कधीतरी आयुष्यात काहीतरी डळमळू लागते. तेव्हाच साहित्याचा जन्म होतो.असाच एक जन्म झाला.किरण येले लिखित मोराची बायको या पुस्तकाचा..
प्रत्येक मानवी जीवनात शुद्ध पारदर्शक स्वातंत्र्य असावे अशी माझी इच्छा आहे.सिमोन द बोव्हुआर या मध्यवर्ती विचाराचा 'विचार' करायला लावणारं वाक्य या पुस्तकाचा 'मानवी गाभा आहे.'
द सेकंड सेक्स जो १९४९ तो प्रसिध्द झाला.जगभरातील स्त्रीमुक्तीवादींना,सर्व स्त्रियांना बायबल ठरावा असा ८०० पानांचा हा ग्रंथ आहे.जो करुणा गोखले यांनी ५५९ पानांमध्ये अनुवाद केला आहे,तर पद्मगंधा यांचे प्रकाशन आहे.जग बदलणारे ग्रंथ 'दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन या मध्ये विस्ताराने लिहिले आहे.स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते.तिचे पंख छाटले जातात आणि तिला उडता येत नाही असा तिच्यावर आरोप केला जातो.सिमॉन द बोव्हा.या पुस्तकात शेतीचा उदय होण्याच्या आधीपासूनच स्त्रीचा इतिहास लिहिला होता.
या पुस्तकात सिमॉन म्हणते,स्त्रियांचे पोशाख दागिने हे सगळं तिच्या हालचालींवर बंधन घालण्यासाठी केले जातात.चीनमध्ये प्रथेच्या नावाखाली मुलींचे पाय जाणीवपूर्वक बुटात घालून त्यांची वाढ होऊ देत नसत.
इतकच काय पण अलीकडल्या काळातली गोष्ट बघितली तर हॉलीवूडमधल्या अभिनेत्री असलेल्या स्त्रियांची टोकदार नखं त्यांच्या हातांच्या हालचालींवर बंधन आणताना दिसतात.
पुरुषाला स्त्रीमध्ये निसर्गातलं खळखळणारे सौंदर्य असावं असं वाटत असतं.पण निसर्गातलं वैविध्य,त्यांचं खरं रूप त्याला नको असतं.स्त्री सुंदर हवी पण नदीतल्या अविचल गोट्यांसारखे असणे त्याच्या सोयीचा असतं.
जन्मल्यानंतर तो मुलगा असो व मुलगी दोघांचीही वाढ सारखीच होत असते.दोघांनाही आईच्या स्तनावाटे दूध पिण्यापासून अनेक कृतींतून सारखाच आनंद मिळत असतो.हळूहळू मुलाला तू वेगळा कोणीतरी आहेस म्हणून वेगळ्या पद्धतीने वाढवलं जातं आणि मुलीला तु स्त्री आहेस,असं म्हणून तिच्यावर अनेक बंधनं लादत तिला वाढवलं जातं.खरं तर त्याआधी दोघांनाही आपल्यातल्या जैविक फरकाचा पत्ता नसतो.मुलीवर अगदी कोवळ्या वयापासून मर्यादा घालण्यात येतात.
उत्क्रांतीच्या टप्प्यातून जात असताना स्त्री आणि पुरुष यांच्यात समानतेच नातं निर्माण होऊ शकलं असतं,पण तसं घडलं नाही.याचं कारण कुठलाही सजीव दुसऱ्या सजीवाचं शोषण करू बघतो.त्यामुळे पुरुष स्त्रीकडे बघताना आपण वरचढ कसे आहोत,ते दाखवण्याचा प्रयत्न करत राहतो.स्त्री आणि पुरुषांच्या नात्यात समतोल आणण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे असं सिमॉन म्हणते.थोडीशी ओळख वाढण्यासाठी ही माहिती दिलेली आहे.आपण आता परत जावू मोराची बायको या पुस्तकाकडे.. या पुस्तकात सात कथा आहेत.मुखपृष्ठ - सतीश भावसार, ग्रंथाली यांचे प्रकाशन आहे.
