३१.०३.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..
आपल्या जगापुढील एक दुसरे अरिष्ट म्हणजे युद्धाचे.
अलीकडच्या घडामोडीवरून आपल्याला स्पष्ट कळून आले आहे की,राष्ट्र मोठ्या प्रमाणावरील विध्वंसाच्या शस्रांचे साठे कमी करीत नसून उलट वाढवीत आहेत.
जगातील अत्यंत विकसित राष्ट्रांतील सर्वात बुद्धिमान माणसांनी आज लष्करी तंत्रशास्त्राला वाहून घेतले आहे.आण्विक अस्त्रांच्या चाचण्यावर बंदी घालण्याचा मर्यादित करार होऊनही आण्विक अस्त्रांचा प्रसार थांबलेला नाही.
उलट अलीकडेच पहिल्या गौरेतर,पौर्वात्य आणि कमी विकसित राष्ट्राने कम्युनिस्ट-चीनने-अणुस्फोट केला आहे.
त्यामुळे साऱ्या मानवजातीसमोर अणुयुद्धाचा भयंकर धोका अमर्याद प्रमाणावर उभा आहे.आतापर्यंत माणसांनी आण्विक युद्धाचे स्वरूप व धोके या संबंधीच्या वास्तव परिस्थितीला आपल्या मनात थारा दिला नाही;कारण त्यांना ती कल्पनाच मुळी अतिशय मानसिक यातना देणारी व न मानवणारी होती.पण त्यामुळे अशा युद्धाचे स्वरूप बदलत नाही किंवा धोके टळत नाहीत.केवळ त्या विचाराला थारा न दिल्यामुळे चिंता तात्पुरती दूर होत असेल पण त्यामुळे मानसिक शांतता व भावनात्मक सुरक्षितता लाभत नाही.आजही माणसाला युद्धाचे आकर्षण वाटते,ही सत्यस्थिती आहे.पण अनुभवावरून आपणास हे कळून आले पाहिजे की,युद्धाची कल्पना आजकाल विसंगत ठरली आहे.एके काळी अनिष्ट प्रवृत्तीचा फैलाव व वाढ यांना आळा घालण्याच्या दृष्टीने युद्ध उपयुक्त ठरत असेल पण आधुनिक काळातील शस्त्रांची विध्वंसक शक्ती इतकी मोठी आहे की,त्यामुळे अनिष्ट प्रवृत्तीला पायबंद घालण्याचे साधन या दृष्टीनेही युद्धाची उपयुक्तता नाहीशी झाली आहे.
सायरनांचे मधुर गीत
जीवन हे जगण्यालायक आहे आणि माणसाला जगण्याचा हक्क आहे हे आपल्याला मान्य असेल तर आपण युद्धाला दुसरा पर्याय शोधून काढलाच पाहिजे.
अवकाशयाने बाह्य अवकाशात भराऱ्या मारत असताना आणि विध्वंसनाची भयंकर क्षेपणास्त्रे वातावरणातून मृत्यूसाठी हमरस्ते तयार करत असताना कोणताही देश युद्धात आपण विजय मिळवू याची खात्री देऊ शकणार नाही.मर्यादित प्रमाणात युद्ध झाले तरी मानवी
हालअपेष्टा, राजकीय अशांतता व आध्यात्मिक भ्रमनिरास यांचा अनर्थकारक वारसा,परंपरा शिल्लक राहते.पण जागतिक महायुद्ध झाले तर परमेश्वराच्या कृपेने असे महायुद्ध न होवो - माणसाने आपल्या चुकीने अखेर आपला नाश ओढवून घेतला याची मुग्ध आठवण म्हणून फक्त धुमसणारी राख शिल्लक राहील.आधुनिक काळातील माणसे जर युद्धाची खुमखुमी बाळगतील तर या पृथ्वीचा डान्टेच्या कल्पनेतही आला नसेल एवढा भयंकर नरक करतील.म्हणून आपणा सर्वांना आणि माझे भाषण ऐकणाऱ्या व हे भाषण वाचणाऱ्या सर्वांना माझी एक सूचना आहे:अहिंसेचे तत्त्वज्ञान व कृती यांचा ताबडतोब अभ्यास केला जावा आणि मानवी संघर्षाच्या सर्व क्षेत्रात, इतकेच काय पण राष्ट्रांराष्ट्रांतील संबंधांच्याही क्षेत्रात अहिंसेच्या अख्खाचे गंभीर प्रयोग केले जावेत,अखेर राष्ट्रच युद्ध करतात,राष्ट्रांनीच मानवजातीच्या अस्तित्वाला धोका आणणारी शस्त्रास्त्रे तयार केली आहेत.केवळ विध्वंसकच नव्हे तर ती आत्मघातक आहेत."
