण उलट त्यांनी गेलन आणि ॲरिस्टॉटल यांनी केलेल्या लिखाणाचं अरेबिक भाषेत भाषांतर करून पाश्चिमात्यांना पाठबळच दिलं.ते फक्त भाषांतर करूनच थांबले नाहीत तर त्यांनी त्या काळी उपलब्ध असलेल्या जवळपास सगळ्या वैज्ञानिक आणि वैद्यकीय ज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यावर टीकात्मक लेखनही केलं! यापैकी सगळ्यात महत्त्वाचा बायॉलॉजिस्ट दहाव्या-अकराव्या शतकात होऊन गेलेला अबु अली अल हुसेन इब्न सिना (९८०-१०३७) हा होता.पाश्चिमात्यांनी त्याचंही नाव लॅटिनाइझ केलं.आज आपण सगळेच त्याला 'अविसेना' म्हणून ओळखतो! अविसेनाचा जन्म आताच्या पर्शियामध्ये झाला.अविसेनानं एकूण तब्बल ४५० पुस्तकं लिहिली.आता त्यापैकी फक्त २४० च उपलब्ध आहेत.

त्यापैकी १५० तत्त्वज्ञानावरची आहेत आणि ४० हिप्पोक्रॅट्स,ॲरिस्टॉटल आणि सेल्सस यांच्या वैद्यकीय थिअरीजवर लिहिलेली पुस्तकं आहेत.बाकीची पुस्तकं गणित, खगोलशास्त्र,झूऑलॉजी,बॉटनी,मेटाफिजिक्स, भौतिकशास्त्र,संगीत आणि काव्य या विषयांवर लिहिलेली आहेत.त्यानं वयाच्या फक्त २१व्या वर्षी लिहायला सुरुवात केली होती!


अविसेना हा लहानपणापासूनच अत्यंत अभ्यासप्रिय आणि मेहनती होता.वयाच्या दहाव्या वर्षीच त्याचं संपूर्ण कुराण पाठ झालं होतं! त्यानंतर तो ॲरिस्टॉटलच्या मेटॅफिजिक्स म्हणजे अध्यात्माकडे वळला.पण या वयात अध्यात्म ते काय कळणार? त्यालाही ॲरिस्टॉटलच्या मेटाफिजिक्समधल्या आध्यात्मिक संकल्पना कळायच्या नाहीत.मग तो रात्रभर त्या पुनःपुन्हा वाचायचा.एक वेळ अशी आली होती,की त्याचं संपूर्ण पुस्तक पाठ झालं, पण त्यातल्या संकल्पनांचे अर्थच त्याला कळत नव्हते.मग शेवटी हताश होऊन तो मशिदीत जाऊन बसला आणि मला का कळत नाही, मला वाचलेलं समजू दे,माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडू दे अशी प्रार्थना तो ओंजळ पसरून अल्लाकडे करत राहिला. रात्रभर अशी प्रार्थना करता करता सकाळ उजाडल्यावर तो घरी जायला निघाला.तेव्हा त्याला रस्त्यावरच्या एका पुस्तकांच्या दुकानात ॲरिस्टॉटलचं मेटाफिजिक्स सोप्या भाषेत सांगणारं पुस्तक चक्क रद्दीच्या भावात मिळालं ! आपल्यासाठी मौल्यवान असलेलं असं पुस्तक अगदीच फुटकळ किमतीला विकत मिळाल्यानं त्याला इतका आनंद झाला,की त्यानं आपल्या खिशात असलेल्या बाकीच्या सगळ्या पैशाचं अन्न खरेदी करून गोरगरिबांना दान करून आपला आनंद साजरा केला! या वेळी अविसेनाचं वय फक्त पंधरा वर्ष होतं! या वयातली अविसेनाची ज्ञानाची लालसा आणि सामाजिक जाणीव पाहून त्याचं कौतुक वाटतं.ॲरिस्टॉटलचं मेटाफिजिक्स समजून घेतल्यानंतर त्यानं आपला मोर्चा वैद्यकाकडे वळवला.गंमत म्हणजे वैद्यकशास्त्र त्याला चक्क मेटाफिजिक्स आणि गणितापेक्षाही सोपं वाटलं.त्यामुळे त्यानं ते लगेचच आत्मसात केलं,आणि तो रोग्यांवर उपचारही करायला लागला.अनेकदा गोरगरिबांवर उपचार करताना त्याला त्यांची दया यायची.त्यामुळे तो त्यांच्याकडून कसलीही फी घ्यायचा नाही.उपचार करताना अविसेनानं मानवी शरीरशास्त्राचा अभ्यासही केला.आणि स्वतःचं संशोधनही केलं होतं,त्यातूनच त्यानं प्रचंड मोठं ग्रंथभांडारच निर्माण केलं.त्याचं 'बुक ऑफ हिलिंग' आणि 'कॅनन ऑफ मेडिसीन' हे दोन ग्रंथ जवळपास १७व्या शतकापर्यंत अरेबिक वैद्यकशास्त्रात संदर्भग्रंथ म्हणून वापरले जात होते.


