१२.०४.२४ या लेखातील पुढील भाग…
या धबधब्याच्या खाली तीस ते चाळीस यार्ड रूंद व दोनशे यार्ड लांब असा डोह तयार झाला होता. व या डोहाच्या दोन्ही बाजूला उंच खडक लांब भिंती होत्या.या दोनशे यार्डापैकी,मी जिथं उभा होतो तिथून शंभर यार्डाच्या पाण्याचा भाग दिसू शकत होता.या अतिशय सुंदर दिसणाऱ्या डोहाताच पाणी स्फटिकासारखं स्वच्छ होतं. डोहाच्या माझ्या बाजूला दगडी भिंत एकदम पंधरा फूट उंच होती.त्यामुळेच हा धबधबा तयार झाला होता.
धबधब्याच्या ज्या बाजूला मी उभा होतो त्या बाजूकडून डोहापर्यंत पोचणं शक्यच नव्हतं व किनाऱ्याने दाट झुडुपं वाढली असल्याने जर मासा गळाला लागलं तर काठाकाठाने त्याच्यापर्यंत पोचून तो हातात मिळणंसुद्धा मुश्किल होत.वाट निसरड्या दगडधोंड्यातून काढावी लागणार होती.डोहाच्या पलीकडच्या टोकाला ही मंदाकिनी नदी प्रचंड उसळ्या मारत फेसाळत अलकनंदाशी तिच्या संगमावरच मिळत होती.
थोडक्यात काय,मासा गळाला लावणं आणि तो हाताशी येणं या दोन्ही गोष्टी या ठिकाणी अवघडही होत्या व धोकादायक सुद्धा!पण ही फार पुढची गोष्ट होती व तिचा विचार आताच करण्याची गरज
नव्हती.अजून तर मी माझा रॉडसुद्धा नीट जुळवला नव्हता! बघूया तरी काय होतंय ते...!
डोहाच्या माझ्या बाजूला म्हणजेच धबधब्याच्या बाजूला पाणी खोल होतं आणि त्यावर धबधब्याच्या फेसाळत्या पाण्यामुळे पाण्याचे असंख्य छोटे छोटे बुडबुडे तरंगत होते आणि त्याच्या मध्यापर्यंत त्याचा वाळूचा तळ दिसत होता.
इथे पाणी चार ते पाच फूट खोल होतं. तळातला प्रत्येक दगड दिसेल इतकं ते पाणी निवळशंख होतं.डोहाच्या या भागातच दोन ते पाच किलो वजनाचे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत येत होते.या बारा फूट उंच खडकावर हुक माऊंट केलेला दोन इंची चमचा हातात घेऊन त्या पाण्याकडे बघत असतानाच फिंगरलिंग्ज माशांचा एक थवा तिथे चमकला व डोहावरून सरळ पुढे जाऊ लागला. त्यांच्या पाठलागावर तीन मोठे महासीर होते. यावेळी मी अगदी निराळी व अपारंपरिक पद्धत वापरून चमचा लांब फेकला.अतिउत्साहाच्या भरात माझा अंतराचा अंदाज चुकला व डोहापलीकडच्या खडकांवर पण पाण्यापासून एक दोन फूट उंचीवर तो चमचा आपटला. शपण माझं नशीब आज जोरावर होतं.कारण तो चमचा पाण्यात पडला त्याच वेळेला फिगरलिंग्जच्या पाठलागावर असलेले महासीर मासे तिथे येऊन पोचले होते आणि त्यातल्या एकाने तर आमिषाला तोंड घातलंच.उंचावरून लांबलचक लाईनने कास्टिंग करणं तसं कष्टाचं असतं पण माझ्या रॉडने मला चांगली साथ दिली आणि तो हुक माशाच्या तोंडात अडकला.काही क्षण माशाला काय झालंय ते कळलं नाही व त्याने पांढरं पोट माझ्याकडे करून पाण्यावर काटकोनात उभं राहून दोन्ही बाजूला हिसडे मारायला सुरुवात केली व शेवटी टाळूत टोचणाऱ्या हुकमुळे जीवाच्या आकांताने पाणी उंच उडवत सरळ प्रवाहाला लागला.या जोरदार हालचालींमुळे तळाशी असलेल्या छोट्या माशांची मात्र तारांबळ उडाली.
या पहिल्याच घावेत त्या माशाने रीळवरची १०० यार्ड दोरी ओढून नेली व काही क्षणानंतर आणखी ५० यार्डस ! तरीही रिळावर अजूनही बरीच दोरी शिल्लक होती पण आता तो मासा प्रवाहातल्या वळणावर आला होता आणि आता डोहाच्या पलीकडच्या टोकाकडे जाण्याचा धोका होता.पण कधी ताण देऊन तर कधी ढील देऊन शेवटी मी त्याचं तोंड प्रवाहाच्या वरच्या बाजूला वळवण्यात यशस्वी झालो आणि त्यानंतर त्याला वळणावरून स्थिर पाण्यात ओढून आणलं. माझ्या जरा खालच्या बाजूने पुढे आलेल्या एका खडकामुळे बॅकवॉटर तयार झालं होतं आणि तिथे आल्यावर अर्धा तास जीवघेणी झुंज दिल्यावर तो मासा शेवटी पाण्याखाली बुडाला.