त्याचबरोबर आपल्याला काही प्राचीन सवयींच्या,
उदाहरणार्थ अफाट सत्तेच्या व्यवस्थेवर विचार करावयाचा आहे आणि अवर्णनीय गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायचे आहेत. यावेळी आपणापुढे दोन पर्याय आहेत.एक म्हणजे मानतावादाचा पूर्ण त्याग करून,जी शस्त्रास्त्रे आपणच निर्माण केली आहेत,त्यांची धास्ती घेऊन निष्क्रिय होणे किवा वांशिक अन्यायाप्रमाणेच राष्ट्राराष्ट्रांतील युद्ध व हिंसा यांना तातडीने आळा घालणे.गौरकाय लोक व निग्रो यांच्यातील समानता म्हणजे दहशतीखाली वावरणाऱ्या आणि विनाशाकडे चाललेल्या जगातील समानता ठरणार असेल तर त्यामुळे गौरकाय लोक अगर निग्रो यांपैकी कोणाचेच प्रश्न सुटणार नाहीत.निःशस्त्रीकरण व शांतता साध्य करण्याकरिता ज्या समस्या सोडवाव्या लागतील त्यांचे गुंतागुंतींचे स्वरूप मी क्षुल्लक लेखू इच्छित नाही.
पण मला वाटते,या क्षेत्रात आपण मानसिक व आध्यात्मिक फेरमूल्यमापन करण्याची तयारी दाखविल्याशिवाय या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक अशी इच्छाशक्ती,धैर्य व दूरदृष्टी आपण व्यक्त करू शकणार नाही. आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यामुळेच ज्या गोष्टी वास्तव व जबरदस्त आहेत, असे आपणास वाटते,त्या वस्तुतःअवास्तव व मृत्यूच्या पाशात नेणाऱ्या आहेत,याची जाणीव होईल.जे नवे जग अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.त्या जगात प्रवेश करण्यासाठी आपण तयारी,इतकेच काय पण उत्सुकता व्यक्त केली पाहिजे.केवळ नकारात्मक मार्गाचा अवलंब करून आपण शांततामय जगाची रचना करू शकणार नाही.आम्ही युद्ध करणार नाही,एवढेच म्हणणे पुरेसे नाही.शांततेसाठी कळकळ दाखविणे व तीसाठी त्याग करणे आवश्यक आहे.युद्ध नकारात्मक उच्चाटन करण्यावर केवळ आपण लक्ष केंद्रित न करता शांततेच्या सक्रिय पुनरुच्चारावर भर दिला पाहिजे.
ग्रीक वाड्मयात युलिसिस व सायरन जमात यांच्याविषयी एक रमणीय कथा आहे.सायरन लोक इतके मधुर गात की,त्यांचे गायन ऐकण्यासाठी त्यांच्या बेटाकडे गलबत वळविण्याचा मोह खलाशांना आवरत नसे.या गायनाच्या मोहामुळे ते आपली गलबते या खडकाळ बेटाकडे वळवीत.गलबतातील खलाशी आपले घरदार,
कर्तव्य व प्रतिष्ठा विसरून गायनाच्या मोहाने समुद्रात उड्या टाकत आणि मृत्युमुखी पडत.युलिसिसने सायरन लोकांच्या मोहाला बळी पडावयाचे नाही,असा निर्धार केला.त्याने प्रथम गलबतावरील शिडाला स्वतःला बांधून टाकण्याचे ठरविले आणि त्याच्या खलाशांनी आपले कान मेणाने बुजवून टाकले. पण अखेर स्वतःचा बचाव करण्याचा अधिक चांगला मार्ग त्यांना सुचला.त्यांनी आपल्या गलबतावर ऑफियस या उत्कृष्ट गवयाला घेतले.सायरन लोकांच्या संगीतापेक्षा त्याची गीते अधिक नादमधुर होती.ऑफियस गाऊ लागला की,सायरनांचे गायन ऐकण्याची कोण फिकीर करतो? यासाठी आपण युद्धाचे केवळ नकारात्मक उच्चाटन करण्याकडे लक्ष न देता शांततेचा सक्रिय पुनरुच्चार करण्यावर भर दिला पाहिजे.युद्धाच्या बदसुरापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असे आणि मधुर संगीत - स्वर्गीय संगीत शांततेच्याद्वारे प्रगट होईल,
इकडे लक्ष दिले पाहिजे.जी कोणालाही जिंकता येणार नाही, अशी नकारात्मक अधिक अस्त्रांची शर्यत थांबविली पाहिजे आणि तीऐवजी जगातील सर्व राष्ट्रांच्या हितासाठी शांतता व भरभराट यांना मूर्त स्वरूपाच्या म्हणून माणसाने सृजनशीलतेचा उपयोग करण्याची सक्रिय शर्यत सुरू केली पाहिजे.थोडक्यात शस्त्रास्त्रांच्या शर्यतीऐवजी शांततेसाठी शर्यत चालू झाली पाहिजे.जर आपण शांततेसाठी निर्धाराने अशी मोहीम सुरू केली तर आतापर्यंत आशेचे जे दरवाजे घट्टपणे बंद राहिले होते,ते आपण उघडू शकू आणि संभाव्य विश्वसंहाराच्या विलापगीतांचे रूपांतर सृजनशील पूर्तीच्या स्तोत्रांत करू.