वयाच्या ५७ व्या वर्षीं अविसेनाच्या पोटात कॉलिक्स झाले. त्यावर त्यानं स्वतःच औषधी काढ्याचे डोस एनिमा म्हणून घ्यायचे ठरवले. हे औषध स्वतः अविसेनानंच तयार केलं होतं. पण या औषधामध्ये एनिमा देणाऱ्या मदतनिसानं चुकून किंवा हेतुपुरस्सरविष मिसळलं.आणि त्यातच अविसेनाचा रमादानाच्या पवित्र महिन्यात मृत्यू झाला. अविसेनाच्या मागे त्यानं लिहून ठेवलेल्या वैद्यकाचं आणि इतर ज्ञानाचं प्रचंड भांडार मात्र डार्क एजेसमधला अंधार बाजूला सारायला पुढच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखं मार्ग दाखवत उभं राहिलं.याचाच प्रभाव अरबांच्या पुढच्या पिढीतल्या एका वैज्ञानिकावर होणार होता.तो म्हणजे इब्न अल नफीस हा होता.माणसाच्या शरीरात मुळात रक्त तयार कसं होतं आणि मग ते कसं वापरलं जातं यासंबंधीचा अभ्यास वैद्यकशास्त्रात अनेकांनी केला.यातूनच रक्त माणसाच्या शरीरातल्या अनेक कामांसाठी वापरलं गेल्यानंतर अशुद्ध होतं हेही संशोधकांच्या लक्षात आलं.याबद्दल इब्न अल्-नफीस (१२१३-१२८८) यानं आपल्या हृदयाचं काम कसं चालतं या प्रक्रियेवर अगदी सुरुवातीला अभ्यास केलेला होता. इब्न-अल-नफीसचं पूर्ण नाव वाचायचं असेल तर जरा श्वास रोखूनच घरावा लागतो : 


अला अल-दिन अबू अल हसन अली इब्न अबि-हज्म अल-कार्शी अल- दिमाश्की ! 


नशिबानं याऐवजी त्याला इब्न अल्-नफीस या नावानं संबोधलं तरी पुरतं! सीरियातल्या दमास्कसमध्ये जन्मलेला आणि इजिप्तच्या कैरोमध्ये नंतर काम केलेला इब्न-अल्-नफीस हा काय काय असावा? फिजिशियन, शरीररचनातज्ज्ञ (म्हणजे ॲनॅटॉमिस्ट), शरीरक्रियातज्ज्ञ (म्हणजे फिजियॉलॉजिस्ट), शल्यविशारद (म्हणजे सर्जन),डोळ्यांच्या विकारांचा तज्ज्ञ,संपूर्ण कुराण तोंडपाठ असल्यामुळे हफीझ या मुस्लिमांमध्ये सन्मानानं घेतलं जाणारं नाव मिळवणारा इस्लाम जीवनशैलीचा पूर्ण तपशील तोंडपाठ असल्यानं मुस्लिमांमध्ये हडिथ स्कॉलर मानला जाणारा, सुन्त्री पंथातल्या आचरणासंबंधीचा वकील आणि न्यायाधीश,इस्लामिक विचारवंत, तर्क शास्त्रात प्रवीण,कादंबरीकार, मानसोपचारतज्ज्ञ,

