योसी घिन्सबर्गने लिहिलेल्या पुस्तकांपैकी 'जंगल: अ हॅरोइंग ट्रू स्टोरी ऑफ सर्व्हायव्हल इन अॅमेझॉन' हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे. या पुस्तकावर आधारित ग्रेग मॅक्लीन दिग्दर्शित आणि डॅनियल रेडक्लिफची मुख्य भूमिका असलेला 'जंगल' हा सिनेमाही हॉलिवुडमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
जंगलात अडकून एक आठवडा झाल्यावर मात्र केव्हिनच्या शोधात मागे जावं की कार्लने सांगितलेल्या रस्त्याने पुढे चालत राहावं हे योसीला ठरवता येत नाही. बॅगेतला अर्धाकच्चा नकाशा काढून आपण कुठे असू याचा अंदाज बांधायचा तो प्रयत्न करतो.आणखी एक दिवस चाललो तर कार्लने सांगितलेलं क्युरिप्लाया लागेल,
तिथून आणखी चार दिवस चाललो तर सॅन जोसे गावात पोहोचू,
या आशेवर योसी पुढे चालत राहतो.वाटेत एखादं फळांचं झाड दिसलं तर फळं खायची आणि थोडी सोबत घेऊन पुढे जायचं.
एखाद्या झाडावर कुणाची अंडी दिसली तर मनावर दगड ठेवून ती खाऊन घ्यायची,असं करत तो जीव तगवतो.
हे झालं शरीराचं,पण मनाचं काय ?
हिंमत हरता कामा नये,असं योसी सतत स्वतःला सांगत असतो.कधी झोपायला त्यातल्या त्यात कोरडी जागा मिळाली,खायला चांगलं फळ मिळालं,पाऊस थांबला की लगेच त्याच्या मनात येतं,'कुणाचं तरी माझ्याकडे लक्ष आहे.कोणी तरी माझी काळजी घेतंय.सगळं ठीक होणारंय.
चार दिवसांत आपण सॅन जोसेला पोचू आणि केव्हिनला शोधायला बाहेर पडू.पण आधी आपल्याला नदीपाशी जायला हवं.'
पण एखादा दिवस वाईट गेला की योसीचं तेच आशावादी मन त्याच्या विरोधात जातं.'आपण मूर्खपणा करून या जंगलात आलो न् स्वतःचा जीव तर धोक्यात घातलाच,पण केव्हिन आणि मार्कसलाही मृत्यूच्या दारात नेऊन सोडलं.'असे विचार येऊ लागले की त्याच्या डोळ्यांसमोर भविष्यातले प्रसंग साकारू लागत.तो जंगलातून बाहेर पडलाय,पण मार्कस आणि केव्हिन मात्र वाचू शकलेले नाहीत.तो ही बातमी द्यायला दोघांच्याही घरी चालला आहे.त्या प्रवासाचे छोटे छोटे तपशील रेखाटत योसी ते प्रत्यक्ष घडत असल्यासारखे अनुभवतो.तो बसने केव्हिनच्या घरी चालला आहे. वाटेत मॅकडोनाल्ड्समध्ये तो थांबतो.तिथे भरपूर चीज असलेलं बर्गर खातोय.आठवड्याहून जास्त काळ उपाशी असलेलं त्याचं मन त्या बर्गरमधला प्रत्येक घास अनुभवतं.बर्गर खाऊन झाल्यावर तो केव्हिनच्या घरी जातो.त्याच्या आई-वडिलांना कळवळून सांगतो,
'माझी काही चूक नाहीये.मी त्याला एकटं सोडलं नाही.मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला.'एकीकडे शक्ती न उरलेलं त्याचं शरीर यंत्रवत पुढे पुढे चालतं आहे आणि त्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्याचं मन अशा अगणित नव्या कहाण्या रचतं.कधी कळत,कधी नकळत.
कधी भानावर,तर कधी बेभान असा योसीचा प्रवास सुरू असतो.