थोडक्यात वांशिक अन्याय,दारिद्र्य व युद्ध या समस्या सोडविण्यावर माणसाचे अस्तित्व अवलंबून आहे.आणि माणूस आपल्या वैज्ञानिक प्रगतीबरोबरच नैतिक प्रगती कशी किती करतो आणि एकोप्याने राहण्याची व्यवहारी कला कितपत शिकतो,यावर वरील समस्यांची सोडवणूक अवलंबून आहे.
जो प्रेम करीत नाही तो परमेश्वराला ओळखीत नाही !
काही वर्षांपूर्वी एक विख्यात कादंबरीकार निधन पावला.त्याच्या कागदपत्रांत नियोजित कादंबऱ्यांच्या कथासूत्रांची यादी होती.त्यांतील एक महत्त्वाचे कथासूत्र पुढीलप्रमाणे होते.खूप ठिकाणी विखुरलेल्या एका कुटुंबाला वारसाहक्काने एक घर मिळाले आणि या घरात त्यांना एकत्र राहणे भाग पडले.मानवजातीपुढील ही एक मोठी समस्या आहे.आपल्याला वारसाहक्काने एक मोठे घर जगरूपी विशाल घर मिळाले आहे.या घरात काळे व गौरकाय, पौर्वात्य व पाश्चिमात्य,जेन्टाईल व ज्यू,कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट,मुसलमान व हिंदू अशा सर्वांनी एकोप्याने रहावयास शिकले पाहिजे. विचारसरणी,संस्कृती व हितसंबंध या बाबतीत गैरवाजवी रीतीने विभक्त झालेले हे कुटुंब आहे. यापुढे आपणांस एकमेकांशिवाय जगणेच अशक्य असल्यामुळे आपण काही झाले तरी या विशाल जगात एकोप्याने रहाण्यास शिकले पाहिजे.याचा अर्थ आपल्या निष्ठा विभक्त असण्यापेक्षा अधिकाधिक प्रमाणात जागतिक झाल्या पाहिजेत.आपल्या वैयक्तिक समाजात जे काही सर्वोत्कृष्ट आहे.त्याचे जतन करण्याकरिता आपण समुच्चयाने मानवजातीविषयी सर्वांत जास्त निष्ठा व्यक्त केली पाहिजे.विश्वबंधुत्वा
साठी दिले गेलेले हे आवाहन म्हणजे वस्तुतः सर्व मानवजातीविषयीसर्वंकष व बिनशर्त प्रेम दाखविण्याचे आवाहन आहे. स्वतःची जमात,वंश,वर्ग व राष्ट्र यांच्या पलीकडे अधिक विशाल दृष्टिकोन ठेवण्याचे हे आवाहन आहे.अखंड जगाचा या कल्पनेविषयी बराच गैरसमज होता आणि त्या कल्पनेचा चुकीचा अर्थ लावला जात होता.तिच्यावर नीत्शेने तीव्र दुबळेपणाचा व भेकडपणाचाच शिक्का मारला होता.पण आज मानवजात टिकविण्यासाठी ही कल्पना अगदी आवश्यक झाली आहे.जेव्हा मी प्रेमाविषयी बोलतो,तेव्हा काही तरी भावनात्मक व दुबळी विचारसरणी व्यक्त करत नाही.त्यात वायफळ बडबडीपेक्षा काहीतरी विशेष अर्थ आहे.सर्व महान धर्मांनी जीवनातील सर्वश्रेष्ठ ऐक्याचे तत्त्व म्हणून जी शक्ती मानली त्या शक्तीसंबंधी मी बोलत आहे.प्रेम म्हणजे अंतिम सत्याचे दार उघडण्याची किल्ली होय. अंतिम सत्यासंबंधीच्या हिंदू,मुसलमान,
ख्रिश्चन, ज्यू व बौद्ध या धर्मीयांच्या या कल्पनेचे समालोचन सेंट जॉन यांच्या पहिल्या पत्ररूपी प्रवचनात उत्तम रीतीने केले गेले आहे.