समाजकार्य करणारा, शास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक, खगोलशास्त्रज्ञ, अंतराळाविषयीच्या माहितीत प्रवीण असलेला, भविष्यवेत्ता,भूगर्भशास्त्रज्ञ,भाषाशास्त्रज्ञ, व्याकरणतज्ज्ञ आणि इतिहासकारसुद्धा! हुश्श! अशा लोकांबद्दल वाचलं की खरंच कमाल वाटते. खरं तर इब्न अल नफीसच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचाच अभ्यास करायला हवा. पण आपण सध्या फक्त त्यानं बायॉलॉजीत

काय केलं ते पाहू,आपल्या शरीरात असलेली पल्मनरी सर्क्युलेशन नावाची यंत्रणा दूषित रक्त शुद्ध करायच्या कामात मदत करते.या यंत्रणेचा खोलात जाऊन अभ्यास करण्यात इब्न अल्-नफीसचा मोठा वाटा होता.आजारी माणसाला बरं करण्यासाठी त्याच्यावर औषधांचे प्रयोग करून बघावेत असं त्याला वाटे.तसंच माणसाच्या मृत्यूनंतर त्यामागचं कारण शोधण्यासाठी त्याचं शरीरविच्छेदन केलं जावं असं त्या काळात सनसनाटी वाटावं असं मत त्यानं मांडलं होतं.आपली अन्नपचन प्रक्रिया नीट राहते ती चयापचय प्रक्रियेमुळे (मेटॅबॉलिझममुळे).या प्रक्रियेत आपण खाल्लेल्या अन्नाचं नीट विघटन होऊन त्याचं आपल्या शरीराचं काम नीट चालण्यासाठीच्या ऊर्जेत होत असतं. या प्रक्रियेचं विस्तारानं वर्णन प्रथमच केलं ते इब्न-अल्-नफीसनंच..


 माणसाच्या शरीररचनेशी संबंधित असलेल्या आधीच्या अनेक अर्धवट माहितीवर आधारलेल्या चुकीच्या संकल्पना त्यानं मोडीत काढल्या.तसंच त्यानं धार्मिक विषयांवरही भरपूर लिखाण केलं. पण या लिखाणामागचा उद्देश मुख्यत्वे विज्ञान आणि त्याचा रोजच्या आयुष्यातला वापर यांची सांगड घालणं हा होता.त्यासाठी त्यानं मग विज्ञानकथाही लिहिल्या.त्या काळी साध्यासुध्या आजारांवर उपाय म्हणून वाइन प्यावी असा सल्ला काही वैद्य देत असत.पण इब्न अल्-नफीसनं त्यावर कडाडून टीका केली. यामागे त्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक असे दोन्ही विचार कारणीभूत होते.गेलननं माणसाच्या नाडीविषयीही चुकीची माहिती लिहून ठेवली होती.माणसाच्या हृदयातलं शुद्ध रक्त शरीराच्या इतर अवयवांकडे नेणाऱ्या रोहिण्यांमधली नाडीसारखी गती असणारी प्रक्रिया ही सतत सुरूच असते आणि या रोहिण्यांची हालचाल ही आपोआप,म्हणजे नैसर्गिकरीत्याच होत असते असं गेलनचं मत होतं. हे म्हणणं खोडून काढत इब्न-अल्-नफीसनं म्हटलं,की या नैसर्गिक प्रक्रियेबरोबरच हृदयानं या रोहिणीकडे रक्त पाठवल्यामुळेही हे होत असतं.म्हणजेच हृदय जेव्हा फुगतं तेव्हा रोहिण्यांचा आकार निमुळता होतो,आणि हृदयानं रक्त बाहेर टाकलं की ते छोटं होतं आणि रोहिण्या फुगतात.म्हणजेच हृदय आणि रोहिण्या एकाच वेळी फुगतात आणि निमुळत्या होतात हा गेलननं पसरवलेला गैरसमजही इब्न अल्-नफीसनं दुरुस्त केला. याउलट जेव्हा त्यांच्यापैकी एक जण फुगतो तेव्हा दुसरा निमुळता होतो हा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा शोध त्यानं लावला.तसंच आपल्या नाडीच्या ठोक्यांचं महत्त्व काय असतं हेही त्याला या अभ्यासातून उमगलं.आपली नाडी सुरू असते याचाच अर्थ आपलं हृदय आपल्या शरीरातल्या इतर अवयवांकडे एखाद्या पंपानं पाणी उपसून शेतात फवारावं तसं रक्त जणू फवारतच असतं,हा अतिशय मोलाचा शोध त्यानं लावला.जितके ठोके जास्त तितका आपल्या हृदयावरचा ताण जास्त आणि म्हणून आपलं हृदय तितकंच धोक्याच्या प्रवासाकडे चाललं आहे असं समजावं हा विचार त्यातूनच आला.माणसाच्या हृदयाखाली हाडं असतात असंही गेलननं लिहून ठेवलं होतं.तेही इब्न-अल्-नफीसनं चुकीचं असल्याचं सिद्ध करून दाखवलं.त्याशिवाय माणसाच्या शरीरातल्या अनेक अवयवांबद्दल गेलननं लिहून ठेवलेले गैरसमज त्यानं दूर केले.माणसाच्या शरीरात महत्त्वाचे म्हणावे असे एकंदर ५२९ स्नायू असतात असा अंदाज इब्न-अल्-नफीसनं बांधला होता.१२३६ साली इब्न-अल्-नफीसनं कैरोचा रस्ता पकडला.तिथं त्यानं सुरुवातीला अल-नसरी नावाच्या इस्पितळात नोकरी केली.तिथून तो अल्-मन्सुरी इस्पितळात गेला आणि तिथला प्रमुख डॉक्टर बनला.

