भावनांची तीव्र मूळं शब्दांच्या भुईत
रूजवणाऱ्या कवींच्या ह्या 'पातीवरल्या बाया'
नदी युगायुगांचे तप घेऊन वाहत असते.ती थकलेल्या माणसांच्या हाडांची राखेसहित त्यांचा काळ देखील धुवून काढत असते.नदी ठेवत नाही जपून कुणाचा संदर्भ,
कुणाचा इतिहास,कुणाचा काळ.कारण नदीला व्हायचं असतं पुन्हा पुन्हा स्वच्छंद निच्छल सजक वर्तमानाच्या पिढ्यानपिढ्यांची तहान भागवण्यासाठी.'तहान'
या एकाच शब्दाला 'पाणी' मिळालं तर अंतःकरणातून कुठल्याही सजीवाला क्षणभरात टवटवीतपण लाभतं.
म्हणून नदी कुण्या एकासाठीच वाहत नाही.तसेच ती प्रवाह जगताना कुठल्याही काळासाठी थांबत नाही.
भुईच्या गर्भातून वाहणारी तशी नदी म्हणजे भुईची लेकच.पण ह्या भुईवर 'नदी' नावाची बाई तसेच 'बाई' नावाची नदी मला तरी युगपरात वाहतांना दिसलेली नाही आणि असा संदर्भ देखील ह्या भुईनेही युगा -
युगानुसार नोंदलेला नसावा.नदीला 'माय' म्हणणारी माणसं नदीलाच दुषित करतात,नदीचा नाला करतात,
नदीत उडी घेत आत्महत्या करतात.मात्र जनावरं नदीला माय मानत नाही.नाही नदीला दुषित करण्याचा त्यांचा हेतू असतो.ते तर नदीचा नालाही करत नाही आणि आत्महत्या तर अजिबातच करत नाही.जनावरं अलिप्त असतात माणसांच्या विचारधारेतून,हे नदीलाही कळत असावं.म्हणून माणूस नदी जगू शकतो पण जगतांना माणसाला नदीची निर्मिती करता येऊ शकत नाही.कारण नदी निर्मितीचे सर्व हक्क ह्या सृष्टीला आहेत.
खालील प्रमाणे कवी 'नदी' ह्या कवितेतून म्हणतात -
नदी वाहे वळणाने, दुःख घेत उदरात
गाव निजते खुशाल, दान घेते पदरात
{पृष्ठ क्रमांक : २१}
कुणी थांबवून विचारतं का नदीला नदीचे दुःख ? नदीचे नैसर्गिक ऐवज काळानुसार कमी होऊ लागलीयेत ! दूर्मिळ होत चाललीयेत खेकडं - मासे,रंगारंगांचे शंख शिंपले,काठाभोवतीची वनस्पती आणि नदीची ओल.गाव शहरांनी तर नदीला दुषित करून नदीचा कसच काढून टाकलाय.? नदीचा नाला करून,तिच्या भोवती अतिक्रमण करून तिचा विस्तारता काठ आखडवून टाकलाय.तिचा खळखळ - झुळझुळ - स्थिर वाहणाऱ्या प्रवाहाला देखील बांधांनी विभागून टाकलाय.जाऊळाची केसं,राख झालेल्या देहाची उरलेली हाडं,केमिकलचं सांडपाणी,
विसर्जित मुर्त्या नदीच्या गर्भात टाकून नदी हेच दुःख उदरात घेत युग जगतेय की काय ? प्रश्नच आहे.बाईचं वाहणं नात्यात आहे,तिचं उद्ध्वस्त होणं माणसात आहे पण नदीचं काय ? बाई तप जगत असेल तर नदी तपातपांचं युग जगत असते,याची नोंद भुईने युगानुयुगे घेतलीच असावी.नदीचं महत्व सांगताना स्त्री प्रासंगिकतेचा तीव्र भाव पाण्यासाठी कसा स्पष्ट होतो हे 'बाई घायाळ मनाला' ह्या पुढील कवितेच्या ओळींमधून जाणवते.कवी म्हणतात
बाई घायाळ मनाला
कशी मारावी फुंकर
किती चालावे वाळूत
तरी रिकामी घागर
{पृष्ठ क्रमांक : ४१}
