* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: रामायणाचा 'सायकल' पाठलाग Ramayana's 'cycle' chase

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२८/४/२४

रामायणाचा 'सायकल' पाठलाग Ramayana's 'cycle' chase

रामायणातल्या आख्यायिकांची भुरळ पडून एक ब्रिटीश महिला भारतात येते.द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेला गेलेल्या हनुमानाच्या मार्गावरून प्रवास करते.भारत आणि रामायण या दोन्हीतली गुंतागुंत समजून घेत सायकलवरून उभा भारत फिरणाऱ्या ॲन मुस्टो यांच्याबद्दल.


जगात नाकासमोरून चालणारी माणसं बहुसंख्य असली तरी कोणत्यातरी वेडाने झपाटून नाना ठिकाणी भटकत फिरणारी माणसंही कमी नाहीत.घरदार असतं;

पोटापाण्याची सोय झालेली असते;सगळं भलं चाललेलं असतं; पण यांना चैन पडत नाही.एक दिवस उठतात, घरादाराचा निरोप घेतात आणि कुठेतरी भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचतात. फक्त पुरुषच नव्हे,तर बायकाही.ही भटकण्याची खाज त्यांच्यात कुठून निर्माण होते ? सर्व अडचणींकडे दुर्लक्ष करत हे स्त्री-पुरुष जीव धोक्यात घालून कुठल्या तरी अज्ञाताचा शोध घ्यायला का निघतात ? दहा ते पाच ऑफिस,शक्यतो घराजवळ कामाची जागा,रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी आराम,असं जगण्याचं सूत्र असलेल्यांच्या हे लक्षात येणं अवघड असतं.


हटके भटके - निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन


ही भटकी वृत्ती त्यांच्यात कुठून येते? असं म्हणतात,

ही वृत्ती आदिमानवात नसती तर माणूस आजही आफ्रिकेत दगडी हत्यारांनी वन्य पशुंची शिकार करत हिंडत असता. आदिमानवाच्या टोळ्यांमधील काहीजणांना क्षितिजापलीकडे काय आहे,समोरचा डोंगर ओलांडून गेलो तर काय होईल,सूर्य मावळतो तेव्हा तो कुठे जातो हे बघण्याची उत्सुकता होती म्हणूनच माणूस जगभर पसरला. तीच वृत्ती अजूनही काही माणसांमध्ये टिकून आहे.


इंग्लंडमधल्या ॲन मुस्टो या बाई त्यातल्याच एक.


ॲन मुस्टो हे नाव भारतीयांना खरं म्हणजे ठाऊक असायला हवं,पण माझ्या ओळखीच्या कुणालाही ते नाव मी सांगेपर्यंत माहिती नव्हतं. सध्या आपण देव,धर्म,

रामायणातलं आणि महाभारतातलं विज्ञान यासंबंधी बराच काथ्याकूट करत असतो.शिवाय अशा सनातनी विचारांविरुद्ध बोलणाऱ्यांना गोळ्याही घालतो. पण एखादी परदेशी व्यक्ती जेव्हा भारतात येते, आपल्या देशातील एखाद्या दैवताचा खोलवर अभ्यास करते,तेव्हा त्या व्यक्तीच्या कार्याची दखल घ्यावी असं मात्र आपल्याला वाटत नाही.


ॲन मुस्टो ही आपला सुखासुखी जीव पणाला लावून भटकणारी एक इंग्रज महिला.तिला सायकल चालवायची हौस.सायकल जणू तिच्या रक्तातच मुरलेली.कारण तिचा जन्म नॉटिंगहॅमचा.नॉटिंगहॅम शहर दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे: पहिली गोष्ट म्हणजे 'रॉबिनहुड' हा इंग्रज दंतकथा गाजवणारा बाराव्या- तेराव्या शतकातील धनुर्धर.दुसरी गोष्ट म्हणजे नॉटिंगहॅम हे ब्रिटिश सायकल निर्मितीचं माहेरघर आहे.


साहस आणि सायकलप्रेम या दोन्हींचा वारसा ॲनला नॉटिंगहॅममधून मिळाला. 


ॲनमुलींच्या एका शाळेची हेडमास्तर म्हणून काम करत होती.सतत तरुण विद्यार्थिनींच्या सहवासात राहून ती मनाने तरुण राहिली असावी.वयाच्या चोपन्नाव्या वर्षी तिने नोकरीचा राजीनामा दिला. बहुधा तोपर्यंतच्या मिळमिळीत आयुष्याचा तिला कंटाळा आला असावा.