आता मात्र विचार करण्याची वेळ येऊन ठेपली होती आणि हा मासा बहुतेक असाच सोडून द्यावा लागणार असा विचार मी करत असतानाच माझ्या शेजारच्या दगडावर एक सावली पडली. खडकावरून बॅकवॉटरकडे वाकून पहात ती व्यक्ती म्हणाली की हा तर खरोखर फार मोठा मासा आहे साहेब,पण आता त्याचं तुम्ही काय करणार आहात ? जेव्हा त्याला मी म्हणालो की त्याला तिथून इथे घेऊन येण्याचा मार्ग नसल्यामुळे त्याला तसाच सोडून द्यावा लागणार... तेव्हा तो म्हणाला, "थांबा साहेब, मी माझ्या भावाला घेऊन येतो.हाक ऐकली तेव्हा बहुतेक त्याचा भाऊ गोठा धूत असणार. हा उंच, सडपातळ नुकतंच मिसरूड फुटलेला पोरगा तशाच अवस्थेत आला तेव्हा मी त्याला हातपाय धुवून यायला सांगितलं नाहीतर तो खडकारून घसरून पडलाच असता.त्यानंतर मी त्यांच्याबरोबर पुढे काय करायचं यावर चर्चा केली.आम्ही जिथे उभे होतो तिथून खडकामध्ये एक भेग सुरू होऊन खाली एका छोट्याशा कपारीपर्यंत गेली होती.ही कपार पाण्यापासून एखादा फूट वर होती व साधारण ६ इंच रुंद होती.योजना अशी ठरली की आताच हातपाय धुवून आलेल्या त्या छोट्या भावाने कसरत करत त्या कपाऱ्यापर्यंत जायचं त्यानंतर मोठ्या भावाने कपारीपर्यंत गेलेल्या भावाचा हात पकडण्याइतपत खाली जायचं आणि मी मोठ्याचा हात धरून खडकावर पालथा पडून राहायचं.पण प्रथम मी त्यांना विचारून घेतलं की त्यांना पोहता येतं का व त्यांना माशाला हाताळता येतं का? हसत हसतच त्यांनी सांगितला की अगदी छोटे असल्यापासनं ते दोघेही मासेमारी करतायत.
योजनेतला कच्चा दुवा असा होता की मी एकाच वेळी हातात रॉड धरून साखळीतला दुवा बनू शकणार नव्हतो.पण काहीतरी धोका तर पत्करायला पाहिजेच होता.तेव्हा मी रॉड खाली ठेवला,लाईन तोंडात पकडली आणि त्या दोन भावांनी त्यांच्या जागा घेतल्यावर खडकावर पालथा पडून मोठ्याचा हात पकडला.त्यानंतर फिशिंग लाईन कधी तोंडात पकडून तर कधी हातात पकडून त्या माशाला जवळ ओढायला सुरुवात केली.त्या पोराला माशाला कसं हाताळायचं माहीत होतं हे नक्की,
कारण माशाचा खडकाला स्पर्श होण्याच्या अगोदरच त्याने त्याच्या कल्ल्याच्या एका बाजूला अंगठा तर दुसऱ्या बाजूला बोटं अशी त्याच्या गळ्यावर घट्ट पक्कड घेतली. ह्या क्षणापर्यंत मासा शांत होता पण जसा त्याचा गळा पकडला गेला तशी एकदम त्याने उसळी मारली व काही क्षण आम्ही तिघंही पाण्यात कोसळणार अशी परिस्थिती निर्माण झाली.ते दोघंही अनवाणी होते आणि आता दोरी पकडावी लागत नसल्याने माझे दोन्ही हात त्यांना मदत करायला मोकळे होते.त्यामुळे ते दोघंही मागे वळले व अगदी पायाच्या बोटांवर पकड घेत त्याच भेगेतून वर आले.
मासा हातात आल्यावर मी त्यांना ते मासे खातात का असं विचारलं.अत्यानंदाने ते 'हो' म्हणाल्यावर मी त्यांना म्हटलं की जर माझ्या माणसांकरीता दुसरा मासा पकडायला त्यांनी मला मदत केली तर हा जवळपास १५ किलोचा मासा मी त्यांना देईन.ते लगेच तयार झाले.
माझा हूक त्या महासीरच्या खालच्या ओठात खूप खोलवर रुतला होता.जसा मी तो कापून काढला तसे ते भाऊ उत्सुकतेने बघू लागले.हूक निघाल्यावर त्यांनी मला तो नीट बघण्यासाठी मागितला.एकाच टोकाला तीन तीन हूक ? अशी गोष्ट त्यांच्या गावात कोणी बघितलीही नव्हती.अर्थात त्यांच्या टोकाला थोडासा बाक असलेली पितळी तार होती ती 'सिंकर' म्हणून काम करते.पण त्या हुकला आमिष कोणतं लावलं होतं ? मासा पितळ थोडंच खाईल ? ते खरंच पितळ होतं की दुसरं कोणतंतरी कडक
झालेलं आमिष होतं? अशा त-हेने आमिषाचे चमचे,तीन हुक लावलेला गळ या सगळ्या गोष्टीवर शेरे व आश्चर्याचं आदानप्रदान झाल्यावर मी त्यांना खाली बसायला व मी दुसरा मासा पकडत असताना नीट बघायला सांगितलं.