आपण एकमेकांवर प्रेम करूया;कारण प्रेम म्हणजे परमेश्वर,आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा जन्म परमेश्वरापासून झाला असून तो परमेश्वराला ओळखतो.जो प्रेम करीत नाही तो परमेश्वराला ओळखत नाही.कारण परमेश्वर म्हणजे प्रेम आहे.जर आपण एकमेकांवर प्रेम केले तर आपल्यात परमेश्वराचे वास्तव्य राहते आणि त्याचे प्रेम आपल्यातील प्रेमाला परिपूर्णता आणते.
उद्धार तरी होईल किंवा सर्वनाश तरी होईल
ही वृत्ती सगळीकडे फैलावेल,अशी आपण आशा करूया.ॲर्नल्ड टॉइन्बी म्हणतात,"मृत्यू व अनिष्टता या तिरस्करणीय निवडीपेक्षा जीवन व सत् या चांगल्या निवडी करण्यातील प्रेम ही अंतिम शक्ती आहे.
म्हणून प्रथम आपल्याला अशी ओढ लागली पाहिजे की,प्रेम हाच अंतिम शब्द राहील.यापुढे आपल्याला द्वेषाच्या देवतेची पूजा करून किंवा टोल्यास टोला या विचारसरणीपुढे नमून चालणार नाही. अधिकाधिक जोराने उफाळणाऱ्या द्वेषरूपी लाटांमुळे इतिहासाचे महासागर खवळले जातात.द्वेषाचा आत्मघातकी मार्ग अवलंबून ज्यांनी नाश करून घेतला अशा राष्ट्रांच्या व व्यक्तींच्या उदाहरणांनी इतिहास नटलेला आहे.आता जगापुढील समस्या सोडविण्याची प्रेम ही एकच किल्ली आहे."
समारोप करताना मी हे सांगू इच्छितो की, मानवजात या काळात कसोटीत उतरेल आणि विनाशाकडे झपाट्याने चाललेल्या या युगाला नवी गती देईल.या काळातील परिस्थिती तंग व अनिश्चित असूनही काही तरी अतिशय अर्थपूर्ण घडत आहे.पिळवणूक व दडपशाही यांच्या जुन्या व्यवस्था ढासळून पडत आहेत आणि निःसत्त्व भासणाऱ्या या जगातून न्याय समता यांच्या व्यवस्था उदयास येत आहेत.पददलित लोकांपुढे संधीची द्वारे हळूहळू खुली होत आहेत,आणि राष्ट्रातील वस्त्रहीन व अनवाणी लोकांमध्ये आपण कोणी तरी आहोत ही भावना निर्माण होत आहे आणि निराशेच्या निबिड पर्वतांतून ते आशेचा बोगदा काढत आहेत.
अंधकारात जीवन कंठत असलेल्या लोकांना महान प्रकाश दिसू लागला आहे;काही ठिकाणी, व्यक्तींनी व गटांनी प्रेमाची प्रवृत्ती व्यक्त करून नैतिक प्रगल्भतेची भव्य उंची गाठली आहे. खऱ्याखुऱ्या अर्थाने जीवन जगण्याच्या दृष्टीने हा महान काळ आहे.याचमुळे भविष्यकाळाविषयी मी अद्याप निराश झालेलो नाही.
भूतकाळातील सहजसुलभ आशावाद आज अशक्य झाला असेल,शांतता व स्वातंत्र्य यांच्या लढ्यात आघाडीला असणाऱ्या लोकांना अद्यापही तुरुंगवासात दिवस कंठावे लागत असतील, आणि त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या जात असतील,त्यांचा एकसारखा छळ केला जात असेल आणि या छळामुळे आपण हा थोडा बोजा सहन करू शकणार नाही अशी निराशेची भावना त्यांच्यात निर्माण होण्याचा आणि अधिक शांत व समाधानी जीवनाचा अवलंब करण्याचा मोह त्यांना होण्याचा संभव असेल,आज आपणामुळे जागतिक पेचप्रसंग निर्माण झाला असेल आणि त्यामुळेच जीवनाच्या खवळलेल्या संग्रामात आपण गुरफटून गेलो असू पण प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगांत जसे धोके असतात तशी संधीही मिळते.त्यामुळे उद्धार तरी होईल किंवा नाश तरी होईल.या निबिड त्रस्त जगात अद्यापही माणसांच्या अंतःकरणात परमेश्वराचे राज्य होणे शक्य आहे.