* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: थोडीशी मासेमारी - १ A little fishing - 1

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१२/४/२४

थोडीशी मासेमारी - १ A little fishing - 1

१९२५ च्या शिशिर ऋतूत मी निराश मनाने गढवाल सोडलं व ताजातवाना होऊन १९२६ च्या वसंत ऋतूच्या सुरुवातीला माझ्या रणभूमीवर परतलो.यावेळेला मी कोटद्वारपर्यंत रेल्वेने आलो आणि तिथून मग पायी पौरीला येऊन प्रवासाचे आठ दिवस वाचवले.पौरीला इबॉटसन मला येऊन मिळाला व आम्ही दोघं रुद्रप्रयागला आलो.माझ्या तीन महिन्याच्या अनुपस्थितीत बिबळ्याने आणखीन दहा नरबळी घेतले होते आणि या काळात त्याला मारण्यासाठी तिकडच्या दहशतीखाली खचलेल्या रहिवाशांकडून एकही प्रयत्न झाला नव्हता.शेवटचा बळी एका छोट्या मुलाचा गेला होता आणि तो अलकनंदाच्या डाव्या तीरावर आम्ही येण्याच्या अगोदर दोन दिवस घेतला गेला होता.या बळीची बातमी आम्हाला टेलिग्राफने पौरीला असताना कळली होती पण कितीही वेगाने निघालो तरी थोडासा उशीर झालाच. आल्यानंतर पटवारीकडून आम्हाला कळलं की आदल्या रात्रीच बिबळ्याने त्याचा संपूर्ण फडशा पाडला होता.हा बळी रुद्रप्रयागपासून चार मैलांवरच्या एका गावात मध्यरात्री घेतला गेला होता आणि खाताना कोणतीही आडकाठी न आल्याने बिबळ्याने नदी ओलांडली असण्याची शक्यताच नव्हती.त्यामुळे आम्ही ताबडतोब दोन्ही ब्रिज बंद करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली.त्या हिवाळ्यात इबॉटसनने अतिशय कार्यक्षम अशी माहिती व संपर्क यंत्रणा प्रस्थापित केली होती.जर एखाद्या ठिकाणी कुत्रा,

बोकड,गाय किंवा माणूस यापैकी काहीही मारलं गेलं किंवा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याची खबर लवकरात लवकर आम्हाला मिळू शकणार होती.


 त्यामुळे आम्ही नरभक्षकाच्या हालचालींशी सतत संपर्क ठेवू शकणार होतो.नरभक्षकाचा वावर असलेल्या प्रदेशात प्रत्येक जण स्वतःच्या सावलीचाही संशय घेतो आणि ऐकला जाणारा प्रत्येक आवाज नरभक्षकाने केल्याचा भास होतो. त्यामुळे कित्येक अफवा आमच्यापर्यंत पोहोचणं साहजिकच होतं या अफवांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला मैलोन मैल तंगडतोड करावी लागे.


अशीच एक गंमतीशीर गोष्ट गालटू नावाच्या इसमाबाबत घडली.अलकनंदाच्या उजव्या तीरावर रुद्रप्रयागपासून आठ मैलांवरच्या त्याच्या गुरांच्या ठाण्यावर रात्री झोपण्यासाठी त्याने गाव सोडलं.दुसऱ्या दिवशी त्याचा मुलगा तिथे गेला तेव्हा त्याला त्याच्या बापाचं कांबळे दुसऱ्या दिवशी अर्धवट आत व अर्धवट बाहेर असं पडलेलं दिसलं आणि जवळच्याच मऊ जमीनीवर त्याला त्याच्या मताप्रमाणे फरफटत नेल्याच्या खुणा व बिबळ्याच्या पावलांचे ठसे आढळले.गावात येऊन त्याने बोंबाबोंब केली. त्यानंतर जवळजवळ साठ माणसं 'मृतदेह' शोधण्यासाठी निघाली तर चार माणसांना आमच्याकडे पाठवलं गेलं.त्यावेळेला इबॉटसन आणि मी अलकनंदाच्या डाव्या तीरावर एका डोंगरावर हाकारा घालत होतो.तेवढ्यात ती माणसं तिथे आली.बिबळ्या नदीच्या आमच्याच बाजूला आहे व गालटूचा बळी गेल्याच्या बाबतीत काही तथ्य नाही याची मला इतकी खात्री होती की,इबॉटसनने त्या चार माणसांना पटवारीबरोबर परत पाठवलं व या घटनेचा स्वतः शोध घेऊन यायला सांगितलं.दुसऱ्या दिवशी आम्हाला पटवाऱ्याकडून संपूर्ण रिपोर्ट मिळाला. त्याच्याबरोबर दरवाजाजवळच सापडलेल्या पगमार्कचं स्केचही काढून दिलं होतं.रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की जवळजवळ दोनशे माणसांनी शोध घेऊनही गालटूच्या 'मृतदेहा'चा पत्ता लागलेला नाही व शोध सुरूच ठेवण्यात येत आहे.