वरील कवितेच्या ओळीतून बाई कोरडा कंठ घेऊन उन्हाची झळ सोसतांना दिसते आहे. आशयाच्या दृष्टीने नदीलाही भागवता आली नाहीये पाणी शोधणाऱ्या बाईची तहान.इथं 'घागर' ही प्रतिमा द्विभाव व्यक्त करते.तिचा देहही पाण्यावाचून कोरड्या घागरीगतच आहे.नदीतली वाळू उपसा करून करून नदीची ओल राहिली तरी कुठं ? तरीही बाईला आस असावीच नदीत झिरे करून घागर भरून घ्यायची.उन्हाळ्याच्या दिवसात वरील कवितेच्या ओळींचा विचार केला तर पाण्यासाठी जीव लाहीलाही करणारा आहे.तशी ही समग्र कविताच बाई मनाच्या दृष्टीने पाण्यासारखी पातळ होऊन विस्तारणारी आहे.नदी,
माळरान, विहिरीचा तळ गाठणाऱ्या बाया हंडा दोन हंडा पाण्यासाठी अस्वस्थ होतात,कोसो मैल दूर पाय तोडत पाणी मिळालं तर आणण्याचा प्रयत्न करतात.कारण तहान समजून घेतांना बाई तिच्या एकट्याचाच विचार करत नाही.बाई बाहेरील भोवतालापेक्षा आपल्या अंतरील भोवतालात अधिक डवरण्याचा प्रयत्न करते.बाईचा अंतर्बाह्य भोवताल म्हणजे तिच्यासाठीचा स्वतंत्र प्रदेशच असतो.एखादी बाई बाईवरील कविता अथवा बातमी ऑनलाईन वाचून 'ति'चा ऑफलाईन अधिक विचार करू शकते.मग जरी त्या कवितेचा तो संदर्भ ती प्रतिमा तिला लागू नसली तरी बाई 'बाई' म्हणून बाईचा विचार करते अर्थात तेव्हा ती तिलाच समजून घेण्याचा प्रयत्न करते.तसा बाईला माणूस म्हणून जगण्याचा स्वतंत्र प्रवाह लाभलाय खरी पण ; तरीही बाई अस्तित्व,ग्रामीण,स्त्रीवाद,आदिवासी,शहरी,
जागतिकीकरण,वर्तमान,कामगार सारख्या आदी प्रवाहात बाई प्रवाह जगून जातांना दिसते. मनाची फांदी एकाएकीच शहारून थरथरावी असे बाईचे तपा तपातील संदर्भ - वेदना काळाला बधिर करून सोडतात पण;बाई वेदनेला ओठांवर कमी आणि आसवांच्या काठांनाच अधिक गपगुमान भिजवून काढण्याचा प्रयत्न करत आलीये.कधी कधी भुईत जिरावं पाणी तशी बाई आपली वेदना मनातल्या भुईत जिरवून टाकण्याचा प्रयत्न करते.
असे कितीहीदा केलं तरी बाईला एखाद्या तीव्र वेदनेतील आसवांना ठेवता येत नाही गोठून डोळ्यांच्या तळ्यात.
म्हणून कवी आसवांचाच संदर्भ घेऊन पुढीलप्रमाणे म्हणतात -
तुझे झरणारे डोळे ओल्या पापणीच्या कडा
तुझ्या आसवांचा बाई पडे अंगणात सडा
{पान नंबर : ५५}
कल्पना वाटाव्यात अशाच वरील ओळखीतल्या प्रासंगिक भावना आहेत.'आसवांचा कधी अंगणात सडा पडतो का ? ' हा प्रश्न देखील वरील कवितेच्या ओळी वाचून वाचक मनाला पडणारा आहे.कदाचित हे काल्पनिक शब्दसौंदर्य असू शकतं पण ह्या काल्पनिकतेला येऊन भिडणारं एखाद्या बाईचं जगत असलेल्या प्रवाहातील वर्तमानही असू शकतं जे आपल्याला नाकारता येऊ शकत नाही.
माझा तर्क,अंगणात पडणारा हा आसवांचा हा सडा पहाटेचा असू शकतो अथवा संध्याकाळाचा देखील असू शकतो.कारण बाईचं आसवांचं आभाळ बऱ्यापैकी ह्याच वेळी दाटून येतं.बाईला द्यायचा नसतो. आसवांचा हिशोब कुणाला म्हणून बाई काळोखाचा आधार घेऊन होत राहते.आसवांनीच व्यक्त अंगणाला झाडू मारता मारता.