खरं तर वयाची पन्नाशी उलटली की आपल्याकडची माणसं निवृत्तीचा विचार करू लागतात.फार तर एखाद्या प्रवासी कंपनीची पॅकेज टूर बघून एखाद्या आखीव रेखीव सहलीला जावं,एवढीच त्यांची इच्छा असते.पण चोपन्न वर्षांच्या ॲन मुस्टोबाईंनी नोकरीचा राजीनामा दिला,

हातात एक सायकल घेतली आणि थेट जगप्रवासाला निघाल्या.१९८७ ते २००० दरम्यान मुस्टोंनी सायकलवरून दोनदा जगप्रवास केला. त्यावर त्यांनी 'लोन ट्रॅव्हलर' आणि 'अ बाइक राइड' नावाची पुस्तकं लिहिली.त्यांचं तिसरं पुस्तक 'टू व्हील्स इन द डस्ट- फ्रॉम काठमांडू टु कँडी', हे त्यांच्या भारतातील सायकल प्रवासाबद्दल आहे.


या ब्रिटिश महिलेला भारतात सायकल प्रवास करताना काय दिसलं हे वाचलं की आपल्या देशातलं हे चित्र आपल्याला कसं दिसलं नाही किंवा रोज पाहत असूनही आपल्याला ते का जाणवलं नाही,हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. 


जिथे आपणही आपला देश असा रस्त्यावर जाऊन बघत नाही,तिथे या परदेशी महिलेने उभ्या भारतात खेडोपाड्यांतून प्रवास करावा आणि तिथलं जनजीवन टिपावं याचं कमालीचं आश्चर्य वाटतं.या पुस्तकाबद्दल आत्मीयता वाटायचं आणखी एक कारण होतं.भूशास्त्राशी संबंधित शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मी पठाणकोट ते कोलकाता आणि उत्तराखंड ते कन्याकुमारी असा भारत पालथा घातला. रेल्वेची तृतीय श्रेणी,खासगी बससेवा (म्हणजे काही वेळा बसच्या छतावरून),

बैलगाड्या किंवा पायी अशी ही भटकंती होती.त्या वेळी प्रत्येक छोट्या वस्तीत मला मारुतीचं देऊळ आढळत असे.सिमल्याची जाकू टेकडी असो,ओरिसातलं एखादं खेडं असो,किंवा कर्नाटकातलं आडगाव -

तिथे मारुती मंदिर आणि त्यावर भगवा झेंडा फडकताना दिसे.मुस्टोबाईंनीही हीच गोष्ट त्यांच्या पुस्तकात नोंदवली आहे.


पण मुस्टोबाई मारुती मंदिरांची नोंद करून थांबल्या नाहीत.या 'मंकी गॉड' बद्दल कुतूहल वाटून त्या त्याबद्दलच्या दंतकथा गोळा करू लागल्या.त्या हनुमानाच्या प्रेमातच पडल्या,म्हणा ना! (पाश्चात्त्यांनी हनुमानाचा मागोवा घेतल्याचं हे दुसरं उदाहरण मी पाहत होतो. १९७२ ते ७५ या काळात अबूच्या पहाडात भूसर्वेक्षण करताना एकदा एका अमेरिकी महिलेशी गाठ पडली. त्यांचं नाव सारा हर्डी.त्या लंगूर वानरांवर संशोधन करत होत्या. त्यांच्या प्रबंधात हनुमानावर एक प्रकरण होतं असं आठवतं. पुढे 'लंगूर्स ऑफ अबू' या नावाने हा प्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.) मुस्टोंनी हनुमानाच्या कथा ऐकल्या तेव्हा त्यांना हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून लंकेत नेल्याची हकीकत कळली.रावणासोबतच्या युद्धात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्याची जबाबदारी हनुमानावर येऊन पडली.


द्रोणागिरी पर्वतावरची संजीवनी आणण्यासाठी गेलेल्या हनुमानाने वनस्पती शोधत बसण्याऐवजी सरळ पर्वतच्या पर्वतच उचलला.'मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे।' हे ठीक आहे; पण पुढे रामदासांच्या भीमरूपी स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे 'आणिला,मागुति नेला।' हे वास्तव तसं नाही,अशी माहिती मुस्टोंना या शोधाशोधीत समजली. हे कळल्यावर मुस्टोबाईंना स्वस्थ बसवेना.त्या द्रोणागिरीचा शोध घेत घेत नेपाळमध्ये पोहोचल्या.तिथे त्यांना कळलं,की मारुतरावांनी द्रोणागिरी उखडला खरा,पण तो परत आणतो असं सांगून ते जे गेले ते परतलेच नाहीत.बहुधा युद्धाच्या गडबडीत विसरले.