फारसं न खाता,रोज बारा तास पायपीट करत,असंख्य जखमा अंगावर वागवत,पूर्ण एकट्याने आणि मुख्य म्हणजे आपण जगू की नाही याची अनिश्चितता सहन करत माणूस किती दिवस जगू शकतो? योसीने ती मर्यादा कधीच ओलांडलेली असते. शहरात,
सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जे अशक्य वाटलं असतं ते त्याच्या बाबतीत घडून गेलेलं असतं तरीही त्याची कसोटी संपलेली नसते.
ना त्याची सुटका होते ना मृत्यू त्याला जवळ करतो.अशा वेळी माणूस काय करतो? मृत्यूची वाट पाहतो की जगणं सहन करत राहतो? जगत राहण्याचं अशक्यप्रद काम करण्यासाठी कोणाचा आधार शोधतो ? आता आणखी सहन करणं अशक्य आहे याची खात्री पटू लागलेली असतानाच एकदा योसीला झाडांमधून दिसणाऱ्या आकाशाच्या छोट्या तुकड्यातून विमान गेल्याचा भास होतो.अंगातली सर्व शक्ती एकवटून तो ओरडू लागतो.पळू लागतो.गळ्याशी बांधलेला स्कार्फ हलवून विमानाचं लक्ष वेधू लागतो,पण झाडांच्या दाटीत लपलेला योसी विमानातून दिसणं शक्यच नसतं. जंगलात पडलेली सुई शोधण्याइतकंच अशक्य.बराच वेळ आरडाओरडा केल्यावर योसीच्या लक्षात येतं,
विमान कधीचंच गेलंय आणि आपल्या अंगात आता उभं राहण्याचंही त्राण नाहीये.सगळं अंग जखमांनी भरलंय.पायांच्या जागी केवळ कुजलेल्या मांसाचे गोळे राहिलेत आणि आगीवरून चालल्यासारखे ते जळताहेत.त्या क्षणी तो तिथेच खाली चिखलात कोसळतो.किती काळ कोण जाणे,
तो तसाच पडून राहतो.मनाच्या तळातून तो देवाची प्रार्थना करतो.आता ही प्रार्थना सुटका लवकर व्हावी किंवा जंगलात टिकाव लागावा यासाठी नसते,तर लवकरात लवकर मृत्यू यावा यासाठी असते.'देवा,काहीही कर आणि हा छळ थांबव. मला मरू देत.' अचानक त्याला जाणवतं,आपल्या शेजारी एक मुलगी झोपली आहे.हा निव्वळ भास आहे हे कळत असूनही त्याचं मन त्या मुलीच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतं.ती कोण आहे,कशी दिसते,कुठून आली हे काहीही माहिती नसतानाही त्याला वाटतं की ती आपल्या जिवाची सहचरी आहे.तिला आपली गरज आहे.
त्याला जाणवतं की ती हमसून हमसून रडतेय.अंगात शक्ती नसतानाही योसी उठून बसतो आणि तिच्या अंगावर ओणवून तिला शांत करायचा प्रयत्न करतो,'घाबरू नकोस,मी आहे तुझ्याबरोबर.आपण लवकरच यातून बाहेर पडणार आहोत.' दुसरीकडे त्याचं मन स्वतःला समजावू लागतं, 'योसी,तू मरणाचा दमलायस हे खरं,पण तिला तुझी गरज आहे.ऊठ,तिला मदत कर.तुलाच जंगलातून वाट काढावी लागणार आहे.'चिखलातून योसी उठतो आणि तिलाही हळूवारपणे उठवतो.'विमानाला आपण दिसलो नाही. आता आपण काय करणार?' ती हताशपणे विचारते.योसी तिला धीर देतो,'विमानातून आपण दिसणं शक्य नाहीये;पण आपण आग पेटवू या. कदाचित त्याचा धूर वरून दिसू शकेल.नाही दिसला तरी मी तुला पुन्हा माणसांत घेऊन जाईन,काळजी करू नकोस.'
शरीर आणि मन पूर्ण खलास झालेल्या योसीला त्याच्या मनाने जगण्यासाठी नवा आधार शोधून दिलेला असतो.