डोहातले सर्वात मोठे मासे त्याच्या पलीकडच्या कडेला होते पण तिथे महासीर शिवाय मोठे 'गूंच' मासेसुद्धा होते.हे मासे गळाला पटकन लागतात.पण गळाला लागल्यावर तळाशी सूर मारून कोणत्यातरी कातळाच्या खाली डोकं घालून ठेवण्याची त्यांना सवय असते त्यामुळे आपल्या पहाडी नद्यांमध्ये फिशिंग करणाऱ्यांचे गळ तुटायला हेच मासे नव्वद टक्के जबाबदार धरले जातात आणि गळाला लागले तरी या त्यांच्या सवयीमुळे हातात मिळणं फार कठीण आणि जवळजवळ अशक्यच असतं.
मगाशी जिथून गळ टाकला होता त्या जागेपेक्षा चांगली दुसरी जागा नव्हती.म्हणून मी परत उभा राहिलो व चमचा हातात घेऊन कास्टींगसाठी सज्ज झालो.मगाच्या माझ्या,महासीरच्या व त्या दोन मुलांच्या हालचालींमुळे खालच्या डोहातले मासे जर बिचकले होते पण आता हळूहळू ते परत डोहात यायला लागले होते.त्या मुलांच्या उत्तेजित आवाजातल्या ओरडण्यामुळे व त्यांनी बोट दाखवल्यामुळे माझं लक्ष,जिथे उथळ पाणी संपत होतं व खोल पाणी सुरू होत होतं तिथल्या मोठ्या माशाकडे गेलं.मी गळ फेकण्याच्या आधीच तो वळला व खोल पाण्यात शिरला. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तो तिथे परत आला तशी मी गळाची दोरी फेकली.पण दोरी ओली होऊन आकुंचन पावल्याने माझा अंदाज थोडा चुकला.
दुसऱ्या वेळेला मात्र मी अचूक वेळेला व अचूक जागी दोरी फेकली.चमचा बुडण्यासाठी थोडा वेळ दिल्यानंतर मी हळूहळू रीळ गुंडाळायला सुरुवात केली.थोडे हिसके देत देत मी दोरी ओढू लागलो तेवढ्यात एक महासीर चटकन पुढे आला व दुसऱ्या क्षणाला टाळूला हुक अडकल्याने त्याने पाण्याबाहेर उसळी मारली.त्यानंतर तो परत पाण्यात पडला,अंगात आल्यासारखा प्रवाहाबरोबर जाऊ लागला.ती माणसं अजूनही पलीकडच्या बाजूला हुक्का ओढत बसली होतीच त्यांची व त्या दोन भावांची उत्सुकता आता शिगेला पोचली.
मी परत एकदा रीळ गुंडाळून तयार झालो तसं माझ्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या त्या दोन भावांनी मला सांगितलं की यावेळी मासा डोहाच्या पलीकडच्या टोकाला जाऊ देऊ नका. हे बोलणं सोपं होतं पण प्रत्यक्षात आणणं फार अवघड होतं.कारण हुक किंवा गळ तुटून न देता महासीर माशाची पहिली धाव थांबवणं भल्याभल्यांना शक्य होत नाही.पण आज आमचं नशीब आमच्यावर प्रसन्नच होतं म्हणा किंवा मासा फार लांब जायला यावेळी घाबरला म्हणा पण रिळावर ५० यार्ड लाईन उरलेली असताना तो थांबला व जरी त्याने बराच वेळ झुंज दिली तरी तो वळवणावरच थकला आणि पाण्यात बुडाला. त्यानंतर त्याला ओढून आणणं फारसं अवघड नव्हतं.दोन्ही माशांची लांबी जवळपास सारखीच होती,पण दुसरा पहिल्यापेक्षा वजनी होता.मोठा भाऊ विजयी मुद्रेने हा मासा खांद्यावर टाकून त्याच्या गावात परतला पण छोट्या भावाने मात्र मला विनवलं की दुसरा मासा व गळ हातात घेऊन मला स्वतःला तुमच्या बरोबर इन्स्पेक्शन बंगल्यावर येऊ द्या.मीही पूर्वी केव्हातरी छोटा मुलगा होतो व माझा मोठा भाऊही फिशिंग करायचा त्यामुळे त्याला नक्की काय पाहिजे हे मला कळलं.खरंतर त्याला म्हणायचं होतं की,"साहेब तुम्ही मला मासा व रॉड घेऊन तुमच्याबरोबर यायची परवानगी दिलीत व तुम्ही एक दोन पावलं माझ्या मागे चाललात तर रुद्रप्रयाग बाजारातल्या सर्वांना वाटेल की हा मासा मीच गळाला लावलाय.एवढा मोठा मासा तर त्यांनी कधी पाहिलाही नसेल."