चित्रामध्ये एखाद्या थाळीच्या आकाराच्या वर्तुळाभोवती छोट्या चहाच्या कपाच्या आकाराची वर्तुळं काढण्यात आली होती आणि सर्व वर्तुळं कंपासने काढण्यात आली होती.पाच दिवसानंतर इबॉटसन व मी ब्रिजवरच्या टॉवरवर बसण्यासाठी निघत असताना एक वरात बंगल्यात आली.सर्वात पुढे एक वैतागलेला माणूस सारखा हातवारे करून ओरडत होता की मी काहीही गुन्हा केलेला नसताना मला अटक करून रुद्रप्रयागला का आणण्यात आलं आहे? हा माणूस गालटूच होता! त्याला शांत केल्यावर त्याने त्याची कथा ऐकवायला सुरूवात केली.झालं होतं असं की त्या रात्री गुरांच्या ठाण्यावर जाण्यासाठी घरातून निघतानाच त्याचा मुलगा घरी आला व त्याने सांगितलं की त्याने शंभर रुपयांना आज एक बैलजोडी विकत घेतली आहे.गालटूच्या मताप्रमाणे ती जोडी सत्तर रुपयांच्या वर जायला नको होती.ह्या पैशांच्या उधळपट्टीमुळे त्याने डोक्यात इतका राग घालून घेतला की गुरांच्या ठाण्यावर रात्र काढून सकाळी उठल्यावर तो त्या तिरीमिरीतच दहा मैलांवरच्या गावात त्याच्या लग्न झालेल्या मुलीकडे निघून गेला होता.आज जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला पटवाऱ्याकडून अटक झाली.आता त्याला जबाब पाहिजे होता की या सर्व घटनेत त्याचा दोष काय आहे.काही वेळ निघून गेल्यानंतर त्यालाही हळूहळू या सर्व प्रकारातला विनोद कळायला लागला व तो दहा मैलांवरच्या गावात राग थंड करण्यासाठी गेला असताना पटवाऱ्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून व इतरही मंडळीकडून काय मूर्खपणा झालाय हे कळल्यावर तोही सर्व मंडळींबरोबर खूप हसायला लागला.


रुद्रप्रयाग ब्रिजच्या टॉवरवरच्या त्या निसरड्या प्लॅटफॉर्मवर बसायला इबॉटसनचा सक्त विरोध होता.तिथे लाकूड व सुतार उपलब्ध असल्याने त्याने टॉवरच्या कमानीमध्येच चांगला प्लॅटफॉर्म तयार करवून घेतला.त्या प्लॅटफॉर्मवर त्याला शक्य होतं तेवढ्या पाच रात्री आम्ही बसून काढल्या.इबॉटसन गेल्यानंतर बिबळ्याने एक कुत्रा,चार बोकड व दोन गायी मारल्या.कुत्रा व बोकड मारल्याच्या रात्रीच दोघांचाही फडशा पाडला गेला,पण प्रत्येक गायीजवळ मात्र मी दोन दोन रात्री बसून काढल्या.