बाई सहन करत जाते शरिरावरील घाव, पण तिच्या मनाला लाभलेला शब्दांचा मुक्कामार ती सहन करेलच असेही नाही.म्हणून कधी तरी बरंच सहल्यावर येऊ शकतो दाटून तिच्यातला स्त्रीवाद.
पातीवरल्या बाया दुःखाचा आवंढा गिळून शिरतात रानात झुरतात,मनात वेदनेच्या खपल्या काढीत उघडी करतात जखम दुखरी एकमेकींपुढे - {पान नंबर : ५६}
वरील प्रमाणे सदर संग्रहाला लाभलेल्या शीर्षकी कवितेच्या ओळी आहेत.बाई वावरातलं तन निंदता निंदता मनातलं तनही खुरपून काढते,आणि भुसभुशीत करू पाहते आपलं मन. नदारी,जबाबदारी,घरेलु भांडणं बायांना सुटत नाही,जगून घेतलेला तो क्षणही मनातून निघता निघत नाही म्हणून बाया उघडी करतात जखम दुखरी एकमेकींपुढे.हे सगळं सहतांना ग्रामीण बाया सोडत नाहीत आपली कामं.कदाचित त्यांना निभावून घ्यायचा असतो त्यांना लाभलेला बाई म्हणून बाईचा जन्म.कवींच्या मते,'वर्षानुवर्ष एकाच मालकाच्या वावरात काम करणाऱ्या बायांना पातीवरल्या बाया म्हणतात.'
तसा 'पात' या एकाच शब्दाचा अर्थ मराठी प्रदेशातील प्रादेशिक ग्रामीण विभागानुसार विविध अर्थाने दैनंदिन जगण्यात येणारा आहे. 'पात' हा शब्द कृतीशील,प्रतिक म्हणून देखील उमटणारा आहे.दोन पिकांच्या रांगेतला मधला जो भाग असतो त्याला पात म्हणतात.एका बांधापासून दुसऱ्या बांधापर्यंत जी निंदनी होते (मधलं तन खुरपलं जातं) त्याला पात लागली असं म्हटलं जातं. खानदेशात 'येक वख्खर लागनं' असं म्हणतात. (तसा 'वखर' हा शब्द कृषी निगडीत अवजारच.) दिवसभर पातीवर अशी प्रक्रिया बायांकडनं वावरात होतांना कवी 'पातीवरल्या बाया' असे उद्देशून म्हणतात.तसा 'पातीवरल्या बाया' हा काव्य संदर्भ सदर संग्रहातील तीन कवितांमध्ये विविध आशयाच्या दृष्टीने वाचावयास मिळतो.गावाकडील बायां विषयी व्यक्त होता होता कवी गावाकडच्या पोरींविषयी देखील व्यक्त होतांना दिसतात. ते म्हणतात -
माहेराला कवेत घेणाऱ्या
गावाकडच्या हसऱ्या कोवळ्या पोरी
कधी बाया होतात कळतच नाही
{पृष्ठ क्रमांक : ६७}
हे खरं आहे.ज्वारीच्या तोट्यागत वय उंचीने टराटरा वाढणाऱ्या पोरी कधी लग्नाच्या होतात, लग्न करून नांदायला लागतात कळतच नाही. सुनं होतं घर लग्न झाल्यावर पोरीवाचून.नकोशी वाटतात दैनंदिन घरातील कामं नात्यांना ज्या पोरी पार पाडायच्या माहेराला 'पोर' म्हणून. खरंच सुनंसुनं होतात घरे लग्न झाल्यावर पोरीवाचून.करमत नाही आख्ख्या घरालाच काही दिवस,काही महिने सणासुदीच्यावेळीही. पोरी नांदायला जातात अन् माहेराला बाया होऊन येतात !? ही खरंच विचार करायची गोष्ट आहे,विचारातल्या प्रश्नाचं उत्तरं शोधायची गरज आहे.पोरींना जन्मतःच वारसा लाभतो वंशवेलींचा,म्हणूनच पोरी लग्न झाल्यावर बाई होण्याच्या अधिक प्रयत्नात असतात.
गावात नात्यांमध्ये अद्यापही तुरळक ओलावा आहे.पण बदलत्या दिवसांप्रमाणे गावाची आणि गावातल्या नात्यांची नीतीमत्ता बदलत चालली आहे ती गावं सोडून जातांना.खालील प्रमाणे 'गाव ढासळत जाते' ह्या कवितेच्या ओळी बदलत्या ग्रामीण काळाचं प्रतिनिधित्व करताना दिसतात.
