उमेशने फोन ठेवला तशी त्याची बायको उल्का लगबगीने त्याच्याजवळ आली.
"कुणाचा फोन होता?तुम्ही कुणाला या या म्हणत होतात?"तिने काळजीयुक्त उत्सुकतेने विचारलं
"अगं काही नाही.दादाचा फोन होता.पुढच्या आठवड्यात येतोय आपल्याकडे"
"एकटेच ना?"
"नाही.सगळ्या कुटुंबासह येतोय.चार दिवस लागोपाठ तहसील आँफिसला सुटी आहे म्हणेे.स्वतःची एक दिवस सुटी घेऊन पाच दिवस आपल्याकडे रहाणार आहे."
" आणि तुम्ही त्यांना हो म्हंटलंत?"
"हो.का?तीन वर्षांनी येतोय तो आपल्याकडे.मग नाही कसं म्हणायचं?"
उल्काने कपाळावर हात मारुन घेतला.
"अहो तुम्हांला समजत कसं नाही?"तिच्या बोलण्यात आता संताप आणि उद्विग्नता दिसत होती "अहो मागच्याच महिन्यात आपण माझ्या मावसबहिणीच्या लग्नाकरीता आठवडाभर सुटी घेतली होती.आणि पुढच्या महिन्यात माझा चुलतभाऊ अमेरिकेहून येतोय.
त्याच्यासाठी आठवडाभर सुटी लागणार आहे.आता मला सांगा या महिन्यात आपल्या दोघांनाही कशी सुटी मिळेल?" उमेशचा चेहरा उतरला.ही गोष्ट त्याच्या लक्षातच नव्हती आली."अगं पण उल्का आपण त्यांच्याकडे हक्काने जायचं,सातआठ दिवस मनसोक्त रहायचं,मजा करायची आणि आता ते यायचं म्हणताहेत तर कोणत्या तोंडाने नाही म्हणणार?शेवटी विलासदादा माझा मोठा भाऊ आहे.आपण जातो तेव्हा तो सुटी घेतोच ना?"
"अहो ती काय खेड्यातली माणसं!त्यांना कसली आली आहेत कामं?रिकामटेकडी नुसती!आणि विलासदादांचं मला काही सांगू नका.चांगली गव्हर्नमेंटची नोकरी आहे त्यांची! भरपूर सुट्या मिळतात त्यांना.
आपल्यासारखा थोडीच आहे प्रायव्हेट जाँब!एक सुटी घ्यायची मारामार.तिथे पाच दिवस सुट्या मिळणार तरी कशा?" तिचा हा मुद्दा मात्र बरोबर होता.उमेश हो तर म्हणून बसला होता पण त्यालाही सुटीसाठी बाँसच्या विनवण्या कराव्या लागणार होत्या.त्यातून विलासदादा येणार त्याच दिवसात काही फाँरेन डेलीगेट्स येणार होते.म्हणजे सुटी मिळण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच.उल्का तणतणत किचनमध्ये निघून गेली.तिथेही तिची बडबड सुरुच होती.उमेशला आठवलं गेली कित्येक वर्ष तो कुटूंबासह दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यात त्याच्या गावी चोपड्याला जायचा.चोपडा हे जळगांव जिल्ह्यातलं तालुक्याचं गांंव.तसं बऱ्यापैकी शहर पण पुण्याची सर त्याला कशी येणार?पण तरीही सगळ्यांना तिथे जायला आवडायचं.याचं कारण म्हणजे विलासदादा आणि सरीतावहिनींचं आदरातिथ्य.ते त्यांना कधीही काही कमी पडू देत नसत.सरीतावहिनी ग्रुहिणीच होती पण नायब तहसीलदार असलेला विलासदादा खास त्यांच्यासाठी सुटी घ्यायचा.ते रात्री बेरात्री केव्हाही येवोत विलासदादा आपली कार घेऊन ६० किमी.अंतरावरच्या जळगांवला त्यांना घ्यायला यायचा.तसंच परततांना सोडायला यायचा.घरी आल्यापासून खाण्यापिण्याची चंगळ असायची.हाताला विलक्षण चव असलेली सरीता
वहिनी रोज खान्देशी पदार्थांबरोबरच भारतातले वेगवेगळे पदार्थ करुन त्यांना खाऊ घालायची.एंजाँयमेंटचे रोज वेगवेगळे प्लँन्स बनायचे.शेतात फिरणं,कधी जळगांव, धुळ्याला चक्कर मारणं तर कधी जवळपासच्या टुरीस्ट प्लेसेसना भेट देणं अशा गोष्टींची चंगळ असायची.त्या आठवड्यात दादा,वहिनी त्यांचा इतका भरभरुन पाहुणचार करायचे की शेवटच्या दिवशी निघतांना सगळ्यांचे पाय जड व्हायचे.उमेशची मुलं तर रडायचीच.