ते दोघं पुन्हा नदीच्या दिशेने चालू लागतात.योसीच्या अंधाऱ्या,पूर्ण निराश झालेल्या मनातल्या शंका-भीती त्या मुलीच्या तोंडातून बाहेर येत राहतात आणि योसीच तिला धीर देत राहतो.आता त्याच्या आयुष्याला एक उद्दिष्ट मिळतं - या मुलीला - आपल्या सहचरीला या वेदनांमधून सुखरूप बाहेर काढायचं आहे.कधी तरी अचानक तो भानावर येतो आणि आपल्या एकटेपणाची जाणीव त्याच्या मनात घुसते;पण भानावर असण्याचा तो क्षण दूर सारून योसी पुन्हा आपल्या भासमय जगात परततो.तिथे तो जास्त सुरक्षित असतो.त्या जगात असतानाच तो एकेक पाऊल पुढे टाकू शकत असतो. कधी कधी त्या जगातही त्याचा धीर सुटतो.तो तिच्यावर ओरडतो, 'रडणं थांबव. तुला कळत नाही का आपण कुठल्या परिस्थितीत आहोत?आपण काय मजा करायला आलोय की काय इथे? जरा खंबीर हो आणि चालत रहा.' तिच्यावर वैतागला की तो पुन्हा दुकट्याचा एकटा होऊन चालू लागतो.
एकदा चालताना योसीला पायाखाली काही तरी वेगळं घडत असल्याचं लक्षात येतं.तो चालत असतो,पण पुढे जाण्याऐवजी तो खाली खाली चाललेला असतो.त्याला जाणवतं की आपण दलदलीत फसत चाललोय.
हीच ती अॅमेझॉनमधली जीवघेणी दलदल.एखादा इंच हात-पाय हलवणंही मुश्किल व्हावं अशी दलदल.त्या चिकट-घट्ट चिखलात तो छातीपर्यंत आत बुडालेला असतो. कितीही प्रयत्न केला तरी तो त्यातून पुढे सरकू शकत नाही.त्या मुलीला संकटातून बाहेर काढण्यासाठी ओढून ताणून आणलेला त्याचा उसना धीर पुन्हा खचतो.इथून बाहेर पडणं अशक्य आहे हे त्याच्या लक्षात येतं.'याचा अर्थ आपला मृत्यू दलदलीत लिहिलेला होता तर!' तो स्वतःशी विचार करू लागतो. 'कसं असेल इथे आयुष्याचा अंत होणं ? इथे मृत्यूची वाट बघत बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. त्यापेक्षा आत्महत्याच का करू नये?सगळ्या वेदना-सगळा त्रास एका क्षणात संपून जाईल.' हा विचार त्याच्या मनाचा ताबा घेतो.नकळत योसी पाठीवरून बॅग काढतो.बॅगेत कसकसल्या गोळ्या असतात.
बहुतेक वेदनाशामक.त्या सगळ्या गोळ्या एकत्र घेऊन टाकल्या की बहुतेक मृत्यू येईल असं त्याला वाटतं.योसी गोळ्या बाहेर काढतो;पण त्या गिळून टाकण्याआधी अचानक त्याच्या डोळ्यांसमोर त्याची आई उभी राहते.आपण आत्महत्या केली हे कळल्यावर तिला काय वाटेल,या विचाराने त्याचं मन कळवळतं.
एवढे दिवस एवढे हाल सोसूनही तगून राहिल्यानंतर हिंमत हरणं बरोबर आहे का,असा प्रश्न त्याही स्थितीत त्याला पडतो.
'पण आता याहून अधिक सहन करणंही शक्य नाही. या दलदलीत फसून मरणाची वाट पाहण्यापेक्षा स्वतःला संपवलेलं काय वाईट?'
योसीच्या मनात दोन्ही विचारांचं द्वंद्व सुरू राहतं;पण अखेर जगण्याची इच्छा बलवत्तर ठरते. 'आणखी कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल,पण मी जगेन.मी सुटकेसाठी प्रयत्न करेन.' तो स्वतःशी बोलतो. तो गोळ्या आत ठेवतो आणि पुन्हा एकदा सगळी शक्ती एकवटून दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतो.तासभर प्रयत्न करून एकेक इंच पुढे सरकत तासाभराने तो त्या दलदलीतून बाहेर पडतो.तो तास त्याच्या आजवरच्या आयुष्यातला सर्वांत वेदनादायी काळ असतो.
