२८.०४.२४ या लेखातील शेवटचा भाग..
मी भारतात गेले काही महिने वावरत होते. कमकुवत हृदयाच्या सायकलस्वाराचा इथे निभाव लागणार नाही हे मला पदोपदी जाणवत होतं.मी दात-ओठ खाऊन या गर्दीतील इतरांप्रमाणेच वावरायला हळूहळू शिकत होते. त्या सकाळी वातावरणात प्रचंड धूळ होती. त्यातच वाहनांचा धूरही मिसळत होता.त्यामुळे वाहते डोळे आणि नाक पुसायला मी अखेरीस रस्त्याच्या कडेला थांबले.
त्याच वेळी माझं लक्ष त्याच्याकडे वळलं.तो अनवाणी होता.त्याच्या अंगात एक फाटका करडा शर्ट होता.पँटही फाटकीच होती.त्याने डोक्यावरून एक फडकं गुंडाळून हनुवटीखाली त्याची गाठ मारली होती.त्याच्या आजूबाजूने गर्दी वाहत होती.ही काय कटकट आहे,अशा नजरेने लोक त्याच्याकडे बघत होते.पण याला त्याची पर्वा नव्हती.डोळे मिटून,हात जोडून तो तिथे उभा होता.त्याचे ओठ हलत होते.अतिशय तल्लीन होऊन बालकाच्या भाबडेपणाने एका मंदिराकडे तोंड करून तो प्रार्थना करत होता.त्याची प्रार्थना संपली.त्याने छातीवरचे हात कपाळापर्यंत वर नेले.मग तो गर्दीचा एक भाग बनून तिथून नाहीसा झाला.
मी त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदिरापर्यंत सायकल ढकलत नेली.हिंदूंच्या असंख्य देवदेवतांपैकी ही कुठली देवता आहे ते मला बघायचं होतं.एखादा माणूस इतक्या तल्लीनतेने गर्दीच्या रस्त्यात उभा राहून ज्या देवाची प्रार्थना करतो तो कोण,याची मला उत्सुकता होती.मी त्या मंदिराच्या जाळीच्या दारातून आत डोकावलं.शेंदरी रंगाच्या त्या देवाचे काळे डोळे माझ्याकडे बघत होते.
झेंडूच्या फुलांच्या माळा घातलेला तो देव म्हणजे 'हनुमान- द मंकी गॉड'.त्याच्या अंगावर सोनेरी वेषही होता.त्या काळात मला हिंदू देवदेवतांची फारशी माहिती नव्हती.हनुमान हा अत्यंत आज्ञाधारक, स्वामिभक्त सेवक होता,इतपतच मला त्याची माहिती होती.तो एक प्रश्नांची सोडवणूक करणारा स्वर्गीय दूत होता आणि तो डोक्याभोवती फडकं गुंडाळलेला माणूस त्याच्याकडे अशीच मदतीची याचना करत होता. देवाला त्याच्या अडचणी सांगून झाल्यावर तो निवांत मनाने गर्दीचा भाग बनून गेला होता.या देवाची आपण जास्त माहिती करून घ्यायलाच हवी,असं त्या क्षणी मला आतून वाटलं.
त्यामुळेच भारतीय उपखंडात मी नेपाळपासून श्रीलंकेपर्यंत भटकले.तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळात वावरले. रामायणाच्या निर्मितीचा आणि रामकथेचा मागोवा घेतला.रामायण ही भारतीयांची अत्यंत आवडती कथा मलाही मोहवू लागली.'
किती सहजपणे मुस्टो हनुमानकथेच्या अंतरंगात शिरल्या आहेत! 'टू व्हील्स इन द डस्ट'चा सारा प्रवास असा सहज आहे.हा प्रवास दोन स्तरांवर आहे,असं म्हणता येईल.
एकीकडे मुस्टोबाई त्यांच्या सायकल प्रवासाबद्दल,त्या प्रवासात भेटणाऱ्या माणसांबद्दल लिहितात,तर त्याला समांतर असं रामायणाचं कथनही सुरू राहतं. आपण कधीही न पाहिलेला भारत आपल्यासमोर उलगडतो.