विलासदादाकडे आलं आणि निघतांना कपडेलत्ते आणि महागड्या गिफ्ट्स मिळाल्या नाहीत.असं कधीही व्हायचं नाही.अर्थातच विलासदादाकडचे ते चारपाच दिवस प्रचंड आनंदाचे आणि सुखाचे असायचे.
उमेशला ते सगळं आठवलं आणि तो मनातून स्वतःवरच नाराज झाला.विलासदादा आणि सरीतावहिनी जेवढं चोपड्याला आपण गेल्यावर आपल्यासाठी करतात त्याच्या निम्मं तरी आपल्याला जमेल का या विचाराने तो धास्तावला.खरं तर तो पुण्याला आल्यापासून विलासदादा फारच कमी वेळा त्याच्या घरी आला होता.आला तरी चारपाच तासांच्यावर त्याच्याकडे थांबला नव्हता.
कुटूंबासह चारपाच दिवसासाठी येण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती.त्यामुळे त्याचा पाहूणचार चांगलाच व्हायला पाहिजे होता.पण उल्का अशी तोंड फुगवून बसली तर काही खरं नव्हतं.
दोन दिवसांनी त्याने उल्काला विचारलं
"मग काय ठरवलंस तू?"
"कशाबद्दल विचारताय तुम्ही?"उल्काने कपाळावर आठ्या पाडत विचारलं.
" तेच गं.दादा आल्यावर सुटी घ्यायचं?"
"तुम्हीच घ्या सुटी.तुमचे भाऊ आणि वहिनी आहेत ते" "का?तुझे ते कोणीच नाहीत का?"
त्याने संतापाने विघारलं "बरं ठिक आहे मी सुटी घेईन.पण सकाळच्या स्वयंपाकाला तर तुच पाहिजेस ना?नाही म्हणजे मला येतो स्वयंपाक पण वहिनींसमोर मी स्वयंपाक करणं बरं दिसेल का?शिवाय त्याच पिरीएडमध्ये जर्मनीचं शिष्टमंडळ आपल्या कंपनीला भेट देतंय.माझ्या जमदग्नी बाँसला विचारणंही मुश्कील आहे"
"मी पण तर त्याच कंपनीच्या मेन आँफिसला काम करते ना?मग मला कशी मिळेल सुटी? आणि हे बघा या गोष्टीवरुन आता वाद नकोत.तुमच्या भावापेक्षा माझा दहा वर्षांनी अमेरिकेहून येणारा भाऊ जास्त महत्वाचा आहे."
" मग काय मी माझ्या भावाला हाकलून देऊ?" उमेशचा पारा आता चांगलाच चढला होता."काही हाकलायची गरज नाही.दिवसभर असेही ते पुणं पहायला बाहेर असतील.संध्याकाळी आपण असूच की त्यांचा पाहुणचार करायला!शिवाय आपली मुलं असतीलच त्यांच्यासोबत"हा मुद्दा उमेशला पटला.पण त्याचं समाधान काही झालं नाही.सहकुटूंब तीन वर्षांनी त्याच्याकडे येणाऱ्या भावाला असं एकटं घरी सोडून जाणं त्याच्या पचनी पडत नव्हतं.पण त्याचाही नाईलाज होता.शहरातले प्राँब्लेम्स् दादावहिनीला काय माहीत असणार!शिवाय दादा वहिनी समजून घेतील असंही त्याला वाटलं.सोमवारी संध्याकाळी विलासदादाने त्याला महाराष्ट्र एक्स्प्रेसने बसल्याचं आणि सकाळी साडेचारला पुण्याला पोहचणार असल्याचं कळवलं." तू ओला किंवा टँक्सी करुन घरी ये" असं उमेश त्याला म्हंटला खरा पण साठ किमी.अंतरावरुन त्याला घ्यायला येणारा दादा त्याला आठवला." आपल्याकडे फोर व्हिलर असती तर गेलो असतो घ्यायला."असं त्याने स्वतःचं समाधान करुन घेतलं.