१२४२ साली वयाच्या २९ व्या वर्षी त्यानं शरीरशास्त्राशी संबंधित अनेक नव्या गोष्टींची माहिती देणारं पुस्तक लिहिलं. पुढच्या दोन वर्षांमध्ये त्यानं वैद्यकशास्त्राशी संबंधित असलेल्या आपल्या ग्रंथाचे चक्क ४३ खंड पूर्ण करून छापलेसुद्धा! पुढच्या काही दशकांमध्ये त्यानं या विषयातली उरलेली सगळी माहिती पूर्ण करण्यासाठी टिपणं काढली.ती सगळीच्या सगळी एकत्र छापली असती तर इब्न-अल्-नफीसच्या ग्रंथाचे एकूण तब्बल ३०० खंड बाजारात आले असते!पण त्याच्या हयातीत यातले आधीचे ४३ आणि आणखी ३७ असे ८०च खंड प्रकाशित होऊ शकले. तरीही बराच काळ त्याचा हा ग्रंथ म्हणजे वैद्यकशास्त्रातला सगळ्यात परिपूर्ण कोष मानला जाई.या ग्रंथाची भन्नाट विक्री झाल्यामुळे इब्न-अ-नफीस श्रीमंत झाला होता. मिइन्न-अल-नफीसच्या काही थिअरीज मात्र एकदम भन्नाट होत्या. 