'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'
असंही त्या प्रश्नांचं स्वतःच सरळपणे उत्तरही दिलं होतं !
एक वाचक म्हणून मी पुस्तकावर व पुस्तक माझ्यावर जिवापाड प्रेम करतात.तुम्ही जर मनापासून काही वर्षे पुस्तके वाचलीत.तर तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होतं. जिथून पुस्तके तुम्हाला वाचतात.लाओत्से,बुद्ध,कन्फ्यूशियस त्यांचे विचार तत्त्वज्ञान एकच आहेत.व हे एकत्रित प्रवास करतात.हे मनापासून पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजत जातं. वाचकांनी पुस्तकांमधील असणाऱ्या दोन ओळींमध्ये मोकळ्या जागेतील प्रवाशी असलं पाहीजे. लेखक पुस्तक लिहीत असताना.ती घटना तो प्रसंग पुस्तकात उतरत असताना.त्या लेखकाच्या जीवाची झालेली घालमेल,श्वासांमधील चढ - उतार,दुःख,आनंद निर्माण झालेली भावना याचं आकलन त्या दोन ओळींमधील मोकळ्या जागेतच होतं.पुस्तक वाचत असताना आपलं भांड मोकळं ठेवावं.कारण
भरलेल्या भांड्यामध्ये नवीन काय भरता येत नाही.
प्रत्येक पुस्तक वाचण्या अगोदर स्वतःला मोकळ करा. म्हणजे प्रत्येक पुस्तक तुम्हाला एक नवीन ज्ञान देईल विचार देईल.जसं कबीरांनी एका ठिकाणी म्हटलं आहे.
कबीर मन निरमल भया जैसा गंगा नीर । तब पाछें लगा हरि फिरै कहत कबीर,कबीर ।।
गंगेच्या पाण्यासारखं मी माझं मन निर्मळ स्वच्छ केलं त्यानंतर मग हरीच 'कबीर, कबीर' असा जप करत मागे मागे फिरू लागला..
' मोराची बायको ' हे पुस्तक वाचण्या अगोदर मी नुकतंच झेन नितीन भरत वाघ यांचे पुस्तक वाचून संपवलं होतं.त्यात एक छोटीशी कथा आहे.ही कथा या ठिकाणी द्यावी असं मला वाटतं.
गुरू कधी कधी ही गोष्ट सांगत : "बुद्ध जेथे जन्मला होता,त्याच गावात एक म्हातारी जन्मली होती.पण ती लहानपणापासून बुद्धाला खूप घाबरत असे.सगळे तिला सांगत,तो खूप चांगला माणूस आहे वगैरे. पण तिची भीती कधीच गेली नाही. तो दिसेल म्हणून ती नेहमी घरात पळून जायची. एकदा ती दुसऱ्या गावाला जात असताना केशरी रंगाचं चिवर धारण केलेला एक भिक्खू दिसला,तो बुद्धच होता.ती खूप घाबरली, पण पळाली नाही.तिने बुद्धाकडे पाहण्याचे टाळले.तिने दोन्ही हातांनी डोळे गच्च मिटून घेतले.पण आश्चर्य असे,की ती जितक्या गच्चपणे डोळे मिटत होती,तितका बुद्ध तिला तिच्या बंद केलेल्या हाताच्या बोटांतून स्पष्ट दिसत होता. सांगा,ती म्हातारी बाई कोण होती?"
किरण येले यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून रस्त्यावरची माणसं पुन्हा माणुसकीच्या परिघारावरती आणलेली आहेत.