आणि त्याचबरोबर रामायणातल्या आपण कधीही न ऐकलेल्या आख्यायिकाही आपल्याला या पुस्तकातून कळतात.त्यातून मुस्टोंची ज्ञानपिपासाही उघड होते.
हनुमानाच्या या द्रोणागिरी आख्यायिकेबद्दल समजल्या समजल्या त्यांनी प्रवास सुरू केला, असं घडलेलं नाही.
'हनुमाना'चा अभ्यास करायचा हा विचार मुस्टोंच्या मनात आला,त्या वेळी त्यांनी भारतीयांकडून हनुमानासंबंधीच्या आख्यायिकांची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यातून मारुती आणि रामायण या दोघांचा निकटचा संबंध त्यांच्या लक्षात आला.त्यानंतर मुस्टोंनी लंडनमधील 'स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज'च्या ग्रंथालयातून रामायणावरचे सगळे संदर्भग्रंथ आणून वाचून काढले.रामायणाच्या वेगवेगळ्या प्रती आणि वेगवेगळ्या लेखकांनी लावलेले अर्थ,त्यासंबंधीचं संशोधन यांची माहिती करून घेतली आणि मगच त्यांच्या या दुहेरी प्रवासाला सुरुवात झाली.
सर्वसाधारणपणे मुस्टो आपल्या सायकल भ्रमंतीत ऐतिहासिक मार्गांनी प्रवास करतात. भारतात त्यांनी ग्रँड ट्रंक रोडवरून प्रवास केलेला होता;पण आता रामायणातील आख्यायिकांनुसार मार्ग शोधायचा निश्चय करून त्या भारतात परतल्या.त्यानंतरचे पाच हिवाळे त्या टप्प्याटप्प्याने नेपाळ ते श्रीलंका हा प्रवास पूर्ण करत होत्या.हे अंतर त्यांना टॅक्सी आणि आगगाडीतून प्रवास करून एका फेरीतच पूर्ण करणं शक्य होतं.पण मुस्टोबाईच्या शब्दांत सांगायचं,तर त्यांना 'सायकल प्रवासाचं व्यसन जडलं होतं,आणि व्यसन सोडणं कधीच सोपं नसतं.'शिवाय सायकलच्या भटकंतीतून दिसणारा भारत ट्रेनमधून कसा दिसणार? त्यामुळे भारतात सायकलवरून हिंडून स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालतेस,असा अनेकांनी दिलेला सल्ला झुगारून त्यांनी ही भटकंती केली.या प्रवासादरम्यान मुस्टोंनी केलेलं एक निरीक्षण फार महत्त्वाचं आहे.त्या म्हणतात, रामायण आणि भारत या दोन्हीही गोष्टी समजून घ्यायला अवघड आहेत.रामायण ही एक गुंतागुंतीची कलाकृती आहे. तिच्या अनेक वेगवेगळ्याआवृत्त्यांतील सर्व घटना एकसारख्या नाहीत,त्यामुळे त्याबद्दल काही ठाम निष्कर्ष काढता येत नाहीत.
तरी मुस्टोंनी रामाचा जनकपूर ते श्रीलंका म्हणजे सीतास्वयंवर ते (श्री) लंकेपर्यंतच्या प्रवासातील सामायिक घटना एकत्र करून एक मार्ग निश्चित केला आणि त्या मार्गावरून प्रवास केला. भारताबद्दलही त्यांचं निरीक्षण असंच आहे. 'भारत ही एक प्रचंड मोठी भूमी आहे. त्या भूमीत हिंडताना माणसांची भाषा,समजुती, एखाद्या प्राचीन ग्रंथातील घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन यात फरक पडतो. तसंच प्राचीन ग्रंथांतील घटनांचे बारकावे एका ठिकाणी जसे सांगितले जातात तसेच दुसऱ्या ठिकाणी सांगितले जातीलच असं नाही.
त्यामुळे नवख्या माणसाचा निष्कर्ष काढताना गोंधळ उडू शकतो,'असं मुस्टो म्हणतात.त्यामुळे त्या शक्यतो फक्त निरीक्षणं नोंदवताना दिसतात.यातून त्यांची भारताकडे पाहण्याची दृष्टी पूर्वग्रहदूषित नाही हे आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे पुस्तकही आपण अधिक जवळिकीने वाचू शकतो.