अर्थात फोर व्हिलर असती तरी भल्या पहाटे झोपेतून उठून तो जाणं शक्यच नव्हतं हे त्यालाही कळत होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच घराची बेल वाजली.उमेश अनिच्छेनेच उठला तर उल्काच्या मनात विचार आला "या लोकांना पुण्याला यायला हीच गाडी मिळाली होती का?असं दुसऱ्यांच्या झोपा मोडणं यांना शोभतं का?शेवटी खेड्यातलेच ना!यांना मँनर्स कुठून येणार?" उमेशने दार उघडून त्यांना आत घेतलं.
" दादा झोप झाली नसेल तर झोपा थोडं" विलासदादाकडे पहात उमेश म्हणाला.भाऊजी अहो पाच वाजलेत.आमची रोजची उठायची हीच वेळ आहे.त्यामुळे आता झोप येणं शक्यच नाही.आणि गाडीत झाली चांगली झोप आमची "सरीतावहिनी म्हणाली.तिचा आवाज ऐकून बेडरुममध्ये झोपलेली उल्का पाहुण्यांना मनातल्या मनात शिव्या देत उठली.हाँलमध्ये येऊन तिने सगळ्यांचं खोटंखोटं का होईना स्वागत केलं.सकाळी आठ वाजता उमेश आणि उल्का दोघंही आँफिसला जायची तयारी करु लागले.ते पाहून विलासदादा आश्चर्याने म्हणाला " हे काय ?आँफिसला निघालात की काय?का सुटी नाही घेतली?" साँरी दादा.सुटीचा अर्ज दिला होता पण ती मंजूर नाही झाली.कंपनीत फाँरेनचे डेलीगेट्स व्हिजीटला येताहेत.त्यामुळे सुटी मिळणं कठीणच होतं.प्लीज जरा समजून घे ना!अरे पण मग उल्काला तर सुटी घ्यायला सांगायचं.नाही ना दादा मलाही सुटी नाही मिळाली" उल्का बाहेर येत म्हणाली. विलासदादाने सरीता
वहिनीकडे पाहिलं.तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती.
" अगं मग आम्हांला तसं सांगायचं ना !नसतो आलो आम्ही.तुम्ही दोघंही नसतांना आम्ही घरात थांबणं बरं तरी दिसतं का?" सरितावहिनी नाराजीने म्हणाली.
असं कसं म्हणता वहिनी?तुम्ही इतक्या वर्षांनी येणार आणि आम्ही नाही म्हणायचं?अहो असंही तुम्ही दिवसा कुठेतरी बाहेरच साईटसाईंगला जाणार.संध्याकाळी आम्ही आहोतच ना!आज मला वाटतं तुम्ही सिंहगडावर जाऊन यावं.तिथंलं पिठलंभाकरी खाण्यात खुप मजा येते.संध्याकाळी तुम्ही येण्याच्या आत आम्ही येऊ.मग करता येईल पाहुणचार" उमेश मखलाशी करत म्हणाला.
दादा आणि वहिनीने एकमेकांकडे पाहिलं.पण दोघंही काही बोलले नाहीत.
" तसं आम्ही आज परत एकदा साहेबांना भेटून सुटीचं विचारतोच आहे"उल्का पर्स गळ्यात टांगत म्हणाली "चला करा एंजाँय.भेटू संध्याकाळी बरं दादा भेटतो संध्याकाळी"
उमेशनेही हात हलवत दादाचा निरोप घेतला.ती दोघं गेल्यावर सरीता विलासकडे पहात म्हणाली."बघितलंत कसे आहेत तुमचे भाऊ? आपल्यालाकडे येतात तेव्हा आपण त्यांच्याकरीता काय नाही करत?साधी आपली दुपारच्या जेवणाचीसुध्दा व्यवस्था केली नाही त्यांनी.सिंहगडावर जेवा म्हणे.आपल्याला कसचं आलंय त्या पिठलं भाकरीचं कौतुक?आणि किती वेळा जाणार त्या सिंहगडावर?त्यांना असं वाटतं जसं आपण पुणं पाहिलेलंच नाहिये."
तेवढ्यात उमेशची मुलं बाहेर आली म्हणून सरीता चुप झाली.विलासलाही त्यांचं हे वागणं पटलं नव्हतं.कुठून इथे आलो असं त्याला होऊन गेलं.