दलदलीपासून थोडं लांब आल्यावर झाडाखालची एक बरी जागा शोधून तिथे तो पामच्या पानांचं अंथरूण तयार करतो.त्यावर झोपू लागणार तेव्हा लक्षात येतं,की आपण स्वतःच्याही नकळत दोघांसाठी अंथरूण घातलंय. 'मूर्ख माणसा,तुझ्यासोबत कोणी नाहीये. एकटा आहेस तू या जंगलात.पूर्ण एकटा !' योसी स्वतःवरच ओरडतो.बूट आणि सॉक्स काढण्याचं भयानक वेदनादायी काम पूर्ण झाल्यावर योसी डोक्यावरून रेनकोट ओढून झोपी जाण्याचा प्रयत्न करत असतो.एखादी डुलकी लागते आणि पुन्हा जाग येते.त्याला जाणवतं,आपण झोपताना लघवीला जायचं विसरलोय.पूर्ण सोलवटलेल्या आणि कुजलेल्या पायांवर उभं राहून चालणं शक्य नसतं आणि आता पुन्हा उठून बूट घालणंही त्याला तितकंच अशक्य वाटतं.बराच वेळ कळ काढल्यावर शेवटी पँटमध्येच मोकळं होण्याशिवाय पर्याय नाही हे त्याच्या लक्षात येतं; पण त्या अवस्थेतही त्याचं मन त्याला राजी होत नाही.
आपल्यावर ही काय वेळ आली आहे,या विचाराने योसी तळमळत राहतो शेवटी नाइलाजाने झोपल्या झोपल्याच तो लघवी करून टाकतो.ते गरम पाण पायांवरून ओघळू लागल्यावर त्याच्या अंगात थोडीशी ऊब येते. रात्रीतून आणखी दोनदा तीच उब त्याला नाईलाजाने अनुभवावी लागते.
त्या रात्री त्याला बरी झोप लागते;पण मध्यरात्री झोपेत असतानाच त्याच्य मांडीला काही तरी चावतं.तो चावा प्रचंड वेदनादायी असतो.थोड्या वेळाने आणखी एक चावा.आधी मांड्यांवर,मग हातांवर,पोटावर,सगळीकडे. अंधारात डोळे फाडून पाहतो तर जखमांनी भरलेल्या त्याच्या शरीरावर मोठाले मुंगळे डसलेले असतात. पायाच्या उघड्या पडलेल्या जखमांमधून ते शरीरात घुसत असतात.योसी वेड्यासारखा रात्रभर अंगावरचे मुंगळे झटकत,मारत,कातडी नसलेल्या पायांमधून त्यांना बाहेर काढत राहतो.तिथून उठून दुसरीकडे जायला हवं हे त्याला कळत असतं,पण पायांत शक्ती नसते.आणि दुसरीकडे म्हणजे कुठे जाणार? सगळीकडे अशा जीवघेण्या किड्यांचंच राज्य असतं.एवढी भयानक रात्र आजवर कुणाच्याही वाट्याला आली नसेल.ही रात्र आपण जिवंत राहणं अशक्य आहे असं योसीला वाटतं; पण अखेर ती रात्रही सरते.सकाळी उठून तो रात्री झोपलेल्या जागेकडे पाहतो,तर ती जागा नाना प्रकारच्या किड्यांनी भरून गेलेली असते.झालं त्याबद्दल दुःख किंवा राग व्यक्त करण्याएवढेही त्राण योसीच्या अंगात उरलेले नसतात.तरीही तो नदीच्या दिशेने चालत राहतो.बधीरपणे.अखेर त्याला नदीचा काठ दिसू लागतो.पण जसं जसं तो आसपासच्या खुणा बघू लागतो तसं लक्षात येतं की आपण फिरून फिरून पुन्हा त्याच जागी येतो आहोत. शेवटी न साहवून तो काठाशी अंग टाकून देतो आणि आकाशाकडे बघत अर्धा ग्लानीत,अर्धा विचारात पडून राहतो.