चिंब मनाची माणसं
त्यांचे निसटले बंध
माती पुसेना मातीला
तिचा हरपला गंध
{पृष्ठ क्रमांक : ७५}
वरील कवितेच्या ओळीतून साध्या सोप्या शब्दात भाव स्पष्ट होतांना दिसतोय पण माझं वाचनीय लक्ष 'माती पुसेना मातीला' ह्या एकाच ओळी कडे पुन्हा पुन्हा लागलेलं.ह्या ओळीमध्ये मला माणसांची बदलणारी मानसिकता जाणवते. 'माती पुसेना मातीला' म्हणजे ?
माणूस येत नाही गावाकडच्या माणसांच्या मरणाला.देत नाही मुठमाती नात्यातील थांबलेल्या श्वासाला.पाहत नाही उद्ध्वस्त झालेल्या घराला.धीर देत आपलं म्हणून घेतांना आपल्यांना.शहराला शब्दांनी कुरवाळणारा गावाकडचा माणूस,गाव - गावातले नाते मेली आहेत की जिंदी आहेत आवर्जून विचारत सुधीक नाहीत अशी खंत सदर कवितेतून कवी व्यक्त करताना दिसतात. 'ओल मनाची सुकता / नाते कोसळत जाते / माया दुभंगते वेडी / गाव ढासळत जाते.' कवी मनाची ही खंत सर्वांना पटेलच असेही नाही पण गाव खरंच ढासळत चाललंय ! याचा प्रत्यय ग्रामीण पिढीला येत आहे.ग्रामीण प्रादेशिकतेचा विचार केला तर काही प्रश्न,काही समस्या,काही संदर्भ काळानुसार सर्वच प्रादेशिक विभागांवर समान व तीव्र प्रभाव पाडतांना दिसतात.धडधड छाती मनाची माती करायला लागलेला हा काळ अस्तित्वाला टवटवीत कमी पण वाळवून अधिक सोडणारा आहे.
मातीचा गंध श्वासात भरून आकाशाकडे उंचावण्याचं बळ राहिलं नाही पिकांमध्ये,नक्षत्रेच वांझोटी होऊन जातात पाणी पावसावाचून धकत नाही मग कितीही ब्रॅण्डेड वापरा बि - बियाणं पाण्याशिवाय कुठला हंगाम उगत नाही.
विहीर हरवून बसली तिचा गर्भ
झालीय वांझोटी
तहानल्या पिकांना जाळते आता सल
कुठं गेली खोल
मुळाखालची ओल ?
{पृष्ठ क्रमांक : ७७}
जरका मातीचच अवसान गळायला लागलं,मग विहिरीत ओल तरी राहिल काय ? भुईचा ओलावा टिकवून ठेवणारी झाडं तुटत चाललीयेत ? ऐन पेरणीत नक्षत्र हूल देऊन जातात ग्रीष्मात रानाचीच होते लाहीलाही,पाखरं नेहमीचाचा मुक्काम सोडून दूर दिशांमध्ये गळप होतात. 'तहानल्या पिकांना जाळते आता सल' ही ओळ काळजाला चटके देवून जाणारी आहे.'कुठं गेली खोल मुळाखालची ओल ?' हा प्रश्न वावरात राबणाऱ्या माणसांचाच नाही वाटत,हा प्रश्न मुक्या जित्रबांचा - पाखरांचा देखील वाटतो... ज्यांच्यासाठी माणूस म्हणून आपल्याला काहीच कसं करता येत नाही ? पाखरं विहिरीचा तळ गाठून अस्वस्थ होतात.जित्रबे पाण्याच्याच शोधात विहिरीपाशी येतात आणि कोरड्या विहिरीत पडून आपला जीव देखील गमावतात.विहिरीला वांझोटपण येणं म्हणजे उगूच न पाहणाऱ्या हंगामी पिकपिढीचा अंतच म्हणता येईल.'गाई हुंगुन येतात कोरडे रान' [पृष्ठ क्रमांक ३५] ही एकच ओळ कविता ठरते.तशी ही कविता पंधरा ओळींची आहे.ह्या पंधरा ओळींमधून सदर कवीला या कवितेत शब्दातून प्रसंग निर्माण करायचा आहे आणि तसा शब्दात्मक प्रयत्न त्यांनी केला देखील आहे पण कवितेचं गुढ आणि कळ 'गाई हुंगुन येतात कोरडे रान' ह्या एकच ओळीतून प्रभावीपणे सिध्द होतांना दिसते.काय म्हणत असावं त्या गाईचं मन जी हुंगन येते कोरडं रान ? किती तीव्र असावी त्या गाईची भुक चारावाचून अन् तहानेनं पाणीवाचून ? माणसांना जगता येतो प्रश्न पण जित्रबांना प्रश्न देखील पडत नसावा जगण्या मरण्याचा ! त्यांना तर उपलब्धही करता येत नाही स्वतःसाठी चारापाणी. जीवाला झळ काळजाला कळ ह्या जित्रबांसाठी तरी आली पाहिजे.अशी खंत 'गाई हुंगुन येतात कोरडे रान' ही एक ओळ वाचून माझ्या वाचक मनातून जित्रबांप्रति येते.