स्त्रीच्याशरीरात गर्भ कसा अंकुरतो याविषयी त्यानं गेलनवर केलेली टीकाही गंमतशीरच होती। स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही शरीरात वीर्य असतं असं इब्न अल्-नफीस म्हणे.तसंच वीर्यात गतिशील तसंच स्थिर राहणारी अशी दोन प्रकारची वेगवेगळी बीजं असतात असं गेलनला वाटायचं.तसंच स्त्रीच्या वीर्याच्या तुलनेत पुरुषाच्या वीर्यात क्रियाशील बीज मात्र जास्त प्रमाणात असतात असं गेलननं लिहिलं होतं. इब्न-अल्-नफीसनं मात्र गेलनचं हे मत चुकीचं असल्याचं सांगितलं.त्यानं याबाबतीत लिहून ठेवलेलं वर्णन गंमतशीर होतं : स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही वीर्यात फक्त स्थिर बीजंच असतात.गतिशील बीजं अजिबातच नसतात, पण जेव्हा पुरुषाचं गरम वीर्य स्त्रीच्या शरीरात जातं तेव्हा स्त्रीच्या वीर्याचा थंडावा या वीर्यांना एकमेकांमध्ये मिसळून जायला मदत करतो. आणि या मिश्रणातून पुढे काय घडणार हे फक्त देवच ठरवू शकतो.त्याला वाटेल त्या प्रकारे मग यातून स्त्रीच्या शरीरात गर्भ तयार होतो,आणि त्याला पुढे अवयव वगैरे फुटतात...अर्थात,हे नेमकं कसं घडतं ते देव नव्हे तर पुढे येणारे वैज्ञानिकच सांगणार होते! इब्न-अल-नफीसनं माणसाचा जीव आणि आत्मा या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत अशा अर्थाचीही विधानं केली होती.ॲरिस्टॉटलच्या मते माणसाचा आत्मा नावाची गोष्ट माणसाच्या हृदयात असते.पण हे मत चुकीचं ठरवत माणसाचा आत्मा ही कुणा एका किंवा काही ठरावीक अवयवांची मक्तेदारी नसून,तो शरीरातल्या सगळ्याच अवयवांचा मिळून बनलेला असतो असं मत इब्न अल्-नफीसनं व्यक्त केलं!तसंच माणसाच्या मेंदूचं तापमान हे त्याच्या हृदयाच्या तापमानापेक्षा कमी असतं असंही इब्न-अल्-नफीसला वाटे.तसंच आपलं हृदय आपल्या हालचाली,संवेदना,आणि विचारशक्ती या गोष्टी नियंत्रित करतं हा तोपर्यंतचा चुकीचा समजही खोडून काढत प्रत्यक्षात आपला मेंदू या गोष्टी करत असतो हा महत्त्वाचा विचारही त्यानं रुजवला.


या सगळ्याखेरीज त्याची काही मतं धार्मिक दुराग्रहानं भारलेलीही असत.उदाहरणार्थ,काही मुस्लिम माणसांना दारू प्यायचं व्यसन असल्यामुळे आणि काहींचे समलिंगी संबंध असल्यामुळे इस्लामिक देशांवर शत्रूची आक्रमणं झाली असं विचित्र मत त्यानं मांडलं होतं.पण याबरोबरच त्याची काही मतं आजही लागू पडतील अशी आहेत.

उदाहरणार्थ,माणसाची प्रकृती नीट राहावी म्हणून औषधं घेत बसण्यापेक्षा आहारावर नियंत्रण ठेवणं जास्त गरजेचं आहे असं त्यानं म्हणून ठेवलं होतं.गंमत म्हणजे इब्न-अल्-नफीसनं प्रदूषणा

विषयीही प्रबंध लिहिले होते! याचाच अर्थ त्या काळीही प्रदूषण तरी असलं पाहिजे किंवा इब्न अल्-नफीसची दूरदृष्टी तरी तीक्ष्ण असली पाहिजे.


इब्न-अल्-नफीस सतत फिरतीवर असे.शेवटी त्यानं हमादानमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलं, तिथल्या आजारी राजाला त्यानं बरं केल्यामुळे त्याची तिथला पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली. पण तिथल्या सैनिकांनी या निर्णयाला विरोध केला आणि इब्न-अल्- नफीसची त्या पदावरून तत्काळ हकालपट्टी होऊन त्याला थेट तुरुंगात टाकलं गेलं! पण सुदैवानं आता तिथला राजपुत्र आजारी पडला.त्यामुळे इब्न-अल्-नफीसला पुन्हा तुरुंगातून राजवाड्यात स्थान मिळालं! नंतर राजा वारल्यावर त्यानं ते गाव सोडून पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली.

जेव्हा तो खूपच दगदग करतोय आणि त्याचा त्याच्या तब्येतीवर दुष्परिणाम होईल असं त्याच्या मित्रांनी त्याला सुचवलं.. तेव्हा त्यानं 'मोठं पण एकसुरी आयुष्य जगण्यापेक्षा मी छोटं पण बहुआयामी आयुष्य जगणं पसंत करेन' असं उत्तर दिलं!