साइन आउट या कथेत एक मानसशास्त्र आहे. माणसाच्या सजीव जीवनामध्ये कृत्रिम जीवन आल्यानंतर काय होऊ शकतं यावर भाष्य केलं आहे.आपल्याला आवडणारी सुंदर गोष्ट केवळ आपल्याला सांभाळता येणार नाही वा आपल्या
जवळ फार काळ राहू शकणार नाही आणि ती हरवली तर ते दुःख आपण पचवू शकणार नाही,
म्हणून नाकारतो किंवा असंही होतं की,सुंदर गोष्टीमागून येणाऱ्या अडचणी,प्रश्न,गुंते,दुःखं यांना आपल्याला सामोरं जाता येणार नाही म्हणून आपण नाकारतो,पण कारण दुसरंच देतो.पण खरोखरचं वास्तवात आपण जगतं असताना कोणतही अनुमान न लावता वर्तमानमध्ये मुक्तपणे जगलो पाहीजे.जे आपण जगत नाही.
अवशेष ही कथा वाचताना माणसाचं दुसऱ्या माणसाची असणार नातं,वागणं हेच जिवंतपणे तुमचं अवशेष दाखवणार असतं.प्रत्येक सजीव गोष्ट ही एकमेवच असते.हे वाक्य आत्मपरीक्षण करायला लावते.हे वाचत असताना एक वाक्य आठवले.ते ही पुस्तकातील आपण प्रचंड सुदैवी आहोत की आज आपण इथे आहोत..! आणि 'आपण' म्हणजे प्रत्येकच सजीव.आपण आपलं आयुष्य जगत असतो.पण जगण्याच्या या गुंतागुंतीमध्ये आपल्या हातून बऱ्याच काही महत्त्वाच्या रिकाम्या जागा सुटून जातात.काहीतरी तुटले काहीतरी आवाज आलाय.पण नेमका कशाचा हेच आपण विसरून जातो कारण आपलं जगणं हे पृष्ठभागावरचं असतं आतून नसतं.पुस्तक आणि माणसं अगदी सेम असतात.
माणसांनी एकमेकांना नव्यानं वाचलं पाहिजे.पुस्तक जसं वर वर वाचलं की कळत नाही,तसंच माणूसही.वर वर वाचलात की कळतच नाही.पण आत्मीयतेनं वाचले की माणसाच्या आत नेमकं काय चाललंय ते कळतं. म्हणजे एकच पुस्तक आपण जर अकरा जणांच्याकडे दिले तर ते पुस्तक एक न राहता अकरा पुस्तके होतात.म्हणजे तिथे ११ वेगवेगळे दृष्टिकोन असतात.
कोपऱ्यातलं टेबल हा टेबल अजूनही माझ्या डोक्यामध्ये घुमत आहे.सरोळकर ज्यानं माणसांतनं स्वतःला वेगळे केलं होतं.अगदी त्या कोपऱ्यातल्या टेबलासारखं ही अविस्मरणीय घटना आहे.बायकांसोबत मी का जातो ते तुम्हाला नाही कळायचं.कारण तुम्हाला त्यांचे फक्त टोचणार अवयव दिसतात.बोचणारे त्यांचे डोळे नाही दिसत.देवानं एक मायाळू माणूस बनवला,त्यालाही तुम्ही घाणेरड्या नजरेने बघता. तुम्हाला वाढवणाऱ्या,जन्म देणाऱ्या,पाजून मोठं करणाऱ्या अवयवांना,ओगंळवाणी करून टाकता.तुम्ही बायकाकडे अशा नजरेने कसं पाहू आणि बोलू शकता? या माणसांमध्ये मला निर्मळता,
निकोपता दिसली.स्त्री समजून घेण्यासाठी आपल्यातील पुरुष व पुरुषार्थ संपवावा लागतो.याची जाणीव झाली.
ती आणि ती चिमणी व स्त्री यांच्या विषयी डोळं खाड करून उघडं करणारी अतिशय मनस्वी मांडणी केलेली आहे.चांगला आणि वाईट या विचारातील द्वंद या कथेमध्ये वाचायला मिळत. जसं की प्रत्येक रात्र एकसारखे नसते.
तशी दिसत किंवा भासत असली तरी चंद्र,सूर्य,तारे आपापल्या स्थानी भासत असले तरी तसं नसतं. त्यांच्या जागा बदललेल्या असतात.कोन बदललेले असतात,
वाहणारा वारा वेगळा असतो.धरतीच्या आत खदादणारी लाव्हालय वेगळी असते.स्त्री,स्त्रीत्व जगण्याची तत्वे,आईने सांगितलेलं अनुभवी जीवन हे खरोखरच अचंबा वाटण्यासारखा आहे.आपण असं कधी विचारच केलेला नाही.असं राहून राहून वाटतं.