दिवस संपतो,रात्र होते.तीही संपते,पुढचा दिवस उजाडतो. 'आपल्याला जंगलात हरवून किती दिवस झाले?' योसी हिशोब करण्याचा प्रयत्न करतो. 'आज २० डिसेंबर आहे.म्हणजे तीन आठवडे आपण अॅमेझॉनमध्ये एकटेच भटकतो आहोत.' त्याच्या मनात विचार भरकटत राहतात. 'आता आपण इथेच पडून राहायचं.बहुतेक इथेच आपल्याला मरण येणार.आपलं काय झालं हे कधीच कुणाला कळणार नाही.आपला मृतदेहही कुणाच्या हाती लागणार नाही.पण असं पडल्या पडल्या माणसाला मरण येतं का? बहुतेक नसावं.म्हणजे आपल्याला अजूनही सुटकेची आशा आहे.आपण नदीजवळ आहोत.कोणी तरी आपल्या सुटकेसाठी येऊ शकतं.'
'आणि समजा,कोणी आलंच नाही तर?' योसी विचार करतो,'कोणी नाही आलं तरी आपण जगू.जंगलातली फळं खाऊन,अंडी खाऊन आपण जगू शकतो.पायाच्या जखमा बऱ्या झाल्या की मी बांबू तोडेन आणि या नदीकाठी छोटं घर बांधेन.मग मला कुणाचीही भीती नाही.कुठून तरी जंगली कोंबड्यांची अंडी मिळवेन.त्या कोंबड्या वाढवेन.त्यांच्यासाठी खुराडं बांधन.मग खाण्याचाही प्रश्न मिटला.मी जंगलचा राजा असेन.अॅमेझॉनच्या जंगलात एकटा राहणारा टारझन ! मी जगेन.'या विचारांनी त्याला काहीसा दिलासा मिळतो. आता परिस्थिती त्याच्या हातात असते.तो अगतिक नसतो.कोणी सुटका करायला आलं नाही तरी त्याचे तो निर्णय घेणार असतो.त्याचा तो जगणार असतो. 'जंगलातलं जगणं अगदीच काही बोअरिंग नसावं.' योसी विचार करतो.अशा विचारांमध्येच आणखी एक दिवस संपू लागतो.
संध्याकाळी झोपण्याच्या तयारीत असताना योसीला कसला तरी आवाज ऐकू येतो.'विमान किंवा हेलिकॉप्टर.पण काहीही असलं तरी ते आपल्याला शोधून काढू शकणार नाही.शिवाय हा आवाज म्हणजेही भासच असणार.' तो विचार करतो.नंतर त्याला वाटतं, हा आवाज म्हणजे एखादी मोठी माशी असावी. कानाभोवती स्कार्फ घट्ट गुंडाळून तो पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करतो;तरीही आवाज काही केल्या कमी होत नाही,उलट वाढतच जातो.हा आवाज खराच आहे की काय,असा विचार करत योसी डोकं बाहेर काढून नदीच्या दिशेने बघतो,तर एका होडीत चार माणसं बसलेली त्याला दिसतात.हाहीभासच असणार, असा विचार करून तो डोक पुन्हा आत घालतो पण शंका नको म्हणून पुन्हा एकदा बघतो,तर त्याला पुन्हा तेच दृश्य दिसतं.नदीत खरोखरच होडी असते आणि त्यात खरोखरची माणसं असतात.त्या क्षणी योसी नदीच्या दिशेने धावत सुटतो.आता ना त्याला पायाला वेदना जाणवत असतात ना पळण्याचे श्रम.फक्त छाती भरून आनंद ! योसी हाक मारण्याचा प्रयत्न करतो; पण त्याच्या तोंडून आवाज फुटत नाही.मात्र,त्याच वेळी होडीतल्या चौघांपैकी एक मागे वळून पाहतो.तो केव्हिन असतो.बोट थांबवून तो धावतच योसीकडे येतो आणि त्याला मिठीत घेतो.योसी वाचलेला असतो,माणसांत परत आलेला असतो.जंगलातून सुटका झाल्यावर योसी केव्हिनसोबत ला पाझला परत येतो. तिथे मार्कस आणि कार्ल येऊन थांबले असतील अशी त्यांची खात्री असते,पण प्रत्यक्षात ते तिथे पोहोचलेले नसतात.