तो काळ म्हणजे सीरिया आणि इजिप्त यांच्यामध्ये सुरू असलेल्या धुमश्चक्रीचा होता. तत्कालीन समजुतींप्रमाणे इब्न अल्-नफीसच्या मते हे सगळं मुस्लिम लोकांनी अधर्माचं वर्तन केल्यामुळे होत होतं.दुर्दैवानं या लढायांमध्ये विज्ञान विषयाची अनेक उत्तमोत्तम पुस्तकं बेचिराख झाली.त्यामुळे खचून न जाता इब्न अल्-नफीस आणि अन्य मुस्लिम संशोधकांनी नव्यानं काही पुस्तकं लिहिली.त्यामुळे विज्ञानाची वाढ खुंटली नाही आणि या बाबतीतल्या इतिहासातल्या नोंदीही बऱ्यापैकी बचावल्या.

१२६० ते १२७७ या काळात त्यानं सुल्तान बेबर्सचा खासगी वैद्य ही राजकीय पातळीवरची भूमिका बजावली. १२८८ सालच्या अखेरीला इब्न अल्-नफीस जग सोडून गेला,त्यापूर्वी त्यानं आपल्यामागे आपलं घर, वाचनालय आणि इस्पितळ या गोष्टी मन्सुरिया नावाच्या इस्पितळाला दान केल्या जाव्यात असं लिहून ठेवलं होतं.आज जरी इब्न-अल्-नफीसचे काही विचार मजेशीरच नव्हे तर वेडगळसुद्धा वाटत असले तरी कित्येक शतकांपूर्वीच्या काळात त्यानं वैद्यकीय बाबतींमध्ये इतका खोलात विचार केला, हे त्याचं खूप मोठं योगदानच म्हटलं पाहिजे !


त्या काळापर्यंत पश्चिम युरोपातल्या या लाटेनं पुन्हा वेगळं वळण घेतलं होतं.ख्रिश्चन सैन्यानं सिसिली जिंकून घेतलं होतं.या आधीची दोन शतकं इथे मुस्लिमांनी राज्य केलं होतं आणि आता अकराव्या शतकात ख्रिश्चन सैन्यानं निअर ईस्टमधल्या धर्मयोद्ध्यांचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती.पण गंमत म्हणजे आक्रमण करून जिंकून घ्यायच्या नादात अरब प्रांतामध्ये आलेल्या ख्रिश्चनांना इथले मुस्लिमही पुढारलेले आहेत हे लक्षात आलं.आणि ते फक्त हुशारच नाहीत तर कित्येक बाबतींत आपल्या

पेक्षाही पुढारलेले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मात्र युरोपियनांनी अरबांचं ज्ञान आपल्या भाषेत उतरवून घ्यायला सुरुवात केली. हे ज्ञान मूळच्या ग्रीक पुस्तकांतूनच अरब भाषेत आलं होतं आणि अरबांनी ते जपून ठेवलं होतं.हे भाषांतर करायचं महत्त्वाचं काम करणाऱ्यांपैकी इटलीचा गेरार्ड ऑफ क्रिमोना (१११४ ते ११८७) हा सगळ्यात महत्त्वाचा भाषांतरकार होता. त्यानं हिप्पोक्रॅट्स, गेलन आणि ॲरिस्टॉटल यांचं लिखाण लॅटिनमध्ये भाषांतरित केलं.तेराव्या शतकातला अल्बर्ट्स मॅग्नस हा जर्मन धर्मगुरू तर ॲरिस्टॉटलच्या पुनरुज्जीवित झालेल्या ज्ञानाच्या प्रेमातच पडला. त्यानं हे ज्ञान पुढे चालवायचा वसाच घेतला आणि त्यानं चक्क ॲरिस्टॉटलची शिकवण अनेकांना द्यायला सुरुवात केली. त्यातूनच अक्किनाज नावाचा अल्बर्ट्सचा एक विद्यार्थी ॲरिस्टॉटलच्या विचारांनी भारावूनच गेला होता.आणि आता जे काही देवधर्म चाललंय ते सोडून आपण विज्ञानाच्या मार्गानं खऱ्या ज्ञानाचा मार्ग स्वीकारायला हवा आणि तेच मनुष्यजातीच्या कल्याणाचं आहे.आणि यातूनच विज्ञानाला पुन्हा तार्किक,जडवादी दृष्टीनं पाहण्याचा पाया रचला गेला.


१५.०९.२३ या लेखमालेतील पुढील भाग