मुस्टोंनी रामायणाचा कसून अभ्यास केलाय,हे त्यांनी वेळोवेळी रामायणाबद्दल व्यक्त केलेल्या मतांवरून स्पष्ट होतं.'अति परिचयात् अवज्ञा' असं एक वचन आहे. रामायण आणि महाभारताच्या बाबतीत आपली अवस्था काहीशी अशीच झालेली असते.त्यातले बरेच बारकावे आणि कंगोरे आपल्याला ठाऊक नसतात.इंद्राचा मुलगा जयंत कावळ्याचं रूप घेऊन येतो आणि वनवासातल्या सीतेला चोचीने टोचून रक्तबंबाळ करतो.त्या वेळी राम हतबल होऊन उभा असतो.या प्रसंगी सीता कावळ्याला शाप देते : 'तुला फक्त एका डोळ्यानेच दिसेल' आणि काचोळी फाटल्यामुळे काढून टाकते. तेव्हापासून कावळ्याला एका डोळ्यानेच दिसतं,या समजुतीमागे ही दंतकथा आहे.त्या घटनेच्या स्मरणार्थ सीतेला सहानुभूती म्हणून दक्षिणेतील भटक्या जमातीतील स्त्रियांनी चोळी वापरणं सोडून दिलं,ही हकीकत आपल्यापैकी कितीजणांना ठाऊक असते? या व अशा अनेक दंतकथा मुस्टो आपल्या प्रवासात गोळा करतातच,पण त्यालाच जोडून त्यांना दिसलेल्या भारताचं दर्शनही आपल्याला घडवत जातात.
'भारतात फिरत असताना बऱ्याचदा कधी एकदा परत घरी जातेय,असं मला होऊन जायचं. इंग्लंडमधलं शिस्तबद्ध आरामदायी जीवन मला खुणावायचं.अशा वेळी मी घरी परत जायचे तेव्हा भारतात कमालीचा उन्हाळा सुरू झालेला असायचा.मात्र,लवकरच निर्जंतुक पाश्चात्त्य जीवनाचाही मला कंटाळा यायचा.झगमगीत रंग, मोकळं हास्य,अनौपचारिक चौकशा,मसाल्यांचा घमघमाट,
उकळत्या चहाचा वास,रातराणीचा गंध,झेंडूच्या माळा आणि साडीचे पदर मला खुणावू लागत.धुळीचा अभाव त्रासदायक ठरू लागे.मग मी पुन्हा एकदा सायकल बाहेर काढून भारतात परतत असे.तुम्ही भारतात एकदा येऊन गेलात की पूर्णपणे या जगात गुरफटून जाता. भारताचा द्वेष किंवा प्रेम यापैकी कोणतीही भावना तुमच्या मनात उद्भवली तरी एक गोष्ट विसरून चालत नाही,ती म्हणजे भारतात एक पुरातन संस्कृती नांदते.
तो एक समजायला कठीण पण तितकाच आकर्षक असा देश आहे.प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भारतात येऊन जायला हवं.'ॲन मुस्टोंसारखी माणसं लिहितात तेव्हा त्यांचे अनुभव आपलंही जीवन समृद्ध करतात आणि अशी पुस्तकं वाचताना आपण त्यांना आपसूकच सलाम करतो !
तुम्हाला जे द्यावेसे वाटते, ते नेहमीच देत रहा !
एक वृद्ध बिल्डर
एक वृद्ध बिल्डर एकटाच,त्या लांबवरच्या हायवेवरुन चाललेला. संध्याकाळ तशी थंड आणि करडी,अंतर तसे खूप मैलांचे आणि कमालीचे रुंदही.रस्त्याजवळचा पाण्याचा प्रवाह वेगाने खळाळतो आहे.,सायंकाळचा संधी प्रकाश अधिकाधिक कातर होत जाणारा!किनाऱ्यावरुन प्रवाहाच्या कडेने त्याला पैलतीरावर जायचे आहे.