अंधारून ढग येता,डोई आभाळ फाकते
पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते. {१०९}
वरील 'पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते' ही ओळ मला ह्रदय स्पर्शी जाणवली.घराला हवी असतात माणसे,
माणसातील नाते,नात्यात ओलावा,ओलाव्यात आपलंपण अनुभवता येते ते घरामुळे.घर पिढ्यानपिढ्यांच्या जगून गेलेल्या काळाची जाणीव करून देते,घराला पाहिलं जरी तरी तारूण्यातलं आपलं मन,आठणीतलं बालपणाकडे खेळायला धावताना दिसते.नेहमी मोठं कुटूंब (खटलं) असल्यामुळे काळानुसार घराची वाटणी होतांना दिसलीये.पण ह्या वाटणी झाल्यावरही बऱ्यापैकी लोकांनी आपली जुनी घरे पाडून नवी घरं बांधली नाहीत.त्यांनी जपलाय पिढ्यानपिढ्यांचा काळ,स्वतःचे बालपण,लहान मोठ्यांच्या लग्नाच्या, सणासुदीच्या आठवणी.कवी अशाच एका मातीच्या घराचं वर्णन आपल्या काव्यातून मांडताना दिसतात.जे माझ्याही वाचक मनाला भावणारं आहे. 'पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते' ओळ खरंच उल्लेखनीय आहे.आणि अशा जाणीवा काळानुसार खरंच साहित्यात येण्या गरजेच्या आहेत.समकालीन ग्रामीण प्रवाहात सचिन शिंदे यांची कविता आगळी व वेगळ्या धाटणीची आहे. तिच्यावर कुठल्याही काळाच्या कवितेची सावली पडलेली जाणवत नाही.ती स्वतःच एक काळ घेऊन शब्दात आलेली आहे. ग्रामीण,स्त्रीवाद,कामगार,सौंदर्य, प्रेम, अस्तित्व,
वर्तमान सारख्या प्रवाहात सदर संग्रहातील कविता भरल्या कणसागत नवे अनुभव,नव्या जाणिवा,नवे प्रश्न घेऊन आलेल्या आहेत.ही कविता ऋतू,नदी - पूर,
दुष्काळ,गाव - गावशिवार,माती - नाती,घर - जित्रब - पाखरं, अस्तित्व हरवत चाललेल्या 'मी' विषयी बोलते ज्याचा माणूस विचार करून सोडतो अथवा विचार पण करत नाही.या संग्रहातील 'जमाव' नावाची कविता वर्तमानाशी भिडताना दिसते.
'झुरणाऱ्या दावणीची कविता' अस्वस्थ मनाचे तळ गाठतांना दिसते.अपेक्षांवर फिरलेलं पुराचं पाणी,
वेदना,जखम,उन्ह,विहीर,वणवा,ओल सारख्या कविताही वाचक मनावर प्रभाव पाडणाऱ्या आहेत.भावनांची तीव्र मूळं शब्दांच्या भुईत रूजवणारा हा कवी लेखणीच्या नांगराने आपलं वर्तमान भुसभुशीत करून पुन्हा नव्या उमेदीने शब्दांचा नवा हंगाम घेऊन येईल,अशी आशा व्यक्त करतो.सचिन शिंदे यांना नव्या शब्दपेरणीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
प्रविण पवार - धुळे
•••• ••••
•पुस्तकाचे नाव : पातीवरल्या बाया
•कवीचे नाव : सचिन शिंदे
•साहित्य प्रकार : कविता (संग्रह)
•प्रकाशकाचे नाव : अष्टगंध प्रकाशन