संध्याकाळी उमेश आणि उल्का घरी परतले तेव्हा विलास आणि सरीता घरीच होते."अरे!गेला नाहीत सिंहगडावर?" उमेशने विलासच्या मुलांना विचारलं.काका आम्ही दोनदा बघितलाय सिंहगड.बोअर होतं आम्हांला परत परत तेच बघायला. आम्ही केळकर म्युझियमला जाऊन आलो."
" बाबा आज खुप मजा आली" उमेशचा मुलगा मध्येच म्हणाला "काकूंनी आज खुप छान स्वयंपाक केला होता.
इतके जेवलो आम्ही की बस!" काकू छानच करतात स्वयंपाक"उल्का सरीताकडे पहात म्हणाली.मग थोडा वेळ थांबून म्हणाली "वहिनी तुमच्या हातची ती खान्देशी शेवभाजी मला खुप आवडते.प्लीज कराल आज?" हो हो शेवभाजी!मलाही खुप आवडते.कराल वहिनी?"उमेशने विचारलं "ठिक आहे करते" सरीता म्हणाली खरं पण उल्का चोपड्याला येते तेव्हा एकाही कामाला हात लावत नाही हे तिला आठवलं.इथे मात्र ती हक्काने तिच्याकडून कामं करुन घेत होती.
" बरं मला सांग तुला सुटी मिळाली की नाही?" विलासने सरीताच्या चेहऱ्यावरची नाराजी पहात उमेशला विचारलं.
नाही ना दादा.माझा इमिजिएट बाँस तर नाहीच म्हणतोय आणि मोठे साहेब आज आँफिसला नव्हते.उद्या परत विचारतो. उल्काला तरी मिळाली का सुटी?नसेल मिळत तर सरळ विदाऊट पे करायला सांग.असं किती दिवस आम्ही एकटंच घरात बसायचं?"
" हो रे दादा मला कळतंय ते!पण काय करणार आमच्या कंपनीत विदाऊट पे केली तर नोटीस देऊन सरळ काढून टाकतात.शिवाय बोनस वगैरेवरही परीणाम होतो.
भाऊजी,आपली इमेजही खराब होते.प्रमोशनवरही परीणाम होतो" उल्का म्हणाली.विलासदादा काही बोलला नाही.मात्र यांना सुटीचं जमत नव्हतं तर आपल्याला सरळ नकार दिला असता.असं आपल्याला घरात बसवून ठेवण्यात काय फायदा?" हा नैसर्गिक विचार त्याच्याही मनात डोकावून गेला.
दुसऱ्या दिवशीही दिर-जावेच्या जेवणाची कुठलीही व्यवस्था न करता उल्का आणि उमेश निघून गेले.मात्र जातांना "वहिनी तुम्हांला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर "झोमँटो" वरुन जेवण पाठवून देवू का?" एवढं तिने विचारलं.हाँटेलचं काहीही न आवडणारी सरीता हो थोडीच म्हणणार होती?
दुपारी पाच वाजता शिपाई निरोप घेऊन आला.उमेशला मोठ्या साहेबांनी बोलावलं होतं.उमेशची छाती धडधडू लागली.जमदग्नी बाँस काय बोलेल याचा नेम नव्हता.
" सर मला तुम्ही बोलावलंत?"उमेशने त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करतांना घाबरत घाबरत विचारल." मिस्टर थोरात तुम्ही सुटीचा अँपलिकेशन दिला होता?मी शिर्केंनाही विचारलं.ते तर म्हणाले की तुम्ही अर्ज तर सोडाच तोंडीसुध्दा विचारलेलं नाही."नाही सर.मी सुटी मागितली नव्हती.उमेश गोंधळून उत्तरला मग तुम्ही तुमच्या भावाला सुटी मिळत नाही असं का सांगितलं?"
उमेशच्या अंगावर तर जणू वीजच कोसळली.अवाक् होऊन तो साहेबाकडे पहातच राहिला.ही गोष्ट साहेबांपर्यंत कशी पोहचली हे त्याच्या लक्षात येईना." बोला मिस्टर थोरात.सुटी न मागता तुम्ही सुटी मिळत नाही असं तुमच्या भावाला का सांगितलं?" साहेबांनी दरडावून विचारुन विचारलं.उमेशच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या."स..र..स..र म..ला वाटलं ते जर्मनीचे लोक आले होते तर मला कुणी सुटी देणार नाही.असा परस्पर अंदाज तुम्ही कसा काय लावलात?अगोदर अर्ज दिला असता.तो रिजेक्ट झाला असता तर तुम्ही तसं म्हणू शकला असता.याचा अर्थ असा की तुम्हांला सुटी घ्यायचीच नव्हती.घरी आलेलं भावाचं कुटुंब कसं लवकर निघून जाईल याचीच तुम्ही वाट पहात होतात.हो ना?"