किनाऱ्यावरुन जाताना पुल बांधण्याची निकड त्याला जाणवते.हात थकले असले,तरी पुल बांधायचाच,तो वृद्ध निश्चित करतो.वेगाने कामालाही प्रारंभ होतो.दिवसरात्र काम आणि काम ! त्या पुलाच्या बांधकामाकडे पहात असणारा एक गृहस्थ,त्या वृद्ध बिल्डरला विचारतो,
'कशासाठी बांधता आहात पुल ? काय साधणार त्यातून ? वेळेचा आणि पैशाचा मोठा अपव्यय ! तू आता इतका वृद्ध झाला आहेस, आणि तुझ्या आयुष्याचा प्रवासही संपत आलेला आहे.तरीदेखील हा सारा व्यर्थ खटाटोप कशासाठी ?हा पुल बांधला जाईल तेव्हा तू निश्चितच या जगात असणार नाहीस!'
'मी नसलो,तरी पुल असेल,आणि पुढच्या अनेक पिढ्यांना पैलतीरावर नेण्यास,तो सोईचा-सुखावह होईल.जवळचा हायवे दमछाक करणारा आहे.कित्येक मैलांची थकावट वाचेल यातून.निश्चितच वेळ आणि ऊर्जाही वाचेल ! मग पुढीलांसाठी सुखावह होईल सारे,येणाऱ्या तरुणाईसाठी पिढ्यांसाठी तर हे एक मोठे श्रमदान आहे,यातून स्वर्गीय आनंद मिळेल, हेही नसे थोडके !' - विल ॲलेन ड्रोमगोले
जन्मजात बुद्धी ही वाढत्या वयानुसार,अनुभवानुसार अधिकाधिक परिपक्क होत असते.प्रत्येक अनुभव आयुष्याचा एक नवा धडा,आपल्या तळहातावर ठेवत असतो.मुख्य म्हणजे तो एक नवे शहाणपण देत असतो.तेव्हा जेवढा माणूस अनुभवसंपन्न असेल,
तेवढे शहाणपण त्याला प्राप्त होते. ३० प्रभावी परिणामकारक सिद्धांत -अनुपम कुर्लवाल, गोयल बुक एजन्सी माझे म्हणाल,तर आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आणि ती म्हणजे,आपण आपले ज्ञान, आपला अनुभव,हा दुसऱ्याला जेवढा देत राहू,त्या देण्यातूनच आपण समृद्ध होत जातो.खरे तर,प्रत्येक अनुभव जीवनाचे एक आगळे रूप दर्शवत असतो.एक वृद्ध बिल्डर ही कविता मी लहानपणी प्रथम वाचली.तेव्हा ती मला फारशी कळली नाही,पण आयुष्याच्या या टप्यावर मात्र ती कविता मला मोठी आशयसंपन्न वाटते.मला त्या वयोवृद्ध बिल्डरचा ध्येयपथ कमालीचा आकर्षून घेतो.त्या वृद्धाला पुढील पिढीतील लोकांना मदत करायची आहे.
म्हणूनच तो मोठा पुल बांधायला घेतो.त्याचे ते पुल बांधणे,हे त्याच्याशी संवाद साधणाऱ्या गृहस्थाला,वेळ फुकट घालविण्यासारखे वाटते.अर्थात तो ब्रीज बिल्डर त्याच्याशी वाद घालत बसत नाही.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे,आपण जे काही कार्य करीत आहोत,
त्याची योग्यता व पुढील अनेक पिढ्यासाठी असणारी उपयुक्तता,त्याला चांगली ठाऊक आहे.
जेव्हा तुम्ही तुमच्याकडची गुणसंपदा-प्रतिभा जेव्हा जगाला वाटायला लागता,तेव्हाच तुम्हाला जे काही हवे (सुख-समाधान) ते सहज मिळते.यामागचे साधे तर्कशास्त्र असे आहे की,तुम्ही जेवढे या दुनियेला द्याल,तितके तुम्हाला अधिक मिळत जाणार आहे.झिग झिगलर म्हणतो, तुमच्याकडे काय आहे, किती धनदौलत आहे, याला काहीच महत्त्व नसून,असलेल्या साधनाचा इतरांसाठी कसा वापर करता,याला अधिक महत्त्व आहे.