आजही 'हा गेलो नि हा आलो' असं सांगून गेलेले हनुमानजी आपली टेकडी परत आणून देतील याची हे गावकरी वाट बघत आहेत,असं मुस्टो सांगतात.


खरं तर रामायण ही आपली परंपरा.पण त्यातल्या तपशीलांच्या खोलात शिरण्याची उत्सुकता आपल्यापैकी कितीजण दाखवतात ? 'द्रोणागिरी'चं मूळ स्थान कुठे आहे यात आजवर किती लोकांनी रस घेतला असेल ? द्रोणागिरी परत करण्याचं आश्वासन देऊन निघालेला हनुमान परत आलाच नाही म्हटल्यावर नेपाळमधल्या त्या गावात कोणत्या दंतकथा तयार झाल्या असतील याचा शोध आपल्यातल्या कितीजणांनी घेतला असेल ?


पण ही हकीकत ऐकल्यावर मुस्टोंचं कुतूहल मात्र जागृत झालं.मुस्टो नेपाळमध्ये गेल्या आणि रामायणातल्या मारुतीच्या मार्गावरून,म्हणजे द्रोणागिरीचं हिमालयातलं मूळ स्थान ते लंका असा प्रवास करायचं त्यांनी ठरवलं. हा प्रवास अर्थातच सायकल प्रवास असणार होता,हे वेगळं सांगायला नकोच.त्या प्रवासाची हकीकत म्हणजे 'टू व्हील्स इन द डस्ट फ्रॉम काठमांडू टु कैडी'. या पुस्तकात या सायकल प्रवासाबरोबरच त्या भारतीय निवडणुकांचा उत्साह,भारतीय आदरातिथ्य आणि ग्रामीण जीवन हे सगळं खुसखुशीत शैलीत आपल्याला सांगतात. त्या म्हणतात...


✓ 'माझी तीर्थयात्रा एक दिवस दख्खनच्या धुळीमध्ये सुरू झाली. १९९२ चा जानेवारी महिना होता.उज्जैनच्या गर्दीतून बाहेर पडून मोकळ्या ग्रामीण भागात जायचा प्रयत्न करत मी सायकल चालवत होते.सकाळची गर्दीची वेळ.अरुंद रस्त्यातून मी वाट काढत होते.इंच इंच लढवत पुढे सरकणं भाग होतं.रहदारीत माझी स्पर्धा सर्व प्रकारची यांत्रिक वाहनं,सायकली, सायकल रिक्षा,बैलगाड्या,

टांगे,घोडे,उंट आणि हातगाड्या अशा विविध वाहनांशी होती.हॉर्न वाजत होते,सायकलींच्या घंटा किणकिणत होत्या,चाबकांचे फटकारे ओढले जात होते आणि त्यातच उतावळे वाहनचालक बहुधा एकमेकांना शिवीगाळ करत होते.जे काही अरुंद पदपथ होते त्यांवर चर्मकार, ज्योतिषी आणि त्यांचे पोपट,भिकारी,कपड्यांचे व्यापारी,

चपलांचे व्यापारी आणि इतर विक्रेते आपला माल मांडून बसले होते.काही गरीब कुटुंबं आपल्या न्याहारीची व्यवस्था करत होती आणि पादचारी भर रस्त्यात वाहनांच्या गर्दीत जीव मुठीत घेऊन चालायचा प्रयत्न करत होते. जिथे मोकळी जागा मिळेल तिथून हे पादचारी एकामागून एक घुसून पुढे पुढे सरकायचा प्रयत्न करत होते.त्यामुळे होणाऱ्या वादांची या गोंधळात आणखीच भर पडत होती.काळी मातकट डुकरं कचऱ्याचे ढीग उकरत डुरकत होती.त्यांच्या पाठीवर बसून त्यांना चोची मारणाऱ्या कावळ्यांना त्याचं काहीच देणं-घेणं नसावं.भटकी कुत्री त्या रहदारीच्या गोंधळात भर घालत होती आणि मधनंच केकाटत होती.या सगळ्या गोंधळाचा नि आपला काहीच संबंध नाही अशा थाटात भारतात परमपवित्र मानल्या गेलेल्या गायी मधूनच एखादा वृत्तपत्रीय कागदाचा पुडा चघळत नाही तर कोबीचं पान चावत निवांत हिंडत होत्या.आपल्या जाणिवांना खडबडून जाग आणणारा खास भारतीय माहौल म्हणतात तो हाच.


शिल्लक राहिलेला भाग पुढील २०९.०४.२४ या लेखामध्ये…