" नाही सर.सर तसं नाही.मी ...मी..."
" काहो तुम्ही पुण्यात रहाता म्हणजे तुम्ही स्वतःला खुप माँडर्न,स्मार्ट,हुशार आणि चोपड्यात रहाणारा तुमचा भाऊ,वहिनींना गावंढळ,रिकामटेकडे,मागासलेले समजता का?"
"नाही सर तसं.."
"तुम्ही चोपड्याला गेलात की त्यांनी तुम्हांला घ्यायला यावं.सातआठ दिवस तुमच्या दिमतीला रहावं.तुम्ही म्हणाल ते खाऊ पिऊ घालावं,तुमची सरबराई करावी,तुम्हांला कपडेलत्ते करावे.आणि तुमच्याकडे ते येतात तेव्हा तुम्ही साधी सुटी घेऊन घरी राहू नये?मान्य आहे की तुमचं लाईफ फास्ट आहे आणि त्यांचं लाईफ शांत आहे.याचा अर्थ असा नाही की ते टाकावू आहेत,रिकामटेकडे आहेत.उलट त्याचं आयुष्य सुखासमाधानाचं आहे.आपल्यापेक्षा त्यांची घरं मोठी आहेत,सगळ्या सुखसुविधा आहेत.या मोठ्या घरांसारखीच त्यांची मनंही मोठी आहेत.त्या फ्लँटनामक खुराड्यात राहून आपली मनंही खुराड्यासारखीच छोटी,संकुचित झालीयेत.अहो तुमच्या भावाला तुमच्यापेक्षा दुप्पट पगार आहे.
मिळणारा मानही तुमच्यापेक्षा जास्त आहे.मनात आणलं असतं तर दोन नंबरच्या मार्गाने त्यांनी करोडोची कमाई केली असती आणि तुमच्या
सारख्याला घरगडी म्हणून ठेवलं असतं.पण ते इमानदार आहेत.त्यांनी पैसा नाही नाव कमावलंय.
साहेब संतापून बोलत होते.
पण सर तुम्हांला हे कसं कळलं आणि तुम्ही विलासदादाला कसं ओळखता?"साहेब हसले.
"मिस्टर थोरात तुमचे भाऊ माझे मित्र आहेत."
उमेशला परत एक मोठा धक्का बसला.
" आता ते माझे मित्र कसे तेही सांगतो.मीही चोपडा तालुक्यातलाच.पण गेली कित्येक वर्ष पुण्याला स्थायिक झालोय.तीन वर्षापूर्वी आमच्या शेतीच्या कामासाठी मी तहसील कार्यालयात गेलो होतो.तीन लाख कबुल करुनही आमचं काम होत नव्हतं.कुणीतरी तुमच्या भावाचं इमानदार अधिकारी म्हणून नाव सुचवलं.आम्ही त्यांना जाऊन भेटलो.अडचण सांगितली.दोन वर्षांपासून होत नसलेलं काम तीन दिवसात झालं तेही एक पैसा खर्च न करता.चर्चा करतांना साहजिकच तुमची ओळख निघाली.आपल्या भावाचे बाँस म्हणून तुमचे भाऊ आम्हांला तुमच्या घरी जेवायला घेवून गेले.आमचा आदरसत्कार केला.तेव्हापासून आम्ही मित्र आहोत.
दर महिन्याला आमचं फोनवर बोलणं होत असतं. माझी काही मदत लागली तर सांगा.असं मी त्यांना एकदा म्हंटल्यावर त्यांनी माझ्या वहिनीसाठी तुमच्या कंपनीत नोकरी असेल तर बघा."अशी विनंती केली.
त्यांच्या सांगण्यावरुनच आम्ही तुमच्या मिसेसला आपल्या कंपनीत लावून घेतलंय." हे ऐकल्यावर उमेशला आणखी एक मोठा धक्का बसला.त्याचबरोबर उल्काचं दादावहिनींसोबतचं वागणं आठवलं.आणि शरमेनं त्याची मान खाली गेली.
आज सकाळीच त्यांचा फोन आला.भावाची सुटी मंजूर करा अशी त्यांनी मला विनंती केली.तेव्हा मला हे कळलं.