त्यातल्या पहिल्या गायीवर दुसऱ्या रात्री बिबळ्या आला,

पण रायफल खांद्याला लावून बरोबर आणलेल्या टॉर्चचं बटन मी दाबणार इतक्यात शेजारच्या घरातल्या बाईने दरवाजा उघडताना आवाज केला आणि दुर्दैवाने तो पळून गेला.या सर्व काळात एकही मनुष्यबळी मात्र गेला नाही.फक्त एक स्त्री व तिचं मूल जखमी झाल्याची घटना मात्र घडली.ते दोघं जिथे झोपले होते त्या खोलीचा दरवाजा बिबळ्याने ताकद लावून उघडला आणि त्या बाईचा हात तोंडात पकडून तिला खोलीबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने ती बाई खंबीर होती आणि बेशुद्ध वगैरे पडली नाही.जमीनीवरून ओढली जात असताना ती खोलीत आणि बिबळ्या दरवाजाबाहेर अशी स्थिती तिने त्याच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला आणि छातीवरच्या काही जखमा व सोलवटलेल्या हातासकट ती वाचली,


मुलाच्या डोक्यालाही छोटी जखम झाली.या खोलीत मी दोन रात्री बसून काढल्या,पण बिबळ्या काही आला नाही.

मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी एकदा मी केदारनाथ यात्रामार्गावरच्या एका गावाला भेट देऊन परतत होतो.

एका ठिकाणी मंदाकिनी नदीचा प्रवाह रस्त्याच्या अगदी जवळून गेला होता व तो उतारावर १२ फूट खाली कोसळल्यामुळे धबधबा तयार झाला होता.इथे आल्यावर मला दिसलं की नदीच्या पलीकडे, धबधब्याच्या वरच्या भागाच्या खडकांवर काही माणसं त्रिकोणी जाळं लावलेला लांब बांबू घेऊन बसली होती.त्यादिवशी माझी चालही बरीच झाली होती आणि ती माणसं काय करतायत ते बघण्याची उत्सुकताही होतीच.त्यामुळे मी रस्ता सोडला व थोडी विश्रांती घेण्यासाठी आणि सिगरेट ओढण्यासाठी माझ्या बाजूच्या खडकावर बसलो.आता त्यांच्यातला एकजण उठला व धबधब्याच्या खालच्या दिशेला आपलं बोट करून उत्तेजित आवाजात त्याच्या सहकाऱ्यांना काहीतरी सांगायला लागला तसे त्याचे दोन सहकारी तो जाळं लावलेला बांबू घेऊन उठले आणि त्यांनी धबधब्याच्या अगदी जवळ ते जाळं येईल अशा पद्धतीने बांबू पकडला.३ ते २५ किलो वजनाचे महासीर मासे असलेला एक थवा धबधब्यावरून खाली उडी घेत होता.त्यातला एक १० किलो वजनाचा मासा धबधब्याच्या प्रवाहात शिरून खाली पडत असतानाच सफाईदारपणे त्या जाळ्यात पकडला गेला.जाळ्यातून तो मासा काढून टोपलीत टाकल्यानंतर परत एकदा ते जाळं धबधब्यावर धरलं गेलं.मी हा खेळ जवळजवळ एक तास बघत होतो आणि तेवढ्या वेळात त्यांनी साधारण त्याच वजनाचे चार मासे पकडले.माझ्या मागच्या रुद्रप्रयागच्या भेटीत इन्स्पेक्शन बंगल्याच्या चौकीदाराने मला सांगितलं होतं की या भागात वसंत ऋतूमध्ये मंदाकिनी व अलकनंदा या दोन्ही नद्यांमध्ये वितळलेल्या बर्फाचं पाणी येणं सुरू होण्याच्या जरासं अगोदर खूप मस्त फिशिंग होऊ शकतं. त्यामुळे यावेळी रुद्रप्रयागला येताना.


मी माझा चौदा फुटी वेताचा साल्मन रॉड,२५० यार्ड लांबीची फिशिंग लाईन गुंडाळलेलं सिलेक्स रीळ व एक-दोन इंचाचे घरी बनवलेल्या पितळी चमच्याचं आमिषही आणलं होतं.


दुसऱ्या दिवशी नरभक्षकाची कोणतीही विशेष बातमी मिळाली नाही तेव्हा मी ही सर्व साधनसामग्री घेऊन धबधब्यावर आलो. कालच्याप्रमाणे आज महासीर मासे (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन) 

धबधब्यावरून खाली उडी मारत नव्हते. पलीकडच्या बाजूला काही माणसं शेकोटीच्या भोवती हुक्का ओढत बसली होती व एक दोन दम मारले की तो हुक्का एका हातातून दुसऱ्याच्या हातात जात होता... मला पाह्यल्यावर त्यांची उत्सुकता चाळवली व ते निरखून बघू लागले !


या लेखातील शिल्लक भाग १४.०४.२४ दिवशीच्या पुढील भागामध्ये..