आसपासच्या कोणत्याच शहरात ते पोहोचलेले नसतात.त्यामुळे योसीला ला पाझमध्येच ठेवून केव्हिन या दोघांच्या शोधात पुन्हा जंगलात जाण्याचं ठरवतो;पण त्या दोघांचा पत्ता लागत नाही.मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात हे चौघं ज्या ज्या वस्तीवर जाऊन आलेले असतात तिथल्या कोणालाच कार्ल मार्कस पुन्हा भेटलेले नसतात.त्या दोघांचा पुढे कधीच पत्ता लागत नाही.ला पाझमध्ये केव्हिन आणि योसीला कळतं,की कार्ल हा कुप्रसिद्ध गुन्हेगार असून बोलिव्हिया पोलिस त्याच्या शोधात आहेत.ही माहिती ऐकून दोघांनाही धक्का बसतो.त्यांना कार्लबाबत शंका येत असली,तरी तो आपल्याशी चांगलंच वागला,त्याने आपली काळजी घेतली हे दोघांनाही नाकारता येत नाही.पण कार्लने आपल्याला मोहिमेला येण्याचा आग्रह का केला हे मात्र त्यांना कधीच कळू शकत नाही.त्यांना सर्वाधिक वाईट वाटतं ते मार्कसचं.
मार्कसचं ऐकून ते वेळीच मागे फिरले असते तर कदाचित...
आणि नंतर...
अॅमेझॉनच्या जंगलातल्या तीन आठवड्यांमध्ये शरीरावर झालेला परिणाम भरून काढायला योसी घिन्सबर्गला पुढे तीन महिने लागले.पुढे शिक्षण पूर्ण करून मार्गी लागल्यावरही अॅमेझॉनचं जंगल योसीच्या मनातून गेलं नाही.आयुष्यातला भीषण काळ अनुभवायला लावणाऱ्या या जंगलाबद्दल त्याच्या मनात खरं तर भीती किंवा घृणा निर्माण व्हायला हवी,पण उलट दहा वर्षांनी तो पुन्हा अॅमेझॉनकडे ओढला गेला.तिथल्या जंगलाच्या संरक्षण-संवर्धनासाठी काम करू लागला.ज्या गावातल्या आदिवासींनी केव्हिनला योसीची सुटका करण्यासाठी मदत केली त्या सॅन जोसे गावातल्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी योसीने इंटर-अमेरिकन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने इको-फ्रेंडली कॉटेजेस सुरू करण्यात पुढाकार घेतला.आज योसीला अॅमेझॉन जंगलाचा आणि सॅन जोसे गावातल्या उचुपियामोनास जमातीचा ब्रँड अँबेसडर मानलं जातं.
जंगलातल्या अनुभवावर योसीने आजवर तीन पुस्तकं लिहिली आहेत.त्यातलं एक पुस्तक आज उपलब्ध आहे.या पुस्तकात दक्षिण अमेरिकेत येऊन ठेपल्यानंतरची संपूर्ण गोष्ट योसी सविस्तर सांगतो. सुरुवातीपासूनच हे पुस्तक आपला ताबा घेतं.मोहिमेचे छोटे छोटे तपशील,केव्हिन-मार्कस कार्ल या तिघांचे स्वभाव,मोहिमेच्या सुरुवातीच्या काळातल्या जंगलाची वर्णनं,सारं काही योसीने अशा साध्या पण प्रभावी शब्दांत केलं आहे की जणू आपल्या डोळ्यांसमोर ते सारं काही घडू लागतं.पण त्याहूनही विशेष म्हणजे योसीने शब्दबद्ध केलेला विचारांचा कल्लोळ.जंगलात एकट्याने काढलेल्या २१ दिवसांमध्ये बाहेर काय घडतंय ते जसं आपल्याला कळत राहतं तसंच त्याच्या मनात काय घडतंय हेही.त्या दिवसांमधल्या त्याच्या मनात घडलेल्या उलथा
पालथी आपल्यापर्यंत तितक्याच आवेगाने पोहोचतात आणि आपल्याही आयुष्यात किंचित का होईना,बदल घडवून जातात.
दिनांक २८.०४.२५ या लेखातील शेवटचा भाग..