सर दादाने तुमच्या मैत्रीबद्दल आणि त्यांच्या ओळखीमुळे मिसेसला नोकरी मिळाली आहे.याबद्दल मला कधीही काही सांगितलं नाही.मी म्हंटलं ना ही माणसं विशाल ह्रदयाची असतात.अशी उपकाराची जाणीव ते करुन देत नाहीत.शिवाय तुम्ही या ओळखीचा गैरफायदा घ्याल असंही त्यांना वाटलं असेल.उमेश मान खाली घालून उभा राहिला.काय बोलावं तेच त्याला सुचेनासं झालं.सर मग काय करायचं सुटीचं?"जरा वेळाने उमेशने घाबरत विचारलं.काय करायचं म्हणजे?तुमची सुटी मंजूर झालीये सोमवारपर्यंतची.तुम्ही अर्ज ठेवून जा.पण सर दादा रविवारपर्यंतच रहाणार आहे.साहेब हसले.नाही मिस्टर थोरात.रविवारी मी त्यांना माझ्या घरी सहकुटुंब पाहुणचाराला बोलावलंय.इतका चांगला माणूस माझ्याकडे पाहूणा म्हणून येतोय याचा मलाच खुप आनंद होतोय.खरं तर त्यांना सुटी नाही नाहीतर मीच त्यांना दोनतीन दिवस माझ्याकडे ठेवून घेतलं असतं.आणि आता तुमच्याही हातात तीन दिवस आहेत.तुम्हीही तुमच्या भावाला छान पाहुणचार करा.त्यांना कशाचीही कमतरता भासू देऊ नका.पैसे हवे असतील तर माझ्याकडून घ्या.पण काहीही कमी पडू देऊ नका.असं समजा की तुम्ही चोपड्याला रहाताय आणि ते तुमच्याकडे पुण्याहून आले आहेत म्हणजे तुमची मानसिकता बदलेल.
" साँरी सर आमच्याकडून चुक झाली.पुन्हा असं होऊ देऊ नका.नाहीतर माझ्याशी गाठ आहे.ओके या तुम्ही थँक्स सर "
तो जाण्यासाठी वळला तसे साहेब म्हणाले एक मिनिट.तुमच्या मिसेसचीही सुटी मंजूर करायला सांगितलंय.त्यांनाही सोबत घेऊन जा रिक्षातून एकत्र परतताना उल्का उमेशला रागाने म्हणाली.अजब जबरदस्ती करतात साहेब.मी मागितलेली नसतांनाही मला सुटी दिली.आता घालवा तीन दिवस त्या रिकामटेकड्या माणसांसोबतउल्का तोंड सांभाळून बोल आणि त्यांच्याशी नीट वाग.ही नोकरीही तुला दादामुळेच मिळालीये आणि मनात आलं तर तो तुला कधीही नोकरीतून बाहेर करु शकतो?"
"काय्यsss!काही काय सांगताय?"
मग उमेशने तिला सगळी कहाणी सांगितली.
घरी परतल्यावर उल्का सरीताला म्हणाली.वहिनी मी चांगली भांडून सुटी घेतलीये बरं का!आणि आता तुम्ही कोणतंच काम करायचं नाही.असं समजा तुमच्या लहान बहिणीकडे तुम्ही आला आहात.आता तीन दिवस मी तुम्हांला चांगला पाहुणचार करणार आहे.
उमेशने विलासदादाकडे पाहिलं.तो त्याच्याचकडे बघून गालातल्या गालातल्या हसत होता.मी तुझ्या साहेबांना फोन केला त्याचं तुला वाईट तर नाही ना वाटलं?"
"नाही दादा.उलट आमचे डोळे उघडले साहेबांनी.साँरी दादा आम्ही असं वागायला नको होतं.मला माफ कर विलासदादाने त्याच्या पाठीवर थोपटलं इट्स ओके उमेश.झालं गेलं विसरुन जा.आजकाल घरोघरी हेच चालतं.मोठ्या शहरातली माणसं गावाकडच्या लोकांना नेहमीच कमी दर्जाची,रिकामटेकडी समजतात.हा तुमचा दोष नाही.हा तुम्ही रहाता त्या शहराचा गुणधर्मच आहे.
चल जाऊ दे.आता तीन दिवस आम्हांला एंजाँय करु दे"
(ही गोष्ट दीपक तांबोळी यांच्या "अशी माणसं अशा गोष्टी " या पुस्तकातील आहे.)