बाई ग,एक लक्षात ठेव चालताना रस्त्यालगतच्या दुकानातून खूप साड्या मांडलेल्या दिसतात. त्यांतल्या काही साड्या आवडतातही आपल्याला.पण म्हणून त्या सगळ्या घेत गेलो तर घराचाच बाजार होऊन जाईल! एवढ्या वर्षांत तू जे शिकलीस ते तू सांगितलंस... आता एवढ्या वर्षांत मी जे शिकले ते तुला सांगते, नीट ऐक आयुष्य हे असंच असतं बये.मनाची एक मागणी पूर्ण केली की दुसरी उगवणारच कुत्र्याच्या छत्रीसारखी कुठेही,कशीही.मन लहान मुलासारखं असतं.त्याला आवडेल ते मागत राहणार,हट्ट करणारच लहान मुलासारखं.कारण त्याला माहीत नसतं आईसक्रीम खाल्ल्यानं पडसं होतं,चॉकलेट खाल्ल्यानं दात किडतात. मनाला आपण समजावायला हवं की,आयुष्यात खूप गोष्टी दिसताक्षणी आवडतात, पण जवळ केल्यावर त्याचे परिणाम वाईट होतात. आणि प्रवाहीपणाचं म्हणशील तर सगळ्या गोष्टी त्या त्या परिघातच बदलतात.म्हणजे बदलायचं म्हणून चंद्र,सूर्य,तारे आकाश सोडून समुद्रात प्रकाशत नाहीत.फक्त जागा बदलत राहतात आकाशातच.
बदलायचं म्हणून पृथ्वी उलटी फिरू नाही लागली कधी एवढ्या वर्षांत.फक्त कोन बदलत राहिली.झाडं जमिनी
ऐवजी आकाशात उगवली नाहीत कधी बदलायचं म्हणून.म्हणे प्रवाही असायला हवं!"असं म्हणत ती निघाली. बाई ग... आपण आपल्यावर वार होतो तीच बाजू जोजवत बसतो कायम.छातीवर वार झाला की तीच जागा दाखवत राहतो आणि पाठ विसरूनच जातो.
उजव्या हातावर झाला तर डावा हात विरसतो.डावा डोळा जखमी झाला तर उजवा डोळा विसरतो.तेव्हा प्रत्येक गोष्टीला दुसरीही बाजू असते हे लक्षात ठेव.
आपण सगळेच आपल्याला समजतो तसे नसतो.
आपल्या सगळ्यांचंच आतलं रुप वेगळं असतं.
एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावरच ते आपल्याला कळतं.हे वैचारिक वैज्ञानिक सिद्धांताने सिद्ध केलेले वाक्य वाचून विचार करायला लागलो आहे.
मांदळकरबाई,अमिबा आणि स्टील ग्लास,मोराची बायको या सर्वच कथा आपल्याला भरभरून जीवन देत आहेत.
पण हे घेण्यासाठी अगोदर आपण लायक असायला हवं.चौकट व थडगे यामध्ये काही फुटांचे अंतर असतं.
हे हेन्री डेव्हिड थोरो यांनी सांगितलेले आहे.पण या चौकटीमध्ये आणि थडग्यामध्ये किती अंतर आहे.हे अंतर समजून घेण्यासाठी मोराची बायको हे मुळ पुस्तक वाचावं लागेल. हे पुस्तक समजून घेण्यासाठी आपल्याला 'जाग्यावर' असावं लागेल.ते ही आतून जस की फार वर्षांपुर्वी एमर्सन यांनी हेन्री डेव्हिड थोरो ला सांगून ठेवलं आहे.स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...!
अवेकन द जायंट विदिन मध्ये अँथोनी रॉबीन्स यांनी नातेसंबंधाबद्दल सांगितले आहे.
जीवनाचा पाया समग्र नातेसंबंध असतो.सुयोग्य जीवन अत्यंत सुव्यवस्थेत आणि सद्गुणात असते.असे आयुष्य असामान्यपणे साधे असून सदैव आत वळलेले आहे.
एकूणच संपूर्णपणे पवित्र आणि खोलवर साधे असलेल्या मनात कोणाताही संघर्ष नसतो.अशा प्रकारचा पाया सहजपणे,कोणताही विशिष्ट प्रयत्न न करता आकाराला येतो,त्यावेळी आपण त्यातले सत्य पाहू शकतो.एकदा का जे आहे त्याचे समग्र आकलन झाले की मूलभूत बदल सहज शक्य होतो.नातेसंबंध ही मोठी छान गोष्ट आहे.
एका प्रतिभावान कवीची एक कवीता
तुझ्या अंतर्मनातील
सुप्त साम्राज्याचा-ऊर्जेचा तू शोध घे!
तो घेतलास आणि तू तुझ्यातील सामान्यत्व नाकारलेस,
तर तुझे सारे भ्रम नाहिसे होतील.
दुःखाच्या दलदलीतून तू कधी चाललाच नाहीस, तर तुला आनंदाविषयी कसे समजणार?
आपल्या बंधनाबद्दल तू मोठमोठ्यांने ओरडला नाहीस,
तर तुला स्वातंत्र्याचे मोल कळेल का?
जर तू प्रेमाशून्य गोष्टींच्या अडथळ्यातून
मुक्त होण्यासाठी प्रयत्नच केला नाहीस,
तर तुला प्रेम म्हणजे काय ते कळेल का?
शेवटी जाता जाता..
एक झेन कथा शिष्याने विचारले,"सत्य मार्ग कोणता आहे?"
"रोजचा मार्गच सत्य मार्ग आहे." गुरू उत्तरला.
"मी शिकू शकतो का?" शिष्याने विचारले.
"जेवढा तू शिकशील,तेवढा सत्यमार्गापासून दूर जाशील."
"जर मी शिकलोच नाही तर मला कसं समजेल?" शिष्याने विचारले.
गुरू उत्तरला, "मार्ग ही दिसणारी वा न दिसणारी गोष्ट नाही,ती माहीत असलेली वा माहीत नसलेली गोष्ट नाही.मार्गाची अभिलाषा धरू नको,अभ्यास करू नको किंवा नाव देऊ नको. जर तुला स्वतःला मार्ग शोधायचा असेल, तर स्वतःला आकाशासारखं मोकळं कर."
बघा जमलं तर स्वतःला मोकळं करा…
मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो,हे संपूर्ण पुस्तक वाचून ते तुमच्या जीवनाशी,आयुष्याची जोडून घ्या.. शेवटी महत्वाचे असते ते प्रत्यक्ष आपलं जगणं..! जगतानाच शब्दांचा खरा अर्थ आपल्याला कळायला लागतो.हे पुस्तक म्हणजे कसं जगायला हवं? या गुंतागुंत अवघड प्रश्नाचं सरळ साधं उत्तर..! असं जगावेगळ पुस्तक लिहिणारे आदरणीय लेखक किरण येले यांचे शतशः आभार व धन्यवाद.. एक जगावेगळी माणसाला माणूस बनण्यासाठीची निर्मिती केल्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार व धन्यवाद…
हे समिक्षण लिहून पूर्ण केलं आणि शांतपणे रस्त्याच्या कडेला कट्ट्यावरती बसलो. आणि त्याचवेळी नेहमीच्याच सवयीप्रमाणे माझी पत्नी सौ.मेघा म्हणाली,आज एकटेच बसला आहात,
पुस्तक कुठे आहे? पुस्तकाशिवाय तुम्ही म्हणजे स्त्रीचं मोकळं कपाळ मी हसून उत्तर दिलं आत्ताच समीक्षण लिहून पूर्ण केले आहे.म्हणून शांत बसलो आहे.…!!